डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

निखिल वागळे आपल्या दीड तासाच्या तडाखेबंद भाषणात म्हणाले, ‘‘ज्या मातीवर उभे राहून भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासोहब आंबेडकर यांनी ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही’ अशी ऐतिहासिक घोषणा करून खळबळ उडवून दिली होती; त्या ऐतिहासिक अशा मुक्तिभूमीवर मी उभा आहे, याची मला जाण आहे. या घोषणेने देशाला हादरा बसला. मात्र त्यांची घोषणा म्हणजे हिंदू धर्माला आव्हान नव्हते; तर पिढ्यान्‌पिढ्या दबलेल्या, अन्याय सहन केलेल्या आणि शोषणाचे बळी ठरत असणाऱ्यांचा तो हुंकार होता, हे आपण समजावून घेतले की धर्मनिरपेक्षता, मानवतावाद म्हणजे नेमके काय, हे आपल्या लक्षात येईल. युरोपमध्ये सेक्युलॅरिझम हा शब्द निधर्मीवाद, नास्तिकता या अर्थी वापरला जातो. भारतातील धर्मनिरपेक्षता म्हणजे शिवाजीमहाराजांनी शिकविलेला सर्वधर्मसमभाव आणि तसाच अर्थ इथल्या संविधानालादेखील अभिप्रेत आहे.

येवला, जि.नाशिक येथे सुरू असलेल्या इतिहास लोकजागर अभियानाचे हे तिसरे वर्ष! या वर्षी जरा अधिक तयारी करून कार्यकर्ते मैदानात उतरले होते, ही एक मोठी समाधानाची बाब आहे. शिवाय या वर्षीच्या इतिहास लोकजागरात राष्ट्र सेवादल, अंनिस, अ.भा.समाजवादी अध्यापक सभा आणि विधायक युवा संसद या नेहमीच्या संघटनांशिवाय रायगड ग्रुप, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, भारिप बहुजन महासंघ, येवला तालुका मराठी पत्रकार संघ, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड, या येवला शहर व तालुक्याच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संघटना आणि पक्षदेखील हिरीरीने सहभागी झाल्यामुळे या अभियानाची उंची वाढली होती. या सर्व पक्ष-संघटनांच्या प्रतिनिधींच्या तीन-चार बैठका मोठ्या उत्साहात पार पडल्या.

इतिहास लोकजागर अभियानाला बहुजन प्रतिपालक रयतेचे राजे छत्रपती शिवाजीमहाराज आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवाचे स्वरूप देण्यात आले. त्यास ‘शिवराय ते भीमराय’ असे साजेसे नाव देऊन काही नियम करण्यात आले. 1. या दोन्ही लोकोत्तर महापुरुषांचे जयंतीउत्सव वैविध्यपूर्ण पद्धतीने साजरे करावेत. 2. या दोन्ही जयंतीउत्सवासाठी कुणाकडेही देणगी/वर्गणी न मागता सहभागी सर्व संघटनांनीच समान हिस्सा खर्चासाठी द्यावा. 3. शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने जशा शालेय परंतु उर्दू भाषक मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा ठेवण्यात आल्या तशा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावरही शालेय विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा घेण्यात याव्यात. 4. बक्षीसवितरण आणि मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातील पुरोगामी, अभ्यासू वक्ते या दोन्ही महापुरुषांच्या जयंती उत्सवासाठी बोलविण्यात यावेत.

19 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या शिवयजयंतीनिमित्त येवले शहरातील उर्दू भाषक अँग्लो उर्दू हायस्कूल, उर्दू गर्ल्स हायस्कूल आणि उर्दू प्राथमिक शाळेतील पाचवी ते दहावीच्या मुलांसाठी ‘छत्रपती शिवाजीमहाराज : एक जाती-धर्मनिरपेक्ष लोकराजा’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. शहरातील दोन्ही उर्दू हायस्कूल आणि उर्दू प्राथमिक शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी या उपक्रमास दर वर्षीप्रमाणेच या वर्षीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

स्पर्धा खेळीमेळीत पार पडल्या. परीक्षक प्रा.डॉ.अजय विभांडिक, प्रा.पुरुषोत्तम पाटील आणि रामनाथ पाटील यांनी स्पर्धेतील मुलांची अभ्यासपूर्ण वक्तव्ये ऐकून या वेळी पाच नंबर काढावेत, अशी न राहवून सूचनाही केली; कारण या सर्व मुलांनी विषयाला धरून इतकी उत्तम मांडणी केली की, नंबर काढताना परीक्षकांचीही काहीशी पंचाईत झाली. उर्दू भाषेचा गोडवा; त्यात उत्तम शेरोशायरी, संत कबीर-गालिब यांचे दोहे म्हणजे नुसती मेजवानीच!!!

‘सिर्फ पानी से नहानेवाला कभी सफल नहीं होता गालिब,

पसीने से नहानेवाले ही दुनिया बदलते है।‘

इतिहास लोकजागर अभियानाच्या या कार्यक्रमात अन्सारी आयमन इद्रीस, सुमय्या अबीद शहा आणि अन्सारी मनताशाबानो सगीर या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनीबरोबरच एक हृद्य सत्कार करण्यात आला, त्यांचे नाव सुभाषराव पाटोळे! सुभाषराव पहिलवान यांचे पाटोळे कुटुंब गेल्या 80 वर्षांपासून तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करीत होते. मात्र संयुक्त जयंती समितीने तिथीऐवजी तारखेप्रमाणे शिवजयंती उत्सव करावा, असे सुचविले. सुभाष पहिलवान यांनी कोणतेही आढेवेढे न घेता तब्बल 79 वर्षांची तिथीची परंपरा खंडित करून 19 फेब्रुवारी रोजी तारखेप्रमाणे भव्य मिरवणूक काढून बहुजन प्रतिपालकाची जयंती साजरी केली. म्हणून पाटोळे यांना भारतीय संविधानाची प्रत, गुलाबपुष्प देऊन वागळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते ॲड.माणिकराव शिंदे आपल्या छोटेखानी भाषणात म्हणाले, छत्रपती शिवाजीमहाराज हे रयतेचे, बहुजनांचे राजे होते; त्यांच्याच कल्याणासाठी आणि संरक्षणासाठी राजे आयुष्यभर झिजले. मात्र या देशातल्या विशिष्ट विचारसरणीच्या तथाकथित लेखकांनी या बहुजन प्रतिपालकाला धर्माच्या गराड्यात कायमच अडकवून गोब्राह्मणप्रतिपालक अशी काल्पनिक प्रतिमा चिकटविण्याचा प्रयत्न केला. महाराजांचा खरा इतिहास जगासमोर यावा, म्हणून आम्ही हा उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून हाती घेतल्याचे स्पष्टीकरणही ॲड.शिंदे यांनी यावेळी दिले. या समारंभास प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्रातील प्रसिद्ध पुरोगामी विचारवंत आणि परखड पत्रकार निखिल वागळे यांना निमंत्रित करण्यात आले होते. प्रेक्षकांनी तुडुंब भरलेल्या सभागृहाच्या व्यासपीठावर ते येताच प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात उपस्थितांनी त्यांचे स्वागत केले. सभागृह खच्चून भरले होते. दोन-तीनशे खुर्च्या बाहेरून लावूनही श्रोते लाडक्या वक्त्याला ऐकण्यासाठी पायऱ्यांवर बसून होते.

निखिल वागळे आपल्या दीड तासाच्या तडाखेबंद भाषणात म्हणाले, ‘‘ज्या मातीवर उभे राहून भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासोहब आंबेडकर यांनी ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही’ अशी ऐतिहासिक घोषणा करून खळबळ उडवून दिली होती; त्या ऐतिहासिक अशा मुक्तिभूमीवर मी उभा आहे, याची मला जाण आहे. या घोषणेने देशाला हादरा बसला. मात्र त्यांची घोषणा म्हणजे हिंदू धर्माला आव्हान नव्हते; तर पिढ्यान्‌पिढ्या दबलेल्या, अन्याय सहन केलेल्या आणि शोषणाचे बळी ठरत असणाऱ्यांचा तो हुंकार होता, हे आपण समजावून घेतले की धर्मनिरपेक्षता, मानवतावाद म्हणजे नेमके काय, हे आपल्या लक्षात येईल. युरोपमध्ये सेक्युलॅरिझम हा शब्द निधर्मीवाद, नास्तिकता या अर्थी वापरला जातो. भारतातील धर्मनिरपेक्षता म्हणजे शिवाजीमहाराजांनी शिकविलेला सर्वधर्मसमभाव आणि तसाच अर्थ इथल्या संविधानालादेखील अभिप्रेत आहे. प्रत्येकाला आपल्या धर्माप्रमाणे उपासना करण्याचा अधिकार आपल्या घटनेने दिला आहे. काही मंडळींचे हिंदू राष्ट्र आणि छत्रपतींचे हिंदवी स्वराज्य यात मोठे अंतर आहे.

हिंदू राष्ट्र म्हणजे पेशवाई आणि हिंदवी स्वराज्य म्हणजे रयतेचे, अठरापगड जाती-धर्मांतील सामान्य माणसांचे अधिकार अबाधित ठेवणारे राज्य! इतकी त्यात स्पष्टता आहे. मनुस्मृतीच्या आधारावर स्थापन झालेली पेशवाई जाती-धर्माच्या विषमतेवर आधारित होती. अशा उच्च-नीचतेची पाठराखण करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे केवळ प्रकांडपंडित, नव्हतेच तर ते एक थोर मानवतावादी महामानव होते. शिवाजीमहाराजांना अभिप्रेत असलेले रयतेचे राज्य सांविधानिक मार्गाने आणण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. ‘‘मनुवादी इतिहासकारांनी छत्रपती शिवाजीमहाराजांना गोब्राह्मण प्रतिपालक म्हणून रंगवले. खोटा इतिहास सांगितला. चूक त्यांची नाहीय, चूक तुमची-आमची आहे. पोवाडे म्हणणाऱ्या कलाकारांना इतिहासकार म्हटल्याने गोंधळ झाला आहे. खोट्या इतिहासकारांना  मनोरंजनाच्या पलीकडे मानू नये, त्यांच्या स्वयंघोषित इतिहासगिरीला आपण नवा इतिहास लिहून उत्तर दिले पाहिजे. पानसरे, शेजवलकर यांनी खरा इतिहास सांगितला. गोविंदराव पानसरेंचे ‘शिवाजी कोण होता?’ हे 70 पानी पुस्तक घराघरांत पोचले पाहिजे.

‘‘नारायण मेघाजी लोखंडे आद्य समाजसुधारक होते, मात्र समाजसुधारक म्हणून तुमच्या-आमच्यासमोर टिळक व आगरकर आणले जातात. पण ज्यांनी केशवपन प्रथेविरुद्ध नाभिकांचा संप घडवून आणला, ते नारायण मेघाजी लोखंडे सांगितले जात नाहीत. ‘‘ दि.1 जानेवारी 2018 पासून मी अस्वस्थ आहे. आजवर या देशात धर्माच्या नावाखाली दंगली घडवल्या गेल्या, पण भीमा कोरेगावला 1 जानेवारीला झालेल्या घटनेमुळे महाराष्ट्रात सर्वांत मोठ्या असलेल्या समाजात आणि डॉ.बाबासाहेब यांच्या अनुयायांत दंगल घडवून दोन्ही समाज कायमचे कसे दुभंगले जातील आणि त्यातून राजकीय पोळी कशी भाजून घेता येईल, याचा डाव मनुवादी शक्तींनी रचला होता. मनुवादी वृत्ती म्हणजे माझाच धर्म, वर्ण किंवा जात श्रेष्ठ!

आता तर मनुवादी शक्ती या केवळ एका जातीपुरत्या मर्यादित राहिल्या नसून बहुजन समाजातही ही मनुवादी वृत्ती ठासून भरली आहे. शरदराव पवार आणि प्रकाश आंबेडकर या दोघांनी वेळीच हस्तक्षेप करून या दोन प्रमुख जाती एकमेकांविरुद्ध संघर्ष करणार नाहीत. याची जी काळजी घेतली त्याबद्दल या दोघांचेही मी महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने जाहीर आभार मानतो.

‘‘पुण्यातील आयटीमध्ये काम करणाऱ्या तरुणाची क्रूर हत्या झाली; कोण पुढे आले? सरकारचा उन्माद जनतेतही उतरला आहे. पुण्यात डॉ.बाबा आढाव यांच्यासारख्या 85 वर्षे वयाच्या वयोवृद्ध व्यक्तीला मोर्चा काढावा लागला. मोर्चाला सुसंस्कृत पुण्यातील किती लोक आले? लोक भीतीखाली आहेत, सरकार विरोधात ब्र काढण्याची हिंमत उरलेली नाही. मात्र सर्वसामान्य जनतेच्या आवाजात जी ताकद असते, त्याची जाणीव करून घ्या आणि निर्भीडपणे बोला. अन्याय- अत्याचाराविरोधात न बोलणारे अन्याय करणाऱ्याइतकेच दोषी असतात याचे सतत भान असू द्या.”

‘‘दाभोलकर गेले, पानसरे गेले, कलबुर्गी गेले, गौरी लंकेश गेल्या! चार जण गेल्यामुळे जनतेचा आवाज दाबला जातो असे ज्यांना वाटत असेल, ते भ्रमात आहेत. या चार जणांचे 4000 होतील आणि धर्मवादी वर्णवर्चस्ववादी सरकारला गाडून टाकतील. हे सरकार जाईल व नवे सरकार येईल. सरकार कोणाचेही येवो, आमचा आवाज दबू देणार नाही. आणि म्हणून छत्रपती शिवरायांच्या आणि महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी म्हणविणाऱ्या युवकांनी या झुंडशाहीविरुद्ध मशाली पेटविल्याखेरीज उन्माद थांबणार नाही. चला आता पुन्हा एकदा मशाली पेटवू या!’’

या शिवराय ते भीमराय संयुक्त जयंती उत्सव समितीच्या कार्यक्रमात मा.आ.मारुतीराव पवार, सहकार नेते अंबादास बनकर, ज्येष्ठ उद्योगपती सुशीलभाई गुजराथी, सुभाषराव पाटोळे, ॲड.दिलीप कुलकर्णी, भागवतराव सोनवणे, महेंद्र पगारे, पत्रकार दत्ता महाले, विठ्ठल शिंदे, संजय पगारे, प्राचार्य भाऊसाहेब गमे, डॉ.सुरेश कांबळे, सलीम काझी, सुदाम पडवळ, शुद्धोधन तायडे, राकेश गिरासे, सुनील गायकवाड, भाऊसाहेब अहिरे, आदी आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात शरद शेजवळ यांच्या ‘दोनच राजे इथे जन्मले या कोकण पुण्य भूमीवर, एक रायगडावर एक चवदार तळ्यावर...’ या प्रसिद्ध पोवाड्याने झाली.

Tags: इतिहास लोकजागर निखील वागळे लोकजागर अभियान eitihas lokjagar abhiyan nikhil wagale lokjagar abhiyan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके