डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

डॉ. शरणकुमार लिंबाळे : साहित्यविश्वाला कवेत घेऊ पाहणारा समृद्ध हुंकार!

डॉ. शरणकुमार लिंबाळेलिखित ‘सनातन’ या कादंबरीला हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे. या देशात विशिष्ट वर्गाने देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात किंवा तत्सम देशाचे अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या पुरोगामी चळवळीमध्ये कधीही भाग न घेता; केवळ सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात कायम आपलेच वर्चस्व कसे राहील हे कटाक्षाने पाहिलेले असल्याने अनेकांच्या वाट्याला काम करूनही उपेक्षाच आलेली आहे. या देशातील दलित- आदिवासींसारख्या जनसमूहांनी प्रसंगी आपल्या पोटाची व अस्तित्वाची पर्वा न करता हा देश परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी जे लढे वेळोवेळी दिलेले आहेत, ‘सनातन’मध्ये डॉ.लिंबाळे यांनी प्रकाशझोत टाकलेला आहे.  

‘अक्करमाशी’ या आत्मकथनामुळे ज्यांनी प्रस्थापित मराठी विश्वाला जबरदस्त हादरे देत स्वतःची अत्यंत वेगळी ओळख निर्माण केली, त्या डॉ.शरणकुमार लिंबाळे यांना त्यांच्या ‘सनातन’ या नव्या कादबंरीसाठी भारतातील प्रतिष्ठित असा के.के.बिर्ला फाउंडेशनचा ‘सरस्वती’ पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतातील तब्बल 22 भाषांमधील पुस्तकांचे अवलोकन करून दर वर्षी एका साहित्यिकाला हा मानाचा पुरस्कार दिला जातो. या अगोदर मराठीत प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर आणि महेश एलकुंचवार यांनाही हा पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे. डॉ.लिंबाळे यांच्यासारख्या भारतीय समाज- व्यवस्थेचे कुरूप स्वरूप छातीठोकपणे मांडणाऱ्या लेखकाला हा पुरस्कार मिळाला, म्हणून त्याचे महत्त्व फार मोठे आहे. 

भारतीय सामाजिक जीवनात ठासून भरलेल्या आणि अनेकांचे आयुष्य उद्‌ध्वस्त करणाऱ्या जातीयतेच्या श्रेष्ठत्वाबरोबरच पुरुषप्रधान संस्कृतीत दलित स्त्रीचे सर्वच पातळीवरचे जीवन किती अप्रतिष्ठेचे आणि अद्‌भुत आहे, याचे वास्तव डॉ.लिंबाळे यांच्या जगण्याला इतके घट्ट चिकटले होते की, त्या घुसमटीतून बाहेर पडण्याची वाट ‘अक्करमाशी’ या पुस्तकाने त्यांना मिळाल्याचे ते खुलेआम कबूल करतात. ‘अक्करमाशी’बद्दल बोलताना ते म्हणतात, ‘‘ही कथा माझी आहे, व्यथा माझ्या आईची आहे आणि आत्मकथा एका अशा समाजाची आहे- जो वर्षानुवर्षे किड्या-मुंग्यांसारखे अत्यंत घाणेरडं जीवन जगला. अक्करमाशी जितकं माझं खासगी आयुष्य आहे, तितकंच ते सर्वांगाला सदा-सर्व-काळ वेदना देणारं जनरल वॉर्ड आहे.’’ जे जीवन डॉ.लिंबाळे यांच्या वाट्याला आले, ते शब्दरूप करताना नेमकं काय होत आहे किंवा होणार आहे याचा थांगपत्ताही नसताना, केवळ आपल्या दुःखाच्या मुळाशी जाण्याच्या अथक प्रयत्नाचाच तो एक भाग होता. समाजात ब्राह्मणांपासून शूद्रांपर्यंत प्रत्येक जण स्वतःच्या घराण्याचा-जातीचा अभिमान, अस्मिता बाळगीत असतो; मात्र लेखकाच्या अस्मितेला इथं चूड लागल्याचे दिसते. लेखकाचा जन्मच अनैतिक ठरवला गेला आहे. रांडेच्या मुलांची एक वेगळीच ‘अक्करमाशी’ जमात निर्माण झाली आहे. आई महार आणि बाप लिंगायत असणाऱ्या लेखकाला महार हमाज सवर्ण म्हणून, तर लिंगायत समाज महार म्हणून जवळ करीत नाही. अशा व्यक्तीच्या मनावर काय आणि किती वाईट परिणाम होत असतील याची कल्पनासुद्धा न केलेली बरी. जातच काय- अशा वेळी आप्तेष्ट वाटणारेही जेव्हा जीवघेणा तटस्थपण दाखवतात तेव्हा शरणकुमारांच्या कौटुंबिक आणि एकूणच वैयक्तिक जीवनाची किती परवड झाली असणार! 

उपेक्षा, कुचंबणा व अनैतिकतेच्या वाट्याने आलेल्या जन्मावरून सातत्याने हिणवणे आणि आपल्या आयुष्याची होत असलेली परवड उघड्या डोळ्यांनी पाहण्याचे प्रचंड धाडस केवळ भुकेसाठी करावे लागणे- हे या देशाचे अत्यंत हीन वास्तव आहे. भारतातील अस्पृश्यतेचे हे अत्यंत कुरूप दर्शन केवळ ‘अक्करमाशी’ असल्यामुळे डॉ.लिंबाळे यांच्या वाट्याला आले. पोटातील भुकेचा रोजचा प्रश्न सोडविण्यासाठी अवघ्या दलित-आदिवासी-भटक्या- विमुक्त समाजाला संघर्षच करावा लागतो. दैन्य, दुःख, लाचारी, उपेक्षा, हलाखी, अस्थैर्य इत्यादी सर्वच समस्यांचे साम्राज्य असलेला हा ‘अक्करमाशी’ समाज स्वतःच्या आत्मकथनातून शरणकुमारांनी ज्या प्रकारे आणला, ज्या क्षणी त्यांना हे कागदावर उतरवावेसे वाटले; त्या क्षणाची मी कल्पना करतो. या चिंतनशील लेखकाची शारीरिक व मानसिक स्थिती अशा वेळी धडधाकट तरी कशी राहिली असेल? किती या वेदना! लक्षावधी इंगळ्या डसत असताना शरणकुमारांनी ज्या धीरोदात्तपणे ‘अक्करमाशी’ लिहिले, त्याबद्दल त्यांना कोटी-कोटी सलाम करावेसे वाटतात. मन तुटलेपणाच्या जाणिवेने स्वतःचे एकटेपण जपत, भोवताली पसरलेल्या कट्टर परंपरावाद्यांची विषण्ण नोंद घेण्यासाठी हिंमत हीच गोष्ट लिंबाळे यांना बळ देऊन गेली असावी. इतरांच्या अभावग्रस्ततेची चर्चा, काळजी हा भाग वेगळा असतो. मात्र स्वतःचा कोणताही दोष नसताना इथल्या शोषणमूलक-विषमताग्रस्त व्यवस्थेने कू्ररपणे अनेकांच्या वाट्याला जे जिणे लादले आहे, त्यावर खरे तर कठोर शब्दांत पलटवार करण्याऐवजी डॉ.लिंबाळे यांच्यासारख्या बहुतेक दलित साहित्यिकांनी अत्यंत संयमित भाषा वापरून, सामाजिक भान पूर्णतः ठेवून आपापली साहित्यनिर्मिती केली असल्याचे स्पष्टपणे दिसते. अर्थातच त्याचे कारण प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मूलगामी मानवतावादी विचार आणि शिक्षण घेतल्यामुळेच या सर्व लेखकांच्या जाणिवा अत्यंत प्रगल्भपणे आपापल्या साहित्यकृतीतून प्रकट झालेल्या आहेत. 

खरे तर ‘अक्करमाशी’ या आत्मकथेत डॉ.लिंबाळे यांनी दोन भिन्न, परंतु भीषण पातळ्यांवरचा संघर्ष चित्रित केला आहे. आईला तिचा जातसमाज स्वीकारायला तयार नाही; तर ज्या अनैतिक संबंधातून जन्म मिळाला, तो बाप शरणकुमारांना मुलगा म्हणून स्वीकारायला तयार नाही! यातून जातिभेदावर आधारलेली समाजरचना आणि त्यामुळे घट्ट झालेले मानसिक पाश हेच खरे तर आमच्या सामाजिक आणि सांस्कृतिक व्याधीच्या मुळाशी आहेत. ते मानवनिर्मित आहेत. त्यामुळेच, म्हटले तर ते सोडविणे सोपे आहे- अशा ठाम भूमिकेतून डॉ.लिंबाळे आपली साहित्यनिर्मिती करीत आहेत.

‘पुस्तकंच मस्तकं घडवतील’, या ठाम विश्वासाने शरणकुमार लिहीत गेले. अर्थातच तमाम दलित साहित्यिकांप्रमाणे डॉ.आंबेडकर हेच लिंबाळे यांचेही प्रेरणास्रोत असल्यामुळे ज्या हिंदू धर्माने कर्मसिद्धांतासारख्या सामाजिक विषमतेला घट्ट पकडून ठेवणाऱ्या सिद्धांताचा आधार घेत इथं अस्पृश्य ठरविल्या गेलेल्या कोट्यवधींची आयुष्यं उद्‌ध्वस्त केली, जनावरांपेक्षाही वाईट जिणं त्यांच्या वाट्याला आलं; त्या अत्यंत घातक प्रथेविरुद्ध निकराने लढण्याची जबाबदारी शरणकुमारांनी आपल्या शिरावर घेतली नसती, तरच नवल! कारण एकूणच दलित साहित्यातून प्रकट होणारा नकार आणि विद्रोहाच्या ठिणग्या या मुख्यत्वेकरून माणसाचे माणूसपण नाकारणाऱ्या धर्मपंरपरा, त्यामुळे रुजलेली हीन संस्कृती, तमाम स्त्रिया व दलितांच्या जीवनात विषमतेचेशोषणाचे बीज पेरण्याबरोबरच अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्र्य कालवणारे षडयंत्र आहे- त्याविरुद्ध ठाम भूमिका घेऊन नकाराचे आयुष्य नाकारणारे साहित्य जोरकसपणे निर्माण व्हायला हवे, ही डॉ.लिंबाळे यांची स्वाभाविक भूमिका आहे. 

बहुतांश दलित लेखकांच्या स्वकथनाच्या भाषेसारखी डॉ.लिंबाळे यांचीही भाषा सामाजिक जाणिवांशी पूर्णतः निगडित असल्याचे दिसते. खरे तर या सर्वच लेखकांच्या वाट्याला केवळ जात म्हणून आलेलं जिणं, अन्याय हे अशा ब्राह्मणी व्यवस्थेमुळे आणि कर्मभोगाच्या सिद्धांतामुळेच आलेलं आहे, याविषयी आता सर्वांचेच एकमत आहे. ज्या साहित्याच्या मुळाशी संघर्ष व क्रांतिकारक प्रेरणा असतात, त्याला वेगळेच सामर्थ्य लाभत असते. दलित लेखक आपल्या साहित्याकडे समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन म्हणून पाहत असल्याने, त्यांच्याबरोबरच वाचकांनाही इतर साहित्यातून मिळते तशी निरागस आनंददायी अपेक्षा नसते. त्यात बऱ्याचदा आपल्या जगण्यात इथल्या व्यवस्थेने अडथळे निर्माण केलेले आहेत हे स्वानुभवाने ते जाणून असल्याने त्यांनी निर्माण केलेल्या साहित्याला अनुभूतीचा आविष्कार असतो. म्हणूनच ते साहित्य केवळ एका विशिष्ट काळाची संगत करीत नाही, तर बदलत नसलेल्या व्यवस्थापरिवर्तनाचे ते हत्यार ठरत असते. 

डॉ.शरणकुमार लिंबाळे यांच्या ‘सनातन’ या कादंबरीला हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे, तीदेखील अशाच पोटतिडिकीतून निर्माण झालेली आहे. या देशात विशिष्ट वर्गाने देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात किंवा तत्सम देशाचे अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या पुरोगामी चळवळीमध्ये कधीही भाग न घेता; केवळ सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात कायम आपलेच वर्चस्व कसे राहील हे कटाक्षाने पाहिलेले असल्याने अनेकांच्या वाट्याला काम करूनही उपेक्षाच आलेली आहे. या देशातील दलित- आदिवासींसारख्या जनसमूहांनी प्रसंगी आपल्या पोटाची व अस्तित्वाची पर्वा न करता हा देश परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी जे लढे वेळोवेळी दिलेले आहेत, त्यावर डॉ.लिंबाळे यांनी ‘सनातन’मध्ये प्रकाशझोत टाकलेला आहे. म्हणजे डॉ.लिंबाळे यांना वंचित जनसमूहदेखील या देशासाठी लढले व लढत आहेत हे जे आवर्जून सांगायचे आहे, त्यातून देशातल्या सर्वच गोष्टींचेही ते भागीदार आहेत, हेच जणू स्पष्ट करावयाचे आहे. शतकानुशतके कुचंबलेले थर, त्यांच्या व्यथा-वेदना व आशा-आकांक्षाची पर्वा न करता देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनाचे भान ठेवतात आणि त्यात उड्या घेतात, ही गोष्ट आता गाईच्या नावाने बोंबलत सत्तेच्या कब्जासाठी क्लृप्त्या करीत आहेत त्यांना खरे तर मोठी चपराक आहे. 

वाङ्‌मयाची किंवा तत्सम कुठल्याही कलेची निर्मिती होताना काहीएक काळ जाणे आवश्यक असते. ज्या काळात प्रश्न निर्माण होतात, त्या काळात साहित्य निर्माण होतेच असे नाही. डॉ.लिंबाळे यांच्या लेखनातली ताकद अशी की, स्वातंत्र्यानंतर एवढा मोठा काळ जाऊनही वंचित जनसमूहांचा स्वातंत्र्यकाळात असलेला सहभाग चित्रित करताना त्यांना केवढी मांड ठोकावी लागली असेल! एकीकडे मनुष्याचे मनुष्यत्व हिरावून घेणाऱ्या प्रस्थापितांशी सातत्याने संघर्ष करावा लागत असताना हे जनसमूह ‘आपल्याला स्वातंत्र्य हवे असले, तर प्रथम देश स्वतंत्र झाला पाहिजे’ या सकारात्मक ऊर्जेने स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय होत असल्याचे सनातन कांदबरीच्या माध्यमातून डॉ.लिंबाळे ठामपणे मांडतात. त्यांना लेखक म्हणून केवढे राजकीय भान आहे, त्याचाच हा पुरावा आहे. 

सभोवतालच्या वास्तवाचे चिंतन व विश्लेषण सतत करून वास्तवाच्या गतित्वाचा अचूक वेध घेत साहित्य निर्माण करायचे असते. लिंबाळे हे याच पट्टीतले- म्हणजे साहित्यनिर्मितीसाठी पुरेसा काळ-वेळ देत, निर्मितीचा ध्यास घेऊन नवी निर्मिती करणारे लेखक आहेत. याच तीव्र जाणिवेतून त्यांच्या हातून सनातन कादंबरी लिहिली गेली आहे. विचारप्रधान साहित्याच्या निर्मितीचा ध्यास हे त्यांच्या पुस्तकांचे वैशिष्ट्य आहे. कथा, कविता, आत्मनिवेदने, कादंबरी, समीक्षा, संपादने आदी साहित्य निर्माण करणारे लिंबाळे हे दलित साहित्याची क्षितिजे विस्तारत नेणारे अत्यंत महत्त्वाचे परिवर्तनवादी लेखक आहेत. त्यांच्याजवळ व्यापक समाज-निरीक्षणाबरोबरच सूक्ष्म आत्मविश्लेषक दृष्टी आहे. त्यामुळेच त्यांच्या साहित्याला मिळालेली परिमाणे मराठी साहित्यक्षेत्राबाहेरचे के.के.बिर्ला फाउंडेशनसारखे पुरस्कार मिळवून देण्यास समर्थ ठरली आहेत. 

डॉ.लिंबाळे यांच्या ज्या सनातन कादंबरीला हा पुरस्कार मिळाला आहे, त्या सनातनच्या नावातही बरेच रहस्य गुंतलेले आहे; ते या निमित्ताने उलगडावे, अशी अपेक्षा करीत पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ.लिंबाळे यांचे मनःपूर्वक अभिनंदन. 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके