डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

शिक्षणाचे धोरण ठरवताना या सगळ्याचे भान असणे आवश्यक ठरते. जोपर्यंत मुलींकडून असलेल्या समान कामगिरीच्या अपेक्षा आणि मूल्यमापनाचे समाजातले असमान निकष यातला गुंता शिक्षण सोडवत नाही, तोवर मुली-स्त्रिया स्पर्धेत आपोआपच पिछाडीवर जाणार. दहावी-बारावीला कायम जास्त गुण मिळवून, जास्त मार्कांनी पास होणाऱ्या मुली त्याच प्रमाणात यशस्वी उद्योजिका, सीईओ, व्यावसायिक, सरकारी अधिकारी होताना दिसत नाहीत. या मुली व्यवस्थेत कुठे विरून जातात, हे डोळे उघडे ठेवून पाहिले पाहिजे. या सगळ्या पिछाडीच्या सूत्रामागे भाषिक विकासाचे नियम आहेत, हे लक्षात ठेवले पाहिजे; तर दुसरीकडे महुआ मोईत्रा आणि त्यांच्यासारख्या अनेक स्त्रिया जेव्हा या अडथळ्यांच्या शर्यती पार करतात, तेव्हा शेवटी भाषेचाच हिंसक वापर करून स्त्रियांना त्यांची जागा दाखवली जाते. हे दुर्दैवाचे तर आहेच, शिवाय सामूहिक अधोगतीचेही लक्षण आहे.

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांचं नाव गेल्या वर्षभरात त्यांनी लोकसभेत केलेल्या भाषणांमुळे चर्चेत राहिलं आहे. त्यांचं बोलणं तडफदार, नेमकं आणि भेदक आहे. त्याचबरोबर त्यांनी निवडलेल्या विषयाबद्दल त्यांना कळकळ आहे असे वाटते. याशिवाय, राज्यकर्त्यांच्या निर्णयांबद्दल, त्यांच्यातल्या त्रुटींबद्दल उघडपणे बोलण्याची धमक, धाडस आणि हुशारीही त्यांच्याजवळ आहे, हे त्यांच्या भाषणातून दिसून येते. सरकार कोणतेही असेल तरी, अशा प्रकारे बोलणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची दखल घ्यावी लागेल, असे वाटायला लावणारे एकूण विषयावरचे प्रभुत्व आवेश महुआ मोईत्रांच्या संसदीय भाषणात दिसून येतो. अर्थात त्यांच्या भाषणानंतर त्याबद्दल सर्वसामान्य भारतीयांनी (पुरुषांनी) सोशल मीडियावर आणि इतर अनेक माध्यमांनी जे बोललं व लिहिलं, त्यात अगदी मोजके सूर प्रशंसेचे होते. बहुतेक प्रतिक्रिया या विविध पातळीवरच्या होत्या. त्यांचा आवाज कसा कर्कश आहे इथपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर चिखलफेक करण्यापर्यंत मजल गेली. कुणी म्हटलं की, या बाई sexually frustrated आहेत म्हणून ‘अशा’ बोलतात की काय? तर, दुसऱ्या एकाने ‘तुमचा चेहरा हसल्याशिवाय शोभून दिसत नाही’ असा सल्लाही दिला. या आणि अशा कॉमेंट्‌स म्हणजे हिणकस प्रवृतींच्या हिमनगाचं केवळ टोक आहे. गेल्या वर्षभरात महुआ मोईत्रा यांचं जे ट्रोलिंग केलं गेलं आहे, ती प्रचंड मोठी भाषिक हिंसा आहे. त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करणे हेच एक मोठे कौशल्य आहे. या ठिकाणी हे नक्की लक्षात घेतलं पाहिजे की, महुआ मोईत्रा उच्च जातीय आणि उच्च वर्गीय आहेत. तसं असल्यामुळे स्त्रियांना जे कवच काही वेळा मिळतं, ते त्यांना मिळालं असणार आहे. त्यांच्या जागी जर संसद स्त्रीसदस्य दलित व्यक्ती असं बोलली असती, तर होऊ शकणाऱ्या परिणामांचा विचारच केलेला बरा. अशा परिस्थितीत स्त्रीने काय करावे? महुआ मोईत्रा यांनी काय केलं म्हणजे समाजातल्या सर्व स्तरांत त्यांना स्वीकारलं जाईल? संसदेचं कामकाज चालू असताना स्वत:च्या फोनवर पोर्न बघणारे पुरुष सदस्य या देशाने खपवून घेतले आहेत, त्याच देशात समाजातल्या महत्त्वाच्या मुद्यांवर पोटतिडकीने बोलणाऱ्या स्त्रियांचं म्हणणं कधी खपवून घेतलं जाईल? संसद सदस्य म्हणून जी प्रतिष्ठा आणि मान्यता पुरुषांच्या वाट्याला येते, ती तितकीच काय केल्याने स्त्रियांना सहज मिळेल? स्त्रियांनी आपले म्हणणे ‘नम्र’पणे मांडलं किंवा ऐकणाऱ्याच्या कला-कलाने घेत बोललं, तर त्यांच्या म्हणण्याला जास्त किंमत मिळेल का? पुरुषांचं बोलणं आणि तशाच प्रकारचं स्त्रियांचं बोलणं याची सारखी परीक्षा होते का, याचा अभ्यास भाषाशास्त्रज्ञ करत असतात. या अभ्यासातून अनेक मुद्दे समोर येतात. काही उदाहरणं पाहू या.

एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये मुख्य डॉक्टर आणि डायरेक्टर पदी स्त्री डॉक्टर आहेत. त्यांची मीटिंग घेण्याची पद्धत या आधीच्या पुरुष डायरेक्टरपेक्षा वेगळी आहे. टीममधल्या सगळ्यांना त्यांचं मत या डॉक्टर विचारतात आणि मग निर्णय घेतात. त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल टीममधल्या स्त्रिया खूश असतात, तर पुरुषांची प्रतिक्रिया फारच वेगळी असते. ‘तुमच्या मनाचेच निर्णय घ्यायचे तर आम्हाला विचारता कशाला? हे सरळ मॅनिप्युलेशन आहे. मी माझं मत सांगण्यात वेळ कशाला घालवू? तुम्ही बॉस आहात, तर सरळ हुकूम ठोका. बॉससारखं वागायला शिका.’ अर्थातच हे उदाहरण पाश्चात्त्य देशातल्या एका अभ्यासातून आलं आहे, हे लक्षात ठेवू या. नेतृत्व करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असू शकतात. स्त्रिया असे प्रयोग करू शकतात, हे अजून अनेक समाजात रुजलं नाहीये. पुरुषांनी जी वागण्या-बोलण्याची पद्धत घालून दिली आहे ती स्त्रियांनी अंगीकारली, तर आपलं आयुष्य सुकर होईल, असं अनेक स्त्रियांना वाटतं. मात्र ते तर अजिबात खरं नाही. तडफदार बोलणाऱ्या पुरुषांचं जसं भरभरून कौतुक होतं तसं स्त्रियांचं होत नाही, असं महुआ मोईत्रा यांच्या प्रातिधिनिक उदाहरणावरून कळतं. 

स्त्री-पुरुषांच्या समान वागणुकीचे, बोलण्याचे वेगवेगळे अर्थ लावण्याची प्रक्रिया खूप लहानपणापासूनच झालेली असते. जी मुलगी स्वत:च्या वागण्याबद्दल खूप ठाम असते किंवा बोलण्यात आत्मविश्वास असणारी असते, तिने शक्यतो तसं असू नये- असे संदेश तिला कधी नकळतपणे, तर कधी स्पष्टपणे दिले जातात. फक्त मुलींच्या गटांचा विचार केला तर एकमेकींसारखं असणं, एकमेकींसारखं बोलणं असं वर्तन जास्त योग्य समजलं जातं. मुलांच्या गटामध्ये एकमेकांशी स्पर्धा असणे, आपण इतरांपेक्षा कसे भारी आहोत हे दाखवून देणे- हे कायम दिसतं. याच्याच बरोबर किशोरवयीन मुली जेव्हा गटात असतात, तेव्हा त्या नातेसंबंध-एकमेकींच्या आवडी-निवडी याबद्दल बोलतात. तर जेव्हा गटात फक्त मुलगे असतात तेव्हा एकत्र करायच्या गोष्टींच्या वेळा ठरवणे, खेळ आणि इतर मित्र-मैत्रिणींबद्दल कॉमेंट करणे असं वागतात, असं दिसून येतं. आता जेव्हा मुली आणि मुलगे एकत्र गटात असतात तेव्हा पुन्हा प्लॅनिंग, खेळ, व इतर मित्र-मैत्रिणींबद्दल कॉमेंट करणे असंच करताना दिसतात. जे लहान मुला-मुलींच्या गटात घडत असतं, त्याचंच दुसरं रूप मोठ्यांच्या वागण्यात दिसतं. जेव्हा पुरुषांचं वर्चस्व असलेले व्यवसाय (अर्थकारण, वकील, जज्‌, राजकारण, बांधकाम व्यवसाय) स्त्रिया निवडतात, तेव्हा त्यांचं वागणं-बोलणं ‘मूळच्या’ पुरुषांसारखं असावं, अशी अपेक्षा अगदी सहज केली जाते आणि रास्त मानली जाते. याउलट हे व्यवसाय निवडणाऱ्या स्त्रिया जर पुरुषांसारखं वागल्या तर ती कशी बॉसी आहे, तिला कसं वर्चस्व गाजवायचं आहे- असंही बोललं जातं. हे म्हणजे ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ असं आहे. इंग्रजीत याला Damned if you do, damned you don't असं म्हणतात. पुरुषांसारखं बोलावं-वागावं तर बॉसी, वेगळ्या कोणत्या पद्धती अंगीकाराव्यात तर पुरुषांसारखं तुम्हाला साधं बॉस होता येत नाही का, असं कचाट्यात पकडलं जातं.

या सगळ्या कचाट्यात जेव्हा स्त्रिया सापडतात तेव्हा त्याच्या आधी घडलेल्या घटना (लहानपणी झालेले संस्कार, मिळालेली शिकवण) आणि वर्तमानात होणारी सततची चिकित्सा (लेबल लावलं जाणं, पुरुषांशी अन्याय्य पद्धतीनं तुलना होत राहणं, टोमणे मारले जाणं), शिवाय भविष्यातल्या आपल्या प्रतिमेला धक्का लागणार नाही अशा प्रकारे संवादात तोल राखणं- अशी तिहेरी कसरत स्त्रिया करत असतात. स्त्रियांना ही कसरत करावी लागते. यामध्ये भूत-वर्तमान, भविष्य यांची जी गुंतागुंत असते, त्या व्यतिरिक्तही काही मुद्दे असतात. महुआ मोईत्रा किंवा हॉस्पिटलमधल्या डायरेक्टर असणं या सगळ्यांमध्ये तुलनेने ‘यशस्वी’ स्त्रियांची चर्चा आहे. मात्र अनेक स्त्रिया इथपर्यंत पोहोचतच नाहीत. एकास एक तुलना करून पाहिली तर स्त्रिया अनेकदा पुरुषापेक्षा कमी सकस आहेत, असेही निष्कर्ष निघतात- जे खोटे नाहीत. मात्र स्त्रिया खरोखरीच कायम तशा असतात का, हे समजून घेण्यासाठी हे लक्षात घेतलं पाहिजे की, गुंतागुंतीचे ज्ञान मिळवण्यासाठी काही ठरावीक भाषा अवगत असावी लागते. भाषा अवगत असण्याच्या दोन पातळ्या असतात. त्यातल्या एका पातळीला Basic Interpersonal Communications skills (BICS) असं म्हटलं जातं. ही अशी भाषा आहे जी रोजचे संवाद करण्यासाठी, समोर असलेल्या घटना-संदर्भांविषयी बोलणे इतकीच सीमित असते. या पातळीवर संवाद घडण्यासाठी भाषेबरोबरच हावभाव, हातवारे, चित्र-आकृत्या या सगळ्यांचा समावेश असतो. दुसरी पातळी म्हणजे Cognitive Academic Language Proficiency (CALP). जास्त गुंगागुंतीच्या विषयांवर लिहू-बोलू शकणे हे यामध्ये अपेक्षित असते. विशेषत: अमूर्त संकल्पना समजावून घेणे, गणिती प्रमेयं भाषेच्या माध्यमातून शिकणे, चित्र-आकृत्या यांच्या मदतीशिवाय मुद्दा समजून घेणे. (अधिक खोलात समजून घेण्यासाठी आकृती पाहावी.) 

या संदर्भात स्त्रियांचा भाषेचा वापर हा अनेकदा केवळ पहिल्या पातळीवर मर्यादित राहतो. तो असा मर्यादित का राहतो, याला अनेक कारणं आहेत. त्यातली अनेक कारणं आपल्या शिक्षणव्यवस्थेतून येणारी आहेत. उदाहरणार्थ हा प्रसंग पाहा. शिक्षणामध्ये मुलांचा थेट सहभाग असावा असं राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा 2005 प्रमाणे म्हटलं गेलं. त्याच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून गणित विषयालाही प्रयोग असावेत, असं ठरलं. यामध्ये वजन मोजणे आणि वजनाची तसंच आकारमानाची विविध एककं शिकणे, अशा एका तासाला घडलेला हा प्रसंग आहे. वजन-काट्यावर पाण्याचे वजन पाहावे आणि लिटर व किलो या आकारमान व वस्तुमानाच्या संकल्पना समजून घ्याव्यात, असा धडा होता. यामध्ये मुली आणि मुलगे या सगळ्यांचा समावेश असयला हवा, या हेतूने शिक्षकांनी (पुरुष) मुलींना नळावरून पाणी आणायला सांगितले तर मुलांना वजन पाहायला सांगितले. यातूनच शिक्षण कुठे घडते आहे, हे लक्षात येतं. म्हणायला तर मुलींचा सहभाग आहे; पण तरीही त्या मूळ ज्ञानापेक्षा दूर राहतात, असंही घडतं. भारतातल्याच एका दुसऱ्या पाहणीदरम्यान असं दिसून आलं की, गणित शिकवत असताना शिक्षक मुलींच्या रांगांकडे बघतच नाहीत. जी तऱ्हा या उदाहरणातून दिसते, म्हणून मुली गणितासारख्या CALP ची जास्त गरज असणाऱ्या विषयात मागे पडतात. तीच गत शिक्षणात अनेक ठिकाणी होते. याव्यतिरिक्त आपल्या पाठ्य-पुस्तकांची भाषा खूप मोठ्या प्रमाणात CALP कौशल्य विकसित असण्यावर अवलंबून असते.

हा झाला पहिला भाग, जिथे मुलींचा भाषिक विकास ठरावीक पातळीवरच अडकतो. त्यामुळे वरच्या स्तरावरचे ज्ञान आत्मसात करणे आणखी अवघड होऊन बसते. दुसरीकडे ज्या मुलींना ज्ञान मिळवण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर पुरेसा पाठिंबा मिळतो, चांगले शिक्षण मिळते किंवा त्या अडचणींवर मात करत आपले भाषाकौशल्य वरच्या स्तरावर नेतात. त्या अनेकदा नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी वर सांगितलेल्या कचाट्यात सापडतात. उत्तम कामगिरी करूनही पुरुषांच्या तुलनेत त्यांचे गुण ओळखले जाणे आणि त्याचं चीज होणे जवळपास अशक्य होते.

या चर्चेमागे भाषेचे ज्ञान आणि ज्ञान मिळवण्यासाठी पुरेसा भाषाविकास झालेला असणे, या दोन्हींची गरज भासते. शिक्षणाचे धोरण ठरवताना या सगळ्याचे भान असणे आवश्यक ठरते. जोपर्यंत मुलींकडून असलेल्या समान कामगिरीच्या अपेक्षा आणि मूल्यमापनाचे समाजातले असमान निकष यातला गुंता शिक्षण सोडवत नाही, तोवर मुली-स्त्रिया स्पर्धेत आपोआपच पिछाडीवर जाणार. दहावी-बारावीला कायम जास्त गुण मिळवून, जास्त मार्कांनी पास होणाऱ्या मुली त्याच प्रमाणात यशस्वी उद्योजिका, सीईओ, व्यावसायिक, सरकारी अधिकारी होताना दिसत नाहीत. या मुली व्यवस्थेत कुठे विरून जातात, हे डोळे उघडे ठेवून पाहिले पाहिजे. या सगळ्या पिछाडीच्या सूत्रामागे भाषिक विकासाचे नियम आहेत, हे लक्षात ठेवले पाहिजे. दुसरीकडे महुआ मोईत्रा आणि त्यांच्यासारख्या अनेक स्त्रिया जेव्हा या अडथळ्यांच्या शर्यती पार करतात, तेव्हा शेवटी भाषेचाच हिंसक वापर करून स्त्रियांना त्यांची जागा दाखवली जाते. हे दुर्दैवाचे तर आहेच, शिवाय सामूहिक अधोगतीचेही लक्षण आहे.

Tags: शिक्षण सोशल मिडिया तृणमूल कॉंग्रेस महुआ मोईत्रा स्त्री अपर्णा दीक्षित weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके