आतापर्यंत 60 मुलांनी या शाळेचा शिक्षणक्रम पूर्ण केलेला आहे. मुलांच्या संगीत शिक्षणासाठी एवढी काळजी घेणाऱ्या देशाला उत्तम गायकांची-वादकांची-संगीतकारांची वाण कशाला पडेल? आपल्याकडच्या किती संगीतशाळांतले शिक्षक गुणी विद्यार्थ्यांच्या शोधात हिंडतात?
रशियातल्या कझाकिस्तानमधल्या अल्माअटा नावाच्या शहरी मुलांसाठी एक संगीत विद्यालय आहे. त्याला जोडूनच मुलांसाठी वसतिगृह आहे. सगळ्या कझाकिस्तानामधली ही आदर्श संगीत शाळा. कझाकिस्तानच्या काना-कोपऱ्यांतून इथे विद्यार्थी येतात. येतात म्हणण्यापेक्षा आग्रहाने आणले जातात. त्यासाठी खास प्रयत्न केले जातात. संगीतात चमक दाखवणाऱ्या मुलांचा शोध घेण्यासाठी दर उन्हाळ्याच्या सुट्टीत या शाळेतले शिक्षक कझाकिस्तानच्या वेगवेगळ्या भागांत हिडतात. कझाकिस्तानातली खेडी आणि शहरे यांतून एकूण 200 संगीतशाळा आहेत. या प्रत्येक संगीत विद्यालयाची पाहणी होते. 'यंग पायोनियर्स' या मुलांच्या संघटनेच्या शाखांनाही शिक्षक भेटी देतात.
बालवाड्यांमध्ये संगीताच्या जगात पहिली पावले टाकणारी लहान मुलेदेखील या शिक्षकांच्या नजरेतून सुटत नाहीत. एवढेच नव्हे तर शाळेबाहेर राहाणाऱ्या मुलांमध्ये एखादा चमकदार मुलगा असेल तर तो हातून निसटू नये म्हणून उन्हाळ्याच्या सुटीत पालकांबरोबर दूरवर खेड्यांत व पर्वतात गुरे घेऊन जाणाऱ्या मुलांचीही पाहणी केली जाते. एकेका मुलाला गायला लावून किंवा वाद्य वाजवायला लावून प्रत्येकाची संगीतातली गती पाहिली जाते. थोडीशी वेगळी उपमा द्यायची तर गुन्हेगारांची टोळी शोधण्यासाठी पोलीस जसे जंग जंग पछाडतात तसेच संगीतात चमक दाखवणाऱ्या मुलांचा कसून शोध घेतला जातो. ही शोध मोहीम पूर्ण झाल्यावर शिक्षक अल्माअटाला परततात. त्यांच्या मागोमाग मुले येऊन दाखल होतात आणि संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण सुरू होते. आजमितीला या शाळेत 300 मुले शिकत आहेत. ही शाळा संगीताच्या सर्व साधनांनी सुसज्ज अशी आहे. सर्व प्रकारची वाद्ये इथे ठेवलेली आहेत. ही वाद्ये
वाजवण्याचे पद्धतशीर शिक्षण दिले जाते. तसा या शाळेचा अभ्यासक्रम खूप अवघड आहे. इथे मुलांकडून खूप मेहनत करून घेतली जाते. हा शिक्षणक्रम एकूण 11 वर्षांचा आहे. अकरा वर्षे मुले इथेच राहतात. शाळेला जोडून त्यांचे दुसरे घर वसतिगृहाची चार मजली इमारत आहे. सगळा खर्च सरकारतर्फे केला जातो.
मुलांना दिवसातून चार वेळा जेवण दिले जाते. कपडेलत्ते मिळतात. अंथरूण-पांघरुणाची सोय केली जाते आणि जरूर पडल्यावर औषधपाणीही केले जाते. मुलाचे पालक कामगार असतील तर त्यांना एक दमडीही द्यावी लागत नाही. जास्त उत्पन्नाच्या गटातील पालकांना नाममात्र फी द्यावी लागते. त्यामुळे 11 वर्षे मुलाला संगीताचे शिक्षण द्यायचे ही बाब पालकांना अजिबात खर्चीक वाटत नाही. मुलांचाच नव्हे तर शिक्षकांचाही सर्व खर्च सरकार करते. शिक्षकांचे पगार, चमकदार मुलांचा शोध घेण्यासाठी केलेल्या प्रवासाचा खर्च, शाळेला लागणारी वाद्ये व इतर साधने, मुले संगीत नृत्य-चित्रपट पाहायला जातात त्याचा खर्च- थोडक्यात म्हणजे सगळाच खर्च सरकार करते. मुलांची संगीतातली गती आणि आत्मविश्वास वाढावा यासाठी दुहेरी प्रयत्न केले जातात. त्यांना संगीताच्या निरनिराळ्या कार्यक्रमांना आवर्जून नेले जाते. त्याशिवाय उत्कृष्ट नृत्ये व चित्रपट दाखवले जातात. तसेच त्यांना शिक्षण चालू असतानाच लोकांपुढे कार्यक्रम करण्याची संधी दिली जाते.
खुद्द शाळेमध्ये एक संगीत सभागृह आहे. तिथे या मुलांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याशिवाय रशियातल्या इतर प्रमुख शहरी मुले आपली कला लोकांपुढे पेश करतात. अशा प्रकारचा हा 11 वर्षांचा शिक्षणक्रम पूर्ण झाला की सगळे संपले असे नव्हे. अल्माअटातल्या विद्यापीठाच्या संगीत विभागात किंवा मास्कोतल्या संगीत शिक्षणाच्या उच्च विद्यालयात पुढचे शिक्षण घेता येते. आतापर्यंत 60 मुलांनी या शाळेचा शिक्षणक्रम पूर्ण केलेला आहे. मुलांच्या संगीत शिक्षणासाठी एवढी काळजी घेणाऱ्या देशाला उत्तम गायकांची-वादकांची-संगीतकारांची वाण कशाला पडेल? आपल्याकडच्या किती संगीतशाळांतले शिक्षक गुणी विद्यार्थ्यांच्या शोधात हिंडतात?
Tags: कझाकिस्तान 11 वर्षांचा अभ्यासक्रम संगीत शिक्षण वेगळा उपक्रम Kazakhstan 11-year course music education a separate activity weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या