डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सूचित केलेलं रसिकानं ओळखावं...

अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार : चित्रव्यूह व चलत्‌चित्रव्यूह

खोपकरांच्या कलाविचाराच्या मुळाशी अनेक परंपरांचं भान आहे. त्यांचा पौर्वात्य आणि पाश्चिमात्य विचारप्रणाली आणि कलाप्रवाहांचा खोल अभ्यास आहे. म्हणूनच खोपकर वैश्विक परिप्रेक्ष्यातून कलाव्यवहाराचा विचार करणाऱ्या भारतीय विचारवंतांच्या परंपरेशी जोडलेले आहेत. त्याचं लेखन एका व्युत्पन्न कलावंताचं लेखन असलं तरी त्यांची भाषा संवादी आहे. तिला स्वतःचा नाद आणि लय आहे. त्यांच्या लेखनात वाचकाच्या ओठावर स्मितरेषा निर्माण करणारा विचारप्रवण विनोद आहे. म्हणूनच ‘गुरुदत्त : तीन अंकी शोकांतिका’ या पहिल्या पुस्तकाप्रमाणेच चित्रव्यूह आणि चलतचित्रव्यूह ही जुळी पुस्तकं वाचतांना एक समृद्ध अनुभव मिळतो. प्रस्तुत मुलाखतीत खोपकर पुस्तकांच्या अनुषंगानं एकूणच कला आणि संस्कृतीव्यवहारासंबंधी काही महत्त्वाच्या मुद्‌द्यांना स्पर्श करतात.  

प्रश्न : ‘चित्रव्यूह’ आणि चलत्‌चित्रव्यूह’ ही जुळी पुस्तकं अनेक अर्थांनी महत्त्वाची आहेत. एकीकडे तुमच्या आयुष्याला आकार देणाऱ्या व्यक्ती आणि घटनांचा तो दस्तऐवज आहे, तर दुसरीकडे काळाचा मोठा पट त्यातून उलगडतो. अनेक कलाप्रवाहांच्या गेल्या चार-पाच दशकांतल्या बदलत्या रूपांचं ते आरेखनही आहे. या पुस्तकांच्या निर्मितिप्रक्रियेविषयी काय सांगाल?

- आपण लेखक व्हावं किंवा नियमित लिहीत राहावं, असं मला कधी वाटलं नव्हतं. गुरूदत्तवरचं पुस्तक काहीसं अपघातानंच लिहिलं गेलं. गुरूदत्तचे सिनेमे पाहिल्यावर मला त्यांत काही सूत्रं जाणवली होती, त्यांची टिपणंही काढली होती. असं टिपण म्हणून लिहायला सुरुवात केल्यावर मला जे जाणवलं होतं, ते पुरेसं व्यक्त होईपर्यंत मी लिहीत राहिलो. त्याचं पुढे ‘गुरूदत्त : तीन अंकी शोकांतिका’ हे छोटं पुस्तक झालं.

त्यानंतर झालेलं लेखन हे चर्चासत्र किंवा चित्रपट महोत्सवांतून वाचलेले पेपर्स किंवा आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतून वेळोवेळी केलेलं लेखन या स्वरूपाचं होतं. त्यानंतर ‘रूपवाणी’ मासिकासाठी मी ‘चौकटीच्या आत-बाहेर’ ही चित्रपट आस्वादाविषयी लेखमाला लिहिली. त्याच काळात लोकवाङ्‌मय गृहात बऱ्याचदा जाणं व्हायचं. तेव्हा मित्रांशी गप्पा व्हायच्या. त्यातून जयप्रकाश सावंत म्हणाला, ‘तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या प्रतिभावंतांचा सहवास लाभला; तुमच्याकडे इतकं सांगण्यासारखं आहे, ते लिहिलंत तर लोकांना वाचायला नक्की आवडेल.’

असाच एकदा परेश मोकाशी माझ्याकडे आला होता. त्याच्याशी बोलताना मी काही किस्से सांगितले. ते ऐकून तो म्हणाला, ‘आमच्या पिढीला यातलं काहीच माहीत नाही, तुम्ही हे लिहायलाच हवं.’ तेव्हा मग ‘आपले वाङ्‌मयवृत्त’ या मासिकासाठी ‘आजोबांची बंडी’सारखे काही लेख लिहिले. पण अर्थात त्यालाही मासिकाची शब्दमर्यादा होतीच. हे लिहिताना मला लोकांचा प्रतिसाद तर चांगला मिळालाच; पण महत्त्वाचं म्हणजे, मला ते लिहिताना आनंद मिळतोय आणि मनापासून लिहावंसं वाटतंय हे जाणवलं. आपल्याकडे सांगण्यासारखं अजून बरंच आहे. हेसुद्धा हळूहळू लक्षात येत गेलं. त्या वेळी आपण मासिकाच्या शब्दमर्यादेत लिहिण्यापेक्षा मोकळेपणानं लिहावं, असं वाटलं आणि मी तसं लिहायला सुरुवात केली.

दुसरं असं की, कोणताही ‘स्व’ जेव्हा घडत असतो; तेव्हा त्या घडणीमागे अनेक हात असतात, त्यांचे संस्कार असतात. हे सगळे संस्कार आणि परंपरा बऱ्याचदा त्या माणसापेक्षा महत्त्वाच्या असतात. तर माझ्या आयुष्याला आकार देणाऱ्या अशा व्यक्तींविषयी, अनुभवांविषयी मी लिहायला लागलो.

प्रश्न : जुळी पुस्तकं हा एक अनोखा प्रकार आहे. या दोन पुस्तकांचा एकमेकांशी कोणत्या स्वरूपाचा संबंध आहे?

- या दोन पुस्तकांपैकी पहिल्यातलं लेखन मी चित्रपट- दिग्दर्शक व्हायचा ठाम निर्णय घेतला, तोपर्यंतचं आहे. दुसऱ्यातले निबंध मी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतल्यानंतर आलेले अनुभव, माझ्या आयुष्यावर खोलवर परिणाम करणारे तिथले गुरू याविषयीचे आहेत. मी वर म्हटल्याप्रमाणे ही दोन्ही पुस्तकं माझ्या अनुभवांवर आधारित असली, तरी त्यात मी केंद्रस्थानी नाही. मी परिघावरून हे सगळं न्याहाळणाऱ्या निरीक्षकाच्या भूमिकेत आहे. हा निरीक्षक विविध अनुभव आणि कलाप्रकार टिपून घेतो आहे.

दुसरं असं की- हे निबंध साहित्य, चित्रपट, नृत्य, चित्र, स्थापत्य अशा विविध कलाक्षेत्रांतल्या कलावंतांच्या व्यक्तिमत्त्वांविषयी, त्यांच्या कलेविषयी, त्यांच्या  स्वभावाविषयी काही सांगत असले; तरी ते त्यापलीकडे जाऊन त्या-त्या कलेची मूलतत्त्वं काय आहेत याचा शोध घेतात. अशा वैश्विक तत्त्वांचा शोध घेताना उत्कट अशा वैयक्तिक अनुभवांना नजरेआड होऊ देत नाहीत.

या दोन पुस्तकांचं स्वरूप समीक्षालेखनाचं नाही, चरित्रात्मक नाही किंवा आत्मचरित्रात्मकही नाही. मराठीपुरता तरी हा एक नवा वाङ्‌मयप्रकार आहे, असं म्हणायला हरकत नाही. जागतिक साहित्याच्या संदर्भात आयझेन्स्टाईन, बोदलेअर, कोलरिज यांनी अशा प्रकारचे निबंध लिहिले आहेत. आपल्याकडे कुमार गंधर्वांच्या व्याख्यानांचं ‘कुमार गंधर्व : मुक्काम वाशी’ हे संकलन आहे.

भास्कर चंदावरकर, ऋत्विक घटक अशा सक्रिय कलावंतांनी असं लेखन केलेलं आहे. अर्थात, ही नावं मी संदर्भासाठी घेतोय; गुणात्मक तुलनेसाठी नाही. कारण लेखक म्हणून माझ्यावर या आणि इतर अनेक लेखक- कलावंतांचं ऋण आहे.

प्रश्न : हे लिहिताना कोणती वैचारिक भूमिका समोर होती? तुमच्या चित्रपट-दिग्दर्शक असण्याचा त्या भूमिकेशी काही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध होता का?

 - चित्रपट ही एक समावेशक कला आहे. तिच्यात अनेक कलांना मुक्त वाट मिळत असते. म्हणून चित्रपट- दिग्दर्शक असणं, म्हणजे केवळ सेल्युलॉइडवर काम करणं नाही; तर ती एक अनुभव घेण्याची पद्धत आहे. तुला एक साधा अनुभव सांगतो. एकदा जंगलात पहाटे शूटिंगसाठी गेलो होतो. पक्ष्यांच्या किलबिलाटाचे विविध आवाज येत होते. मला ते आवाज एखाद्या ऑर्केस्ट्रासारखेच हळूहळू वाटायला लागले. म्हणजे, आधी एक पक्षी ओरडायचा, मग दुसरा त्यात आपला आवाज मिसळायचा, मग तिसरा त्याला साद घालायचा. हे सूक्ष्म ऐकणं दिग्दर्शक असल्यामुळे शक्य झालं किंवा ढगाळ आकाशाकडे पाहिल्यावर त्यात राखी रंगाच्या किती छटा दिसतात, ते नजरेला जाणवणं, ही पाहण्यातली सूक्ष्मताही त्याचाच भाग. त्यासाठी डोळ्यांना, कानांना जो रियाझ पाहिजे, तो दिग्दर्शक असल्यामुळे होत गेला.

ही सूक्ष्मपणे ऐकण्याची, सूक्ष्मपणे पाहण्याची आणि परस्परसंबंध जोडण्याची जी प्रक्रिया आहे; ती एखादी कलाकृती तुमच्यासमोर असली तर तिच्या संदर्भात होते. त्यामुळे तात्त्विक निष्कर्ष नीट समजून घेणं कलेच्या संदर्भात केलं की, त्या निष्कर्षांना मुळं मिळतात, अधिष्ठान मिळतं.

प्रश्न : आपल्याकडे असं लेखन तुरळक दिसतं. त्यामागे कोणती कारणं असावीत?

- महाराष्ट्रात मध्यमवर्गीय जाणिवांच्या प्राचुर्यामुळे एकूणच कलेविषयीचं जागतिक भान इथे कधी नीट रुजलंच नाही. बंगालमध्ये हे भान सुरुवातीपासूनच होतं, कलाविचाराला समृद्ध परंपरा होती. तसं महाराष्ट्रात झालं नाही. महाराष्ट्रातल्या मोठ्या विचारवंतांनी जेव्हा संगीताबद्दल लिहिलं, तेव्हा फक्त भारतीय संगीताबद्दलच लिहिलं. आता नृत्याचं उदाहरण घेतलं, तर आपल्याकडे खास आपलं असं अभिजात नृत्य नाही. महाराष्ट्रातले भोसले तंजावरला गेले, तिथे नृत्य वाढलं; पण महाराष्ट्राला ते आपलं वाटलं नाही. चित्र आणि शिल्पकलेबद्दलही असंच म्हणता येईल. महाराष्ट्रात कलांविषयी जो विचार झाला, तो प्रामुख्यानं साहित्याच्याच अंगानं झाला. मर्ढेकरांचं उदाहरण यासंदर्भात बोलकं आहे.

प्रश्न : सैद्धांतिक आणि वैयक्तिक यांची सांगड घालताना कोणत्या बाबींचं भान ठेवावं लागतं?

 - एखाद्या विषयावर विचार करताना तुमची उदाहरणं जितकी विपुल आणि चांगल्या अर्थानं परस्परविरोधी असतील, तेवढी त्या विचाराला खोली लाभते. सैद्धांतिक विचार करावा, पण तो सेंद्रिय अनुभवापासून दूर गेलेला नसावा. आयझेन्स्टाईन याला ‘ग्रुंडप्रॉब्लेम’ अशी संज्ञा देतो; म्हणजे कलानुभवाच्या मूलभत समस्या. त्यानं चॅप्लिनवर लिहिलेल्या लेखात तो विनोदाच्या स्वरूपाचा विचार करतो किंवा त्याच्या ग्रिफिथवरच्या लेखात Pars Pro Toto किंवा अंशातून व्यक्त होणाऱ्या समग्रतेविषयी विचार करतो. या उदाहरणांमुळे त्याच्या मुख्य चिंतन- विषयाला एक आधार मिळतो. यामुळे ज्यांचा वरवर एकमेकांशी काही संबंध नाही, असं वाटणाऱ्या अनुभवांचे परस्परसंबंध लक्षात यायला लागतात.

त्यामुळे या दोन पुस्तकांतले लेख लिहिताना ही भूमिका मी समोर ठेवली होती. म्हणून ऋत्विक घटक यांच्यावर लिहिताना मला महाकाव्याचं स्वरूप आणि त्यातही रामायणाचा विचार करावासा वाटला किंवा महाकाव्याला जोडूनच थिओ आंगेलोपुलोस हा ग्रीक चित्रपट-दिग्दर्शक आणि ऋत्विक घटक यांच्यातले समान दुवेही लक्षात आले. याच भूमिकेतून हे लेख एकामागोमाग एक असे लिहिले गेले. त्या सगळ्यांमागे सूत्र आहे. पण ते लेखकाच्या मनात आहे आणि वाचकानं शोधायचं आहे. ते त्याला सापडलं, तर  त्या सूत्राला वेगळा अर्थ लाभतो. म्हणूनच आपल्याकडे जे प्राचीन सूत्रबद्ध लेखन आहे, त्यावर अनेक भाष्यं झालेली आहेत. कारण प्रत्येक भाष्यकाराला त्यात वेगळं सूत्र दिसत असतं.

सूत्रांचा अन्वय प्रत्येक वाचकाचा वेगळा असतो किंवा असू शकतो. त्यातूनच त्या सूत्राला नवं आयुष्य मिळतं. म्हणूनच मी मला दिसणाऱ्या किंवा गवसलेल्या सूत्रांचं तत्त्वज्ञान मांडण्याऐवजी वैयक्तिक उत्कट अनुभव केंद्रस्थानी ठेवले. या अनुभवांतून काही गोष्टी लख्ख जाणवतात. वीज चमकल्याप्रमाणे भोवतालचा परिसर स्वच्छ दिसायला लागतो- ही पुस्तकं लिहिण्यामागची भूमिका.

प्रश्न : अनेक कलांचा साकल्यानं विचार करताना विशिष्ट कलेचं स्वरूप दुर्लक्षित होण्याचा धोका असतो का? किंवा त्याचा विशिष्ट कलेच्या विचारात कसा उपयोग होऊ शकतो?

 - नृत्याच्या अनुभवाचं जे नृत्यपण असतं, ते चित्रकलेचा अनुभव त्यावर लादला तर नष्ट होतं. म्हणूनच आपल्याकडच्या तात्त्विक चर्चेत येणारा एक अपुरेपणा मला नेहमी जाणवतो. सौंदर्यविचार करायचा असेल, तर तो कवितेबद्दलच का? इतर कलांमध्येही सौंदर्य आहेच की! किंवा वाङ्‌मयीन महात्मता ही इतकी वेगळी आहे का? आता काळात उलगडणाऱ्या कलांचं उदाहरण घेतलं- आणि त्यात साहित्यही येतं हे लक्षात घेतलं- तर सबंध महाभारत काही तुम्ही एका क्षणात वाचू शकत नाही. म्हणूनच या कलांमधलं निवेदन कळण्याइतकी सूक्ष्म दृष्टी रसिकाकडे असावी लागते. ध्वनीच्या संदर्भात कान तयार नसेल, तर संगीतातलं कथन कसं कळणार?

सुनीत या काव्यप्रकाराचे काही नियम आहेत. एखादा प्रतिभावंत कवी जेव्हा उत्कृष्ट सुनीत लिहितो, तेव्हा तो हे नियम पाळतही असतो आणि तोडतही असतो. हे एकाच वेळी काही तरी बांधलं जाणं आणि काही तरी विखुरलं जाणं कळण्यासाठी, काय बांधलं जातंय याची माहिती पाहिजे. त्यामुळे तू हा जो जीवनदृष्टीचा प्रकार म्हणतोयस, तो मला तत्त्वतः मान्य नाही. कारण तसं झालं, तर ती दृष्टी बंदिस्त होते. माझा एखाद्या कलाकृतीबद्दलचा दहा वर्षांपूर्वीचा अनुभव आजच्या अनुभवापेक्षा अगदी वेगळा असू शकतो. म्हणूनच जेव्हा कलेच्या संदर्भात लोक वस्तुनिष्ठ विधानं करतात, तेव्हा मला धास्ती वाटते. तर ‘तुम्ही म्हणाले ते खरं,’ असं म्हणणं हे दुसरं टोक. कारण सगळं काही पाहणाऱ्याच्या डोळ्यांत, असं काही नसतं. मी लिहितो तेव्हा आपली ही विधानं शाश्वत आहेत, असं मला वाटत नाही किंवा ती संपूर्णपणे अशाश्वत आहेत, असंही वाटत नाही. कारण या दोन्ही गोष्टी त्या कलाकृतीच्या पुढच्या प्रवासावर अवलंबून आहेत. त्यामुळे काळ आणि आस्वाद या दोन अक्षांचा एखादी कलाकृती अभिजात बनण्याशी महत्त्वाचा संबंध असतो.

प्रश्न : तुमच्या बहुभाषिकत्वाचा, नव्या भाषा शिकण्याचा तुमच्या लेखनावर काय परिणाम झाला?

 - आपल्याकडे जेव्हा समीक्षात्मक लेखन केलं जातं, तेव्हा असा विचार होत नाही. त्यामुळे ते लेखन फार एकांगी होतं. माझा भाषा शिकण्याचा जो सोस आहे, त्यामागे हाच विचार आहे. तुम्ही जेव्हा एखादी भाषांतरित कादंबरी वाचता, तेव्हा तुमचा वाचनानुभव मूळ कादंबरीपासून दूर जातो. या दूर जाण्याचा संबंध केवळ भाषांतराच्या गुणवत्तेपुरता नसतो. मूळ भाषेतलं पुस्तक त्याच्या आधीच्या अनेक पुस्तकांशी जोडलेलं असतं. भाषांतरात ही नाळच तोडली जाते. त्यामुळे त्याचे संबंध मागे कुठपर्यंत जातात किंवा त्याच्या कुंडलीत काय काय आहे, हे तुमच्या लक्षात येत नाही. सतारीला खाली ज्या तारा असतात, त्या वरच्या तारांच्या नादाला अनुनाद निर्माण करतात. भाषांतरात या अनुनाद निर्माण करणाऱ्या किंवा सहकंप देणाऱ्या तारा गप्प राहतात. तो सहकंप निर्माण करणं, हे भाषांतरकारासाठी मोठं आव्हान असतं. म्हणूनच जीवनदृष्टी या संकल्पनेत एक काठिण्य अभिप्रेत आहे. माझ्या भूमिकेत ते नाही. ती प्रवाही आहे.

प्रश्न : या पुस्तकांच्या भाषेबद्दल मला विचारायचंय. आजकाल एवढं चविष्ट मराठी वाचायला मिळत नाही. तुमच्या या भाषेवर कोणते संस्कार आहेत? तिच्या मुळाशी काय आहे?

- माझ्या भाषेवर कळत-नकळत झालेले संस्कार हे लिखित शब्दांपेक्षा उच्चारित शब्दांचे आहेत. माझ्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींशी बोलणं-ऐकणं हा फार महत्त्वाचा अनुभव होता. मला ज्या बऱ्याच गोष्टी मिळाल्या आहेत, त्या लोकांशी झालेल्या संवादातूनच. प्रुफं तपासताना मला ती वाचण्यापेक्षा ती मोठ्यानं वाचणं-ऐकणं महत्त्वाचं वाटतं. डोळ्यांची मराठी आणि  कानांची मराठी असा फरक जर आपण केला, तर छपाई आल्यापासून डोळ्यांच्या मराठीचं प्रमाण वाढत चाललंय. हल्ली तर लोक असं मराठी लिहितात की, कोणी अडखळल्याशिवाय मोठ्यानं वाचूच शकणार नाही. कारण ती वाक्यं शब्दांच्या काट्याकुट्यांनी आणि दगडांनी भरलेली असतात.

म्हणजे तुम्ही केवळ हलकं-फुलकं असंच लिहिलं पाहिजे, असं मला म्हणायचं नाही. लेखनात तात्त्विक चर्चा करायला माझी काहीच हकरत नाही; पण विचाराला शब्दरूप देताना नादरूपाला असलेलं महत्त्व दुर्लक्षित करू नये. ही नादरूपाची जाणीव ऐकण्याच्या अनुभवांतून वाढत असते. म्हणजे जर तुम्हाला ‘खयाल’ चांगला ऐकता यायला लागला, तर तुम्हाला महाप्राणाची किंमत कळायला लागते किंवा व्यंजनाची किंमत कळायला लागते. आता ‘अकडी खटकती रैंदी’ हा टप्पा घेतला, तर त्यात ‘डी’ लांबवल्यानंतर ‘ख’ येण्याआधी मधे जो विराम आहे तो जाणवला; तर पुढे तुम्ही लिहिताना जेव्हा व्यंजनं वापरता, तेव्हा हा ऐकण्याचा अनुभव त्याच्या पार्श्वभूमीला असेल. मग कधी कधी आपण एखाद्या योग्य शब्दासाठी दहा-पंधरा दिवसही अडून राहतो. कारण इतर कोणताही शब्द लिहिला तर त्यातून चुकीचे, बेसूर आवाज यायला लागतात.

प्रश्न : पुस्तकाची मांडणी वेगळ्या प्रकारची आहे. जाहिरातक्षेत्रातले विख्यात डिझायनर विकास गायतोंडे यांनी तयार केलेलं त्यांचं दृश्यरूपही लक्षवेधी आणि विचारपूर्वक आखलेलं आहे. विकास गायतोंडेंबरोबर काम करायची पद्धत कशी होती?

- या पुस्तकाचं डिझाईन करताना मी आणि विकास गायतोंडे एकत्र बसून पानावरचा मजकूर कुठे संपवायचा, परिच्छेद कुठे करायचा- असा हिशेब केला. त्यामुळे ती पुस्तकं जर तू मोठ्यानं वाचलीस, तर या मांडणीचा तुला आधार मिळेल. फिल्म एडिट करताना तुम्ही शांतता कुठे वापरायची, ध्वनी कुठे आणि कसा वापरायचा, हे ठरवत असता. पुस्तक लिहितानाही जर असा विचार केला, तर त्याचा नक्कीच उपयोग होतो. तसाच नादाचा अनुभव भाषा समृद्ध करत असतो.

प्रश्न : मराठीत नादविचाराचं भान ना.ग.जोशी, वि.का.राजवाडे यांच्या लेखनात आढळतं. तुमच्या लेखनात भाषेच्या नादरूपाचं स्थान अतिशय महत्त्वाचं आहे. त्याविषयी काय सांगाल?

- मराठीत मुक्त छंद आल्यावर मोकाट सुटलेल्या वळूसारखे लोक लिहीत सुटले. मोठ्या कवीला शब्दाच्या नादरूपाचं तल्लख भान असतं. नारायण सुर्व्यांचं उदाहरण घे. काय तालिया होता तो! त्यांच्या वाचनाची पद्धत संगीताच्या अगदी जवळ जाणारी होती. दुसरीकडे अरुण कोलटकर गद्याच्या नादानं वाचायचा, पण त्यातही नाद होताच. या दोघांमध्ये ध्वनीची प्रखर जाणीव आहे. असे संस्कार जर भाषेवर झालेले असले, तर ते लेखनात यायला लागतात. मी जेव्हा नवी भाषा शिकतो, तेव्हा माझ्या भाषेतल्या काही गोष्टी नव्यानं कळतात.

रवींद्रनाथ म्हणायचे की, मी जेव्हा जग फिरून आलो, तेव्हा मला माझ्या अंगणातल्या दवबिंदूचं सौंदर्य कळलं. ना.ग.जोशी, माधव ज्यूलियन असे लेखक-कवी मी अत्यंत प्रेमानं वाचले. मराठी छंदांचं रूप कळण्यासाठी ते महत्त्वाचं ठरलं. तुम्ही जेव्हा दहा प्रकारची शार्दूल विक्रीडितं, मंदाक्रांता, वसंततिलका वाचता, तेव्हा तुम्हाला भाषेतल्या खाचाखोचा, गमतीजमती कळायला लागतात. तुमच्या भाषेचा सुंदर कशिदा तुम्हाला कळायला लागतो. भाषेचा स्पर्श छंदातून होत असतो.

प्रश्न : लेखनात मोठं आव्हान कोणतं वाटतं?

- ब्रेसाँ ‘युन फाम दूस’ हा सिनेमा करत असताना कुमार शाहनी त्याला सहायक होता. एका प्रसंगात त्यांना हॅट न घातलेला माणूस मागून जायला हवा होता. कुमारनी तसा एक माणूस ब्रेसाँच्या समोर उभा केला. ब्रेसाँनं क्षणभर त्याच्यावर नजर टाकली आणि नापसंतीनं मान हलवली. कुमारनं कारण विचारलं. त्यावर ब्रेसाँ म्हणाला, ‘‘मला फक्त हॅट न घातलेला माणूस नको, हॅट- शिवायचा (without a hat) माणूस पाहिजे. हा तसा नाही.’’ म्हणजे त्याचं without hat असणं त्यांना सूचित करायचं होतं. त्यामुळे प्रत्यक्ष दिसत नसलेल्या गोष्टी सूचित करणं, हे कोणत्याही कलेसमोरचं प्रमुख आव्हान असतं.

सिनेमासमोर ते अधिकच गंभीर स्वरूपात असतं. कारण समोर असलेल्या गोष्टी थेट दाखवणारं माध्यम सिनेमा आहे. चित्रकार एखादी फांदी आणून हवी ती गोष्ट झाकू शकतो किंवा कादंबरीकार एखाद्या गोष्टीचं वर्णन राखून ठेवू शकतो. पण सिनेमा दिग्दर्शकाच्या डोक्यावर ‘असतेपण’ हे सिंदबादच्या म्हाताऱ्यासारखं बसलेलं असतं. इतकं की, ‘नसतेपण’ सुचवायला त्याला फार झगडावं लागतं. माझ्या लेखनात आणि सिनेमात हे सूचित कसं केलंय, ते रसिकानं ओळखावं.

मुलाखत:  निखिलेश चित्रे

Tags: मुलाखत निखिलेश चित्रे हाथी का अंडा कथा दोन गणपतरावांची अरुण खोपकर चित्रव्यूह व चलत्‌चित्रव्यूह अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार महाराष्ट्र फ़ौंडेशन पुरस्कार 2014 interview mulakhat nikhilesh chitre hathi ka anda katha don ganapatravanchi arun khopkar chitrvyuh v chalatchitravyuh aparamparik granth purskar vishesh granth purskar Maharashtra foundation awards 2014 Maharashtra foundation purskar 2014 weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अरुण खोपकर
arunkhopkar@gmail.com

मराठी लेखक, लघुचित्रपट निर्माते व चित्रपट दिग्दर्शक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके