डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

पैसे गेले, महागड्या वस्तू गेल्या, दागिने गेले पण रामसिंह खेळायचा थांबेना. शेवटी त्याचे असे त्याच्याजवळ काय राहिले? कदाचित मित्रांनी सुचवले असेल; किंवा कदाचित त्याच्याच लक्षात आले असेल, की आहे! अजून एक वस्तू - एक गोष्ट शिल्लक आहे! तिला पणाला लावू या! किती किंमत ठरवायची तिची?... पाच हजार रुपये! रामसिंहाने आपली बायको पणाला लावली आणि पाच हजार रुपयांच्या बोलीवर तो अखेरचा डाव खेळला. खेळला आणि तो डावही हरला. रामसिंह पूर्ण कफल्लक झाला. कंगाल झाला. त्याच्या मालकीची शेवटची गोष्ट म्हणजे त्याची बायको! तीही तो हरला.

महाभारतातला प्रसिद्ध द्यूत प्रसंग. युधिष्ठिराने द्यूतात सर्वस्व गमावले. आपल्या भावांसकट सर्वांना पणाला लावून तो हरला. स्वतःसह आपल्या भावांना त्याने कौरवांचे दास केले. अखेर मागे उरली ती द्रौपदी. द्यूतात तिलाही त्याने पणाला लावले आणि तो हरला. त्या द्यूतसभेत द्रौपदीने आक्रोश केला. आपल्याला न्याय मिळावा म्हणून आकांत केला, पण कौरवांना अश्लाघ्य वर्तनापासून रोखणे सभेत हजर असलेल्या ज्येष्ठांना आणि सद्गृहस्थांनाही शक्य झाले नाही. मानवी स्वभावातील नीचतेचे, हिडीसपणाचे आणि क्रूरतेचे ते प्रच्छन्न दर्शन होते; आणि ते एका स्त्रीच्या निमित्ताने घडले होते. त्या प्रसंगी द्रौपदी त्यांचे सावज होती. त्यांच्या निर्दय आणि निर्लज खेळाचे एक साधन होती.

मुळात तिला साधन केले होते तेही युधिष्ठिरानेच. त्यानेच तिला प्रथम पणाला लावली. खरे तर आपल्या भावांना पणाला लावण्याचा अधिकारही त्याला कोणी दिला? आणि त्याने तो का वापरला? केवळ वयाने वडील असणे यामुळे धाकट्या भावांच्या आयुष्याची खरेदी-विक्री करण्याचा अधिकार मोठ्या भावाला मिळतो; केवळ पुरुष असणे यामुळे आपल्या वायकोची खरेदी-विक्री करण्याचा हक्क पुरुषाला मिळतो! त्या काळी व्यवस्थेने सत्ताधाऱ्याला, ज्येष्ठाला आणि पुरुषाला बहाल केलेल्या अनेक हक्कांपकी, अधिकारांपैकी हा एक हक युधिष्ठिराला त्या प्रसंगी बजावता आला इतकेच.

द्यूतसभेचा प्रसंग हा महाभारतातला अंगावर काटा आणणारा प्रसंग आहे. 'माणसांच्या सुसंस्कृततेचे पापुद्रे उकलल्यावर आतून काय काय बाहेर पडते ते पहा!' असे म्हणतच जणू व्यासांनी ह्या प्रसंगाला हात घातला आहे. दुर्योधन- दुःशासनाची निर्लज, बीभत्स आणि क्रूर अभिलाषा, धृतराष्ट्राचा किडका स्वार्थ आणि घातक पुत्रप्रेम, शकुनीचे उघड कपट, कर्णाचे सूडाचा स्पर्श झालेल्या मोहाचे अश्लाघ्य दर्शन, भीष्मांची अनुचित माघार, विकर्णाचा दुबळा प्रतिकार- कितीतरी गोष्टी या निमित्ताने व्यासांनी उघड केल्या! 

द्रौपदीचा विचार द्यूतप्रसंगातच काय, पण संपूर्ण महाभारतात सहजपणे बाजूला न करता येणारा आहे. भारतीय संस्कृतीतील स्त्रीच्या स्थानाचाच एका परीने तो प्रश्न आहे. द्रौपदीचे पाच पती ही महाभारतोत्तर समाजालाच नव्हे तर भारतकालीन समाजालाही न पचलेली गोष्ट. व्यासांनी रचलेल्या महाभारतातच तिच्या बहुपतित्वासंबंधीचा पेच उपस्थित केला गेला आहे. व्यासांच्या उपदेशामुळे आणि त्यांनी सांगितलेल्या तिच्या पूर्वजन्म वृत्तांतामुळे- द्रुपदाने ती गोष्ट मान्य केली खरी; पण इतरांच्या मनात, विशेषतः पांडवद्वेष्ट्या कौरवांच्या मनात द्रौपदीचे चारित्र्य कायमचे कलंकित राहिले.

कौरवांनी पांडवांशी घेतलेल्या आमरण वैरात द्रौपदी ही एक कायमची दुखरी जागा राहिली. सत्ता आणि संपत्ती यांच्यासाठीच मुख्यतः कौरव-पांडवांचा संघर्ष असला तरी त्या संघर्षाला प्रज्वलित ठेवणारा अंतराग्नी द्रौपदीमुळेच भडकून उठत होता. तिची अभिलाषा, ती अप्राप्य असल्यामुळे तिचा द्वेष आणि ती पांडवांशी एकनिष्ठ असल्याने वाटणारा मत्सर यांचे एक कडू रसायन कौरवांच्या मनात सतत उकळत होते. तिची विटंबना करण्यात त्यांना आसुरी आनंद वाटला, त्यामागे त्या रसायनाची उकळीच होती. एरवी चारित्र्यसंपन्न, दानशूर, थोर आणि गुणवान असलेल्या कर्णाच्या मनातही द्रौपदीच्या बाबतीत असलेले अनुचित, अशोभनीय विचार द्यूतसभेत उघड झाले.

द्रौपदी मुळात कितीही तेजस्वी आणि मानिनी असली, तरी तिचे धिंडवडे त्या सभेत पूर्णपणे निघाले. कृष्णाने चमत्काराने तिची लाज राखली. हे घडले नसते तरी आणि घडले असले तरी तिची विटंबना त्यापूर्वीच यथेच्छ झाली. सर्व वयाच्या पुरुषांनी तरुणांनी, प्रौढांनी, वृद्धांनी भरलेल्या त्या सभेत द्रौपदीला स्त्री म्हणून जेवढे अपमानित करता येईल तेवढे केले गेले. भारतीय इतिहासात एवढा लाजिरवाणा प्रसंग स्त्रीने कचितच जाहीरपणे अनुभवला असेल.

परवा परवा तिचेच नशीब वाट्याला आलेल्या एका बाईने मात्र तिच्या वाटच्या अन्यायाचा प्रतिकार फार त्वेषाने केला. काळाची, परिस्थितीची चौकट बदलली, याचा हा परिणाम म्हणायचा का? वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीत या धाडसी बाईचे नाव प्रसिद्ध झाले नव्हते; पण ती नवी द्रौपदीच म्हणायची. ती उत्तर प्रदेशातील, मुकाटयाने अत्याचार सहन करणाऱ्या, छळ सोसणाच्या, जळून मरणाच्या कितीतरी बायका तिच्या भोवताली वावरत असणार, बायकोने मनासारखे जेवण केले नाही: तिने माहेरी पत्र पाठवले; तिने दीरांचे आदरातिथ्य नीट केले नाही; ती सासऱ्यांना उलट बोलली; तिथे कौतुक शेजाऱ्यांनी जरा जास्तच केले, अशा कोणत्याही कारणाने बायकोला जीवे मारण्याचा पराक्रम करणारे कितीतरी पुरुष भोवती दिसत असणार.

तरीसुद्धा ही न घाबरता प्रतिकार करणारी निघाली. उत्तर प्रदेशातील बिजनोर जिल्ह्यातील आणि धामपूर तालुक्यातील केदारपूर हे तिचे गाव. ऐन दिवाळीचे दिवस होते. दिवाळी म्हणजे लक्ष्मीचा उत्सव. जुगार खेळून रात्र जागवण्याचाही(?) उत्सव. धनपती कुबेर आणि धनदेवी लक्ष्मीचा उत्सव म्हणून दिवाळीचा सण पूत खेळून साजरा करण्याची प्रथा एकेकाळी कुठेकुठे होतीच. तीच प्रथा अठ्ठावीस वर्षांच्या तरुण रामसिंहानं आनंदाने पाळली. दिवाळीच्या दिवशी तो रात्री जुगार खेळायला गेला.

दारू ओघानंच आली. नशा दोन्हींची चढली. दारूची आणि जुगाराचीही. नेहमीची मित्रमंडळी होती. नेहमीचा खेळ होता. भरीला सणाचा उत्सव होता. पण रामसिंहाचे नशीब तेवढे त्याला साथ करीत नव्हते. दान मनासारखे पडलेच नाही. जवळचे सगळे पैसे संपले. आता...? त्याने घड्याळ काढून ते पणाला सावले. पण तो घड्याळही हरला. मग अंगठी बोटातून निघाली. तीही मित्राच्या खिशात जाऊन पडली. मित्र सुदैवी. जिंकतच राहिला आणि रामसिंह बेभान होऊन सगळे काही पणाला लावत राहिला.

पैसे गेले, महागड्या वस्तू गेल्या, दागिने गेले पण रामसिंह खेळायचा थांबेना. शेवटी त्याचे असे त्याच्याजवळ काय राहिले? कदाचित मित्रांनी सुचवले असेल; किंवा कदाचित त्याच्याच लक्षात आले असेल, की आहे! अजून एक वस्तू - एक गोष्ट शिल्लक आहे! तिला पणाला लावू या! किती किंमत ठरवायची तिची?... पाच हजार रुपये!

रामसिंहाने आपली बायको पणाला लावली आणि पाच हजार रुपयांच्या बोलीवर तो अखेरचा डाव खेळला. खेळला आणि तो डावही हरला. रामसिंह पूर्ण कफल्लक झाला. कंगाल झाला. त्याच्या मालकीची शेवटची गोष्ट म्हणजे त्याची बायको! तीही तो हरला.
मित्राने जल्लोष केला असेल. पैसे आणि दागिने वगैरे गोष्टी तर त्याने तिथल्या तिथेच रामसिंहाकडून वसूल केल्या होत्या. बायको जिवंत प्राणी असल्यामुळे आणि नवऱ्याचे स्वयंपाकपाणी, घरदार राखणे इत्यादी कामांसाठी ती घरीच राहणे आवश्यक असल्यामुळे रामसिंह तिला खेळाच्या ठिकाणी हजर करू शकला नव्हता. मग 'महाभारत' घडवणारा हा 'राम' आपल्या मित्राला घेऊन सरळ आपल्या घरी गेला. तिथे त्याची बायको त्याची वाटच पहात होती. मित्राला तर आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. झालेली हकीकत रामसिंहाच्या मित्राने तिला सांगितली आणि जुगारात रामसिंहाकडून तिला जिंकून घेतल्याचेही सांगितले. 

हकीगत ऐकून ती आधी अवाक् झाली. पण नंतर नवऱ्याचा तो मित्र जेव्हा तिला आपल्याबरोबर चलण्याचा आग्रह करू लागला, तेव्हा ती संतापाने पेटून उठली. तिची चूलही पेटतीच होती. कदाचित स्वयंपाक करून ती रामसिंहाची वाटच बघत असेल. तिने त्या पेटल्या चुलीतले एक चांगले जळते लाकूड उचलले आणि नवऱ्याला आणि त्याच्या मित्राला चांगले झोडपून काढले. तिच्या नवऱ्याला तिचा हा अवतार कदाचित अनपेक्षित असेल; पण तिने निमूटपणे नवऱ्याची आज्ञा पाळणाऱ्या पतिव्रतेची भूमिका सोडून चंडिकेचा अवतार धारण केला आणि नवऱ्याची खोड मोडली. त्याचा तो अजिंक्य मित्र तर इतका घाबरला की त्याने सरळ पोलीस चौकी गाठली. रामसिंहाचा पराक्रम तिथे सर्वांना कळला आणि त्या आधुनिक द्रौपदीची तडफही सगळ्यांच्या लक्षात आली. किती शतकांनंतर द्रौपदीवरच्या अन्यायाला तिच्याकडूनच उत्तर मिळाले!

Tags: घरगुती हिंसा द्युतसभा द्रौपदी वस्त्रहरण महाभारत महिला सबलीकरण स्त्री प्रश्न Indian Myths Mahabharata Domestic Volence Male Patriarchy Women Empowerment Draupadi Women weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अरुणा ढेरे,  पुणे

कवयित्री, लेखिका 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके