डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अनेक शाळा, दवाखाने, पुनर्वसन केंद्र बांधण्यासाठी कोट्यवधी रुपये परदेशातून पाठवून आधारवड झालेले डॉ. वाणीकाका (६ मे २०१७ रोजी) इतक्या गर्दीतून उठून अचानक निघून गेल्याने आम्ही पोरके झालो आहोत! काही माणसं मृत्यूनंतरही तळपत राहतात, त्यापैकी एक डॉ.जगन्नाथ वाणी होते. आमच्या समता प्रतिष्ठान परिवारावर डॉ.वाणी यांनी माया केली, आमच्यावर विश्वास दाखवून, ‘न भूतो न भविष्यति’ असे अर्थसाह्य केले. परदेशात थोर शास्त्रज्ञ असूनदेखील भारताच्या मातीवर घट्ट पाय रोवून उभ्या राहिलेल्या डॉ.वाणीकाका नावाच्या माणूसबेटाला लाखलाख सलाम!  

अपंगांच्या शिक्षण-प्रशिक्षणाबरोबरच पुनर्वसनाला प्राधान्यक्रम देऊन त्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करण्यासाठी गेल्या २३ वर्षांपासून समता प्रतिष्ठान, येवला ही संस्था मायबोली निवासी कर्ण-बधिर विद्यालय या विशेष शाळेच्या माध्यमातून कार्यरत आहे. प्रचलित शिक्षण-व्यवस्थेत मुलांचा कौशल्यविकास व जीवन मुल्यांची रुजवण होत नसल्याने आणि त्यातही या अपंग मुलांना शिक्षणाबरोबरच विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देऊनच त्यांना सक्षमपणे त्यांच्या पायावर उभे करता येऊ शकते, ही प्रतिष्ठानची मूळ धारणा असल्याने संस्थेने गेल्या पाच-साह वर्षांपासून बहुउद्देशीय अपंग निवासी संमिश्र कार्यशाळा या पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून पैठणी विणकाम, शिवणकाम, मेणबत्ती व खडू तयार करणे यासारखे छोटे-छोटे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केलेली आहे.

या अपंग कार्यशाळेची एक स्वतंत्र इमारत उभी करण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच भारतीय रिझर्व्ह बँकेतील अधिकारी आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते गणेश चिंचोले यांचा मला फोन आला, ‘डॉ.जगन्नाथ वाणी नावाचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, ते राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते आहेत. सध्या ते कॅनडात असतात आणि या अशा कार्याला ते बऱ्यापैकी मदत करीत असतात. मात्र ते भारतात कधी येतील, हे माहीत झाल्यावर मी तुम्हाला कळवतो.‘ ही साधारणपणे २०१३ मधील गोष्ट आहे. या कामी कार्यशाळेच्या माध्यमातून प्रशिक्षण दिल्याखेरीज या अपंग मुलांचे पुनर्वसन नाही, हे नक्की माहीत असल्याने काही जुळवाजुळव चालू असतानांच मला एक फोन आला, ‘मी जगन्नाथ वाणी बोलतोय. मी पुण्याहून धुळ्याला जातोय, येवल्यात थांबून तुची मूक-बधिर शाळा बघीन म्हणतोय,’ मला तर खूप आनंद झाला. बाहेर ऑक्टोबर हीटचा कहर होता. अन्य सोय नसल्याने पत्रे टाकलेल्या एका छोट्याशा हॉलमध्ये मूक-बधिर मुलांनी ‘झाडे लावा...झाडे जगवा’ ही नाटिका, ‘खरा तो एकचि धर्म’ आणि ‘जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा’ या दोन गीतांवर सादर केलेले नृत्य पाहून डॉ.वाणी प्रभावित झाल्याचे दिसले. पत्रे टाकलेली संपूर्ण इमारत फिरून पाहिल्यावर त्यांनी मला विचारले, ‘वरतून पत्रे का टाकलेत? उन्हाने पत्रे तापल्यावर आत मुलाना खूप उकडत असेल! स्लॅब का नाही टाकला?’ मी अर्थातच, आर्थिक कुवत नसल्याचे कारण सांगितले. या वेळी मी या मूक-बधिर मुलांच्या पुनर्वसनासाठी त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे महत्त्वाचे असल्याचे सांगीतले. ‘मला जरा मेल करून कार्यशाळेचा प्रोजेट रिपोर्ट पाठवा, त्यात इमारतीचे एस्टिमेट आणि कोणकोणती प्रशिक्षणं सुरु करणार आहेस तेही पाठव.’ असे सांगून अण्णा आमच्या घरी जेवणासाठी आले. जेवण झाल्यावर म्हणाले, ‘चांगलं काम करताय तुम्ही. या अपंगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांचे पुनर्वसन करणे, हाच उपाय आहे. मी शक्य ती मदत नक्कीच करीन.‘ या वेळी माझी पत्नी सुधा आणि मुलगा सलिलसोबत आवर्जून हितगुज केले नंतर काका पुण्याला गेले. मी अण्णांनी सांगितल्याप्रमाणे ८/१० दिवसात मेलकरून कार्यशाळेचा प्रोजेक्ट रिपोर्ट पाठविला. त्यात प्रामुख्याने इमारत बांधकामाचे अंदाजपत्रक आणि त्या इमारतीत सुरु करावयाचे ट्रेड आणि त्यासाठी लागणारी इंस्ट्रुमेंट्‌स असा सविस्तर मेल केला.

दुसऱ्याच दिवशी मला कॅनडाहून अत्यंत मृदू, मुलायम आणि आश्वासक आवाजात अण्णाकाकांचा फोन आला. ‘इमारतीचा प्लॅनही पाठव. काम कधी सुरु करतोस?’ मी तर भांबावूनच गेलो. मोठा विलक्षण दिलासा वाटला. आम्ही तीन मजली इमारतीचा प्लॅन केला होता. पाच हजार चौ.फुटांचा एक मजला असे तीन मजली इमारत बांधणे आवश्यक असले, तरी त्यासाठी पैसा कसा उभा करायचा, हा प्रश्न होता. १ कोटी २० लाख रुपयांचे इमारतीचे इस्टीमेट होते. एस्टिमेट पाहूनच माझा उर दडपला होता. ज्यांनी इमारतीचा स्पॉट निश्चित करून एस्टिमेट बनविले होते, ते प्रा. प्रवीण मेहेत्रेही धीर द्यायचे. मात्र ११० निवासी मुलांपैकी केवळ ४० विद्यार्थ्यांसाठी शासकीय अनुदान मिळत असल्याने उर्वरित ७० मुलांचं परिपोषण, कपडेलत्ते, अंथरूण-पांघरूण करता-करताच आमची दमछाक होत असताना या नव्या इमारतीचे बांधकाम कसे करणार? या प्रश्नाने मी अस्वस्थ असतांनाच अण्णांचा कॅनडाहून पुन्हा फोन आला. ‘मी मुंबईचे रमेशभाई कचोलिया आणि अरुणभाई सेठ यांचे फोन नंबर व मेल आयडी तुला मेल केलेत, ते पाहून घे. त्या दोघांच्याही संपर्कात राहा.’ मी पडत्या फळाची आज्ञा समजून रमेशभाई कचोलिया आणि अरुणभार्इंशी फोनवर सविस्तर बोललो. शाळा चालविताना येणाऱ्या अडचणी सांगितल्या आणि व्यावसायिक प्रशिक्षण कार्यशाळेच्या आवश्यकतेविषयीही बोललो.

त्यानंतर सुमारे एक ७/८ महिन्यांचा काळ गेला. दरम्यान मायबोलीतील वाढीव ७० विद्यार्थ्यांना अनुदान मिळावे म्हणून माझ्या मुंबई-पुण्याच्या चकरा सुरू होत्या. ६/७ महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर अनुदान प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्यात आम्ही यशस्वी झालो. होतो. प्रस्ताव वित्त मंत्रालयात गेला. माझा पाठलाग सुरूच होता. निर्णयच होत नव्हता. अनुदानासाठी मंत्रालयात मोठा भाव फुटल्याची संस्थाचालकांमध्ये चर्चा होती. आम्ही मात्र कोणताही असा व्यवहार करणे शक्यच नव्हते. वाढीव विद्यार्थ्यांना प्रयत्न करूनही अनुदान मिळत नसल्याने मी हैराण झालो होतो. ११० निवासी मुलांचा दैनंदिन खर्च करणे अवघड होऊन बसले होते. त्यांचे जेवण, नाश्ता, गणवेश, आरोग्य, अंथरूण-पाघरूण आदी खर्च करणे अपरिहार्य होते. वित्त मंत्रालयात फाईल जाऊन सर्वच प्रयत्न फसले होते. मात्र मूक-बधिर मुलांचे पुनर्वसन हा मुद्दा ऐरणीवरचा होता. अशा द्विधा परिस्थितीतही मे २०१५ मध्ये कार्यशाळेच्या इमारतीची पायाखोदाई पूर्ण करून पायाभरणीसाठी आवश्यक तेवढे स्टील आणि सिमेंट आणून मूक-बधिर शाळेतील एका विद्यार्थीनीचे हस्ते पाया भरुन काम सुरू करण्यात आले. त्याचे काही फोटोग्राफ्स डॉ.जगन्नाथ वाणी यांना पाठविताच फोन आला. ‘काम सुरू केले, चांगले केले, या मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिल्याखेरीज त्यांचे पुनर्वसन होऊ शकणार नाही, ही गोष्ट मला पटते. मी तुला लवकरच पैसे पाठवतो.‘ त्यानंतर ९ जुलै २०१५ रोजी मुंबई येथून रमेशभाई कचोलिया आणि अरुणभाई सेठ खास हे काम पाहण्यासाठी आले. ते येवल्यात येण्याच्या २/३ दिवस अगोदर तसा डॉ. वाणीकाकांचा मला फोन आलाच होता. ही जोडगोळी काम पाहून गेली आणि खऱ्या अर्थाने कार्यशाळेच्या कामाला गती आली. या दोघांनी शक्य ती आर्थिक मदत केल्याने आणि दरम्यान डॉ.वाणी काकांनीही कॅनडातून तीस लाख रुपयांचे भरीव अर्थसाह्य केल्याने पाच हजार चौ. फुटांच्या तळमजल्याचे काम पूर्ण करता आले. मुंबई येथूनही रमेशभाई कचोलिया आणि अरुण सेठ यांनी सातत्याने संपर्कात राहून वेळोवेळी अनेक मौलिक सूचना करून बांधकामासाठी काही देणगीदारांकडून अर्थसाह्य मिळवून दिले. अर्थातच ही कृती डॉ.वाणी काका यांच्या सांगण्यावरून होत होती, हे मात्र निश्चित!

डॉ. वाणीकाका जानेवारी २०१६ च्या पहिल्या आठवड्यात भारतात येणार असल्याचा मेल मला आल्याबरोबर १३ जानेवारी २०१६ रोजी त्यांच्याच शुभ हस्ते या तळमजल्याचे उद्‌घाटन करण्याचे आम्ही निश्चित  केले. उद्‌घाटन समारंभासाठी डॉ.वाणीकाका आले तेव्हा तब्येत जरा नरम-गरमच वाटत असली तरी मायबोलीतली व्यवसाय प्रशिक्षणासाठी आतूर झालेली मूक-बधिर मुले पाहून ते हरखून गेले होते. त्यांचे बंधू, धुळे न.पा.चे माजी अध्यक्ष चंद्रकांतकाका केले आणि प्रसिद्ध उद्योगपती आरिफभाई रत्नानी हेदेखील त्यांच्या सोबत होते. या दोघांनीही आमच्या कामाचे कौतुक केले. मोठी माणसं आपल्या कृतीतून इतिहास घडवतात, काळाला पुढे नेतात. डॉ. अण्णांची स्वयंप्रज्ञा, प्रतिभा, सर्जनशीलता, संवेदनशीलता आणि एखाद्या कामाच्या यशस्वी अमंलबजावणीचा ध्यास या गोष्टींमुळे सभोवतालावरही जे काही इष्ट परिणाम झाले, त्यातून अनेक संस्था कायमच्या उभ्या राहिल्या.

ज्या ५ हजार चौ. फुटांचा एक मजला अशा तीन मजली १५ हजार चौ.फुटांच्या कार्यशाळेच्या इमारतीसाठी डॉ. वाणीकाकांनी ३० लाख रुपयांची मदत संस्थेला केली, ती इमारत आता पूर्णत्वाकडे जात आहे. याच इमारतीच्या अखेरच्या मजल्यासाठी सुप्रसिद्ध क्रिकेटवीर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी आपल्या खासदार निधीतून ४० लाख रुपये निधी दिला. जिल्हाधिकारी, नाशिक यांचे तसे अधिकृत पत्र मिळताच, ही बातमी मी सर्वप्रथम डॉ. वाणीकाकांना कळविली, त्यांना खूप आनंद झाला. ‘तू करीत असलेल्या कामाचा दर्जाच काही और आहे, त्यामुळे तुला भविष्यात कोणतीच अडचण येणार नाही!’ हे त्यांचे शब्द आजही माझ्या कानात घुमत आहेत.

आज महाराष्ट्र सेवा समितीचे काम वटवृक्षाप्रमाणे विस्तारले आहे. वटवृक्षाच्या पारंब्यांप्रमाणे शिक्षण, अपंग पुनर्वसन, मानसिक आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक संस्थाचे पालकत्व स्वीकारुन डॉ. वाणीकाकांनी अथक परिश्रम घेत त्या संस्थांना कोट्यवधी रुपयांची मदत केली. डॉ. वाणीकाकांनी जाणीवपूर्वक वेळ काढून काम पाहून केलेल्या आर्थिक मदतीमुळे आमच्या संस्थांच्या कामाकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टीकोन समाजात तयार तर झालाच, परंतु या संस्थांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेली ओळखही भविष्यात महत्त्वाची ठरणार आहे !

ज्या दिवशी डॉ. वाणीकाकांनी मायबोलीच्या प्रांगणात प्रथम पाऊन ठेवले, त्या दिवशी मला त्यांनी, ‘शाळेच्या छतावर पत्रे का टाकले?’ या प्रश्नाचं उत्तर त्यांनीच अखेरच्या क्षणी म्हणजे तब्येत अजिबात ठीक नसतांना दिलं. आणि ते म्हणजे- ‘मायबोलीवरील पत्रे काढून त्यावर स्लॅब टाकायचा आहे.’ तसा मेल मला आला. मेल पाठविल्यानंतर फोन करण्याची अण्णांची पद्धत होती. फोनवर नेहमीसारखं बोलणं झाल्यावर अण्णांनी मूळ मुद्द्याला हात घातला. मायबोलीचे पत्रे टाकलेल्या बांधकामाचे क्षेत्रफळ विचारले, मी पाच हजार चौ.फूट सांगितल्यावर अण्णा म्हणाले, ‘सध्या मला निम्म्या क्षेत्रफळासाठी लागणारे इस्टिमेट पाठव.’ मी २५०० चौ.फुटांसाठी येणारा खर्च आणि त्याचा प्लॅन पाठवला. दि. १० मार्च २०१७ रोजी संस्थेच्या एफ.सी.आर.ए. खात्यावर २५ लाख रुपये जमा झाले. दि. ११ मार्चला सकाळी-सकाळी अण्णांचा फोन, ‘पैसे मिळालेत का? सध्या आपण २५०० चौ.फुटांचे काम करू, नंतर पुढचे काम करू’ बोलताना अण्णांना दम लागत होता. खोकला येत होता. त्यांना आणखी काही बोलायचे होते, मात्र बोलताना खूप त्रास होत असावा, ‘काळजी घे! चल अच्छा.’ म्हणून अण्णाकाकांनी फोन ठेवला. पुन्हा तो आवाज ऐकायलाच मिळणार नसल्याचे त्यांच्या मृत्यूने सिद्ध केले. वैयक्तिक जीवनात सातत्याने संघर्ष वाट्याला आलेल्या या स्थितप्रज्ञाने अखेरच्या क्षणापर्यंत आमच्यासारख्या शेकडो छोट्या-छोट्या कार्यकर्त्यांना मोठ्या ममतेने प्रेमाची उब आणि धीर दिला. आमचे सार्वजनिक कामातील मनोबल वाढविले. अशा एक नव्हे, अनेक गोष्टी मनात दाटून येत आहेत.

अनेक शाळा, दवाखाने, पुनर्वसन केंद्र बांधण्यासाठी कोट्यवधी रुपये परदेशातून पाठवून आधारवड झालेले डॉ. वाणीकाका इतक्या गर्दीतून उठून अचानक निघून गेल्याने आम्ही पोरके झालो आहोत! काही माणसं मृत्यूनंतरही तळपत राहतात, त्यापैकी एक डॉ.जगन्नाथ वाणी होते. आमच्या समता प्रतिष्ठान परिवारावर डॉ.वाणी यांनी माया केली, आमच्यावर विश्वास दाखवून, ‘न भूतो न भविष्यति’ असे अर्थसाह्य केले. परदेशात थोर शास्त्रज्ञ असूनदेखील भारताच्या मातीवर घट्ट पाय रोवून उभ्या राहिलेल्या डॉ.वाणीकाका नावाच्या माणूसबेटाला लाखलाख सलाम! मायबोली परिसरात त्यांच्या वास्तव्याचा गंध कायम दरवळत राहील!

Tags: मायबोली निवासी कर्ण-बधिर विद्यालय डॉ.जगन्नाथ वाणी अर्जुन कोकाटे थोर शास्त्रज्ञ समता प्रतिष्ठान Dr. Jagnnath wani arjun kokate Scientist Dr. Jagnnath Vani weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके