डिजिटल अर्काईव्ह

आज हे सगळे आर्थिक गुन्हेगार जे करतात, लोकांना लुबाडतात, त्यामुळे लोक अक्षरशः आत्महत्या करतात, त्यांची घरं उद्‌ध्वस्त होतात. याला जबाबदार असणाऱ्या गुन्हेगारांना तुम्ही जगासमोर आणताय, आणि पुढे त्यांच्याकडून असे गुन्हे घडणार नाहीत याची काळीज घेताय, याचाच अर्थ या कामातून एक प्रकारची राष्ट्रसेवाच घडतेय. यातून मिळणाऱ्या समाधानाची तुलना इतर कशाशीही होऊ शकत नाही. तिसरी गोष्ट अशी, की या क्षेत्रात काम करताना अशा प्रकारच्या मोहाला बळी पडलेल्या लोकांचं पुढे काय होतं, हे मी जवळून पाहिलं आहे.

फोरेन्सिक अकाउंटिंग क्षेत्रातील महाराष्ट्रातील महत्त्वाचे तरुण नाव म्हणजे डॉ. अपूर्वा जोशी, रिस्कप्रो कन्सल्टन्सी या कंपनीच्या संचालक, तसेच ‘क्विक हिल’सारख्या अनेक प्रसिद्ध कंपन्यांच्या त्या स्वतंत्र संचालक आहेत. हे अवघड आणि धाडसी क्षेत्र त्यांनी का निवडले, मोठ-मोठ्या आर्थिक घोटाळ्यांचा माग काढताना नक्की काय काय करावे लागते, या सगळ्याला लागणारी खंबीरता आणि नैतिकता कुठून येते या सगळ्यांचा मागोवा घेणारी मुलाखत.

प्रश्न - फोरेन्सिक अकाउंटिंग म्हणजे नक्की काय? या क्षेत्रात तुम्ही कशा आलात?

- फोरेन्सिक अकाउंटिंग हे आपल्याकडे फारसं ज्ञात नसलेलं क्षेत्र आहे. एखाद्या कंपनीच्या किंवा संस्थेच्या अकाउंटिंगमध्ये दिसून आलेल्या अनियमिततेचा किंवा घोटाळ्याचा तपास म्हणजे फोरेन्सिक अकाउंटिंग! पाश्चात्त्य देशांमध्ये तयार झालेली ही त्याची सरळसोट व्याख्या आहे. पण भारतातले प्रसिद्ध सीए आणि सर्टिफाइड फ्रॉड एक्झामिनर म्हणून काम करणाऱ्या मयूर जोशी यांनी ही व्याख्या बदलवली. त्यांनी एक नवा दृष्टिकोन फोरेन्सिक अकाउंटिंगच्या क्षेत्रात आणला, तो असा की, तंत्रज्ञान आणि तपास यांचा समन्वय म्हणजे फोरेन्सिक अकाउंटिंग. म्हणजे नक्की काय, तर ज्या वेळी एखादा फ्रॉड घडतो, तेव्हा त्या कंपनीचे व्यवस्थापनातील अधिकारी किंवा सरकारी अधिकारी आमच्यासारख्या लोकांना या फ्रॉड्‌सचा तपास करण्यासाठी बोलावतात. तिथे गेल्यानंतर आम्हांला हे पाहावं लागतं की, हा फ्रॉड खरंच झाला आहे का? बऱ्याच वेळा आकडे मांडताना झालेल्या चुकांमुळे किंवा नजरचुकीने हे फ्रॉड्‌स झाल्याचं दिसत असतं. तसं नसेल, आणि प्राथमिक निरीक्षण करताना फ्रॉड खरंच झाल्याचं दिसून येत असेल, बॅलन्स शीट तसं सांगत असेल, तर त्यानंतर तपास सुरू होतो. मग पुढे कागदपत्रे, पुरावे, संबंधित लोकांच्या मुलाखती, यांच्यातून तो फ्रॉड उलगडत जातो. त्यातून त्या कंपनीने या फ्रॉडमध्ये किती रक्कम गमावली याचा अंदाज घेणारा एक प्राथमिक अहवाल तयार करण्यात येतो. फ्रॉड कशा पद्धतीने झाला, त्याची कथा नक्की काय आहे हे सगळं त्या अहवालात सांगितलं जातं. इथपर्यंत प्रामुख्याने फोरेन्सिक अकाउंटंटचं काम असतं. मग पुढे तो अहवाल न्यायालयासमोर जातो आणि त्यावर निर्णय येतो.

प्रश्न - तुम्ही म्हणालात की फोरेन्सिक अकाउंटिंगबद्दल भारतात कुणालाही फारशी माहिती नाही. असं असताना तुमची या विषयाशी ओळख कशी झाली?

- याच्याही मागे एक कथाच आहे असं म्हणावं लागेल. मी मघाशी ज्या सीए मयूर जोशी यांचं नाव घेतलं त्यांनी भारतात या क्षेत्राचा पाया घालून दिला आहे. फोरेन्सिक अकाउंटिंगचं शिक्षण देणारी संस्था त्यांनी भारतात सुरू केली. ज्या दिवशी अमेरिकेच्या टि्वन टॉवरवर दहशतवादी हल्ला झाला, त्याच दिवशी मयूर हे खूप वरच्या पातळीवरची फ्रॉड एक्झामिनेशनची परीक्षा पास झाले. अर्थातच ते सीए आणि फोरेन्सिक अकाउंटंट, दोन्ही असल्याने एक कुतूहल त्यांच्या मनात निर्माण झालं ते असं की, 9/11 हा केवळ लोकांचे जीव घेण्यासाठी झालेला दहशतवादी हल्ला असेल का? की त्यामागे आणखी काही हेतू असेल? हा धागा पकडून त्यांनी त्या घटनेचा मागोवा घेण्यास सुरुवात केली. त्यातून एक लक्षात आलं, की या हल्ल्याची तयारी ओसामा बिन लादेन आणि त्याच्या दहशतवादी चमूने पाच वर्षे आधीच सुरू केली होती. अमेरिकेवर हल्ला केल्यानंतर जगभरातील शेअर बाजार कोसळतील हा अंदाज त्यांनी बांधला होता. त्या अंदाजावरून वेगवेगळ्या देशांत त्यांनी काही शेल कंपन्या स्थापन केल्या होत्या. त्या कंपन्यांच्या माध्यमांतून त्यांनी स्टॉक मार्केटमध्ये शॉर्ट पोझिशन्स घेतल्या होत्या. हल्ला झाल्याबरोबर त्याचा परिणाम बाजारात दिसू लागला. त्यानंतर झालेल्या मार्केटच्या पडझडीत दहशतवाद्यांनी स्थापन केलेल्या त्या कंपन्यांना अब्जावधी डॉलर्सचा नफा झाला. तो पैसा पुढे इतर दहशतवादी कारवायांसाठी वापरला गेला. एवढंच नव्हे, तर ज्या लोकांची सगळीच संपत्ती आणि एका अर्थाने सगळं भविष्य स्टॉक मार्केटमध्ये गुंतवलं गेलं होतं, त्यांनी आपल्या पोर्टफोलिओची व्हॅल्यू शून्य झाली असल्याचं पाहिल्यानंतर आत्महत्याही केल्या. याचाच अर्थ 9/11 चा हल्ला करून ओसामा बिन लादेनने फक्त तिथल्या लोकांना मारलं नाही, तर त्यामागे हा एक खूप मोठा आर्थिक गुन्हाही त्याने केला होता. हा सगळा अभ्यास करून मयूर जोशी यांनी तो जगासमोर आणला, तेव्हा त्यांना जागतिक पातळीची काही पारितोषिके मिळाली. टाइम्स, टुडेसारख्या वर्तमानपत्रांनी त्याची दखल घेतली.

मी सोलापूरसारख्या एका छोट्या शहरात वाढले. माझं बालपण सोलापुरात गेलं. माझं शिक्षण, आधी बालविकास मंदिर आणि नंतर ज्ञानप्रबोधिनी या दोन शाळांमध्ये झालं. घरातली सगळी पार्श्वभूमी डॉक्टरकीची होती. माझे आई आणि वडील डॉक्टर होते. मला यापेक्षा वेगळं काही तरी करायचंय ते खूप लवकर ठरलं होतं. आईही अनेकदा मी काही तरी वेगळं केलं पाहिजे हे बोलून दाखवायची. त्या वेळी इंटरनेटचा वापर फारसा वाढलेला नव्हता. करिअरच्या पारंपरिक वाटा वगळता इतर क्षेत्रांची फारशी माहिती मला नव्हती. त्यातल्या त्यात वेगळं म्हणून मी दहावीनंतर कॉमर्स शाखेत जाण्याचा निर्णय घेतला. कॉमर्समध्ये गेल्यानंतर चार्टर्ड अकाउंटंट ही त्या क्षेत्रातली सर्वोच्च पदवी, असं अनेकांना वाटतं. आमच्याही घरी तसाच समज होता, म्हणून मी सीए करण्याचा निर्णय घेतला. त्याची पहिली लेव्हल सोलापुरात असतानाच क्लिअर झाली होती. घरी अर्थातच कुणालाही कॉमर्स शाखेची माहिती नसल्यामुळे सीए आर्टिकलशिपसाठी कुणाकडे जावं हा प्रश्न माझ्यासमोर होताच. दरम्यान कोणती एक फर्म चांगली, आर्टिकलशिप कुठे उपलब्ध होऊ शकेल याचा अंदाज घेण्यासाठी मी मनी कंट्रोल नावाच्या वेबसाइटवर काही मुलाखती वाचत होते. त्यातल्या एका लेखात ‘इन्व्हेंटरी फ्रॉड’ असा उल्लेख होता. त्या लेखात या मयूर जोशी यांचं नाव होतं. इन्व्हेंटरी फ्रॉड नक्की काय असेल, या कुतूहलाच्या पोटी मी मयूर जोशी यांचा शोध सुरू केला. दरम्यान मीही पुढच्या अभ्यासाकरिता पुण्यात आले, मयूर जोशी यांचं कार्यालयही पुण्यातच होतं; मी त्यांना भेटले. त्यांच्याशी बऱ्याच गप्पा झाल्या. त्यात त्यांनी माझी मुलाखत कधी घेऊन टाकली हे मलाही कळलं नाही. त्यांनी मला त्यांच्याकडे फोरेन्सिक अकाउंटिंगमधली आर्टिकलशिप करण्यासाठी ऑफर दिली. त्या वेळी निर्णय घेणं इतकं सोपं होतं, की त्याच दिवशी मी घरी फोन करून मयूर जोशी यांच्याकडे आर्टिकलशिप करण्याबद्दल विचारलं. घरच्यांनीही तत्काळ परवानगी दिली. आपल्या हातात अजून बरीच वर्षं आहेत आणि हे आवडलं नाही तर पुढे वेगळं काही तरी करता येईल, असं म्हणत घरच्यांनी मला आणखीनच निश्चिंत केलं. इतक्या सोप्या पद्धतीने मी या क्षेत्रात आले.

त्यातली आणखी एक मजेदार गोष्ट म्हणजे, मी त्यांना होकार कळवला आणि दुसऱ्याच दिवशी त्यांच्या कार्यालयात गेले. तिथे पाहते तर कार्यालयात सगळी मुलेच होती. एकही मुलगी नाही. या सगळ्या गोंधळात आपल्याला कसं एक्स्पोजर मिळणार, हा प्रश्न माझ्या समोर होता. पण एक खूप चांगलं झालं, की ‘ही मुलगी असल्याने हे काम करू शकणार नाही, हे रिस्की आहे, मुलीला हे काम देऊ नका’- अशा प्रकारचा भेदभाव तिथे कधी झालाच नाही. त्यामुळे बंगळुरूमधील एका खूप मोठ्या व्होलसेल चेनची पहिलीच असाइनमेंट मला मिळाली. ‘ही असाइनमेंट तुला करायची आहे, आणि त्यात कुणी मदतीला नसेल, अकाउंटिंगमधील काही शंका असतील तरच आम्ही मदत करू’, असं मला सरांकडून सांगण्यात आलं होतं. मग मी इंटरनेटवरून बरीच माहिती घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यावरही फ्रॉड्‌स किंवा फ्रॉड मॅनेजमेंट याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नव्हती. शेवटी आम्ही बंगळुरूला पोहोचलो. ज्या कंपनीची असाइनमेंट होती ती कितीतरी एकरांत पसरलेली होती. सुरुवातीला काही दिवस मी फक्त तिथल्या लोकांशी बोलून तिथला कारभार कसा चालतो, अकाउंटिंग कसं होतं, लोकांकडून कॅश कशी स्वीकारली जाते, हे सगळं समजून घेत होते. सगळं जागच्या जागी होतं. अकाउंटिंग छान होतं. आमच्या असाइनमेंटमधली फक्त एकच गोष्ट आता करण्याची बाकी राहिली होती, ती म्हणजे कंपनीच्या इन्व्हेंटरीची प्रत्यक्ष तपासणी. हा या सगळ्या तपासातला खूप महत्त्वाचा प्रकार असतो. पुण्याला येण्याच्या आधीच्या दिवशी मी त्या कंपनीच्या गोदामात गेले. तिथल्या लोकांना सांगितलं की, मी ऑडिटर आहे आणि मला इथल्या सगळ्या सामानाचं फिजिकल इन्व्हेस्टिगेशन करायचंय. त्या गोदामात टीव्हीचे मोठमोठे बॉक्स होते. मला ते तपासायचे आहेत असं सांगितल्यावर तिथला माणूस त्रासून गेल्यासारखा झाला. खरं तर अशा एखाद्या कंपनीत ऑडिट होणं, त्यासाठी बाहेरून माणूस येणं यात नवीन काहीही नसतं. पण माझ्या येण्याने तिथला माणूस त्रासलेला आहे हे बघून मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याच्याकडे दुर्लक्ष करून मी तिथल्या शिडीवर चढू लागले. ‘‘या मॅडम ऐकत नाहीत, त्यांना बाहेर काढा,’’ वगैरे त्याचा आरडाओरडा सुरूच होता. तेवढ्यात झालं असं की, तिथे बाजूला असलेला एक टीव्हीचा बॉक्स माझ्या धक्क्याने हलला. एवढा मोठा टीव्हीचा बॉक्स माझ्या हाताच्या हलक्या धक्क्याने हलला कसा, हा प्रश्न पडून मी तो बॉक्स उघडला, तर त्यात कार्डबोर्ड, रद्दीतले पेपर असा बराच ऐवज होता. शेजारी असलेला दुसरा बॉक्स उघडून पहिला तर त्यातही तेच दिसलं. तिथे माझ्या लक्षात आलं की ‘फेक इन्व्हेंटरी’ म्हणजे नक्की काय असतं. मग तो धागा पकडून आम्ही तिथे आणखी कोणते फ्रॉड झाले आहेत तेही शोधून काढलं. जिन्यातून खाली येताना कोपऱ्यात एक डिटर्जंटचा बॉक्स ठेवलेला होता. त्याला माझ्या पायाचा धक्का लागून तो सांडला. आता त्याचं काय करायला हवं? त्यांनी तो बॉक्स एका कामगाराला 60 टक्के सवलतीत विकून टाकला! यातून इन्व्हेंटरी नक्की जातेय कुठे याचा आम्हांला अंदाज आला. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इन्व्हेंटरी फ्रॉड्‌सबद्दल मला पहिल्याच असाइनमेंटमध्ये काम करायला मिळालं, आणि मग माझा प्रवास सुरू झाला.

प्रश्न - तुम्ही आत्ता जो प्रसंग सांगितला त्यातून असं दिसतं की, प्रत्यक्ष जमिनीवर उतरून हे काम करण्यासाठी प्रचंड धाडस लागतं. तिथे काहीही होऊ शकतं. हे धाडस तुमच्यात कुठून आलं?

- मला वाटतं की तुम्ही जसजसे त्या परिस्थितीत प्रत्यक्ष जाऊ लागता आणि तुमची जर का शिकण्याची इच्छा असेल तर तुमच्यात हे धाडस येत जातं. दुसरी गोष्ट म्हणजे हा ‘टीम एफर्ट’ असतो. फोरेन्सिक अकाउंटिंगची कोणतीही असाइनमेंट एकट्याने पूर्ण होत नाही. त्यात पूर्ण टीम सहभागी असते. त्यातल्या प्रत्येकाची वेगळी खासियत असते. खरं तर माझ्या सोबत सुरुवातीला सगळी मुलं होती. आधी मला त्याचं वैषम्य वाटलं, पण नंतर मी त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकले. या क्षेत्रात दीर्घ काळ काम केल्याने त्यांच्यात एक प्रकारचा बेदरकारपणा होता, स्पष्टवक्तेपणा होता. तो माझ्यात हळूहळू येत गेला. मला नवीन ठिकाणी जाण्याची, धाडस करण्याची भीती वाटेनाशी झाली. माझ्या विचारांना कलाटणी देणारा आणखी एक प्रसंग आहे. भारतातील काही सर्वोच्च संस्थापैकी एका संस्थेकडून आमच्या कंपनीला एक प्रोजेक्ट मिळाला होता. ‘अर्ली वॉर्निंग सिग्नल्स ऑफ कॉर्पोरेट फ्रॉड्‌स’ या नावाचा तो एक इंटरेस्टिंग रिसर्च प्रोजेक्ट होता. त्यात काय अपेक्षित होतं? तर उदा., एखादा डॉक्टर आपल्याला तपासल्यानंतर अंदाज घेतो की, आपण आजारी असण्याचं नक्की काय कारण असू शकतं? त्यावरून कोणती औषधं द्यायची आणि पुढे काय करायचं हे तो ठरवतो. त्याच पद्धतीने एखाद्या कॉर्पोरेट कंपनीत नक्की काय गोष्टी चालल्या आहेत, त्या तपासताना ऑडिटरला अंदाज यावा की इथे काही तरी गडबड आहे. अशा प्रकारचं संशोधन त्यांना आमच्याकडून करून घ्यायचं होतं. हा रिसर्च माझ्याकडे देण्यात आला.

या प्रोजेक्टवर मी एकटी काम करत होते. सुरुवातीला मी विचार केला की भारतात अशी सगळी मिळून किती क्षेत्रे असतील, म्हणजे उदा., मीडिया, फार्मा, उत्पादन वगैरे... अशा एकूण 14 क्षेत्रांची मी यादी बनवली. या 14 क्षेत्रांमध्ये किती प्रकारचे फ्रॉड्‌स होऊ शकतात, याचीही ढोबळ यादी तयार केली. बँक किंवा वित्तीय संस्था असेल तर तिथे कॅशच्या बाबतीतला घोटाळा होण्याची शक्यता जास्त असते. एखाद्या वस्तूचं उत्पादन करणारी कंपनी असेल तर इन्व्हेंटरीमध्ये घोटाळा होऊ शकतो, अशा साधारण अंदाजाने मी ती यादी तयार केली. त्यातून एक फ्रॉड मॅट्रिक्स तयार झालं. हे सगळं काम साधारण नऊ-दहा महिने चाललं असावं. मला तेव्हा मी नक्की काय काम करतेय याची फारशी कल्पना नव्हती. आपण वेगवेगळ्या घोटाळ्यांचे प्रकार शोधतोय एवढंच मला वाटत होतं. सहाशे ते सातशे पानांचा तो सगळा रिसर्च पेपर तयार झाला. ‘मिंट’ नावाच्या अग्रगण्य दैनिकाने हा रिसर्च पहिल्यांदा प्रकाशित केला. त्या वेळी फ्रॉड ही संकल्पना भारतात नवखी होती. त्यात कुणी तरी फ्रॉड मॅट्रिक्स तयार केलंय असं लक्षात आल्यानंतर ‘मिंट’ने तो ताबडतोब छापला. ज्या संस्थेने आम्हांला हा रिपोर्ट तयार करायला सांगितलंय त्यांचं नाव कुठेही घेऊ नका, असं माझ्याकडून त्यांना सांगण्यात आलं होतं. त्या संस्थेशी झालेल्या करारात तसा उल्लेख असल्याने हे करावं लागलं. पण तरीही मिंटने त्या सरकारी संस्थेचं नाव छापलं. झालं! सगळीकडून ऑफिसमध्ये फोन यायला सुरुवात झाली. ‘‘आम्ही तुमची आर्टिकलशिप रद्द करू, तुम्हांला हा रिसर्च करण्याची परवानगीच नाही,’’ अशा प्रकारच्या गोष्टी सांगितल्या गेल्या. एवढं सगळं मन लावून काम केल्यानंतर अशा धमक्या येणं माझ्यासाठी धक्कादायक होतं. खास हे काम शिकण्यासाठी मी सोलापुरातून पुण्याला आले होते. त्यात या कोर्समधूनच काढून टाकण्याच्या धमक्या आल्याने मी व्यथित झाले. पण त्या वेळी माझ्यात कुठून धाडस आलं, मला माहीत नाही... एक गोष्ट मला माहीत होती की मी केलेल्या संशोधनाला राष्ट्रीय पातळीवर कव्हरेज मिळालं आहे. मला घाबरण्याचं काही कारण नव्हतं. त्या वेळी सी.बी.भावे हे सेबीचे चेअरमन होते. त्यांचाही कॉल मला येऊन गेला. इतक्या मोठ्या पातळीवर या संशोधनाची दखल घेतली जात होती, याचा अर्थ मी योग्य मार्गावर आहे असं मला वाटलं. उद्या हा कोर्स किंवा कंपनी सोडावी लागली तरी जागतिक पातळीवर ज्या फोरेन्सिक अकाउंटिंग शिकवणाऱ्या संस्था आहेत, तिथे जाऊन मी पुढचं शिक्षण घेईन असं ठरवून टाकलं होतं.

पुढे त्या संस्थेने आम्हांला नोटीस पाठवली, त्यानंतर ती केस कोर्टातही गेली. तिथे ‘‘आम्ही मिंटमधील लोकांना नाव घ्यायला सांगितलं नव्हतं,’’ ही आमची बाजू सिद्ध केली. मी त्या वेळी अगदी वीस वर्षांची होते. त्या केसचा निकाल आमच्या बाजूने आला, तेव्हा माझ्यात एक प्रकारचा आत्मविश्वास आला. आपण जे करतोय ते योग्य करतोय याची खात्री पटली होती. तुम्ही चांगलं काम करता तेव्हा काही लोक त्याला दाद देतील आणि काही लोक विरोध करतील हा तर जगाचा नियम आहे. त्यामुळे मी याबद्दल फारसा विचार केला नाही. त्या वेळी माझ्यासाठी या सगळ्यात जमेची बाजू अशी होती, की मी फ्रॉड एक्झामिनर किंवा भारतातली सर्वांत तरुण फोरेन्सिक अकाउंटिंग प्रोफेशनल झाले, त्या वेळी एक अब्जापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या देशात अवघे 6 ते 7 हजार लोक या क्षेत्रात काम करत होते. त्यातही महिलांचं प्रमाण फक्त 10 टक्के म्हणजे 600 ते 700 च्या आसपास होतं. हे सगळे मुद्दे पाहता माझ्यासाठी ही योग्य परिस्थिती होती. मला जे शिक्षण घेणे शक्य होतं ते घेण्यासाठी लोकांना दहा-वीस वर्षांचा अनुभव लागायचा. पण माझी आर्टिकलशिपच त्या क्षेत्रात झालेली असल्याने माझ्याकडे ते प्रिव्हिलेज होतं. हे प्रिव्हिलेज आपण योग्य रीतीने वापरून पुढे जायचं, की ‘‘हे रिस्की प्रोफेशन आहे,’’ असं म्हणत ते प्रिव्हिलेज वाया घालवायचं या दोन पर्यायांपैकी मी पहिला पर्याय सहजपणे निवडला. त्यातून धाडस नैसर्गिकरीत्या येत गेलं, असं मला वाटतं.

प्रश्न - तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे, कुणी तरी काही तरी कारणाने दबाव आणणं हे अनेक वेळा झालं असेल. एखाद्या मोठ्या घोटाळ्याचा तपास करताना त्यात सहभागी असणाऱ्या लोकांना काही ना काही कुणकुण लागू शकते. यातून येणाऱ्या दबावाला तुम्ही कसं सामोरे गेलात?

- मला अजूनही आठवतंय की, आम्हांला त्या त्या कंपनीच्या व्यवस्थापनाने दिलेल्या काही असाइनमेंट असायच्या, त्यातलेच लोक त्या घोटाळ्यात सहभागी असायचे. बाहेर आखाती देशांत मी कामासाठी जायचे, त्या वेळी हे प्रेशर सर्वांत जास्त असायचं. एका बँकेने तर ऑडिट रिपोर्ट दिल्यानंतर माझ्या एका सहकाऱ्यावर तो रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव आणला होता. आम्ही त्या रिपोर्टचं कुठलंही शुल्क न घेता त्यांना सांगितलं की, हा रिपोर्ट असा आहे आणि आम्ही तो बदलणार नाही. तुम्ही आम्हांला पैसे दिले नाहीत तरी चालतील. परिणाम असा झाला की, ज्या लोकांनी आम्हांला तो रिपोर्ट बदलायला सांगितला होता ते लोक दहाच दिवसांनी तुरुंगात गेले. असे प्रसंग झाले की त्यातून तुम्ही शिकत जाता. काय बरोबर आहे आणि काय चूक आहे, भविष्यात आपल्यासाठी काय घातक असू शकतं, याची समज तुम्हांला येत जाते. अशा प्रकारच्या प्रेशरला तोंड देणं भारतात तुलनेने सोपं होतं, कारण हा रिपोर्ट आम्ही बदलणार नाही हे लोकांना सांगणं शक्य होतं.

मी आखाती देशांत काम करत होते त्या वेळच्या एका प्रसंगातून मला खूप काही शिकायला मिळालं. तेव्हा मी अगदी 24-25 वर्षांची होते. बाहेरची असाइनमेंट असल्याने ती माझ्यासाठी मोठी संधी होती, त्यामुळे मला ती कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करायची होती. तिथल्या हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीत झालेला फ्रॉड मला शोधायचा होता. ज्यांनी ही असाइनमेंट आणली होती त्या लेडी मला इथे भेटल्या. माझा पत्ता त्यांना कसा मिळाला हे त्यांनी शेवटपर्यंत सांगितलं नाही. त्यावरून मला थोडा संशय आला, पण परदेशी काम करायला मिळतंय या विचाराने मी थोडी हवेत होते. मी त्यांना भेटल्यानंतर 14 दिवसांनी आखाती देशांत पोहोचले. सोबत आमची टीम होतीच. त्यात माझ्याकडे कम्प्यूटर फोरेन्सिकचं काम होतं. म्हणजे काय, तर मी इथून जाताना माझ्याकडचं एक हार्डवेअर घेऊन गेले होते, तिथे गेल्यानंतर काही संशयित व्यक्तींच्या लॅपटॉपमधून डिलीट झालेला डेटा मला माझं हार्डवेअर वापरून रिकव्हर करायचा होता. त्यानंतर डेटा कॉपी करून तो नव्या हार्डडिस्कमध्ये घ्यायचा होता. त्यानंतर पॅरिसला त्या प्रकरणाची कोर्टासमोर सुनावणी होणार होती, तिथे पुरावा म्हणून दाखवण्यासाठी तो डेटा उपयोगी पडणार होता. असाइनमेंटला सुरुवात झाली त्या दिवशी मी तिथे गेले. गेल्यानंतर त्या बार्इंना हा सगळा तपास करण्यासाठी परवानगीचं पत्र मागितलं. कारण एक तर आम्ही नव्या देशात, अनोळखी ठिकाणी होतो. तिथे जाऊन आम्ही ती व्यक्ती तिथे नसताना तिच्या लॅपटॉपची, खाजगी वस्तूंची तपासणी करणार होतो. हे करण्यासाठी त्या देशातले कायदे काय आहेत, हे माहीत असणं अत्यंत आवश्यक होतं. त्यामुळे मी त्यांना परवानगीपत्र मागितलं. दोन-तीन दिवस त्यांनी माझ्याशी बोलणंच टाळलं. त्यावरून एक लक्षात आलं, की जर कुणाचीही लेखी परवानगी न घेता, खाजगी वस्तूंची तपासणी आपण करणार असू, तर ते धोक्याचं ठरू शकतं. त्या वेळी त्यांनी परवानगीचं पत्र न देता मला आमिष दाखवायला सुरुवात केली, की ‘तुम्ही या कामाचे दुप्पट पैसे घ्या, तो माणूस इथे नाही तोपर्यंत त्याचा लॅपटॉप चेक करा.’ अशा पद्धतीने कामं होत नाहीत, हे मी त्यांना सांगितलं. मी म्हटलं की, ‘मी त्यांच्या लॅपटॉपमधून बेकायदेशीर पद्धतीने डेटा कॉपी केलाय हे त्या माणसाला कळलं, तर माझ्यावर केस होऊ शकते. तसं झालं तर या देशातून मला डिपोर्ट केलं जाईल.’ बार्इंच्या वागण्यातून असं दिसत होतं की त्यांना कुठलीही जबाबदारी घ्यायची नव्हती. आम्हांला पुढं करून फक्त कार्यभाग साधून घ्यायचा होता. नंतर मला प्रश्न पडला, की एवढ्या खटपटी करणारी ही व्यक्ती कोण असावी? नंतर लक्षात आलं की त्या घोटाळ्यात जी कागदपत्रे समोर आली, त्यात त्या स्त्रीच्या काही नातेवाइकांची नावं होती. हे प्रचंड धक्कादायक होतं. या प्रसंगाने अगदी सुरुवातीच्या काळात माझे डोळे उघडले. भारतात परत आल्यानंतर आम्ही हे ठरवलं, की आपल्याकडे जेव्हा एखादी असाइनमेंट येते, तेव्हा ती जो माणूस घेऊन आलेला असतो, त्याचीही आधी माहिती घेतली पाहिजे, तपास केला पाहिजे. सध्या मी माझ्या कंपनीसाठी हे ड्यू डिलिजन्सचं काम करते. कधी कधी फक्त संशयितच नव्हे तर आपल्या क्लाएंटवरही आपल्याला ड्यू डिलिजन्स करावा लागतो.

तर अशा पद्धतीने जेव्हा एखादं चुकीचं काम करण्यासाठी कुणी दबाव आणत असेल, तर धोक्याची पहिली घंटा वाजली पाहिजे. काही तरी चुकीचं होतंय आणि त्यामागची कारणं काय, हा प्रश्न तुम्हांला पडला पाहिजे. हा फायनान्शिअल सिक्स्थ सेन्स काम करूनच विकसित होत असतो. माझ्यातही तो असाच टप्प्याटप्प्याने विकसित झाला.

प्रश्न - हे क्षेत्र असं आहे की, यात चुकीचं काम केल्यास तुम्हांलाही वेगवेगळे फायदे होऊ शकतात. अशा वेळी नैतिक पाया भक्कम ठेवणं आणि त्यानुसार वागणं कशातून येतं? मोहाचे प्रसंग आल्यानंतर त्यापासून दूर राहणं तुम्ही कसं साध्य करता?

- मला असं वाटतं की ही नैतिकता एका दिवसाच्या प्रशिक्षणातून किंवा संस्कारातून येणं शक्य नसतं. त्यामागे खूप मोठं संचित असतं. माझ्या बाबतीत याची सुरुवात माझ्या आई-वडिलांपासून झाली. माझी आई आणि वडील, दोघेही डॉक्टर होते. सोलापुरात त्यांचं क्लिनिक होतं. हे शहर राज्याच्या सीमेला लागून असल्यामुळे तिथे कर्नाटक, आंध्र प्रदेशच्या सीमावर्ती भागातून गरीब आणि गरजू लोक उपचार घेण्यासाठी यायचे. माझ्या आईवडिलांची तीसेक टक्के ओपीडी त्यांच्यासाठी मोफत असायची. आपल्याला जेवढं मिळतं, त्यातलं काहीतरी आपण समाजाला देणं लागतो हा विचार तिथून माझ्यात रुजला असावा. माझ्या आई आणि वडिलांच्या आचरणातून मी ते शिकले. आम्ही कसं वागावं, आणि कोणत्या क्षेत्रात जावं हे त्यांनी आम्हांला कधीच सांगितलं नाही. त्यांच्या कृतीतून जे जे शिकायला मिळालं ते मी नकळत शिकत गेले. दुसरं म्हणजे ज्ञान प्रबोधिनीसारख्या चांगल्या शिक्षणसंस्थेत माझं शिक्षण झालं, हे मी खूप मोठं प्रिव्हिलेज मानते. याची शाळेत असताना मला जाणीव नव्हती, पण बाहेरच्या जगात पाऊल ठेवल्यानंतर मला कळलं की आपल्या शाळेने आपल्याला काय दिलंय. राष्ट्रसेवा ही कुठल्याही कार्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे आम्हांला आमच्या शाळेच्या प्रार्थनेत रोज शिकवलं जायचं. कुठलंही काम करताना अशा पद्धतीने करा की त्यातून तुमच्या हातून राष्ट्रसेवा घडेल, ही शिकवण आम्हांला शाळेने दिली. आज हे सगळे आर्थिक गुन्हेगार जे करतात, लोकांना लुबाडतात, त्यामुळे लोक अक्षरशः आत्महत्या करतात, त्यांची घरं उद्‌ध्वस्त होतात. याला जबाबदार असणाऱ्या गुन्हेगारांना तुम्ही जगासमोर आणताय, आणि पुढे त्यांच्याकडून असे गुन्हे घडणार नाहीत याची काळजी घेताय, याचाच अर्थ या कामातून एक प्रकारची राष्ट्रसेवाच घडतेय. यातून मिळणाऱ्या समाधानाची तुलना इतर कशाशीही होऊ शकत नाही. तिसरी गोष्ट अशी, की या क्षेत्रात काम करताना अशा प्रकारच्या मोहाला बळी पडलेल्या लोकांचं पुढे काय होतं, हे मी जवळून पाहिलं आहे. ज्यांनी काहीतरी खोटं असलेला ऑडिट रिपोर्ट दिला आणि त्यानंतर त्यांच्यावर केसेस झाल्या, असे कितीतरी फोरेन्सिक अकाउंटंट मी पाहिले आहेत. करिअर चांगलं चालू असताना हे स्वतःसोबत घडलेलं कुणाला आवडेल? यातून एक बोध असा होतो की आपल्याला नैतिक मार्गानेच काम करायचं आहे.

प्रश्न - या क्षेत्रात काम करताना शेवटी आकडे महत्त्वाचे असतात. तुम्ही बॅलन्स शीट बघता, इतर कागद चेक करता आणि त्यातून घोटाळ्याचा माग काढत जाता. तो आकड्यांतला घोळ पकडण्यासाठी जी नजर लागते ही नजर किंवा हा आकड्यांचा सेन्स तुमच्यात कसा तयार झाला?

- मघाशी मी म्हटलं की प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करणं यासाठी खूप महत्त्वाचं आहे. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर आकडेमोड हा माझा प्रांत कधीच नव्हता. कॉमर्स शाखेला प्रवेश घेतल्यानंतर त्यातलं सर्वोच्च करिअर म्हणजे सीए, असा विचार करून मी सीए करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी जे काही लागतं ते सगळं करण्याचीही माझी तयारी होती. पण आर्टिकलशिप करताना जसजशी मी प्रत्यक्ष इन्व्हेंटरी फ्रॉड, ड्यू डिलिजन्ससारखी प्रकरणं हाताळू लागले, तशी माझी नजर तयार होत गेली. ड्यू डिलिजन्समधली काही उदाहरणं अशी आहेत, की त्यातून एखादी बॅलन्स शीट आपल्या समोर असेल तर त्यात काय बघायला हवं हे मला कळलं.

कोलकात्याला असलेली एक खाजगी बँक आमची क्लाएंट आहे. जेव्हा आम्ही बँकांसाठी काम करू लागलो तेव्हा फोरेन्सिक अकाउंटिंगबद्दल त्यांना जागरूक बनवण्याचा प्रयत्न केला. तर ज्या वेळी बँकेकडे एखाद्या कर्जाची मागणी केली जाते, तेव्हा ती व्यक्ती, म्हणजे प्रमोटर नक्की कोण आहे, ती विश्वासार्ह आहे का, हे तपासण्यासाठी प्रशिक्षण दिलं गेलेलं आहे. या कर्जाच्या मागण्याही काही छोट्या आकाराच्या नसतात, त्या कोट्यवधी रुपयांच्या असतात. त्यामुळे लोकांचे पैसे सुरक्षित हातात जावेत, याची जबाबदारी बँकेची असते. अशा वेळी त्या प्रमोटरकडून कागदपत्रं मागवताना तुम्ही काय बघितलं पाहिजे, त्याच्या कंपनीची आणि त्याची कागदपत्रं हातात आल्यानंतर त्यात काय तपासलं पाहिजे, याचं प्रशिक्षण आम्ही बऱ्याच बँकांच्या मार्केट इंटेलिजन्स टीमला आधीच दिलेलं आहे.

तर कोलकात्याहून मला एका बँक मॅनेजरचा कॉल आला, की आमच्याकडे कर्ज घेण्यासाठी एक माणूस आलेला आहे, त्याची सगळी तपासणी केल्यानंतर सगळं व्यवस्थित असल्याचं दिसतंय, पण मला यात काहीतरी गडबड वाटतेय. काय गडबड आहे असं मी विचारल्यानंतर ते म्हणाले की, 96 कोटी रुपयांची कॅश त्याच्याकडे आहे आणि तो त्या बदल्यात 96 कोटींचा ओव्हरड्राफ्ट मागतोय. मी म्हणाले की, ही कॅश कशी आलेली आहे? तर मॅनेजरने सांगितलं की कोलकात्यात एका जमिनीचा व्यवहार त्याने केलेला आहे आणि त्याचे सगळे डॉक्युमेंट्‌सही आणले आहेत. व्यवहार कायदेशीर वाटत आहे. जागेचा व्यवहार झालेला आहे. इतकी इतकी कॅश मिळालेली आहे, पण त्यातल्या 96 कोटी रुपयांचा त्याला ओव्हरड्राफ्ट हवा आहे.

तर कुठल्याही सामान्य माणसाला सहज लक्षात येईल, की 96 कोटी या माणसाच्या हातात असताना याला बँकेची काय गरज? यासाठी कोणत्याही फोरेन्सिक अकाउंटंटची गरज नसते. कॉमन सेन्स जागृत असेल तरी हा प्रश्न पडतो. मग आम्ही ठरवलं की आपण पहिल्यांदा या माणसाचा बॅकग्राउंड चेक करायचा. आता हे ड्यू डिलिजन्स किंवा फोरेन्सिकचं काम एका माणसापुरतं मर्यादित नसतं. त्यात कोलकात्यात असल्यामुळे तिथल्या लोकांची भाषा वेगळी. त्यामुळे मी तिथे जाऊन काम करणं थोडसं अशक्य होतं. त्यामुळे आम्ही तिथल्या एका स्थानिक माणसाला याचा तपास करण्याचं काम दिलं. काही दिवसांमध्ये रिझल्ट असा आला की, त्या माणसाचं नाव खोटं होतं. कोलकात्यात काही वर्षांपूर्वी आलेल्या एका पेपरमध्ये त्याचं खरं नाव आलेलं होतं. सीमेवर झालेल्या एका तस्करीच्या प्रकरणात तो माणूस ‘मोस्ट वॉन्टेड’ असल्याचं त्या वर्तमानपत्रात आलं होतं. तपास यंत्रणा त्याच्या मागे होत्या. त्याने नावे बदलली होती आणि तो सगळा पैसा तस्करीतून आलेला होता. उद्या काय झालं असतं, ती रक्कम बँकेकडे देऊन त्याने ओव्हरड्राफ्ट घेतला असता आणि कुठेही पळून गेला असता. ओव्हरड्राफ्ट घेऊन पैसे त्याच्या अकाउंटला आले असते. मग तपास यंत्रणा बँकेकडे गेल्या असत्या आणि म्हणाल्या असत्या की हा माणूस वाँटेड आहे, याची जी काही मालमत्ता आहे ती जप्त होणार आहे. त्यामुळे बँकेतल्या त्याच्या असणाऱ्या पैशावरही तपास यंत्रणांची जप्ती आली असती, म्हणजे बँकेच्या हातात काहीच राहिलं नसतं. या प्रकारचं ते षडयंत्र पुढे उलगडत गेलं. यातून आम्हांला एक लक्षात आलं, की ज्या वेळी सगळं अगदी परफेक्ट असतं, तेव्हा नक्की कोणत्या गोष्टी तपासल्या पाहिजेत! मग त्या गोष्टींचा मागोवा घेत गेल्यानंतर सत्य काय आहे ते समोर येतं. येणाऱ्या प्रत्येक केसमध्ये गडबड असतेच असं नाही. काही प्रकरणं स्वच्छही असतात, पण प्रत्येक वेळी असे असेलच याची शाश्वती नाही.

प्रश्न - गेल्या वर्षी Scam  92 सारखी सिरीज आली, त्यातून सामान्य माणसाला हे कळलं की, अशा प्रकारचे मोठे आर्थिक घोटाळे होतात. गेल्या काही वर्षांत त्या संदर्भातले कायदे आले, बँकरप्सी कोड आला आणि वेगवेगळ्या पद्धतींनी घोटाळेबाज समोर येऊ लागले. पण मुख्यतः तुम्ही हे सगळं होण्याच्या आधीच्या काळाबद्दल बोलताय. तर त्या काळात या सर्व गोष्टीचं प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया कशी होती?

- आम्ही सुरुवात बँकांपासून केली. बँका आणि तत्सम आर्थिक संस्थांचा प्रचंड प्रभाव सर्वसामान्य लोकांवर आहे. सामान्यातल्या सामान्य माणूस असो किंवा श्रीमंतातला श्रीमंत असो, त्यांचा बँकेशी येणारा संबंध रोजचा आहे. त्यामुळे या संस्थांमधील वरिष्ठ पातळीवरील लोकांना प्रशिक्षण दिलं, तर स्वाभाविकत: सर्व प्रशिक्षण, माहिती शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचत जाते. त्यामुळे पहिल्यांदा आम्ही ‘मार्केट इंटेलिजन्स’ किंवा ‘ड्यू डिलिजन्स’ ही प्रॅक्टिस सुरू केली. तोपर्यंत फसवणूक किंवा फोरेन्सिक अकाउंटिंग ही पोस्टमार्टेम ॲक्टिव्हिटी होती. आर्थिक घोटाळा झाल्यानंतर आम्ही आकडेमोड करत बसायचो. तर ही डिसेक्शन ॲक्टिव्हिटी न ठेवता आपण जर फसवणूक रोखण्यासाठीच काही केलं, तर नक्कीच आमूलाग्र बदल होईल याची आम्हांला जाणीव होती. या विचाराने आम्ही बँकांकडे गेलो. फोरेन्सिक ऑडिट म्हणजे तुमचे पैसे घेऊन माणूस पसार झालाय, किंवा त्या माणसाने भारताबाहेर पैसे नेलेत, ते आता कसे आणायचे एवढ्यापुरती मर्यादित गोष्ट नसून ती फार गुंतागुंतीची प्रक्रिया आहे हे बँकांना पटवून दिलं. हे करण्यापेक्षा कर्ज मागायला आलेला माणूसच फ्रॉड आहे, हे ओळखता आलं तर त्याला पैसे देणं आणि ते पैसे पुढे जाऊन हरवणं, आपले पैसे नक्की कुठं गेलेत हे बँकांनाच लक्षात न येणं, हे पुढचे सगळेच प्रकार टाळता येतील. मग ‘ड्यू डिलिजन्स’ आधीच का नाही करायचा? ‘ड्यू डिलिजन्स’ आधीच करायचा तर मार्केटमध्ये आमच्यासारखे लोक खूप कमी आहेत, की ज्यांच्याकडे बँका जातील आणि सांगतील की व्यक्तीवर किंवा कंपनीवर ‘ड्यू डिलिजन्स’ करा. बँक हा शेवटी एक व्यवसाय आहे. त्यामुळे बँका यासाठी खूप पैसेही खर्च करू शकत नाहीत. म्हणून बँकांना आम्ही प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली की, तुमच्याकडे एखादी कंपनी कर्ज घेण्यासाठी आली, तर तुम्ही काय तपासलं पाहिजे, बॅलन्सशीटमध्ये काय प्रकारच्या गोष्टी पहिल्या पाहिजेत, किंवा काय ट्रेंड्‌स पाहिले पाहिजेत की ज्यामुळे त्या बॅलन्सशीटमध्ये असलेला गोंधळ तुम्हांला कळेल.

त्यात अजून पुढचा तपास करावा लागेल असं वाटलं, तर तुम्ही आमच्यासारख्या तज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे. हे सगळं करताना आम्हांला इंडियन बँकर्स असोसिएशनचे त्या वेळचे सीईओ असलेल्या कन्नन यांचा खूप सपोर्ट मिळाला. त्यांनी आमच्या पुढाकाराला खूप पाठिंबा दिला. त्यांनी देशभरातील सगळ्या बँकांच्या सीईओंसोबत आमची राउंड टेबल कॉन्फरन्स घेतली. ‘‘अशी एक कंपनी भारतात काम करत असून, ‘मार्केट इंटेलिजन्स’ नावाची प्रिव्हेंटिव्ह ॲक्टिव्हिटी प्रत्येक बँकेमध्ये चालू करण्याचा संदर्भात ते प्रयत्न करत आहेत, तुम्ही हे समजून घ्या, आणि यातून जर घोटाळे कमी करता आले तर पाहा,’’ असा मेल कन्नन सरांच्या स्वतःच्या मेल आयडीवरून ज्या वेळी दोनशेपेक्षा जास्त बँकांच्या सीईओंना जातो, तेव्हा त्याचं महत्त्व खूप मोठं असतं. अशा प्रकारे आम्हांला व्यवस्थेत काम करणाऱ्या मोठ्या माणसांची मदत मिळत गेली. बँका हळूहळू प्रशिक्षित होत गेल्या.

कोविडच्या काळात आपण पाहिलं की, गेल्या तीन वर्षांत फसवणुकींचं प्रमाण 64 टक्क्यांनी वाढलंय. ती आकडेवारी पाहिली तर असं वाटेल, की या आर्थिक घोटाळ्यांमध्ये आपले किती पैसे वाया जातात! असं असताना लोकांना प्रशिक्षण देणं, त्यांना सतत सतर्क राहायला सांगणं ही आमची जबाबदारी आहे. ओटीपी शेअर करू नका, फोन बंद पडला तर कोणालाही तुमच्या मोबाइलचा ॲक्सेस देण्याऐवजी अधिकृत सेंटरमध्ये जाऊन चौकशी करा, अशा काही साध्या गोष्टी आहेत, ज्या बँकांनी त्यांच्या ग्राहकांना सांगायला सुरुवात केली तर ग्राहकही जागरूक होतात. बँकांचा, कंपन्यांचा रोज मेसेज आल्यामुळे तुम्ही जागरूक असता. अकाउंट नंबर किंवा आणखी काही माहिती विचारणारा फोन आल्यास तुम्ही तो कट करता, प्रतिसाद देत नाही. हे सगळं त्या प्रयत्नांमुळे शक्य होतं. म्हणून पहिल्यांदा बँकांना प्रशिक्षण देणं, आर्थिक संस्थांना प्रशिक्षण देणं गरजेचं होतं. हे आम्ही केलं.

दुसरी गोष्ट, भारत हा मोठ्या प्रमाणावर तरुण लोकसंख्या असलेला देश आहे. अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यापेक्षा ज्या वयात मुलांचा नव्या गोष्टी शिकण्याचा उत्साह जास्त असतो, त्या वेळी आपण त्यांना या क्षेत्राबद्दल सांगू शकलो, तर त्यांना या क्षेत्राबद्दल कुतूहल निर्माण होईल. कॉमर्स शाखेत प्रवेश घेतला तर फोरेन्सिक क्षेत्रात कितीतरी उपप्रकार आहेत ज्यात लोक स्वतःचं करिअर घडवू शकतील. त्यामुळे मी आणि माझी कंपनी तरुणांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करतो.

प्रश्न - दहा-पंधरा वर्षांपूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती, यात दोन-तीन फरक असे दिसतात की, लोकांची आर्थिक बाबतीतली जागरूकता वाढली आहे. जास्तीत जास्त लोक डीमॅट अकाउंट काढत आहेत, शेअर मार्केटमध्ये येत आहेत, क्रिप्टोमध्ये येत आहेत. पण जितके जास्त लोक या क्षेत्रात येत आहेत, तितकी जास्त धोक्याची शक्यताही वाढली आहे. तुम्ही जेव्हा काम चालू केलं तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती, यांत तुम्हांला काय फरक दिसतो? काय चांगलं घडलं? काय वाईट घडलं असं वाटतं?

- सध्याच्या काळात तंत्रज्ञानामुळे फ्रॉड्‌स खूप गुंतागुंतीचे झाले आहेत. ते शोधण्यासाठी जे तंत्रज्ञान वापरलं जातं ते अजून गुंतागुंतीचं आहे. मध्यंतरी एका बँकेबरोबर एक आर्थिक घोटाळा घडला होता. बँकेतील मुख्य माहिती अधिकाऱ्याला एक ‘आय लव्ह यू’ असा मेल आला. स्वाभाविकत: असा मेल आल्यावर त्या माणसाने तो मेल ओपन केला. त्यामध्ये होता malicious code!  त्या प्रकरणाचा तपास केल्यावर ही फसवणुकीची वेगळीच पद्धत कळली. malicious code  ने त्या माणसाच्या कम्प्यूटरचा पूर्ण ताबा घेतला. त्यानंतर दुसरी व्हर्च्युअल सिस्टीम तयार केली, ज्यावर सगळा डेटा ट्रान्स्फर करण्यात आला. एका संध्याकाळी असं लक्षात आलं, की या बँकेच्या एटीएम मशिन्समधून काही तासांमध्ये खूप मोठी रक्कम काढून घेण्यात आली आहे. खूप मोठा सायबर हल्ला झाला आहे. या प्रकरणाची तपासणी सुरू झाली, त्या वेळी त्यात ‘मनीम्यूल्स’चा वापर केल्याचं दिसून आलं. एटीएम मशिन्सच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये जे लोक दिसले, त्यांच्या चालण्या-बोलण्याच्या पद्धतीवरून हे लक्षात आलं. फारसं काही ज्ञान नसलेले खेड्यात राहणारे लोक या गुन्ह्यात सहभागी करून घेण्यात आले होते. त्यांना ठिकठिकाणांवरून पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांना शोधण्याचा तो एकच मार्ग होता. तपासात पोलिसांच्या लक्षात आलं की, यातले बरेच लोक बेरोजगार आहेत. त्यांना ‘इम्पोर्ट-एक्स्पोर्टचा व्यवसाय करा, घरबसल्या पैसे कमवा, तुम्ही अमुक अमुक गोष्ट केलीत तर एवढ्या कालावधीत इतके पैसे मिळतील,’ असे मेल आले होते. हा अगदी कोविड सुरू होण्यापूर्वीचा घोटाळा होता. लोक याला बळी पडले आणि त्यांनी आपले पैसे काढून सांगितलेल्या खात्यावर पाठवले. हीच कॅश भारताबाहेर वेगवेगळ्या देशांत ट्रान्स्फर होऊन, कुठं गेली याचा पत्तादेखील नाही! बँकेच्या खातेदारांना काही संरक्षण मिळालं नाही ही गोष्ट वेगळीच! आम्ही या क्षेत्रात काम करत असल्यामुळे हे लक्षात आलं की, हा ‘मनीम्यूल्स’चा प्रकार आहे. अज्ञानी, अशिक्षित लोकांना जाळ्यात ओढून त्यांच्यामार्फत केला गेलेला हा घोटाळा आहे. आता एवढं लक्षात आलंय की, तंत्रज्ञान जसं झपाट्याने बदलत आहे त्याप्रमाणे गुन्ह्यांचे प्रकारही बदलत आहेत.  त्यामुळे या निमित्ताने मी एवढंच सांगेन की, लोकांनी इझी मनीच्या मागे लागणं बंद केलं पाहिजे. कुठलाही पैसा हा कष्ट केल्याशिवाय मिळत नाही. दुप्पट परतावा, चौपट परतावा आणि काय काय अशा प्रकारच्या स्कीममध्ये पहिले चार-सहा महिने लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांना परतावा दिलाही जातो. त्यामुळे आपण सांगायला गेलो, तर लोक आपल्याला वेड्यात काढतात. पण एके दिवशी तो मनुष्य कुठं पळून जातो, तो कुणाच्याही हाताला लागत नाही. त्यामुळे पहिल्यांदा लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की, There are no free lunches in the world!

प्रश्न - शेवटचा प्रश्न... तुमच्या या करिअरमधला सर्वांत हाय पॉइंट कोणता, आणि सर्वांत लो पॉइंट कोणता?

- 2014 मध्ये मी ‘क्विक हिल’ या कंपनीसाठी कन्सल्टंट म्हणून काम करत होते. कंपनीसाठीच्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस ते आमच्याकडून लिहून घेत होते. एखादा नवीन माणूस कंपनीत काम करण्यासाठी आल्यानंतर त्याला त्यानुसार प्रशिक्षण दिलं जातं. कंपनीत काहीही बेकायदेशीर काम केलं तर ते पकडलं जाईल, हे एसओपी वाचतानाच त्या माणसाच्या लक्षात आलं पाहिजे, अशा पद्धतीने त्या एसओपी लिहायच्या होत्या. त्यानुसार आमचं काम सुरू होतं. दरम्यान 2013 मध्ये कंपनी कायद्यात अशी एक तरतूद करण्यात आली, की ज्या कंपन्यांचा आयपीओ येऊ घातलाय, किंवा ज्या शेअर बाजारात लिस्ट झालेल्या आहेत, ज्यांचा टर्नओव्हर शंभर कोटींच्या वर आहे अशा कंपन्यांना किमान एक स्वतंत्र महिला संचालक असणं आवश्यक आहे. त्या वेळी क्विक हिल त्यांचा आयपीओ बाजारात आणण्याच्या तयारीत होतं. तेव्हा माझ्या पार्टनरनी क्विक हिलचे सीएफओ राजेश घोणसगी यांच्याकडे माझ्या नावाची शिफारस केली. त्या वेळी इतरही अनेक लोक तिथे होते. नंतर क्विक हिल कंपनीत गुंतवणूकदार असलेल्या अनेक लोकांची त्यांनी माझ्याशी भेट घडवून आणली. दुसऱ्या बाजूला इतरही अनेक महिलांना ते या पदावर निवड करण्यासाठी भेटत होते. काही महिन्यांनी मला कळलं की माझी त्या पदासाठी निवड झाली आहे. त्या वेळी माझं वय 25 वर्षं होतं. तो माझ्या आयुष्यातला, करिअरमधला सगळ्यात हाय पॉइंट होता. मी नंतर विचार केला की या पदासाठी मलाच का निवडलं असेल, तर त्याचं कारण म्हणजे माझा फोरेन्सिक अकाउंटिंगमध्ये असलेला अनुभव. बोर्ड मेंबर म्हणून ज्या वेळी अशा क्षेत्रात काम केलेली व्यक्ती एखाद्या कंपनीत असते, तेव्हा तिचा वेगळा प्रभाव पडतो. आर्थिक बाबी हाताळताना त्यात रिस्क कमी होते. माझं वय कमी असतानाही जी संधी मला क्विक हिलने दिली त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. तिथे काम केल्यामुळे मला पुढे त्यापेक्षा वरच्या स्तरावर काम करणं शक्य झालं. भारतातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांतून आलेल्या अत्यंत ख्यातनाम व्यक्तींबरोबर ‘वुमन इंडिपेंडंट डिरेक्टर’ म्हणून मला बऱ्याच ठिकाणी काम करता आलं. त्यातून मला खूप शिकायला मिळालं.

फोरेन्सिक या क्षेत्रात काम करताना बरीच आव्हाने असतात. कधी काही प्रकरणांचा लवकर उलगडाच होत नाही. कधी असंही होतं की, तुमचा रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव आणला जातो. त्या वेळी असं वाटतं की, आपण इतक्या मेहनतीने केलेल्या कामाचं हे फळ नक्कीच अपेक्षित नव्हतं. तो काळ खूप निराशेचा असतो. असे लो पॉइंट मधूनमधून येत राहतात. पण शेवटी हा प्रत्येकच प्रोफेशनचा भाग आहे. त्यासाठी कुणी 12-13 वर्षं केलेल्या मेहनतीवर पाणी सोडत नाही. म्हणून दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने काम सुरू करायचं असतं. अशा प्रकारचे हाय आणि लो पॉइंट्‌स आयुष्यात येत राहतात. त्या ठिकाणी टिकून राहण्याची तुमची वृत्ती त्या वेळी महत्त्वाची असते. या भावनेने काम करत राहिलात तर कोणताही लो पॉइंट किंवा निराशा आपल्याला आपल्या कामापासून दूर घेऊन जाऊ शकत नाही.

संवादक : विनायक पाचलग, कोल्हापूर
vinayak@vedbiz.com

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी