डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

जागतिक स्त्रीमुक्ती दिनी सिंधू कंक मुक्त!

जातीसमस्या, धार्मिक समजुती आणि अंधश्रद्धा, यामुळे समाजातल्या तळातल्या अनेकांचे शोषण होते. व्यवस्थेचा सारा भारही समाजाच्या उतरंडीच्या तळाशी असलेल्या दलित, भटके व स्त्रिया यांच्यावर पडतो. या भाराखाली त्यांचे सारे जीवनच भरडून निघते. देवदासींची प्रथा देखील अशीच एक अमानुष गोष्ट! कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रात आजही ही प्रथा मोठ्या प्रमाणात आहे.

'यत्र नार्यन्तु पूजन्ते'...? 

1934 साली सरकारने देवदासी प्रथेस बंदी केली, परंतु असा काही कायदा झाला असल्याचे देखील अनेक संबंधित अधिकाऱ्यांना माहीत नसल्याचा आम्हा कार्यकर्त्यांचा अनुभव आहे. जिथे शासकीय अधिकाऱ्यांना आपले काम (ड्यूटी) माहीत नाही, तिथे समाजाला आपले कर्तव्य काय कळणार? 'यत्र नार्यन्तु पूजन्ते' वगैरेचा टेंभा मिरविणाऱ्या आमच्या हिंदू संस्कृतीतली ही प्रथा म्हणजे स्त्रियांबद्दलच्या दृष्टिकोनाचा पंचनामा होय! कारण देवदासी म्हणून ज्या मुली सोडल्या जातात त्या मातंग, आदिवासी व अन्य दलित जातींतीलच असतात.

नाशिक जिल्ह्यात या प्रथेविषयी विशेष माहिती उपलब्ध नसली किंवा ही प्रथा रूढ नसली तरी पण, 'घरात खूप खरुज झाली देवीला नवस करा, बोकड मारा, सुवासिनी जेऊ घाला. मुलं जगत नाहीत म्हणून देवीला मुलगी सोडणे असे प्रकार खेड्यांमधून सर्रास चालतात परंतु त्याचे प्रमाण अल्प व दुर्लक्षित जातीतच ते घडत असल्याने विशेष माहिती मिळत नाही. येवले तालुक्यातील अंदरसूल येथील आदिवासी (भिल्ल) जातीतील 'सिंधू कंक' ही तरुणी अशीच या दुष्ट प्रथेचा बळी ठरत होती पण... 

सिंधू कंक वय अंदाजे 19 वर्षे.

शिक्षणाचा गंध नाही. रोजच मोल-मजूरी करून गुजराण. विधवा आई, एक छोटा भाऊ, तीन बहिणी-एवढे कुटुंब. आणि हो, घरात अठराविश्वे दारिद्र्य! ते तर मुक्कामालाच.

चार-चौघींसारखं लग्न करावं. संसार थाटावा. जीवनाची स्वप्ने रंगवावी. ही सिंधूची इच्छा. पण आईच्या जुन्या, अंधश्रद्धाळू मनाला पटवील कोण, हा यक्षप्रश्न! सिंधू वयात आली तशी आईची नि मोठ्या बहिणीची कुरकुर सुरू होती. 'तू जपून रहा, काही चाळे केलेस तर बघ. पोराशी बोलू नको. तुला 'व्हरांड्या' आईला सोडलंय; काही घोटाळा केला तर मरशील वगैरे वगैरे!

आपल्या उभ्या आयुष्याचं मातेरं होतंय, अंधश्रद्धेच्या साखळदंडांनी आपल्याला जखडून टाकलंय, ज्या 'व्हरांड्या' आईला आपल्याला सोडलं (असं आई म्हणते) तिचं साधं देऊळही दिसत नाही, आदी विचार सिंधूच्या मनात दिवसेंदिवस पक्कं घर करू लागले. 

3-4 वर्षांची असताना सिंधू खूप आजारी पडली. धा-पाच वैदानला, बाबानला दाखिवलं पर गुण नाय. डाक्टरला दाखवलं म्हणं तिला दवाखान्यातच ठिवावं लागंल-सिंधूच्या पाठीवर म्या गरुदर असतानाच सिंधूचा बा मेला-घरची परिस्थिती हलाकीची -मंग माझ्या मोठ्या पोरीनं आमच्या हक्काच्या 'व्हरांडया'आईला साकडं घातलं-'जगली तर तुही-मेली तरी तुहीच.' पुढं सींधीला बरं वाटलं. ती आता इस तरी वर्साची असल. 'व्हरांड्या' आईच्या नावाने सोडलं, परत कशी घिऊ?- इति सिंधूची आई! 

कनिष्ठ जातींचे देव व त्यांची नावेही कशी ओबड-धोबड असतात. व्हरांड्याआई, खापऱ्याआई, सखाई आदी!

येवले तालुक्यात 'समता आंदोलन'चं काम चालतं. अंदरसूल गावातील आदिवासी, दलित, धनगर, वडार व सवर्णांचेही सुमारे 20-22 तरुण संघटनेचे कार्यकर्ते! मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात ह्या गावचे 17-18 तरुण जेलमध्ये होते. संघटनेच्या इतरही कार्यक्रमांमध्ये या तरुणांचा सहभाग दखल घ्यावा असा.

या तरुणांपैकीच दुर्योधन निकम (आमचा 'दुर्गामामा') हा आदिवासी तरुण. दोन हात हेच उत्पन्नाचे साधन. रहायला घर नाही की वहायला शेत नाही. रक्ताचं पाणी नि हाडाची काडं करून वृद्ध मातापिता व बहीणभावंडांना रोजचा शेर उपलब्ध करून देणारा 24 वर्षीय अंगठेबहाद्दर तरुण! सिंधूची दुःखद कैफियत त्यानेही ऐकलेली. कधी शेतीवर शेतमजूर म्हणून तर कधी रोजगार हमीच्या कामावर मजूर म्हणून एकत्र कामे करताना गाठी-भेटी. सिंधुविषयी त्याला विशेष सहानुभूती. वेगळीच भावना. त्यातूनच भेटीगाठी घरी येणे-जाणे वाढलेले. पुढे दोघांचे 'चक्क' लग्नावर बोलणे! 

दुर्योधनसारखा धट्टा-कट्टा तरुण आपल्याला जीवनभराची साथ द्यायला तयार आहे, हे ऐकूनच सिंधूला आभाळ ठेंगणं वाटू लागलं. तिनं लगेच आपल्या आईला ही सुखद वार्ता सांगितली. जुन्या, भोळ्या, अंधश्रद्धाळू मनाला या 'व्हरांड्या आईला सोडलेल्या सिंधूचे लग्न' ही कल्पनाच सहन होईना. आई सिंधूवर खूप चिडली. या आईचा कोप व्हईल, किडे पडून मरशील, घरादाराच्या नावाला बट्टा लावशील. वगैरे वगैरे!   

दुर्योधनने ही गोष्ट आपल्या साथी मित्रांना सांगितली. चंद्रकांत सावरे, काशीनाथ भालेराव, बन्सी पवार, कांता सोनवणे, रायमान कचरे, भगवान गुजरे, माधव सोनवणे आदी मध्यस्थी. या कार्यकर्त्यांनी सिंधूच्या आईला सिंधूच्या उभ्या आयुष्याची जाणीव करून दिली. तिचे लग्न झाले तर व्हरांड्या आईचा कोप होईल ही भ्रामक कल्पना, अंधश्रद्धा वगैरे पटवून मन वळविण्याचा प्रयत्न केला. नाहीच आईची परवानगी मिळाली तरी विरोध पत्करून हे लग्न लावण्याचे ठरले. तीन दिवसांच्या सातत्याच्या बैठकांनंतर सिंधूची आई सिंधूचे लग्न करण्यास तयार, पण एक अट-'व्हरांड्या आईला जीवाला जीव सोडावा लागंल-चार पायाचं असलं तरी चालंल.' कार्यकर्ते तयार होतात. 3 मार्चला संघटनेची बैठक, सिंधू-दुर्योधन यांच्या आयुष्याच्या बांधिलकीची चर्चा. 8 मार्च 83 या जागतिक स्त्री मुक्तिदिनी लग्न रजिस्टर पद्धतीने करण्याचे ठरते. 5 मार्च आम्ही लग्नाची सर्व तयारी करतो. लग्न नक्की ठरते.

8 मार्च 1983 जागतिक स्त्री मुक्ती दिन. 

'समता आंदोलन'च्या वतीने येवले तहसीलवर स्त्रियांचा मोर्चा व धरणे धरण्याचा कार्यक्रम : 11 वाजण्याचा सुमार. गावागावातल्या बाया आपल्या लेकरा-बाळांसह संघटनेच्या कार्यालयात हजर. मोर्चा सुरू होण्यापूर्वी माझ्या घरी येवल्यातच दुर्योधन-सिंधू यांना आम्हीच तयार केलेली प्रतिज्ञा देवविली. लग्न लागले. मग मोर्चा तहसीलवर गेला. समतेची गाणी म्हणत मागण्यांच्या घोषणा देत बायांनी धरणे धरली. कार्यकर्तेही मोठ्या संख्येने होते. 

रजिस्ट्रारकडून आलेले विवाह नोंदणी फॉर्म चंद्रकांत साबरेने भरले. लग्न लागल्याचे घोषित झाले. 

एव्हाना इतर कार्यकर्ते व बाबा यांनी तहसीलदारांना खालील मागण्यांचे निवेदन दिलेले.- *स्त्रियांवरील वाढते अत्याचार थांबलेच पाहिजे. *भारमची राजूबाई गायकवाड व नागडघाची उज्ज्वल वांगर यांच्या खून व आत्महत्येची न्यायालयीन चौकशी करा. * स्त्रियांवरील वाढत्या अत्याचारांच्या खटल्याचे निकाल त्वरित लागण्यासाठी फिरते न्यायालय स्थापन करा, त्यावर स्त्री न्यायाधीशांची नेमणूक करा. *प्रत्येक तालुक्याच्या गावी एक महिला इन्स्पेक्टर काँस्टेबल नेमा. *किमान वेतन स्त्री-पुरुषांना समान द्या.

पाच वाजलेले असतात. धरणे उठण्यापूर्वी मी सिंधू-दुर्योधन यांच्या या साध्या सुध्या विवाहात मान-पान, जेवणावळी, हुंडा, बक्षिसे, मंडप, लाईट, कर्णकर्कश लाउडस्पीकर आदींचा प्रचंड खर्च टाळण्यात आला आहे, विशेषतः सिंधूला व्हरांड्या आईला सोडलेलं होतं, तिचं जीवन म्हणजे निव्वळ अंधार राहिला असता, धार्मिक बेड्या तिच्या हाता-पायात अडकविल्या होत्या, तिला सारं आयुष्य गुलामीत घालावं लागलं असतं. जीवन जगण्याचे दरवाजेच तिच्यासाठी बंद झाले होते ते आज उघडले असे सांगताच उपस्थित बाया व कार्यकर्ते टाळ्या वाजवून दाद देतात. जागतिक स्त्री मुक्तिदिनी इथल्या अंधश्रद्धांच्या तावडीतून, धर्मांधांच्या नजरेतून आज एक सिंधू कंक मुक्त झाल्याचे पहात बाया घरी परतल्या. 

सिंधू-दुर्गामामा आता काबाडकष्ट करीत सुखाने राज्य करीत आहेत!

Tags: आदिवासी. देवदासी नाशिक हिंदू संस्कृती अर्जुन कोकाटे स्त्रिया Tribes. #अंधश्रद्धा Devdasi Nashik Hindu Culture Arjun Kokate Women #Superstition weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके