डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

शेरलॉक होम्सनं सोडवलेल्या अनेक समस्यांच्या कथांचा पट वाचकांसमोर उलगडल्याविना राहवत नाही. त्यांच्या अनेक रहस्यकथांचा आवाका वाचकांपर्यंत पोचावा व त्यातून आर्थर कॉनन डॉयल यांच्या अंतरंगाच्या एका खुबीला स्पर्श करावा असंही वाटलं. डॉयल यांचा स्वभाव पाण्यासारखा होता. जिथं जातील तिथल्या समस्यांविषयी त्यांना रस वाटायचा. कोणी एखादं पत्र पाठवावं, वर्तमानपत्रात अन्यायाला वाचा फोडणारी एखादी बातमी छापून यावी अन् आर्थर यांनी त्यात लक्ष घालावं, असं अनेकदा घडलं आहे. शेरलॉक होम्सच्या कथांतून अनेकदा या प्रवृत्तीचं प्रतिबिंब आपल्याला दिसतं.

सर आर्थर कॉनन डॉयल आणि  शेरलॉक होम्स - एकमेकांत मिसळून गेलेली दोन व्यक्तिमत्त्वं. एक खरं, एक काल्पनिक, पण ही काल्पनिकता पचनी पडू नये इतकी बेमालूमपणे सत्यात मिसळलेली. सुरुवातीला वाचत गेले तेव्हा वाटलं, हे कसं काय झालं? माणसांना इतकं साधं पटू नये? कळू नये? कल्पनेला वास्तव म्हणून उराशी धरून मेलेल्याला जिवंत करण्याचा अगदी शहाण्यासुरत्या माणसांनी इतका अट्टाहास कराया? त्यासाठी रस्त्यावर उतरावं? पण जसजशी शेरलॉक होम्सच्या कथाविश्वाचा धांडोळा घेत गेले तसतसं वाटायला लागलं, शहाण्यासुरत्या माणसांना वेड लागावं असं काहीतरी या कथांमध्ये आहे एवढं खास. आर्थर कॉनन डॉयल यांनी शेरलॉक होम्सच्या माध्यमातून अनेकविध विषयांना किती सहज स्पर्श केला आहे! विविध सामाजिक समस्यांची अतिशय आत्मीयतेनं हाताळणी केली आहे. कितीतरी कथानकांतून शेरलॉक होम्सनं लोकांच्या दुखऱ्या जागांना हळुवारपणे स्पर्श करत त्या त्या प्रश्नांची उकल समर्थपणे करून त्यांना दिलासा दिला असणार. संकटात, गोंधळून गेले असताना आपल्या सोबत कोणीतरी आहे, ही भावनाच किती आश्वासक असते! 

म्हणूनच दोन लेख लिहिले असतानाही शेरलॉक होम्सनं सोडवलेल्या अनेक समस्यांच्या कथांचा पट वाचकांसमोर उलगडल्याविना राहवत नाही. त्यांच्या अनेक रहस्यकथांचा आवाका वाचकांपर्यंत पोचावा व त्यातून आर्थर कॉनन डॉयल यांच्या अंतरंगाच्या एका खुबीला स्पर्श करावा असंही वाटलं. डॉयल यांचा स्वभाव पाण्यासारखा होता. जिथं जातील तिथल्या समस्यांविषयी त्यांना रस वाटायचा. कोणी एखादं पत्र पाठवावं, वर्तमानपत्रात अन्यायाला वाचा फोडणारी एखादी बातमी छापून यावी अन् आर्थर यांनी त्यात लक्ष घालावं, असं अनेकदा घडलं आहे. शेरलॉक होम्सच्या कथांतून अनेकदा या प्रवृत्तीचं प्रतिबिंब आपल्याला दिसतं. म्हणूनच त्यांच्या काही कथांचे स्वैर अनुवाद करावेत असं वाटतंय. ‘द अॅडव्हेंचर ऑफ ….’ मध्ये सोल्जर जॉन डॉड शेरलॉक होम्सशी संपर्क साधून त्याला युद्धात जखमी झालेल्या आपल्या मित्राविषयी माहिती देतो. गॉडफ्रे एम्सबर्थ हा त्याचा मित्र लढाईत जखमी झालाय हे डॉडला माहीत असतं. पण त्याचा ठावठिकाणा शोधण्यासाठी डॉड गॉडफ्रेच्या वडिलांजवळ चौकशी करतो तेव्हा त्याला त्यांच्याकडून फारच उडवाउडवीची उत्तरं मिळतात.

नाइलाजानं डॉड गॉडफ्रेच्या आईला गाठतो. पण तिच्याशी बोलत असतानाच अचानक डॉडला गॉडफ्रे त्याच घरात वावरतोय, असा भास होतो. जे काही डॉडला दिसतं त्यावरून गॉडफ्रे पांढराफटक पडलाय एवढं त्याला नक्की समजतं. सावकाशीनं शोध घेत असता गॉडफ्रेला त्याच्याच घरात अडकवून ठेवलंय याची डॉडला खात्री होते. खुद्द आईवडिलांनीच मुलाला तळघरात अडकवून ठेवावं याचं नवल वाटून शेरलॉक होम्स या केसमध्ये लक्ष घालतो व डॉडसमवेत गॉडफ्रेच्या घराच्या आसपास मुक्काम ठोकतो. या मुक्कामी तो अनेकांशी जवळीक साधतो. त्यातूनच ‘एक माणूस’ (ले प्रसी) एवढाच शब्द लिहिलेला कागद होम्सकडे पोचवतो. सुतावरून स्वर्ग गाठणा-या होम्सला एवढी सूचना पुरेशी असते. गॉडफ्रेच्या आईवडिलांचं मन वळवून तो खरी गोष्ट जाणून घेतो. लढाईत जखमी झालेल्या गॉडफ्रेला एका कुष्ठरोगाच्या रुग्णालयात चुकीनं भरती केलं जातं. तिथं उपचार घेऊन गॉडफ्रे परत येतो. परंतु त्याच्या अंगावर पांढरे चट्टे उठायला सुरुवात होते. समाज वाळीत टाकेल या भीतीनं गॉडफ्रेचे आईवडीळ त्याला तळघरात दडवून ठेवतात. हे सारं समजल्यावर होम्स नेटानं कामाला लागतो. कुष्ठरोग्यांच्या विषयात तज्ज्ञ समजल्या जाणान्या सर जेम्स साँडर्स या मित्राशी संपर्क साधून साँडर्स गॉडफ्रेच्या घरी येतील अशी व्यवस्था होम्स करतो. 

साँडर्सही आपल्या मित्राची विनंती मान्य करून गॉडफ्रेची गाठ घेऊन त्याला तपासतात व घाबरण्याचं कारण नाही, असा निर्वाळा देतात. गॉडफ्रेला झालेला रोग कुष्ठरोग नसतो व भविष्यात तो बरा होण्यास काहीच प्रत्यवाय नसतो. या कथेत फार गुंतागुंतीचे रहस्य होम्सला सोडवावं लागत नाही. परंतु होम्स या प्रकरणात सामाजिक भावनेनं खूप रस घेतो. यात त्याला फीचीही अपेक्षा नसते. देशासाठी लढणाऱ्या एका सैनिकाला आयुष्यात उभं राहण्यासाठी मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे, असं तो समजतो. ‘दी अॅडव्हेंचर ऑफ द रिटायर्ड कलरमन’ यात शेरलॉक होम्सनं आपल्या कारकिर्दीत प्रेमाच्या त्रिकोणाची अनेक रहस्यं सोडवली आहेत. प्रस्तुत कथाही त्यांपैकीच एक आहे. जोसी अँबली हा रंगाचं उत्पादन करणारा एक यशस्वी उद्योजक असतो. नुकतीच त्यानं आपल्या व्यवसायातून सेवानिवृत्ती स्वीकारलेली असते. प्रौढत्वाकडे झुकलेला हा गृहस्थ मात्र आपल्यापेक्षा वयानं तीस वर्षांनी लहान असलेल्या एका तरुणीशी लग्न करतो. होम्सकडे अँबली येतो तेव्हा त्याची मनःस्थिती फार चमत्कारिक झालेली असते. गेले काही महिने आपली पत्नी बुद्धिबळाच्या खेळातल्या पार्टनरच्या फार जवळ जाते आहे, असा संशय अँबलीच्या मनात बळावत असतो. या विषयात काय करावं याबद्दल संभ्रमित अवस्थेत असतानाच अचानक अँबलीची पत्नी त्याचे बरेचसे पैसे घेऊन नाहीशी होते. अँबली होम्सजवळ, ती आपल्या प्रियकरासोबत पळून गेली असावी असा संशय व्यक्त करतो. 

चौकशीच्या पहिल्या फेरीत होम्स डॉ. वॉटसन या आपल्या जीवश्च-कंठश्च मित्राला अँबलीच्या घरी पाठवणं पसंत करतो. वॉटसन अँबलीच्या धराला भेट देतो. परंतु रंगाच्या अतिशय उग्र वासाखेरीज वेगळं असं काहीही त्याच्या निदर्शनाला येत नाही. तिस-या दिवशी अँबली घाईघाईनं होम्सच्या ऑफिसमध्ये येतो. इसेक्समधील एका छोट्या गावातून आलेली तार त्याच्या हातात असते. या तारेत ‘अँबलीनं ताबडतोब तिथं पोहोचा,’अशी सूचना केलेली असते. अँबली होम्सचा सल्ला विचारतो. होम्स अँबलीला त्या गावात जाऊन काही सुगावा लागतो का, हे पाहण्याचा सल्ला देतो. सोबत हवी असल्यास डॉ. वॉटसनला बरोबर घेऊन जायला काहीच हरकत नसल्याचंही सुचवतो. अँबलीला होम्सचा सल्ला पटतो व दुसन्याच दिवशी डॉ. वॉटसनला घेऊन तो गावाला  रवाना होतो. तिसऱ्या दिवशी अँबली व डॉ. वॉटसन परततात. तावातावानं अँबली होम्सला, ती तार म्हणजे दुसरं तिसरं काही नसून कोणीतरी आपली फिरकी घेतल्याचं सांगतो. या वेळी होम्स मात्र अगदीच वेगळ्या मूडमध्ये असतो. तो अँबलीवर त्याच्या बायकोचा व तिच्या मित्राचा खून केल्याचा आरोप करतो. अँबली आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. पण तो फसतो व त्याला अटक होते. होम्सच्या हुशारीचा प्रत्यय या प्रकरणात प्रकर्षानं येतो. डॉ. वॉटसननं उग्र वासाच्या रंगाचा उल्लेख करताच होम्सचं विचारचक्र फिरू लागतं. अँबलीच्या घराची झडती त्याच्या गैरहजेरीत घ्यायची असं ठरवून होम्स त्याला एक खोटी तार धाडतो. अँबली होम्सच्या या डावाला बळी पडतो. अँबली व डॉ. वॉटसन यांची अशा प्रकारे रवानगी केल्यावर होम्स तातडीनं अँबलीचं घर गाठतो. घराची झडती घेताना होम्सला एका खोलीत भिंतीच्या खालच्या भागावर कोणीतरी काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केल्याचं आढळतं. त्या लिखाणावरून काही बोध होत नसला तरी भिंतीच्या अगदी खालच्या भागावर लिहिण्याची धडपड कोणीतरी का केली असावी, असं वाटून होम्सचा संशय बळावतो. 

तपासाअंती ती रूम कडेकोटानं बंद आहे व एक गॅसपाइप त्या खोलीत आल्याचं होम्सला आढळतं. गॅसचा वास नष्ट होण्यासाठी खोलीला उग्र वासाचा रंग दिल्याचं अनुमान होम्स काढतो. सरतेशेवटी दोन्हीही मृतदेह एका वापरात नसलेल्या विहिरीत सापडतात. अशा तन्हेनं अँबलीनं आपल्या पत्नीचा आणि तिच्या मित्राचा खून करून आपल्यावरचं बालंट दूर करण्याचा प्रयत्न केल्याचं उघडकीला घेतं. होम्सनं हाताळलेल्या या प्रकरणात, त्याचे अगदी एखाद्या मुद्दयावरून अंतिम निष्कर्षाप्रत येण्याचे कौशल्य वादातीत असल्याचं कबूल करावं लागतं. अँबलीनं आपली पत्नी पळून गेली आहे अशी दिशाभूल करणारी माहिती होम्सला दिली तरी त्याची त्यामुळे यत्किंचितही दिशाभूल होत नाही. पण तरीही समीक्षक या कथेतील एका कच्च्या दुव्यावर नेमकं बोट ठेवतात. खुनाचा उलगडा करण्याच्या नादात होम्स प्रेतांच्या कपड्यांत एखादी पेन्सिल सापडण्याची शक्यता सूचित करतो. पण खोलीच्या भिंतीच्या खालच्या भागावर लिहिणारा माणूस गॅसमुळे बेशुद्ध होण्याच्या बेतात असताना आणि खुनाचा सुगावा लागावा म्हणून ते लिहीत असताना पेन्सिल परत आपल्या खिशात ठेवेल हे अजिबात संभवत नाही, असं होम्सच्या टीकाकारांचं म्हणणं आहे. या टीकाकारांच्या मते बेशुद्ध पडताना त्या व्यक्तीच्या हातून ती पेन्सिल खालीच पडणार व अँबली किंवा होम्सच्या नजरेस पडणार हे निश्चित.

 या टीकाकारांनी होम्सच्या चाणाक्षपणाचं, तीव्र निरीक्षणशक्तीचं कौतुक करीत असतानाच होम्सच्या हातून या अशा सामान्य चुका व्हाव्यात, याविषयी आश्चर्य व्यक्त केलं आहे. शेरलॉक होम्सनं आपल्या कारकिर्दीत वैवाहिक जीवनात तिसरं माणूस (प्रियकर किंवा प्रेयसी) आल्यानं उद्भवलेल्या अनेक रहस्यांचा यशस्वीरीत्या छडा लावला आहे. दुर्दैवानं आज शेरलॉक होम्सच्या जनकाच्या संदर्भात अगदी याच प्रकारचा संशय व्यक्त केला जात आहे. सर आर्थर कॉनन डॉयल यांची सर्वांत प्रसिद्धीचा उच्चांक गाठलेली कथा ‘द हाउंड ऑफ बास्करव्हिले’ ही त्यांच्या मित्राने लिहिलेल्या 'द हाउस ऑफ बास्करव्हिले' या कवितेची उचलेगिरी आहे, एवढंच नव्हे तर या मित्राच्या पत्नीशी डॉयल यांचे प्रेमसंबंध होते व तिच्याच मदतीनं आपल्या मित्राचा काटा काढून त्याची कथा डॉयल यांनी चोरली, असा आरोप डॉयल यांच्या मृत्यूनंतर सत्तर वर्षांनी केला जातो आहे. डॉयल यांच्या हितचिंतकांनी हे आरोप अगदी बिनबुडाचे असल्याचे सांगून त्यांच्या विरुद्ध लढण्याचा निर्धार केला आहे. पण डॉयल यांचा मानसपुत्र आज जिवंत असता तर आपल्या मानसपित्यावरच्या आरोपांचं खंडन त्यानं कसं केलं असतं, असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही. 

‘द फायनल प्रॉब्लेम’ मध्ये होम्स एका गुन्हेगारी टोळीचे अचूक धागेदोरे शोधतो. त्याच्या अविरत परिश्रमांमुळे ती संपूर्ण टोळी पोलिसांच्या हाती लागेल व त्यांच्या प्रमुखाला फाशीची शिक्षा होईल अशी शक्यता निर्माण होते. त्यामुळे या टोळीकडून होम्सला जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागतात. होम्स वॉटसनला या टोळीचा पुरेपूर निकाल लागेपर्यंत आपल्या बरोबर लांबच्या प्रवासाला येण्याची विनंती करतो. ती मान्य करून दोघेही जण लांबच्या प्रवासाला निघतात. टोळीच्या प्रमुखाला याचा सुगावा लागताच तो त्यांचा पाठलाग करतो, परंतु त्यांच्या हातावर तात्पुरती तुरी देण्यात दोघेही यशस्वी ठरतात. पण काही अनपेक्षित घटना घडून ही गुन्ह्यांचा उच्चांक गाठलेली टोळी आपल्याला अटक होऊ देत नाही. होम्सला हे समजताच आपला जीव आत्यंतिक धोक्यात आहे हे लक्षात येऊन तो त्वरेनं स्वित्झर्लंडला जायला निघतो. परंतु वाटेतच एका धबधव्यानजीक होम्सची आणि त्याच्या शत्रूची गाठ पड़ते. वॉटसनला कोणत्यातरी निमित्तानं हॉटेलवर परतावं लागतं.

वॉटसन धबधब्यापाशी परततो तेव्हा एक फडफडणारा कागद जणू त्याची वाट पाहतो आहे असं त्याला दिसतं. त्या पत्रात होम्सनं गुन्हेगारी जगताच्या त्या अनभिषिक्त सम्राटाशी लढण्यासाठी आपण सज्ज झाले आहोत, असं लिहिलेलं असतं. मात्र आजूबाजूला कुठंच होम्सचा ठावठिकाणा न लागल्यानं जीवनमरणाच्या त्या लढ्यात दोघांचाही अंत झाला असावा असा निष्कर्ष वॉटसन काढतो. 'द फायनल प्रॉब्लेम' या कथेद्वारे डॉयल यांनी अगदी अचानक आपल्या मानसपुत्राचा अंत केला. अर्थात लोकाग्रहास्तव त्यांना आपला हा निर्णय बदलावा लागला, ही गोष्ट वेगळी. पण ‘फायनल प्रॉब्लेम' या कथेतून डायल यांनी होम्सची ध्येयनिष्ठा रंगवली आहे. ‘या जगाला सुधारण्याचा सर्वांत उत्तम उपाय म्हणजे गुन्हेगारी जगताला नष्ट करणे,’ असा शेरलॉक होम्सचा अढळ विश्वास होता. त्यासाठी स्वतःचा प्राण द्यायलाही तो तयार असे. जग अधिक सुखी व्हावं, आनंदी राहावं, यासाठी होम्सनं आपले प्राण दिले; असा उदात्त संदेश 'द फायनल प्रॉब्लेम’ या कथेतून डॉयल यांनी दिला.

या कथेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वॉटसनला होम्सविषयी वाटणारा आत्यंतिक जिव्हाळा. होम्सचा मृत्यू वॉटसनच्या जिव्हारी लागतो आणि त्याचं सारं भावजीवनच खिन्न होऊन जातं. त्याचं पुढचं आयुष्य शुष्क होतं. होम्स आणि वॉटसन यांचा आंतरिक जिव्हाळा, त्यांनी परस्परांवर केलेलं निरतिशय प्रेम वाचकांच्या हृदयाला स्पर्श करून जातं. एखाद्या स्त्रीनं पतिनिधनांतर दुसरा विवाह केल्यास पहिल्या विवाहातील मुलांच्या संगोपनाचा, मालमत्तेच्या हक्कांचा किंवा भावनिक सुरक्षेचा प्रश्न उभा राहू शकतो…. हे लक्षात घेऊन होम्सनं अशा प्रकारच्याही समस्यांना हात घालून मुलांना न्याय मिळवून दिला आहे. संपूर्ण एकांतवासाचे विलक्षण आकर्षण डॉयल यांना वाटत असावे. होम्स एकांडा शिलेदार होता. कामाच्या स्वरूपामुळे आपण आपल्या पत्नीला न्याय देऊ शकणार नाही असं वाटून तो शेवटपर्यंत एकटाच राहिला. पण एकांतवासाची परिणती काही प्रमाणात एकाकीपणात होऊ शकते याचं भान डॉयल यांना होतं. त्यामुळे इतका शहाणा होम्स कित्येकदा व्यसनांच्या आहारी, विशेषतः मादक पदार्थांच्या आहारी जातो की काय, अशी शंका वाचकांच्या मनात निर्माण होते. परंतु एखादी नवी केस आली की व्यसनांचा हा बागुलबुवा कुठल्या कुठे पळून जातो अन् नवीन उत्साहानं होम्स समोर आलेल्या प्रश्नांशी दोन हात करायला सज्ज होतो. आयुष्याच्या उत्तरार्धात होम्सला युद्धामुळे, औद्योगिकीकरणामुळे आसपासचं जीवन अतिशय आत्मकेंद्रित होत चालल्याची जाणीव झाली आहे. म्हणूनच तो डॉ. वॉटसन या आपल्या परममित्राला 'या विलक्षण वेगानं बदलणा-या जगात ‘‘तूच काय तो एकटा अटळ ताऱ्यासारखा राहिला आहेस',’’ असं म्हणतो. सर आर्थर कॉनन डॉयल यांचा शेरलॉक होम्स हा मानसपुत्रही दीर्घकाळ रसिक वाचकांच्या मनात अढळ ताऱ्याप्रमाणे राहणार यात कोणतीच शंका नाही, आजूबाजूची परिस्थिती अतिशय अस्थिर बनते तेव्हा अशा काही अढळ ता-यांची फार जरुरी असते असं नाही तुम्हांला वाटत?
 

Tags: वॉटसन शेरलॉक होम्स आर्थर कानन डॉयल रहस्यकथा परीक्षण रेणू गावस्कर wotson. Sherlock holmes arther connan duyal mystery report renu gavaskar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके