डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मंदिर-मस्जिद : नवीन तोडगा कितपत योग्य?

मंदिर-मशीद वाद आणि गुजरातमधील हत्याकांड या पार्श्वभूमीवर मुस्लिम सत्यशोधक मंडळाने तणाव दूर करण्यासाठी सुचवलेला तोडगा आणि त्याचा प्रतिवाद करणारा अन्वर राजन यांचा लेख विचारमंथनासाठी छापत आहोत....
- संपादक
 

मुस्लिम सत्यशोधक मंडळाने देशात सध्या तणाव दूर करण्यासाठी जो तोडगा सुचवला आहे, त्या पत्रकात घेतलेल्या भूमिकेमागील धोके दाखवण्यापूर्वी काही गोष्टींची नोंद करणे गरजेचे वाटते. हाच तोडगा यापूर्वी मौलाना वालिदुद्दीन यांनी सुचवला होता. त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले होते, पण तोडग्याला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता.

यापूर्वी सय्यदभाई व प्रा.स.ह.देशपांडे यांनी एक तोडगा सुचवला होता की, अयोध्येतील वादग्रस्त जागेवर मुसलमानांचा मशीद बांधण्याचा अधिकार हिंदूंनी मान्य करावा व समान नागरी कायद्याला मुसलमानांनी मान्यता द्यावी. ती भूमिका चुकीचीच होती. पण आता तीही भूमिका सोडून ही नवीन चुकीची भूमिका मांडली जात आहे. काही वर्षांपूर्वी सय्यदभाईंच्या पुढाकाराने मंदिर-मशीद सुलए कमिटी करण्यात आली होती, पण त्या कमिटीचे पुढे काय झाले, याबद्दल कोणालाच काही माहिती नाही. या सर्व प्रकारांतून गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने न पाहण्याचा अपराध केला जात असल्याचे दिसत आहे.

नवीन तोडग्यात 1947 साली जैसे थे परिस्थिती मान्य करण्याचे हिंदूंना आवाहन केले आहे. पण शासनाने यापूर्वीच तसा अध्यादेश काढलेला आहे, याची नोंद घ्यायला हवी.

गोध्रा येथे रेल्वे डबा पेटवण्याची घटना अमानुष आणि निंद्यच होती. त्यानंतर गुजरातमधील हिंसाचार हा सर्व देशवासीयांच्या काळजाचा थरकाप उडवणारा आहे. जवळपास पावणेदोन महिने झाले पण हिंसाचार थांबत नाही. त्यातून निर्माण झालेल्या भीतीला बळी पडून विश्व हिंदू परिषदेच्या मागणीला उचलून धरणे म्हणजे हिंसाचारामागील उद्देश अप्रत्यक्षपणे सफल करणे होय; ते लक्षात घेतले पाहिजे. याच तर्काने आपण असे म्हणणार का काश्मीरमधील हिंसाचार थांबवण्यासाठी अतिरेक्यांच्या सर्व वैध-अवैध मागण्या मान्य कराव्यात? हिंसाचारातून निर्माण होणाऱ्या दहशतीला बळी न पडता त्याचा धैर्याने, शांततेने कठोरतेने व राष्ट्रीय एकात्मतेची भावना ठेवून मुकाबला करणे, याला पर्याय नाही.

हिंदूंचे प्रतिनिधित्व संघ परिवार, विश्व हिंदू परिषद व शिवसेना करीत आहे असे गृहीत धरणे चूक आहे. त्याचप्रमाणे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, बाबरी मशीद अ‍ॅक्शन कमिटी, किंवा तबलीग यांसारख्या संघटना सर्व मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करतात अशी भूमिका आम्हाला मान्य नाही. कोणताही एक गट वा एक संघटना कोणत्याही एका धार्मिक गटाचे प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार बाळगत नाही. सर्व भारतीय नागरिकांचे व्यासपीठ हे संसद आहे व सर्व वादग्रस्त बाबींचा निकाल लावण्याचा अधिकार घटनेला एकनिष्ठ राहून न्याय देणाऱ्या न्यायसंस्थेला आहे. याबाहेरच्या कोणत्याही शक्तिकेंद्राला मान्यता देणे धोकादायक आहे.

संघपरिवार व त्यांच्या सहकारी संघटना यांना राममंदिर बांधण्यामध्ये रस आहे असे आपण गृहीत धरतो हे बरोबर नाही. संघ परिवाराच्या स्थापनेपासून आजपर्यंत गेल्या 75 वर्षांत विभिन्न सबबी पुढे टाकून मुस्लिम व ख्रिश्चन धर्माविरुद्ध द्वेष निर्माण करून स्वतःची ताकद वाढवणे हा संघ परिवाराचा हेतू आहे. राममंदिराचा प्रश्न सुटला म्हणजे देशात शांतता नांदू देण्यासाठी संघ परिवार सहकार्य करेल, यावर कोणीच विश्वास ठेवू शकत नाही. संघ परिवाराचे राजकारण ओळखून आपण धर्मनिरपेक्षता बळकट करणे म्हणजेच राष्ट्र बळकट करणे व समाजाचे ऐक्य कायम टिकवण्यासाठी प्रयत्न करणे, यांसाठी अधिक कष्ट करणे हा मार्ग आहे. संघाच्या भाषेत पुरोगामी संघटना बोलू लागल्यास चुकीच्या भूमिकेला मान्यता दिल्यासारखे होईल.

या देशातील बहुसंख्य जनता धार्मिक आहे. आपापले धर्म पाळताना इतरांच्या धार्मिक भावनेचा आदर करण्याची आपली परंपरा आहे. ही परंपरा नष्ट करण्याचा प्रयत्न संघपरिवार हिंदुत्वाच्या नावाने व तबलीगसारख्या संघटना इस्लामच्या नावाने करीत आहेत, मुसलमानांवर सर्व पातळीवरचा आर्थिक व सामाजिक बहिष्कार घालून या समाजाची कोंडी करण्याचा प्रयत्न संघपरिवार करीत आहे. त्यातून त्यांना द्विराष्ट्रवादाचा सिद्धांतच बळकट करायचा आहे असे दिसते. तसे झाल्यास उच्च जातींना सत्ता, संपत्ती व प्रतिष्ठा ताब्यात ठेवण्यासाठीच्या धर्मावर आधारित हिंदू राष्ट्र निर्माण करणे सुकर होईल हा त्यामागील डाव आहे. राखीव जागांविरोधी आंदोलनात सहभागी असलेले संघाचे स्वयंसेवक गुजरातचे मुख्यमंत्री आहेत. एकाच वेळी दलित व मुस्लिम तसेच ख्रिश्चनांच्यावर दहशत बसवण्याचा संघ परिवाराचा डाव आहे.

राममंदिर विश्व हिंदू परिषदेला देऊन टाकण्याच्या भूमिकेला हिंदू समाजातही पाठिंबा नाही. अशी भाषा वापरणे म्हणजे दंगलीत बळी जात आहेत त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे होईल. बकासुराची भूक कधी थांबत नसते, त्याला एकदा गाडीभर अन्न व नरबळी दिले तर दुसऱ्या दिवशी नवीन गाडी व नवीन नरबळी द्यावा लागतो. धर्मांध शक्तीचे हे बकासुरी स्वरूप ओळखायला हवे. मूळ मुद्दा मंदिर-मशिदीचा नसून भारतीय नागरिकांमध्ये हिंदु-मुस्लिम अशी उभी फूट पाडण्याचा हा डाव आहे. या डावाला मुस्लिम सत्यशोधक मंडळ व त्यांना पाठिंबा देणारे मान्यवर हे बळी पडलेले आहेत याचे दुःख वाटते व काळजीही वाटते.

Tags: मंदिर-मस्जिद वाद आणि गुजरात मधील हत्याकांड मुस्लिम सत्यशोधक मंडळ अन्वर राजन Gujarat riots Temple Masjid issue Muslim satyashodhak Mandal Anwar Rajan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अन्वर राजन

सामाजिक कार्यकर्ते 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके