डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

वंचितांचा, शोषितांचा आणि दरिद्री कष्टकऱ्यांचा कैवारी, स्वयंसिद्ध वकील, उत्तम वक्ता, स्वातंत्र्याचा उद्गाता आणि ब्रिटिश पार्लमेंटमध्ये इतिहास घडवणारा झुंजार सदस्य- ‘चार्ल्स ब्रॅडलॉ!’ 1893 च्या अखेरीला ती भारतात आली आणि अवघ्या दोन महिन्यांच्या अवधीत हजारो मैलांचा प्रवास करून तिने हा देश पालथा घातला. या काळातल्या तिच्या एकशे एकवीस व्याख्यानांनी लक्षावधी भारतीयांच्या मनात धर्मविषयक विचारांची नवी ज्योत लागली. 'बेझंट बाई' किंवा 'अन्नाबाई' हे त्यांच्या विश्वासाचे आणि आदराचे स्थान झाले.
 

लंडनच्या ओल्ड स्ट्रीटवरचा 'हॉल ऑफ सायन्स' माणसांनी फुलून गेलेला. श्वासही मोकळा घेता येऊ नये इतकी गर्दी, “भाषण सुरू होत आहे”, अशी घोषणा झाली आणि आनंदोल्हासाचा एकच गजर झाला. ‘तो’ व्यासपीठावर आला आणि किंचित झुकून त्याने श्रोत्यांच्या स्वागताचा स्वीकार केला. 'तिची' नजर त्याच्यावर स्थिर झाली. शांत, गंभीर, करारी असा त्याचा चेहरा. भव्य मस्तक, विशाल कपाळ आणि उत्सुक डोळे! त्याच्या उंच आकृतीचा आणि ट्रम्पेटसारख्या जोरकस नादमय बोलण्याचा परिणाम विलक्षण होता. कृष्ण आणि येशु यांच्यामधल्या साम्याचा शोध घेताना त्यांच्या मिथकथांमधले लहान लहान धागे तो उकलून दाखवत होता. तुडुंब भरलेले ते सभागृह श्वास रोखून तन्मय, शांत होते. काय ऐकले आपण याच्याबद्दल? हा पोकळ निदर्शने करतो? हा दिखाऊ लोकनेता आहे? तिने जे प्रवाद ऐकले होते ते हळूहळू वितळत गेले. त्याच्या आवाजाच्या उष्ण जिवंत सच्चेपणाचा स्पर्श तिच्या अंतःकरणाला थेट होत गेला. तो थांबला. सभागृह भानावर आले. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. तो व्यासपीठावरून खाली उतरला. त्याच्या नॅशनल सेक्युलर सोसायटीच्या नव्या सभासदांची प्रमाणपत्रे त्याच्या हाती होती. तिचे नाव त्या नव्या सभासदांमध्ये होते पण ती प्रथमच त्या सभेला आली होती आणि त्याला प्रथमच पहात होती. त्याने तिला पाहिले असण्याचा तर संभव नव्हता.

पण घडले ते वेगळे. तो तिच्याजवळ आला आणि तिचे नाव अर्धवट प्रश्नार्थक उच्चारत तिचे प्रमाणपत्र त्याने तिच्या हाती दिले. तिने विचारलेल्या प्रश्नाला नंतर भेट ठरवून उत्तर देण्याची आनंदाने तयारी दाखविली आणि व्याख्यानासाठी संदर्भ म्हणून वापरलेले पुस्तकही त्याने तिच्या हाती ठेवले.

ती चकित झाली. पुष्कळ पुढे, गाढ मैत्रीची खूणगाठ पक्की बांधली गेल्यानंतर तिने त्याला विचारले, “आपण एकमेकांना कधीच पाहिल नव्हतं. तरी तू सरळ माझ्याकडे तसा कसा आलास?” तो हसला. म्हणाला, “माहीत नाही, पण तुझ्याकडे दृष्टी टाकली आणि मी ओळखलं, की तू अॅनी बेझंट आहेस म्हणून.”

होय. एखाद्या चित्रपटात शोभावी अशी त्या दोघांची पहिली भेट होती. वयाची चाळीशी पूर्ण केलेला चार्ल्स ब्रँड लॉ सत्तावीस वर्षांच्या अॅनीला भेटला आणि तिने वयाच्या पंचेचाळीशीत मागे वळून पाहताना त्या पहिल्या भेटीबद्दल लिहिले, ‘त्या हॉल ऑफ सायन्समधल्या पहिल्या भेटीतच मृत्यूपर्यंत अखंड टिकलेल्या एका मैत्रीची सुरुवात झाली.’ 1893 साली आपल्या आत्मचरित्रात अॅनी असे लीहीत होती. तेव्हा चार्ल्स जिवंत नव्हता. 1891 च्या प्रारंभीच तो मरण पावला होता. पण अॅनी लिहीत होती, ‘मृत्यूने आमच्या मैत्रीचा पार्थिव बंध तोडला. पण माझ्यासाठी तर त्या मृत्यूचे दार उघडून आम्हांला दोघांना त्या बंधाने अजूनही बांधून ठेवलेले आहे.’ 

‘आम्ही भेटलो तेच मुळी अनोळखी म्हणून नव्हे. पहिल्याच नजरभेटीत आम्हांला जुनी ओळख पटली. मैत्रीचा धागा आम्ही उचलला तो जुनाट नवा नव्हे. फार फार जुना. ती नवीन सुरुवात नव्हतीच. म्हणून आम्ही भेटलो आणि येणाऱ्या जन्मांमध्ये भेटतच राहू. या जन्मी केली तशीच एकमेकांना मदत करू.’ 

वंचितांचा, शोषितांचा आणि दरिद्री कष्टकऱ्यांचा कैवारी, स्वयंसिद्ध वकील, उत्तम वक्ता, स्वातंत्र्याचा उद्गाता आणि ब्रिटिश पार्लमेंटमध्ये इतिहास घडवणारा झुंजार सदस्य- ‘चार्ल्स ब्रॅडलॉ!’ भारतीयांच्या वतीने ब्रिटिश सत्तेशी सतत बोलणी करत राहिलेला भारतमित्र ब्रॅडलॉ! इंग्लंडमधला भारताचा प्रतिनिधी अशा भूमिकेत वावरणारा ब्रॅडलॉ भारतात फक्त एकदा आला आणि तोही आयुष्याच्या अगदी अखेरीला. पण त्याच्या मृत्यूनंतर दोनच वर्षांनी त्याची जन्ममैत्रीण अॅनी भारतात आली आणि तिच्या मृत्यूपर्यंतची चाळीस वर्षे भारतासाठीच तिने खर्ची घातली. पारतंत्र्याचे गंभीर दुष्परिणाम अनेक प्रकारे भोगत असलेल्या देशाला ते पारतंत्र्य आणणाऱ्या देशाविषयी आणि त्या देशवासीयांविषयी प्रचंड संताप आणि तिरस्कार असला तर नवल नव्हते. पण तशा काळातही देशाची आणि द्वेषाची सीमा ओलांडून एतद्देशीयांसाठी प्रेम आणि सहानुभूती घेऊन आलेल्या अॅनीला भारताने मनापासून आपले म्हटले. 

1893 च्या अखेरीला ती भारतात आली आणि अवघ्या दोन महिन्यांच्या अवधीत हजारो मैलांचा प्रवास करून तिने हा देश पालथा घातला. या काळातल्या तिच्या एकशे एकवीस व्याख्यानांनी लक्षावधी भारतीयांच्या मनात धर्मविषयक विचारांची नवी ज्योत लागली. 'बेझंट बाई' किंवा 'अन्नाबाई' हे त्यांच्या विश्वासाचे आणि आदराचे स्थान झाले. एवढेच नव्हे, तर आपल्यासाठी देव म्हणून त्यांना पाठवले गेले आहे, अशी लोकांची भावना झाली. मोतीलाल घोषांसारख्या मान्यवर लोकनेत्यांचे बंधू शिशिरकुमार घोष कलकत्त्यात त्या काळी 'हिंदू स्पिरिच्युअल मॅगेझिन’  चालवीत असत. त्यात बातमी प्रसिद्ध झाली. 

‘या भारत वर्षामध्ये काय आहे व त्याने काय हरवले आहे याची स्मृती पुनश्च जागृत करून त्याच्या हृदयात अध्यात्मज्योत पेटवण्याकरिता देवतांकडून एक दूती आली आहे; आणि ती बहुजन समाजाला सांगत फिरते आहे, की “माझ्या शब्दांवर विश्वास ठेवून जर भूतकाळाकडे पहाल तर आर्यभूमीत पुन्हा एकदा देवतांचा वास होईल, आणि तुम्ही गमावलेली आत्मविद्या देशभर पुन्हा प्रकट होईल.’ या देशातल्या लोकांच्या वर्तनावर जगाचे सौख्य आणि भवितव्य अवलंबून आहे.” अशा विश्वासाने आंतरराष्ट्रीय थिऑसॉफिक सोसायटीची ही अध्यक्षा भारतात काम करीत होती. 

आज कदाचित या गोष्टीचे महत्त्व फारसे वाटणार नाही. निधर्मी भारताची संकल्पना अधिक शुद्ध करून घेण्यासाठी आणि ती सर्वसामान्यांच्या आयुष्यात रुजवण्यासाठी येथील विचारी आणि कृतिशील माणसे प्रयत्न करीत असताना थिऑसॉफी किंवा इतर कोणत्याही तत्सम धार्मिक संस्थेकडे या चळवळीकडे आपण आस्थेने पाहणारही नाही. मात्र त्या काळात हतप्रभ अशा समाजाची अस्मिता जागवण्यासाठी धर्मक्षेत्रात जे जे प्रामाणिक आणि उदार प्रयत्न झाले. त्यांतील एक थिऑसॉफिस्टांचा होता यात शंका नाही. अॅनी बेझंट तर या देशाच्या उत्थानाची खरीखुरी आस बाळगणाऱ्या होत्या. बनारस हिंदू विद्यापीठाची गंगोत्री म्हणजे बाईंनी स्थापन केलेले बनारसचे सेंट्रल हिंदू कॉलेज. या कॉलेजमधील सरस्वती मंदिर बाईंनी बांधले. पण गोऱ्या माणसाने आपल्या देवळात प्रवेश केलेला एतद्देशीयांना रुचत नाही म्हणून त्या देवळाच्या पायरीपर्यंतच जात असत. “मुलींना शिकू द्या, त्याच अयोग्य रूढींचा त्याग आपोआप करतील,” असे त्यांचे म्हणणे असे. 

एकदा 1921 साली गांधीजींच्या असहकाराच्या चळवळीविषयी मतभिन्नता प्रकट करणारे भाषण त्यांनी अलाहाबादला केले. नेहरूही त्या सभेला उपस्थित होते. बाई बोलायला उभ्या राहिल्या त्या क्षणापासून लोकांनी गोंधळ सुरू केला, तो अखेरपर्यंत. जवाहरलालजींच्या शांत राहण्याच्या आवाहनाचाही परिणाम झाला नाही. तरीही बाई तासभर बोलल्या. व्याख्यानानंतर बी.संजीवराव हे त्यांचे ज्येष्ठ स्नेही श्रोत्यांविषयी अत्यंत नाराजीने त्यांच्याशी बोलू लागताच बाई म्हणाल्या, “या गोष्टीकडे वेगळ्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे. मला माहीत आहे की ते माझ्याविरुद्ध नाहीत. त्यांना माझ्या त्वचेचा पांढरा रंग आवडत नाही. मी जेव्हा पंचवीस वर्षांपूर्वी इथे आले तेव्हा गोऱ्या कातडीला येथील लोक फार मान देतात असे मला दिसलं आणि मला ते अतिशय अनैसर्गिक, अयोग्य वाटलं. ती वृत्ती बदलण्याकरता तर मी झगडत राहिले. आज त्या झगड्याला यश आलं आहे, म्हणून मला आनंद होतो आहे. आजपर्यंत माझ्या गोरेपणाचा उपयोग तरुणांना जागे करण्यात मला पुष्कळ झाला. आता त्याची जरूरी नाही. तरुण पिढीच्या मनात निर्माण झालेल्या आकांक्षांना योग्य वळण देणं हे आता माझं कर्तव्य आहे. ते मी करतच राहीन.”

इतक्या निर्मळपणे येथील क्रिया प्रतिक्रियांकडे पाहणाऱ्या अॅनी बेझंट, त्यांची होमरुल चळवळ, त्यांनी इंडियन होमरूलसाठी केलेले प्रयत्न, भोगलेला तुरुंगवास, एतद्देशीयांना स्वराज्याचे शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी उभ्या केलेल्या संस्था, दिलेली व्याख्याने आणि त्यांनी मांडलेले कॉमनवेल्थ ऑफ इंडिया बिल या सर्व गोष्टी आज बहुतांशी केवळ इतिहासजमा झाल्या आहेत. भारतीय राजकारणाने, धर्मकारणाने व समाजकारणाने अनेक प्रामाणिक, निर्भय आणि प्रागतिक स्त्री पुरुषांचे चरित्र आणि कार्य नामशेष केले, ही वस्तुस्थिती आहे. अॅनी बेझंट त्या वस्तुस्थितीला अपवाद नाहीत. मात्र भविष्यात हा देश आपले स्मरण कसे ठेवील याचा विचार अॅनीने भारताकडे धाव घेताना केला नव्हता. अंतरात्म्याला साक्षी ठेवून सर्व कल्याणाच्या प्रेरणेने काम करणाऱ्या कोणाही माणसाच्या मनात तसा विचार बहुधा नसतोच. अनेक प्रिय गोष्टींची, स्थानांची, व्यक्तींची किंमत चुकवून जवळ केलेल्या एखाद्या विचाराच्या, एखाद्या मूल्याच्या उजेडात अशी माणसे निःशंकपणे आणि निरपेक्षपणेच बहुधा वाट चालत असतात. अॅनीने तर तशी आपली वाट चालण्यासाठी जी किंमत दिली, ती कोणत्याही काळात कोणाही संवेदनशील स्त्रीसाठी खूप मोठीच होती. 

1847 मध्ये ती इंग्लंडमध्ये जन्माला आली. वडील ट्रिनिटी कॉलेजचे पदवीधर होते; अभिजात वाङ्मयाचे अभ्यासक होते, गणिती होते, तत्त्वज्ञ होते. फ्रेंच, जर्मन, इटालियन, स्पॅनिश आणि पोर्तुगीझ भाषांवर त्यांचे उत्तम प्रभुत्व होते. हिब्रूही त्यांना अवगत होती. वेगवेगळ्या भाषांमधले उत्तमोत्तम साहित्य वाचावे आणि घरात काम करत असणाऱ्या पत्नीला ते मोठ्याने ऐकवावे, हा त्यांच्या आनंदाचा भाग होता. अॅनीची आई आयरिश होती. तिच्या मृदु, समर्पणशील, प्रेमळ आणि स्वाभिमानी व्यक्तिमत्त्वाचा गाढ परिणाम अॅनीवर झाला. वडील गेले तेव्हा अॅनी पाच वर्षांची होती आणि तिचा मोठा भाऊ सात वर्षांचा, त्यांच्या आनंदाने भरून गेलेल्या कुटुंबावर वडिलांच्या मृत्यूने मोठाच आघात झाला. नवऱ्यावर खूप उत्कट प्रेम करणाऱ्या अॅनीच्या आईला त्यातून सावरणे फार कठीण झाले. लहानग्या अॅनीला वडिलांचा मृत्यू तर आठवत राहिलाच; पण एका रात्रीत आईचे काळेभोर चमकदार केस बर्फासारखे शुभ्र पांढरे झालेले तिला त्याहून लख्ख आठवत राहिले. 

वडिलांशिवायची अॅनी आईशी घट्ट बांधली गेली. इंग्लंडमध्ये ती जन्मली होती खरी, पण तिचे तीनचतुर्थांश रक्त आयरिश होते. आई आयरिश आणि वडिलांची आई आयरिश असल्यामुळे तेही अर्धे आयरिशच, अॅनीच्या नसांमधून स्वातंत्र्यप्रेम वहात  राहिले ते जन्मापासून. जिथली हृदये उबदार आहेत, आणि जिथल्या माणसांच्या ओठांवर सारखे आशीर्वादाचे शब्द असतात, अशा साध्या, सुंदर आयरिश भूमीशी तिचे आंतरिक नाते जुळले. अॅनीची आई माहेरची  'सेव्हन किंग्ज ऑफ फ्रान्स' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजघराण्यातील. त्या अभिमानाने तिला ताठ कणा दिला होता. हृदय घायाळ झाले तरी ओठावरचे हसू मावळू द्यायचे नाही, उपाशी राहण्याची वेळ आली तरी कर्ज काढायचे नाही. आणि कितीही कठीण प्रसंग आला तरी स्वतःच्या नजरेतून उतरायचे नाही, या प्रस्थानत्रयींच्या आधाराने तिच्या आईने एकटीने जीवनप्रवास चालू ठेवला होता. अॅनीच्या वादळी आणि आत्मसन्मानाला जपणाऱ्या स्वभावाची घडण तिच्यामुळेच झाली होती. 

अतिशय बुद्धिमान आणि संवदेनशील अॅनी बीथोवेन आणि बाखचे संगीत शिकत मोठी झाली. कल्पनेत रमणारी, भासांच्या जगात हरवणारी एक लाजरीबुजरी मुलगी. येशू तिला आवडायचा. त्याच्यावर तिचे प्रचंड प्रेमच होते. आईबरोबर नियमित चर्चमध्ये जाणाऱ्या अॅनीच्या स्वप्नांना, भासांना इच्छांना व्यापून येशू दशांगुळे उरला होता. त्यामुळे चर्चमध्ये धर्मगुरू म्हणून आलेल्या तरुण रेव्हरंड फ्रेंक बेझंटने अॅनीला मागणी घातली तेव्हा अॅनीच्या आईला बहुधा ती सुखाचीच घटना वाटली असणार. 

गुडघ्यापर्यंत लांब आणि दाट केस असलेली, चमकदार डोळ्यांची सुंदर अॅनी 1866 मध्ये फ्रेंक बेझंटला भेटली आणि 1867 मध्ये त्यांनी लग्न केले. स्वतःचा शोध न लागलेली एक असावध, आनंदी मुलगी आणि नवऱ्याचे अधिकार, पत्नीची कर्तव्ये आणि धर्मश्रद्धां माहात्म्य निःशंकपणे, निर्विवादपणे माहीत असलेला उच्चशिक्षित धर्मगुरु- लग्न दोघांसाठीही दुःखदायक ठरले. एक मुलगा आणि एक मुलगी अशा दोन मुलांचा जन्म झाला आणि एक चांगली पत्नी होण्याचा एक चांगली आई होण्याचा अॅनीने मनापासून प्रयत्न केला. पण हळूहळू धर्माविषयीच्या अनेक प्रश्नांनी अॅनीला अस्वस्थ केले. जहाल सुधारणावादी विचारांशी तिचा योगायोगाने परिचय झाला आणि मनातल्या अस्वस्थतेचे रूप व्यक्तिगत आयुष्याचा पुनर्विचार करण्याइतके तीव्र झाले. वरवर पाहता कोणतेही मोठे कारण नसताना कित्येक वेळा मोठी उलथापालथ घडवणाऱ्या अशांतीचा जन्म होतो. आयुष्याची मुळे गदगदा हलवणारे उत्पात घडतात. अॅनीच्या बाबतीत तसेच घडले. एकदा नव्हे, दोनदा घडले. पहिल्या वेळी तिने आपला संसार गमावला, सुरक्षितता गमावली, मुलगा आणि पती गमावला आणि कालांतराने अत्यंत लाडकी मुलगीही गमावली. दुसऱ्या वेळी तिने आपल्या जिवलग मित्राची वैचारिक साथ गमावली. मैत्रीतील शांती आणि मित्राच्या सहवासातील बौद्धिक समाधान गमावले. पहिल्या वेळी पतीपासून ती शरीरमनाने विभक्त झाली. दुसऱ्या वेळी ती मित्रापासून- चार्ल्स ब्रँड लॉ पासून विचार विभक्त झाली. पहिल्या वेळी एका मृदु, प्रेमळ आणि श्रद्धाळू मुलीच्या अंतरंगात एक तीव्र, आक्रमक इच्छाशक्तीची बंडखोर आणि आवेगी मुलगी कशी राहत होती याचा शोध तिला लागला. दुसऱ्या वेळी एक साहसी, निश्चयी आणि कार्यमग्न स्त्रीच्या गाभ्यात हळूहळू उदयाला आलेल्या समंजस मानवप्रेमाच्या विस्तारशील वाटांची ओढ मान्य करणाऱ्या आत्मनिष्ठ प्रौडेचा निर्णय तिने स्वीकारला. 

अॅनीने फ्रेंकपासून विभक्त होणे त्या काळाचा विचार करता सामाजिक दृष्टीने भयंकर होते, पण तिच्या स्वतःच्या दृष्टीनेही ते फार सोपे नव्हते. ती कर्तव्यांचे भान असलेली गृहिणी होती. अतिशय प्रेमळ आई आणि दक्ष पत्नी होती. बाहेरच्या जगाविषयीची तिला ओढ नव्हती, तिची काही महत्त्वाकांक्षी स्वप्नेही नव्हती. उलट तिचे येशूवरचे प्रेम, तिला गरजू आणि असहाय जीवांविषयी वाटत असलेला खराखुरा कळवळा, तिची सहजस्फूर्त सेवेची भावना, तिचे शिक्षण, तिचा धर्मगुरू पती, तिचे मुलांवर असलेले प्रेम, तिची धर्मसमर्पित निष्ठांनी भारलेली आई आणि त्या दोघींमधला प्रेमाचा दृढ बंध, तिचा लाजाळूपणा, बुजरेपणा आणि तिची अतिसंवेदनशीलता ही सगळी तिच्याभोवतीची भक्कम तटबंदी होती. 

पण श्रद्धांचा तळ बघण्याचा अट्टाहास, रूढ धर्मग्रंथांमधल्या अनेक गोष्टीविषयीचा अविश्वास आणि धर्ममते तपासून घेण्याचा संकल्प यांची वाढ तिच्या मनात झाली आणि सगळे तट ओलांडून ती बाहेर पडली. मुलगा फ्रैंकजवळ राहिला. मुलीला मेबलला घेऊन जाण्याची तिला परवानगी मिळाली आणि थोडेसे उदरनिर्वाहासाठी पैसे.

मग सुरू झाली कसोटी. मुलीच्या बदलत्या धर्मनिष्ठामुळे तिचा संसार मोडल्यामुळे कष्टी होऊनसुद्धा तिच्या मदतीला ठाम उभी राहिलेली आईही 1874 च्या वसंत ऋतूत या जगाचा निरोप घेऊन तिच्यापासून कायमची दूर झाली आणि अॅनीची एकाकी झुंज अधिक उग्र, अधिक कठीण, अधिक क्लेशकारक झाली. अशा कठीण काळात अर्धपोटी काम करीत असतानाच अॅनीला ब्रेडलों भेटला आणि तिच्या शब्दांत सांगायचे तर त्याने तिच्या जीवनाचा रंग बदलून टाकला. जे घडले ते तिला अनपेक्षित असेच होते. त्याची भेट होण्यापूर्वी ती दिवस दिवस ब्रिटिश म्युझियमच्या लायब्ररीत काम करीत बसायची. बॉमस स्कॉटसारखा उदार सुधारणावादी तिच्या परिचयाचा झाला होता. त्याचे ग्रंथालय तिच्यासाठी खुलेच होते. ती वाचत होती, थॉमसने चालवलेल्या मासिकात स्वतःला पडलेले प्रश्न मांडत होती. साऊथ प्लेस चॅपेलमधल्या उपदेशांना जात होती आणि आणखी खोल धर्मविषयक प्रश्न घेऊन परत येत होती. अशा वेळी तिला ज्याची खरी गरज होती ते मैत्रीचे, स्नेहाचे, नितळ विश्वासाचे आणि बौद्धिक साहचर्याचे आश्वासन घेऊन चार्ल्स ब्रॅड तिच्या आयुष्यात आला.

तिच्यासारखाच तोही संसारात अपयशी आणि दुःखी होता. एक मुलगा आणि दोन मुली अशा त्याच्या मुलांपैकी मुलगा लहानशा आजाराने मरण पावला होता आणि त्याची पत्नी जवळजवळ मनोरुग्ण बनली होती. चार्ल्सचे सातत्याने संघर्षमय जीवन, अत्यंत दारिद्र्य, त्याच्या कामांचा आणि कर्जाचा डोंगर या सर्वांमुळे मोठा ताण सहन करणाऱ्या त्याच्या पत्नीचे मन जवळच्या नातेवाईकांनी त्याच्याविषयीच्या रागाने कलुषित करून टाकले आणि मुलाच्या मृत्यूने विकल झालेल्या त्या सामान्य बाईला मानसिक आजाराने ग्रासले.

तिच्या वडिलांपाशी तिला आणि लहानग्या दोन मुलींना ठेवून चार्ल्स लंडनला भाड्याच्या जागेत राहात होता. अधूनमधून तो मुलींपैकी एकेकीला काही दिवसांसाठी आपल्याजवळ ठेवून घेई आणि ते दिवस मुलींना सोन्याचे वाटत. 

चार्ल्स एका सामान्य कुटुंबातून वर आला होता. त्याचे वडील एका वकिलाच्या ऑफिसात कारकून होते. त्यांना साहित्याची आवड होती आणि 'संडे मिरर’ मध्ये ते थोडेफार लिखाणही करीत, पण एवढ्यामुळे त्याला घरातल्या वाङ्मयीन वातावरणाने घडवले असे म्हणता येणार नाही. वडिलांकडून त्याला मिळाला तो मासेमारीचा छंद. तो त्यांचा व्यवसाय नव्हता. त्यांच्या विरंगुळ्याचा तो भाग होता. छोट्या चार्ल्सला त्या छंदातला आनंद त्यांनी समजावला, कौशल्ये शिकवली. पुढे कामाच्या ओझ्यातून सुटका करून घेताना आणि शरीराला ग्रासणाऱ्या व्याधींवर मात करताना चार्ल्स याच छंदाकडे वळत राहिला. अॅनीनेही त्याच्या त्या आनंदात सहभागी व्हावे म्हणून धडपड करीत राहिला. चार्ल्स आणि अॅनी दोघांनीही तरुण वयात रूड धर्ममतांविषयी शंका उपस्थित करून धर्मगुरूंचा आणि कुटुंबातल्या परिवारातल्या धर्मश्रद्ध माणसांचा रोष ओढवून घेतला होता. वयाच्या बाराव्या वर्षी वडिलांच्याच ऑफिसमध्ये निरोप्या पोराचे काम करणारा चार्ल्स पुढे एका कोळशाच्या व्यापा-याकडचा कॅशियर बनला. तो उत्तम वक्ता होता. त्याची हुशारी त्याच्या कुटुंबाच्या चर्चचे धर्मगुरू जे. जी. पॅकर यांच्या लक्षात आली आणि चर्चच्या संडे स्कूलमध्ये बायबल शिक्षक म्हणून त्याची त्यांनी नेमणूक केली. 

पण त्याचा परिणाम भलताच झाला. बायबल शिकवताना त्यातल्या अंतर्गत विसंगतींकडे चार्ल्सचे लक्ष गेले. तो स्वतंत्र विचार करणारा मुलगा होता. पॅकरने पूर्वीच्या मान्यवरांनी दिलेली रूढ उत्तरे त्याना ऐकविली; पण त्याचे समाधान झाले नाही, तेव्हा त्याच्या आईवडिलांना एक खरमरीत पत्र पाठवून तीन महिन्यांसाठी त्याला बडतर्फ केले गेले. मधल्या तीन महिन्यांत चार्ल्स आणखी मोकळा झाला. रविवारी दुपारी एका मोकळ्या मैदानात चालणाऱ्या खुल्या चर्चामध्ये भाग घेताना त्याची धिटाई वाढीला लागली. तशात एका 'फ्री थिंकर' शी त्याची चर्चा झाली आणि तीन महिन्यांनंतर पुन्हा पॅकरसमोर तो उभा राहिला तेव्हा त्याच्यात झालेला बदल पॅकरच्या दृष्टीने आणखी भयानक होता. तीन दिवसांची मुदत त्याला मतपरिवर्तनाची संधी म्हणून दिली गेली. तिसऱ्या दिवशी चार्ल्सने नोकरी आणि घर दोन्हींचा निरोप घेतला होता. 

नंतर काही काळाने त्याने 'सेवन्थ ड्रॅगन गार्ड्स’ मध्ये स्वतःचे नाव दाखल केले. त्यापूर्वी ज्यांच्या आश्रयाने तो राहत होता, त्या जोन्स कुटुंबातल्या हिपेटिया नावाच्या तरुण मुलीवर त्याने प्रेम केले. ती आणि तिची भावंडे यांच्यासमवेत तो फ्रेंच, ग्रीक, हिब्रू आणि अरेबिक शिकला. उत्तम वक्ता म्हणून त्याने अनेक गुण त्या काळात विकसित केले. कष्टांची तयारी समृद्ध वाचन, उत्तम स्मरणशक्ती, नेमकेपणाचा आग्रह. त्याच्याकडे मोठेपणाची क्षमता असाधारण होती. श्रेष्ठ लोकनेत्याच्या ठायी असणारे अनेक गुण त्याच्याकडे होते. 

आर्मीतून परतल्यानंतर निरोप्या ते सेक्रेटरी असा नोकरीतला प्रवास करत लिखाण आणि भाषणांमध्ये तो व्यस्त होत गेला, हाईड पार्कमधला लोकप्रिय वक्ता म्हणून त्याला नाव मिळाले. हिपेटिया आणि तिची भावंडे मात्र मधल्या काळात त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्याने दूर देशी विखुरली होती. तो हिपेटियाला परत भेटू शकला नाही. पुढे 1853 मध्ये सुधारणावादी हूपर कुटुंबाशी त्याची ओळख झाली आणि त्या कुटुंबातल्या ससान्हा लँब हूपरशी त्याने लग्नही केले. तिला काव्यात्म पत्रे लिहिताना स्वतःच्या आणि अनेक कविता तिला पाठवताना चार्ल्समध्ये एक हळवा आणि साधवी कवी कसा होता ते लक्षात येते. त्याला तीन मुले झाली. एक मुलगा आणि दोन मुली. आपल्या तिसऱ्या मुलीचे नाव त्याने हिपेटिया ठेवले. कदाचित आपल्या जुन्या प्रेमाची आठवण त्याच्यातल्या कवीता विसरता आली नसेल. सुसान्हाच्या प्रेमात आणि घरातल्या तीन गोड मुलांत गुंतून समाधानाचे गृहस्थी जीवन जगण्याइतके चार्ल्सचे आयुष्यध्येय सीमित नव्हते. कायद्याचे उत्तम ज्ञान त्याने मिळविले होते आणि ज्यांना न्यायाची गरज आहे अशा गरिबांचा कैवार त्याने मनोमन घेतलेलाच होता. स्वातंत्र्य, न्याय आणि समता यांच्याशी त्याचा संबंध केवळ शाब्दिक नव्हता, तो जीवनमूल्यांचा होता. आणि जीवनमूल्ये हाच माणसाचा खरा आधार तीच माणसाची खरी शक्ती, तेच त्याचे प्रेम आणि श्रेयही. अशा आंतरिक विश्वासाने माणूस जेव्हा उभा राहतो, तेव्हा कुटुंबाच्या, देशाच्या भाषेच्या मर्यादाही त्याच्यासाठी मर्यादा राहत नाहीत. 

चार्ल्स इंग्लंडच्या सार्वजनिक जीवनात ओढला गेला. 'रिफॉर्मर लीग’ चा तो प्रमुख नेता बनला. ट्रफल्गार स्वेअर आणि हाइड पार्कमधली त्याची विविध प्रश्नांवरची भाषणे गाजू लागली. तो इटलीला व्यावसायिक कामासाठी गेला खरा; पण त्याच्या स्वातंत्र्यप्रेमाने त्याला मॅझिनी आणि गॅरीबाल्डीसाठी बोलते केले. तो स्पेनला गेला.. तिथेही त्याने स्वातंत्र्याचा उदोकार करणारी भाषणे केली. इंग्लंड हे प्रजासत्ताक राष्ट्र झाले पाहिजे, असा त्याचा आग्रह होता आणि राजसत्तेला न घाबरता त्याने आपला तो आग्रह निर्भयपणे प्रकट केला. दोन वेळा त्याने अमेरिकेचा व्याख्यानदौरा केला आणि तो अर्धवट राहिला. दोन वेळा त्याने ब्रिटिश संसदेच्या सदस्यत्वाची निवडणूक लढवली आणि तो पराभूत झाला. अर्थात पराजयाचे विजयात रूपांतर करण्याची शक्ती त्याच्याजवळ अंतर्हित होती. ज्यांचे अपयश निर्णायक असते. अशा दुर्मिळ माणसांमधला तो एक होता. अनेक वर्षांचा कायद्याचा अभ्यास त्याने लोकमंगलाच्या भावनेने समृद्ध केला होता. सर्वसामान्यांसाठी आणि गरिबांसाठी त्याची दारे नेहमी खुली होती. दिवसातला काही वेळ त्याने त्यांच्या मदतीसाठी राखून ठेवला होता. युद्धे त्याने शस्त्रांनी केली नाहीत, तत्त्वांनी केली आणि नेहमीच त्या युद्धांत कायदा आणि न्याय त्याच्या बाजूने राहिला. 

एकट्याने धुमाळीत उतरणे त्याला कधी अवघड वाटले नाही. पण अॅनी मदतीला आली आणि तेरा वर्षे त्याला त्याच्या खडतर आयुष्यात जिवाभावाची सोबत मिळाली. तो अॅनीपेक्षा चौदा वर्षांनी मोठा होता. अॅनी भेटली तेव्हा ऑस्टिन होस्पॉक नावाचा फ्री थॉट चळवळीतला एक अग्रणी कार्यकर्ता त्याने गमावला होता. शिवाय ऑस्टिन त्याचा केवळ सहकारी नव्हता; तर विश्वासू मित्रही होता. ऑस्टिनला मृत्यूने ओढून नेले आणि त्या दुःखावर अॅनीच्या येण्याची जणू फुंकर घातली गेली. चार्ल्सला अॅनी भेटली ती त्याच्या व्यक्तित्वाने मंतरलेल्या अवस्थेत. त्या भेटीपूर्वी तिने त्याचे 'नॅशनल रिफॉर्मर या नियतकालिकाचे अंक पाहिले, वाचले होते. स्वतः लिहिलेला एक लेख घेऊन नंतर दोन-तीन दिवसांनीच ती त्याला त्याच्या स्टडीत पुन्हा भेटली; आणि विचारांची सूत्रे जुळत गेली. चार्ल्सने अॅनीला 'नॅशनल रिफॉर्मर’च्या कामात सामील होण्याची विनंती केली आणि आठवड्याला केवळ एक गिनी, एवढ्या लहानशा मानधनावर अॅनी संपादक मंडळात रुजू झाली. 'अजेक्स' या टोपण नावाने तिने लेखनही सुरू केले.

अॅनीने चार्ल्सला आपल्या घरी निमंत्रित केले तेव्हा प्रथम त्याने नकार दिला. त्याच्याशी केलेल्या मैत्रीची अॅनीला मोठी किंमत द्यावी लागेल, असे त्याने तिला समजावले. पण अॅनीला त्याचे मोठेपण अचूक समजले होते. एखाद्या नीलमण्यासारखी ती मैत्री! एकाच वेळी घातक आणि संजीवक. तिने ती गमावण्याचा वेडेपणा केला नाही. मग तो आला. नॉरवुडच्या तिच्या घरी अधूनमधून सहजपणे येतच राहिला. त्याचा दिनक्रम खूप साधा होता. तो पहाटे लवकर उठायचा. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये निवडून गेल्यानंतर पहाटे चार वाजेपर्यंत काम करून परतल्यानंतरही त्याच्या उठण्याच्या वेळेत फारसा फरक नसे. आठ म्हणजे आठ वाजता तो नाश्ता करी. साडेबाराला जेवण आणि जेवणानंतर कपभर चहा. चार वाजता पुन्हा चहा. सात वाजता सपर आणि आठ वाजता डिनर. एखादा मांसाचा तुकडा, ब्रेड-बटर, चहा इतके साधेसे त्याचे खाणे असे. फार लहान सहान गोष्टींनी तो चटकन् समाधानी होई. कितीतरी वर्षे तो सकाळी सकाळी अॅनीच्या घरी येई. गरीब माणसांना कायद्याचे मोफत शिक्षण देण्याचे त्याचे काम संपवून स्वतःच्या कामाचे कागद आणि पुस्तके घेऊन तो तासन् तास तिच्या घरी लिहीत वाचत बसे. तीही तिच्या स्वतःच्या कामात गुंतलेली असे. एकमेकांशी बोलण्याची गरज असेच, असे नाही. जेवणापुरती, चहापुरती विश्रांती घेत आणि मग पुन्हा काम, रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा! एकमेकांच्या सान्निध्याची जाणीव मनात ठेवून कामाचे डोंगर उपसण्याचे ते सुंदर दिवस होते. कधी एखादा तास पत्ते खेळण्यात जाई. कधी एखादा दिवस मोकळा फिरण्यात जाई. रिचमंड पार्कमधल्या भल्याथोरल्या झाडांच्या सावलीत, विंडसरच्या झाडांच्या गर्द राई, किंवा एका गंमतीदार जागेत चहा घेण्यात त्यांना आपल्या सगळ्या ताणांचा विसर पड़े. हॅमल्टन कोर्टला परिसराचे देखणेपण निरखत ते हिंडत. मेडनहेड आणि टॅपसोला नदीचे आकर्षण त्यांना ओढून नेई. सर्वात हवीशी जागा म्हणजे ब्रॉक्सबोर्न. तिथल्या नदीपात्राचा इंचनइंच चार्ल्सला माहीत होता. आपला मासेमारीचा गळ घेऊन तो विश्रब्धपणे नदीकाठाने हिंडत जाई. 

अॅनीला मासेमारीचा खेळ शिकवण्याचा त्याने पुष्कळदा प्रयत्न केला. त्या खेळाचे हुकमी एक्के त्याच्याकडे होते. तिला त्याने तेही दाखवले. पण अॅनी त्यात फारशी रमली नाही. ती रमली त्याच्या बोलण्यात, तिच्याबरोबर निवांत फिरताना तो तिच्यापुढे आपल आंतरविश्व उलगडत राही. तिला आपल्या इच्छा-आकांक्षा तो सांगे, त्याच्यापुढचे प्रश्न, त्याच्यासमोर ठाकलेली आव्हाने, हजारो गोरगरिबांनी त्याच्यात एकवटलेल्या त्यांच्या आशा यांच्याविषयी तो बोलत राही. संसदेत जाणे ही त्याची व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा नव्हती. ती त्याच्या कार्यातून निर्माण झालेली आत्यंतिक गरज होती. त्याला संसदेत जायचे होते ते सुधारणेचे कार्यक्रम अधिक परिणामकारक रीतीने राबविण्यासाठी, लोककल्याणाचे कायदे मंजूर करून घेण्यासाठी आपल्या लेखणीने आणि वाणीने जे युद्ध तो लढत होता, त्या युद्धासाठी अधिक प्रभावी शस्त्र त्याला हवे होते. सांसदीय अधिकाराचे शस्त्र. 

तो अॅनीपाशी बोलत असताना इंग्लंडच्या भूमीविषयीचे प्रेम त्याच्या शब्दांतून पाझरत येई. ब्रिटिश संसदेविषयीच्या आदराने तो भरून येई. आपल्या देशाच्या क्रौर्याचे आणि त्यांच्याकडून घडलेल्या महापराधांचे स्मरण त्याला व्याकुळ करी. भारतासाठी त्याच्या आयुष्याच्या अखेरीला त्याने जे केले ती काही अकस्मात घडलेली घटना नव्हती. कितीतरी वर्षे तो भारताचा विचार करीत होता. त्याच्या हक्कांविषयी बोलत होता, मांडत होता. अॅनी त्या धडपडीची सर्वात निकटची साक्षीदार होती. तिच्या घरी येताना त्याने पहिल्यांदाच त्याच्या मैत्रीची किंमत देण्याविषयी तिला इशारा दिला होता. तशी किंमत तिला सतत चुकवावी लागली. इंग्लिश समाजापासूनच नव्हे तर अनेक समविचारी कार्यकर्त्यांपासूनही तिला दूर रहावे लागले. पण एक क्षणभरही तिच्या मनात खंत निर्माण झाली नाही. पश्चात्ताप तर कधीच नाही. स्त्रीला भेटलेला सर्वांत कुलीन, सर्वात थोर मित्र म्हणून तिने त्याचे वर्णन केले. त्याच्यामुळे ती सर्वांगांनी बहरली. तिचे विचार, तिची सार्वजनिक संवेदनशीलता, तिच्या भावनांची प्रगल्भता, तिचे लेखन आणि सर्वांत लक्षणीय म्हणजे तिचे बोलणे- तिचे भाषण या सगळ्या गोष्टींना कसदारपणा, सामर्थ्य आणि तेज मिळाले ते चार्ल्समुळे. तिच्याजवळ सारे होतेच. त्याच्यामुळे ते जागले. उजळले. झळझळले. लग्नानंतर एकदा मनाच्या अस्वस्थ स्थितीत एका रिकाम्या चर्चमध्ये उभे राहून तिने पहिले भाषण केले होते. समोर एकही श्रोता नसताना केवळ आतल्या उमाळ्याने केलेले भाषण. स्वत:च्या शब्दांची जादू तिने तेव्हाच अनुभवली होती. चार्ल्समुळे आता ती जाहीरपणे अनुभवण्याची इच्छा तिला झाली. कॅसल स्ट्रीटवरच्या कोऑपरेटिव सोसायटीच्या हॉलमध्ये स्त्रियांचे राजकारणातील स्थान या विषयावर तिने प्रथम व्याख्यान दिले आणि ऐकताना चार्ल्स म्हणाला, “धिस इज प्रोबेविली दी बेस्ट स्पीच बाय अ वुमन.” 

त्या भाषणानंतर जवळजवळ वर्षभराने चार्ल्सच्या रिफॉर्मर लीगच्या व्यासपीठावर अॅनी बोलण्यासाठी उभी राहिली आणि मग अपरिहार्यच झाली. ती उत्तम वक्ता होती. तिचे बोलणे प्रवाही आणि आवेगपूर्ण असे. तिचा आवाज प्रथम थोडा कमजोर वाटायचा पण हळूहळू तो जोरकस झाला. ती पहिल्या दर्जाची कार्यकर्ती होती. विश्रांती न घेता लिहिणे बोलणे तिला सहज शक्य होत असे. तिची एकाग्रता आणि स्मरणशक्ती उत्तम होती. कोणत्याही गोंधळात हाती घेतलेले काम पूर्ण करण्याची तिची क्षमता होती.

ती चार्ल्सची मैत्रीण आणि सहकारी झाली तेव्हापासून त्याच्या मृत्यूपर्यंत ती त्याची निकटची सोबतीण होती. 1874 मध्ये त्यांच्या प्रथम भेटीनंतर महिन्याभरानेच संसदेची दुसरी निवडणूक झाली. फेब्रुवारीमध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत चार्ल्स पराभूत झाला होता. दुसरीतही तो पराभूत झाला. पण त्याच्या मतदारांमध्ये वाढ झाली आणि अॅनीला सार्वजनिक जीवनातल्या समरप्रसंगांचा पहिला अनुभव मिळाला. 1875 मध्ये पूर्ण विचारांती फ्री थिंकर आणि रिफॉर्मर म्हणून प्रचारकार्य सुरू करण्याचा निर्णय अॅनीने घेतला. 

या निर्णयाचे परिणाम गंभीर झाले. चार्ल्सच्या सार्वजनिक जीवनातील भल्याबुऱ्या घटनांशी ती सहकारी, सहविचारी म्हणून जोडली गेली आणि धर्मश्रद्ध अशा समाजगटात तिची प्रतिमा कायमची कलंकित झाली. इतकेच नव्हे तर तिच्या छोट्या मुलीवर, मेबलवर तिच्या धार्मिक बंडखोरीचा विपरित परिणाम होऊ शकतो- होतो आहे. या आरोपाची ती बळी ठरली आणि फ्रँक बेझंटने कोर्टात रितसर खटला भरून मेबलला तिच्यापासून हिरावून घेतले. 

अॅनीला परिणामांची कल्पना नव्हती असे नव्हे; पण विचारपूर्वक घेतलेल्या त्या निर्णयानंतर परिणामांची क्षिती नव्हती. सबंध देशभर तिने व्याख्यानांचा दौरा केला. चार्ल्स त्यावेळी अमेरिकेचा दोन वेळा अपुरा राहिलेला व्याख्यानदौरा करण्यासाठी गेला होता. मात्र तिथे तो टायफॉईडने आजारी पडला आणि जवळजवळ मरणाच्या दारात पोचला. व्याख्यानदौरा अपुरा राहिला, पण त्या काळात त्याने दाखवलेले धैर्य, त्याची सहनशक्ती आणि त्याची शांती यांची तारीफ अमेरिकन वृत्तपत्रांनी आवर्जून केली. तो मायदेशी परतला, तेव्हा लहान बाळासारखी त्याची काळजी घ्यावी लागली. त्याची मुलगी हिपेटिया आणि सखी अॅनी त्याला सांभाळण्यासाठी तत्पर होत्या. शिवाय त्याच्या अनुपस्थितीत त्याचे सोसायटीचे आणि 'नॅशनल रिफॉर्मर’चे कामही अॅनीने व्यवस्थित सांभाळले होते. त्या काळापासून अॅनी सोसायटीची व्हाइस प्रेसिडेंट झाली. चार्ल्स स्वतः प्रेसिडेंट होता. 

1890 मध्ये चार्ल्सच्या मृत्यूपूर्वी वर्षभर अॅनीने ते पद सोडले. 1877 मध्ये दोघांच्या सत्त्वपरीक्षेची वेळ आली. डॉ. चार्ल्स नोस्टन नावाच्या एका अमेरिकन डॉक्टरने कुटुंबनियोजनाची तरफदारी करणारी एक पुस्तिका 1835 मध्ये लिहिली होती. अनेक वर्षे ती इंग्लंड अमेरिकेत विकली जात होती. मात्र एका विक्रेत्याने काही अयोग्य चित्रे घालून ती पुस्तिका विक्रीला आणली आणि त्याच्यावर खटला झाला. तो विक्रेता दोषी ठरला.

त्या वेळी पुस्तिकेवर बंदी आली आणि ती बंदी चार्ल्सला अयोग्य वाटली, ते साहजिक होते. कुटुंबनियोजन हा विषय चर्चेतून बाद कसा होऊ शकतो! चर्चेचे स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे. या भावनेने चार्ल्स आणि अॅनीने ती पुस्तिका पुन्हा छापली आणि पोलिसांना तिच्या विक्रीसंबंधी रीतसर माहिती कळवली. तुरुंगवासाच्या शिक्षेपर्यंतचे परिणाम त्यांना अनपेक्षित नव्हते. पण प्रत्यक्षात घडले ते त्याहूनही भयंकर होते. त्या दोघांच्या प्रतिष्ठेवर आणि पावित्र्यावरच अमंगल आरोपांचे शिंतोडे उडवले गेले. चार्ल्सची संसदेतल्या प्रवेशाची आशा धुळीला मिळवणारा गदारोळ उठला. अॅनीने निर्माण केलेली स्वतःची शालीन धिटाईची स्वच्छ प्रतिमा डागली. एखाद्या स्त्रीवर ओढवू नये अशी बदनामी तिच्या वाट्याला आली. पुरेशी आर्थिक क्षमता नसणाऱ्या कष्टकरी गरीब वर्गाला डोळ्यांसमोर ठेवून या पुस्तिकेचे प्रकाशन दोघांनी केले होते. मात्र त्यांच्या हेतूचा संपूर्ण विपर्यास केला गेला; आणि खटल्याची मानहानी त्यांच्या वाट्याला आली. पण या सगळ्यांमधून जाताना दोघांना एकमेकांची भक्कम साथ होती. या खटल्यातून विजयी होऊन ते बाहेर पडले. त्यांनी पुस्तिकेची विक्री करण्याचा हक्क परत मिळविला आणि विक्री केली. शिवाय जोडीला 'लॉ ऑफ पॉप्युलेशन' ही अॅनीने तयार केलेली आणखी एक पुस्तिकाही आणली. 

मात्र अॅनीसाठी या लढाईतला विरोधाचा बार जबरदस्त होता आणि तो तिच्या मर्मस्थानावरच होता. वर्षातला एक महिना मेबल तिच्या वडिलांकडे सुट्टीत रहायला जात असे. तशी ती गेली असताना तिला परत न पाठवता फ्रैंक बेझंटने तिला अज्ञातस्थळी लपवून ठेवले. अॅनी अस्वस्थ झाली. अखेर तिने कोर्टात जाण्याची धमकी दिली तेव्हा त्याने मेबलला परत पाठवली खरी; पण ती कायमचीच अॅनीपासून दूर होईल अशी व्यवस्था करून. फ्रँकने अॅनीविरुद्ध कोर्टात रीतसर अर्ज केला होता. प्रक्षोभक धर्मविरोधी भाषणे आणि लेखन करणाऱ्या चार्ल्स ब्रॅडलॉसारख्या नास्तिकाबरोबर सहकार्य करणाऱ्या आणि त्याच्या संबंधात राहून ख्रिश्चन धर्माला हानी पोचवणारे कार्य करणाऱ्या अॅनीचे संस्कार आपल्या मुलीवर होणे धोक्याचे आहे, असे फ्रँकने नमूद केले होते. तापाने फणफण मेबलच्या उशाशी बसलेल्या अॅनीस ही नोटीस मिळाली आणि आपली केस आपणच मांडण्याचा निर्णय तिने घेतला. ही गोष्टही समाजाला विस्मित करणारीच होती. 

खटल्याचा निकाल देताना न्यायाधीशांनी म्हटले होते की “जरी अॅनी बेझंट यांनी मुलीची शक्य तितकी सर्वतोपरी काळजी घेतली आहे. तरी तिला निधर्मी विचारांचे संस्कार देऊन ख्रिश्चन धर्माच्या शिकवणुकीपासून वंचित ठेवणे ही गोष्ट मुलीचा नाश घडवणारीच आहे. म्हणून तिला आईपासून दूर ठेवणेच सर्वदेव योग्य आहे.” 

मेबल अॅनीपासून कायमची हिरावली. अॅनी खंबीर लढवय्या स्त्री होती खरी पण तिच्यामधली आई त्या क्रूर प्रसंगाने कोसळून पडली. एकाकीपणा, अपमान, दुःख, थकवा, ताण अॅनी प्रचंड आजारी पडली. त्या भयंकर यातनामय, शक्तिपात घडवणाऱ्या आजारातून अॅनीला सावरले ते चार्ल्सने. कित्येक दिवस ती अंथरुणात होती आणि कित्येक दिवस चार्ल्स तिची शुश्रूषा करत होता. तो रोज यायचा. तिला बर्फ घातलेले दूध पाजायचा. तिच्या उशाशी लिहीत बसायचा. आपल्या इतर सर्व भेटीगाठी त्याने पूर्ण थांबवल्या होत्या. अॅनीच्याच शब्दात सांगायचे तर 'एका पुरुष मित्रापेक्षासुद्धा एक मृदुमवाळ आई होऊन त्याने माझी शुश्रूषा केली. मला जगवले.' अॅनी आजारातून उठली आणि पुन्हा एकदा झगडायला सिद्ध झाली. कोणताही खटला या संदर्भात दाखल करण्याला अॅनीला प्रतिबंध करणारी तजवीज फ्रेंकने केली होती. अॅनीने त्याविरुद्ध आवाज उठवला. पण पुन्हा विवाहबद्ध झालेल्या आईच्या विरोधात बापाच्या बाजूनेच अपीलाचा विचार झाला. अॅनीवर हा फार मोठा अन्याय होता. ती चार्ल्सची मैत्रीण होती. सहकारी होती. असे असताना तिला पुनर्विवाहित आईच्या पंक्तीला बसवून तिच्या चारित्र्यावर तर फ्रेंकने डाग उठवला होताच, पण न्यायालयानेही त्या प्रकरणी तिला जवळजवळ व्यभिचारी ठरवले होते. या सर्व प्रकरणात अॅनीला फक्त मुलांच्या भेटीची परवानगी मिळाली आणि प्रत्येक भेटीत नवऱ्याकडून अनुभवाला येणारी अवहेलना, क्रूर उपहास, निंदा यांमुळे मुलांना होणाऱ्या यातना आणि त्यांच्या मनाची होणारी कुतरओड थांबावी म्हणून तिने ती वाटच आपल्या हातांनी मिटवून टाकली. 

तिने आपल्या अंतरात्म्याने दाखवलेल्या दिशेने चालण्याचा निर्णय घेतला आणि धर्मश्रद्ध समाजाने त्याची एवढी जबर शिक्षा दिली. तिला समविचारी मित्र भेटला आणि त्याची सहकारी होण्याचे फळ तिला इतक्या कटू रीतीने भोगावे लागले. ही किंमत फार होती. पण तिने ती चुकवली आणि चार्ल्सबरोबर ती पुढच्या सार्वजनिक जीवनातल्या लढायात राहिली. चार्ल्स संसदेत निवडून आला. सर्वसामान्य माणसांच्या हक्काचे अनेक प्रश्न त्याने घसाला लावले. त्याच्यावर भ्याड हल्ले झाले. प्राणघातक संकटांमधून त्याला जावे लागले. पण उदारमतवादी सुधारक पक्षाची बांधणी करण्यात तो यशस्वी झाला. 

एकीकडे प्रचंड कर्ज, दुसरीकडे प्रचंड कार्य! त्याची प्रकृती क्रमाने खालावत गेली. 1888 मध्ये त्याची एक मुलगी अॅलिस मृत्युमुखी पडली, मुलगा आधीच गेला होता, पत्नीही वारली होती. अॅलिसच्या मृत्यूने चार्ल्स आणखी खचला. एखाद्या भव्य पहाडासारखा तो माणूस होता. पण त्याला व्याधींनी पोखरले. तो पुन्हा आजारी पडला. त्यातून तो थोडाफार सावरला तो त्याच्या भारतभेटीने. 

1888 पासूनची त्याची शेवटची दोन वर्षे भारतासाठीच त्याने जणू वाहिली होती. तो सतत भारताविषयी बोलत होता, लिहित होता, व्याख्याने देत होता. संसदेत भारताची बाजू हिरीरीने मांडत होता. 1889 च्या अखेरीला मुंबईत भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनासाठी तो भारतात आला. तेव्हा तो शरीराने खंगलेला होता. आजारपण पुरते हटलेले नव्हते. मधल्या वर्षांमध्ये त्याची प्रिय मैत्रीण अॅनी त्याच्या व्यक्तिगत आयुष्यातून दूर गेली नसली तरी त्याच्या विचारप्रणालीपासून मात्र दूर होत गेली होती. ईश्वरावरची तिची श्रद्धा थिऑसॉफीने पुन्हा जिवंत केली होती. तिच्यातला फ्री थिंकर पूर्ण मावळला होता. समाजवादी विचारसरणीने ती प्रभावित झाली होती आणि जगभरातल्या त्या विचारसरणीच्या जोरदार उठावानंतर 1887मध्ये तिने 'नॅशनल रिफॉर्मर’ च्या सहसंपादकत्वाचा राजीनामा देऊन चार्ल्सच्या हातातला आपला साहाय्याचा हातही काढून घेतला होता. 

1889 च्या प्रारंभी नॅशनल सेक्युलर सोसायटीच्या अध्यक्षपदाचा त्यानेही राजीनामा दिला. जी संस्था त्याने स्थापन केली, वाढवली, जिच्या बळावर त्याने झुंजी घेतल्या, तिची सूत्रे त्याने खाली ठेवली, तेव्हाच त्याच्या अंतिम प्रयाणाचे पडघम वाजू लागले होते.

तो भारतात आला. त्याची मुलगी त्याची काळजी घेणारी त्याची लाडकी हिपेटिया त्या वेळी त्याच्याबरोबर येऊ शकली नव्हती. दर बंदरातून तो तिला खुशालीचे पत्र पाठवत होता. तो मुंबईला पोचला तेव्हा प्रकृतीने खूपच विकल झालेला, शिणलेला होता; पण बंदरावर त्याचे जे अतीव प्रेमाचे स्वागत झाले, त्याने त्याला उभे राहण्याचे बळ दिले. अधिवेशनाचे प्रतिनिधी आणि रसिक श्रोते मिळून पाच हजारांच्या समूहाने चार्ल्सचे दर्शन होताच त्याला उभे राहून मानवंदना दिली.

टाळ्यांच्या गजरात त्याने व्यासपीठावर पाय ठेवला आणि प्रत्येक भारतीयाच्या हृदयाला स्पर्श करील असे लहानसे भाषण केले. तो म्हणाला, "माझ्याबद्दल काही जण उपहासाने म्हणतात की मी ब्रिटिश संसदेतला भारताचा प्रतिनिधी आहे. पण मला खरोखरच ते पद धारण करायला आवडेल. न्यायाच्या बाजूने आणि दडपणांच्या विरोधात मी जी लहान लहान कामे करीत आलो, त्यामुळे मी त्या पदाला पात्र झालो आहे असे मला वाटते. तुमच्या बाजूने कायदा आहे. तुम्ही त्याच्याशी निष्ठावंत आहात आणि तुम्हांला पाठिंबा देणे हे माझे कर्तव्यच आहे. माझा विश्वास आहे की तुम्हांला जिंकण्याची आकांक्षा आहे आणि न्याय, स्वातंत्र्य आणि समता यांच्या मर्यादेत ती आकांक्षा तुम्ही घरली आहे....

..इथे या समूहात स्त्रियाही बसलेल्या आहेत, हे पाहून मला आनंद वाटतो. त्या संख्येने थोड्या असतील पण त्या तुमच्या माता आहेत आणि तुमच्या मुलांवर त्यांचे संस्कार असतील. माझ्या देशाप्रमाणेच इथे तुम्हीही हे जाणून आहांत की स्त्रिया त्यांच्या पतींना उत्तम सल्ले देऊ शकतात आणि मला वाटते की नवरा बायकोकडे सल्लामसलतीसाठी गेल्याविना कोणतीही थोर कृत्ये होऊच शकत नाहीत… मी तुम्हांला विनंती करतो की तुमचे विचार, तुमच्या मागण्या तुम्ही शब्दबद्ध करा. माझ्याकडे द्या आणि माझ्या देशात मी त्या निश्चितपणे मांडत राहीन. आपण आपल्या विचारांचे सामर्थ्य वापरू या. इतर कोणतीही छुपी संघटना नको. सर्व स्वच्छ, कायद्यासमोर उघड असू द्या… तुमच्यासमोर कदाचित माझे हे पहिले आणि अखेरचे भाषण असेल, पण तिथे माझ्या देशातल्या संसदेत मी जेव्हा बोलत असेन, तेव्हा तुमच्यासाठी बोलत असेन आणि तुम्ही ते ऐकता आहात या भावनेने बोलत असेन. मी योग्य ते बोललो तर तुम्ही माझ्याविषयीच्या उदार प्रेमाने मला दाद द्याल; आणि तुमचा आवाज पुरेसा उमटला असे तुम्हाला वाटले नाही, तरी मी माझ्या प्रयत्नांत कमी पडलो नाही, असे तुम्ही निश्चितपणे म्हणाल...” 

चार्ल्सच्या या भावनाप्रधान भाषणानंतर टाळ्यांचा गजर झाला आणि भारताच्या कानाकोपऱ्यांतून शेकडो मागण्यांचे अर्ज त्याच्याकडे आले. काही अर्ज अतिशय सुंदर वेष्टनांमधून आले होते. काही निवेदनांसोबत चंदनाच्या, हस्तिदंताच्या आणि सोन्या-चांदीच्या कलाकुसरीच्या वस्तू होत्या. ती निवेदने, तो आशेने भरून गेलेल्या हजारो माणसांचा समुदाय, तो उत्साह, तो उसळता अभिमानी जल्लोष पाहताना, भाषणे ऐकताना चार्ल्सच्या आजारी शरीरात नवे चैतन्य भरले गेले. त्याला खरे तर भारताचे विविध प्रांत पाहायचे होते. माणसे पाहायची होती. पण त्याच्या शरीरात तेवढे त्राण नव्हते. परतीची वाट धरणे त्याला भागच होते. मुंबईहून तो परत निघाला तेव्हा बंदरापर्यंतच्या रस्त्यावर सर वेडरबर्नसमवेत जाताना त्याच्यावर फुलांचा वर्षाव करीत लोक उभे होते. 

भारतयात्रेच्या अत्यंत सुखद आठवणी बरोबर घेऊन तो मायदेशी इंग्लंडला परतला. पुन्हा एकदा आपल्या टेबलाशी बसून उमेदीने कामाला लागला, पण आता दिव्यातले तेल संपत आले होते. आतली ज्योत मंदावली होती. जुन्या सहकाऱ्यांना भेटताना डोळे पाणावत होते. भाषणे करण्याची ताकद उणावली होती. कार्डियल मैनिंग किंवा हिंडमनसारख्या मातब्बरांशी प्रतिवाद करण्याची ऊर्मी मधूनच उसळी घेत असली, तरी आता आयुष्यातली धग संपत आली होती. 1890 साल जेमतेम संपले आणि 1891 चा जानेवारी महिना सरता सरताच चार्ल्सने कायमचे डोळे मिटले. वयाच्या सत्तावन्नाव्या वर्षी तो निधन पावला. त्याचे अगणित सहकारी आणि इंग्रज, स्कॉच, आयरिश, वेल्श, हिंदू अशी हजारो गरीब, साधीसुधी माणसे त्याच्या अंत्ययात्रेत होती. दोन रॉयल कमिशनांचे अधिकारी होते. मानवंदना देणारे सैनिक होते आणि त्यांच्यावर प्रेम करणारे त्याचे हितचिंतकही होते. त्याची कबर अगदी साधी. तिच्यावर काही लिहायची जरूरीच नव्हती. तो पुष्कळसे कर्ज मागे ठेवून गेला होता. त्याच्या कार्यासाठीच त्याने करून ठेवलेले कर्ज. तो गेल्यानंतर धनकांनी त्या कर्जापैकी फक्त दहा टक्के रक्कम परत घेण्याची तयारी सहजपणे दाखवली. त्याची पुस्तके आणि भारतातून त्याला मिळालेल्या भेटी विकून बरीचशी रक्कम उभी झाली. उरलेली भर लोकांनी स्वयंस्फूर्तीने निधी उभारून जमा केली आणि चार्ल्स मरणोत्तर कर्जमुक्त झाला. त्याने करून ठेवलेले पैशांवाचूनचे आणखीही काही कर्ज होते. हजारो गरीब माणसांचे प्रेम त्याने स्वीकारले होते. त्यांच्यासाठी तो आयुष्यभर झगडत आणि कष्टत आला होता खरा; पण त्यामुळेच त्यांच्या आशांची, त्यांच्या स्वप्नांची पुंजी त्यांनी त्याच्या हवाली केली होती. तो स्वातंत्र्य आणि समतेचा पुरस्कर्ता होता म्हणून भारताने- एका परतंत्र देशाने मोठ्या विश्वासाने आपले प्रतिनिधित्व त्याला बहाल केले होते.

त्या सगळ्या आशा-आकांक्षांची, वचनांची, विश्वासाची परतफेड अजून व्हायची होती. त्याच्या मैत्रिणीने तो भार उचलला आयुष्यभर तीही त्याच्याचसारखी स्वातंत्र्यासाठी, समतेसाठी माणसांच्या उच्चतर आयुष्यासाठी झुंजत राहिली. त्याच्या मृत्यूनंतर आपले उरलेले आयुष्य तिने भारतासाठीच जणू खर्ची घातले. तिची त्याची मैत्री मृत्यूच्या मर्यादेलाही ओलांडून तिने सांभाळली ती अशी सर्वस्वाची किंमत देऊन!

तो गेला आणि तिने लिहिले, “माझे शब्द पक्षपाती नाहीत, अशी वंचना मी करणार नाही. तो माझा प्रिय मित्र होता. त्याच्या चुका मला दिसल्या नाहीत, असेही मी म्हणणार नाही. पण त्याच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची शोभा वाढवणारे असे कलंक नव्हते; तर काजळठिपके होते. जिथे पोटातली माया असते तिथे मित्रांचा आपण न्याय थोडाच करतो? आपण तर प्रेम करतो... आज नव्हे, पण दूर विसाव्या शतकात, आपली भांडणे आणि गोंधळ जेव्हा निवले असतील आणि आपले जळते प्रश्न थंडावले असतील तेव्हा इतिहास आपल्या शांत नजरेने त्याच्या आयुष्याचा आलेख वाचील, त्याने त्याच्या देशासाठी केलेल्या कार्याचे मूल्यांकन करील आणि मग त्याचे आयुष्य हातात घेईल. डाव्या नव्हे.... आपल्या उजव्या हातात. एखाद्या अमर ताऱ्याप्रमाणे ते चमकत राहील. इतरांसाठी जो नायक हिरो असतो तो निकटवर्तीयांसाठी अतिसामान्य असतो. कारण त्याचे मातीचे पाय त्यांना माहीत असतात. पण चार्ल्स ब्रॅडलॉचे मोठेपण असे, की त्याच्या जवळच्यांसाठीही तो थोरच होता. तो गंभीर वाटत असे, पण फुरसतीच्या वेळात तो लहान मुलासारखा होता, गमत्या आणि आनंदी. आमच्या व्यस्त आयुष्यातून मिळवलेले कितीतरी आनंदक्षण मला आठवतात. त्याच्या मोकळ्या सहवासात वेळ तेव्हा सोन्याच्या पावलांनी धावायचा. इंग्लंडच्या प्रेमाने भरून येऊन तो जी स्वप्ने पहायचा, ती मी त्याच्याकडून कित्येकदा ऐकली आहेत. स्त्रियांशी तो खूप आदराने आणि सौजन्याने वागायचा.

मला तर त्याच्याविषयी केवढी तरी कृतज्ञता वाटते. त्याने मला खूप दिले. त्याने केलेली समंजस टीका, त्याचे सहायक मार्गदर्शन, त्याचे सावध आडाखे... तो माझा सर्वांत कठोर आणि सर्वात सहृदय टीकाकार होता. मी प्रथम भाषणे करू लागले तेव्हा टाळ्यांची धुंदी मी चवीने चालू लागले. त्या धुंदीतून मला त्यानेच बाहेर काढले. आज माझ्या कार्यात जे काय मौलिक आहे ते त्याच्या प्रभावातून आले आहे.” आपल्या त्या लेखनाची सांगता करताना फार काव्यात्म शब्दांत तिने लिहिले आहे. ‘त्याने आपल्या असण्याने जगाला उदात्त केले, आपल्या त्यागाने श्रीमंत केले आणि आपल्या मृत्यूने दरिद्री केले.' आणि आपल्या आत्मचरित्रात त्याच्या आठवणी सांगताना अति मृदू होत तिने म्हटले आहे. “एकही कठोर शब्द तो मला कधी बोललेला नाही. आमचे मतभेद झाले, तेव्हा मला दाबून टाकण्याचा प्रयत्न त्याने एकदाही केला नाही. मी त्याची मते स्वीकारावी म्हणून त्याने माझ्यावर कधी दबाव आणला नाही. एखादा सच्चा मित्र आपल्याला वेदनांच्या अंधारातून जशी वाट दाखवतो, तशी त्याने दाखवली आणि माझ्याबरोबर त्याची अटळ दुखे त्याने वाटून घेतली. त्यांच्या विचारी वागण्यातून, तत्पर सहानुभूतीतून आणि सहृदय प्रेमातून मी माझ्या वादळी आयुष्यातला प्रकाश पाहात आले. त्याच्या इतका निःस्वार्थी माणूस मी दुसरा पाहिला नाही. तो जितका दृढ होता, तितकाच संयमी आणि धीराचा होता. माझ्याजवळ एवढ्यातेवढ्याने उसळणारी प्रवृत्ती होती आणि तिची स्थिरता मी फक्त त्याच्याकडूनच शिकले.” अॅनीच्या या उद्गारांशेजारी चार्ल्सच्या मुलीने हिपेरियाने त्याच्या चरित्रात काढलेले उद्गार अखेर ठेवावेसे वाटतात. तिने लिहिले आहे...

"They were mutually attracted, and a friendship sprang up between them of so close a nature, that had both been free, it would undoubtedly have ended in marriage. In their common labors, in the risks and responsibilities jointly undertaken, their Friendship grew and strengthened, and the insult and calumny heaped upon them only seoved to cement the bond." 

तो धागा मैत्री या नावानेच अखेरपर्यंत दोघांनी निखळ आत्मप्रेरणेने सांभाळला, हे त्या नात्याचे भाग्य आणि त्याला मळवणे शक्य झाले नाही हे जसे मोहप्रवण जीवनाचे, तसेच त्याला तोडणे शक्य झाले नाही हे मृत्यूचेही दुर्भाग्य.

Tags: सुधारक अजेक्स जीसीपॅकर साहित्य मुक्त विचार चळवळ बी. संजीवराव अॅनी बेझंट बनारस हिंदू विद्यापीठ आंतरराष्ट्रीय थियोसोफिक समाज हिंदू आध्यात्मिक पत्रिका धर्मशास्त्रीय विचार वक्ता वकील गरीबी वंचित शोषित आत्मचरित्र मृत्यू चार्ल्स ब्रॅड मैत्री राष्ट्रीय धर्मनिरपेक्ष समाज येशू कृष्ण हॉल ऑफ सायन्स Reformer Ajex G.C.Packer Literature Free thought movement B. Sanjivrao Annie Besant Banaras Hindu university International theosophic society Hindu spiritual magazine Theological thoughts Speaker Lawyer Poverty Deprived Exploited Autobiography Death Charles brad Friendship National secular society Jesus Krushna Hall of science weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अरुणा ढेरे,  पुणे

कवयित्री, लेखिका 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके