डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आसाममधील 'अन्वेषा': ग्रंथप्रसारातील नवा आदर्श

'अन्वेषा' ही आसाममधील तरुणांची संघटना. ही मंडळी 'डावी' असूनही चर्चा कमी आणि काम जास्त हा संघटनेचा 'अलिखित' नियम आहे. राज्यातील राजकीय-सामाजिक हिंसेच्या पार्श्वभूमीवर संघटनेची स्थापना झाली. लोकांचे प्रश्न हाताळताना ग्रंथप्रसाराचेही महत्त्वपूर्ण काम संघटना करत आहे. गेल्या एक तपात वेगवेगळ्या दालनांतून संघटनेने कार्यक्षेत्र विस्तारित केले आहे.

‘अन्वेष’' - आसाममधील मूठमर तरुण मंडळींनी 1986 मध्ये गुवाहाटीत सुरू केलेली स्वयंसेवी संस्था. संस्थेचं अलिखित ध्येय म्हणजे राजकीय आणि सामाजिक अस्थिरतेच्या विध्वंसक कालखंडातून जाणाऱ्या आसामातील जनमानसाला पुस्तकं आणि वाचनातून एका आशावादी, सकारात्मक भूमिकेकडे नेणं. ध्येय 'अलिखित' अशासाठी की इथे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना भारंभार बोलण्याची, ढीगभर लिहिण्याची मुळीच इच्छा नाही. कामासाठी होणाऱ्या बैठका सुरुवातीपासूनच शिस्तबद्ध, मुद्याला धरून चालणाऱ्या पण अगदी अनौपचारिक आणि परखड संवादात्मक. अ-सरकारी संघटनांमध्ये प्रकर्षाने आढळणारा शाब्दिक चर्चांचा जल्लोष आणि त्याचं कामाशी असणारं व्यस्त प्रमाण ‘अन्वेषा’नं कटाक्षानं टाळलं आहे. 

अनुभवातून शिकणं सगळ्यांत महत्त्वाचं :

म्हणजे बारा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या संस्थेत आत्ता कुठे कामाला पगारी माणसं घ्यायला सुरुवात झाली आहे. कामाची दिशा ठरवणारी आणि योजना राबवणारी माणसं पूर्णतः बिनपगारी; पोटापाण्यासाठी नोकरी व्यवसाय करून संस्था चालविणारी. संस्थेला अबोलपणे वाहून घेतलेली ही माणसं नेमक्या वेळात नोकरीतील आपापलं कामकाज आटोपून रोज संध्याकाळी संस्थेत येऊन मनाजोगत्या कामात स्वतःला झोकून देतात. थोडंसं किक्‌झोटिक वाटतंय ना ऐकताना? पण आहे हे असंच.

इथे पगारी लोकांचं प्रमाण 30% आहे. इथे कामकाजाची दिशा ठरवून मार्गदर्शन करण्यासाठी कार्यकर्त्यांची 'हायरार्की' आहे. पण एकंदरीत मामला ज्वलंतपणे मतस्वातंत्र्य जोपासणारा. उदाहरण द्यायचं तर 'अन्वेषा'नं जेव्हा 'स्कोलॉस्टिक' ह्या अमेरिकन बाल प्रकाशन संस्थेची पुस्तकं वितरीत करायचा निर्णय घेतला तेव्हा त्या बैठकीच्या विचारमंथनाची सुरुवातच पुस्तकांची ने-आण करणाऱ्या कर्मचाऱ्यानं संस्थेच्या सचिवांना 'हे आपल्या धोरणांशी कितपत सुसंगत आहे ', असा जाब विचारून केली होती. मुद्यावर उलट-सुलट चर्चा झाल्यावर एक ठाम निर्णय घेणं आणि मग त्या दिशेने कामाला लागणं हेही ‘अन्वेषा’चं वैशिष्ट्य! काही वेळा प्रयोग फसले तर त्यातून वेळीच अंग काढून घेणं आणि अनुभवांतून शिकणं हेही संस्थेच्या वाढीचं एक महत्त्वपूर्ण अंग.
 
'अन्वेषा' अस्तित्वात आली कशी? 

1986-87 मध्ये सी.पी.आय.एम.चा जो विद्यार्थी-गट होता त्यातून फुटून निघालेल्या गुवाहाटी विद्यापीठातील काही युवकांनी काहीतरी भरीव कार्य करण्यासाठी ‘अन्वेषा’ सुरू केली. विद्यार्थी नेते आणि सध्याचे अध्यक्ष श्री. परेश मालाकार आणि सध्याचे सचिव डूडूलमणि शर्मा ह्यांचा पुढाकार होता. 'अन्वेषा'च्या स्थापनेबद्दल बोलताना आजही ती दोघं म्हणतात, ‘‘आमचं भांडण कम्युनिस्ट ध्येयवादाशी नव्हतं, त्याच्या निष्क्रियतेशी होतं. केवळ शाब्दिक चर्चांच्या दलदलीत अडकून पडणारा आदर्शवाद खरा वाटत नव्हता. काही गट तर सरळसरळ राजकीय फायद्यांकडे झुकत असल्याचं स्पष्टपणे दिसत होतं. अशा पार्श्वभूमीवर राजकीय आणि सामाजिक हिंसेच्या वातावरणाने वेढल्या गेलेल्या आसाम राज्यात अ-सरकारी संघटनांनी एकत्र येऊन मुद्दे हाताळावेत असं वाटत होतं.

राज्यात प्रचंड उलथापालथ चालू होती आणि अनेक संस्था वेगवेगळ्या दिशांत जमेल तसं कार्य करत होत्या. पण सर्वांना एकत्र आणून स्थूल मुद्यांवर एकमतानं काम करणं ही एक महत्त्वाची गरज होती. राजकीय विध्वंसातून सर्वांना बाहेर काढणं आणि सर्जनशीलतेकडे वाटचाल करणं सर्वांसाठी श्रेयस्कर होतं. ह्यासाठी बुद्धिजीवी गटाचं एकत्र येणं आणि त्याने समाजाचं नेतृत्व हाती घेणं महत्त्वाचं होतं. तळमळ होती, समाजकार्यासाठी स्वतःला झोकून देण्याचा उत्साह होता आणि दिशेची खात्री होती. हे नक्की कसं घडणार हे मात्र स्पष्ट नव्हतं आणि काही सहजशक्य तर नव्हतंच नव्हतं. पण कुठेतरी सुरुवात करायला हवी ह्या उद्देशाने अन्वेषाचं ‘देऊका’ (पंख) हे एक मासिक सुरू झालं.’’
 
विध्वंसाकडून सर्जनशीलतेकडे
 

आसामात वैचारिक लेखनाची आणि समाजप्रबोधन करणाऱ्या मासिकांची एक परंपरा आहे. 'जुनाकि', 'बाहि', ‘रामघनू’ यांसारखी उणीपुरी पन्नाशी गाठणारी मासिक वेगवेगळ्या कालखंडांत सक्रिय होती. लक्ष्मीनारायण बेनझबरूआ, हेमचंद्र गोस्वामी आणि बीरेन्द्र कुमार भट्टाचार्य यांसारखे विद्वान संपादक समाजाची वैचारिक धुरा सांभाळत होते. पण मधल्या हिंसक कालखंडात सगळंच धुवून गेल्यासारखं झाल्यानं विचारहीनता आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. गंभीर विचारप्रवर्तनाची कालसापेक्ष गरज भासत होती. देऊकानं ही गरज हाती घेतली. मग सुरू झाले नेहमीचेच प्रश्न - ह्या तरुण मंडळीजवळ उसळत्या रक्ताची सामाजिक बांधिलकी होती पण व्यावहारिक बाजू लंगडी होती. गाठीशी पैसा नव्हता आणि प्रकाशनाचा अनुभवही नव्हता. वास्तवाचे चटके बसायला लागले.

दांडग्या उत्साहाच्या भरात आणि मिळणाऱ्या शिष्यवृत्तींच्या, बक्षिसांच्या तुटपुंज्या रकमांतून एक-दोन अंक काढले. मग सुरू झाली पायी भटकंती. सगळा जिल्हा विंचरून काढला आणि वर्गणीदारांचं पाठबळ उभ केलं. वेगवेगळ्या विषयांवर केन्द्रित अंक काढले. बुद्धिजीवी गटांचा विश्वास संपादन केला आणि सगळ्यांच्या मदतीनं ‘अन्वेषा’ तगून राहिली. पुढे पुढे ‘संसदेतील लोकशाही’, 'आसामचा प्रश्न', 'आदिवासींची समस्या', 'स्त्री-मुक्तिवाद आणि संसदेतील राखीव प्रतिनिधित्व' या विषयांवर अंक काढून राष्ट्रीय पातळीवर चर्चा घडवून आणल्या. रजनी कोठारी, अशोक मित्रा, जयप्रकाश, ज्योती बसू, निखिल चक्रवर्ती यांसारख्या विचारवंतांचे लेख अनुवाद करून छापले. आसाममधील प्रदूषणावर बरंच काही छापलं. शाळांमधून पर्यावरण संरक्षणासाठी चर्चा, स्पर्धा, भाषणं आयोजित केली. गुवाहाटीतील प्रदूषणावर उपाययोजनेचा एक प्रकल्प करून तो सरकारला सादर केला. वगैरे वगैरे. 

पुस्तकांचं नवं दालन

सरकारकडून मदतीची किंवा भरीव सहकार्याची अपेक्षा नव्हतीच. पण विरोधही झाला नाही. मूळ म्हणजे हेतूंबद्दल शंका नसल्याने म्हणा कदाचित, पण हिंसक गटांकडूनही कधी विरोध झाला नाही. 1990-91 मध्ये नॅशनल बुक ट्रस्टनं जागतिक पुस्तक मेळाव्यात असमिया पुस्तकांच्या अनुपस्थितीबद्दल काहीतरी करायला पाहिजे असं ठरवलं. तेव्हाचे ट्रस्टचे निर्देशक श्री. अरविंद कुमार गुवाहाटीत जाऊन ‘अन्वेषा’ च्या कार्यकर्त्यांना पुस्तक क्षेत्रात काम करण्यासाठी सुचवून गेले. ‘अन्वेषा’नं हे आव्हान स्वीकारायचं ठरवलं. आसाममधील तमाम प्रकाशकांना पत्रं गेली आणि आसामी भाषेतील उत्कृष्ट पुस्तकं निवडून एक प्रातिनिधिक असमिया पुस्तकांचा स्टॉल पुस्तक मेळाव्यात लागला. इतक्या सूत्रबद्धतेनं पुस्तकं वाचकांसमोर आल्याने दिल्लीत छानच विक्री झाली आणि 'अन्वेषा'ला आसामी भाषेतील प्रकाशकांचं प्रतिनिधित्व करण्याचं एक नवं दालन उघडं झालं. मंडळी मूळचीच पुस्तकप्रेमी, त्यात कार्याला मिळालेली ही नवी दिशा.

इतर भाषांतील प्रकाशक आणि आंतरराष्ट्रीय पातळी ह्यांना असे सामोरं गेल्यानं आपल्या भाषेसाठी आणि भाषकांसाठी आपण काय काय करू शकतो यावर विचारविमर्श सुरू झाला. मग नॅशनल बुक ट्रस्टबरोबर आसाम साहित्य सभेत भाग घेतला आणि पुस्तक प्रकाशन व वितरण क्षेत्रात ‘अन्वेषा’च्या पुढाकारावर शिक्कामोर्तब झालं. एका खोलीत ऑफिस थाटलेल्या ‘अन्वेषा’नं भांडवल आणि सरकारी अनुदानाच्या अभावातून मार्ग काढत आसामभर पुस्तक प्रदर्शनं भरवायला सुरुवात केली. आज ही स्थिती आहे की वर्षातील 360 दिवस अन्वेषा राज्यातील कुठल्या न कुठल्या ठिकाणी प्रदर्शनं आणि पुस्तकांशी संबंधित कार्यक्रम आयोजित करते. त्यांच्याकडे प्रदर्शनाचा भपकेबाज जामानिमा नाही. कार्यकर्ते बसने प्रवास करतात. गाड्यांवर पुस्तकं लादून नेतात. पण प्रदर्शनाच्या वेळी बांबूच्या सुबक शेल्फांवर ती आकर्षकपणे मांडून ठेवतात. असमिया आणि इंग्लिश भाषांमधील जवळजवळ तीन हजार पुस्तकं वाचकांसमोर ठेवण्यात येतात. वेगवेगळ्या प्रकाशकांशी सहकार्यातून पुस्तकं छापणं आणि स्वस्तातस्वस्त दरात ती वाचकांपर्यंत पोहोचवर्ण हे ‘अन्वेषा’चं काम आहे. हे सगळे करत असताना पुस्तकांएवढीच महत्त्वाची आहे सामाजिक बांधिलकी. 

‘अन्वेषा’चे अध्यक्ष परेश मालाकार म्हणतात, ‘‘माझे प्रयत्न आहेत शिक्षणातून लोकांना स्वयंसिद्ध, शक्तिवान करण्यासाठी. कशासाठीही केन्द्र सरकारवर अवलंबून राहू नका आणि वैचारिकदृष्ट्या जगभराशी संपर्क ठेवा. प्रगतीसाठी स्वाभिमान आणि स्वयंपूर्णता जेवढी महत्त्वाची आहे, तेवढंच महत्त्वाचं आहे आधुनिक जगाचं भान. भर असायला हवा आशावादी प्रयत्नांवर - मनाच्या जोपासनेला आणि वाढीला पुस्तकांचं खतपाणी सतत मिळाले पाहिजे. निरलस मनानं सामाजिक कार्य करणारी आणि वेगवेगळ्या दालनांतून स्वतःचं कार्यक्षेत्र व्यापक बनवणारी अन्वेषा आसामच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील आहेच. पण त्याहूनही महत्त्वाचा आहे तिने जगभराशी साधलेला संवाद!

Tags: विध्वंसाकडून सर्जनशीलतेकडे आसाम ‘अन्वेषा’ पुस्तक चळवळ सामाजिक from destruction to creativity assam 'anwesha' book movement social weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके