डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कृत्रिम पद्धतीने भूगर्भजल साठे वाढविणे शक्य

मुक्त अर्थव्यवस्था आली आणि पर्यावरण, पाणी हे विषय मागे पडून आय.टी. उद्योग, मोठे प्रकल्प, मोठी अंदाजपत्रके यांमध्ये मोठी टक्केवारी आली आणि घात झाला. पाणलोट विकास, माती-पाणी-संवर्धन, वृक्षारोपण हे जसे कालबाह्य झाले, तसे शेतीच्या एनए प्लॉटींगने अक्राळविक्राळ रूप धारण केले. कोकणात जिथे आंबा, काजूच्या बागा उभ्या करण्यात आम्ही तांत्रिक मदत केली, त्या जागी फार्म हाऊस आणि जंगलात, उभ्या उतारावर जेसीबी आले. पावसाळ्यात ती माती नदीमार्गे समुद्राला जाते, जिला निसर्गात तयार व्हायला किमान 500 वर्षे लागली होती. मातीचा आधार गेला, झाडे पडायला लागली. टोलेजंग बंगले (ज्यांचा वापर वर्षातून तुरळक) उभे राहायला लागले, तेव्हाच कुठे तरी मनात पाल चुकचुकली, हा तर आत्मनाश. उजनी धरण 123 टीएमसी (महाराष्ट्रातील सर्वांत मोठे धरण) पूर्णक्षमतेने भरूनही कोरडे पडल्याचे छायाचित्र लोकसत्ता (3 जून) रोजी पाहिले आणि धस्स झाले.

दि.30 मार्च 2019 च्या साधना अंकात रत्नाकर पटवर्धन यांचा ‘महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर तोडगा’ हा लेख वाचला. महाराष्ट्रातील भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर त्यानी तो तळमळीने लिहिला हे जाणवते. त्यातील प्रतिपादनात काही तथ्ये आहेत. परंतु त्यातील भूजल आणि भूगर्भातील रचना, पाणी साठवणूक क्षमता याविषयीची माहिती अचूक नसून, ती वरवरच्या माहितीवर विसंबून लिहिली आहे असे वाटते.

‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ ही गोविंदाग्रज यांची कविता महाराष्ट्राचे भौगोलिक वर्णन करते; त्यातून हे राज्य पाण्याच्या बाबतीत टंचाईग्रस्त आहे, हा निष्कर्ष योग्य, पण तो फक्त सह्याद्रीपुरता आणि तोही फक्त डोंगरमाथ्यांना लागू पडतो. इतर विभाग जसे कोकण, खानदेश, मराठवाडा, विदर्भ या प्रदेशांना लागू पडत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. कोकणातील जांभा दगड ठिसूळ, सच्छिद्र असून, त्यात पाणी साठवून ठेवण्याची आणि अंतसरण प्रक्रियेवाटे भूगर्भात संक्रमित करण्याची त्याची क्षमता अफाट आहे. कोकण आजपर्यंत भूगर्भजलावर विसंबून होता, आजही आहे. या वर्षी रत्नागिरी, रायगडमध्ये काही भागात तीव्र पाणीटंचाई आहे, त्याची कारणे पुढे विषद केली आहेत.

भारतात सर्वांत जास्त मोठी धरणे महाराष्ट्रात असून, ती  सह्याद्रीच्या पायथ्याला आहेत. दोन्ही बाजूंनी कोकण, पश्चिम महाराष्ट्र आहे, त्यावर मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक इत्यादी शहरांची तहान भागते, तर धरणांपासून 250 किमीपर्यंतचा प्रदेश (कुकडी कालवा उदाहरण) कालव्यांनी सिंचित होत असल्याने, त्या प्रदेशातली भूगर्भजल पातळी संपृक्त असते. त्याचा प्रत्यय त्याच अंकातील अंकुश आवारे यांचा लेख वाचल्यास येईल. मुद्दा असा की, भूगर्भातील नैसर्गिक जलसाठ्याच्या मर्यादा लक्षात घेऊन विज्ञानाच्या आधारे त्यावर मात केली आहे.

आळेफाटा येथून महाराष्ट्र कमी पर्जन्यछायेचा प्रदेश सुरू होतो. तो नगर, पारनेर, पाथर्डी, माण, खटाव, आटपाडी, तासगाव असा विस्तृत होत विजापूरपर्यंत जातो. राळेगणसिद्धी, हिवरेबाजार हे याच बेल्टमध्ये येत असून, शास्त्रीय पद्धतीने नियोजन करून तेथील भूगर्भजल किती वाढले हे सर्वश्रुत आहे. रत्नाकर पटवर्धन प्रतिपादन करतात तसे ‘भूगर्भातील रचना माहिती नाही’, म्हणून नाही तर त्या ‘उपलब्ध माहितीचा अभ्यास करूनच’ हे झाले आहे. अंडरग्राउंड बंधारा ही पटवर्धन यांनी मांडलेली कल्पना राळेगणसिद्धी येथे 1990 मध्ये राबवली गेली आहे, त्याचा दृश्य परिणाम विहिरींची जलपातळी वाढण्यात दिसून येतो.

यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, भूगर्भात जलसाठा करण्यासारखी रचना आहे आणि पाऊस फार कमी झालेला नाही. तरीही सरासरीइतका पाऊस पडूनही उन्हाळ्यात टंचाई का होते? याचे कारण हजारो वर्षांचे पाण्याचे साठे प्रचंड गतीने उपसले जात आहेत, आणि भूगर्भजल पुनर्भरण तर नैसर्गिक गतीनेच होत आहेत. वाढती लोकसंख्या, शहरे, उद्योग, शेती यांच्यासाठी खोल विहिरी खोदून पाणी उपसण्याचे तंत्रज्ञान वाढत गेले, याचा हा एकत्रित परिणाम आहे. ही टंचाई सिंचनक्षेत्र नसलेल्या सगळ्या ठिकाणी तीव्र आहे. रत्नागिरी-रायगड जिल्ह्यात या वर्षी सरासरीइतका पाऊस पडूनही शेकडो गावे व वाड्या वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा होतोय, त्यालाही हेच कारण आहे. उदा. खात्यात जमा तेवढीच पण खर्चात वाढ, म्हणून इतरांकडून उसणे घेणे- तसे टँकर पाणीपुरवठा म्हणजे दुसरीकडून उसणे पाणी. आज सरकार खर्च करतेय एवढाच काय तो बदल.

रत्नाकर पटवर्धन म्हणतात त्याप्रमाणे काही ठिकाणी मात्र भूगर्भातील रचना अनुकूल नाही आणि पर्जन्यमानही कमी, तिथे पाणीटंचाई भयावह आणि ऑक्टोबरपासून टँकर हे सत्य आहे. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी महाराष्ट्रात पटवर्धन यांनी सुचविल्याप्रमाणे बोअर ब्लास्ट पद्धत वापरून ‘भूगर्भजल सर्व्हे आणि विकास संचालनालय, पुणे’ यांनी काही प्रमाणात यश मिळविले आहे. असे प्रयोग उंबरडा (जिल्हा यवतमाळ), भल (गुजरात) घोटकरवाडी (ता.अकोले, अहमदनगर), सरस्ते (तालुका पेठ, जि. नाशिक) आणि इतरही. हे सर्व प्रयोग ॠडऊअ भूगर्भजल सर्व्हे आणि विकास या विभागामार्फत केले गेले. पुण्यातील पाषाण येथील मैत्री पार्क येथेही हा प्रयोग यशस्वी झाला आहे.

बोअर ब्लास्ट पद्धत

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील मैत्री अव्हेन्यू, पाषाण येथे ही पद्धत अवलंबविली गेली. त्यात अस्तित्वात असलेल्या विहिरीच्या परिघात 15,21,33 आणि 42 मीटर खोलीपर्यंत बोअर घेतले, दोन बोअरमधील जागा हैड्रोफ्रॅक्टरिंग करून पोकळ केली तर जिथून भूगर्भजल बाहेर जात होते, ती सिमेंटने बुजवली. त्यानंतर बोअरची क्षमता तपासली ती पुढीलप्रमाणे वाढली-

3-7-90 । 160 लिटर/मिनिट
1-8-90 । 900 लिटर/मिनिट
16-8-90। 1300 लिटर/मिनिट

हैड्रोफॅक्टरिंग  (Hydro fracturing) :

असे काही प्रदेश आहेत की, तिथे उघडे बोडके खडक व तेही काळे, डेक्कन बेसाल्ट. उदा. घोटकरवाडी (ता.अकोले) येथे पाणलोट आधारित तत्त्वावर माथा ते विमोचकापर्यंत खडकात सुरुंग लावून कृत्रिम पोकळ्या निर्माण केल्या, त्या एकमेकांना त्याच पद्धतीने जोडल्या आणि त्यातील पाणी विमोचकापर्यंत येईल व तेथील विहिरीत उतरेल अशी रचना करून पिण्यासाठी पाण्याची सुविधा निर्माण केली गेली.

यात 56 सुरुंग पाच-सहा मीटर खोलीवर उडवले, त्यातून 15 लाख लिटर पाणीसाठवण क्षमता विकसित केली. त्यापैकी 50 टक्के विहिरींतून उपलब्ध होईल, असे गृहीत धरले म्हणजे 7.5 लाख लिटर. मार्च ते मेपर्यंत  150 माणसांना ते पुरेल अशी सोय त्यावेळी 50 हजार रुपयांत (1987) तयार करण्यात आली.

एके काळी महाराष्ट्रात पाणलोट विकास उपक्रम, ठिबकसिंचन पद्धत, वृक्षलागवड यांवर अनेक संस्था काम करीत होत्या. त्यात अण्णा हजारे, विलासराव साळुंखे, मोहन धारिया, वसंतराव गंगावणे (अमेरिकेतील सुखवस्तू नोकरी सोडून राजीव गांधी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आलेले) डॉ.लोहिया, निरीडचे डॉ.चित्रे, युसुफ मेहेरअली संस्थेचे जी.जी.पारीख असे अनेक लोक होते. अण्णा हजारे यांनी जर निव्वळ पाणलोटक्षेत्र विकासात काम केले असते तर ते नोबेल पारितोषिकपात्र झाले असते. या सगळ्यांसोबत चर्चा करण्याची संधी मला मिळाली. गंगावणे आणि निरीड यांच्यासोबत पालघर आदिवासी भागात काम करणाऱ्या संस्थेबरोबर पाणलोटक्षेत्र आराखडे तयार करण्यापासून निधी मिळविणे, प्रकल्प अहवाल लिहिणे आणि प्रत्यक्ष काम करणे इतकी संधी मिळाली. फार मूलभूत काम मध्य प्रदेश व आंध्र प्रदेशमध्ये त्या वेळी होत होते आणि महाराष्ट्र त्यात मार्गदर्शकाची भूमिका बजावत होता.

पण?

पण मुक्त अर्थव्यवस्था आली आणि पर्यावरण, पाणी हे विषय मागे पडून आय.टी. उद्योग, मोठे प्रकल्प, मोठी अंदाजपत्रके यांमध्ये मोठी टक्केवारी आली आणि घात झाला. पाणलोट विकास, माती-पाणी-संवर्धन, वृक्षारोपण हे जसे कालबाह्य झाले, तसे शेतीच्या एनए प्लॉटींगने अक्राळविक्राळ रूप धारण केले. कोकणात जिथे आंबा, काजूच्या बागा उभ्या करण्यात आम्ही तांत्रिक मदत केली, त्या जागी फार्म हाऊस आणि जंगलात, उभ्या उतारावर जेसीबी आले. पावसाळ्यात ती माती नदीमार्गे समुद्राला जाते, जिला निसर्गात तयार व्हायला किमान 500 वर्षे लागली होती. मातीचा आधार गेला, झाडे पडायला लागली. टोलेजंग बंगले (ज्यांचा वापर वर्षातून तुरळक) उभे राहायला लागले, तेव्हाच कुठे तरी मनात पाल चुकचुकली, हा तर आत्मनाश.

उजनी धरण 123 टीएमसी (महाराष्ट्रातील सर्वांत मोठे धरण) पूर्णक्षमतेने भरूनही कोरडे पडल्याचे छायाचित्र लोकसत्ता (3 जून) रोजी पाहिले आणि धस्स झाले. मनमाडला 18 दिवसांनी होत असलेला पाणीपुरवठा आता 30 दिवसांनी, तर केपटाऊनचा पाणीपुरवठा बंद, या बातम्या झोप उडवणाऱ्या आहेत. लोकसंख्या 133 कोटी, हे एक मुख्य कारण. प्रचंड काँक्रिटीकरण, रस्ते, घरे, मेट्रो, पूल इत्यादीसाठी प्रचंड पाणीवापर. तर भूगर्भातील पुनर्भणात व्यत्यय, हे सूक्ष्म पातळीवर घडत आहे आणि त्याचाही हातभार पाणीटंचाई तीव्र होण्यात आहे.

रत्नाकर पटवर्धन यांनी या विषयाला वाचा फोडली हे अभिमानास्पद आहे. या विषयावर जाणून घ्यायचे असेल तर 19-21 नोव्हेंबर 1990 या काळात ग्रामीण विकास मंत्रालय, महाराष्ट्र राज्य आणि भूगर्भजल सर्व्हे आणि विकास संचालनालय, यांनी आयोजित केलेल्या अखिल भारतीय परिषदेचे इतिवृत्त (938 पानी, इंग्रजीत असलेले) वाचावे. प्रस्तुत लेखातील प्रयोग या इतिवृतांतून घेतले आहेत.

सदर इतिवृत्त ‘संचालक, भूगर्भजल सर्व्हे आणि विकास संस्था, पुणे 411037’, येथे उपलब्ध होईल.

संदर्भ : Proceedings of All India Seminar on Modern Techniques of Rain Water Harvesting,held at Pune, November 19-21,1990

Tags: भूगर्भजल सर्व्हे आणि विकास संस्था भूजल सुखदेव काळे underground water artificial irrigation irrigation sukhdeo kale sukhdev kale weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके