डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

मानवी मनातील ‘माणूस’ जागविणारा कार्यकर्ता, लेखक

औरंगाबाद येथे नागसेन वनात दलित साहित्य संमेलन आयोजित केले होते. हिंदीतील ख्यातनाम साहित्यिक कमलेश्वर अध्यक्ष होते. मराठवाड्यात जे अत्याचार झाले त्यातील पीडितांना-शहिदांना अभिवादन करून संमेलनाची सुरुवात होणार होती. त्यासाठी ‘स्मृती स्तंभ’ उभा करायचा होता. कामाच्या रगाड्यात वेळ मिळाला नाही. मी, अविनाश डोळस, दिलीप बडे, वसतिगृहाच्या बाहेरच्या प्रांगणात चिंतायुक्त विचार करीत उभे होतो. दिलीपची नजर समोर पडलेल्या झाडाच्या फांदीवर गेली. ती त्याने उचलली. रॉकेल मागविले ते त्या फांदीवर टाकले. फांदी अर्धवट जाळली. आणि ती मातीत रोवून भोवती पांढऱ्या चुन्याचे रिंगण केले. अनिलला ते ‘स्मारक’ खूपच भावले. ‘मनोहर’मध्ये त्याने संमेलनासंबंधी जो वृत्तांत लिहिला. त्यात त्याने या स्मारकाचा फोटो तर दिलाच, पण ठळकपणे त्यावर लिहिलेदेखील.
 

‘सामाजिक कार्यकर्ते, लेखक डॉ.अनिल अवचट यांचे निधन’ ही दूरचित्रवाणीवर बातमी ऐकून हबकलो. एक अपराधी सल मनात चमकून गेली. ‘दलित पँथर : अधोरेखित सत्य’ हे माझे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक अनिलला मी स्वत: पुण्यात जाऊन देणार होतो. दलित पँथर चळवळ आणि डॉ.अनिल अवचट यांचं अतूट असं नातं होतं. किंबहुना उपेक्षित, कष्टकरी, शोषितांच्या व्यथा-वेदनांचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होऊन त्या अत्यंत समर्थ शब्दांत साकार करणारा मराठी साहित्य विश्वातला अनिल हा नवरचनाकार होता. सत्तरीच्या दशकात त्याने सामाजिक, सांस्कृतिक दंभावर-ढोंगावर ‘रिपोर्ताज’मधून जे भाष्य करणारे लेख लिहिले, त्यातून त्याने जी शैली मराठी भाषेला दिली, ती अजोड आहे. एकूणच त्याच्या समग्र लिखाणातील शैली ही मराठी साहित्याला देन आहे. त्याच्या एकूण साहित्य निर्मितीची मराठी साहित्यविश्वाने भरपूर दखल घेतली, परंतु ‘अवचटी’ वळणाच्या शैलीची समीक्षा नेटकेपणाने झालेली नाही, असे मला वाटते. तात्पर्य, भालचंद्र नेमाडे, भाऊ पाध्ये, नामदेव ढसाळ या समकालीन कलावंतांच्या शैलीविषयी भरपूर लिहिले गेले. असो.

तर, पुण्यात संदेश भंडारेंच्या कार्यालयातून अनिलला फोन केला होता. दलित पॅन्थरवरील पुस्तक मार्गस्थ होण्याच्या अवस्थेत होते. अनिलला सांगितले, तेव्हा त्याला आनंद झाला. दलित पॅन्थर चळवळीतील अनेक फोटोग्राफ्स त्याने लिहिलेल्या लेखात वापरल्याचे मला माहीत होते. त्यातील काही फोटो मिळाले, तर पुस्तकात वापरता येतील या हेतूने मी फोन केला होता. त्याच्याकडे फोटो नव्हते. पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर दोन महिन्यांत जे वातावरण होते, ते प्रवासायोग्य नव्हते आणि त्यामुळे अनिलला प्रत्यक्ष भेटून पुस्तक देता आले नाही.

सांगी-वांगीवर, पुस्तके चाळून स्वत:च्या कल्पना-शक्तीवर विश्वास बाळगून बंद खोलीत लिहिणारे अनेक लेखक आहेत. तसेच आपणाला ज्याबद्दल लिहायचे आहे, त्याबद्दल प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन तिथला परिसर, तिथली माणसे, त्या घटनेतील तथ्याबद्दल परिसरात हिंडून-फिरून माहिती घेणारे कष्टकरी लेखकसुद्धा आहेत. अनिल हा कष्टकरी लेखक होता. पूर्णियामधील आदिवासी असोत, निपाणीतील तंबाखू क्षेत्रातील स्त्रिया असोत, दलित विद्यार्थी युवकांचे लढे असोत, साहित्य संमेलने किंवा उच्चभ्रूंचे सामाजिक, सांस्कृतिक मेळावे असोत, हमाल, पथारीवाल्यांची आंदोलने असोत, मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा असो- अनिल तिथे असायचा शरीराने व मनाने. खरं म्हणजे अनिल हा अत्यंत प्रखर सामाजिक जाणीव आणि बांधिलकी असलेला परिवर्तनवादी संवेदनशील आणि सर्जनशील असलेला एक प्रतिभावंत लेखक होता. कार्यकर्ता आणि लेखक म्हणून त्याच्या ठायी असलेल्या समाजनिष्ठेत भेदरेषा आखणे अशक्य आहे.

अनिल युवक क्रांती दलात होता. पण पत्रकाराच्या नात्याने एका व्यापक सामाजिक वर्तुळात तो निष्ठेने आपली लेखणी चालवीत राहिला. त्याने जे लेख लिहिले, जी पत्रकारिता केली, त्यामुळे उपेक्षितांच्या लढ्याला, आंदोलनाला नैतिक बळ मिळालेच; पण त्याने मांडलेल्या भीषण समाजवास्तवामुळे मध्यम वर्गातील प्रवृत्तीलादेखील पाझर फुटलेले आहेत. अनेक तरुणांना ऊर्जा मिळाली आहे. मानवी मनातला ‘माणूस’ जागृत करण्याचे सामर्थ्य त्याच्या लेखणीत होते. त्याचे बोलणे, वागणे, रहेन-सहेन, त्याचे छंद, मुक्तांगण याविषयी खूप लिहिले गेले आहे. मलाही लिहिता येईल, पण मी इथे अनिलचा दलित चळवळीविषयी असलेला जिव्हाळा, ओढ याविषयी थोडक्यात लिहिणार आहे.

दलित पँथर चळवळीला गती आणि जोर चढला, तो साधना साप्ताहिकाने भारताच्या स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त काढलेल्या (1972) ‘काळा स्वातंत्र्यदिन’ या विशेषांकामुळे आणि या अंकाचे संपादन केले होते अनिलने. त्या अंकातील राजा ढाले याच्या ‘काळा स्वातंत्र्यदिन’ या लेखाने महाराष्ट्रात एक वादळ निर्माण केले होते. या अंकात माझा, दया पवार, प्रल्हाद चेंदवणकर, त्र्यंबक सपकाळे यांचेही लेख होते. ग्रामीण भागातील तसेच वसतिगृहात राहणाऱ्या दलित विद्यार्थ्यांची, युवकांची मनोगते होती. दलित समाजावर विशेषत: ग्रामीण भागात अन्याय-अत्याचारांची मालिका सुरू झाली होती; बावडा, ब्राह्मणगाव, सुलतानपूर, शिरसगाव या गावांत स्त्रियांवर अत्याचार, दलित स्त्रियांची नग्न धिंड, बलात्कार असे प्रकार घडले होते. वडाळ्याच्या सिद्धार्थ विहार वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी या अत्याचाराविरुद्ध आवाज उठविण्यासाठी ‘युवक आघाडी’ ही संघटना उभारली होती. राजा ढाले याच वसतिगृहात राहायचा. राजा ढाले याच्याशी मैत्री असल्यामुळे माझी त्या वसतिगृहावर ये-जा होती. शिवाय भगवान झरेकर, चेतन जावळे, विनायक रांजणे, वसंत कांबळे हे वसतिगृहातील युवकदेखील मित्र होते. त्या काळात दलित युवक विद्यार्थ्यांना ‘युवक क्रांती दला’चे आकर्षण होते. प्रा.मे.पुं. रेगे, डॉ.अनिल अवचट हे सिद्धार्थ विहार वसतिगृहात आले होते. युवक कार्यकर्त्यांसोबत बैठक झाली होती. या युवक आघाडीचा अध्यक्ष मी होतो. तिथे अनिलने साधनाच्या त्या विशेषांकाची कल्पना सांगितली. ‘तुम्ही बेधडक लिहा, काटछाट केली जाणार नाही.’ पुढे राजा ढालेंच्या त्या लेखातील ‘राष्ट्रध्वजा’बद्दल केलेल्या टिप्पणीवर दुर्गा भागवत यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये पत्र लिहिले आणि महाराष्ट्रात ‘दलित पँथर’ नावाचे वादळ उभे राहिले. या संदर्भात मी ‘दलित पँथर : अधोरेखित सत्य’ या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकात सविस्तर लिहिले आहे.

अनिलला दलित चळवळींबद्दल, आंबेडकरी चळवळीबद्दल जिव्हाळा आणि आत्मीयता होती. आंबेडकरी चळवळीतील लढाऊपणाबद्दल जिज्ञासा होती. त्या काळात आम्ही छोट्या-मोठ्या कार्यक्रमांत, आंदोलनांत भेटायचो. चर्चा करायचो. त्या वेळी तो म्हणाला होता, ‘बौद्ध समाजात मूल जन्माला येतं ते निळी टोपी घालूनच.’

पुढे दलित पॅन्थरच्या झंजावातात ‘वरळीची दंगल’ झाली. त्या दंगलीच्या काळात अनिल मुंबईतच होता. वरळीच्या बी.डी.डी. चाळीत उसळलेल्या दंगलीत शासनाने पक्षपाती भूमिका घेतली, राजा ढालेला मारहाण करून पोलिसांनी अटक केली, त्याच्या निषेधार्थ ‘दलित पँथर’ने  10 जानेवारी 1974 रोजी मुंबईत प्रचंड निषेध मोर्चा काढला होता. मोर्चामध्ये जातीयवादी गुंडांनी भागवत जाधवचा बळी घेतला होता. त्या मोर्चात आघाडीवर आमच्या बरोबर अनिल होता. ‘मनोहर’ साप्ताहिकात त्याने या संबंधी जे लिखाण केले आहे, त्या अंकात माझा, ज.वि. पवार आणि अनिलचा मोर्चाचे नेतृत्व करतानाचा फोटो आहे.

इतकेच नाही, तर पँथर नेत्यांवरच्या केसेस भोईवाडा कोर्टात उभ्या राहायच्या त्या वेळी अनिल तिथे हजर असायचा. कमलाकर सामंत, निलोफर भागवत, जयंत प्रधान, सुनील दिघे अशी वकिलांची फौज घेऊन आम्ही कोर्टात जायचो. वरळीतील बी.डी.डी. चाळीतील दंगलीच्या बातम्या येतच होत्या. अनिल कोर्टात होता. मला म्हणाला, ‘‘बी.डी.डी. चाळीत जाऊन लोकांशी बोलता येईल का?’’ मी ‘हो’ म्हटलं. ‘‘तू माझ्या बरोबर चल.’’ अनिल म्हणाला. जाता जाता मिस्किलपणे म्हणाला, ‘‘बी.डी.डी.चा फुल फॉर्म काय?’’ मी म्हणालो, ‘‘बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट.’’ त्यावर तो शांतपणे म्हणाला, ‘‘मला आजपर्यंत वाटत होतं, की ते बुद्धिस्ट डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असेल.’’

अनिल बर्वे यांनी ‘रणांगण’ साप्ताहिकात आणि अनिल अवचटांनी ‘मनोहर’मध्ये वरळीतील बौद्ध-दलित जनतेवर झालेल्या अत्याचारावर जे लेख लिहिले ते वाचून महाराष्ट्र हादरला होता. दोन्ही अनिल माझे चांगले मित्र होते.

मी बरोबर असल्यामुळे वरळीतील कार्यकर्ते व नागरिक मोकळेपणे बोलत होते. न कंटाळता रात्र होईपर्यंत अनिल लोकांशी बोलत होता. विचारत होता. एक गोष्ट मला त्या वेळी जाणवली आणि ती म्हणजे अनिलच्या अंगी असलेला ‘बेरकी’ निरीक्षणाचा गुण होय. समोरचा माणूस किती खरेपणाने किंवा खोटेपणाने बोलतो हे तो तत्काळ ताडायचा. खोटं बोलणाऱ्यांशी तो जुजबी बोलून खरं बोलणाऱ्यांशी संवाद करायचा.

‘साधना’ कार्यालयावर त्या काळात अनेक मोर्चे आले होते. विरोध करण्यासाठी आणि समर्थन देण्यासाठी. एवढ्या हलकल्लोळात अनिल डगमगला नाही. साधना परिवाराने आणि अनिलने कार्यकारी संपादक म्हणून ‘राष्ट्रध्वजा’च्या अपमानाबद्दल माफी मागितली. पण भूमिकेवर अनिल ठाम राहिला. ‘साधना’वरील दोन मोर्चे या त्याच्या लेखात याचे प्रत्यंतर येते. अनिलची लेखनशैली आणि मी वर उल्लेखिलेला ‘बेरकी’पणा यांचा मेळ इथे दिसतो.

हा लेख मी माझ्या दलित पँथरवरील पुस्तकात परिशिष्टात पुनर्मुद्रित केला आहे. शिवाय अनिलने ‘मनोहर’साठी घेतलेल्या राजा आणि नामदेवच्या प्रदीर्घ मुलाखती या पुस्तकासाठी उपयोगी पडल्या. मलाही त्याने मुलाखतीसाठी आग्रह केला. पण ‘‘नामदेवची भूमिका तीच आमची भूमिका,’’ असे सांगत मी मुलाखत टाळली होती.

मराठवाड्यातील नामांतराच्या लढ्यात अनिल होता. नामांतरावरून झालेल्या दंगलीत दलितांवर अत्याचार झाले, जाळपोळ झाली. त्यानंतर आम्ही ‘दलित साहित्य संसदे’तर्फे औरंगाबाद येथे नागसेन वनात दलित साहित्य संमेलन आयोजित केले होते. हिंदीतील ख्यातनाम साहित्यिक कमलेश्वर अध्यक्ष होते. मराठवाड्यात जे अत्याचार झाले त्यातील पीडितांना-शहिदांना अभिवादन करून संमेलनाची सुरुवात होणार होती. त्यासाठी ‘स्मृती स्तंभ’ उभा करायचा होता. कामाच्या रगाड्यात वेळ मिळाला नाही. मी, अविनाश डोळस, दिलीप बडे, वसतिगृहाच्या बाहेरच्या प्रांगणात चिंतायुक्त विचार करीत उभे होतो. दिलीपची नजर समोर पडलेल्या झाडाच्या फांदीवर गेली. ती त्याने उचलली. रॉकेल मागविले ते त्या फांदीवर टाकले. फांदी अर्धवट जाळली. आणि ती मातीत रोवून भोवती पांढऱ्या चुन्याचे रिंगण केले. अनिलला ते ‘स्मारक’ खूपच भावले. ‘मनोहर’मध्ये त्याने संमेलनासंबंधी जो वृत्तांत लिहिला. त्यात त्याने या स्मारकाचा फोटो तर दिलाच, पण ठळकपणे त्यावर लिहिलेदेखील. अनेकांना ते भावले. अनिलची लेखणी म्हणजे चळवळीतील कार्यकर्ते आणि जनता यांमधील दुवा होता. अनिलच्या लेखणीने अनेक आंदोलनांना नैतिक बळ मिळाले, हे जे मी वर म्हटले आहे, ते याच अर्थाने. आणि नुसतेच नैतिक बळ दिले नाही, तर तो स्वत: सकारात्मक रचनात्मक भूमिका घेऊन जगलेला ‘माणूस’ होता. ‘मुक्तांगण’ हे अनिलने साकारलेले ‘समाजशिल्प’च होय.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके