Diwali_4 पुरस्कार स्वीकारताना निर्भेळ असा आनंद होत नाही !
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

पुरस्कार स्वीकारताना निर्भेळ असा आनंद होत नाही !

1996 साली जाखडे यांनी ‘पद्मगंधा’ ही प्रकाशन संस्था स्थापन केली. ‘पद्मगंधा’च्या माध्यमातून त्यांनी आजवर ज्येष्ठांपासून ते तरुणांपर्यंत नव्या-जुन्या पिढीतील अनेक लेखक-संशोधकांचे पुस्तके प्रकाशित केली. ‘ग्रंथप्रकाशन हा सांस्कृतिक आदानप्रदानाचा व्यवहार आहे, म्हणूनच त्याकडे जबाबदारीने व गंभीरपणे पाहिले पाहिजे,’ असं मानणाऱ्या श्री.जाखडे यांनी, आजवर विविध वाङ्‌मयप्रकारातील मिळून शेकडो दर्जेदार ग्रंथांचे प्रकाशन केले आहे. गेली तीन दशके विविध अडीअडचणींना सामोरे जात एकटाकी ‘पद्मगंधा’चा प्रवास यशस्वीपणे चालू आहे. नुकताच त्यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठित असा ‘श्री. पु. भागवत उत्कृष्ट प्रकाशक पुरस्कार’प्राप्त झाला. मराठी ग्रंथप्रकाशन आणि साहित्यातील त्यांच्या या भरीव कार्याची व योगदानाची दखल यानिमित्ताने शासकीय पातळीवर घेण्यात आली.

अरुण जाखडे यांचे नाव मराठी साहित्यव्यवहारामध्ये लेखक-संपादक-ग्रंथप्रकाशक म्हणून ओळखले जाते. या तिन्ही क्षेत्रात त्यांनी नोंद घ्यावी अशी कामगिरी केलेली आहे. ‘पाचरुट’, ‘इर्जिक’, ‘हुसेनभाई बाताड्या’, ‘प्रयोगशाळेत काम कसे करावे,’ ‘लोहमित्र धातू’, ‘भारताचा स्वातंत्र्य लढा’ आदी उत्तम पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. डॉ.गणेश देवी यांच्या मार्गदर्शनाखाली अलीकडेच प्रकाशित झालेल्या ‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण-महाराष्ट्र’ या महत्त्वपूर्ण ग्रंथाचे संपादनही त्यांनी केले आहे. ‘पद्मगंधा’ आणि ‘उत्तम अनुवाद’ हे दोन दिवाळी अंक ते प्रतिवर्षी प्रकाशित करत असतात. ‘उत्तम अनुवाद’मधून जागतिक पातळीवरील व भारतीय भाषांमधील अभिजात साहित्य मराठी वाचकांना वाचायला मिळावे, हा त्यांचा निखळ उद्देश आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील एक छोटेसे खेडे ते पुणे असा अरुण जाखडे यांचा समृद्ध करणारा प्रवास आहे. ‘स्थलांतर आणि चांगल्या माणसांचा सहवास, यामुळे व्यक्तीचा विकास खूप चांगला होतो’ असं स्वानुभवातून म्हणणाऱ्या जाखडे यांचे मराठी ग्रंथप्रकाशनातील योगदान या व्यवसायात नव्याने येऊ पाहणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी निश्चितच आहे. म्हणून त्यांची दीर्घ मुलाखत घेतली आहे.

प्रश्न - तुमचा जन्म शेतकरी कुटुंबातला. जडण-घडण खेड्यात झालेली आणि विज्ञानाचे पदवीधर, असं असताना तुम्ही ग्रंथप्रकाशन-लेखनाकडे कसे वळलात? त्यासाठीची काही पार्श्वभूमी आपल्याला होती का?

अजिबात नव्हती. आमच्या गावात वर्तमानपत्र तर काय, पण साधी पोस्टाची पत्रंही येत नव्हती. आजूबाजूच्या गावांचीही परिस्थिती यापेक्षा फार काही वेगळी नव्हती. माझं गाव आणि शेती हीच माझ्या लिखाणाची प्रयोगशाळा होती. पण ही प्रयोगशाळा आहे, हे समजायला खूप उशीर झाला. आमच्या गावात नद्यांचा संगम आहे. या नद्यांच्या काठी माझं शेत आहे. गावाला दीड-दोन हजार वर्षांची मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. गावाचे शंभर टक्के संस्कार माझ्यावर झालेले आहेत, जे माझ्या लिखाणातून पाझरत गेले आहेत. सातवीपर्यंत बालभारतीच्या पुस्तकांशिवाय आम्हाला वाचायला काहीच नव्हतं. तिथली माणसं, निसर्ग, शेतशिवार, तिथल्या बोलीभाषा, ग्रामीण परंपरा हेच मी वाचत मनात नोंदवत गेलो. वास्तविक हीच खरी आपली संस्कृती आणि हीच आपली मराठी भाषा आहे. नियती आपल्याला एखादी गोष्ट देऊन जाते आणि पुढं कधी तरी पाच-पंचवीस वर्षांनी ती उपयोगी पडते. फक्त ती गोष्ट सांभाळून ठेवायचं काम आपल्याला करावं लागतं. म्हणजे मी पुण्याला येईन, इथं माझं पोटापाण्याचं काही साधन असेल, हे त्या वेळी मनातही नव्हतं. असं असलं तरी आजही माझी गावाशी असलेली नाळ मी तुटू दिलेली नाही. आठ-पंधरा दिवसांतून सतत मी गावी जात-येत असतो. माझं मुख्य घर हे गावाकडचं आणि उपघर हे पुण्यातलं, असंच मी समजतो.

मला शिक्षक खूप चांगले मिळाले. त्यामुळे विज्ञानाची आवड लागली. आमच्या वा. ज. खेरसरांचा आइन्स्टाईन यांच्याशी पत्रव्यवहार होता. सरांनी आम्हाला शाळेत असतानाच अतिशय सुलभ पद्धतीने सापेक्षतावादाची ओळख करून दिली होती. विद्यार्थ्यांना कसं शिकवावं, याचं एक उत्तम तंत्र त्यांच्याकडे होतं. थोड्या-अधिक प्रमाणात सर्व शिक्षकमंडळी चांगली होती. वसतिगृहात सर्व समाजघटकांतल्या विद्यार्थ्यांची सामूहिक प्रार्थना, सामूहिक जेवण असायचं. अहमदनगरला दोन कंपन्यांत नोकरी केली.

दि.6 मे 1982 रोजी मी पुण्याला नोकरीसाठी आलो. त्या वेळी पिंपरी-भोसरी-आकुर्डी या भागात चाळी होत्या. उंच इमारती तुरळक असत. त्या चाळींतील कामगारांसाठी आम्ही काही मित्र सांस्कृतिक उपक्रम करत होतो. साहित्य परिषदेची शाखा काढली. या कामगारांचं एक म्हणणं असे की, ‘आमचं कोण छापणार?’ मग मला वाटू लागलं की, आपणच एखादा अंक काढावा. त्यातूनच मी पुढं ‘पद्मगंधा’ हा दिवाळी अंक काढायला सुरुवात केली आणि हळूहळू साहित्य-प्रकाशन आदींशी संबंध येऊ लागला. अंकाच्या निमित्ताने गंगाधर महांबरे, रामचंद्र देखणे, निनाद बेडेकर आदी मंडळी भेटली. डेक्कनच्या संभाजीमहाराज प्रतिष्ठानचा खजिनदार म्हणूनही काम बघायचो. छत्रपती संभाजीमहाराजांची त्रिशताब्दी 1989 मध्ये साजरी करताना जे नवे लोक शोधले, त्यात बेडेकर होते. बेडेकरांची भाषणं पहिल्यांदा आमच्या प्रतिष्ठानने आयोजित केली होती. मीपण गावोगाव अशी भाषणं करायचो. कारण संभाजीमहाराजांची आणि औरंगजेबाची भेट आमच्या गावाला झाली होती, असे अनेक संदर्भ होते. त्या वेळी केलेल्या भाषणांतूनच मग माझं संभाजीमहाराजांवरचं पुस्तक आलं. मी लेखक झालो. लिहिता राहिलो. यातूनच पुस्तक छापायचं ज्ञान अवगत होत गेलं.

प्रश्न - नियतकालिक सुरू करणं, सातत्याने चालवणं ही तशी जिकिरीची गोष्ट. मग ही सुरुवात कशी झाली?

सुरुवात तशी अडचणी-संघर्ष यातूनच झाली. कारण भांडवल नावाची गोष्टही जवळ नव्हती. पाच-दहा रुपयांवर अंक सुरू केलेला. आमचे लेखक म्हणजे कामगारांपैकीच कोणी कोणी लिहिणारे होते. त्यात काही हौशी मंडळीही होती. हौस संपली की, सगळं संपायचं. त्या वेळी विविध कामगार संघटना, कंपन्यांचे व्यवस्थापन यांच्यातील संघर्षांमुळे, कंपन्यांचे संप व्हायचे. त्यातून काही कंपन्या बंदही पडायच्या. यामुळे चाळीतील लोकजीवन विस्कळीत व्हायचे. संप सुरू झाला की लोक गावाकडे जायचे, संप मिटला की परत यायचे. यामुळे माझेही सातत्य तुटत जाऊ लागले. अंकासाठी मी जीवतोड मेहनत घेतली होती. खूप धावपळ केलेली होती. मुख्य म्हणजे त्या वेळी मला अंक काय असतो, त्यात चित्रकाराची काय भूमिका असते, मुद्रण-बाइंडिंग काय असतं- यातलं काहीही काहीही माहीत नव्हतं. कंपनीतून सुटलो की, मी रोज जंगम प्रेसमध्ये जाऊन बसायचो. त्यातून मुद्रणाची माहिती मिळू लागली. कंपनीतल्या नोकरीचा फायदा असा झाला की, वेळेचं नियोजन करणं, कामात परफेक्शन ठेवणं (जे करायचं ते अधिकाधिक परिपूर्ण करायचा प्रयत्न करणं) संस्कार उपयोगी पडला. थोडे-थोडे पैसे जमा करून कागद खरेदी करायचो. स्वत:च कागद उचलून प्रेसमध्ये नेऊन टाकत असे. कारण एक रीम कागद घेणाऱ्याला कागदवाल्याकडे काय प्रतिष्ठा असणार? तिथला कामगारसुद्धा मला मदत करत नसे. त्यामुळे अशी सगळी कामं मी स्वत:च करायचो. नोकरी सांभाळून उर्वरीत वेळेत ही कामं करत रात्री मी लिहायचो. जीव ओतून केलं की, कुठलीही गोष्ट असाध्य राहत नाही. सुरुवातीचा हा पंधरा-सोळा वर्षांचा काळ खूप संघर्षाचा होता. वेगवेगळ्या अनुभवांतून मी शिकत गेलो. थोड्या-अधिक प्रमाणात आपल्या प्रत्येकाचा सुरुवातीचा संघर्ष हा असाच असतो.

प्रश्न - ‘पद्मगंधा’ या प्रकाशनसंस्थेचा जन्म कसा झाला आणि ‘पद्मगंधा’ हे नाव ठेवण्यामागचं कारण काय?

खरं तर सुरुवातीला म्हणालो तसं या व्यवसायातलं मला फार काही माहीत नव्हतं. एका जाणकार व्यक्तीनं सांगितलं की, तुला अंकाची रीतसर नोंदणी करावी लागेल. त्यासाठी तुला दोन-तीन नावं द्यावी लागतील. मला वाटलं की, आपण जी नावं काढू ती फार कॉमन असू नयेत. शिवाय हे नाव मला वाङ्‌मयीन गोष्टींशी निगडित हवं होतं. मग कालिदासाने शकुंतलेसाठी वापरलेला एक शब्द मला आठवला- ‘पद्मगंधा.’ कालिदासासारख्या महाकवीने हा शब्द सिद्ध केलेला आहे. त्याला एक वाङ्‌मयीन पार्श्वभूमीही आहे, तर आपण तो वापरू या. या नावाचा कुठं काही अंक नसल्याने त्याला लगेच परवानगी मिळाली. पण प्रकाशनाचं म्हणशील तर ‘उमा’ नावाने मी सुरुवात केली होती. उमा हे माझ्या आईचं नाव होतं. आईच्या धडपडीमुळंच मी पदवीधर झालो, नाही तर मी शेतीच केली असती. मातृप्रेम आणि कृतज्ञता म्हणून तिचं नाव घेतलं होतं. पण या नावाच्या बऱ्याच प्रकाशनसंस्था महाराष्ट्रात होत्या. हे बघता, मग अंकाचं ‘पद्मगंधा’ नाव हेच पुढं प्रकाशन संस्थेचं नाव म्हणून कायम केलं.

प्रश्न - ‘पद्मगंधा’ सुरू झाल्यावर प्रकाशनाचं म्हणून पहिलं-वहिलं कोणतं लेखन छापलं? 

सुरुवातीचं अंकाचं काम म्हणजे काही अंशी हौशीच होतं. त्या वेळी दिवाळी अंकात कादंबरी छापायची एक पद्धत होती. त्या काळात लोक कादंबऱ्याही खूप वाचायचे. त्यामुळे मी दीर्घ मजकूर टाकायचो. एकदा बोलता-बोलता रामचंद्र देखणे म्हणाले की- त्यांच्या गावाला एमआयडीसी होतेय. त्यासाठी शेतजमीन घेतली गेली, त्यातून शेतकऱ्यांचं जीवन उद्‌ध्वस्त झालंय, प्रदूषण वाढलंय इ. इ. मी त्यांना म्हणालो, तुम्ही यावर एक कादंबरी लिहा. मग त्यातून त्यांची ‘भूमिपुत्र’ ही कादंबरी काढली. पुढे अतिरिक्त ऊसउत्पादन झाल्यावर काय होतं, यावर मी स्वत:च ‘पाचरूट’ नावाची कादंबरी लिहिली. माझ्याकडे काही नामवंत लेखक नव्हते. त्यामुळे मी स्वत:च लिहायचो. पुढं असं वाटायला लागलं की, कादंबरीच छापावी असं काही नाही, इतरही काही छापावं. त्या वेळी खंडोबाच्या मंदिरात चोरी झाली होती. त्यावर अंकात एक दीर्घ भाग केला होता. त्यातूनच पुढे रामचंद्र देखणे यांचं खंडोबावरचं पुस्तक आलं. म्हणजे दिवाळी अंक काढायचा आणि दोन महिन्याने त्यातला दीर्घ मजकूर फिरवायचा आणि त्याचं पुस्तक करायचं. मग कुणा तरी एका विक्रेत्याला गाठून त्याला ती सगळी आवृत्ती देऊन टाकायची आणि सगळं विसरून जायचं, असं काही तरी चालायचं. यात ना पुस्तकविक्रीचा कसलाही अनुभव, ना त्यावर परीक्षणं आली पाहिजेत- हे असलं काही त्या वेळी माहीत नव्हतं.

पुढं 1996 मध्ये संशोधक व लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक रा.चिं. ढेरे यांची तीन पुस्तकं काढली आणि तिथूनच हा व्यवसाय खरा गांभीर्याने सुरू झाला. तेव्हा लोकांना खूप नवल वाटलं की, सुरुवातीला साधारण अंक काढणारा माणूस एकदम संशोधनात्मक गंभीर प्रकारची तीन पुस्तकं काढतो! त्याच काळात एकदा कल्याण इनामदार भेटले. म्हणाले, ‘‘सरकारची ऑपरेशन ब्लॅकबोर्डची योजना आहे. त्यात पुस्तकं सादर करा. त्यातून तुम्हाला चार पैसे मिळाले तर अशी गंभीर संशोधनात्मक पुस्तकं छापता येतील.’’ त्यांचा हेतू चांगला होता, पण माझ्याकडे चांगले लेखक नव्हते. ओळखीही नव्हत्या. आणि चांगले लेखक कोण देणार? एक तर दिवसा नोकरी करून उरल्या वेळेत हे उद्योग चाललेले. मग इनामदार म्हणाले, ‘‘काळजी करू नका. माझ्याकडे बालवाङ्‌मयाची तीन हस्तलिखितं आहेत. दोन प्रकाशक मागतायत, पण तुमच्यासारख्या चांगल्या धडपडणाऱ्या माणसाला दिली तर तुम्हाला उभं राहायला मदत होईल.’’ विज्ञानाचा पदवीधर असण्याचा आणि कंपनीतल्या कामाच्या अनुभवाच्या बळावर मी ‘प्रयोगशाळेत काम कसे करावे?’, ‘लोहमित्र धातू,’ ‘भारताचा स्वातंत्र्यलढा’ अशी शालोपयोगी पुस्तकं मी लिहिली. कॉलेजमधल्या प्राध्यापकांसाठी समीक्षेची पुस्तकं असतात. पण शाळेतल्या शिक्षकांसाठी अभ्यासक्रमाला धरून समीक्षात्मक पुस्तकं करावीत, असं कोणत्याही शिक्षकांना का वाटत नाही? म्हणून मी बालकवींवर एक दीर्घ लेख लिहिला होता, त्याचंही छोटं पुस्तक केलं. पण यातली कोणतीच पुस्तकं ब्लॅक बोर्डला लागली नाहीत. माझ्या या पुस्तकांना राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले. मला साहित्य कोण देणार? तर, कोणी नाही. मग या गरजेतून माझं स्वत:चं लेखन झालं. माझ्या लिहितेपणाचा प्रकाशन संस्था चालू राहण्याला उपयोग झाला.

प्रश्न - गांभीर्याने व्यवसाय सुरू केला म्हणजे नक्की काय केलं?

आपल्याला प्रकाशनात राहायचं म्हटल्यावर प्रकाशन व्यवसायाचा मी बारकाईने अभ्यास सुरू केला. एकदा व्यंकटेश माडगूळकर मला म्हणाले, ‘‘तू एक चांगला ललित लेखक आहेस. तू ललित लेखनाची पुस्तकं काढशील. किंवा कदाचित व्यवसायाचा भाग म्हणून तू वाईटही पुस्तकं काढशील, पण ती काढताना तुला हे समजलं पाहिजे की, त्यात काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे. पण मी काही तरी कारणासाठी असं करतोय, हे कळण्यासाठी तू साहित्याचा अभ्यास कर.’’ मग तात्यांनी मला ग.रा. कामत, व.दि. कुलकर्णी, द.भि. कुलकर्णी आदींची नावं सुचवली. साहित्य समीक्षा यांवर अनेक पुस्तकं मिळवून त्यांचा अभ्यास करू लागलो. चांगल्या मुद्रकांकडे जाऊन मुद्रणातल्या खाचाखोचा जाणून घेतल्या. माझ्या असं लक्षात आलं की, ही ‘नॉलेज इंडस्ट्री आहे आणि आपण त्यात आहोत, ही खूप चांगली गोष्ट आहे. आपल्याला हेच करायचं होतं.’ माझी आवड आणि हा सर्व सांस्कृतिक परिघ असं सगळं जुळून आलं. एका निर्मळ व भारलेल्या सांस्कृतिक व्यवहाराचा तो उत्तरकाळ होता. रविमुकुलसारखा चित्रकार आमच्यासोबत काम करत होता. पुढं-पुढं फार सपाटीकरण होत गेलं. परिणामी, प्रकाशन व्यवसाय हा बौद्धिक-सांस्कृतिक जगाशी निगडित आहे, हे विसरून तो आता तद्दन आर्थिक-धंदेवाईक म्हणून रुजवला जात आहे. हे पाहता, कधी कधी काही लोक मला ‘अयशस्वी प्रकाशक’ म्हणतात. वास्तविक, मला असं वाटत होतं की, जे पूर्वसंचित आहे, त्यातील एक तरी धागा आपण पुढं न्यावा. तो नेताना आपली काही पडझड होताना काही माणसं हसतील, परंतु सूज्ञ लोक आपल्या पाठीशी उभं राहतील. म्हणून तो सुज्ञांचा काळ यावा, असं वाटतं.

प्रश्न - लोकसाहित्य हा तुमच्या खूप आस्थेचा विषय आहे. पद्मगंधाच्या माध्यमातून तुम्ही लोकसाहित्याच्या पुस्तकांना नेहमीच प्राधान्य दिलेलं आहे, यामागे काही विशेष आहे का?

माझी जडण-घडणच मुळी खेड्यातली असल्याने लोकजीवन आणि लोकसाहित्य हा विषय मला नेहमीच जवळचा वाटत आला आहे. गावातल्या यात्रा-जत्रा, मंदिरं, सण-लोकपरंपरा-रीति-रिवाज, लावण्या, भैरवनाथाच्या जत्रेच्या वेळी तमाशा यायचा, बारा बलुतेदारी संपत येण्याचा काळ... अशा सगळ्यांतून खूप काही मनात साठलेलं होतं. विविध समाजांतील-जाती-जमातींतील माणसांबरोबर मी वाढत गेलो. भटक्या-विमुक्त समाजातील लोकांची पालं गावात पडायची. त्यांना न्याहाळत होतो, समजून घेत होतो. ग्रामसंस्कृती ही समूहसंस्कृती आहे. त्यात कुठलीही एक व्यक्ती, कुटुंब सुटं-सुटं करता येत नाही. म्हणजे अशा जगण्याचा सामूहिक आविष्कार मला लहानपणापासून समृद्ध करत गेला. लोकजीवनाशी असलेल्या या अनुबंधामुळे लोकसाहित्य व लोकसंस्कृती या विषयाशी निगडित आपण काही तरी केलं पाहिजे, असं वाटत होतं. त्यातूनच पुढे विविध ग्रंथ पद्मगंधाकडून आकाराला येत गेले. मूळ माती आणि संस्कृती संस्काराचा हा भाग आहे.

एकदा असंच रविमुकुल यांच्याशी बोलता-बोलता मी म्हणालो की- लोकसाहित्याशी संबंधित चांगली माहितीपर, संशोधनात्मक पुस्तकं करायला मला आवडेल. तेव्हा रविमुकुल यांनी रा.चिं. ढेरे यांची पुस्तकं सुचवली. तसं पाहिलं तर रा.चिं. ढेरे यांचं नाव खूप मोठं त्या वेळीही होतं आणि आजही आहे. त्यांची पुस्तकं काढायला काय कोणीही मोठा प्रकाशक सहज तयार झाला असता. पण अण्णांना असं मनापासून वाटायचं की, ‘इतक्या खडतर गोष्टींतून मी अभ्यास केला, हे ज्ञान निर्माण केलं, पुस्तकं केली; ते काही पैसा मिळावा म्हणून, प्रसिद्धी मिळावी म्हणून नाही.’ अण्णांसाठी अभ्यास-ग्रंथ-ज्ञान म्हणजे जीवननिष्ठा, व्रतच होते. एकदा ते म्हणाले, ‘‘ही पुस्तकं मी ज्याच्याकडे देईन, त्याला ती समजली पाहिजेत. जाखडेंना पुस्तकं देतो. कारण या माणसाला लोकसंस्कृतीची चांगली जाण आहे. मी जे काम करतोय ते काय आहे नि तो जे छापणार आहे, ते काय आहे, हे त्याला नेमकं कळतंय आणि त्याला ते मनापासून करायला हवं आहे.’’ मग त्यांनी एकदम तीन पुस्तकांचा प्रस्ताव मी नवीन असतानाही समोर ठेवला. एका अर्थाने अण्णांची ती पिढी खूप वेगळी- तत्त्वाने चालणारी होती. आज असा विचारही कोणी करणार नाही. आज प्रकाशक कोणंय, किती मोठाय, त्याची आर्थिक स्थिती कशी आहे, तो आपली जाहिरात कशी करेल इत्यादी....

प्रश्न - डॉ.रा.चिं.ढेरे यांची एखादी चांगली कोणती आठवण सांगाल?

एक पट्‌कन आठवली तीच सांगतो. अण्णा स्वत:चीच पुस्तकं दुकानातून विकत घ्यायचे. कारण संशोधन करताना त्यांना ज्यांची मदत लाभायची, सहकार्य मिळायचं, त्यांना ती पुस्तकं भेट द्यायची असायची. म्हणून ते ज्या दुकानातून पुस्तकं घ्यायचे, त्या दुकानदाराला आश्चर्य वाटायचं की, प्रकाशकाकडून घ्यायचे सोडून अण्णा आपल्याकडून असे पुस्तकं का घेतायत? म्हणजे जाखडेंचा आणि अण्णांचा काही तरी कलह झालाय का? एकदा त्या विक्रेत्याने अण्णांनाच विचारलं. तर ते म्हणाले, ‘‘अरुण खूप भिडस्त आहे. एक तर तो पैसेच घ्यायला नको म्हणतो किंवा वाट्टेल तितकं कमिशन देतो. त्यामुळे मला ते खूप संकोचल्यासारखं होतं. म्हणून मी तुमच्याकडून घेतो.’’ अशीच द.भिं.चीही एक आठवण. द.भि. प्रत्येक वेळी पद्मगंधाच्या ऑफिसला आले की, आवर्जून पुस्तकं विकत घ्यायचे. मी मग पैसे घ्यायचो नाही. ते म्हणायचे, ‘‘पुस्तकं विकत घेणं हा माझ्या आनंदाचा भाग आहे, पण तुझ्यासाठी चरितार्थाचा भाग आहे. त्यामुळे मी पुस्तकं विकत घेतलीच पाहिजेत.’’ कधीही भेट सरांनी माझ्याकडून म्हणून पुस्तक घेतलं नाही. अनेक लेखकांना वाटतं की, यांनी आम्हाला पुस्तकं भेट दिली पाहिजेत. द.भि. स्वत: तर विकत घेतच, पण इतरांनाही विकत घ्यायला लावत.

प्रश्न - ‘प्रकाशक उभा करणं ही त्या काळातल्या लेखकांची भूमिका होती’, असं तुम्ही पूर्वी एकदा बोलल्याचं मला आठवतं. नेमकं काय म्हणायचं तुम्हाला?

त्या काळात लेखकाजवळही एक ‘मस्ती’ (चांगल्या अर्थाने म्हणतोय मी...) होती की, मी जे लिहितो ते टॉपच आहे- ते महत्त्वाचं आहे आणि ते कोणीही छापलं तरी मला काही फरक पडत नाही. मी ते या प्रकाशकाला देतोय, इतकीच त्यांची भूमिका असायची. म्हणजे एके काळी लेखक प्रकाशकाला उभे करत, नाव मिळवून देत. आज मात्र या सगळ्याची जागा तद्दन व्यवहाराने घेतलेली आहे. ज्याला आर्थिक यश आहे, तो यशस्वी, अशी आताची यशस्वी माणसाची व्याख्या झालीय. त्या काळात असं नव्हतं. माणूस बघणं, त्याच्याकडे कोणते गुण आहेत, त्याची ज्ञानात्मकतेच्या जवळ जाण्याची वृत्ती, कामाचा दर्जा आदींवरून जोखलं जायचं. म्हणजे, समाजात एक गुणग्राहकता होती.

गंगाधर महांबरे, व्यंकटेश माडगूळकर, रा.चिं. ढेरे, व. दि. कुलकर्णी, द.भि. कुलकर्णी, रा.ग.जाधव, के.रं.शिरवाडकर आदीं अशी गुणग्राहक माणसं मला भेटली. या मंडळींनी माझ्यातील उणीवांकडे दुर्लक्ष केलं. लेखकांना वाटायचं की, ‘हा माणूस प्रकाशन व्यवसायात स्थिरावला पाहिजे’, असं त्यांना मनापासून वाटत होतं. याचं कारण म्हणजे त्यांना सांस्कृतिक भलेपणाची काळजी होती. आधीच्या काळातील पिढीत हा विचारांच्या व कृतीच्या पातळीवरील भलेपणा होता. ज्या प्रकाशकांना ग्रंथ, वाङ्‌मय, संशोधन आदींविषयी जी जाण व समज होती; असे आधीच्या पिढीतील प्रकाशक वा.वि. भट, श्री.पु. भागवत, पुरुषोत्तम चित्रे, रा.ज.देशमुख, अनंतराव कुलकर्णी, रामदास भटकळ  असतील- या सर्व मंडळींचा वारसा पुढे चालत राहावा. ह्या प्रकाशकांकडे वाङ्‌मयीन दृष्टी होती, एक व्यापक विचार असणारी ती पिढी होती. म्हणूनच वरील लेखकमंडळींनी माझ्यावर विश्वास दाखवला. त्यामुळे मला चांगले लेेखक मिळाले आणि मला स्थिर व्हायला कमी त्रास झाला.

या लेखकांचं एक वैशिष्ट्य मी पाहिलंय की, ते आले म्हणजे माझी, कुटुंबाची, मुलांची निगुतीनं चौकशी करत. एक प्रेमळपणा, माणूसपण त्यांच्याकडे होतं. केवळ व्यवहार, माझं-माझं ह्या गोष्टी नव्हत्या. मी असं पाहिलंय की- त्या वेळी अशा लेखकांना ‘प्रकाशक जगला पाहिजे, कारण तो या साहित्यव्यवहाराचा महत्त्वाचा भाग आहे’, याची काळजी असायची.

प्रश्न - मगाशी तुम्ही म्हणालात की, ‘यशस्वी माणसाची व्याख्या काय, तर आर्थिक दृष्ट्या यश मिळवणं’. हा धागा पकडून मला असं विचारायचं आहे की, जवळ भांडवल नसताना आर्थिक दृष्ट्या फारसं उत्पन्न न देणाऱ्या समीक्षा-संशोधनपर-वैचारिक अशा प्रकारच्या (काउंटर सेल नसणारी) पुस्तकांकडे कसं वळलात?

पुष्कळदा आपली व्यक्तिगत आवडच आयुष्यभराची सोबत होते. त्या-त्या वेळी जी चांगली माणसं भेटत गेली, त्यातून काही गोष्टी घडत गेल्या. मुळात मी प्रकाशन-व्यवसायात आलो तेच वाङ्‌मयप्रेमातून. सुरुवातीला मला खूप न्यूनगंड होता की, ‘आपण आधी विज्ञानाचे विद्यार्थी होतो, नंतर इंजिनिअरिंगचे झालो; त्यामुळे आपल्याला भाषा-वाङ्‌मय नीट कळत नाही किंवा त्यातलं काही येत नाही.’ मी या क्षेत्रातील अनेक मंडळींना मी भेटत गेलो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाङ्‌मयाचा अभ्यास करत गेलो, यामुळे समीक्षा किंवा गंभीर लेखन आवडायला लागलं. कलाकृती समजून घेण्यासाठी तुमची एक चांगली मानसिक आणि बौद्धिक पार्श्वभूमी तयार होणं आवश्यक असतं. समीक्षापर, वैचारिक, गंभीरप्रवृत्तीच्या पुस्तकांतून ती होत असते. अण्णांचे लेखनाचे विषय- देवदैवते-लोकजीवन-लोकसंस्कृती- हे माझ्या जगण्याशी खूप जवळचे होते. त्यामुळे अशा पुस्तकांना ग्राहक फारसा नसला तरी ती काढणं मला स्वत:ला महत्त्वाचं वाटत होतं. याच भावनेतून मी र.धो. कर्वे, भारतीय भाषांचा प्रकल्प, गाथासप्तशती, लोकसाहित्य वगैरे एकेक प्रकल्प करत गेलो. विशेष म्हणजे ही लेखकमंडळीही मला सांगत- ‘‘अशी पुस्तकं काढायचं धाडस तू करतोयस, पण विचारपूर्वक कर... व्यवहारातले धोके ओळख.’’ पुढं विंदा करंदीकरांनीही त्यांचं पुस्तक दिलं. तेही समीक्षेचंच जे आव्हानात्मक आहे, तेच तर करून दाखवलं पाहिजे ना? आपण करतो ती पुस्तकं ज्ञानाचं अधिष्ठान असलेली आहेत; भलेही विक्रीच्या दृष्टीने त्यांना पुस्तकांच्या दुकानात स्थान नसेल. एकदा का संस्थेची ओळख ‘अशा प्रकारची पुस्तकं काढते’ म्हणून झाली की, मग अभ्यासू लोक तुमच्याकडे त्या दृष्टीनं पाहू लागतात.

प्रश्न - हे खरं असलं तरी आर्थिक ओढाताण झालीच असणार ना?

हो, आर्थिक संकटं कोणालाही चुकत नाहीत. खरं तर हा सगळा इच्छाशक्तीचा व्यवहार होता. भांडवल तसं नव्हतंच. मग पगारातून खर्च करायचो, काही वेळा कर्जही घेतलं. यामुळे कुटुंबाची प्रचंड ओढाताण व्हायची. मग पुढं जाऊन नोकरी सोडून पूर्ण वेळ प्रकाशन करायचा निर्णय घेतला. परिणामी, घरातल्या गोष्टींवर अनेकदा टाच आली. यातून मला स्वत:ला आनंद वगैरे मिळाला खरा, पण कुटुंबाला मात्र खूप झीज सोसावी लागली. मानसन्मान, पुरस्कार वगैरे ही चांगली गोष्ट आहे, पण त्याने संस्था नाही चालवता येत.

प्रश्न - चांगले पैसे मिळतील किंवा त्या-त्या काळाची चलती पाहून लोकप्रिय, खपणारी पुस्तकं करावीत, असा मोह कधी झाला नाही का?

नाही. यश कसं मिळवावं, व्यवस्थापन कसं करावं, भरतकाम कसं करावं, स्वयंपाक कसा बनवावा, कामशास्त्र वगैरे पुस्तकांच्या लाटा त्या-त्या काळात येत-जात असतात. आता अशा गोष्टींची माहिती लोकांना इंटरनेटवर, यू-ट्यूबवर, सोशल मीडियावर मुबलक मिळायला लागल्यामुळे त्या पुस्तकांचे दिवस संपले आहेत. मात्र ज्ञान ही अशी एकमेव गोष्ट आहे की, ते वैश्विक आहे. ज्ञान ही संपणारी गोष्ट नाही. त्याची आवश्यकता सर्वच काळात असते. आम्ही छापतो त्या पुस्तकांची लाट कधीच येणार नाही, पण कधी ना कधी तरी एखादा ज्ञानसन्मुख माणूस भर पावसात भिजत येईल आणि ‘हे हे पुस्तक मला पाहिजे’, असं म्हणेल. आजही माझ्याकडे अशी अनेक माणसं कुठून कुठून येत असतात की, तुम्ही काढलेलं अमुक-अमुक पुस्तक पाहिजे, म्हणून. कारण त्यांना ती संदर्भ म्हणून महत्त्वाची असतात. त्यामुळे अशा लाटांवर स्वार होऊन आर्थिक-लौकिक यश मिळवता येईल, कॉर्पोरेट कार्यालये थाटता येतील; परंतु आपण समाजाला काय देतो, हा महत्त्वाचा प्रश्न उरतोच ना? म्हणून पैशाच्या मागे न लागता किंवा लाटेत वाहून न जाता ठाम उभं राहणं महत्त्वाचं असतं. भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठी छाप असलेला टाटांसारखा माणूसही म्हणतो की, माझ्याजवळ आहे ते समाजाचं आहे आणि मी ते समाजाला दिलं पाहिजे. म्हणजेच- अंबानी व्हायचं की टाटा, हे तुम्हाला ठरवायचंय. तसंच ते नव्याने प्रकाशन व्यवसायात येणाऱ्यांनीही ठरवलं पाहिजे.

प्रश्न - मोठ्या प्रकाशनांशी उत्तम संबंध असतानाही माडगूळकर, ढेरे, करंदीकर, कुलकर्णी अशा मातब्बर लेखकांनी त्यांची पुस्तकं तुम्हाला दिली. वास्तविक, आपण एका नवख्या प्रकाशकाला आपली पुस्तकं कशी काय द्यायची, दिली तर याच्याकडून रॉयल्टी मिळेल की नाही- असा काहीएक विचार त्यांनी केला होता का?

खरं तर मी नवखा होतो म्हणूनच त्यांच्याप्रमाणेच अनेक लेखकांनी मला पुस्तकं दिली. माझ्याकडे कसलीही यंत्रणा नव्हती, सगळ्या पातळीवर मीच एकटा धावत होतो. हे माहीत असूनही त्यांनी मला पुस्तकं देताना कसल्याही अटी, नियम घातले नाहीत. कारण कुठे तरी मी त्यांच्या विश्वासाला पात्र ठरलो होतो. त्यांना असं वाटायचं की- याची संस्था चालली पाहिजे. एक प्रकाशक उभा राहिला तर तो अनेक लेखकांचं लेखन छापतो. ही मंडळी गुणग्राही होती, दुसऱ्याचा विचार करणारी होती, विशिष्ट तत्त्वांनी चालणारी होती. ती केवळ लेखक नव्हती, तर उत्तम शिक्षकही होती. समोरच्याची अडचण ओळखून या ना त्या तऱ्हेनं मदत करणं, ही कर्तव्यनिष्ठा ते जगत आले. विंदांनी तर स्वत:ला मिळालेल्या पुरस्काराच्या रकमा सामाजिक देणग्या म्हणून देऊन टाकल्या, हे सर्वश्रुतच आहे. अशा प्रकारची विचार जगणारी लेखक मंडळी त्या वेळी होती. असं असलं तरी ठरावीक लेखक सोडले तर आजही अनेक लेखकांचा पहिला पर्याय हा मराठीतील इतर ठरावीक नामवंत प्रकाशकच असतात. मग त्यांच्याकडे नाही जुळलं की शेवटी आमचा पर्याय... किंवा चालणारी पुस्तकं इतरांकडे आणि न चालणारी आमच्याकडे... काहींना असं वाटतं की, माझं नाव अमुक एका प्रकाशनाशी जोडलं गेलं की प्रतिष्ठा मिळेल, त्याची परीक्षणं छापून येतील, इतरांना सांगताना आपली कॉलर टाईट राहील... इ. अशा अनेक गोष्टींतून गेलो, अजूनही जातो. अशा प्रकारच्या एकांगी व्यवहारावादाला वा दुजाभावाला थारा नसल्यामुळे ढेरे, विंदा, माडगूळकर, कुलकर्णी या लेखकमंडळींबद्दल कायमच आदराची भावना मला वाटत आली.

प्रश्न - ‘लेखकांमुळे प्रकाशक घडणे किंवा लेखकांच्या सहवासात प्रकाशकाचं व्यक्तिमत्त्व घडणे’, ही गोष्ट तुमच्या संदर्भात मला नेहमीच जाणवते...

अगदी खरंय तुझं हे म्हणणं... खरं तर वर उल्लेख केलेल्या लेखकांच्या पुस्तकांमुळे प्रकाशक उभे राहत, नियतकालिके उभी राहत, त्यांना बळ मिळे, नाव मिळे. या मंडळींना भेटायला गेलं की, नवं काही तरी ज्ञानाच्या स्वरूपात मिळत असे. एखादा शब्द विचारला की ते तासभर त्या शब्दाचा अर्थ, व्युत्पत्ती, व्याकरण असं सखोलपणे सांगत. आपापल्या अभ्यासविषयात ही मंडळी ‘बाप’च होती. यांच्या सहवासात असलं की प्रकाशक म्हणून आपल्याला काय काय माहीत असलं पाहिजे, याची जाणीव व्हायची. कवितेचं व्याकरण किंवा काव्यशास्त्रासंबंधी द.भिं.कडूनच जाणून घ्यावं. ढेरेअण्णांकडे गेलं की, ज्ञानाच्या जगाची सफरच होत असे. या लेखकांनी मला खूप काही दिलं, खूप काही शिकवलं. पालकांप्रमाणे समजून घेतलं, समजूनही सांगितलं. हे सगळं सहज, कळत-नकळत झालं. या प्रत्येकाची एक निराळी प्रकृती होती. व.दि.चं व्यक्तिमत्त्व अत्यंत शांत होतं, माडगूळकरांच्या वागण्यात एक प्रकारचा रांगडेपणा होता. द.भिं.चं काहीसं आक्रमक होतं. ढेरे यांचं ‘आपल्या अभ्यासाचा, बुद्धीचा समोरच्यावर कसलाही ताण येणार नाही,’ असं संयमी व्यक्तिमत्त्व. माझ्याही वागण्यात एक प्रकारचा ग्रामीण ओबड-धोबडपणा (रफनेस) होता, पण व.दि. आणि ढेरे अण्णांमुळे तो कमी झाला. अशा लेखकांची पुस्तकं छापताना मनावर दडपणही यायचं की, आपल्याकडून चुकीचं काही होऊ नये. कारण त्यांचा आदरयुक्त दरारा आणि त्यांच्या विद्वत्तेचा धाक. अशा लेखकांमुळंच पद्मगंधा नीट उभी राहू शकली. तिला एक आकार आला. मात्र लेखकांची ती पिढी आता संपली आणि त्यांच्याबरोबर ह्या गोष्टीही संपल्या. मी खूप चांगल्या लोकांच्या सहवासात आलो ही, माझ्या दृष्टीनं- पद्मगंधाच्या दृष्टीनं जमेची बाजू आहे. आता पुरस्कार मिळणं, प्रसिद्धी मिळवणं सोपं झालंय; पण चांगली माणसं, चांगले लेखक मिळणं अवघड झालंय. या अर्थानं आता या व्यवसायात येणाऱ्या प्रकाशकांसमोर अडचणी पुष्कळ आहेत.

प्रश्न - तुमच्या बोलण्यात एकदा मी ऐकलं की, ‘आपलं गाव आणि शेत हीच एक लॅबोरेटरी आहे,’ असं तुम्हाला का वाटतं?

व्यंकटेश माडगूळकर सहज बोलायचे, ‘‘शब्द कसा आला पाहिजे, तर त्याच्या नादासहित, गंधासहित, आला पाहिजे.’’ एकदा मी त्यांना म्हणालो, ‘‘शंकर पाटील, द.मा. मिरासदार- तुम्ही आणि इतरांनीही इतकं ग्रामीण साहित्य लिहून ठेवलंय की, आम्ही आता वेगळं काय लिहिणार?’’ तर तात्या म्हणाले, ‘‘गड्या, तुझ्या शेतात, रानात जाऊ या एकदा आपण.’’ मग ते एकदा माझ्या गावी शेतात हुरडा खायला आले. मुक्काम केला. ते म्हणाले, ‘‘आता हे पाहा, नदीकाठी तुझं शेत आहे. तुझ्या या रानात तू राहुटी टाकून दिवसभर बस ना. कोणते पक्षी येतात, काय खातात, त्यांचे व्यवहार कसे चालतात, प्राण्यांच्या हालचाली, त्यांचे काय व्यापार चालतात याची निरीक्षणं कर ना. इथल्या माणसांत झालेले बदल, जगणं नव्याने टिपत जा. इथं पुण्यात बसून तू काय लिहिणार? तिथं जा.’’ तात्यांनी असं म्हटल्यावर मला वाटू लागलं की, आपलं गाव आणि शेत हीच एक लॅबोरेटरी आहे. लेखनाची बीजं तिथं शेतात, गावात, निसर्गात आहेत.

प्रश्न - एकेक विषय घेऊन, एकेक लेखक घेऊन तुम्ही काही ग्रंथप्रकल्प केलेत. उदा.- श्री.व्यं. केतकर, र.धों. कर्वे, रा.चिं. ढेरे यांचे संशोधनपर असतील, गणेश देवी, लोकसाहित्य,  गाथासप्तशती, सूफी, आदी ग्रंथप्रकल्प करावेत, हे सगळं सुरुवातीपासून ठरवून केलं की पुढे ओघात आलं?

एक तर प्रकाशन सुरू केल्यावर पद्मगंधाचं असं स्वत:चं वेगळं काही सांगता आलं पाहिजे, एक स्वतंत्र ओळख असली पाहिजे, असं मला सतत वाटायचं. मग ते वेगळं म्हणजे नक्की काय, तर एकेक प्रकल्प घेऊन काम करणं. कंपनीत-इंडस्ट्रीमध्ये नोकरीचा फायदा असा झाला की, तिथं आम्हाला ‘प्रोजेक्ट’ असायचे. त्यामुळे मला प्रोजेक्ट घेऊन काम करायची सवय लागली. कुठल्याही प्रकल्पाचं काम करताना ते पूर्ण होईपर्यंतचा काळ खूप छान जातो. तो प्रकल्प हाच काही वर्षांपुरता आपल्या आयुष्याचा भाग होऊन जातो. एकाच विषयावर काम करायची दिशा आपसुक मिळत जाते. शिवाय काही तरी भरीव काम उभं राहतं. प्रकल्प न करता सुटी-सुटी पुस्तकं करणं म्हणजे मला किराणा दुकानासारखं वाटतं. तिथं हमामही ठेवतात, लक्सही ठेवतात, लिरिलही ठेवतात. म्हणजे ह्या वस्तू ठेवायला हव्यातच, पण तुमचं स्वत:चं असं काय आहे त्यात? म्हणून मला प्रकल्प करणं गरजेचं वाटतं. बरं, प्रकल्प कोणता करायचा, हेही महत्त्वाचं आहे. म्हणजे व्यावसायिक पुस्तकांचा की ज्ञानात्मक पुस्तकांचा? तर, माझ्या मते ज्ञानात्मक पुस्तकांचा. कारण व्यावसायिक पुस्तकांचं महत्त्व विशिष्ट काळानंतर हळूहळू कमी होत जातं. ज्ञानात्मक पुस्तकांचं तसं नसतं. ज्ञानात्मक गरज ही संपत नाही. ती कायम भासत असते. प्रकल्प लांबला म्हणून संस्थेचं काही नुकसानही होत नाही. अशा पुस्तकांची कुठली लाट नसते, ती संथपणे पण कायम चालत राहतात. शिवाय आपल्या कामाचं, संस्थेचं वेगळेपण राहतं. प्रकल्प करताना आपणही त्या ग्रंथात, त्या लेखकात रममाण होतो. लेखकाची व प्रकाशकाची प्रतिभा एकत्र आणि समांतर चालली, तर असा प्रकल्प जास्त यशस्वी होतो. यात लेखकालाही एक दीर्घ काळाचा ‘हे एक पुस्तक झालं की पुढचं करायचंय’ ही हमी मिळते. आर्थिक बाबींचा विचार केला तर मग असे प्रकल्प होणंच कठीण आहे. संयम ठेवून निगुतीनंच असे प्रकल्प होऊ शकतात. आर्थिक बळ असतं तर आणखी चांगले प्रकल्प करता आले असते, आणखी धाडस करता आलं असतं, असं वाटतं. परंतु एकदा का ग्रंथप्रकल्प सिद्ध झाला की, समाजात काही चांगली माणसं असतात, काही चांगले वाचकही असतात; त्यांचं सहकार्य मिळत राहतं. महेश एलकुंचवारसरांना र.धों.चा प्रकल्प फार आवडला. त्यांनी त्यांच्याशी संबंधित अनेकांना हा संच घ्यायला लावला. असे हातभाराचे दुर्मिळ ‘हात’ही लाभतात. काही मंडळी तर असे ग्रंथसंच भेट म्हणूनही देतात. अशी कदर असलेली माणसं संख्येनं कमी असतील, पण आहेत. टोनी मॉरिसनची ‘बिलिव्हड’, सिमॉन द बोवा यांचं ‘द सेकंड सेक्स’, अल्बेर काम्युचे ‘आऊटसायडर’, चीनचा लेखक गाओ झिंगजिआनचे पुस्तक, सार्त्र... असे अनेक अनुवाद प्रकल्पही केले. वास्तविक असे प्रकल्प करणे म्हणजे, प्रायोगिक सिनेमा करण्यासारखं असतं. म्हणजे तो पहिल्याच दिवशी डब्यात असतो. असं असलं तरी अशी ग्रंथसंपदा  समाजाच्या, अभ्यासकांच्या दृष्टीने महत्त्वाची असते. तिचा केव्हा ना केव्हा तरी नक्कीच विचार होतो.

प्रश्न - एखादं स्क्रिप्ट येतं. ते वाचणं, त्यावर बारकाईनं संपादकीय संस्कार करणं, मुद्रितशोधन करणं, या सगळ्या प्रक्रियेतून ते स्क्रिप्ट जाणं आणि मग शेवटी ते मुद्रित पुस्तकापर्यंत येणं- हा जो एके काळाचा शिरस्ता होता, तो आता हळूहळू मोडीत निघू लागलेला दिसतोय. तुमचा याबाबतीतला कटाक्ष मी पाहिलेला आहे. काय सांगाल याबद्दल?

याला प्रकाशक-लेखक दोघंही कारणीभूत आहेत. लेखकालाही स्क्रिप्ट दिलं की पुस्तक लवकर हवं असतं. काहींचं असंही म्हणणं असतं की- तुम्ही फार खोलात जाऊ नका, आम्ही केलंय ते बरोबर केलंय. जे लिहिलंय ते अंतिम आहे. फार लक्ष नका घालू. आपण जर एखाद्या लेखकाला ‘हे जरा काळजीपूर्वक बघायला पाहिजे’ असं म्हटलं तर त्यांना कमीपणाचं-अपमानकारक वाटतं. वास्तविक ग्रंथ वा पुस्तक ही दीर्घ काळ टिकणारी गोष्ट आहे. हे पाहता, त्यावर बारकाईनं काम होणं अपेक्षित तर असतंच, पण महत्त्वाचंही. त्यामुळे या बाबतीत चालढकलपणा उपयोगाचा नाही. लेखक-प्रकाशक दोघांनीही या गोष्टी करणं, त्यांना वेळ देणं आवश्यक आहे. तसं पाहिलं तर ग्रंथनिर्मिती ही प्रक्रिया दमवणारी आणि वेळ खाणारी असते. पुष्कळदा मनुष्यबळ नसतं किंवा त्या-त्या कामासाठी योग्य माणसं मिळत नाहीत. तांत्रिक समस्या अचानक उद्‌भवतात. अशी एक ना दोन- अनेक कारणे असतात. यात अनिश्चित वेळ जातो. शिवाय टायपिंग, मुद्रितशोधन, संपादन, चित्रकार आदी विविध टप्प्यांवर खर्च होत असतो. पुस्तक येईपर्यंत पैसाही अडकून पडतो. ही सर्व प्रक्रिया नीट समजून घेतली म्हणजे प्रकाशकांबद्दलचे गैरसमज दूर होतील. दुसरी गोष्ट म्हणजे मुद्रितशोधक, संपादक आदी घटकांना पूर्वी समाधानकारक मानधन आणि प्रतिष्ठा देऊ शकलो नाही. त्यामुळे नवनवीन तरुण लोक इकडे यायला उत्सुक नसतात. आपण प्रकाशन व्यवसायाचा भविष्याचा विचार करता, नव्या दमाची माणसं तयार करू शकलो नाही. आता त्यांची उणीव भासते. याचं मूळ कारण असंही आहे की- दरमहा होणारी पुस्तकांची विक्री, निर्मिती खर्च आणि कार्यालयीन खर्च यांचा मेळ जुळत नाही. त्यामुळे संबंधित घटकांना अपुऱ्या मानधनावर समाधान मानून घ्यावं लागतं. आपल्याकडे बहुतांश प्रकाशनसंस्था या एक खांबी असण्याचं कारण हेच आहे. ‘सबकुछ दादा कोंडके’ अशी स्थिती आहे. कथा-पटकथा-नायक-दिग्दर्शक-निर्माता अशा सगळ्या पातळ्यांवर दादा एकटे काम करायचे.

प्रश्न - अलीकडच्या काळात ही गोष्ट सतत छळत असते म्हणून विचारतो, पुस्तकाच्या व्यवसायात डेडलाईनला-टार्गेट्‌स कितपत महत्त्व वाटतं?

डेडलाईन किंवा टार्गेट्‌सला इंग्रजी प्रकाशनात खूप महत्त्व आहे. कारण ते लोक त्याकडे ‘इंडस्ट्री’ म्हणून पाहतात. त्यांची कॉर्पोरेट ऑफिसेस असतात, इनहाऊस अनेक कामं चालतात, यंत्रणा मोठी असते, मनुष्यबळ अधिक असतं. इंग्रजी भाषेमुळे त्यांना वितरणाचा मोठा अवकाशही मिळतो. साहजिकच उत्पन्नही त्या पटीतच राहते. हा सगळा लवाजमा सांभाळायचा तर खर्चही मोठा असतो. त्यासाठी त्यांना डेडलाईन आणि टार्गेट्‌सनुसार काम करणं अनिवार्य ठरतं. ठरावीक बिझिनेस झालाच पाहिजे, यावर कटाक्ष असतो. मराठीचं तसं नाही. पूर्वी तर आपण हजाराची आवृत्ती करायचो, आता-आता ती पाचशेवर आलीय. तीसुद्धा संपायला पुष्कळ काळ जातो. त्यात वर म्हटल्याप्रमाणे अडचणी असतातच. शिवाय आपल्याकडे हा व्यवसाय दोन प्रकारे चालला. एक- वडील करत होते म्हणून मुलगा आला. दोन- पुस्तकाच्या, वाङ्‌मयाच्या प्रेमातून आला. त्यामुळे इंग्रजीप्रमाणे कार्यप्रणाली आपल्याकडे तितकी रुजली नाही. आर्थिक उलाढाल वाढली तर त्याप्रमाणे शक्य होईल. पूर्वी काही प्रकाशकांकडे स्वत:चा सगळा सेटअप (मुद्रण, मुद्रितशोधन, बायडिंग, वगैरे) असायचा. मात्र कालौघात घटते उत्पन्न आणि वाढत्या खर्चामुळे त्यात कपात होत गेली. आता प्रत्येक गोष्ट आऊटसोर्स केली जाते. प्रादेशिक भाषेतल्या एका प्रकाशकाला पाच लोक नोकरीला ठेवणं आर्थिक दृष्ट्या दिवसेंदिवस अवघड होत चाललंय. ही परिस्थिती केवळ मराठीचीच आहे का? तर, नाही. सबंध भारतभर प्रादेशिक भाषांतील प्रकाशनांची थोड्या-अधिक प्रमाणात अशीच स्थिती आहे. राहिली गोष्ट टार्गेट्‌सची तर टार्गेट ठेवायचं म्हणून कोणतीही पुस्तकं काढायची का? समजा- तुम्ही ठरवलं की, महिन्याला दहा पुस्तकं काढायची; पण दहा उत्तम स्क्रिप्ट तर मिळाली पाहिजेत ना! म्हणजे टार्गेटलासुद्धा मर्यादा येतात. बरं, मोठ्या संस्थांकडे तो लेखकांचा ओघ असतो, भांडवल पुष्कळ असतं. बाकीच्यांचं काय? कुठलीही गोष्ट मुळात रॉ मटेरियलपासून सुरू होते. जर रॉ मटेरियलच मिळणार नसेल तर? आपल्याकडं प्रकाशकाचं व्यक्तिमत्त्वच त्या प्रकाशन संस्थेचं व्यक्तिमत्त्व असतं. तो त्याच प्रकारच्या पुस्तकांना शोधत असतो. टाइम, मनी व मॅनपॉवर मॅनेजमेंट फार कमी पडते आणि नियोजन कोसळून जाते.

प्रश्न - पूर्वी कसल्याही तांत्रिक सुविधा नसताना, कठीण परिस्थितीत अतिशय दर्जेदार ग्रंथनिर्मिती आपल्याकडे झाली. उदा.- निर्णयसागर, जगदिदेच्छू, चित्रशाळा आदी मुद्रणसंस्था असतील किंवा जावजी दादाजी, दामोदर सावळाराम यंदे आदी पूर्वसूरींनी केलेलं काम असेल. आज तंत्रज्ञानाच्या अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध असूनही दर्जाच्या बाबतीत तितकी सरसता दिसत नाही. याचं काय कारण असावं, असं वाटतं?

आज संगणकामुळे अक्षरजुळणी, मजकूर कुठेही, कसाही फिरवणं, चित्रं टाकणं, बॅकअप ठेवणं वगैरे अनेक- एके काळी किचकट वाटाव्यात- अशा गोष्टी सहजसुलभ झाल्या, हे खरंचय. आताच्या दर्जाबद्दल म्हणशील तर, याला केवळ प्रकाशन व्यवसायच अपवाद नाही, तर सर्वच क्षेत्रांत अशी पडझडीची स्थिती दिसू लागलेली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांतील चांगले लोक भेटतात, तेव्हा तेही याबद्दल चिंता व्यक्त करताना दिसतात. हल्ली सगळ्यांनाच प्रत्येक गोष्ट ‘इन्स्टन्ट’ हवीय. थांबणं, वाट पाहणं हे कोणाला नको झालंय. पूर्वी प्रत्येक ज्ञानशाखेत विद्वान लोक कार्यरत असत आणि ते त्यांच्या कामाच्या बाबतींत असो किंवा ज्ञानाच्या बाबतींत असो, खूप सजग असत. शक्यतो तडजोड करत नसत. त्यात स्वत:ला झोकून देत. कारण पूर्वी प्रत्येक गोष्ट ही पैशात-यशात मोजली जात नसे. मी जर एखाद्या क्षेत्रात काम करत असेन, तर मला त्या क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान असलंच पाहिजे, असं त्या मंडळींना मनापासून वाटे. त्यासाठी अनेकांनी आयुष्याची किंमतही मोजलेली आहे. आता प्रत्येक गोष्ट लौकिक यशात (पैशात, सन्मान-पुरस्कार-प्रसिद्धी) मोजली जाऊ लागली आहे. पैसा मिळणार असेल तरच करायचं, अशी एक संकुचित मानसिकता तयार होताना दिसतेय. किंबहुना, जे लोक पुरेसा वेळ देऊन बारकाईनं, साधनशुचिता पाळून दर्जात्मक काम करू पाहतात, त्यांना नावं ठेवणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. दुसरीकडे टॅलेन्टची, कसदार काम करणाऱ्यांची, चांगलं शिकणाऱ्यांचीही हेळसांड होताना दिसतेय. अनेक चांगले शिकलेले तरुण बेकार फिरताना पाहतो, तेव्हा वाईट वाटते. त्यामुळे हा फरक पडला असावा, असं मला वाटतं. पूर्वीसारखी प्रकाशनातली विद्वान व तज्ज्ञ मंडळींची गांभीर्याने काम करणारी फळी आता दिसत नाही, हे वास्तव खरंच आहे.

प्रश्न - तुम्ही मुळात लेखक आहात, नंतर प्रकाशनाकडे वळलात. खरं तर ‘लेखकच प्रकाशक असणं किंवा प्रकाशक लिहिणारा असणं’ अशी उदाहरणं आपल्याकडे कमीच आहेत. तेव्हा तुमचं लेखक असणं हे तुमच्यातील प्रकाशक असण्याला पूरक वाटतं, की  तुमच्यातला प्रकाशक लेखकावर वरचढ ठरतो? नेमकं काय सांगाल?

या दोन्ही गोष्टींचा एक फायदा झाला की- गमतीनं सांगायचं तर- दोन्ही पायांतली चप्पल नेमकी कुठं चावते ते कळतं. त्यामुळे दोन्हीकडच्या वेदना मला समजल्या. लेखकाविषयी आदर असल्यामुळे मी अनेकांचे स्वभाव सांभाळत आलो. लेखक किंवा लेखकाची प्रतिभा ही आदराची-महत्त्वाची गोष्ट असली, तरी प्रतिभावंताचा सहवास हाही तितकाच कसोटीचा असतो. अनेकदा असं वाटतं की, आपण गळ्यात नाग घेऊन फिरतोय की काय! एखादा चांगलं लिहिणारा लेखक असला की, मी त्याला त्याच्या सगळ्या गुण-दोषांसकट स्वीकारतो. फक्त त्याचा आवेश ‘आपण फार विद्वान आहोत’ असा नाटकी-ढोंगी नसावा. ढोंगी लोक करतात थोडं आणि आव खूप आणतात. मात्र काही प्रतिभावान लेखकांचं वागणं-बोलणंच अतिशय नैसर्गिक आणि सहज असतं. ही नैसर्गिकता आपल्या लक्षात येते. मी स्वत: लेखक असल्याने मला समोरच्या लेखकातली ही नैसर्गिकता जाणून घेणं सोपं गेलं. त्यामुळे त्यांच्याबद्दल (त्यांच्या स्वभावात अधिक-उणे-तऱ्हेवाईकपणा-फटकळपणा असला तरी) आदरच वाटतो. कारण तो नाटकीपणा नसून नैसर्गिक असतो. काही लोकांचे लेखकांबद्दलचे काही आक्षेपही असतात, परंतु मला त्यांच्या खासगी आयुष्यातील गोष्टींबद्दल मुळीच स्वारस्य नसतं. मी नेहमीच त्यांचं कवीपण-लेखकपण-लेखननिष्ठा आणि लेखन पाहत आलो. आजवर लेखकांचे चांगले-वाईट असे खूप अनुभव आले. चांगले आपल्याला समृद्ध करतात, तर वाईट अनुभवांकडे कामाचा एक भाग म्हणून पाहून सोडून द्यावं.

प्रश्न - आपल्याकडे प्रकाशकांबद्दल व्यवहाराला धरून संशयाचं-अविश्वासाचं एक वातावरण लेखकांमध्ये कायम दिसतं. तुमचा अनुभव काय सांगतो?

याबद्दल इतकंच म्हणता येईल की, हे परस्पर-विश्वासाचं नातं आहे. कोणी कोणत्या गोष्टीकडे कसं पाहावं, हा ज्याचा त्याच्या दृष्टिकोनाचा-आकलनाचा भाग आहे. त्याला आपण काही करू शकत नाही. कारण प्रकाशकांबद्दल असं बोलणं ही एक फॅशनच झालीय. अनेकदा असं होतं की- पुस्तक उत्तम असतं, पण खपत नाही. त्या अर्थानं पुस्तकंसुद्धा चकवा देतात. हा काही प्रकाशकाचा दोष नसतो. ते पुस्तक चांगलं आहे म्हणूनच प्रकाशक काढतो ना? मग लेखकाला वाटायला लागतं की, पुस्तक तर उत्तम आहे आणि इतक्याच प्रती कशा काय गेल्या? प्रकाशक खोटं सांगतो की काय? दोन-चार आवृत्त्या विकल्या असतील... इ. तर, अशा गोष्टींना काही उत्तर नाही. किंवा असंही होतं की, साधारण पुस्तकही चांगलं खपतं. आम्ही छापलेली नव्या-जुन्या लेखकांची कन्टेन्टच्या दृष्टीने उत्तम असलेली अशी अनेक पुस्तकं आहेत की, जी चांगली चालायला हवी होती, पण चालली नाहीत. पुष्कळदा प्रकाशकाचं आर्थिक गणित कधी चुकतं, कधी जुळतं. उदा.- एका वर्षात 25 पुस्तकं छापली तर त्यातील चार-पाच पुस्तकं चालतात. कधी-कधी तर हे प्रमाण एक-दोन एवढंच असतं. मग खर्चाचा सगळा ताण त्यावरच येतो. त्यातून मग मुद्रक-बाइंडर-चित्रकार-कागद-रॉयल्टी आदी मंडळींची देयकं लांबत जातात. प्रत्यक्ष खर्च आणि मिळालेलं उत्पन्न याचा ताळमेळ जुळत नाही. यातून, ‘पैसा आहे आणि तो देत नाही किंवा तो जाणीवपूर्वक देत नाही,’ असे अनेक गैरसमज निर्माण होत जातात. विशेषत: छोट्या आणि मध्यम प्रकारच्या प्रकाशकाबद्दल असे गैरसमज खूप होताना दिसतात. अशा गोष्टींमुळे नवी तरुण पिढी इकडे यायला कचरते. अशी स्थिती देशभरातील प्रादेशिक भाषांतील प्रकाशनांना कायम सतावत असते. मात्र याबाबतीत माझं एक ठाम मत आहे की- एक माणूस म्हणून तो प्रकाशक जर वाईट असता, तर पुस्तकांच्या जगात आला नसता. पैसा कमावण्याचे इतरही अनेक सोपे मार्ग असताना ते सोडून तो अशा क्लिष्ट व्यवसायात कशाला येईल? एखाद्याला पुस्तकं छापावी वाटतात, ही गोष्टच मोठी आहे ना!! तो सत्प्रवृत्त असल्याशिवाय हे करू शकत नाही. पुस्तकाचं सगळं बाळंतपण करायचं, त्याच्या प्रती जीव लावून सांभाळायच्या, निर्मितीशी संबंधित सर्व लोक सांभाळायचे आणि वरून आरोप-गैरसमज हेही ऐकून घ्यायचं. प्रत्येकच जण अशा शंका घ्यायला लागला तर त्याच्या आत्मसन्मानाचं काय? त्याचं हनन किती करायचं? प्रा.म.वा. धोंड म्हणायचे, ‘‘एवढाच वेळ आणि एवढाच पैसा प्रकाशकाने दुसऱ्या व्यवसायात लावला तर त्याला याच्यापेक्षा जास्त पैसा मिळेल. पण ते ही चूक करतात, पुन:पुन्हा करतात. परमेश्वराला मी प्रार्थना करतो की, त्यांना अशीच चूक करायची बुद्धी दे. नाही तर आमची पुस्तकं कोण काढणार?’’ म्हणजे धोंडांची ही भूमिका लक्षात घेतली पाहिजे. सगळेच लेखक काही तसे नसतात. धाेंडांसारखे, विंदांसारखे, द.भिं.सारखेही समजून घेणारे असतात. असंच दिवाळी अंकांबद्दलही बोललं जातं की, मानधन कमी देतात म्हणून. खरं तर प्रश्न असा आहे की, ज्याचं लेखन छापलं म्हणून दिवाळी अंकाच्या पाचशे प्रती विकल्या गेल्या, असे किती लेखक आज दिसतात? पूर्वी पु.ल., माडगूळकर, व.पु. अशा किती तरी लेखकांबद्दल असं घडायचं ना! मग लेखक लोकप्रिय असो की अभिजात लेखक असो; पण त्यांचं लेखन अंकात आहे म्हटल्यावर वाचकांच्या उड्या पडायच्या. हातोहात शेकडो प्रती विकल्या जायच्या. आज ते होताना दिसत नाही. म्हणून मग विशिष्ट ‘विषय’ घेऊन अंक काढायची पद्धत आली. कारण काय तर, विषय पाहून तरी अंक विकला जाईल म्हणून. यामध्ये त्या-त्या विषयाचा अभ्यास असणारा, चांगलं लिहिणारा लेखक तरी पट्‌कन शोधता येतो. असं सगळं आहे.

प्रश्न - पुस्तकांचं वितरण खेडोपाडी होत नाही, अशी एक ओरड कायम असते?

याचं कारण असं आहे की, लेखकापासून ते वाचकांपर्यंत प्रत्येक जण असंच समजतो की, ही जबाबदारी केवळ आणि केवळ प्रकाशकाचीच आहे. म्हणजे प्रकाशकानेच सगळं केलं पाहिजे. त्यानं पुस्तकावर संस्कारही केले पाहिजेत, उत्तम निर्मितीही केली पाहिजे, लेखकांचंही सगळं पाहिलं पाहिजे, परीक्षणंही छापून आणली पाहिजेत, नाही विकली तरी वर्षांनुवर्षे पुस्तकं सांभाळलीही पाहिजेत, इ. मात्र यात आपण हे विसरतो की, वितरणाची जबाबदारी ही विक्रेत्यांची असते. जसं छपाईची जबाबदारी ही मुद्रकाची असते, चांगलं मुखपृष्ठ करायची चित्रकाराची असते, परीक्षणं-समीक्षा लिहिण्याची समीक्षकांची असते, मुद्रिते वाचण्याची मुद्रितशोधकाची असते; तशीच पुस्तकं विकण्याची जबाबदारी ही वितरकांची असते. एक पुस्तक तयार झालं की- प्रकाशक पुढच्या पुस्तकाच्या कामात स्वत:ला गुंतून घेतो. मग अशी प्रक्रियेच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेक पुस्तकांची कामं चाललेली असतात. निर्मितीच्या या प्रक्रिया सोडून तो महाराष्ट्रातल्या किती गावोगाव पुस्तकं विकत कधी फिरणार? एक प्रकाशक प्रत्येक गावोगाव आपली स्वतंत्र यंत्रणा उभी करू शकत नाही. ही अशक्य गोष्ट आहे. ही जबाबदारी त्या-त्या ठिकाणच्या विक्रेत्यांची असते. त्यांनी पुस्तकं ठेवली पाहिजेत, लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजेत. आज वीसेक जिल्हे असे आहेत की तिथे ललित, समीक्षापर आणि वैचारिक पुस्तकांना विक्रेतेच नाहीत. जे आहेत ते अशी पुस्तकं ठेवायला तयार नसतात. असे वितरक तयार झाले पाहिजेत, याची चर्चा आजवर कोणीच करताना दिसत नाही. जो-तो उठतो- प्रकाशकाने हे केलं नाही, ते केलं नाही, त्याचं हे चुकलं, ते चुकलं, असं म्हणत असतो. बोलणं फारच सोपं असतं. दुसरी एक गोष्ट आहेच की, मला जर एखादं पुस्तक हवं असेल तर मी धडपड करून ते मिळवतोच की. एके काळी सुविधा नसताना अनेक प्रतिभावान मंडळींनी एकेक ग्रंथ धडपड करून मिळवल्याची उदाहरणे आपण वाचतो, ऐकतो. आता सुविधा असूनही ही धडपड कमी-कमी होत चाललीय. आता तर ऑनलाईन विक्रीमुळे पुस्तक मिळवणं खूप सोपं झालंय. नवं पुस्तक आलंय, हे कळण्यासाठी जाहिराती कराव्या लागतात. पण तोही खूप खर्चिक प्रकार झाला आहे. जाहिरातींचे दर प्रत्येक प्रकाशकाला परवडतीलच असे नाही. हल्ली अनेक वृत्तपत्रांनी पुस्तक परीक्षणांना हात आखडता घेतलेला आहे. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त सूच्या पाठवतो.

प्रश्न - श्री.पु. भागवत यांच्या नावे दिला जाणारा हा प्रतिष्ठित सन्मान मिळाल्यावर काय भावना आहे?

हा पुरस्कार स्वीकारताना जो निर्भेळ आनंद व्हायला हवा, तो होत नाहीय. याची तीन कारणं आहेत. एक- खरं सांगायचं तर आता या व्यवसायातली मजा संपलेली आहे. मी ज्या वेळी या व्यवसायात आलो तेव्हा कमीत कमी दोन वेळची भाकरी तरी मिळेल, याची शाश्वती असायची. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. महागाई खूप वाढलीय. तुम्ही विक्रेत्यांवर खूप अवलंबून असता आणि तुमचे पैसे वेळेवर मिळतीलच याची खात्री नाही. त्यामुळे भांडवल सारखं अडकून राहतं. तुमचा ‘प्रॉफिट’ हा गोडावूनमध्ये आणि विक्रेत्यांकडे अडकलेला असतो. त्यामुळे नव्याने या व्यवसायात येणाऱ्यांची काळजी वाटते. दोन- या व्यवसायातले माझे सर्व सहकारी या ना त्या कारणाने अडचणीत आहेत. आपल्याच व्यवसायातील लोक जर कष्टी असतील, तर तो आनंद निर्भेळ राहत नाही. तीन- ज्याच्यातून काही भलं होईल, असं आता तरी समाजात काही दिसत नाही. अतिशय गांभीर्याने लेखन करणारे संशोधक दुर्मीळ होत चालले आहेत. समाज ग्रंथसन्मुखतेपासून दूर जात आहे. पुढं आशा जिवंत राहाव्यात असा समाजाकडूनही ग्रंथांना प्रतिसाद मिळत नाही.

शेवटी, प्रकाशन हा एक अनिश्चित व्यवसाय आहे, क्रिकेटसारखा. कधी काय होईल, कसं होईल, कोणतं पुस्तकं चालेल, कोणतं नाही- हे काहीही सांगता येत नाही. क्रिकेटमध्ये जसं शेवटच्या बॉलपर्यंत काहीही होऊ शकतं, तसंच. पण म्हणूनच त्यात थरारकता आहे, आनंद आहे आणि मी तो एन्जॉय करतो.

मुलाखत व शब्दांकन : सुशील धसकटे

Tags: अरुण जाखडे मुलाखत सुशील धसकटे sushil dhaskate award purskar interview mulakhat arun jakhade sunil dhaskate weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अरुण जाखडे

मराठी ग्रंथप्रकाशक आणि लेखक. पद्मगंधा ही त्यांची प्रकाशनसंस्था आहे. 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात