डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

1955 मध्ये इंदौरला ‘नाट्यभारती’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्याच वेळी भारत सरकारच्या ‘साँग ॲंड ड्रामा डिव्हिजन’तर्फे देश प्रबोधन करणारी प्रचारकी नाटकं खेड्यापाड्यांतून करण्याची योजना तयार झाली. सर्वच हिंदीभाषी राज्यांमधून ‘नाट्यभारती’चे नाटकांचे दौरे सुरू झाले. नाट्यभारतीत त्या वेळी सुमारे 50 ते 60 हौशी कलाकार होते, ‘नवप्रभात’, ‘हमारा गांव’, ‘मंगू’, ‘खाई’, ‘आराम हराम है’ वगैरे नाटकांतून ही मंडळी कामं करत होती. मी त्या वेळी सीहोरला कृषी महाविद्यालयात शिकत होतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत मीही ‘नाट्यभारती’च्या दौऱ्यात हजेरी लावत असे. राहुलजी व कलागुरू विष्णू चिंचाळकर ज्यांना आम्ही गुरुजी म्हणत असू, तेही असायचे. दिल्लीच्या तालकटोरा मैदानात दरवर्षी ‘ग्रीष्म नाट्य महोत्सव’ व्हायचा. मध्य प्रदेश शासनातर्फे फक्त नाट्यभारतीचीच नाटकं तिथं व्हायची. झाली. या दौऱ्यात माझी राहुलजींशी मैत्री अधिक दृढ झाली.

सोमवार 3 जून 1996 रोजी एक दुर्दैवी घटना घडली. राहुल बारपुते नावाची एक अत्यंत बुद्धिमान, प्रतिभावंत, निष्ठावान पत्रकार, कलामर्मज्ञ अधिकार आणि कर्तव्याची पुरेपूर जाणीव असलेली जीवनमूल्ये प्रामाणिकपणे जपणारी अत्यंत साधं राहणीमान असलेली पण असामान्य चेतना आणि ऊर्जा असलेली अजातशत्रू अशी व्यक्ती या धरेवरून प्रयाण करती झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे मित्र, सुहृद, हितचिंतक, सहकारी, नातलग मोठ्या प्रमाणावर एकत्र जमले होते. अत्यंत दुःखी अंतःकरणानं सन्मान व आदरपूर्वक त्या प्रचंड गर्दीनं त्यांना शेवटचा निरोप दिला.

त्याच दिवशी सायंकाळी मला नागपूरला जायचं  असतानाच थोरल्या बंधूंचा फोन आला अन्‌ ही बातमी समजली. प्रवासाची तयारी करत मी खरं तर इतका गडबडलो, गोंधळलो की नेमकं काय घडलंय अन्‌ मी काय करावं तेच मला सुधरेना. बाबाबरोबर मी गेलो व राहुलजींचं अंत्यदर्शन घेतलं. घरी परतताना त्या बधिर अवस्थेतही मनानं बजावलं, ‘‘अरुणभाऊ आज तुम्ही तुमच्या एका अत्यंत चांगल्या हितचिंतक मित्राला कायमचे मुकला आहात’’.

राहुलजी माझे मित्र असणं खरं तर थोडं विचित्रंच. वयानं ते माझ्याहून किमान वीस वर्षं तरी वडील होते. देखणं रूप, प्रखर बुद्धिमत्ता होती. त्यांना मित्रांचा तुटवडा नव्हता. देशपरदेशांत त्याचं नांव होतं. त्यांच्या मित्रवर्तुळाचा परीघही विस्तीर्ण होता. प्रसिद्ध गायक, वादक, नर्तक, लेखक, पत्रकार, रंगकर्मी, सिनेजगतातील व्यक्ती, डॉक्टर, इंजिनिअर, आर्किटेक्ट, शिक्षण महर्षी, थोर समाजसेवक, मोठमोठ्या पदांवरचे शासकीय अधिकारी...

कोण न्‌ कोण... कित्येक स्वार्थी संधिसाधूही आपण राहुलजींचे मित्र असल्याच्या बढाया मारून घेत. अशात त्यांची-माझी मैत्री कशी शक्य होती? पण ती होती अन्‌ आमच्या मैत्रीमागचं कारण होतं राहुलजींच्या स्वभावातला व्यक्तिमत्त्वातला सहज साधेपणा. गुण फक्त थोर व्यक्तींमधेच असतो. वयाचा अडसर हा आम्हांला कधीच जाणवला नाही. ‘आमच्या वेळी असं नव्हतं’, ‘ही आजकालची पोरं’ यासारखी भाषा राहुलजी कधीही वापरत नसत. तरुण पिढीविषयी ते फार आशावादी होते. म्हणायचे, ‘‘जग रोज सुधारतंय.’’ कोणतीही गोष्ट बघण्याची, ऐकण्याची, करून बघण्याची, वाचायची, चाखायची, समजून घेण्याची विलक्षण जिज्ञासा होती त्यांच्यात. त्यासाठी ते कायम तत्पर असायचे. एरवी ते बरे सुखासीन होते. पण अशा वेळी त्यांच्यातली ऊर्जा उफाळून यायची.

अलाहाबादच्या प्रसिद्ध नैनी विद्यापीठातून राहुलजींनी कृतषविज्ञानाची पदवी घेतली होती. त्यांचे खास मित्र रणवीर सक्सेना यांनी पुढील शिक्षण तिथंच सुरू ठेवलं. राहुलजी मात्रं इंदौरला परतले. देशप्रेम दोघांमध्ये ठासून भरलेलं. स्वातंत्र्यलढ्यात ते एकत्र होते. नेहरू त्यांचे आवडते पुढारी होते, तर गांधींपुढे ते कायम नतमस्तक होत.

इंदौरला परतल्यावर राहुलजी कुठल्याही शासकीय कार्यालयात किंवा कॉलेजात न जाता सरळ ‘मजदूर संघा’त व्ही.व्ही द्रविड यांच्याकडे नोकरीसाठी जाऊन थडकले. द्रविड म्हणाले, ‘‘25 रु. पगार देईन, महिन्याचा!’’

‘‘मला 24 रुपये पुरतील’’ राहुलजींचं उत्तर होतं. स्वेच्छेनं परत केलेला तो एक रुपया हे राहुलजींच्या आयुष्याचं सार होतं. त्यानंतर त्यांनी तात्या सरवटेंबरोबर वर्तमानपत्र काढलं अन्‌ शेवटी ते ‘नई दुनिया’त आले.

1955 मध्ये इंदौरला ‘नाट्यभारती’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्याच वेळी भारत सरकारच्या ‘साँग ॲंड ड्रामा डिव्हिजन’तर्फे देश प्रबोधन करणारी प्रचारकी नाटकं खेड्यापाड्यांतून करण्याची योजना तयार झाली. सर्वच हिंदीभाषी राज्यांमधून ‘नाट्यभारती’चे नाटकांचे दौरे सुरू झाले. नाट्यभारतीत त्या वेळी सुमारे 50 ते 60 हौशी कलाकार होते, ‘नवप्रभात’, ‘हमारा गांव’, ‘मंगू’, ‘खाई’, ‘आराम हराम है’ वगैरे नाटकांतून ही मंडळी कामं करत होती. मी त्या वेळी सीहोरला कृषी महाविद्यालयात शिकत होतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत मीही ‘नाट्यभारती’च्या दौऱ्यात हजेरी लावत असे. राहुलजी व कलागुरू विष्णू चिंचाळकर ज्यांना आम्ही गुरुजी म्हणत असू, तेही असायचे. दिल्लीच्या तालकटोरा मैदानात दरवर्षी ‘ग्रीष्म नाट्य महोत्सव’ व्हायचा. मध्य प्रदेश शासनातर्फे फक्त नाट्यभारतीचीच नाटकं तिथं व्हायची. झाली. या दौऱ्यात माझी राहुलजींशी मैत्री अधिक दृढ झाली.

त्याच सुमाराला नाट्यभारतीनं ‘लिटिल थिएटर’ सुरू केलं. तीन-चारशे प्रेक्षकांसमोर नाट्यभारतीचे हौशी कलाकार निवडक प्रायोगिक नाटकांचे प्रयोग सादर करीत असत. मुंबईला छबिलदासची नाट्य चळवळ किंवा पुण्यातली पी.डी.ए.ची नाटकं त्यानंतर सुरू झाली. यातल्या बऱ्याच नाटकांचं दिग्दर्शन राहुलजी करायचे. अभिनय व दिग्दर्शन दोन्हींत ते मातब्बर होते. इंदौरला त्याच वेळी महेंद्र जोशींनी ‘अंकुर फिल्म क्लब’ सुरू केला. मालू साहेबांचा ‘अभिनव कला समाज’, रामबागेतल्या मुळ्यांची ‘संगीत कला मंडळ’ ही संस्था आणि मुकुंद कुळकर्णींचं ‘अभ्यास मंडळ’ यांमुळे इंदौरचं एकूण  वातावरण साहित्य, संगीत व नाट्यमय झालेलं होतं. राहुलजी अर्थातच प्रत्येक ठिकाणी असायचेच. त्यांच्यामुळेच मला कलाजगतातील बारकावे समजून घेता आले. अनेक नामवंत व्यक्तींना प्रत्यक्ष व जवळून बघता, भेटता आलं.

74 आणि 76 मध्ये घडलेल्या दोन कारणांमुळे माझी व राहुलजींची दोस्ती घट्ट झाली, इतकी की माझी बायको मला कैक वेळा ‘बाबा वाक्यं प्रमाणं’ म्हणून चिडवायची किंवा आमच्या  ओमकार मित्र मंडळी (भालू, चंदू, पांडू, वीरू, सुलू, रंजू, बंडू) मध्ये मी जर गेलो तर मला सर्व चिडवायचे, ‘‘राहुलजींबरोबर राहून तू नेहमी उशिरा यायला शिकला आहेस.’’

74 मध्ये कुमार गंधर्वांच्या 50व्या वाढदिवसाचा मोठा सभारंभ देवासमध्ये होता. मी राहुलजींकडे प्रवेशपत्रिकेसाठी प्रार्थना केली. हेपण म्हणालो की मी त्या दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमात ‘कार’सेवा करायलापण तयार आहे. आधी ते काही बोलले नाहीत. पण एके दिवशी त्यांनी माझ्या हाती रीतसर आमंत्रणपत्र ठेवलं. त्यामुळे वसंतराव देशपांडे, मालिनी राजुरकर, वसंत देसाई, वसंत बापट, विंदा करंदीकर, मंगेश पाडगांवकर, कवी अनिल, रणजित देसाई यांचं मला सांस्कृतिक सौख्य लाभलं.

1976 मध्ये राहुलजी, बाबा डिके, गुरुजी चिंचाळकर बाबा आमट्यांच्या आनंदवनात निघाले. मीही त्यांच्यात ‘शिरलोच’. त्या वेळी आनंदवनात दरवर्षी ‘मित्रमेळावा’ व्हायचा. महारोग्यांची सेवा आणि ललित कलांचा उत्सव- असा सुंदर संगम बाबा आमट्यांनी घडवून आणला होता. देशातील नामवंत लेखक, नाटककार, डॉक्टर, वकील, पत्रकार, कवी, चित्रकार त्या मेळाव्यात हजेरी लावत असत. त्याच वर्षी पु.लं.नी शांतिनिकेतनच्या धर्तीवर प्रथमच बालतरूची पालखी काढून एक नवा पायंडा पाडला. इथूनच मी आनंदवनाशी कायमचा जोडला गेलो.

कुमारजींच्या ‘स्वरां’त जी ताकद होती तीच बाबा आमट्यांच्या ‘शब्दां’त होती. तीच ताकद राहुलजींच्या ‘विचारसरणी’त होती आणि गुरुजींच्या ‘रेषां’मध्ये होती. बाबा डिके नेहमी म्हणायचे, ‘‘राहुलजी आणि गुरुजींनी त्यांचं मोठेपण, त्यांची महत्ता अगदी सहजपणे, साधेपणा अन्‌ निर्मळ वागणुकीखाली झाकून ठेवली.’’ 

गुरुजींच्या आणि राहुलजींच्या व्यक्तिमत्त्वातला फरक जाणवायचा. त्यांच्या अभिव्यक्तीतही जाणवायचा. विचार, भावना व्यक्त करताना गुरुजी सौम्यपणे व्यक्त करायचे तर राहुलजींची अभिव्यक्ती उग्र असे. प्रखर बुद्धी अन्‌ तर्काच्या कसोटीवर विचार किंवा मुद्दा पारखून घेण्याच्या वृत्तीमुळे ते समोरच्याशी वैचारिक ढिशुमढिशुम करायला नेहमीच तत्पर असायचे.

एकदा मी कामावरून घरी परतत होतो. रेल्वे स्टेशनसमोर राहुलजी कुणाचीतरी वाट बघत उभे होते. मी सायकलवरून खाली उतरलो, त्यांना नमस्कार केला. आम्ही गप्पा मारू लागलो, बोलता बोलता ते म्हणाले, ‘‘तीन प्रश्न विचारतो, खरी खरी उत्तरं द्यायची.’’
‘‘विचारा’’, मी म्हटलं.
‘‘तू नोकरी का करतोस?’’ पहिला प्रश्न.
‘‘पैसे मिळवायला.’’
‘‘पैसे कशाला हवेत?’’ दुसरा प्रश्न.
‘‘जिवंत राहायला... जगायला...’’
‘‘जगायचं कशाला?’’ तिसरा प्रश्न.
‘‘काही घाई नाहीय. विचार करून उत्तर दे.’’ एवढं बोलून ते सायकलवरून निघूनही गेले.
मी विचारच करत होतो. चोवीस वर्षांच्या त्या माझ्या अपरिपक्व वयात मला कुठं कळंत होतं की या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात माणसाचं संपूर्ण आयुष्य निघून जातं...
राहुलजींची विचारसरणी पूर्णपणे वैज्ञानिक, तर्कशुद्ध आणि लोकशाहीशी प्रामाणिक अशी होती. हिंदीभाषी प्रांतातील लोकप्रिय दैनिक ‘नई दुनिया’त ते संपादक होते. ते म्हणायचे, ‘‘खरं तर संपादक वर्तमानपत्र चालवतो. पण मी एकमेव संपादक आहे ज्याला वर्तमानपत्र चालवतंय.’’

स्वतःच्या अटीवर ते काम करायचे. बरेचदा ते ऑफिसमध्ये असण्याऐवजी नाटकाच्या तालमीत असायचे. कुणी त्या संदर्भात तक्रर केली तर सहजपणे म्हणायचे, ‘‘माझा पगार कमी करा, कापून घ्या.’’

राहुलजींच्या साधेपणाचा एक किस्सा आहे, एकदा सहायक संपादक परदेशी गेल्यामुळे राहुलजींना उशिरापर्यंत ‘नई दुनिया’ कार्यालयात थांबावं लागायचं. मालकांच्या ते लक्षात आल्यावर ते म्हणाले, ‘‘तुमच्यावर कामाचा बोजा बराच आहे, तेव्हा तुम्हांला पगारवाढ द्यायला हवी, बोला किती पगारवाढ देऊ?’’
ताबडतोब राहुलजींनी विचारलं, ‘‘या वेळी तुमच्या खिशात किती पैसे आहेत?’’ खिसे चाचपत बाबूजी (मालक) म्हणाले, ‘‘असतील दोनशे रुपये’’.
‘‘तर ते सगळे मला द्या.... म्हणजे त्याचं काय आहे की आज आम्हा मित्रांची पार्टी आहे अन्‌ व्हिस्कीचा खर्च मलाच करायचा आहे, माझं आजचं काम झालं. हीच माझी पगारवाढ समजा.’’ निरागसपणे राहुलजींनी म्हटलं.

राहुलजी म्हणायचे, ‘‘जास्त पगार म्हणजे चांगल्या कामाची गॅरेंटी नाही. त्यामुळे रोगट (अनहेल्दी) स्पर्धा निर्माण होते अन्‌ चंगळवाद वाढतो.’’ उलट राहुलजींच्या पुढाकारानंच आम्ही कृतज्ञता निधी सुरू केला. जे लोक झोकून देऊन समाजासाठी काम करतात त्यांचा व असेल तर त्यांच्या कुटुंबाचा खर्च चालावा म्हणून हा कोष होता. त्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम कारणारे श्याम मानव, नर्मदा बचाओ आंदोलनाचे डॉ. बिल्लोरे, आलोक अग्रवाल, श्रीपाद धर्माधिकारी, भोपाळ विषारी वायुदुर्घटनेच्या लोकांसाठी काम करणारी साधना कर्णिक, बरगी धरणग्रस्तांसाठी काम करणारे राजकुमार सिन्हा, झाबुआ जिल्ह्यातल्या आदिवासींसाठी काम करणारी नफीसा, विद्याव्रत नायर या लोकांचा समावेश होता. राहुलजींच्या मृत्यूनंतरही निधी विमला बारपुते (राहुलजींच्या पत्नी) यांनी पुढे सुरू ठेवला.

मराठीभाषी असले तरी राहुलजींचं शिक्षण हिंदीतून झालं होतं. हिंदीवर त्यांचं प्रभुत्व होतंच. इंग्रजीवरही तेवढंच प्रभुत्व होतं. इंदौरला डॉ. पट्टाभी सीतारामैय्या आले असताना त्यांच्या इंग्रजी भाषणाचं तत्काळ वाक्यागणिक सुंदर हिंदी भाषांतर राहुलजींनी लोकांना ऐकवलं होतं. एकदा खेडवळ शेतकऱ्याच्या भूमिकेत असताना प्रेक्षकांमधला टारगट बड्या धेंडांना अन्‌ त्यांच्या लाडावलेल्या पोरांना राहुलजींनी अस्खलित इंग्रजीत असा सज्जड दम दिला होता की सगळे चकित झाले होते.

मी मुंबईला एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्येे नोकरीसाठी केलेल्या अर्जासोबत त्यांनी दिलेलं चरित्र प्रमाणपत्र वाचण्यासारखं आहे.

To whom so ever it may concern
Whenever someone attains a modest status, as I have today he is called upon to issue a few character certificates but such occasions are rare indeed when issuing a certificate is also a privilege. I am happy that my young friend Arun Dike has given me one such chance. 

I have to know Mr. Dike for the last 12 years and I can testify from my first-hand knowledge that not only does he bear an excellent moral character but combines in himself a rare mixture of head and heart. With his sense of ability, he is bound to be an asset to any institution that he cares to join. Not that he needs them for, he will succeed on his own merits, yet all my good wishes.

13 May 1967

Rahul Barpute Chief Editor
Nai-Dunia, Indore

विचारसरणी अतिशय उच्च असूनही त्यांचं राहणीमान मात्र पूर्णपणे मध्यम वर्गीय होतं. दुटप्पीपण, भ्याडपणा अन्‌ देखावा करणं त्यांना अजिबात आवडत नसे. आणि त्यासाठी ते आपल्या मित्रांची मजेदार फिरकी घ्यायचे. एकदा माझ्या कारने आम्ही दोघं फार जरुरी कामासाठी गेलो. दुसऱ्या दिवशी त्यांनी परत माझी कार मागितली. त्यांचा कोणी मित्र मुंबईहून येणार होता त्याला घेऊन त्यांना देवासला जायचं होतं. देवासचं काम त्यांनी सांगितलं नाही. मित्राचं नाव व मी काहीसं कारण सांगून नकार दिला. काही दिवसांनंतर जेव्हा त्यांना पृच्छा केली तेव्हा ते हळूच म्हणाले, ‘‘अरे मधु लिमये मुंबईहून आला होता त्याला कुमारजींना भेटवायला न्यायचं होतं म्हणून तुझी कार हवी होती.’’

प्रांतीय भाषांविषयी त्यांच्या मनात आदर होता. मराठी पुस्तकं वाचण्याचा तोही विकत घेऊन वाचण्याचा छंद होता. दलितांविषयी, दलित लेखकांविषयी ते नेहमीच कनवाळू होते. दया पवार, लक्ष्मण माने, लक्ष्मण गायकवाड, आनंद यादव, भीमराव गस्ती या लेखकांबद्दल त्यांच्या मनात कौतुक असायचं. हिंदी भाषेचा ऱ्हास बघून त्यांना संताप येत असे. देशाची दुर्दशा बघून ते उद्विग्न व्हायचे. कधीकधी वैतागून म्हणायचे, ‘‘हमारी नस्ल ही घटिया है।’’

खाण्याची अन्‌ पिण्याचीही त्यांना आवड होती, कचोरी फार आवडायची. एकूणच ते सोंदर्याचे भोक्ते होते. प्रसिद्धीपासून कायम दूर राहणाऱ्या राहुलजींनी सत्कार, प्रशस्तिपत्रं, पदकं, समारंभ नेहमीच नाकारले. स्वतःचं आत्मचरित्रही लिहिलं नाही. लिहिलं ते अफलातून लिहिलं. फक्त ते ‘बिटविन द लाइन’ वाचायलं हवं. 

तारुण्य हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायी भाव होता. म्हणूनच मी या शब्दांजलीला ‘राहुल’ हे शीर्षक दिलंय. त्यांना राहुल या नावानं काही मोजकेच लोक ओळखायचे. रनवीर रक्सेना, पु. ल. देशपांडे, राम पुजारी, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्वच त्यांना राहुल म्हणायचे. इतरांसाठी ते राहुलजी किंवा बाबा होते.

(मराठी अनुवाद : प्रतिमा डिके)

(राहुल बारपुते यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. त्यानिमित्ताने हा लेख प्रसिद्ध करीत आहोत. - संपादक)

Tags: अरुण डिके राहुल बारपुते weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके