डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

क्लासिक्स ॲण्ड ह्यूमॅनिटीज्‌

(बेळगाव येथील जी.एस. सायन्स कॉलेजच्या स्थापना दिनानिमित्त 6 ऑगस्ट 2012 रोजी केलेली भाषण.)

ज्या समाजातील बुध्दिवादी सत्यान्वेषण, नि:स्पृहपणा, आवश्यकता पडली तर ज्येष्ठ किंवा अधिकारी व्यक्तींनाही आव्हान देण्यास लागणारे धैर्य यांच्यापासून दूर राहतात व आपली कर्तव्ये चुकवतात त्यांच्या समाजाची उंची क्रमाक्रमाने कमीच होत जाते. तो खुजा होतो; जरी दर वर्षी सरकारमान्य विद्वान आणि बुध्दिवादी यांची यादी लांबत राहिली आहे असे आपल्याला दिसले तरी! ज्या समाजातील राजकारणी आणि नेते आपल्यामधील बुध्दिवंतांची जाहीरपणे कुचेष्टा करतात, त्या समाजाची प्रतिष्ठा धोक्यात आलेली असते. ज्या समाजातील शिक्षण विचारविश्व विस्तारत नाही आणि जो समाज आदर्शवादी शिक्षणावर मात करून व्यावसायिक शिक्षणामागे धावतो; कोणत्याही प्रकारच्या बौध्दिक कार्यक्रमावर नापसंतीचा शिक्का मारतो तो चंगळवादाच्या आहारी जातो हे निश्चित.

माझ्या विद्यार्थिदशेत विद्यापीठात वाणिज्य विभागांची वेगळी शाखा नव्हती. ‘कला’ शाखा किंवा ज्याला आज आपण अभिजात साहित्य आणि सामाजिक विज्ञान शाखा म्हणतो तेवढाच एक प्रमुख अभ्यासक्रम होता आणि त्यामागोमाग ‘विज्ञान शाखा’ हा दुसरा स्वतंत्र विभाग होता. त्या वेळी वाणिज्य शाखेचे शिक्षण  देणारी विद्यालये अजिबात नव्हती असे नाही. 1913 साली स्थापन झालेले मुंबईचे सिडनेहॅम कॉलेज वाणिज्य विषयांच्या शिक्षणासाठी केवळ मुंबईतील नव्हे तर सर्व आशिया खंडामधील पहिले महाविद्यालय म्हणून प्रख्यात होते. त्यानंतर वाणिज्य शाखेची काही  महाविद्यालये सुरू झाली आणि त्यांच्यामधील अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ‘बी.कॉम’ (बॅचलर ऑफ कॉर्स) ही पदवी विद्यापीठाकडून देण्यात येऊ लागली. पण कलाशाखा किंवा ‘आर्टस्‌’ आणि विज्ञान किंवा ‘सायन्सेस’ या दोनच शाखांना  निव्वळ अभ्यासक्रम (ॲकॅडेमिक डिसिप्लीन्स) म्हणून मान्यता  होती.

वाणिज्य शाखा जरी नोकरी मिळवण्याच्या दृष्टीने अधिक उपयुक्त होती,  तरी त्या अभ्यासक्रमाकडे व्यावसायिक शिक्षण किंवा प्रशिक्षण याच दृष्टिकोनातून पाहिले जाई. ‘आर्टस्‌’च्या  अभ्यासक्रमाची आखणी विद्यार्थ्यांचे विचारविश्व अधिक विकसित करण्याच्या उद्देशाने केली जात असे तर विज्ञान शाखेकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांना निसर्गाच्या गूढ स्वरूपाचा अभ्यास, अनुभव आणि संशोधन करण्यासाठी मार्गदर्शन केले जात असे. प्रत्येक विद्यार्थ्याची निवड त्याचा नैसर्गिक कल, क्षमता आणि त्याचा आवाका या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर केली जात असे. आज उच्च शिक्षणाच्या विश्वात कमालीचा बदल झालेला आपण पाहत आहोत. कितीतरी नवनवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसमोर उघडून ठेवलेले आहेत.

पूर्वी कधीच अस्तित्वात नसलेले ग्रंथालय विज्ञान (लायब्ररी सायन्स), वृत्तपत्रविद्या आणि संपर्कज्ञान (जर्नालिझम ॲण्ड कम्युनिकेशन), व्यावसायिक  व्यवस्थापन (बिझिनेस मॅनेजमेंट), पणन (मार्केटिंग), समाजकार्य (सोशल वर्क), अंगभूत कलांच्या अभिव्यक्तीचे आणि इतर कित्येक विषयांचे अभ्यासक्रम आणि त्यांच्या नव्या विद्याशाखा आता चांगल्याच प्रस्थापित झाल्या आहेत. या नवीन अभ्यासक्रमांना आणि त्यासाठी मान्यता मिळालेल्या विद्याशाखांना कोणाचीच हरकत असण्याचे कारण नाही. उच्च शिक्षणाबाबतचा यथार्थ दृष्टिकोन (परस्पेक्टिव्ह) जेव्हा बदलेल, त्या वेळी त्यांमध्येही आवश्यक बदल घडून येतीलच.

प्रत्येक बदलाचा स्वीकार प्रगती म्हणून करणे जरुरीचे नाही. पण शिक्षणाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात घडलेला महत्त्वाचा फरक असा की आमच्या उच्च शिक्षणाची दिशा बदलून ते ‘रोजगारासाठी किंवा नोकरीसाठी शिक्षण’ या उद्दिष्टाच्या दिशेने वळविण्यात आले आहे. त्यामुळे व्यवसायाभिमुख असे जे शिक्षणक्रम आहेत त्यांना विशेष महत्त्व देऊन त्यांची तरतूद केली जात आहे. पण त्यातही आक्षेपार्ह असे विशेष नाही.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात जुनी व्यवस्था बदलणार हे स्वाभाविकच होते. ब्रिटिश शासकांच्या शिक्षणासंबंधातील ‘उच्चभ्रू’ कल्पनांचा त्याग आणि उच्च शिक्षणाचे लोकशाहीकरण या दोनही घटना नव्या व्यवस्थेत अटळ आणि स्वागतार्हही होत्या. स्वातंत्र्योत्तर काळात प्रवेशासाठी नव्या आणि जुन्या विद्यापीठांची दारे अधिक अधिक विद्यार्थी ठोठावणार हे अपेक्षितच होते. त्यामुळे नवनवीन अभ्यासक्रमांचे संयोजन करताना बाजाराच्या गरजा विचारात घेणे आवश्यक होते, नवीन विषयांचा समावेश करून समाजाच्या, विशेषाधिकार लाभलेल्या, ते न लाभलेल्या वंचित आणि विशेषत: परिघावरील अशा सर्व स्तरांवरील विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नवनवीन ज्ञानशाखांचा समावेश करणे गरजेचे होते.

जसजशी वर्षे उलटत गेली तसतशी ब्रिटिश रियासतीच्या सुरुवातीपासून चालत आलेली उदार शिक्षणपध्दती एक तर दुर्लक्षिली गेली किंवा तिच्यासमोरील अनेक हरकतींमुळे हळूहळू सोडून दिली गेली. हे खरोखरच आवश्यक होते काय, हा आजच्या संदर्भात  विचार करण्यासारखा प्रश्न आहे. कारण उच्च शिक्षणाला नवी दिशा देत असताना मुलांच्या कोवळ्या मनोभावनांना आकार देऊन त्यांच्या पुढील परिपक्व जीवनाची तरतूद करण्याचे आणि त्यासाठी विशिष्ट मूल्यव्यवस्था राबविण्याचे आधीच्या शिक्षणपध्दतीचे जे एक उद्दिष्ट होते त्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले. विशेषत: ‘कला शाखेला’ या आदर्श बदलाचा चांगलाच धक्का बसला. तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान, तौलनिक धर्मविचार (कम्पॅरिटिव्ह थिऑलॉजी) आणि साहित्यवाङ्‌मय यांसारख्या चिंतनाधिष्ठित विद्याशाखांना या आदर्श बदलाचा फारच मोठा फटका बसला. आमची शैक्षणिक धोरणे ठरविणाऱ्या माननीयांचा असा निष्कर्ष होता की भाषा व साहित्य, तर्कशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषय फक्त शैक्षणिक व्यवसायातच उपयुक्त ठरणारे आहेत. त्या क्षेत्राबाहेर रोजगार किंवा नोकरी मिळविण्यासाठी त्यांचा काहीही उपयोग नाही. ‘अभ्यासासाठी अभ्यास’ हाच जणू त्यांना संदर्भ आहे!

हा निष्कर्ष अत्यंत  उतावीळपणाचा होता. जर त्या चिंतनप्रचुर विद्याशाखांमध्ये नवीन  उपक्रमांचे, व्यवसायांचे बीज पेरण्याचा प्रयत्न झाला असता तर आज आपण कदाचित फार वेगळ्या परिस्थितीत राहिलो असतो. पण एकदा पूर्णपणे अशक्य असा शिक्का या विषयांवर मारला गेल्यावर या पर्यायाकडे लक्ष जाणे शक्यच नव्हते.

एका शतकापेक्षा अधिक काळ या देशात जी उदारमतवादी शिक्षण व्यवस्था आमच्या उच्च शिक्षणाचा मेरुदंड म्हणून राबवली गेली, तिच्याबद्दल आजपर्यंत बरेच लिहिले-बोलले गेले आहे. हे उदार शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांचे ज्ञानभांडार विशाल बनवून व त्यांच्या मूल्य व नीतिविषयक जाणिवा प्रखर करून त्यांचे सकस व्यक्तिमत्त्व घडविणे या खेरीज दुसरे काय होते? विद्यार्थ्यांना अनेक विषयांचा विस्तृत परिचय, आणि किमान कोणत्याही एका अभ्यास विषयाचे सखोल ज्ञान हाच त्या शिक्षण व्यवस्थेतील सर्वसाधारण अभ्यासक्रम होता.

आज आपण आपल्या आजोबांच्या पिढीतील लोकांकडे नुसती नजर जरी टाकली, तरी आपल्याला असे आढळते की उदार विचारांचे शिक्षण घेत ही मंडळी अधिक खुल्या मनांची, मतमतांतरांतही अधिक सहिष्णु आणि संकुचितपणापासून दूर राहिलेली आहेत; रूढिबध्द विचार, पूर्वग्रह, आणि कर्मठपणा यांच्यापासून पूर्णपणे मुक्त असलेले या पिढीतील लोक या उदार शिक्षण व्यवस्थेचाच परिपाक आहेत. त्यांना आपली मते आणि निर्णय यांच्याबद्दल निश्चितपणे आत्मविश्वास होता पण व्यवसायाचे क्षेत्र कोणतेही असो, त्यांची कृती विचारपूर्वक असे. ते थोडेफार नास्तिक असतील, पण अविचारी रूढी-परंपरांबरोबर वाहवत जाणारेही नव्हते. कृती करण्याआधी तिचा सर्व बाजूंनी सखोल विचार करण्याचे शिक्षण त्यांना मिळाले होते. त्याचाच परिणाम  म्हणून समाजामध्ये तर्क, समानता आणि मानवता यांवर आधारलेले  प्रगतिपर बदल घडवून आणण्याचे ते एक साधन बनले.

उदारमतवादी शिक्षण हे मुख्यत: अभिजात भाषा व साहित्य (क्लासिक्स) आणि सामाजिक विज्ञान (ह्यूमॅनिटीज्‌) यांचे होते. त्यामुळे विद्यार्थ्यांवर त्यांच्या विषयांच्या अभ्यासाखेरीज नैतिकता आणि मानवी मूल्ये यांचेही दृढ संस्कार होत. विद्यार्थ्यांना शरीर, बुद्धी आणि आत्मा यांच्या स्वातंत्र्याचे महत्त्व समजावे; धार्मिक कडवेपणा, रूढिबध्दता आणि धार्मिक व सामाजिक प्रतिबंध यांच्यापासून ते मुक्त असावेत; वेगवेगळ्या सामाजिक समस्या व त्यांची चिकित्सा उपस्थित करण्यास त्यांना मोकळीक असावी. नकाराचा आणि व्यवसाय निवडीचा अधिकार त्यांनी मिळवावा हे या शिक्षणव्यवस्थेचे हेतू होते. मूलभूत स्वातंत्र्याच्या या काही गोष्टींखेरीज आणखी काही मानवी मूल्ये रुजावीत असा प्रयत्न होता. त्यातील सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ‘समानता’ या मूल्यावरील अतूट विश्वास.

सर्व माणसे जन्मत: सारखीच असतात, म्हणून त्या सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे;  दुसरी गोष्ट व्यक्तीची प्रतिष्ठा. आदर बाळगण्याचा, आणि नैतिक वागणूक मिळण्याचा अधिकार- अटळ सहिष्णुवृत्ती आणि अहिंसा विचार या उदारमतवादी शिक्षणाने  विद्यार्थ्यांध्ये रुजविलेल्या मूल्यांमुळे सार्वजनिक जीवनाला  पायाभूत असा ‘जगा आणि जगू द्या’ हा विचार रुजविला. माझ्या शालेय जीवनातसुध्दा सामाजिक-आर्थिक पायावर उभी शंकूसारखी समाजरचना आणि स्वाभाविक कल, त्याचप्रमाणे  पालकांची इच्छा या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांचे वर्गीकरण करीत होत्याच. विद्यार्थ्यांचा बुध्यांक ही महत्त्वाची गोष्ट या सर्वांच्या मुळाशी होती. सर्वांत वरच्या क्रमांकाचे हुषार विद्यार्थी अभियांत्रिकी  (इंजीनिअरिंग) किंवा वैद्यकीय (मेडिकल) अभ्यासक्रमाकडे वळत. मध्यम बुध्दीचे किंवा सर्वोच्च गुण मिळवणाऱ्यांपेक्षा थोड्या खालच्या पातळीवरचे, कॉलेज किंवा शाळांत शैक्षणिक किंवा शिक्षकाच्या व्यवसायात प्रवेश करीत. तर त्याही खालच्या तळाजवळच्या थरातील विद्यार्थी वृत्तपत्र व्यवसाय अगर इतर पांढरपेशा व्यवसायांत शिरत असत.

आज पदवीधर विद्यार्थ्यांसमोर अनेक मार्ग खुले आहेत. आणि तरीही अनेक वेळा रिकाम्या पदांवर योग्य उमेदवार मिळत नाहीत आणि लायक उमेदवार उपलब्ध आहेत तिथे त्यांना योग्य अशी पदे रिक्त नसतात. त्याचाच परिणाम म्हणून  व्यवसायाधिष्ठित शिक्षणाचा आणि अभ्यासक्रमाचा गजर चाललेला आहे. दुसऱ्या शब्दांत असेही म्हणता येईल की पदवी परीक्षेपर्यंतचे  शिक्षण हे बाजारात उपलब्ध असणाऱ्या व्यवसायांसाठी किंवा  नोकऱ्यांसाठी अपुरे आहे. विद्यार्थ्यांनी एक तर महाविद्यालये आणि विद्यापीठे यांमध्ये आतापर्यंत घेतलेले शिक्षण पूर्णपणे विसरून गेले पाहिजे. किंवा मिळेल ते खडतर प्रशिक्षण घेण्याची तयारी ठेवली पाहिजे. गेल्या काही वर्षांत अभ्यासक्रमातील विषयांच्या लोकप्रियतेत बराच चढ-उतार आढळलेला आहे.

पोषाखातील फॅशन्स जशा झटपट बदलतात तशीच झपाट्याने निव्वळ ज्ञानकक्षेतील अभ्यासक्रमांची आवड कमी जास्त होत आहे. व्यवस्थापन विषयातील पदवी किंवा पदविका यांचा भाव सध्या प्रचंड वाढला आहे. आणि पणन-व्यापार, उत्पादनशास्त्र, आणि जाहिरात व्यवसाय हे विषय सध्या ‘फॅशनेबल’ विषय आहेत. वाणिज्य विद्या शाखेवरचा भर ओसरून व्यवस्थापन (मॅनेजमेंट फॅकल्टी) विद्याशाखेने त्याची जागा घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या नजरेसमोर तरळणाऱ्या आर्थिक सुबत्तेच्या आणि प्रशासकीय अधिकारांच्या दराऱ्याच्या स्वप्नांची आपल्याला यावरून कल्पना करता येते. आणखी एक विद्यार्थिप्रिय आणि फॅशनेबल विषय  म्हणजे माहिती तंत्रज्ञान (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) हा अभ्यासक्रम.

या उलट आश्चर्य म्हणजे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखांमधील जागा दिवसेंदिवस अधिकाधिक रिकाम्या राहताना दिसत आहेत. लोकप्रियता ही नेहमी हिंदोळ्यावरच असते. ती सदैव आत्ममग्न लहरीच राहिली आहे. नवीन अभ्यासक्रम आणि विद्याशाखा उभारण्याचे कार्य स्वातंत्र्योत्तर काळाच्या सुरुवातीस ज्यांनी स्वीकारले त्यांनी किमान काही दशके तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान, आणि वाङ्‌मय यांसारख्या वैचारिक विषयांचे अभ्यासक्रमातील महत्त्व विद्यार्थ्यांच्या जीवनविकासात किती आहे हे जाणले होते. 1960 च्या दशकात महाविद्यालयातील प्राध्यापक म्हणून मी माझ्या व्यवसायाला सुरुवात केली होती. तेव्हा वाणिज्य विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांनाही जॉर्ज ऑरवेलचे ‘ॲनिमल फार्म’ व ‘नाइन्टीन एटीफोर’ किंवा इब्सेनची ‘डॉल्स हाऊस’ किंवा ‘एनिमी ऑफ द पीपल’, ‘ई.एम. फॉर्स्टरचे ‘ए पॅसेज टु इंडिया’ अथवा बर्नार्ड शॉ यांचे ‘इम्पॅक्ट ऑफ सायन्स ऑन सोसायटी’ अशांसारखी पुस्तके अभ्यासावी लागायची.

त्या वेळी विद्यापीठातील जाणत्यांची अशी धारणा होती की, विद्यार्थ्यांच्या चारित्र्य घडणीत सामाजिक विज्ञानविषयक ग्रंथांचा (ह्यूमॅनिटीज्‌) मोठाच हिस्सा असतो. विद्याशाखा कोणतीही असो; साहित्यकृतींचा अभ्यास आणि सामाजिक विज्ञानाचा थोडा तरी परिचय या गोष्टी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी त्या वेळी आवश्यक मानल्या जात. जसजशी वर्षे उलटत चालली, तसतशी अभ्यासक्रमातून  ‘अभिजात साहित्याची’  पीछेहाट होत गेली आणि शेवटी त्याची पूर्ण उचलबांगडी झाली.

भारतातील ब्रिटिशांच्या शिक्षणपध्दतीला आपला विरोध होता. थोडासा फरक असला तरी आपण आपल्या राज्यात तोच दृष्टिकोन अवलंबला आहे असे दिसते. आज आपल्या विद्यापीठातून काही गंभीर विषयांवरील चर्चा अगर सत्यशोधन करून नवीन कल्पना अगर विचार पुढे आणण्यासाठी कितीसा अवसर दिला जातो? खरे तर आमच्या विद्यापीठातून आणि सर्व विचारशाखांतून ‘विचार कसा करावा’ याच विषयावरचा अभ्यासक्रम लागू केला पाहिजे अशी परिस्थिती आहे.

आमच्या उच्च शिक्षणाची उद्दिष्टे ठरविण्यात आम्हांला आलेले अपयश या सर्व घोटाळ्याच्या मुळाशी असावे. आपले पहिले  पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू अलाहाबाद विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात बोलताना 1947 साली म्हणाले होते- ‘‘विद्यापीठांचे कार्य मानवता, सहिष्णुता, सारासार विचार, साहसी कल्पनांचा विस्तार, आणि सत्यशोधन हे आहे. उच्चतर ध्येयांकडे मानव जातीची वाटचाल सुरू ठेवण्याची त्यांची जबाबदारी आहे. विद्यापीठांनी आपले हे कर्तव्य चोखपणे पार पाडणे समाजासाठी आणि राष्ट्रहितासाठी आवश्यक आहे.’’  आपल्या पहिल्या पंतप्रधानांचे हे विचार त्यांचे ‘सहजोद्‌गार’ म्हणून स्वीकारले गेले असावेत असे आता दिसते.

विद्यापीठांनी या नवस्वतंत्र देशासाठी काय केले पाहिजे याची स्पष्ट जाणीव त्यांनी करून दिल्यावर सुध्दा आज आपल्या विद्यापीठांची केवळ परीक्षा मंडळे का बनली आहेत ?  वस्तुस्थिती अशी आहे की आमच्या  नियोजनकारांना उदार विचारांचे शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण  यांच्यामधील तोल सांभाळता आलेला नाही. शिक्षणाकडे केवळ  उपयुक्ततेच्या नजरेने आम्ही पाहिले तेव्हा त्यातील उदार विचार आमच्या दृष्टिआड झाले. तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र अशांसारख्या विषयांचे वर्ग ओस पडले. अनेक विश्वविद्यालयात त्यांचे शिक्षण निव्वळ भूतकाळ बनला. आणि निखळ विज्ञानाचे (प्युअर  सायन्सेस) जे अभ्यासक्रम आहेत त्यांनाही फार थोडेच विद्यार्थी लाभत आहेत. अनेक तऱ्हेची आर्जवे, आमिषे तरुण विद्यार्थ्यांनी झिडकारली आहेत. कारण ज्यांना ‘बाजारभाव’ (मार्केट व्हॅल्यू)  नाही असे विषय शिकण्याची त्यांची तयारी नाही आणि वैचारिक ज्ञानशाखांचे महत्त्व वाढविण्याचा आम्हीही प्रयत्न केलेला नाही.  त्यामुळे या विषयांचे आकर्षण आणि त्यांच्याबद्दलचा आदरभाव  किवा दबदबा संपला आहे.

शिक्षणाची सरमिसळ जर देवाणघेवाण,  व्यापार किंवा तंत्रविज्ञान यांच्याशी होऊ लागली तर वैचारिक ज्ञानशाखांकडे दुर्लक्ष होऊन त्या नष्ट होण्याचीच शक्यता अधिक.  दुसऱ्यांच्या चुकांवरून धडे घेण्याचे आम्ही सोडून दिले आहे.  इतकेच काय,  आमच्या पूर्वजांच्या अनुभवांवरूनही आम्ही काही  शिकलो नाही. 1987 साली प्रो. ॲलन ब्लू यांनी ‘क्लोजिंग ऑफ अमेरिकन माइंड’ हा ग्रंथ प्रसिध्द केला तेव्हा अमेरिकन पंडितांमध्ये चलबिचल झाली. विद्यापीठ प्राकारात आर्थिक उद्दिष्टांसाठी, सत्यान्वेषणासाठी करावयाच्या तात्त्विक संशोधनाला दिलेली  तिलांजली आणि मानसन्मान व वैभवांच्या प्राप्तीसाठी अभिजात साहित्याची चालविलेली हेळसांड यांच्यावर त्यांनी कोरडे ओढले होते. पाश्चिमात्य जगाला हितोपदेशाचे धडे देणाऱ्या पुस्तकांचे (ग्रेट बुक्स ऑफ वेस्टर्न थॉट्‌स) अवमूल्यन केल्याबद्दल अमेरिकन पंडितांची  त्यांनी चांगलीच कानउघाडणी केली. त्यांच्या मते उदार शिक्षण विचारांशी फारकत घेतल्यामुळे आजकालचे विद्यार्थी त्यांच्या समोर यश म्हणून नाचविल्या जाणाऱ्या कोरड्या रोकड फायद्यांपलीकडे जाऊन आपल्या आयुष्याला सार्थ आकार देऊ शकत नाहीत.

वास्तविक शिक्षणाने विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनाचे तत्त्वज्ञान गवसले पाहिजे आणि ते फक्त थोर ग्रंथांतूनच मिळू शकते असा त्यांचा आग्रह आहे.  प्रो. ब्लू यांनी व्यक्त केलेल्या या विचारांवर अमेरिकेतील विद्यापीठांत आणि इतर व्यासपीठांवरूनही बरीच साधकबाधक चर्चा झाली. लॉरेन्स डब्लू लेविन यांचे ‘ओपनिंग ऑफ द न्यू अमेरिकन माइंड’ हे ब्लू यांच्या मतांचा प्रतिवाद करणारे पुस्तकही प्रकाशित झाले. आपण मात्र मूकपणे उच्च शिक्षणातील उदार मूल्ये हळूहळू नष्ट होत जाताना पाहिली. आणि सर्व अभ्यासक्रमाचे संपूर्ण व्यावसायीकरण करण्याकडे वळलो. एका शतकापूर्वी आपल्या अभ्यासक्रमात अभिजात साहित्याला विशेष महत्त्वाचे स्थान होते. आज त्याची आवश्यकताच काय, हा प्रश्न विचारला जात आहे. त्याला असे उत्तर आहे की अभिजात साहित्य हे प्राचीन काळातील ज्ञानवंतांचा परिचय आपल्याला करून देते.

पौराणिक कथा आणि इतिहास यांच्या अध्ययनातून भविष्याची दारे आपल्याला खुली होतात. या विषयांचा अभ्यास खडतर आणि कठीण असला तरी विद्यार्थ्यांच्या पुढे प्रश्न निर्माण करतो, त्यांची कल्पनाशक्ती उत्तेजित करतो आणि बौध्दिक पातळीवर त्यांची सोडवणूकही करतो. शिवाय आपल्या देशातील समाज विविध प्रकारच्या संस्कृतींचा- त्यांतील काही परस्पर विरोधी असलेल्या- आणि अनेक वंश-जातींचा बनलेला आहे. या प्राचीन जगाचे दर्शन तुम्हांला अभिजात वाङ्‌मयातूनच होते. त्याच्या अभ्यासामधून आपण सामाजिक उत्क्रांतीची प्रक्रिया समजावून घेतो; त्याचबरोबर आजच्या जमान्यातील सामाजिक संस्था संघटनांचा विकास आणि त्यांचा ऱ्हास यांचीही कारणपरंपरा समजण्यास आपल्याला मदत होते; सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याला अभिजात साहित्य किंवा वाङ्‌मय म्हणतात,  त्याचा परीघ सर्वसमावेशक असतो. त्यामध्ये  इतिहास, कला, पुराणवस्तू संशोधन, तत्त्वज्ञान, भाषा आणि अशा अनेक ज्ञानशाखा सामविष्ट आहेत. त्यामुळे दृष्टिकोन व्यापक होतात.

थोडक्यात अभिजात साहित्यामधील परिवर्तनाची ताकद फार मोठी आहे. जरी ती अनाकलनीय असली तरी तिचे झंकार मनात दीर्घकाळ घुमत असतात. त्यामुळे कल्पनाशक्तींना पंख फुटून त्यांचा स्वैर विहार चालू होतो. ज्यामुळे आपण आनंदित आणि  प्रोत्साहितही होतो. प्रत्यक्षात या अभ्यासाचा उपयोग भाषेचा पाया  बळकट करण्यासाठी होतो. त्यामुळे विद्यार्थी इतर आधुनिक भाषाही चटकन आत्मसात करू शकतात. उदाहरणार्थ संस्कृत भाषेच्या अभ्यासकाला हिंदी, मराठी, बंगाली यांसारख्या आधुनिक भारतीय भाषांमध्ये प्राविण्य मिळविणे सोपे आहे. या विधानाला दोन प्रकारचे  आक्षेप घेतले जातात. त्यांतील एक असा की संस्कृत आणि प्राकृत या मृत भाषा आहेत. आजच्या दैनंदिन व्यवहारात परस्परांशी त्यातून कोठेही संभाषण केले जात नाही अगर त्यांचा इतर प्रकारे वापर होत नाही.

दुसरा आक्षेप असा की चांगला रोजगार किंवा नोकरी मिळवण्यासाठी त्यांचा आज काहीही उपयोग नाही.  आजच्या विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक भारतीय भाषांच्या वापरात त्यांचे व्याकरण व त्यांतील शब्दप्रयोग यांच्याबाबत आलेली बेफिकिरी आणि तुच्छता यांबद्दल त्यांना देण्यात येणाऱ्या दोषात संस्कृतसारख्या प्राचीन अभिजात भाषेबद्दल उपेक्षा दर्शवणाऱ्या या क्षेत्रातील मान्यवरांचा वाटाही काही कमी नाही.

एकदा एका नामवंत शिक्षणतज्ज्ञाने- ज्याचा भारत सरकारकडूनही गौरव झाला आहे - पुण्यामधील एका परिसंवादात असे उद्‌गार काढलेले मी ऐकले की सर्व ‘आर्टस्‌’ कॉलेजेस म्हणजे अभिजात साहित्य आणि सामाजिक विज्ञान यांचे शिक्षण देणारी  महाविद्यालये आणि विज्ञानाच्या विद्याशाखा चालवणाऱ्या शिक्षण संस्था बंद करून टाकाव्यात, कारण विद्यार्थ्यांना विशेष कौशल्ये शिकवण्यासाठी त्या निरुपयोगी आहेत.

मान्यवरांचे हे विधान फारच  धक्कादायक होते. या सद्‌गृहस्थांच्या मते धंदेशिक्षण देणारी किंवा व्यावसायिक प्रशिक्षण देणारी विश्वविद्यालयेच चालू ठेवावीत व  वाढवावीत, कारण त्या शिक्षणातून रोजगारनिर्मिती होते;  उदरनिर्वाहाची तरतूद होते. अशा प्रकारच्या एककल्ली विचारांच्या प्रसारामुळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक गोंधळून जातात आणि म्हणून त्यांचा उच्चार सार्वजनिक सभांमध्ये अगदी क्षुल्लक बाब म्हणून होऊ नये.

शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट अर्थार्जन असावे ही गोष्ट नाकारता येणार नाही. पण चांगली नोकरी हे उच्च शिक्षणाचे एकच उद्दिष्ट पुरेसे आहे काय? सार्वत्रिकीकरणातून (जनरलायझेशन) विशेषीकरण (स्पेशलायझेशन) हा सुध्दा शिक्षणाचा एक उद्देश होऊ शकत नाही काय? त्यातून होणारे ज्ञानार्जन व्यर्थ आहे काय? आमचे शिक्षणतज्ज्ञ कदाचित आज हा दूरवरचा विचार करावयास अपुरे पडत असतील, की शैक्षणिक धोरणात होणारा हा आकस्मिक बदल आणि ‘व्यावसायीकरणा’च्या मुद्यांच्या बाजूने त्या धोरणाचा गेलेला तोल यांमुळे ‘मूल्ये विरुध्द हितसंबंध’ असा एक कायम पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

प्रत्यक्षात हे आजच झाले आहे आणि त्याची किंमत आपण चुकती करीतही आहोत. आमचे सामाजिक-सांस्कृतिक जीवन असहिष्णुता,  हिंसा, फसवणूक आणि भ्रष्टाचार यांनी लडबडले आहे. आपण या भोवऱ्यात का सापडलो आहोत? त्याचे स्पष्ट कारण असे आहे. आवश्यक ती वैज्ञानिक क्षमता वाढविण्याआधीच आपण तंत्रज्ञानाची उसनवारी केली आहे. औद्योगिक क्रांतीच्या वातावरणाचे धक्के न अनुभवताच इथे उद्योगधंद्यांची रुजुवात केली, त्यांना प्रतिष्ठा आणली. याचा एक चमत्कारिक परिणाम  जनमानसावर झाला. त्यांच्या मनात अस्थिरता निर्माण झाली. आपण तंत्रज्ञानसन्मुख समाज निर्माण केला, पण तो विज्ञानाधिष्ठित  नव्हता. तंत्रज्ञानाचा वापर हा कौशल्याचा भाग आहे, पण त्यामुळे  व्यक्तीचा दृष्टिकोन आणि मूल्ये यांमध्ये किंवा व्यक्तीच्या जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल घडत नाही.

तंत्रज्ञानातील आधुनिकता आणि सामाजिक परंपरा या फारसा संघर्ष न करता बरोबर जाऊ शकतात. वास्तवात तंत्रज्ञानातील आधुनिकतेचा वापर  करून जीवनातील परंपरागत मार्ग कधी कधी उजळू शकतात. आपल्या समाजात आज तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झालेले सामानसुमान आणि सुखसोयी यांच्याबद्दल आकर्षण निर्माण झाले आहे. तंत्रज्ञानाच्या कल्पना आणि त्यातून निर्माण झालेली सैध्दांतिकता यांच्याबद्दलचे ते आकर्षण नाही. वैचारिक ज्ञानशाखांच्या अवहेलनेचा हा परिणाम आहे. स्वातंत्र्यानंतरच्या सहा दशकांच्या कालानंतर आता आपल्याला नवीन पिढीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यशिक्षणाची आवश्यकता भासत आहे.  

भारतामध्ये 1820 च्या दशकात उदारमतवादी शिक्षणपध्दतीची सुरुवात झाली. त्यानंतर युवकांचा एक नवीन वर्ग समाजात उदयास  आला. या वर्गाने आपल्या समाजात परंपरागत रुळलेल्या मूल्य व्यवस्थेतील विपरीत गोष्टींबाबत प्रश्न करायला सुरुवात केली. त्यांना  मिळालेल्या उत्तेजनामुळे त्यांनी जवळ जवळ अर्धशतकातच जागरूकपणाने अथक कष्ट करून जुन्या मूल्यव्यवस्थेवर मात करून सामाजिक, सांस्कृतिक सुधारणा समाजात रुजवायला सुरुवात केली. त्यांनी समाजामध्ये आणलेल्या सुधारणांमुळे समाजाचे स्वरूपच बदलले, त्याचा जणू नवोदय झाला. एकदा राजकीय स्वातंत्र्य मिळाले की या बौध्दिक परंपरा त्या नव्या समाजात बहरतील अशा अपेक्षाही निर्माण झाल्या. आमच्या राज्यघटनेचे शिल्पकारही सत्य, न्याय आणि मानवता या उदात्त ध्येयांनी प्रभावित झाले होते. पण त्यांच्याही आशा हळू हळू मावळत गेल्या.  त्यासाठी कारणीभूत झालेल्या इतर अनेक गोष्टींत उदार शिक्षणाचा मार्ग सोडून देण्यात आला हे एक चुकीचे मोठेच पाऊल होते.

हे खरे आहे की जगातील सर्व नामांकित विद्यापीठांमध्ये उदार विचार पसरवणाऱ्या शिक्षणाची जागा हळूहळू विशेष (स्पेशलाइज्ड) अभ्यासक्रमांनी घेतली होती. आपण त्यांनी मळवलेल्या मार्गावरून चालू लागलो. पण पश्चिमेकडील या विद्यापीठांपैकी काही विद्यापीठांना आपल्या धोरणातील चुका जाणवू लागल्यामुळे त्यांनी फेरविचार करून लगोलग जुना उदार अभ्यासक्रम आणि नवीन वैशिष्ट्यपूर्ण व्यावसायिक अभ्यासक्रम यांचा योग्य समतोल साधलेली अभ्यास पध्दती चालू केली. पण आपल्याकडे मात्र अशा  प्रकारचा फेरविचार झाला नाही, कारण लोकानुनय!

त्याचाच  परिणाम म्हणून आपल्याकडे उदार शिक्षण पध्दती साफ नाकारण्यात आली. त्यामुळे आधीच मोडतोड झालेली मूल्यव्यवस्था सुधारून आजच्या जमान्यातील सामाजिक न्याय व समानता ही नवी आव्हाने पेलण्यासाठी तिला योग्य वळण लावण्याचे काम पूर्ण झाले नाही.

भारतासारख्या देशात लोकांच्या दैनंदिन जीवनात धर्मभावना खोलवर रुजलेली आहे. त्यामुळे विज्ञान व विवेकवाद यांवर आधारलेल्या आधुनिकतेकडे समाजाचे परिवर्तन होणे ही अतिशय  अवघड गोष्ट आहे. लोकांमध्ये विवेकवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचा प्रयत्न जागरूकपणे काही विचारी लोकांनी केला, त्यांनीच भावना आणि अध्यात्म यांच्याशी विवेकाचीही सांगड घालावी असे प्रतिपादन करून आपण बुध्दिचा लगाम मानायचा की भावनेचे बंध प्रबळ मानायचे यामध्ये निवड करावी असे सुचविले.

परिणामी, आपण एक समाज म्हणून परिवर्तन व प्रगती यांसाठी  मूलभूत आवश्यक असा प्रयत्नवाद लोकांमध्ये रुजवू न शकल्यामुळे चिकित्सेची कोणतीही पायरी ओलांडू शकलो नाही. प्रगती ही आपोआप कधीच होत नसते. अनेक बुध्दिवादी-व्यापक अर्थाने मी त्यांना व्यावसायिक किंवा नोकरदार असे न म्हणता बुध्दिच्याच प्रेरणेने चालणारे असे म्हणेन, एक निखळ दृष्टिकोन- विशिष्ट तत्त्वज्ञान, आवड आणि मत स्पष्टपणे व्यक्त करणे जरुरीचे मानतात.

सनातनी कर्मकांड, रूढी, प्रतिगामी व भ्रष्ट आचार यांच्या विरूध्द आवाज उठविण्यास ते कचरत नाहीत. त्यासाठी ते खळबळ माजवणारे प्रश्न निर्भयपणे विचारतात. सत्तेत असणाऱ्या भ्रष्टाचारी मंडळींनाही ते जुमानत नाहीत. त्यांच्या या कृतीमुळे समाजातील इतर लोक पुन्हा पुन्हा विचार करीत राहतात. कोणत्याही घटनेकडे पाहण्याची त्यांची वैश्विक दृष्टी आणि अलिप्तता यामुळे त्यांच्या भोवतालच्या वातावरणात एक प्रकारची चिकित्सक वृत्ती वाढीला लागते.  

आमच्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये ज्या काही पोकळ जागा राहिल्या आहेत, त्यांचे कारण म्हणजे आपण आपल्या देशात तत्त्वज्ञ शास्त्रज्ञ,  तत्त्वज्ञ लेखक,  तत्त्वज्ञ राजकारणी निर्माणच केले नाहीत करूच शकलो नाही.

थोडक्यात जे जे कल्पनांच्या, विचारांच्या विश्वात धाडसाने काही प्रयोग करतात ते आपल्या जवळ नव्हते. बर्ट्राण्ड रसेल. ए.एन्‌. व्हाइटहेड,  रिचर्ड फेनमन यांच्यासारखी  माणसे आपल्याकडे कधीच नव्हती. त्याचाच नैसर्गिक परिणाम  म्हणून आधीच्या मूल्याधिष्ठित प्रगतीच्या कल्पनांचा आमच्या जीवनातून हळूहळू लोप झाला. सामाजिक विकृतींना रोखणारे  कायदे सहजपणे अगर अडथळ्यांना ओलांडत संसदेत मंजूर झालेही पण अखेरचे निरीक्षण असे, की सर्व नागरिकांची स्वाभाविक प्रवृत्ती कायदा मोडण्याची आहे. आणि त्यांना थांबवणे फार कठीण आहे. शैक्षणिक कारखान्यांतून अभ्यासक्रम संपवून बाहेर पडणारे व्यावसायिक आणि तंत्रज्ञ यांची रांग लागली आहे. पूर्वी कधीही आजच्यासारखे एवढ्या मोठ्या प्रमाणात कुशल तंत्रज्ञ उपलब्ध नव्हते, त्याबद्दल तंत्रज्ञानाच्या झालेल्या विकासाला धन्यवादच दिले  पाहिजेत.

समाजात एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा, तोही तरुण पिढीच्या हाती आलेला, पाहिला नव्हता, अशी तक्रार खालच्या आवाजात जुनी मंडळी करत असतात. तरीही सर्व प्रकारच्या सामाजिक दुखण्यांची वाण नाही. काही काळापूर्वीच्या सुशिक्षित वर्गावर नैतिक व मानवी मूल्यांचा त्यांच्यामधील ऋजुता व संयम वाढविणारा एक प्रकारचा दबाव होता. ती मूल्ये आता संदर्भहीन झालेली आहेत. त्याची निष्पत्ती संपत्ती आणि लोभ यांच्यात वृध्दी होण्यातच झालेली आहे. आज समाजाचे चित्र असे दिसते आहे की जुनी मूल्ये निरुपयोगी म्हणून फेकून दिली गेली आहेत आणि  नव्यांची रचना अद्याप झालेली नाही, रुजणे तर दूरच आहे.

आपल्या समाजाची ग्राहक समाज म्हणून घडण होण्यास फार वेळ लागला नाही. ग्राहक समाज हा एक समूह समाज असतो. त्या समाजात सारख्या आवडी निवडी, समान सवयी, तशीच मते आणि कृती, अगदी पोषाखाच्याही त्याच प्रकारच्या तऱ्हा आणि वागण्यातल्या लकबीही (मॅनरिझम्स) एकसारख्या असतात. या समाजातील बहुसंख्य नागरिक या सर्व गोष्टी स्वीकारतात आणि व्यक्ती म्हणून अगर वर्ग म्हणून स्वत:चे वेगळे अस्तित्व दाखवूच शकत नाहीत. प्रसार माध्यमे- विशेषत: दृक्‌श्राव्य वर्गातील- विलक्षण ताकदीने समाजात सारखेपणा रुजविण्यास कटिबध्द आहेत. याचाच अर्थ असा की हा समूह समाज किंवा ज्याला आपण बहुजन-समाज असे म्हणू- लोकलहरींवर सध्या झुलत राहिलेला आहे आणि त्यांची गती वाढवीत आहे.

अशा परिस्थितीत पहिला बळी जातो, तो पारंपरिक स्वातंत्र्याचा- अभिव्यक्ती स्वातंत्र्य- सकारात्मक पध्दतीने इतरांपेक्षा व्यक्तीचे वेगळेपण- अशा समाजात फक्त बंडखोर व्यक्तीच बदल घडवून आणू शकतात कारण प्रवाहाविरुध्द पोहण्याची ताकद फक्त त्यांच्यामध्येच असते. एक  महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे ती ही, समाजातील मतभेद फक्त एकाधिकारशाही व्यवस्थेमध्येच दडपले जातात असे नाही, तर अशा प्रकारच्या बहुजन समाज व्यवस्थेमध्येही तेच होते. फक्त सावकाश, नकळत होते; पण त्याचे परिणाम तितकेच भयंकर असतात. अशा गुदमरवून टाकणाऱ्या वातावरणात विज्ञान शिक्षण हे फक्त समीकरणे (इक्वेशन्स) आणि सूत्रांपुरतेच (फॉर्म्युला) मर्यादित राहते. आणि त्या विषयातील जिज्ञासेचा भाग मात्र लोपलेला असतो. अशा समाजात अभिजात साहित्यकृती आणि सामाजिक विज्ञान विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व मानवी मूल्ये जागृत करू शकत नाहीत.

भाषा- अगदी मातृभाषासुध्दा- शिकवताना विद्यार्थ्यांपर्यंत त्या भाषेतील शब्दांमधले अध्याहृत अर्थ आणि सूक्ष्म भेद पोहोचवू शकत नाहीत. आणि निर्मिती- कलाकृती (क्रिएटिव्ह आर्टस्‌) तर त्यांच्या शेखमहंदी विश्वात रमलेल्या असतात. सांस्कृतिक भाष्ये करणारे आणि टीकाकार, ज्यांनी समाजातील कमी जास्त घटना आणि मूल्ये यांच्यावर लक्ष ठेवून सामाजिक जीवनाची बांधणी करणे अपेक्षित आहे,  तेच,  त्यांचे कर्तव्य पार पाडण्यासाठी लागणारी ऊर्जा आणि इच्छाशक्ती नसल्यामुळे ढेपाळले आहेत.  

संस्कृती समजावून घेण्याचे प्रखर साधन बुध्दी हे आहे;  आणि ती कार्यक्षम राहण्यासाठी व्यापक विचार व सूक्ष्म चिंतन यांची गरज आहे. या चिंतनात्मक उदार विचारांच्या ज्ञानशाखा आपल्या समोरील विषयांच्या चर्चा व वादविवाद यांच्यामधून नवीन कल्पनांना आकार देतात.

स्वातंत्र्योत्तर कालखंडात आणखी एक मोठा अपघात घडला. संख्येच्या हव्यासात गुण मागे पडत गेले कारण आपली निर्णय घेणारी यंत्रणा व प्रशासक विस्तार की विकास या पेचात सापडले होते. समानता आणि सामाजिक न्याय यांच्याशी निष्ठा ठेवण्याच्या  शपथा घेतल्यामुळे त्यांनी विस्ताराचा विचार केला आणि उच्च  शिक्षणात विकासाकडे दुर्लक्ष केले. विद्यापीठे आणि विश्वविद्यालये आवश्यक त्या विद्याशाखांची तरतूद व संरचनेचा पुरता विचारही न करता उघडली गेली. लोकांनी यालाच शैक्षणिक विकास समजावा असे राज्यकर्त्यांचे मत होते. शिक्षण व्यवस्थेच्या साफसफाईची भाषा तर आपण नेहमीच ऐकतो. रोगाचे मूळ समजले, त्यावरचा उपचारही माहीत आहे पण रोगी मात्र बरा होत नाही कारण त्याला  हवे ते इंजेक्शन दिले गेलेले नाही!

सरकारच्या सर्वोच्च पातळीवर सतत चाललेल्या पुनर्विचारामुळे परिस्थिती आणखीनच बिघडते आहे आणि जवळपास ती हातून गेलीच आहे. उच्च शिक्षणाची तरतूद बरीचशी सरकारी तिजोरीतून होत असल्यामुळे त्या अनुदानावर डोळा ठेवून लोकप्रतिनिधी आपापल्या मतदार संघाचा ‘विकास’ घडविण्यासाठी त्या भागात नव्या विश्वविद्यालयांची  योजना करून आपल्या भागात विद्यापीठ हवे अशी मागणी करीत  असतात. नवीन विश्वविद्यालय उघडताना त्याच परिसरात आधी सुरू असलेल्या शिक्षणसंस्था आणि विद्यापीठे साधनसामग्री अभावी बंद पडत असलेलीही हे राजकारणी पाहतात.

‘दुर्बल वर्गांसाठी  शिक्षण’ आणि ‘रोजगार हमी’ यांचा उच्चार त्यांच्या तोंडी सतत  असतो. वास्तविक समाजातील दुर्बल घटकांचे शिक्षण हे शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञांना फार मोठे आव्हान आहे. पण आपला राजकीय आर्थिक पाया उभारून तो भक्कम करण्याची एक संधी म्हणूनच त्याकडे पाहिले जाते. या प्रक्रियेत विश्वविद्यालये व विद्यापीठे यांच्यामधील शिक्षणाचा संदर्भ हरवल्यासारखा वाटतो.  आणि पदवीधारकांची पैदास हाच त्यांचा मुख्य उद्देश या सर्व व्यवहारामागे असावा याची खात्री पटते. शिक्षणक्षेत्राचा असा खेळखंडोबा करणाऱ्या सरकारला नक्कीच याचे विपरीत परिणाम राजकारण, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये भोगावे लागणार  आहेत.

या सर्व गोष्टींची थोडी उशिराच जाणीव झाल्यामुळे विद्यापीठ अनुदान मंडळाने (युनिव्हर्सिटी ग्रँटस्‌ कमिशन) संशोधनासाठी- मग ते सामाजिक विज्ञान असो, किंवा कलाशाखा अगर नैसर्गिक विज्ञान  असो- मोठ्या रकमा मंजूर केलेल्या आहेत. परंतु सामाजिक विज्ञान  शाखेतील बहुतेक सर्व संशोधन प्रयोग,  आणि त्यातून निघणारी  अनुमाने,  अभ्यासाच्या प्राथमिक पायरीवरच थांबलेले दिसतात.  क्वचितच एखादा संशोधन प्रकल्प सैध्दांतिक पातळीपर्यंत पोहोचलेला दिसतो. दुसऱ्या बाजूला समाजातील दानशूर व्यक्ती, ज्या एरवी धर्मादाय संस्थांना मोठमोठ्या देणग्या देण्यासाठी सज्ज असतात त्या संशोधन कार्याकडे मात्र डोळेझाक का करतात ते  कळत नाही.

काहीही असले तरी एखाद्या विषयातील संशोधनासाठी केवळ पैसा पुरवणे पुरेसे नाही; तेही अशा वेळी की जेव्हा आमची विद्यापीठे, जी स्वत:च सार्वजनिक क्षेत्रातील मोठी व्यवसायकेंद्रे  बनली आहेत,  त्यांचे हितसंबंध भांडवलदारी औद्योगिक संस्थांसाठी  व्यवस्थापक निर्माण करण्यात गुंतले आहेत. समाजाला नेतृत्व  देण्यासाठी बुध्दिमंत निर्माण करणे ही त्यांना त्यांची जबाबदारी वाटत  नाही. केंद्र सरकार, विद्यापीठ अनुदान मंडळ हे दोघे मिळून अनेक वेळा शिक्षक वर्गाला उद्‌ध्वस्त करीत आले आहेत,  इतके की त्यांची अमर्याद ढोंगबाजी या शिक्षण व्यवसायाला फसवणुकीच्या मार्गावर घेऊन गेली आहे. एखाद्या चांगल्या शिक्षकाला आपली  निर्मितिक्षमता दाखविता किंवा सिध्द करता यावी असा आव्हानात्मक व्यवसाय आता हा राहिलेला नाही.  

परिश्रमपूर्वक केलेला अभ्यास, विचार आणि अभिव्यक्ती  यांच्यातील अचूकपणा,  भाषेवरील प्रभुत्व आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विचार करण्याची क्षमता ही एका निर्मितिक्षम शिक्षकाच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. त्याची निर्मितिक्षमता  अधिकाऱ्यांना कळत नाही कारण तिचे मोजमाप सहजी करता येणारे  नाही. उदाहरणार्थ, सामाजिक विज्ञानाचा व कलाशाखेचा एखादा  शिक्षक आपली निर्मितिक्षमता सार्वजनिक जीवनातील विषम घटनांचे पट शोधून काढून त्यांचा अर्थ वेगवेगळ्या विचार शाखांचे विशिष्ट सिध्दांत आणि कल्पना यांच्या आधारे लावून दाखवू शकतो.  त्यांचा कार्यकारणभावही जोडून दाखवू शकतो.

सध्या अस्तित्वात  असलेल्या कल्पना आणि सिद्धांत यांची सुधारित मांडणी  करण्यासाठीसुध्दा लागणारी क्षमता त्यांच्याकडे असते. या कामाचे  मूल्यमापन करणे सोपे आहे का? आणि ते कोण करणार?  कसे? म्हणूनच वर्तमान पध्दती प्रथमदर्शी निष्कर्षांवरच केंद्रित झालेली  दिसते आणि कोवळ्या मनाच्या विद्यार्थ्यांवर संस्कार उमटवण्याच्या  क्षमतेऐवजी कागदावरच्या तपशिलावरच भर देते. आजची व्यवस्था  ही खरोखरीच एखाद्या प्रगल्भ विद्यार्थ्याच्या गरजा पुरविण्यास  असमर्थ ठरावी ही दुर्दैवाची गोष्ट आहे. पण ‘आतापर्यंत काही  निवडक व्यक्तींच्याच कब्जात असलेली ‘शिक्षणव्यवस्था’ आता  ‘सार्वत्रिक’ होऊ लागली आहे यासाठी स्वत:चीच पाठ थोपटून  घेणाऱ्या निर्णयप्रक्रियेमधील बुजुर्गांच्या कानात दडे बसल्यामुळे अभ्यासक्षेत्रातील टीका त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही.

शिक्षणाचा प्रसार बहुजन समाजात होणे ही आपल्यासारख्या प्रचंड  आणि सामाजिक समस्यांनी भरलेल्या देशाला अभिमानास्पद गोष्ट आहे. पण केवळ शिक्षणप्रसाराचे श्रेय घेत किती काळ घालवणार?  आता जे ‘उच्च शिक्षण’ म्हणून दिले जाते त्याचा खरोखरीच्या उच्च  शिक्षणाशी तसूभरही संबंध नाही. हे शिक्षण पदवीदान करते आणि पदवीधर होऊन लक्षावधी विद्यार्थी या मानसिक समाधानात गुंग होऊन राहतात पण त्यांपैकी थोड्यासुध्दा विद्यार्थ्यांना जर अधिक चांगल्या विचारांनी प्रगत आणि परिप्लुत आयुष्य जगण्यासाठी त्या  शिक्षणातून शिदोरी मिळणार नसेल तर मानसिक समाधानाखेरीज  त्या पदवीचा उपयोग काय?  

एकोणिसाव्या शतकात एका मजेदार चर्चेला तोंड फुटले होते. पौर्वात्यांचा मेंदू वापरून वापरून शिणला आहे काय?  प्राचीन भारतीय संस्कृती जीर्ण झाली आहे काय?  तिच्यामधली वाफ निघून गेली आहे काय?  या कठीण प्रश्नांना  थोडक्यात व निश्चित उत्तरे मिळू शकणार नाहीत, हे स्पष्ट आहे. एक  सत्य आपण आज स्वीकारलेच पाहिजे. ते म्हणजे आपण आपल्या  बुध्दिशी प्रतारणा चालविली आहे. आपल्याला ही जाणीव नाही की  केवळ व्यवसायाचे काही ज्ञान मिळणारे तंत्रविज्ञान निपुण पदवीधर निर्माण करणे हे शिक्षणसंस्थांसाठी पुरेसे नाही. उच्च शिक्षणाचे  अंतिम ध्येय समाजात योग्य बौध्दिक वातावरण तयार करणे हे आहे.  हे वातावरण अधिक उच्च स्तरावर विचारांना घेऊन जाईल. अधिक विचारशील मने समाजात आपोआप बदल घडून येण्यास मदत करतील. जॉर्ज सुदर्शन, हरगोविंद खुराणा, किंवा अमर्त्य सेन यांसारख्या वैज्ञानिकांच्या यशामध्ये आपण आनंद मानणे व तो साजरा करणे यात निव्वळ स्वत:ची फसवणूक आहे. त्यांनी त्यांचे बहुतेक सर्व काम परदेशांत पूर्ण केले आहे.

डॉ. होमी भाभा- ज्यांना  ‘भाभा हाइटलर कास्केड थिअरी’  शोधून काढल्याचे श्रेय मिळाले त्यांनीही आपले जास्तीत जास्त काम केंब्रिजमध्ये पूर्ण केले आहे.  वास्तव असे आहे की ‘बोस स्टॅटिस्टिक्स’ (1924)  सिध्द करणारे सत्येद्रनाथ बोस, ‘आयोनायझेशन फार्म्युला’ (1926)चे मेघनाद साहा, रामन यांचा ‘रामन इफेक्ट (1928)’  किंवा ‘चंद्रशेखर  लिमिटस्‌’  निर्मिणारे चंद्रशेखर यांच्यासारखे वैज्ञानिक आम्ही  स्वातंत्र्यानंतरच्या काळात निर्माण करू शकलो नाही. ह्या सर्व  वैज्ञानिकांनी भारतीय भूमीवरच काम केले. मान्यताप्राप्त असे वैज्ञानिक आणि सामाजिक अभ्यासक आम्ही नि:संशयपणे निर्माण केले पण त्यांतील फारच थोड्यांना जागतिक मान्यता मिळाली  आणि त्याचे कारण हेच की त्यांच्या भोवतालचे वातावरण बुध्दिला  पुरेसे उत्तेजक असे नव्हते.

21 व्या शतकाच्या पहिल्या काही दशकांत आपण नव्या आणि समृद्धीच्या जगाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. आंतरराष्ट्रीय  अर्थतज्ज्ञ आणि नगर रचनाकार- ज्यांना भारताचे जागतिक पटावरील महत्त्व माहीत होते- पाश्चिमात्य आणि पौर्वात्य दोनही  गटांपासून अलिप्त- ते भारतासाठी भविष्यात फार मोठी आंतरराष्ट्रीय  भूमिका निभावयाची आहे असे म्हणत. त्यातूनच येत्या काही  दशकांतील भारताच्या अभूतपूर्व भरभराटीचे चित्र उभे केले जात होते. आजसुध्दा मध्यम वर्गाचा- जो अतिशय वेगाने वाढतो आहे - हा ठाम विश्वास आहे की आजच्या इतकी सुबत्ता त्यांच्या वाट्याला कधीच आलेली नव्हती. बदलत्या काळाची प्रतीके शहरात  बदलत्या आकाशरेषांच्या (स्कायलाइन्स) रूपाने, मोठमोठ्या  मॉल्सच्या वाढत्या संख्येतून समोर येत आहेत.

आंतरराष्ट्रीय  अर्थव्यवहार करणाऱ्या फायनान्शिअल इन्स्टिट्यूशन्सचे प्रस्थ देशात वाढत चाललेले असल्यामुळे भारतातील मोठी गावे व शहरे आर्थिक, सुबत्तेच्या प्रतीक्षेत आहेत. आपण भविष्यात आपली आर्थिक ताकद वाढवू शकतो पण ते पुरेसे आहे काय?  महत्त्वाचा आणि संबंधित प्रश्न हाच की आपण स्वत:ला विचारले पाहिजे की आपली वाढ बुध्दिमत्ता आणि शहाणपणा या कसोट्यांवरच होते आहे ना?  की या बाबतीत आपण  अद्याप खुजेच आहोत?  प्रामाणिकपणे बोलायचे तर बौध्दिक जगतात कोणत्याच क्षेत्रात आपण नेतृत्व देऊ शकत नाही. याचे कारण हेच की खऱ्या सत्तेचा उगम कल्पनांच्या-विचारांच्या प्रवाहात आहे, याची जाणीव आपल्याला पुरती झालेली नाही.

आपल्या देशाला जर विचार कल्पना,  बुध्दिमत्ता यांची ताकद  वाढवता आली तरच तो नेतृत्व देण्याच्या परिस्थितीत असेल,  या वैश्विक सत्याचा अनुभव आपण घेतच आहोत. त्यासाठी आमची शैक्षणिक पध्दती विचार, कल्पना किंवा अंत:प्रेरणा यांना गती देणारी असावयास हवी. कला,  साहित्य यांसारख्या किंवा सामाजिक विज्ञानात मिळविलेल्या पदव्यांनी आपल्याला हे बळ मिळवून दिले पाहिजे. पण त्यासाठी या विषयांचे स्वरूप मुळापासून बदलून त्यांना अधिक परिणामकारक बनवावे लागेल. महात्मा गांधींच्या शब्दांत बोलायचे तर आज आपला समाज हा ‘सप्त सामाजिक पापांचा’ बळी बनला आहे-

तत्त्वशून्य राजकारण,  अनैतिक अर्थव्यवस्था,  चारित्र्यहीन शिक्षण,  मान्यताविरहित विज्ञान, विवेकरहित सौख्य,  कष्टांखेरीज संपत्तिसाधन,  त्यागविरहित पूजा- जर या सप्त क्षेत्रांमध्ये आपल्याला आपली प्रतिमा सुधारायची असेल तर फक्त तंत्रज्ञान  विकास किंवा धंद्यातील कौशल्ये पुरी पडणार नाहीत. त्यामुळे फार तर आर्थिक सुबत्ता आणि सुधारलेले ऐषारामी राहणीमान आपल्या पदरी पडेल,  पण विचारांच्या क्षेत्रातील आमची प्रगती,  पुनर्रेखित  आणि द्रष्टेपणाची मूल्यव्यवस्था बरोबर घेऊन पुढे जात राहिली तरच तिचा प्रकाश आणि उत्तेजना यांच्यामुळे वाटचाल सोपी होईल. असंस्कृत जगाच्या दिशेने परतणाऱ्या आमच्या पावलांना, आमच्या  भावना शान्त करून आणि संतापाचे उद्रेक सौम्य करून ते रोखून धरतील.

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, जे मुंबई विद्यापीठाचे प्रथम पदवीधर होते आणि ज्यांनी भारताच्या या भागात पुनरुत्थानाची बीजे पेरली,  त्यांनी असे म्हटले आहे : ‘‘जोपर्यंत तुम्हांला राजकीय हक्कांबाबत झुकते माप मिळत नाही, तोपर्यंत तुम्हांला चांगली समाजव्यवस्था लाभू शकणार नाही किंवा जोपर्यंत तर्कविचार आणि न्याय यांच्यावर आधारित तुमची समाजव्यवस्था अस्तित्वात येत नाही तोपर्यंत आपल्या राजकीय हक्कांची आणि अधिकारांची अंलबजावणी तुम्ही योग्य तऱ्हेने करू शकणार नाही. जोपर्यंत तुमचे सामाजिक व्यवहार अपूर्ण, सदोष आहेत तोपर्यंत चांगल्या अर्थव्यवस्थेचा लाभ तुम्हांला होऊ शकणार नाही. जर तुमचे धार्मिक आदर्श नीच स्तरावर आणि शरम वाटण्याजोगे असतील तर तुम्ही सामाजिक,  आर्थिक आणि राजकीय क्षेत्रांत यशस्वी होऊ शकणार नाही.

हे परस्परावलंबन एक अपघात नाही;  पण तो एक निसर्गनियम आहे. आपल्या शरीरातील अवयवांच्या अस्वास्थ्याचा परिणाम आपल्या हातापायांच्या शक्तीवर होतो. मानवी शरीराला जे लागू ते समाज किंवा राज्य सीमित करीत असलेल्या मानवी समूहालाही लागू पडते.’’

हे आपल्याला कायमच लक्षात ठेवावे लागेल की जो समाज  विचारशक्तीला ऊर्जा समजत नाही तो जीवनाच्या सर्व स्तरांवर अध:पतित होतो. जीवनाच्या सुयोग्य तत्त्वज्ञानाच्या अथवा योग्य मूल्यरचनेच्या अभावी ज्ञानाची प्रगती होत नाही. सर्व बुध्दिच्या  व्यवहारांच्या मुळाशी ज्ञान आहे. भौतिक प्रगतीचा मेळ आधिभौतिक (मेटॅफिजिकल) विकासाशी पडणे जरुरीचे आहे. म्हणजे त्या दोघांच्या संमेलनातून योग्य जीवनपध्दती आणि वर्तणुकीच्या मर्यादा स्पष्ट होतील. म्हणूनच प्राचीन भारतीय साहित्याचा भर पावित्र्य, सौम्यपणा, चांगली वर्तणूक, प्रज्ञा या गुणांच्या विकासावर असायचा आणि शिक्षणाचाही मुख्य भाग तोच असे.

आपल्या आदर्शांशी अथवा निष्ठांशी घेतलेल्या फारकतीमुळे अनेक उदात्त व्यवसायांवर विपरीत परिणाम झाले आहेत. शिक्षक, लेखक, वकील, पत्रकार एवढेच नव्हे तर ज्यांचा ज्यांचा संबंध भाषेशी किंवा शब्दांशी आला,  अशा माहिती,  करमणूक, शिक्षण आणि समाज रक्षण असल्या सर्व प्रकारच्या क्षेत्रांतल्या व्यवसायांनी हा अनुभव घेतला. या व्यवसायांतील शब्दशक्ती समाजाला विचार करण्यास भाग पाडते कारण विचारहीन समाज किंवा तत्त्वहीन माणसे फक्त खाण्यापिण्यासारख्या क्षुद्र सुखांत मश्गुल होऊन राहतात. आयुष्यातील उच्च ध्येयांची प्रचिती त्यांना कधी येतच नाही.  त्यामुळेच आज आपला समाज नवसंशोधनाऐवजी फक्त अनुकरणात रमला आहे.

प्रगतिपथावर असलेल्या प्रत्येक समाजाचे ध्येय विचार-चिंतन करणे, सिध्दांत ठरवणे व त्यावरून नवीन गोष्टींचे संशोधन हे असते. केवळ अनुकरण, नक्कल करणाऱ्यांना एकत्रच अध:पतनाचाही अनुभव घ्यावा लागतो. मला व्यक्तिश: असे वाटते,  की वाङ्‌मय किंवा साहित्य, शिक्षण, पत्रकारिता, वैद्यक, विज्ञान, कायदा आणि सांस्कृतिक अशा प्रत्येक महत्त्वाच्या क्षेत्राचा आपल्या सध्याच्या वैचारिक दिवाळखोरीच्या अवस्थेला हातभार लागलेला आहे. आणि त्यामुळे समाज प्रतिभाशून्य अशा  एका वैराण जगात जगत आहे. अशा वातावरणात निर्माण होणारी संपत्ती फक्त चैन व मौजमजेच्या गोष्टींवर उधळली जाते;  पण  तिच्या वापरातून कसदार असे काही निर्माण होत नाही.

संग्राहक  वृत्तीच्या आपल्या समाजात जर संपत्तीच्या संचयाबरोबर बौध्दिक आवाका वाढवत नेला नाही तर समाजाला पुन्हा मध्ययुगीन सरंजामशाहीच्या शोषक वातावरणाच्या गर्तेत पडावे लागेल. या  समाजाचा देखावा लोकशाहीचा राहिला तरी नैतिक भ्रष्टाचारासह त्या समाजाचे सर्व दोष आपण आत्मसात केलेले असतील. विचार व आदर्शांचा व्यवहार करणाऱ्यांवर एक सामाजिक जबाबदारी असते. ज्या समाजातील बुध्दिवादी सत्यान्वेषण, नि:स्पृहपणा, आवश्यकता पडली तर ज्येष्ठ किंवा अधिकारी व्यक्तींनाही आव्हान देण्यास लागणारे धैर्य यांच्यापासून दूर राहतात व आपली कर्तव्ये  चुकवतात त्यांच्या समाजाची उंची क्रमाक्रमाने कमीच होत जाते. तो  खुजा होतो; जरी दर वर्षी सरकारमान्य विद्वान आणि बुध्दिवादी यांची यादी लांबत राहिली आहे असे आपल्याला दिसले तरी!

ज्या  समाजातील राजकारणी आणि नेते आपल्यामधील बुध्दिवंतांची  जाहीरपणे कुचेष्टा करतात, त्या समाजाची प्रतिष्ठा धोक्यात आलेली असते. ज्या समाजातील शिक्षण विचारविश्व विस्तारत नाही आणि आदर्शवादी शिक्षणावर मात करून समाज व्यावसायिक शिक्षणामागे  धावतो; कोणत्याही प्रकारच्या बौध्दिक कार्यक्रमावर नापसंतीचा  शिक्का मारतो तो चंगळवादाच्या आहारी जातो हे निश्चित.  म्हणून एका नव्या सुरुवातीचा क्षण समोर आला आहे आणि  त्याची सुरुवात विद्यापीठांच्या परिसरात व्हायला हवी- आधुनिक  विद्यापीठाने त्याचा मानवता,  न्याय आणि चांगुलपणा यांच्या  कसोटीवर उभारण्याचा संकल्प महत्त्वाचा असला तरी तोकडा  आहे- विचार व आदर्श यांच्या विश्वात खोलवर आवाहन करून सत्याचा शोध घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यासाठी तरुण पिढीला चर्चा, वादविवाद, परिसंवाद यांच्यासाठी उद्युक्त करून नवीन संशोधनात रमविणे जरुरीचे आहे.

जेव्हा आपल्याकडील उच्च शिक्षणव्यवस्थेने नकळत तरुण भारतीयांच्या दृष्टीवर पडदा ओढला आहे तेव्हा पाश्चिमात्यांनी आपल्या मुलांची मने खुली करण्याचे प्रयत्न चालविले आहेत;  कारण त्यांना वाङ्‌मय,  तत्त्वज्ञान यांसारख्या विषयांच्या विकासाचे  महत्त्व पटत चालले आहे. आज अनेक पाश्चात्य देशांत तत्त्वज्ञानाचे  पदवीधर एम.बी.ए.ची पदवी घेऊन उच्च व्यवस्थापनाच्या पदावर मुद्दाम निवडले जात आहेत. अभ्यासक्रमांचा अशा प्रकारे संयोग झाला तर त्यातून विद्यार्थ्यांना एक निश्चित जीवनदृष्टी लाभेल असा  त्यांचा अंदाज आहे. यासाठी आपल्या समोर चीनचे उदाहरण आहे.

त्या देशात 1920 ते 40 या दशकांत उदार शिक्षणक्रम  विद्यापीठातून राबवला जात होता. त्यानंतर चीनमध्ये क्रांती होऊन 1949 मध्ये ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’ची कम्युनिस्ट राजवट आली. त्यानंतर विशेष शाखांचे म्हणजे धंदेवाईक आणि  व्यावसायिक शिक्षणक्रम विद्यापीठात जारी झाले. पण नव्वदच्या  दशकात पुन्हा एकदा शिक्षणक्रमाने दिशा बदलली. बीजिंग  विद्यापीठाने उदार शिक्षणाची कास धरली आणि त्याचे अनुकरण  चीनमधील अनेक विद्यापीठांनी केले आहे.  आपण जर आताच जागृत झालो नाही तर भारताचे महासत्ता होण्याचे स्वप्न हवेत विरून जाण्यास अवधी लागणार नाही.

 (अनुवाद : कुमुद करकरे)

Tags: कुमुद करकरे भाषा मराठी अरुण टिकेकर गोवींद रानडे डॉ. होमी भाभा नैसर्गिक अभिजात वाणिज्य विद्यापीठ उदारमतवाद साहित्य शिक्षण स्वातंत्र्य कम्युनिकेश्न जर्नालिझम bhasha Marathi arun tikekar govind rande homi bhabha dr naisrgik abhijat wanijya vidhyapith udarmatwad sahitya shikshan swatantray communication Journalism weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अरुण टिकेकर

1944 - 2016

अभ्यासक, संपादक

लोकसत्ता या दैनिक वृत्तपत्राचे 11 वर्षे संपादक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके