डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

अनेक ठिकाणी मॅन्सप्लेनिंग निमूटपणे सहन करावं लागणं हे स्त्रियांचं वास्तव आहे. तर दुसरीकडे ज्या स्त्रिया मोकळेपणी किंवा बेधडकपणे व्यक्त होऊ पाहतात, त्यांचे समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग होताना दिसते. त्यांच्या मतांना फारशी किंमत दिली जात नाही. अशा स्त्रियांच्या शरीराची, कपड्यांची, वैयक्तिक आवडींची येथेच्छ आणि हिणकस चेष्टा केली जाते. ज्ञान मिळवण्यासाठी स्त्रियांना पुरुषांपेक्षा किती तरी तीव्र झगडा करावा लागतो. या सगळ्या श्रमांनंतर स्वत:चे मत-विचार व्यक्त करण्याची किंमत ट्रोलिंगसारख्या मनस्तापाला सामोरे जाऊन चुकवावी लागते. असाही हा दुहेरी तिढा आहे.

अभ्यासोनि प्रकटावे। ना तरी झाकोनि असावे।

प्रकटोनि नासावे। हे बरे नोहे।।

समर्थ रामदासांनी संभाषणामध्ये पाळायच्या शिष्टाचाराची, इतरांशी वागता-बोलताना घ्यायची काळजी किती नेमकेपणाने सांगितली आहे! ज्या विषयात आपल्याला गती आहे, आपले अभ्यासातून आलेले प्रभुत्व आहे- तिथेच व्यक्त व्हावे. बोलण्याची घाई करून आपले अज्ञान उघड करू नये. मात्र सहज सोपा वाटणारा हा सल्ला पाळणे महाकठीण असू शकते. रेबेका सोलनीट या प्रसिद्ध लेखिकेच्या आयुष्यात 2003 मध्ये घडलेला हा प्रसंग पाहा. त्यांनी नुकतेच एडवर्ड मायब्रीज (अमेरिकन फोटोग्राफर आणि मोशन सिनेमा तंत्राचा जनक) याच्या आयुष्यावर आधारित पुस्तक लिहिले होते. मायब्रीजच्या गोष्टीबरोबरच तंत्रज्ञान आणि कला यांचा अमेरिकेतील जीवनातील संबंध याचाही वेध घेणारे हे पुस्तक लक्षणीय ठरले. वाचकांच्या आणि समीक्षकांच्या पसंतीस उतरले. पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर काहीच काळाने लेखिका आपल्या मैत्रिणीबरोबर एका समारंभाला गेल्या. तिथे भरपूर श्रीमंती थाट असणाऱ्या (पुरुष) यजमानांनी बोलता-बोलता मायब्रीजचा उल्लेख आल्यावर, नुकतेच त्याचे चरित्र कसे प्रसिद्ध झाले आहे आणि कशी महत्त्वाची भर या चरित्रामुळे पडली आहे वगैरे सांगायला सुरुवात केली. रेबेकांनी आपणही कसे नुकतेच या विषयावरचे पुस्तक लिहून प्रसिद्ध केले आहे, असं सांगायचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या बोलण्याकडे जवळपास दुर्लक्ष करत, हे नवं पुस्तक कसं खूप महत्त्वाचं आहे, हे यजमान रेटत राहिले.

रेबेका लिहितात, त्यांच्या बोलण्यात जवळपास उद्धटपणाकडे जाणारा आत्मविश्वास आणि ठामपणा होता. इतका की, संभाषण जसजसं पुढे जाऊ लागलं तसं रेबेकांना अशी खात्री वाटू लागली की, याच विषयावरचे आणखी एक पुस्तक आले असणार आणि आपल्या नजरेतून कदाचित ते सुटले असेल. मात्र पुस्तकातल्या ज्या संदर्भांचा यजमान उल्लेख करत होते, त्यांचा विचार केल्यावर रेबेकांच्या मैत्रिणीला ही खात्री पटली की, ही चर्चा आपल्याच मैत्रिणीच्या पुस्तकाची चालली आहे. तसं यजमानांच्या लक्षात आणून द्यायचा प्रयत्नही त्यांनी केला. मात्र स्वत:चे म्हणणे समोरच्याला ऐकून घ्यायला लावण्याच्या भरात अर्थातच पाहुण्यांचे म्हणणे त्यांनी फारसे मनावर घेतले नाही. शेवटी तीन-चार वेळा मोठ्या आवाजात, पुन:पुन्हा ठामपणे मैत्रिणीने हे सांगितल्यावर अचानक यजमानांना मुद्दा कळला. यावर रेबेकांनी त्यांना विचारले, ‘‘तुम्ही पुस्तक वाचलं आहे का?’’ त्यावर पांढराफटक चेहरा झालेल्या यजमानांनी कसंनुसं हसून केवळ ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये आलेले पुस्तकाचे परीक्षण वाचले आहे, अशी कबुली त्यांनी दिली. ज्या पुस्तकाची आपण इतकी वाहवा केली, ते एका बाईने लिहिले आहे आणि त्या बाई आपल्यासमोरच उभ्या आहेत, यावरचा त्यांचा अविश्वास त्यांचा चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता, असं रेबेका लिहितात. हा प्रसंग घडल्यावर काही काळाने, 2008 मध्ये रेबेका सोलनीट यांनी Men explain things to me  यामागची भाषेतली व सामाजिक गुंतागुंत या लिखाणात समजून घेतली आहे. त्याचबरोबर अशा घटनांना mansplaining - मॅन्सप्लेनिंग असा शब्दही त्यांच्या लिखाणानंतर रूढ झाला. Man+Explaining हे दोन शब्द एकत्र करून तयार झालेल्या या शब्दाची खूप चर्चा झाली. न्यूयॉर्क टाइम्सने mans plaining ला word of the year 2010 मध्ये घोषित केले आणि 2010 नंतर वेगवेगळ्या इंग्रजी शब्दकोशांमध्ये mansplaining या शब्दाची अधिकृत रीत्या भर घालण्यात आली. - splain या प्रत्ययाची भरही कालांतराने शब्दकोशात झाली, ज्याचा अर्थ आवश्यक नसताना आक्रमकपणे एखादी गोष्ट समजून सांगणे असा घेतला जातो. अमेरिकी संदर्भात, whitesplaining, baracksplaining  असे अनेक शब्द यातून तयार झालेले दिसतात.

आता जवळपास दहा-बारा वर्षांनंतर या शब्दाचा अर्थ आणि त्याचा भाषेतला वापर यासंबंधी काही बाबी प्रस्थापित झाल्या आहेत, त्या अशा-

1. संभाषणातला भाग- ज्यामध्ये स्पष्टीकरण (explaination) आहे.

2. हे स्पष्टीकरण चुकीचे आहे.

3. बहुतेकदा हे स्पष्टीकरण ज्या व्यक्तीला सांगितले जात आहे, त्या व्यक्तीला या स्पष्टीकरणाची गरज नाही.

4. स्पष्टीकरण देणारी व्यक्ती (बहुतेकदा) पुरुष आहे.

5. ज्या व्यक्तीला हे स्पष्टीकरण सांगितलं जात आहे, ती (बहुतेकदा) स्त्री आहे.

6. स्पष्टीकरण देणारी व्यक्ती ठामपणे, अति-आत्मविश्वासानं, समोरच्याला काहीसे तुच्छ लेखण्याच्या हेतूने, समोरच्याला अक्कल शिकवण्याच्या स्वरात, समोरच्याला नामोहरम करण्याच्या हेतूने बोलते आहे.

असे अनुभव स्त्रियांना वारंवार येतात. मॅन्सप्लेनिंगचे भाषिक आणि सांस्कृतिक परिणाम स्त्री-पुरुष दोघांवर होत असतात. सामाजिक भाषाशास्त्राच्या अभ्यासामध्ये silence आणि silencing यावरही सखोल विचार झाला आहे. संभाषणात गप्प राहणे आणि समोरच्याला गप्प करणे याबद्दलचा हा अभ्यास आहे. मॅन्सप्लेनिंगमुळे स्त्रियांना पद्धतशीरपणे आणि व्यवस्थात्मक पातळीवर गप्प केले जाते. एखाद्याच्या मताला, सत्तेला कमी लेखण्यासाठी या तंत्राचा वापर पुरुषांकडून जाणते-अजाणतेपणानं, कधी सवयीनं, तर कधीच कुणीही अशा वागण्या-बोलण्याला आक्षेप न घेतल्यामुळे केला जातो. स्त्रियांचा आवाज, म्हणणं बाद करण्याकरता केले गेलेले हे वर्तन अनेकदा कुणाच्या नेमकं लक्षात येत नाही.

यामध्ये एक लक्षात घेणे आवश्यक आहे की- पुरुषांनी दिलेल्या सगळ्याच स्पष्टीकरणांना, सल्ल्यांना मॅन्सप्लेनिंग म्हणत नाहीत. मात्र, रेबेका सोलनीटना वरती आलेला जो अनुभव आहे, त्यातल्या यजमान पुरुषाचा अतिआत्मविश्वास, समोरची स्त्री तज्ज्ञ नसणारच याबद्दलचा ठामपणा, ती व्यक्ती तज्ज्ञ आहे हे कळल्यावरही खजील वाटण्यापलीकडे फारसे मनाला लावून न घेणे, माफी वगैरे मागणे तर दूरच, ही सर्व मॅन्सप्लेनिंगची लक्षणे आहेत हे ही लक्षात घेतले पाहिजे. आता अशी परिस्थिती कामाच्या ठिकाणी, औपचारिक संदर्भातही स्त्रियांना अनेकदा सहन करावी लागते; तर वैयक्तिक आयुष्यात नवरा, भाऊ, मित्र यांच्याकडूनही अशी वागणूक मिळण्याची शक्यता असतेच. रेबेका सोलनीट त्यांच्या लिखाणात हे दाखवून देतात की, हिंसा ही समोरच्याला गप्प करण्याचे, त्या व्यक्तीचे म्हणणे नाकारण्याचे एक साधन असते. यातून व्यक्तीची विश्वासार्हता आणि विश्वसनीयता (credibility and reliability) डावलणे शक्य होते. हिंसा जशी शारीरिक आणि मानसिक असते, तशी ती शब्दिकही असते.

इथे हे ध्यानात ठेवलं पाहिजे की- विश्वासार्हता हे तगून राहण्यासाठी, टिकून राहण्यासाठीचे आवश्यक साधन आहे. कुटुंबात, समाजात, कामाच्या ठिकाणी इतरांचा आपल्या म्हणण्यावर विश्वास असणे, त्या विश्वासातून येणारा पाठिंबा उपलब्ध असणे यावर व्यक्तीचा आत्मविश्वास, स्वबद्दलचा आदर टिकून असतो. अविश्वासाला सतत जर सामोरे जावे लागत असेल तर व्यक्तीच्या जडण-घडणीमध्ये त्रुटी राहतात, आत्मविश्वास डळमळीत होतो. ‘मला नाही बाई जमणार’, ‘उगीच कशाला?’, ‘....तर मला सगळे हसतील, त्यापेक्षा नकोच त्या वाटेला जायला’- असे संवाद मुली-स्त्रियांकडून सर्रास ऐकायला मिळतात. यातून काय लक्षात येतं? तर एकीकडे इतरांनी सतत दाखवलेल्या दीर्घ काळ अविश्वासातून आलेला अनुभव स्त्रिया नवा निर्णय घेताना वापरत असतात. शिवाय आपल्या पुढच्या पिढीतल्या मुलींना असं नामोहरम होण्याचा अनुभव येऊ नये, म्हणून त्यांना एक तर फारसं घराबाहेर पडून जगात जाण्याची संधी नाकारली जाते किंवा सतत सतर्क राहण्याची सूचना केली जाते. यात सर्वांत वाईट भाग म्हणजे- अशा सततच्या संभाषणांमधून आपण खरोखरच पुरुषांपेक्षा दुय्यम आहोत, हा समज मनात घट्ट होण्याची शक्यता असते. मग जेव्हा असे संवाद आणि संभाषणं पिढ्यान्‌पिढ्या तशीच चालू राहतात तेव्हा, पुरुष आणि स्त्रियांच्या वागण्यातले- विशेषत: बोलण्यातले ‘फरक’ जाणवू लागतात.

असाच एक प्रचलित समज म्हणजे- स्त्रिया खूप जास्त बोलतात, बडबड्या असतात; तर पुरुष कमी, मोजकंच आणि महत्त्वाचंच बोलतात. आज अनेक संशोधनांनी हे दाखवून दिलं आहे की, हे खरं नाही. संभाषणांमध्ये पुरुष कायम वर्चस्व टिकवून असतात आणि इतकंच नव्हे, तर ते स्त्रियांपेक्षा जास्त बोलतातसुद्धा. अनेक प्रयोग-पाहण्या यातून हे दाखवलं गेलं आहे की, पुरुष दुसरं कुणीही- आणि विशेषत: स्त्रिया- बोलत असताना संवादात मधेच खंड पाडून, दुसऱ्याचं म्हणणं खोडून काढण्यासाठी आपलं म्हणणं मांडतात. या घटना आपल्या आजूबाजूला सहज बघायला मिळतात. स्त्रियाही अनेकदा जेव्हा संवादात मधेच उडी घेतात, ते मुख्य करून बोलणाऱ्याच्या मताशी आपण सहमत आहोत हे सांगण्याकरता. मॅन्सप्लेनिंग केवळ कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंबातच केले जाते असे नाही; तर राजकारणात, धर्मव्यवस्थेत, नेतृत्वाच्या भूमिकांच्या ठिकाणीही दिसतं. समाजाने पुरुषांना स्वत:च्या मताला आपसूक जास्त किंमत द्यायला, तसं पुरुषांनी केलं की स्त्रियांनी त्याच्याशी जुळवून घ्यायला शिकवलेलं असतं- असं या सर्व क्षेत्रांत घडताना दिसून येतं. जोपर्यंत पुरुष आक्रमक असणे (संवादात आणि इतरत्रही) हा आपल्याला सकारात्मक ‘पुरुषी गुण’ वाटत राहणार आहे तोपर्यंत स्त्रियांना मधेच तोडून, त्यांचे तज्ज्ञ असणे डावलून संवाद घडत राहणार. ही शाब्दिक हिंसा ओळखणे, त्यातले बारकावे समाजातल्या कोणत्या समज-गैरसमजातून तयार झाले आहेत, हे अभ्यासणे गरजेचे आहे.

मॅन्सप्लेनिंग करणारी व्यक्ती आपल्या बोलण्यातील धार कमी करण्यासाठी अनेकदा विविध शब्दप्रयोगांचा हमखास वापर करताना दिसते. उदाहरणार्थ- ‘पण मी काय म्हणतो’, 'actually', ‘खरं तर’, ‘मी तर फक्त माझं मत मांडत होतो, तुम्ही/तू उगीच इमोशनल झालीस’, ‘मला तसं म्हणायचं नव्हतं’, ‘मी फक्त माहिती सांगतोय’ (जी अनेकदा चुकीची किंवा अर्धवट बरोबर असते), ‘मी इतकं तुला समजवून सांगतोय/ पटवून देण्याचा प्रयत्न करतोय, तर आता मीच वाईट झालो’. मॅन्सप्लेनिंगचे हे बारकावे पाहण्याआधी त्याचे काही नमुनेदार किस्से पाहा. यातले बहुतेक संवाद ट्वीटरवर घडलेले आहेत.

मॅन्सप्लेनिंगच्या अनुभवाबद्दल सांगताना एक जण म्हणते -men regularly try to explain that there weren't women writing in the Middle Ages (I have a PhD in medieval women's writing), तर दुसऱ्या एका संवादात विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात स्त्रियांचं प्रमाण कमी का आहे, या विषयावर प्रकाशित झालेल्या शोधनिबंधाबद्दल चर्चा चालू आहे- She - So many 'solutions' to the lack of women in tech don't get at the actual problems...

He - You should read the full article. There's a chicken and egg problem w/ female tech role models. Men want to be the next Jobs/Gates/etc.

She – No

She - I WROTE THE ARTICLE.

आपल्या पहिल्या अंतराळ प्रवासाचे अनुभव फोटोसोबत शेअर करताना जेसिका मायर यांचा इंटरनेटवर घडलेला अनोळखी पुरुषासोबतचा संवाद बघून त्या इतक्या वैतागतात आणि लिहितात- When you're literally an astronaut and The Situation tries to mansplain space to you. हा संवाद असा घडला-

Jessica - My first ventre 63000', the space equivalent zone, where water spontaneously boils! Luckily I'm suited!

He - Wouldn't say it's spoantaneous. The pressure in the room got below the vapour pressure of the water at room temp. Simple thermo.

अजून एकजण लिहिते --Yesterday a man corrected my pronunciation of my name.

या उदाहरणामध्ये पाहिलं तर लगेच लक्षात येतं की- ज्या स्त्रिया आपापल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करताहेत, अगदी अंतराळात पोहोचल्या आहेत; त्या स्त्रियांनाही अनोळखी पुरुष स्वत:च्या किंवा या स्त्रियांच्या पात्रतेचा कोणताही विचार न करता धडाक्याने प्रश्न विचारताहेत, स्त्रियांच्या म्हणण्यावर शंका घेताहेत, त्यांना जास्तीचे पुरावे-दाखले द्यायला भाग पाडताहेत. इतकंच नाही, तर कुणी तरी एखादीला तिच्याच नावाचा बरोबर उच्चार काय आहे, हे समजवायला जातो आहे. हे सगळं भारतातही सतत घडत असतं. त्याबद्दल मुली-स्त्रियांनी मोकळेपणाने आवाज उठवण्याचं प्रमाण मात्र कमी दिसून येतं. अगदी अलीकडे प्रसिद्ध अभिनेत्री, विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेतलेली, बायकिंगसाठी प्रसिद्ध आणि शिवाय फिटनेस गुरू समजली जाणारी गुल पनांग हिने आपला पुश-अप व्यायाम करतानाचा छोटा व्हिडिओ समाजमाध्यमावर शेअर केला होतं. त्याखाली पहिल्या काही कमेंटमध्येच एकाने असं लिहिलं होतं की- ‘पुश-अप करताना तुमचा फॉर्म काही इतका ठीक वाटत नाही. तुम्ही अजून ट्रेनिंग नीट केलंत तर तुम्हाला जमेल.’ यावर गुल पनांगने उत्तर म्हणून पुश-अपचे किती प्रकार असतात, हात-पाठ-पाय यांच्या स्थितीवर त्यांचे कसे प्रकार पडतात, शिवाय कोणत्या स्नायूंना कोणत्या पुश-अप व्यायामप्रकारामुळे फायदा होतो, हे सविस्तर उत्तर म्हणून लिहिल्यावर पुढे त्या व्यक्तीकडून कोणतीही कमेंट आली नाही.

आता पाहा- या स्त्रीकडे निश्चित जास्त ज्ञान, माहिती आणि अनुभवही आहे. मात्र ते अशा प्रकारे सतत सिद्ध करत राहण्याची एक प्रकारची अलिखित आणि मनस्तापाची सक्तीही आहे. जग्गा जासूस चित्रपटाच्या निमित्ताने समीक्षकांनी कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांची एकत्र मुलाखत घेत असताना कतरिनाला काही प्रश्न विचारले. तेव्हा एका मुलाखतीत तिला बोलायची संधीच न देता रणबीरने तिला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं, तर अजून एका मुलाखतीत ती बोलत असताना तिचं बोलणं अर्धवट तोडून उत्तर देण्याची आणि पर्यायाने संवादाची सगळी सूत्र आपल्याकडे घेतली. नॅशनल टीव्हीवर आपल्या सहकलाकारांशी असं वागण्याचं धाडस कुठून येतं? यावर बरीच टीका झाल्यावर मग रणबीर कपूरने एका मुलाखतीत आपली चूक मान्य केली.

आता हे सगळं वाचल्यावर, सगळे पुरुष असे नसतात, मग पुरुषांनी काय काहीच बोलायचं नाही का; स्त्रियांच्या चुका होतच नाहीत का; झाल्या तर दाखवूनही द्यायच्या नाहीत का; मी असा नाही तर मी कशाला या सगळ्यात लक्ष घालू- असे प्रश्नही उपस्थित होऊ शकतात.  या आणि अशा प्रश्नांची उत्तरं देताना रेबेका सोलनीट स्वत: एका ठिकाणी लिहितात की- मॅन्सप्लेनिंग हा काही पुरुषांकडे अंगभूत असलेला दोष आहे, असं म्हणता येणार नाही. तसंच सगळे पुरुष मॅन्सप्लेनिंग करत नाहीत, हेही खरं आहे. मात्र, बहुतेक सगळ्या स्त्रियांनी याचा एकदा तरी अनुभव घेतला आहे किंवा मॅन्सप्लेनिंगच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणामांना सामोरे जावं लागल्याचा अनुभव बहुतेकींकडे आहे, हे यापुढे नाकारता येणार नाही. आपण ज्या प्रकारे मुलगे व मुली छोटे असल्यापासून जे धडे त्यांना आपल्या वागणुकीतून आणि समाजातल्या इतर संस्कारांतून घालून देत असतो; त्यामधून अशा प्रकारे पुढाकाराने, ठामपणे, चुकीचं असलं तरी आपलं म्हणणं बेधडकपणे मांडण्याची संधी मुलग्यांना मिळत असते.

संभाषणात आत्मविश्वास दाखवण्याला काही किंमत असते आणि त्याचे फायदे असतात, हे जणू मुलगे मूल्य म्हणून अंगीकारतात. त्याचेच पडसाद पुरुषांनी केलेल्या मॅन्सप्लेनिंगमध्ये दिसतात. तर दुसरीकडे- मुलींनी संवादात कायम पडती बाजू घ्यावी, दुसऱ्याचं चुकत असेल तरी त्याच्या सन्मानाचा विचार करून ‘उद्धटपणे’ त्याला तसं सांगू नये, असे अलिखित नियम/संस्कार/शिष्टाचार मुलीही अंगीकारताना दिसतात. यातूनच रेबेका सोलनीटसारख्या यशस्वी, अभ्यासू लेखिकेच्याही मनात ‘माझ्याच नजरेतून हे दुसरं पुस्तक सुटलं असेल’ असं न्यून सहज तयार होतं. लौकिक अर्थी यशस्वी स्त्रियांची ही गत असेल तर सर्वसामान्य स्त्रीचा रोजचा झगडा किती मोठा असेल, याची कल्पना केलेलीच बरी. स्त्रियांच्या चुका होत नाहीत का? त्या दाखवून द्यायच्या नाहीत का? तर हे ही मान्य केलं पाहिजे की, काही प्रमाणात स्वत:च्या मतांवर, ज्ञानावर शंका असणे (Self- doubt ), उपस्थित केली जाणे, आपल्याकडच्या माहिती- तथ्यांविषयी (facts ) पुन्हा पुन्हा खात्री करून घेणे हे शिकण्याच्या प्रक्रियेत नक्की उपयोगाचं असतं. त्यामुळे, समोरच्याने विचारलेले प्रश्न, उपस्थित केलेल्या शंका हे सगळं स्वत:ला घडवण्यासाठी उपयोगाचं ठरू शकतं. मात्र अशा प्रक्रिया संतुलित प्रमाणातच घडाव्यात. सततची शंका घेतल्याने, नाकारल्याने स्त्रियांना शिकायला प्रोत्साहन तर मिळत नाहीच उलट विचार- मतांमध्ये पंगूपण येण्याची शक्यताच खूप असते. वरच्या प्रश्नांच्या उत्तराकडे नेणारा एक सोपा मार्ग म्हणजे, ‘मी ज्या स्त्रीशी संवाद करतो आहे ती जर पुरुष असती तर मला तिच्या ज्ञानाविषयी, मतांविषयी शंका वाटली असती का?’ हा प्रश्न स्वत:ला विचारण्याचा मोकळेपणा दाखवणे. स्त्रियांची गुणवत्ता अशा प्रकारे पुरुषांच्या काल्पनिक गुणवत्तेशी तपासून पाहणे नक्की दुर्दैवाचे आहे. मात्र, हा सोपा आणि खात्रीशीर मार्ग आहे.

स्त्रियांचा संवादातला झगडा दोन पातळ्यांवर असतो. एक म्हणजे- ‘जो काही’ नेमका मुद्दा आहे, तो आत्मविश्वासपूर्वक समजून घेणे आणि मांडणे. आणि दुसरं म्हणजे- स्वत:ची स्वतंत्र मतं-विचार असू शकतात, सत्य आणि तथ्य या दोन्हींचे आपण हक्काचे दावेदार असू शकतो हे समोरच्याला पटवून देत राहणं. आता कुणाला जर असं वाटत असेल की- छे : परिस्थिती आता बदलली आहे; आता स्त्रिया मांडतात की मतं, समाजमाध्यमं-टीव्ही यावर बेधडक बोलतात. एकीकडे तर हे चित्र शहरी किंवा निमशहरी भागात काही प्रमाणात दिसतं. मात्र, अनेक ठिकाणी मॅन्सप्लेनिंग निमूटपणे सहन करावं लागणं हे स्त्रियांचं वास्तव आहे. तर दुसरीकडे ज्या स्त्रिया मोकळेपणी किंवा बेधडकपणे व्यक्त होऊ पाहतात, त्यांचे समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग होताना दिसते. त्यांच्या मतांना फारशी किंमत दिली जात नाही. अशा स्त्रियांच्या शरीराची, कपड्यांची, वैयक्तिक आवडींची येथेच्छ आणि हिणकस चेष्टा केली जाते.

ज्ञान मिळवण्यासाठी स्त्रियांना पुरुषांपेक्षा किती तरी तीव्र झगडा करावा लागतो. या सगळ्या श्रमांनंतर स्वत:चे मत-विचार व्यक्त करण्याची किंमत ट्रोलिंगसारख्या मनस्तापाला सामोरे जाऊन चुकवावी लागते. असाही हा दुहेरी तिढा आहे. या सगळ्या गुंतागुंतीतून बाहेर पडण्यासाठी किम गुडविन नावाच्या लेखिका-अभ्यासिकेने चक्क तक्ता तयार करून ट्वीटरवर टाकला आहे. त्या लिहितात, ‘माझे सहकारी मला सतत विचारत असतात की खरं मॅन्सप्लेनिंग कसं ओळखायचं, त्यांना सोपं जावं म्हणून हा तक्ता!’ या तक्त्याची दखल बीबीसीनेही घेतली आणि या ट्वीटवर आधारित लेख प्रकाशित केला. मूळ इंग्रजीतच तक्ता वाचण्यात त्यातला गाभा आहे, म्हणून तो तसाच देते आहे.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

  1. sahil joshi- 29 Jul 2020

    Its is the tought provoking article i have ever read.thanks for opening my eyes.

    save

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात