डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

खरं तर मस्तानीसारखी स्त्री मराठेशाहीला मिळाली हे येथील सत्तेचं भाग्य. ती उत्तम घोडेस्वार होती. बाजीरावाची स्फूर्तिदेवता होती. शिवाय मनानं निर्मळ आणि वागण्यानं सरळ होती. तिनं पती म्हणून फक्त बाजीरावाचाच स्वीकार केला होता असं नव्हे, तर त्याच्या पहिल्या बायकोचा आणि मुलाचाही स्वीकार केला होता. तरीही तिला तिच्या स्वाभाविक सरलतेचं आणि प्रेममयतेचं बक्षीस म्हणून मिळाला तो फक्त विरोध, अपमान, तिरस्कार आणि कैद! तिचा उल्लेख त्या काळातील पत्रांमधून 'वस्तू' असाच आहे. माणूस नव्हे वस्तू!

जुलै महिना आला की वादळी पावसाळ्यासारख्या बाजीराव-मस्तानीच्या प्रेमकथेची आठवण येते. मस्तानी पुण्यात आली ती भर पावसाळ्यात. जुलै 1729 मध्ये, आणि पुण्याच्या सनातनी अंतरंगात एकच खळबळ उडाली. विरोधाचा गडगडाट, कडकडाट झाला. पण मस्तानीचं प्रेम त्या विरोधाला, कट-कारस्थानाला आणि बहिष्काराला न जुमानता वर्षत राहिलं. 

ती छत्रसाल बुंदेल्याची मुलगी, त्यानं बाजीरावाला नजर केली असं सर्वमान्य मत आहे खरं, पण एका जुन्या बखरीच्या आधारे लिहिल्या गेलेल्या बाळाजी बाजीरावाच्या चरित्रात ती निजाम दरबारातली असल्याचा उल्लेखही मिळतो. उमदा, देखणा आणि रुबाबदार असा सत्तावीस वर्षांचा तरुण बाजीराव पाहून मस्तानी त्याच्यावर लोभावली आणि पुरुषवेष धारण करून त्याला भेटली अशी नोंद या चरित्राने केली आहे. 

ती हकीकत खरी असो किंवा नसो, मस्तानी बाजीरावाच्या प्रेमात आकंठ बुडालेली होती हे तर खरंच आहे. एरवी पुण्यासारख्या शहरात तिच्या वाट्याला आलेल्या नाराजीला तोंड देणं काही सोपं नव्हतं. ती राजघराण्यातल्या रीतिरिवाजांशी परिचित होती, बुद्धिमान होती, मनानं सरळ आणि वर्तनानंही सरळ होती. शिवाय ती प्रणामी धर्मपंथाची दीक्षित होती. शुद्ध शाकाहारी होती, तरीही ती छत्रसालला त्याच्या मुस्लिम पत्नीपासून झालेली त्याची अनौरस मुलगी होती. पेशव्यांच्या परिवाराला तिचा स्वीकार करणं फारच कठीण गेलं. 

बाजीराव स्वतः अगदी वेगळ्या प्रवृत्तीचा होता. मद्यपान आणि मांसाहार त्याला निषिद्ध नव्हता असं कागदपत्रं सांगतात, पण कुटुंबाच्या दृष्टीनं शेवटी तो 'आपला' होता आणि 'पुरुष' होता. मस्तानी त्यांची नव्हती. ती 'कुबलसुरत' होती म्हणजे अतिशय रूपवंत होती. नाचगाण्यात ती निपुण होती. बाजीराव अशा कुणा बाईकडे नुसता जात राहिला असता तरी परिवारानं हरकत घेतली नसती. पण बाजीरावानं मस्तानीला स्वत:च्या आयुष्यात पत्नीची प्रतिष्ठा द्यावी हेच परिवाराच्या दृष्टीनं गैर होतं. जी बाई बाजीरावाच्या मन-बुद्धीला व्यापून, त्याच्या शरीर सुख-समाधानात त्याची सहचरी होऊन मनोमन त्यांच्या सर्वस्वाची स्वामिनी झाली आहे, तिला सार्वजनिक रीतीनं तिचं ते स्थान देणं मात्र महापाप!

पुण्याच्या ब्राह्मणांनी पेशव्यांच्या घरी धर्मकृत्य करण्यासाठीही कुरबूर सुरू केली, कारण बाजीरावानं मस्तानीला थेट वाड्यात आणून ठेवली. पुढे तिला वेगळा महाल बांधून दिला. त्याचा उल्लेख कागदपत्रांमध्ये 'संसार कृत्याकरिता हवेली बांधली' असाच आहे. म्हणजे बाजीरावानं मस्तानीचा स्वीकार केला तो पत्नी म्हणून. मस्तानी तर स्वत:चं सगळंच मागे ठेवून त्याच्यामागे आली होती. तिला बाजीरावाखेरीज दुसरा ठाव नव्हता. त्या काळातल्या बहुतेक विवाहितांची स्थिती अशीच असे. लग्न झालं की सासर घराशिवाय दुसरा ठाव नाही. तिथे सासरच्या माणसांनी प्रेमानं वागवलं तर ठीक, नाहीतर बहुतेक वेळा तिला नाना प्रकारच्या छळाला आणि डावपेचांनाच सामोरं जावं लागायचं. नवरा बहुतेक वेळ बाहेर, कामाला जुंपलेला. त्यामुळे सासुरवाशिणीला आपली लढाई आपणच लढावी लागे आणि ती बहुधा हरण्यासाठीचीच असे. त्यातही नवरा समंजस असेल आणि तिच्यावर प्रेम करणारा असेल तर त्याचा आधार तरी मिळे. एरवी आडांचे-विहिरींचे आणि नदीचे रस्ते मोकळे असत. एक उडी निकरानं घ्यायची फक्त. 

या बायकांमध्ये मस्तानीचं वेगळेपण एवढंच की तिचा धर्म वेगळा होता आणि बाजीराव हा सत्ताधारी पुरुष होता. एरवी छळ तोच. तसाच, श्रीमंतांघरचा विरोध आणि सत्ताधाऱ्यांच्या घरची कट-कारस्थानं यांना तोंड देतच तिचं आयुष्य गेलं. तिची आणि बाजीरावाची फारकत करण्याकरता बाजीरावाच्या कुटुंबानं हर-तऱ्हेचे प्रयत्न केले. त्यांतला एक निंद्य प्रयत्न सांगितला जातो, तो नानासाहेब पेशव्यांच्या म्हणजे खुद्द बाजीरावाच्याच मुलाच्या संबंधानं आहे. तत्कालीन पत्रव्यवहाराच्या आधारे अभ्यासकांनी अशी नोंद केली आहे की मस्तानीविषयी बाजीरावाच्या मनात जर अप्रीती निर्माण झाली तर तो तिला स्वत:च दूर करील, असा एक विचार बाजीरावाच्या कुटुंबानं केला.

बाजीरावाची आई राधाबाई, भाऊ चिमाजीअप्पा आणि मुलगा नानासाहेब अशी तिघांची ही मसलत होती. त्यानुसार नानासाहेबांनी मस्तानी महालातलं आपलं येणं-जाणं हेतुपूर्वक वाढवलं. सतरा-अठरा वर्षांच्या त्या तरुण मुलाला तशा मोठ्यांच्या सूचनाच होत्या. बाजीराव पुण्यात नाही असं पाहून नानासाहेबांनी मस्तानीशी संबंध वाढवावेत अशीच योजना होती. त्यानुसार नानासाहेब वागत होते. एकदा तर ग्रहणानिमित्त नदीवर मस्तानीला ते स्नानासाठी घेऊनही गेले. लोकांनी त्या दोघांना एकत्र पहावं आणि त्यांची चर्चा बाजीरावाच्या कानावर जावी, म्हणजे मस्तानी व्यभिचारी असल्याचा संशय बाजीरावाच्या मनात मूळ धरेल असं घरच्या मंडळींना वाटत होतं; म्हणून हे कारस्थान रचलं गेलं होतं. 

मात्र मस्तानीनं नानांना नेहमीच ममत्वानं वागवलं. बाजीरावाचा मुलगा तो आपला मुलगाच आहे, अशा भावनेनं तिनं नानांकडे पाहिलं आणि जेव्हा त्याच्या वर्तनात वेगळात हेतू तिला दिसू लागला तेव्हा तिनं नानासाहेबांची कानउपाडणीही केली. बाजीराव-मस्तानीला वेगळे करण्याचे कुटुंबाचे सर्वच प्रयत्न सतत व्यर्थ होत गेले. सुदैवाने बाजीराव मस्तानीच्या पाठीशी शेवटपर्यंत राहिला. 

मस्तानी मात्र शेवटपर्यंत खूप एकाकी लढत राहिली असली पाहिजे. कारण बाजीराव वर्षातील आठ-नऊ महिने कुठल्या ना कुठल्या मोहिमेवरच असे. मस्तानीला सोबत असत त्याची मधूनमधून येणारी पत्रं आणि त्याचा-तिचा मुलगा समशेर. सदाशिवराव आणि रघुनाथराव यांच्याबरोबर समशेरचीही मुंज करावी असं बाजीरावाला वाटत होतं. मस्तानीनं मराठी भाषा आणि पेहेराव स्वीकारलाच होता. आता मुलाची मुंज व्हावी असं तिला वाटत होतं. पण पुण्यातील ब्रह्मवृंदानं या गोष्टीला कडाडून विरोध केला. बाजीराव वैतागानं पाटस कुरकुंभला जाऊन राहिला. पण चौक्या बसल्या त्या मस्तानीभोवती. 

खरं तर मस्तानीसारखी स्त्री मराठेशाहीला मिळाली हे येथील सत्तेचं भाग्य. ती उत्तम घोडेस्वार होती. बाजीरावाची स्फूर्तिदेवता होती. शिवाय मनानं निर्मळ आणि वागण्यानं सरळ होती. तिनं पती म्हणून फक्त बाजीरावाचाच स्वीकार केला होता असे नव्हे, तर त्याच्या पहिल्या बायकोचा आणि मुलाचाही स्वीकार केला होता. 

तरीही तिला तिच्या स्वाभाविक सरलतेचं आणि प्रेममयतेचे बक्षीस म्हणून मिळाला तो फक्त विरोध, अपमान, तिरस्कार आणि कैद. तिचा उल्लेख त्या काळातील पत्रांमधून 'वस्तू' असाच आहे. माणूस नव्हे वस्तू! तिला जीवे मारणं किंवा तुरुंगात खितपत टाकणं हे घडू शकलं नाही याचं कारण तिच्या प्रेममय अंत:करणाची कुणाला खात्री पटली, हे मुळीच नव्हे. कारण असे आहे की सर्वांना बाजीराव हवा होता आणि त्याचा जीव मस्तानीकडे गहाण पडला होता. 

बायकांची एक जुनी ओवी मला आठवते. मुलगा आणि सून यांच्याविषयीची ओवी... 

"आपल्या लेकासाठी सई सांभाळली सून

रतनाचे साठी चिंधी करावी जतन"

मस्तानीला हालहाल करून मारलं गेलं नाही किंवा तिला पळवून लावलं गेलं नाही, याचे एकमेव कारण म्हणजे बाजीरावाचे तिच्यावर असलेलं प्रेम. त्या प्रेमाची जाणीव सर्वांनाच अहोरात्र होती. 

म्हणून मस्तानी वाचली, पण त्या वाचण्याला काय अर्थ होता? बाजीराव पुण्याबाहेर असतानाच आजारी पडला आणि मरण पावला. मरतेवेळी त्याच्याजवळ त्याची पहिली बायको काशीबाई आणि मुलगा हे दोघं पोहोचू शकले. मस्तानी मात्र पोहोचू शकली नाही. अर्थात बाजीरावानंतर तीही जगली नाहीच. त्या तिच्या मृत्यूनंही तिच्या सुसंस्कृत प्रेमाचंच दर्शन घडवलं. पेशवे परिवाराच्या कट-कारस्थानांच्या आणि असमंजस विरोधाच्या हीन पार्श्वभूमीवर, ते दर्शन अधिकच उदात्त वाटतं. दुर्दैवी, करुण आणि उदात्त!

Tags: पुणे पेशवाई मध्ययुगीन विचारधारा स्त्री प्रेम कथा बाजीराव मस्तानी Love story Pune Mediaval Society Women Peshwe Bajirao Mastani weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अरुणा ढेरे,  पुणे

कवयित्री, लेखिका 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके