डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

समजून घ्यावे की सर्व ऊर्जा अपुरी आहे!

भारतात अणुकराराविषयी एवढी चर्चा कशासाठी? वर निवेदन केल्याप्रमाणे जरी ऊर्जा प्राप्त होणार असली तरी ते सर्व करायला बराच मोठा कालावधी व खर्चही लागेलच. आपण मात्र दररोज वाचतो की साठ वर्षे स्वातंत्र्यास होऊनही वीजकपात, कित्येक खेड्यात वीज नाही, विजेअभावी औद्योगिक व शेती उत्पन्नावर परिणाम वगैरेंबाबत समजून घ्यावे की ही सर्व ऊर्जा अपुरी आहे. चांगली प्रगती व्हायची असेल तर विजेचा अखंड पुरवठा कायमस्वरूपी व्हायला हवा. ह्यासाठी अणुऊर्जा महत्त्वाची आहे. थोड्या अवधीत प्रचंड पुरवठा अणुऊर्जेपासून मिळू शकतो. अपरंपारिक नूतनीकरण होणारी सौर, वारा, लाटा, भूगर्भातील उष्णता यांचादेखील उपयोग होणे जरूरीचे आहे.

पृथ्वीवरील सर्व प्राण्यांना ऊर्जेची जरूरी असते. ऊर्जेशिवाय प्राणी, जगू शकत नाहीत. यात सर्व प्राणी येतात. अगदी जीवाणू हत्तीसारखे जंगली प्राणी, वनस्पती व माणसेही. यातील काही जमिनीवर, काही पाण्यात तर काही हवेत राहतात. यांचे जीवन काही क्षणांपासून कित्येक वर्षे असते. त्या सर्वांना ऊर्जा मात्र आवश्यक आहे, वनस्पती स्वतः सूर्याच्या ऊर्जेपासून अन्न तयार करतात. प्राण्यांना हे शक्य नसल्यामुळे त्यांना वनस्पतीवर अवलंबून रहावे लागते. 

पृथ्वीतलावरील ऊर्जा कोणती? 

ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत म्हणजे सूर्य. अखंड ऊर्जा सूर्यापासून मिळते. जमिनीतून मिळणारे क्रूड ऑईल, कोळसा, वाऱ्यापासून मिळणारी तसेच पाण्याच्या लाटांपासून निर्माण होणारी ऊर्जा उपयुक्त आहे. याशिवाय पृथ्वीच्या अंतरंगात खोलवर तापमान भरपूर आहे, त्याचाही उपयोग होऊ शकतो. नद्यांचे पाणी अडवून त्यापासून जलविद्युत प्रकल्प ऊर्जा देतात. यांपैकी क्रूड, कोळसा यांची ऊर्जा कायमस्वरूपी नाही. एखाद दुसऱ्या शतकानंतर ती संपेलही. शिवाय क्रूड, कोळसा याची निर्मिती वनस्पतीपासूनच झालेली असते. यात सूर्यप्रकाशाची ऊर्जा उपयोगी पडलेली आहे. 

मात्र जलविद्युत ऊर्जा किंवा सौर, वारा, समुद्राच्या लाटा यांपासून मिळणारी ऊर्जा अखंड आहे. या सर्व स्रोतामध्येदेखील सूर्याचे कार्य कारणीभूत आहे हे विसरता येणार नाही. तसे बारकाईने पाहिल्यास आपण सूर्य खात असतो व शास्त्रानुसार आता नाही, पण कित्येक कोटी वर्षांनी सूर्याची उष्णता कमी होत जाणार. यात घाबरायचे कारण नाही, पुढचे पुढे. पण तोपर्यंत मनुष्यप्राणी गप्प थोडाच बसणार? त्याचे संशोधन व तंत्रज्ञान नवीन झेप घेत राहील. 

हिरव्या वनस्पतीच्या पानांच्या पेशींमध्ये हरितद्रव्य, क्लोरोफिल असते. हे द्रव्य जमिनीतून मूळावाटे घेतलेल्या पाण्याचा सौरऊर्जेपासून विघटन करते व त्यातील हायड्रोजन व हवेतील कार्बन डाय ऑक्साइड मधील कार्बन यांचा संयोग करून साखर बनवतात आणि अविरत प्राणवायू हवेत सोडतात. प्रगत जीवतंत्राद्वारे कदाचित मनुष्यामध्येही हरित द्रव्याप्रमाणे एखादे द्रव्य निर्माण होऊ शकते. आताच अनैसर्गिक हरितद्रव्य तयार करण्याचे प्रयत्न चालू आहेत. तसे पाहिल्यास वनस्पतींचा मनुष्याला फार मोठा आधार आहे. त्या हवेतील कार्बनडायऑक्साईड घेऊन हवेत शुद्ध प्राणवायू सोडतात.

आपणास ऊर्जा पाहिजेच, आपल्या शारीरिक वाढीसाठी, हालचालीसाठी, श्वसनासाठी, विचारासाठी आपण अन्न ग्रहण करतो. श्वसनाद्वारे प्राणवायू वापरला जातो व ग्रहण केलेल्या अन्नापासून ऊर्जा मिळते आणि कार्बनडायऑक्साईड बाहेर टाकला जातो. शारीरिक व मानसिक क्रियेसाठी अन्नाचा उपयोग होतो. त्या अन्नात वनस्पतींनी सूर्यापासून ऊर्जा वापरलेली असते, पर्यायाने त्या ऊर्जेचा वापर आपण करतो व बाहेर मात्र वातावरणास हानिकारक कर्ब बाहेर टाकतो. 

हे ठीक आहे, पण आपण काँक्रीटची घरे बांधतो, लोखंडाचा उपयोग करतो, मोठमोठ्या यांत्रिक पद्धतीने तयार झालेला कपडा वापरतो. याशिवाय प्रवासासाठी वाहने वापरतो, रस्ते तयार करतो, इत्यादी सर्वासाठी ऊर्जा वापरली जाते. कित्येक चैनीच्या बाबीवर त्या निर्माण करण्यास पायाभूत ऊर्जा लागते व त्या वस्तू चालविण्यासाठी सतत ऊर्जेचा वापर केला जातो व ह्या सर्व क्रियेमधून वातावरणाची न भरून येणारी हानी होते. विशेष म्हणजे वातावरणातील तापमान वाढते, उत्तर ध्रुवावरील व हिमालयावरील बर्फ वितळत जाते. पुढे ह्याचे दुष्परिणाम आपणास भोगावे लागतील. हा सुनामीसारखा आघात होऊ शकतो, पिकांच्या उत्पन्नावर परिणाम होईल. आपण विनाशाकडे जात आहोत काय? आपण जीवनशैली अशी स्वीकारत आहोत की ज्यामध्ये नैसर्गिक साधनसामग्रीचा ऱ्हास होत आहे, असे सर्व देशातील लोकांना वाटत आहे. ही मंडळी एकत्र येऊन या समस्येचा मुकाबला कसा करायचा ह्याचा विचार करू लागली. 

क्वेट्टा येथे भरलेल्या जगातील सर्व देशांच्या प्रतिनिधींनी प्रश्नाचे गांभीर्य ओळखून त्यावर कार्बन निर्मिती कमी करण्याबद्दल सुचविले. विशेषत: प्रगत देशांनी ह्यावर किती प्रमाणात हे काम करावयाचे ह्याची बंधने घातली आहेत. तसेच जगातील कर्ब कमी करण्यासाठी वृक्ष लागवडीचा उपाय मान्य करून जेथे वृक्ष लागवड जास्त प्रमाणात होईल, तेथील लोकांना 'कार्बन क्रेडिट' द्यायचे मान्य केले आहे. 'कार्बन फूटप्रिंट' वाढू द्यायचा नाही असे सर्वांनी मान्य केले. मात्र कोणत्याही देशाची आर्थिक प्रगती उद्योग उत्पन्न, औद्योगिकीकरण याशिवाय होणार नाही असे मानले तर विकसित देशांनी ह्यामध्ये बराच पल्ला गाठला आहे, भरपूर कर्ब वातावरणात सोडला आहे व विकसनशील देश- चीन, भारत, ब्राझील, मेक्सिको इत्यादींना कर्ब कमी करण्याचा पर्यायाने विकासाची गती रोखण्याचा सल्ला देत आहेत.

भारतामध्ये क्रुड ऑईल क्रूड ऑइल

उत्पन्न ३३ मिलियन टन = ६,६०,००० बॅरल दर दिवशी. 
वापर १२९ मिलियन टन (२००७-०८)
आयात १२१ मिलियन टन (२००७-०८)
आयातीचा खर्च ११० ते १२० बिलियन डॉलर्स = ४.५ ते ५ लाख कोटी रुपये.
श्रीमंत प्रगत देश जैविक तेल वापरायला लागले. हे जळण तयार करण्यास मका, सोयाबीन ह्यांचा प्रामुख्याने वापर करतात. ह्याचा परिणाम मक्याचा भाग वाढण्यात झाला तो मका आफ्रिकेतील गरीब देशांना परवडणारा नाही. ह्याचा परिणाम गरीब देशातील ३० लाख लोकांवर झाला. मध्य आशियातून तेलाची आयात, भाव वाढविल्यामुळे परवडत नाही. मका तेलासाठी वापरतात, त्यामुळे अमेरिकेत जो मका चार डॉलरला बुशेल होता तो सहा डॉलर झाला. हवामानातील कार्बन वाढल्यामुळे तापमान वाढत आहे. हे हिमालयात दरवर्षी ०.०६C वाढत आहे. नद्यातील पाणी वाहत जाऊन नैसर्गिक तळी फुटली व उपयुक्त पाणी ३० ते ६० मीटरने कमी झाले. जैविक तेल इथेनॉलपासून बनवता येते व इथेनॉल ऊस रसाच्या मळीपासून तयार होते, तसेच मक्यापासूनही होते. त्यामुळे अन्न का तेल यावर वाद सुरू झाला आहे.

जगातील ऊर्जेचा वापर १९७० पासून ८४ टक्क्यांनी वाढला आणि अनुमान आहे की पुढील २० वर्षांत तो आणखी ६० टक्यांनी वाढेल. तेल काढून ते निर्यात करणारे देश- मध्य आशियात आहेत, यांच्याकडे जगातील तेलापैकी ८० टक्के हिस्सा आहे. भारतातील हरित क्रांतीमुळे आपण अन्नधान्यात स्वयंपूर्ण झालो; परदेशी धान्यावर अवलंबून रहावे लागेनासे झाले खरे. परंतु हरित क्रांतीमधील धान्याच्या पिकांच्या वाणांना मोठ्या प्रमाणात रासायनिक खते व कीड-रोगासाठी विषारी औषधे वापरावी लागतात. यांच्या बेदरकार व सततच्या वापरामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. एकतर अन्नधान्याचे उत्पन्न पुढे वाढेना व स्थिर होऊ लागले. रासायनिक खतांचा बेसुमार वापरामुळे जमिनी खारवट व नापीक बनू लागल्या तर जमिनीतील पाणी विषारी बनून ते मनुष्यास घातक बनले आहे. 

यंदाच्या वर्षी अन्नधान्याचे उत्पन्न खूप वाढले. (२२७ मिलियन टन) असले तरी दरमाणशी त्याचे प्रमाण पुरेसे नाही. किंबहुना लोकसंख्येच्या वाढीपुढे अन्नधान्याची वाढ कमी पडू लागली आहे. रासायनिक खते व औषधे बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जेचा वापर केला जातो, तर काही प्रमाणात ती आयातही करावी लागतात. यासाठी सेंद्रीय शेतीचा वापर करणे इष्ट होणार आहे. मात्र याबाबत अनेक वाद आहेत, विशेष म्हणजे FAO (Food and Agricultural Organization) प्रमाणे गुरेढोरे मोठ्या प्रमाणात मिथेन हवेत सोडतात. तसेच भाताचे पीकही मिथेन निर्माण करते. हे खरे असले तरी गुरेढोरे साधनसंपत्ती मोठ्या प्रमाणात वाढवतात. भात तर जगातील २/३ लोकांचे अन्नधान्य आहे, शिवाय भात पिकाची जमिनीला सेंद्रीय खत मिळते. भाताचा पेंढा खाऊन गुरे सेंद्रीय पदार्थ जमिनीला देऊ शकतात.

भारतात तर गुरांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे हे विसरता येणार नाही. भारतातील १४० लक्ष बैलगाड्यामधून एकूण मालवाहतुकीपैकी २/३ माल वाहिला जातो. एकूण शेतीच्या शेतकामाच्या मशागतींपैकी २/३ मशागत बैलांनी होते. सर्व गुरांच्या वापरातून भारतात दरवर्षी १०,००० कोटी रुपयांचे काम होते, ज्यासाठी क्रूड वापरल्यास ते ६० लक्ष टन एवढ्या प्रमाणात लागेल. भारतात गुरांचे शेण ८००० लक्ष टन तयार होते यापैकी बरेचसे शेणखतात रूपांतरित होऊन शेतात वापरले जाते. मिथेन जनावरांपासून होत असला तरी त्यांच्याकडून खूप मोठ्या प्रमाणात शेतीतून निर्मिती होते व शिवाय हवेतील कार्बनचा त्यात वापर केला जातो. हे सर्व लक्षात घेता गुरापासून निर्माण होणारा मिथेन, रासायनिक खतांची निर्मिती आणि वाहतुकीत तयार होणाऱ्या मिथेनच्या मानाने केवळ ४% असतो.

एकूण ऊर्जेच्या पुरवठ्यासाठी अनेक विचार व उपाय मांडले जातात. पहिल्या पिढीतील तंत्रज्ञानात स्टार्च, भाजीपाला, तेल किंवा जनावरांची चरबी वापरतात. पण दुसऱ्या पिढीतील तंत्रज्ञानात बिगरअन्नाचा जसा भाताचे ब्रान (तांदळावरील व तुसाच्या आतील पातळ पापुद्रा) भाजीपाल्यातील तुकडे, पामतेल, मक्याचे तेल, मासे इत्यादी वापरतात. रान एरंडी (जेट्रोफा)चे बी ह्यातूनही तेल निर्माण करून ते वापरतात. सेल्युलोसपासूनही पेट्रोल निर्माण करता येते, परंतु काही लोकांचे म्हणणे आहे की ह्या सर्वांचा जनावरांसाठी वापर होऊ शकतो. लाकडाचे ढलपे व पिकांचे उर्वरित भाग यापासूनही ऊर्जा निर्माण करतात. कोणीतरी कॉफीबियांचे टरफले वापरून ऊर्जानिर्मितीचा प्रयोग केला. परंतु सध्या मोठ्या प्रमाणात मका, सोयाबीन (अमेरिका), ऊस (ब्राझील), पामतेल (पूर्व आशिया) यांचा अन्नधान्याच्या विरोधात जमिनीचा वापर करून ऊर्जानिर्मिती होते. केएलएम ह्या डच विमान कंपनीने शेवाळापासून ऊर्जानिर्मितीचा मार्ग स्वीकारला. त्यांच्यामते मोठ्या यंत्रणेतून शेवाळ निर्मिती करून त्यापासून काढलेले तेल स्वस्त (१०० डॉलर एका बॅरलला) पडते, कारण सध्या आयात तेलाचा भाव १४० डॉलर आहे. 

काहीजण मांसाहारी आहार घेतात. यामुळे अधिक ऊर्जा वापरली जाते, कारण एक किलो मांस तयार होण्यास गुरांना ८ ते १० किलो वनस्पतीअन्न द्यावे लागते.

आधुनिक जीवन ऊर्जेशिवाय अशक्य आहे, साधे उदारण घेऊ. आपण शहरात घरातील नळाने आलेले पाणी पितो. प्रथम म्हणजे जास्त पावसाच्या भागात पाणी साठविण्यासाठी धरणे बांधली जातात. त्यातील पाणी कालव्याने, मोठ्या नळांनी शहरात येते. तेथे त्याचे शुद्धीकरण करतात व पंपाच्या दाबांनी विविध भागात ते पुरविले जाते. प्रथम धरण बांधायला प्रचंड ऊर्जा लागते. त्यातील माती काढणे, दगड, सिमेंट आणून बंधारा उभारणे यासाठी ऊर्जेचा खूप वापर होतो. शिवाय धरणापूर्वी त्या जमिनीवर गुजराण करणाऱ्यांना आपले वंशपरंपरागत हक्काचे ठाणे सोडावे लागते. त्या ठिकाणच्या प्राणी, पक्षी यांची हकालपट्टी होते. जमिनीची धूप मोठ्या प्रमाणावर होते. नैसर्गिक संपत्तीचा विनाश होतो. यात पायाभूत ऊर्जा खर्च होते. शिवाय दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी ऊर्जा लागतेच. हेच प्रमाण रस्ते वनीकरण, रेल्वे वगैरेंसाठी असते. ही सर्व ऊर्जा पुनःनिर्माण होणारी नसते, खनिज क्रूड मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.

पुन्हा निर्माण होणारी ऊर्जा सौर, वारा, पाण्याच्या लाटा काही प्रमाणात उपयुक्त आहे, मात्र त्यासाठी सध्या तरी खर्च खूप आहे. सध्या २०० लिटर बंबासाठी ५०,००० रुपये लागतात. हा बंब १५-२० वर्षे टिकला तरी विजेचा तेवढा खर्च होणार नाही. शिवाय बंब बनविताना खूप ऊर्जा वापरावी लागते. पावसाळ्यात ढग असताना ह्या बंबाचा तेवढा उपयोग होत नाही. वाऱ्याच्या बाबतीतही प्रश्न आहेत. ठराविक ठिकाणी हे फिरणारे पंखे चालतात, तेथे किमान वाऱ्याचा वेग १५ कि.मी. ताशीपेक्षा जास्त लागतो. म्हणजेच हे सतत चालत नाहीत. ज्या शेतकऱ्यांकडे गुरेढोरे व लहानसे शेत आहे त्यांना गोबरगॅस स्वयंपाक तसेच दिव्यांची योजना होऊ शकते. शहरात सौरकंदील, सौर कुकर छान चालू शकतात. अमेरिकेचे भूतपूर्व उपराष्ट्रपती अल् गोर (नोबेल पारितोषिक मिळविलेले) यांचा मात्र ठाम विश्वास आहे की, अपारंपरिक अशा सौर, वारा, लाटा इत्यादींपासून मिळणारी ऊर्जा अमेरिकेतील सर्व ऊर्जेची गरज भागवेल.

टाटा केमिकल यांनी हैद्राबादच्या आंतरराष्ट्रीय कृषि संस्थेशी करार करून गोड्या ज्वारीपासून इथेनॉल करावयाचे ठरवले आहे. भारतात साखर कारखान्यातून निर्माण केलेला इथेनॉल जळणतेलात १० टक्के वापरण्यात येणार आहे. यामुळे आपले ८०० लक्ष लिटर तेल वाचेल. तसे पाहिल्यास वारा, सौर, लाटा, पृथ्वीच्या पोटातील ऊर्जेबरोबर ऊसाच्या मळीपासून तसेच शेतातील काडीकचरा, रानटी गवत, शेवाळ, इत्यादींपासून ऊर्जा निर्माण करून आपली गरज भागविणे अगत्याचे होणार आहे.

माणशी कार्बन निर्मिती भारतात इतर देशांच्या मानाने कमी आहे. अमेरिका माणशी २०.१० मेट्रिक टन, युरोप ९.४० मेट्रिक टन, जपान ९.८७ मेट्रिक टन, भारत १.०२ मेट्रिक टन. मात्र देशाचा विचार केल्यास भारताचा क्रमांक जगात चौथा लागतो, चीन, अमेरिका व रशिया यांच्यानंतर.

'जी-८' राष्ट्रांची (जपान, इटली, रशिया, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, अमेरिका व कॅनडा) नुकतीच जपानमध्ये बैठक होऊन त्यात कार्बननिर्मिती २०२० पर्यंत निम्म्याने घटवायचे ठरवले आहे. इतर पाच राष्ट्रे (भारत, चीन, ब्राझील, मेक्सिको व द. आफ्रिका) या चर्चेसाठी हजर होती. या सभेत भारताचे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी त्वरीत कार्बननिर्मिती घटविण्यापेक्षा भारत आपल्या प्रगतीकडे अधिक लक्ष देणार आहे असे स्पष्ट केले.

भारत सरकारने नुकतेच आपले हवामान बदलाबद्दल धोरण जाहीर केले आहे. त्यात आठ मोहिमांचा समावेश केला आहे. ऊर्जेची कार्यकुशलता वाढविणे, पुनर्निर्मिती ऊर्जास्रोतांची वाढ करणे, शास्त्रीय व तांत्रिक उपायांचा शोध, पाण्याचे संधारण करणे, हिमालयातील वातावरणाच्या बदलाचे संरक्षण, बदलत्या हवामानाच्या पायऱ्या व सर्वांसाठी आवश्यक अर्थकारण. 

अशी सर्व परिस्थिती असताना भारतात अणुकराराविषयी एवढी चर्चा कशासाठी? वर निवेदन केल्याप्रमाणे जरी ऊर्जा प्राप्त होणार असली तरी ते सर्व करायला बराच मोठा कालावधी व खर्चही लागेलच. आपण मात्र दररोज वाचतो की साठ वर्षे स्वातंत्र्यास होऊनही वीजकपात, कित्येक खेड्यात वीज नाही, विजेअभावी औद्योगिक व शेती उत्पन्नावर परिणाम वगैरेंबाबत समजून घ्यावे की ही सर्व ऊर्जा अपुरी आहे. चांगली प्रगती व्हायची असेल तर विजेचा अखंड पुरवठा कायमस्वरूपी व्हायला हवा. ह्यासाठी अणुऊर्जा महत्त्वाची आहे. थोड्या अवधीत प्रचंड पुरवठा अणुऊर्जेपासून मिळू शकतो. 

अपरंपारिक नूतनीकरण होणारी सौर, वारा, लाटा, भूगर्भातील उष्णता यांचादेखील उपयोग होणे जरूरीचे आहे. पृथ्वीवरील एकूण जळणाचे ३/४ भाग खनिज कोळशापासून होऊ शकतो, आणि तो 5x106मे.ट. याचा ८०% भाग २२५० पर्यंत संपेल. एकूण क्रूड 2000x19  बॅरल असावे व ते ह्या शतकापर्यंत पुरावे, तसेच नैसर्गिक ज्वालाग्रही वायू ३४०x1012  घ. मी. आहे ते शतकापर्यंत पुरू शकतो. सौरऊर्जा तशी प्रचंड प्रमाणात सूर्यापासून मिळते, १.८x1011मिलियन ज्युल, पण या ऊर्जेचा उपयोग थोडाच केला जाऊ शकतो. ह्या सौरऊर्जेचा फायदा म्हणजे ती प्रदूषण करीत नाही. मात्र फार अल्प दराने मिळत असल्यामुळे ती घेण्यासाठी फार मोठे क्षेत्रफळ लागते. शिवाय ती २४ तास किंवा ३६५ दिवस मिळू शकत नाही. या कारणाने अणुऊर्जेची आवश्यकता आहे. 

अणुऊर्जेसाठी १ टन युरेनियम वापरले तर सुमारे ३० लाख टन कोळशाइतकी ऊर्जा मिळू शकते. अणुऊर्जा तयार करण्यास प्रचंड अणुभट्ट्या व अणू फोडण्यासाठी युरेनियम सारखे धातू लागतात. भट्ट्यासाठी परदेशातील तंत्रज्ञान विकत घ्यावे लागेल, तसेच युरेनियम वगैरे आयात करावे लागतील. परंतु थोड्याच अवधीत हे साध्य होऊ शकते. ह्या दृष्टीने भारताने अमेरिकेशी करार करावयाचे ठरविले. कालांतराने भारतात अणुभट्ट्या निर्माण करू शकतो व निर्यातही करू शकतो. मात्र भट्टीत उरणाऱ्या राखेचे व्यवस्थापन करणे जबाबदारीचे आहे, पण कमीत कमी काळात भारत खूप प्रगती करू शकतो.

अणुऊर्जा निर्माण करायला आपल्या देशात सुरुवातीला खूप खर्च येणार, परंतु कालांतराने ही ऊर्जा सर्वात स्वस्त पडणार आहे. इराणमधून पाईपमधून गॅस आणला तरी तो गॅस येथे पडणाऱ्या किमतीपेक्षा अणुऊर्जा काही प्रमाणात कालांतराने स्वस्त पडणार आहे. दरमाणशी २५०० कि.वॅ. ऊर्जा आपण २०३१-३२ मध्ये निर्माण करण्यासाठी अणुऊर्जा जरूरीची आहे. जगातील ऊर्जा माणशी २५०० कि.वॅ. ही २००३ मध्येच प्रगत देशातील वापरामुळे तयार झाली. भारतात सध्या १,४४,००० मेगावॅट ऊर्जा निर्माण होत आहे, आणि जरूरी आहे ९,६०,००० मेगावॅटची.

एकूण अणुऊर्जा हा जरी एक महत्त्वाचा स्रोत असला तरी इतर अपारंपारिक पद्धतीने ऊर्जा निर्माण करणे, त्यात संशोधन करणे चालू ठेवलेच पाहिजे. विशेषत: काडी-कचरा, टाकाऊ सेंद्रिय पदार्थ हा महत्त्वाचा स्रोत आहे.

Tags: खनिज कोळशा. भूगर्भातील उष्णता लाटा वारा सौर coal. अणुऊर्जा geothermal waves wind solar nuclear energy weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

द. गो. भापकर,  पुणे ४११०१६.

लेखक म.फुले कृषि विद्यापीठाचे संचालक संशोधन म्हणून निवृत्त झाले आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके