डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आदिवासींना संघटित करणाऱ्या कष्टकरी संघटनेची पंधरा वर्षे

कष्टकरी संघटना ही ठाणे जिल्ह्यातील विशेषतः डहाणू आणि तलासरी भागातील आदिवासींची बलशाली संघटना आहे. प्रदीप प्रभू आणि त्यांच्या पत्नी सिराज बलसारा यांनी तळागाळाच्या आदिवासी कार्यकत्यांना संघटित, प्रशिक्षित आणि बोलके करून संघर्षासाठी सिद्ध करताना त्यांना पोलिसांचा, जमीनमालकांचा, व्यापाऱ्यांचा आणि मुख्य म्हणजे प्रतिस्पर्धा मार्क्सवाद्यांचा फार विरोध झाला.

स. न. वि.वि. आमच्या येथे आमची कष्टकरी संघटना हिचा 15 वर्षाचा उत्सव गुरुवार दि. 23/12/93 रोजी दुपारी 3 वाजताचे शुभ मुहूर्तावर करण्याचे योजिले आहे. तरी आपण या मंगलसमयी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून, संघटनेस शुभाशीर्वाद द्यावेत ही नम्र विनंती. आपले नम्र, काळूराम धांगडा.... आणि समस्त कष्टकरी संघटना परिवार मिरवणूक : गुरुवार 23/12/93 ला दुपारी 1 वाजता. उत्सव स्थळ डहाणू. उत्सव मुहूर्त गुरु. 23/12/93 दुपारी 2 वाजता.

विवाहाच्या निमंत्रण पत्रिकेच्या धर्तीवर कष्टकरी संघटनेची पंधरा वर्षे पुरी झाली म्हणून बोलावलेल्या आनंदोत्सवाची ही निमंत्रण पत्रिका, पत्रिकेच्या डाव्या उजव्या बाजूला आदिवासी कलेचे सुंदर नक्षीकाम होते.

कष्टकरी संघटना ही ठाणे जिल्ह्यातील विशेषतः डहाणू आणि तलासरी भागातील आदिवासींची बलशाली संघटना आहे. प्रदीप प्रभू आणि त्यांच्या पत्नी सिराज बलसारा यांनी तळागाळाच्या आदिवासी कार्यकत्यांना संघटित, प्रशिक्षित आणि बोलके करून संघर्षासाठी सिद्ध करताना त्यांना पोलिसांचा, जमीनमालकांचा, व्यापाऱ्यांचा आणि मुख्य म्हणजे प्रतिस्पर्धा मार्क्सवाद्यांचा फार विरोध झाला. प्रसंगी मारही खावा लागला,  पण त्यांनी हिंमत सोडली नाही. आज डहाणू तलासरी भागात आदिवासींमध्ये कष्टकरी संघटनेचे वजन आहे. प्रदीप प्रभू हे सर्वच सी.आय.ए.चे एजंट आहेत इथपासून ते नक्षलवादी आहेत आणि त्यांवा शस्त्रे बनविन्याचा गुप्त कारखाना आहे असे आरोप त्यांच्यावर झाले. पण आदिवासी भूमिहीनांनी आणि अल्पभूधारकांनी त्याला भीक घातली नाही आणि संघटनेच्या झेंडयाखाली ते निर्धाराने उभे राहिले.

आनंदोत्सवाच्या दिवशी डहाणू महामार्गावरून सुमारे पाच सहा हजार स्त्री-पुरुष नटून थटून मिरवणुकीने गावात आले आणि तेथे मिरवणुकीचे मोठ्या जाहीर सभेत रूपांतर झाले. कालूराम धांगडा यांनी पंधरा वर्षाच्या कामाचा आढावा घेतला. आनंदोत्सवानिमित्त तयार करण्यात आलेल्या या पुस्तिकेत कष्टकरी संघटनेच्या स्थापनेच्या वेळी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा उल्लेख आहे. त्यातील काही ठळक असे : कष्टकरी संघटना लढाऊ बाण्याची असून जनसामान्यांनी आपल्या हक्कांसाठी झगडावे यासाठी ती त्यांचे संघटन करीत. जनतेने उभ्या केलेल्या निधीवर ती आपला निर्वाह करील. ती लोकांच्या पाठिंब्यावर उभी राहील व शासनाकडे, सोसायटी, इस्ट वा कामगार संघटना म्हणून नोंदणी करून मान्यता मिळवणार नाही. न्यायाचा तराजू धरणारी वळलेली मूठ हे संघटनेचे प्रतीक असेल.

सावकारी विरुद्ध संघर्ष, सावकारांनी आदिवासींच्या माह, पिके इत्यादी जप्त केलेली मालमत्ता लोकन्यायालयातील निर्णयांनी परत मिळवणे पडीक जंगल जमीन लागवडीखाली आणून ती नियमित करण्यासाठी सदा, लाकूड कंत्राटदारांच्या बेकायदा लाकूडतोडी विरुद्ध आंदोलन, जंगलातील छोट्या उत्पादनावर, स्वतःच्या निकडीच्या गरजा व उदरनिर्वाहासाठी लागणारा मौळीभर छायफाटा यावर आदिवासीचा अधिकार आहे या भूमिकेचा आग्रह हस्तांतरित जमिनीचा पुन्हा ताबा घेणे, जंगलजमीन व सरकारी पडीक जमीन यावरील अतिक्रमणे निर्मित करणे... सारांश, आदिवासींना आत्मसन्मानाची वागणूक मिळेल आणि त्यांच्या अस्तित्वाच्या हक्काची बूज राखली जाईल या मध्यवर्ती प्रेरणेने संघटना कार्यशील राहिली आणि म्हणूनच आदिवासींचा विश्वास संपादन करू शकली.

कष्टकरी संघटनेने स्त्रियांच्या प्रश्नांचीही वेगळी दखल घेतली. दारूविरुद्ध संघर्ष, नक्की मार खाणार नाही हा निर्धार, घरगुती भांडणांशी सर्व स्त्रियांनी एकत्र येऊन सामना देणे, लैंगिक शोषण व अत्याचारांविरुद्ध लढा... अशा विविध लढ्यासाठी आदिवासी स्त्रियांनी तयार व्हावे म्हणून संघटना प्रयतनशील राहिली. उदरनिर्वाहाचे संघर्षही संघटनेने छेडले, काही स्वबळावर तर, काही समविचारी संघटनांच्या सहकार्याने शेतमजुरांचे किमान वेतन, रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी हंगामी शेतमजूर, गवतकापणी करणारे मजूर, वीटभट्टी, मिठागरे बांधकाम, शेतीकामात काम करणारे व कामासाठी स्थलांतर करावे लागणारे कामगार हाताळले आणि त्यासाठी संघर्ष केले, या सर्वांचे वेतनाचे प्रश्न, संघटनेने हाताळले.

कालूराम धांगडा यांचे भाषण अंत:करणाचा ठाव घेणारे होते. त्यांनी सांगितले की पंधरा वर्षांच्या आंदोलनात संघटनेचे सात जण हुतात्मे झाले, दोन पोलिसांच्या गोळीबारात ठार झाले. तर बाकीचे पाच प्रतिनिधी मार्क्सवादी कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीमुळे मृत्यू पावले. कष्टकरी संघटनेने डहाणू तलासरी भागातील मार्क्सवादयांची मक्तेदारी संपवली आणि राजकीय साधन म्हणून आदिवासींना वापरण्याच्या मार्क्सवादी  नीतीला आव्हान दिले यात शंका नाही. संघटनेने आदिवासींना बोलके केले ते केवळ पोलीस, जमीनमालक, सावकार यांच्याविरुद्ध नव्हे तर आदिवासींचा पाठिंबा गृहीत धरून त्यांना राजकीय स्वार्थासाठी राबविणाऱ्या मार्क्सवादी पक्षाविरुद्धही. सुप्रियावर झालेल्या भीषण बलात्काराचा या संदर्भात काळूराम यांनी उल्लेख केला आणि ते म्हणाले की अशा घटनांनी आपल्याला राग आला नसता तर आपली संघटना काय कामाची?

या आनंदोत्सवाचे एक नजरेत भरेल असे वैशिष्ट्य असे की व्यासपीठावर संघटनेचा एकही कार्यकर्ता वा पदाधिकारी बसला नव्हता. व्यासपीठावर बसले होते ते बाहेरुन आलेले मित्र, पाहुणे आणि समविचारी संघटनांचे प्रतिनिधी. संघटनेचे कार्यकर्ते फक्त भाषण करण्यापुरते व्यासपीठावर यावयाचे. सात हुतात्म्यांच्या कुटुंबियांना पाहुण्यांच्या हस्ते संघटनेने अल्पसे आर्थिक साहाय्य दिले. त्या अल्प साहायाचे मोल केवढे मोठे होते याची जाणीव साहाय्याची पाकिटे स्वीकारणाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. संघटनेशी एकरूप आणि एकजीव झालेल्या सामूहिकतेचे हे आगळेवेगळे दर्शन होते. परीक्षेत यश संपादन केलेल्या आदिवासी मुलामुलींना बक्षिसे देण्यात आली. डहाणूमधील बिगर आदिवासी समाजाची ही भेट होती. त्या समाजाला कष्टकरी संघटनेचे मोल समजले होते.

आदिवासींना निर्भय आणि निर्भीड बनविणाऱ्या कष्टकरी संघटनेच्या नेत्यांना सत्ताधाऱ्यांनी गुंड आणि दहशतवादी ठरविले आहे. प्रदीप प्रभू आणि त्यांच्या पत्नी सिराज बलसारा यांना तडीपार करण्याचे प्रस्ताव पोलिसांनी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे पाठवले आहेत म्हणे. आपल्या पायाखालची वाळू सरकत असल्याने हताश झालेल्या मार्क्सवाद्यांचा तडीपारीच्या प्रस्तावाला पाठिंबा नव्हे, फूस असावी हे अतिशय गर्हणीय आहे.

Tags: डहाणू मार्क्सवादी   कष्टकरी संघटना Aadivasi #Weekly Sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके