डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सध्याच्या व्यवस्थेत विषम वागणुकीला ज्यांना सामोरे जावे लागते आहे, त्यांचा लढा विषारी पौरुषाच्या (toxic masculinity) विरुद्धचा आहे, हा अजून एक धागा आहे. शिवाय संस्थात्मक पातळीवर होणाऱ्या भेदभावाचीही (institutional discrimination) दखल घ्यायला लावणारा आहे. इथे एक आवर्जून लक्षात घेतले पाहिजे की मुद्दा पुरुषांविरुद्ध असण्याचा, पुरुषांच्या चुका दाखवण्याचा नाही. स्त्रियांचा लढा एक प्रकारे या सगळ्या चर्चेचा केंद्रबिंदू राहिला आहे. याबद्दलही समाजातल्या वेगवेगळ्या गटात राग-लोभ दिसून येतील. LGBTQ गटातल्या लोकांचे प्रश्न आणि स्त्रियांचे प्रश्न एकाच प्रकारचे नसून अतिशय वेगळे आहेत असे ठामपणे म्हणणारे गट सातत्याने दिसतात. तर एकूणात हा सगळाच लढा (स्त्रिया आणि इतर जेन्डर गटातल्या व्यक्ती) पुरुषप्रधानतेविरुद्ध, toxic masculinity विरुद्धचा आहे असाही एक मतप्रवाह दिसतो.

स्त्रिया वापरत असलेली भाषा आणि स्त्रियांबद्दल वापरली जाणारी भाषा याचा विचार या लेखमालेत आपण करत आलो आहोत. स्त्री-पुरुषांच्या भाषेची वैशिष्ट्ये, त्यातले फरक इथपासून ते विविध प्रकारच्या भाषिक हिंसेपर्यंत अनेक मुद्यांची आणि उदाहरणांची चर्चा इथे केली गेली. याआधीच्या लिखाणात (काही अपवाद वगळता) भाषा-वापराचे हे सर्व मुद्दे तपासून बघत असताना मुख्यत: स्त्री आणि पुरुष अशा दोनच गटांचा विचार केला. मात्र प्रत्यक्षात भाषेच्या वापराचे, त्यातल्या फरकांचे, विषमतेचे मुद्दे हे फक्त स्त्री-पुरुष अशा दोनच गटांचे नाहीत. त्याचे स्वरूप पुष्कळ व्यापक आहे. भाषेचे मुद्दे आणखी खोलात जाऊन समजून घेण्याआधी लिंगभावाच्या (Gender) मांडणीचे काही मुद्दे समजून घेतले पाहिजेत.

स्त्रियांच्या सबलीकरणाचे मुद्दे हे कायम त्यांना मिळणारी (किंवा न मिळणारी) आरोग्यसेवा, आर्थिक स्वातंत्र्य, शैक्षणिक संधींचा अभाव आणि इतर संधींचा अभाव किंवा मर्यादा याभोवती गुंफलेले दिसतात. या सगळ्या चर्चेमध्ये जे निर्णय घ्यायचे ते स्त्रियांच्या संदर्भातले असतात, ज्या कृती करायच्या आहेत त्या स्त्रियांबद्दल असतात. उदाहरणार्थ- स्त्रियांना शिक्षण मिळेल अशी योजना राबवणे, स्त्रियांना विविध प्रकारचे आरक्षण पुरवणे, स्त्रियांना स्वसंरक्षणाचे धडे देणे इत्यादी. जास्त संख्येने स्त्रिया शिकल्या, जास्त स्त्रियांना नोकरीच्या संधी मिळाल्या, अनेक स्त्रियांना आपण हल्ला झाल्यास तो परतवून लावू शकतो असा विश्वास निर्माण झाला की, लिंगभेदाचे प्रश्न संपणार आहेत किंवा आटोक्यात येणार आहेत, असा विश्वास या सगळ्या कृती-निर्णयांमधून दिसतो. अर्थातच, वास्तव तसं नाही. वरीलप्रमाणे बदल होऊ नयेत असा मुद्दा नाही, मात्र वरील बदल पुरेसे निश्चित नाहीत. इंग्रजीमध्ये याला necessary but not sufficient असं म्हटलं जातं. स्त्री-पुरुषांमध्ये असणारी असमानता ही बऱ्याचदा त्यांच्यात जे अधिकाराचे-सत्तेचे असमान वाटप झाले आहे, त्यामुळे अस्तित्वात असते. या  असमतोलाला धक्का देण्यासाठी सर्व ऊर्जा केवळ स्त्रियांच्याच प्रश्नांवर केंद्रित करून चालणार नाही, असे आता लक्षात येऊ लागले आहे. 

लिंगभेदाच्या प्रश्नांना हात घालायचा असेल,  तर त्यासाठीचे भागधारक कोण आहेत या प्रश्नाकडेही पाहिले पाहिजे. या प्रश्नाचे सोपे उत्तर म्हणजे, पुरुष. स्त्रियांइतके भीषण नसले तरी पुरुषप्रधानव्यवस्थेचे दुष्परिणाम पुरुषांनाही अनुभवावे लागतात. शिवाय आहे त्या व्यवस्थेतून ज्या मानसिकतेचे मुलगे आणि पुरुष निपजताहेत, ते स्त्रियांसाठी आणि एकूण समाजासाठीही फारसे आशादायक नाहीत, ही बोचरी जाणीवही आहे. पुरुषांसंदर्भातल्या मुद्यांचे आणखी काही बारकावे आपण बघणार आहे. मात्र त्याआधी हे लक्षात घेऊ या की, स्त्री आणि पुरुष अशा दोनच (gender identity) गटांत आपण विभागलेलो नाहीत. ज्या व्यक्ती स्वत:ला स्त्री किंवा पुरुष यातली कोणतीच संज्ञा योग्य समजत नाहीत, अशा व्यक्तींसंदर्भातले मुद्दे समजून घ्यायला हवेत. खाली दिलेल्या चित्रात अगदी सोप्या इंग्रजीमध्ये हे सगळं स्पष्ट केलं आहे. 

LGBTQ यापलीकडे जाऊनही लैंगिकता आणि लिंगभाव ठरू शकतात. जन्मत: असणारे लैंगिक अवयव (Sex), कोणाविषयी आकर्षण वाटते (Attraction), आपली स्वत:ची लैंगिक ओळख (Identity) आणि व्यक्त होत असतानाचे प्राधान्यक्रम (Expression) या सगळ्यातून जवळपास 20-24 प्रकारे लिंगभाव व्यक्त होत असतो. Genderqueer, agender, polygender, binary, Cisgender अशा अनेक नव्या संज्ञांची ओळख आणि त्यातून येणारी जागरूकता वाढते आहे. अशा सर्व गटांतल्या व्यक्तीदेखील समाजात वावरत असताना विविध प्रकारची विषमता अनुभवत असतात. ही विषमता ज्या प्रकारे व्यवस्थात्मक, मोठ्या पातळीवरची असू शकते; त्याचप्रमाणे ती पेहराव, भाषा, संस्कृती लवचिक नसल्याने येणारीही असते. सर्व मनुष्यांनी ठरावीक साचेबद्ध आयुष्य जगलं पाहिजे, या अपेक्षेचे मोठ्या प्रमाणातले बळी हे जे स्त्री किंवा पुरुष अशा ढोबळ वर्गीकरणात स्वत:ला बसवून घेत नाहीत, ते आहेत. जागतिक पातळीवर सर्व व्यक्तींना सामावून घेण्यासाठी व्यवस्था विविध प्रकारची लवचिकता अंगीकारताना दिसत आहेत.

याव्यतिरिक्त इंग्रजी भाषाही जाणीवपूर्वक बदल करताना दिसते आहे. Mx  हे संबोधन अनेक ठिकाणी रूढ होताना दिसतेय. त्याचबरोबर एकवचनी they (they, singular) असा शब्द सर्व शब्दकोशांनी स्वीकारलेला आहे.

अर्थातच हे सगळे बदल अनेक वर्षांच्या चर्चा, ऊहापोह, लढे यानंतर घडून आले आहेत. लिंगभेदाच्या संदर्भात सर्व चर्चांमध्ये काही समान धागे दिसून येतात. साचेबद्ध आयुष्य जगण्याच्या सीमा तपासून पाहणे, हा एक धागा आहे. सध्याच्या व्यवस्थेत विषम वागणुकीला ज्यांना सामोरे जावे लागते आहे, त्यांचा लढा विषारी पौरुषाच्या (toxic masculinity) विरुद्धचा आहे, हा अजून एक धागा आहे. शिवाय संस्थात्मक पातळीवर होणाऱ्या भेदभावाचीही (institutional discrimination) दखल घ्यायला लावणारा आहे. इथे आवर्जून लक्षात घेतले पाहिजे की- मुद्दा पुरुषांविरुद्ध असण्याचा, पुरुषांच्या चुका दाखवण्याचा नाही. स्त्रियांचा लढा एक प्रकारे या सगळ्या चर्चेचा केंद्रबिंदू राहिला आहे. याबद्दलही समाजातल्या वेगवेगळ्या गटांत राग-लोभ दिसून येतील. LGBTQ गटातल्या लोकांचे प्रश्न आणि स्त्रियांचे प्रश्न एकाच प्रकारचे नसून अतिशय वेगळे आहेत, असे ठामपणे म्हणणारे गट सातत्याने दिसतात. तर, एकूणात हा सगळाच लढा (स्त्रिया आणि इतर जेन्डर गटांतल्या व्यक्ती) पुरुषप्रधानतेविरुद्ध, toxic masculinity विरुद्धचा आहे असाही एक मतप्रवाह दिसतो. अर्थात जास्तीत जास्त गटांनी एकत्र येऊन, एकमेकांपासून बळ घेत योग्य दिशेने बदल घडवून आणावेत, हे कधीही सयुक्तिक आहे. त्याचबरोबर कृतीची दिशा व निर्णयांचे रोख पुरुषांमध्ये कोणत्या प्रकारचे बदल अपेक्षित आहेत याकडेही वळवावे. यामध्ये लहान मुलग्यांना जडण-घडणीच्या काळात काय व कसे संस्कार दिले जातात, मुलग्यांसाठी व मुलींसाठी कोणती भाषा योग्य समजली जाते, त्यांच्या अभिव्यक्तीवर लहान वयापासून कोणती जाचक बंधनं घातली जातात- इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.

ज्याप्रमाणे स्त्रीला अपमानित करण्यासाठी शब्दांची भली मोठी यादी प्रत्येक भाषेत असते, हे आपण आधी एका लेखातही पाहिलं आहे. त्याचप्रमाणे इतर कुठलीही जेन्डर आयडेन्टिटी असणाऱ्या व्यक्तीला हिणवण्यासाठीसुद्धा भरपूर शब्द असतात. या हीन वागणुकीचा पहिला टप्पा म्हणजे, जन्मत: पुरुष असणाऱ्या मात्र वेगळी जेन्डर आयडेन्टिटी (उदा. Transgender, binary ) असणाऱ्या व्यक्तीला बायल्या, बाईसारखा कमी दर्जाचा, असे म्हणून हिणवणे. किंवा जन्मत: स्त्री असणाऱ्या व्यक्तीने आपली वेगळी जेन्डर आयडेन्टिटी असल्याचे जाहीर करताच, त्या व्यक्तीला कठोर आणि गरजेच्या नसलेल्या नैतिक उलटतपासणीला सामोरे जायला भाग पाडणे. यापुढची पायरी म्हणजे, त्या व्यक्तीचे संपूर्ण अस्तित्व तिच्या लैंगिक आयुष्याशी जोडणे. यातून भाषिक आणि इतर अनेक प्रकारच्या हिंसेला वाव मिळतो. मानसिक-भावनिक हिंसेचे माध्यमही अनेकदा भाषा असते, हेसुद्धा इथे लक्षात घेतले पाहिजे. 

जिथे पुरुषप्रधानव्यवस्थेला भारतीय संस्कृती म्हणून संबोधण्याची गल्लत केली जाते, तिथे पुरुषांचे मानसिक आरोग्य तरी सुदृढ आहे का? तर, तसेही घडताना दिसत नाही. अनेक जाणत्या वयाचे पुरुष स्त्री-पुरुष नातेसंबंध, नात्यातल्या अपेक्षा-इच्छा याबद्दल अतिशय बुरसटलेले आणि ठोकळेबाज ग्रह बाळगताना दिसतात. आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींच्या मानसिक-भावनिक आरोग्याची जबाबदारी सक्षमपणे पेलू शकणारे किती पुरुष आपल्या बघण्यात असतात? ईर्ष्या, राग, अभिमान, सुख, दु:ख, आनंद या काही मोजक्या भावनांपलीकडे जाऊन मानवी भावनांची गुंतागुंत सहज समजून घेता येणे सगळ्यांसाठी आणि खास करून पुरुषांसाठी गरजेचे बनले आहे. स्त्रिया आणि इतर जेन्डर आयडेन्टिटी असणाऱ्या व्यक्तींच्या मतामागे आपल्या पुरुष असण्यातून जी सहज सत्ता मिळते, तिचा जोर लावून धरता आला पाहिजे. उग्र भाषेचा, भाषेतल्या हिंसेचा जितका जास्त वापर तितके ठळक पौरुषत्व- हे समीकरण बदलले पाहिजे. आणि म्हणूनच या सगळ्या वाटचालीत जास्त माणुसकी असणारे, अधिक संवेदनशील, जाणते पुरुष तयार होण्यासाठी जेन्डरचे प्रश्न पुरुषांना आपले स्वत:चे प्रश्न वाटले पाहिजेत, ही आजच्या काळाची गरज आहे. त्याचबरोबर toxic masculinity ला आव्हान देत असताना, ज्या सगळ्यांना त्यातल्या विखाराला सामोरे जावे लागते, त्यांनी काही समान अक्ष आखता येतात का, त्यावर एकत्र येता येते का- हेही जरूर तपासून बघितले पाहिजे.

स्त्रियांच्या भाषेचे मुद्दे हे स्त्रियांपुरतेच मर्यादित नाहीत, ते हे असे- एकाच वेळी सारख्याच प्रकारची भाषिक विषमता आणि अन्याय सहन कराव्या लागणाऱ्या सगळ्यांचे ते आहेत. शिवाय भाषेसंदर्भातल्या विषमतेचा मुद्दा लक्षात घ्यायचा तर सगळ्या स्त्रियांचे प्रश्नही सारखे नाहीत. त्यातही जात, धर्म, वर्ग यांचे अनेक बारकावे आहेत. या मुद्यांवर अधिक चर्चा समारोपाच्या उत्तरार्धात करू या.

(उत्तरार्ध पुढील अंकात)

Tags: स्त्री-पुरुष नातेसंबंध पुरुषप्रधानव्यवस्था पुरुष विषमता स्त्रीवाद भाषा : स्त्रियांची /स्त्रियांविषयीची अपर्णा दीक्षित aparna dixit weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके