डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अमेरिकेत जी गोष्ट कृष्णवर्णीय लोकांची आहे- ती आपल्या इथे दलित-बहुजन जातींतल्या व्यक्तींची आहे, आपल्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या आदिवासींची आहे, समाजात सामावून न घेतल्या जाणाऱ्या तृतीयपंथीयांची आहे आणि तीच गत स्त्रियांची आहे. अशा अविश्वासातून जेव्हा समाज, कुटुंबातल्या इतर व्यक्ती, न्यायव्यवस्था व्यक्तीकडे पाहते, त्यातून त्या व्यक्तीचे दोन प्रकारचे नुकसान होते. व्यक्तीला दिलासा, न्याय कधी उशिराने मिळतो तर कधी मिळतच नाही, हा पहिला भाग. शिवाय व्यक्तीला जर सतत सर्व पातळ्यांवर संशय- अविश्वास यांचा सामना करावा लागत असेल, तर बरोबर आणि चूक ठरवण्याची व्यक्तीची जी क्षमता असते, त्याची हानी होऊ शकते. यातून व्यक्तीच्या स्व-ला सहज भरून न निघणारी इजा होत असते. कुणी जर सतत असं सांगत असेल की- बघ हं, सांभाळून राहा, असे कपडे घालू नकोस, फार मोठ्यांदा हसू नकोस, शक्यतो पडती बाजू घे... तर काय करणे बरोबर आहे आणि काय नाही, हे ठरवण्यासाठीचा जो आत्मविश्वास व्यक्तीकडे हवा, तो कसा शाबूत राहील?

जर अमेरिकेतील वंशभेदाबद्दल किंवा भारतातील जातिभेदाबद्दल चर्चा होणार असेल, तर कोण व्यक्ती डोळ्यांसमोर येतात? वंशभेद हा कृष्णवर्णीयांचा, अमेरिकी लॅटिनांचा प्रश्न आहे, तर जातिभेद हा दलित-बहुजन जातींचा प्रश्न आहे, असं वाटणं स्वाभाविक आहे. त्याचप्रमाणे लिंगभेदाचा प्रश्न हा स्त्रियांचा आहे; तर लैंगिकतेच्या प्राधान्याचे प्रश्न हे लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, तृतीयपंथी व्यक्तींचे आहेत- अशी समीकरणे सर्वांना सहज मान्य होतील अशी आहेत. या प्रकारच्या भाषिक समीकरणात काही मुळातून गल्लत आहे. श्वेतवर्णीय व्यक्तींना वांशिक ओळख नसते का? मराठा-ब्राह्मणांना जात नसते का? तसंच पुरुष असणे ही gender identity आहे, शिवाय विरुद्ध लिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण वाटणे (heterosexual)  हेही एक प्रकारचे प्राधान्यच आहे. जिथे ‘शोषितांचे प्रश्न’ अशी व्याख्या केली जाते, तिथे शोषण करणारे नजरेतून- चर्चाविश्वातून आपसूक बाहेर होतात. म्हणूनच स्त्रियांचे प्रश्न असं म्हटलं की, ‘हे काय आपल्यासाठीचं नाही’ असं म्हणून पुरुषांनी चर्चेत सहभागही नोंदवण्याची गरज उरत नाही. किंबहुना, वर दिलेल्या उदाहरणांमध्ये समाजात वर्चस्व असणाऱ्या कोणत्याच गटाकडे बारकाईने तपासणीच्या दृष्टिकोनातून पाहिलं जात नाही. या प्रकारचं दुर्लक्ष शेकडो वर्षं चालत आलेलं आहे. यातून वर्चस्व असणारे गट टिकून राहतात आणि पुन:पुन्हा तशाच प्रकारची सामाजिक बांधणी उभी राहते. वर्चस्व असणाऱ्या गटातील व्यक्तींना त्यांच्याकडे असलेल्या वर्चस्वाचा खोलात जाऊन विचार करण्याची संधी आपला समाज सहज उपलब्ध करून देत नाही. कुटुंबातील इतर पुरुषांना आपले बोलणे किंवा वागणे रुचते आहे का याची जितकी चिंता कुटुंबातल्या स्त्रियांना करावी लागते, तितका विचार पुरुषांना आपल्या वागण्या-बोलण्याबद्दल करावा लागत नाही, हे आपल्या आजूबाजूला अनेकदा दिसते. अशा वर्चस्वाला बहुतेकदा कोणताही शह बसत नाही. सत्ता (power) आणि मक्तेदारी (privilege) यातले संबंध घट्ट असतात. शिवाय ज्या व्यक्तींकडे किंवा व्यक्तींच्या समूहाकडे सत्ता आणि मक्तेदारी/विशेषाधिकार दोन्ही असतात, तेव्हा असे बेलगाम वर्चस्व असणाऱ्या गटाला/व्यक्तींना स्वपरीक्षण करण्याचीही गरज उरत नाही. वर्चस्व असणाऱ्या गटातल्या व्यक्तींच्या निवडींची, निर्णयांची फारशी छाननी होत नाही. एक प्रकारे या गटातील व्यक्ती निर्धोकपणे, बिनधास्त असे जीवन जगत असतात. कित्येक वेळा वर्चस्व असणाऱ्या व्यक्तींना समाजाकडून इतक्या विविध प्रकारची मुभा मिळत असते की, या व्यक्ती अदृश्य, कोणाच्याही परीक्षणाच्या कक्षेत नसलेलं असं आयुष्य सहज जगत असतात. शिवाय ‘सामाजिक प्रश्नांच्या चर्चाविश्वात’ही या व्यक्तींचा कुठे ठाम उल्लेख नसतो.

उदाहरणार्थ- कौटुंबिक हिंसा, बलात्कार यांसारख्या मुद्यांना धरून चर्चा करण्याची किंवा कृतिकार्यक्रम आखण्याची जेव्हा वेळ येते, तेव्हा काय होतं?  जे खरं तर मोठ्या प्रमाणात ‘पुरुषांचे प्रश्न’ आहेत, त्यांचा सतत उल्लेख ‘स्त्रियांचे प्रश्न’ असा केल्यामुळे पुरुषांची या सगळ्यात काय भूमिका असावी यावर खूपच कमी भर दिला जातो. पुरुषांचे वागणे, त्यांच्यावर समाजाकडून केले जाणारे संस्कार, जडण-घडणीच्या वयातल्या मुलग्यांचे शारीरिक आणि मानसिक प्रश्न याकडे लक्ष तर दिले जात नाहीच; आणिक भर म्हणून पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या त्यांच्यासाठीच्या वागण्याच्या पद्धती जशाच्या तशा स्वीकारल्या जातात.

या सगळ्याकडे भाषिक अंगाने कसं पाहता येईल हे बघू. पुरुषांकडून केले जाणारे लैंगिक अत्याचार, खून यांच्या बातम्यांचे काही नमुना मथळे खाली दिले आहेत-

1. महिलेची निर्घृण हत्या

2. नऊ वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार

3. ॲसिड टाकण्याची धमकी देऊन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार

या तीनही बातम्यांमध्ये संशयित आरोपी कोण आहे, हे माहिती आहे. किंबहुना, दोन घटनांमध्ये व्यक्तीची कबुली आहे आणि अटकही झालेली आहे, असं बातमी पूर्ण वाचल्यावर कळतं. मात्र बातमीच्या मथळ्यांमध्ये ‘गुन्हे करणारी व्यक्ती’ अजिबात दिसत नाही. वाक्यातील कर्ता गाळून टाकला आहे, असं दिसतं. असे मथळे कर्मणी प्रयोगात (passive voice) मध्ये लिहिले जातात किंवा कर्ता गाळून कर्तरी प्रयोगात (active voicewithout subject)  लिहिले जातात. वाक्यरचनेत असे ठरावीक बदल पुन: पुन्हा दिसून येतात आणि यातून वाचकाचे लक्षही ठरावीक तपशिलांकडे वेधले जाते. आता वरील मथळे पाहिल्यास असे लगेच लक्षात येते की- हत्या झालेली महिला, नऊ वर्षांचे बालक (म्हणजे मुलगा, कारण जर ती मुलगी असती तर मीडिया ते विशेषकरून नक्की छापतोच.) आणि शाळकरी मुलगी ही जणू बातमीतील मुख्य माहिती आहे. यातून काय कल मनात तयार होतात?

- बायकांच्या सुरक्षिततेचं आजकाल काही खरं नाही, आता लहान मुलग्यांबाबतही असले प्रकार घडू लागले आहेत, शाळा वगैरेंसाठी पण मुलींना घराबाहेर सोडावं तर असे प्रकार घडतात.. हेच मथळे जर गुन्हेगार कोण आहे हे डोळ्यांसमोर ठेवून लिहिले,

तर आपल्याला त्याबद्दल विचार करणे गरजेचे होईल. ‘23 वर्षीय सुशिक्षित, बेरोजगार तरुणाची लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात दोषी असल्याची कबुली’ असा मथळा छापला तर असे गुन्हे कोण करत आहे, त्या व्यक्तीची परिस्थिती काय आहे, त्या व्यक्तीच्या आर्थिक-सामाजिक पार्श्वभूमीचे विश्लेषण या बाबींचा विचार आपसूक करावा लागेल. अशा प्रकारे passive voice मध्ये किंवा पीडित व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून जे वार्तांकन किंवा वर्णन केलं जातं, त्याला prescribed passivity असं म्हटलं जातं. या बातम्या जेव्हा छापून येतात, तेव्हा अनेकदा पीडित स्त्रीच्या किंवा व्यक्तीच्या परिस्थितीचे वर्णन सनसनाटी वाटेल, अशा प्रकारे केले जाते. गुन्हा करणाऱ्या व्यक्तीचा मात्र एखाद-दोन ओळींत उल्लेख असतो. वरील बातम्यांचे मथळे ज्या व्यक्तींबद्दल आहेत, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना किती तरी मनस्ताप या सनसनाटीकरणामुळे होत असतो. इथे हा त्रास गुन्हा करणाऱ्याला व्हावा, हा मुद्दा अजिबात नाही. असा त्रास मुळातूनच शोषण झालेल्या व्यक्तीला निश्चितच होऊ नये. लिंगभेदातून होणारी जी हिंसा आहे (gender violence)  तिचं वर्णन जेव्हा कायद्याच्या कक्षेतही केलं जातं, तेव्हा शोषित व्यक्ती केंद्रस्थानी असते. याचं इंग्रजीतलं एक उदाहरण पाहू या.

- Jack beat Martha. (जॅकने मार्थाला मारले- घटना)

- Martha was beaten by Jack. (मार्थाला जॅकने मारले.- इथे आपले लक्ष मार्थाला मारले गेले, याकडे काही प्रमाणात वळते.)

- Martha was beaten. (मार्थाला मारले गेले. -  या वाक्यात जॅक नाहीये.)

- Martha was battered.  (मार्थाला मारहाण केली गेली. -जॅक कधीच चर्चेतून बाहेर आहे आणि मार्थावर झालेल्या हिंसेचे अधिक चित्रमय वर्णन पाहायला मिळते.)

- Martha is a battered woman. (मार्था मारहाण झालेली स्त्री आहे.- अशा वर्णनांमधून मार्थाची ओळखच जणू तिच्यावर झालेल्या हिंसेच्या घटनेतून ठरवली जाते आहे आणि वाक्याला कर्ता नसल्याने त्या व्यक्तीचा साधा उल्लेखही केला जात नाही.)

आता यामध्ये जॅकने चर्चेतून अंग कधीच काढून घेतले आहे आणि सगळं लक्ष मार्थावर आहे. स्त्रियांविरुद्धच्या अत्याचाराच्या बातम्या जेव्हा वेगानं पसरतात आणि चर्चिल्या जातात, तेव्हा शोषित व्यक्तीच्या वागण्याचीच जास्त मीमांसा होते. उदाहरणार्थ- तिने कपडे कसे घातले होते, संध्याकाळी फार उशीर झाला होता का, ती एकटी बाहेरच कशाला गेली- अशा गोष्टींवर भरपूर ऊहापोह होतो. याला victim blaming असं म्हणतात. आणि असा ठपका इतर वेळेस ठेवलेला दिसत नाही. एखाद्या पुरुषाचा खून झाला तर तो एकटा का होता, असा प्रश्न विचारला जात नाही. शिवाय शोषित/पीडित स्त्रीचं जे वर्णन केलं जातं- जसं की, शाळकरी मुलगी असणे- यातून काय साध्य होतं? शाळेत जाणाऱ्या मुलींचे पालक जेव्हा हे वाचतात, तेव्हा ते आपल्या मुलींवर आणखी जास्त बंधनं घालायला जातात. तर शाळेत जाणाऱ्या मुलग्यांच्या पालकांनी आपल्या मुलाला काय सांगायचे आहे, काय समजवायचे आहे याची चर्चा व्हायला वावच उरत नाही. आता गुन्हेगाराचा उल्लेख अजिबातच नसतो किंवा त्याबद्दलचे तपशील नसतातच, असं नाही. विशेषत: पतीने केलेल्या गुन्ह्यांची नोंद ही कायम पतीचा उल्लेख करून केलेली दिसते, मात्र इतर सर्व वेळा शोषित व्यक्ती केंद्रस्थानी आहे असं दिसतं.

जगभरातून अशा प्रकारे भाषेत बदल केले जावेत, गुन्हा करणाऱ्या पुरुषांचा ठळकपणे उल्लेख करावा- असा आग्रह जेव्हा धरला जातो, तेव्हा सगळीकडून प्रचंड टीकेची झोड उठते आणि ‘सगळे पुरुष असे (not all men) असे सांगितले जाते. Not all men चा धोशा लावून धरल्याने, गुन्हे होऊच नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाय काय करता येतील याकडे सातत्याने दुर्लक्ष होते. यातून छोटे मुलगे, पौगंडावस्थेतील तरुण यांच्याशी वेगवेगळ्या प्रकारे संवाद साधायची वेळ हातातून निघून जाते आणि अधिकाधिक व्यक्ती शोषणाला बळी पडतच राहतात. खरं तर हा मुद्दा केवळ स्त्रियांपुरताच सीमित नाही. लहान मुला-मुलींचे होणारे शोषण, तृतीयपंथी व्यक्तींना सहन करावी लागणारी शारीरिक-मानसिक हिंसा आणि स्त्रियांविरुद्ध घडणारे गुन्हे या सगळ्यामध्ये पुरुषांचे प्रमाण लक्षणीय आहे. भारतात पती आणि सासरच्या इतरांकडून होणाऱ्या छळाखालोखालचे प्रमाण हे विनयभंगाच्या गुन्ह्यांचे आहे, तर त्याखालोखाल बलात्कार आणि अपहरण यांचे आहे. (संदर्भ- Women and Men in India – statistical compilation of Gender related Indicators in India 2018 तसेच Crime in India 2016, National Crime Records Bureau, Ministry of Home Affairs.) यात एक गंभीर मुद्दा असा की, हे सर्व विश्लेषण Crimes Committed Against Women याचा भाग म्हणून दिलेले असते; मात्र Crimes committed by men किंवा Crimes committed by women अशी आकडेवारी कुठेही ठळकपणे दिसत नाही. दर तीन मिनिटाला एका स्त्रीला अत्याचाराचा सामना करावा लागतो, असे मथळे दिसत राहतात. दर तीन मिनिटाला पुरुषांकडून अत्याचार केला जातो, असा मथळा का दिसत नाही? Not all men या युक्तिवादावर अवलंबून राहणे धोक्याचे आहे. हे वारंवार दाखवून दिले जाते की- विनयभंग, बलात्कार यामध्ये कुटुंबातील व्यक्ती दोषी असण्याचे प्रमाण खूप मोठे आहे. Not all men च्या हट्टापायी चुकीचे वर्तन करणारा पुरुष हा कुणी नराधम-खुनशी नसून तो कुणीही, सर्वसामान्य असू शकतो, हे चित्र बऱ्याचदा नीट उभं राहत नाही. शिवाय सर्वच मुलग्यांना-पुरुषांना या विषयाबाबतीत संवेदनशील, जागरूक बनवण्याची संधीही उरत नाही. मी स्वत: त्यातला नाही, माझ्या कुटुंबातले पुरुष असे नसणारच- असं वाटून अनेकदा मनाचं समाधान करून घेतलं जातं किंवा याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं जातं. आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये स्त्रियांविरुद्ध होणारे गुन्हे किंवा पुरुषांकडून केले जाणारे अत्याचार या विषयाबद्दल शाळेपासून ते पदवीच्या शिक्षणापर्यंत संपूर्ण मौन आहे. कायदा किंवा समाजशास्त्र शिकणाऱ्या मोजक्या लोकांना या विषयाची तोंडओळख होते, मात्र इतर सगळीकडे आनंद आहे.

यासंबंधी एक बाब लक्षात घेणे आवश्यक आहे की, हा स्त्री विरुद्ध पुरुष असा मुद्दा नाहीये. भाषा वापरताना केल्या जाणाऱ्या निवडी या स्त्री-पुरुष दोघांच्या विकासाला खीळ घालणाऱ्या असतात, असा हा मुद्दा आहे. वरील सगळी आकडेवारी, चर्चा ही पोलीस/न्यायव्यवस्था या सगळ्यापर्यंत पोहोचलेल्यांची आहे. पोलिसांची किंवा कायदेशीर मदत सगळ्या पीडितांना उपलब्ध असतेच असे नाही. शिवाय हे खूपदा दिसून येतं की, ज्या गटाचे शोषण होते आहे त्याची या सगळ्या प्रक्रियेत वारंवार मानहानी होते. शिवाय पीडित स्त्रीची या सगळ्यात कबुली (consent) तर नव्हती, अशी शंकाही व्यक्त केली जाते. विशेषत: बलात्काराच्या प्रकरणांबाबतीत हे जास्त खरे आहे. इथे एका मुद्याचा विचार व्हायला हवा. जर एखादा पुरुष कोणतीही तक्रार करत असेल, पाकीट मारल्याची किंवा अगदी शारीरिक बळजबरी झाल्याचीसुद्धा जरी बाब असेल तरी त्याच्यावर ताबडतोब विश्वास ठेवण्याकडे कल असतो. मात्र तक्रार करणारी व्यक्ती स्त्री असेल, तर तिच्यावर पुराव्याशिवाय सहज विश्वास ठेवला जात नाही किंवा खूप चौकशी, उलटसुलट प्रश्न यानंतरच तिच्यावर विश्वास ठेवला जातो. घरगुती भांडणांमध्येसुद्धा जर तक्रार करणाऱ्या स्त्रीची बाजू कुटुंबातल्या एखाद्या पुरुषाने घेतली, तर तिचं म्हणणं तुलनेने सहज ऐकून घेतलं जातं, विश्वास ठेवला जातो. अन्यथा ती स्त्री भांडकुदळ, कांगावखोर ठरवली जाते. अशा वर्तणुकीला second guessing - अविश्वासाची भूमिका असं म्हणतात. पुन्हा एकदा हे केवळ स्त्रियांबरोबर नाही तर सर्व शोषित गटांबरोबर केले जाते. जॉर्ज फ्लॉइडच्या दुर्दैवी मृत्यूनंतर अमेरिकेत कृष्णवर्णीय लोकांच्या हक्कांसाठी जी खूप मोठ्या प्रमाणात आंदोलने चालली आहेत, त्यामध्येसुद्धा हा मुद्दा वारंवार पुढे आणलाय. ‘मला श्वास घेता येत नाहीये’ हे तो मृत्यूच्या आधी सतत म्हणत होता त्याकडे त्याचा प्राण घेणाऱ्या ऑफिसरने ज्या सहजतेने दुर्लक्ष केले, त्या विरुद्धचा हा राग आहे. ‘मला श्वास घेता येत नाहीये’ अशीच विनवणी जर एखाद्या संशयित श्वेतवर्णीय व्यक्तीने केली असती तर परिणाम निश्चित वेगळा असता, हे आपल्याला माहिती आहे. अमेरिकेत जी गोष्ट कृष्णवर्णीय लोकांची आहे- ती आपल्या इथे दलित-बहुजन जातींतल्या व्यक्तींची आहे, आपल्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या आदिवासींची आहे, समाजात सामावून न घेतल्या जाणाऱ्या तृतीयपंथीयांची आहे आणि तीच गत स्त्रियांची आहे. अशा अविश्वासातून जेव्हा समाज, कुटुंबातल्या इतर व्यक्ती, न्यायव्यवस्था एखाद्या व्यक्तीकडे पाहते, त्यातून त्या व्यक्तीचे दोन प्रकारचे नुकसान होते. व्यक्तीला दिलासा, न्याय कधी उशिराने मिळतो तर कधी मिळतच नाही, हा पहिला भाग. शिवाय व्यक्तीला जर सतत सर्व पातळ्यांवर संशय- अविश्वास यांचा सामना करावा लागत असेल, तर बरोबर आणि चूक ठरवण्याची व्यक्तीची जी क्षमता असते, त्याची हानी होऊ शकते. यातून व्यक्तीच्या स्व-ला सहज भरून न निघणारी इजा होत असते. कुणी जर सतत असं सांगत असेल की- बघ हं, सांभाळून राहा, असे कपडे घालू नकोस, फार मोठ्यांदा हसू नकोस, शक्यतो पडती बाजू घे... तर काय करणे बरोबर आहे आणि काय नाही, हे ठरवण्यासाठीचा जो आत्मविश्वास व्यक्तीकडे हवा, तो कसा शाबूत राहील? या सगळ्या दिव्यांमधून पार पडल्यावर जर दुर्दैवाने काही अपप्रसंग घडला तरी पुन्हा तुमच्याच वर्तनाची कसून शहानिशा होणार! असं कसं चालेल?

म्हणूनच या सगळ्याकडे आधी म्हटल्याप्रमाणे, स्त्री विरुद्ध पुरुष असा मुद्दा न पाहता घटनेत सहभागी विरुद्ध बघ्याची भूमिका वठवणारे, असंही पाहिलं पाहिजे. अनेकदा जेव्हा मुलगे चुकीचं वागत असतात तेव्हा आजूबाजूचे, कुटुंबातले स्त्री आणि पुरुष दोघेही वेगवेगळ्या प्रकारे शांत राहतात Boys will be boys  हे बदलायला हवं. त्यातही वर म्हटल्याप्रमाणे पुरुषांच्या म्हणण्याला जास्त आणि सहज मान्यता मिळते. तेव्हा आपल्या आजूबाजूला जर स्त्रियांप्रति हीन वागणुकीची चर्चा सहज होत असेल, स्त्रियांच्या शरीरावरून केले जाणारे विनोद नॉर्मल वाटत असतील किंवा कौटुंबिक हिंसेकडे ‘ज्याचा-त्याचा मामला’ म्हणून दुर्लक्ष करण्याचे धडे आपल्याला मिळत असतील, तर तेही बदलायला हवं. स्वत:च्या कुटुंबीयांच्या, मित्रांच्या विरोधात बोलणे ही अनेकदा सोपी गोष्ट नसते हे खरं आहे. मात्र या रोजच्या आयुष्यातल्या भाषेतल्या आणि वृत्तीतल्या बदलांशिवाय मोठे बदल घडून येणार नाहीत. लिंगभेदातून होणारे अत्याचार, गुन्हे रोखण्यासाठी प्रश्न मुळातून समजून घेण्याकडे भाषेने आपला रोख वळवला पाहिजे. यातून पुरुषांच्या जडण-घडणीच्या काळात शिक्षणात काय बदल अत्यावश्यक आहेत, कुटुंबात काय बदल करायला हवेत याकडे तर लक्ष वेधलं जाईलच; त्याचबरोबर victim blaming च्या भाषेवरही बंधनं येतील. स्त्रियांच्या हक्काचे प्रश्न मानवी हक्कांचे आहेत. चुकीचे वर्तन कुणाबरोबर घडते आहे याकडे तर लक्ष दिलेच पाहिजे. मात्र त्या वर्तनामागचा ‘कर्ता’ कोण आहे, अशा वर्तनामागची ‘करविता’ शक्ती कोणती आहे, हेही आता डोळसपणे पाहायला हवे.

Tags: सदर साधना सदर स्त्री-पुरुष समानता कृष्णवर्णीय असमानता black people tribals gender issues equality aparna dixit weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके