डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने

गॉर्डियसच्या या जगप्रसिद्ध कथेवरून इंग्रजी भाषेत ‘गॉर्डियन नॉट’ म्हणजे अत्यंत अवघड गोष्ट. एखादा अत्यंत गुंतागुंतीचा जटिल प्रश्न असा वाक्प्रचार तयार झाला. मराठीत याच अर्थाने ‘ग्यानबाची मेख’ किंवा ‘नाथाच्या घरी उलटी खूण’ असे दोन वाक्प्रचार रूढ झाले आहेत. एखाद्या संकटातून बाहेर पडणे यासाठी सद्धा ‘To cut the Gordian knot’ असा वाक्प्रचार वापरला जातो.

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने

शब्दची प्रयत्ने यत्न करू॥

शब्दची आमुच्या जीवाचे जीवन

शब्दे वाटू धन जनलोका॥

मित्रांनो, संत तुकाराम म्हणतात, ‘आमच्या घरी शब्दांची श्रीमंती आहे. शब्दांचेच धन घरात भरले आहे. त्यामुळे जनसामान्यांना आम्ही दुसरे कसले दान करणार?’ त्यामुळे संत तुकाराम साऱ्या समाजाला शब्दांचे धन वाटायला निघाले आहेत. कविकुलगुरू केशवसुत शब्दांना विनंती करतात, ‘शब्दांनो, मागुते या.’ प्रतिभावंत लेखक-कवींचा अर्थ शब्दांच्या पाठीवर स्वार होतो अन् थेट रसिक-वाचकांच्या मनापर्यंत पोहोचतो. म्हणून तर शब्दांना भाषेचं माध्यम म्हणतात. भाषेचं वाहन म्हणतात.

सूरदासांच्या गीतातला खोडकर श्रीकृष्ण माता यशोदेला वारंवार, कळवळून सांगतो, ‘मैया मोरी, मैं नहीं माखन खायो।’ मैया यशोदेला पटवून देतो की ‘सकाळी सूर्योदयापूर्वीच मी तुझ्या देखत काठी-घोंगडं घेऊन रानात गेलो, मग सांग बरं, मी गोपींच्या घरी कसा जाणार, अन् लोणी कधी चोरणार? ‘मैं नहीं... मैं नहीं... असं तिला चार कडव्यांतून सांगणारा बालकृष्ण शेवटच्या कडव्यात मात्र म्हणतो, ‘मैय्या मोरी, मैनेही माखन खायो।’ ‘मै नही’ व ‘मैनेही’ या दोन शब्दांत फक्त एकच मात्रा देऊन सूरदासांनी केवढा अर्थचमत्कार साधला आहे, नाही का? हे शब्दप्रभुत्व प्राप्त करण्यासाठी आपणही शब्दांशी खेळलं पाहिजे, त्यांच्याशी मैत्री केली पाहिजे.

तुम्ही मुले, खेळताना एकमेकाला कोडी घालता, उखाणे घालता तर कधीकधी मित्राला सांगता, ‘रबर, जहाज, नयन हे शब्द उलट म्हण बघू!’ अरे, परत तोच शब्द तयार झाला... इतक्यात एक छोट्या बोबडे बोल बोलत तिथे आला. म्हणाला, ‘लामाला भाला माला, म्हणा बघू उलत-सुलत.’ परत तोच अर्थ आला ना!

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणारा अ‍ॅडॅम म्हणाला, ‘अरे, माझं पण ऐका. एकदा मी आमच्या मॅडमना म्हणालो, ‘Madam I’m Adam’ मॅडम हसल्या. म्हणाल्या, ‘मला माहीत आहे. उलट वाचलं तरी परत तोच अर्थ.

‘सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ता हमारा.’ हे गीत लिहिणारे कवी इक्बाल यांची एक छान आठवण तुम्हांला सांगतो, शाळेत असताना इक्बाल दररोज उशिरा यायचा. एक दिवस शिक्षकांनी त्याला चांगला दरडावला. “इक्बाल. तू हमेशा देरीसे आता है।” इक्बाल म्हणाला, “हाँ सर, इक्बाल देरीसेही आता है।”

त्याच्या या उत्तराने सारा वर्ग खळखळून हसला. रागावलेल्या शिक्षकांच्याही लक्षात आले. इक्बाल या शब्दाचा एक अर्थ व्यक्तीचे नाव असा असला तरी दुसरा अर्थ मात्र, ‘शहाणपण, सुज्ञपणा, ज्ञान’ असा आहे आणि त्याच अर्थाने भविष्यकाळातल्या कवी इक्बालने हे वाक्य वापरले होते.

विनोबाजींना कुणीतरी म्हणालं, “तेरा ही संख्या अशुभ आहे.” विनोबाजी चटकन म्हणाले, “अरे, तेरा म्हणजे सबकुछ तेरा. हेच तर खरं परमेश्वराशी एकरूप होणं. मग कोण म्हणतो तेरा अशुभ आहे?” थोर प्रतिभावंत, विचारवंतांच्या सहवासात शब्दांना असं लाभतं आभाळपण. हे आभाळपण आपल्याही शब्दांना यायला हवं. त्यासाठी खूप वाचलं पाहिजे. आपल्या शब्दांच्या खजिन्यात नवनवी शब्दरत्ने आणून साठविली पाहिजे. रत्नांना पारखतो त्याला म्हणतात रत्नपारखी. तर मग आपण होऊया शब्दपारखी.

आज आपण अशाच काही नव्या इंग्रजी वाक्प्रचारांची भर आपल्या खजिन्यात टाकणार आहोत.

गॉर्डियनची गाठ (Gordian knot). ग्रीक पुराणांमध्ये गॉर्डियनची गोष्ट आढळते. त्याने एका दोराला एक जबरदस्त भलीमोठी गाठ मारली आणि जाहीर केले की जो कोणी ही गाठ सोडून दाखवील तो आशिया खंडावर राज्य करील. कोण होता बरं हा गॉर्डियन? गॉर्डियन हा ग्रीक देशातला एक सर्वसामान्य गरीब शेतकरी होता. त्याच्याकडे एक खटारा म्हणजे छोटीशी बैलगाडी होती. तो पुढे फ्रिजिया या ग्रीक नगर राज्याचा राजा झाला. कसा बरं राजा झाला? तेच तर या गोष्टीत आपण पाहूया...

फ्रिजिया या नगरराज्याला कुणी राजा नव्हता. आता इतकं महत्त्वाचं राज्यपद द्यायचं कुणाला? मग ते नगरदेवतेच्या मंदिरात गेले. नगरदेवतेने सांगितले, “तुम्हांला हवा असलेला राजा तुमच्या नगराच्या दिशेने निघाला आहे. तुम्ही सर्वजण आत्ताच्या आत्ता नगरवेशीवर जा. तुम्ही तिथे पोहोचताच तुम्हाला जी व्यक्ती आपल्या बैलगाडीसह येताना दिसेल त्याला सन्मानाने नगरात आणा व त्याला माझी आज्ञा सांगून राज्यपदावर बसवा.”

आश्चर्यचकित व उत्साहित झालेले सारे नगरजन वेशीजवळ जमले. इतक्यात त्यांना एक अत्यंत गरीब शेतकरी आपल्या खटाऱ्यातून येताना दिसला. सर्वांनी त्याचा जयजयकार केला. त्याला नगरदेवतेची आज्ञा सांगितली. तो भांबावला. पळून जाऊ लागला. लोकांनी त्याला पकडून त्याच्या खटार्‍यासह नगरदेवतेच्या मंदिरात आणले. तो म्हणाला, “ठीक आहे. आल्या प्रसंगाला सामोरं गेलं पाहिजे.” त्याने देवतेचे आभार मानले व आपला खटारा त्या मंदिराच्या एका खांबाला बैलाच्या कासऱ्याने (दोराने) घट्ट बांधला. कारण आपला प्रिय खटारा कुणी चोरून नेऊ नये. तो शेतकरी असल्यामुळे त्याने त्या दोराला अशी भक्कम गाठ बांधली की बस्स! पुढे गॉर्डियन फ्रिजियाचा राजा झाला. त्याने मारलेल्या गाठीबद्दल लोकांच्या मनात फार कुतूहल होतं. अनेकांनी ती गाठ सोडण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झालं नाही. शेवटी फ्रिजिया देशात अशी एक बातमी पसरली की गॉर्डियनने मारलेली गाठ कुणातरी पराक्रमी व्यक्तीच्या हातूनच सुटू शकेल आणि ती भाग्यवान व्यक्ती आशिया खंडावर राज्य करील. त्यामुळे साऱ्या ग्रीक देशात व पश्चिमेकडील देशात ‘गॉर्डियनची गाठ’ एक दंतकथा होऊन राहिली.

इ. स. पूर्व 336 मध्ये वयाच्या विसाव्या वर्षी गादीवर आलेल्या अलेक्झांडर दी ग्रेट याने फ्रिजियात प्रवेश करून तलवारीच्या नुसत्या टोकाने ती गाठ सोडविली व तो जग जिंकायला निघाला. एक एक देश जिंकत तो इ.स. पूर्व 327 मध्ये भारताच्या वायव्य सरहद्दीवर येऊन पोहोचला...

गॉर्डियसच्या या जगप्रसिद्ध कथेवरून इंग्रजी भाषेत ‘गॉर्डियन नॉट’ म्हणजे अत्यंत अवघड गोष्ट. एखादा अत्यंत गुंतागुंतीचा जटिल प्रश्न असा वाक्प्रचार तयार झाला. मराठीत याच अर्थाने ‘ग्यानबाची मेख’ किंवा ‘नाथाच्या घरी उलटी खूण’ असे दोन वाक्प्रचार रूढ झाले आहेत. एखाद्या संकटातून बाहेर पडणे यासाठी सद्धा ‘To cut the Gordian knot’ असा वाक्प्रचार वापरला जातो.

Tags: अलेक्झांडर दि ग्रेट पश्चिम देश राजा फ्रिजिया ग्रीक गॉर्डियन गाठ इंग्रजी विचारवंत विनोबा भावे कवी इक्बाल श्रीकृष्ण सूरदास कवी लेखक केशवसुत संत तुकाराम शब्द Alexander the Great Western Country King Frisia Greece Gordian Knot English Philosophers Vinoba Bhave Poet Iqbal Shri Krishna Soordas Poet Writer Keshavsut Saint Tukaram #Words weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके