डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

एक झपूर्झा - जगाच्या टोकावर नवा नाच

वर्तमान काळातून पार हरवलेली ती वृद्ध श्रमिका, माझी यजमानीण अस्फुट स्वराने म्हणाली, 'त्या क्षणी मी माझ्या हातांकडे नव्या डोळ्यांनी पाहिले!' मी यांच्यासारखीच तरुण होणार होते. नटणार होते, मोहून जाणार होते, मोहविणार होते-नाचणार होते, सुंदर सुंदर होणार होते...पण ज्या चीनमध्ये ती मोठी झाली, तो नाचाला मुळीच अनुकूल नव्हता.

पार पिकलेल्या चिनी बुजुर्गांचा एक अनाडी विश्वास असतो. या पृथ्वीचे शेवटचे टोक म्हणजे आपले हैनान बेट, हेच आहे. आणि यात मागे पुढे नाही. आपल्या दक्षिण चिनी सागरातल्या या बेटापाशी पृथ्वी संपते, अशी त्यांची पक्की खात्री. 

दाट जंगलाने भरलेले, डासांनी, उडत्या किड्यांच्या घोंघावण्याने झाकोळून गेलेले हे बेट. तिथले वन्य जीवन म्हणजे एक अक्राळविक्राळ अनुभव असणार होता, निर्दय; तरी उकळत्या चैतन्याने रसरसणारा. खदखदणारा. या लाव्हारसासारख्या आयुष्याची चव घ्यायला म्हणून मी इथे आहे. 

आम्हां अमेरिकन स्वयंसेवकांच्या संघाने बारमाही धो धो पावसाची दक्षिणेकडची जंगले पार केली. पर्वत रांगांतल्या आदिवासी चिन्यांच्या कडेलोट जिव्हाळ्याची चव घेतली, त्यांच्या सरळ मुंडीछाट वैरातून जीव वाचवला. थेंब तोंडात घालताच बकाबका ओकावे इतक्या कडू जहर पेयाचे वाडगे पचनी पाडले. 

पर्यटकांना सोडाच, संशोधकांनाही हुंगायला मिळणार नाहीत, असे चिनी आदिम आयुष्याचे अनुभव घेतले. आमच्या बरोबरचे सगळे वीर कामे संपवून परतले, तरी आम्ही दोघे उरलो- मी आणि माझी एक जिगरबाज सहकारी जोन टर्नर. तिने एका नकाशावर बोट ठेवले. आपल्या सुजलेल्या गुडघ्यावरून हात फिरवला आणि भुवई उंचावली. विचारले.  'हैनान बेटे ?' 
मी एक शिवी हासडली. 'नाही, काय म्हणून?' उलट विचारले. निघालोच. 

किनाऱ्याकडचा 560 कि.मी.चा बसचा आमचा प्रवास सुरू झाला. आज तिथे आमच्या सुधारणांची चंगळ झाली आहे. तेव्हा ते विसाव्या शतकाच्या उलट्या दिशेने जाण्यासारखे होते. तुफान भरलेली बस. माणसे, सामान कलकलणार्या कोंबडयांच्या डालग्या यांच्यासकट हिसके खात सायकल रिक्षा भटकी जनावरे आणि खड़े चुकवीत धावत राहिली. दोन दिवस आणि एका पूर्ण रात्रीचा प्रवास करून आम्ही 'तियान या ही जिओ'ला म्हणजेच 'पृथ्वीच्या टोकाला पोहोचलो. 

निर्जन, वालुकामय समुद्रकिनारा पार केला आणि अंतर्भागातल्या एका खेड्यात रस्त्याकडेच्या टपरीवजा घरात शिरलो. खाणे उरकले. असली चार हॉटेल्स असतात तसेच हेही होते- एखादीच मोठीशी चंद्रमौळी खोली, तिच्यातच राहण्याची जागा उपाहारगृह आणि प्राण्यांचे खुराडे. 

चिनी खेड्यातले नेहमीचे मकाण असलेली ही केंबळी झोपडी अगदी चिनी खेड्याच्या मापानेसुद्धा गरीबडी दिसत होती. तक्ता उडालेले एकमेव टेबल, चटईसुद्धा वर न अंथरलेली निव्वळ खाट, आणि दोन व तीन मीटर लांबीच्या वळवळत्या सापांनी भरलेले पिंजरे! एक जुनी सायकल भिंतीवर टांगलेली. प्रॉपर्टी खलास. सरकारी दिसणारी काही पत्रके जागोजागी चिकटवलेली आणि एक, आता फिके पडलेले मुलाचे चित्र. कोणत्या तरी मासिकातून फाडलेले.

80 वर्षांची एक बाई, बहुधा मालकीण आणि तिचा तरणा नोकर, आम्हांला ते साप हातात घेऊन दाखवू लागला. आम्ही गिर्हाईक होतो. जेवणासाठी यांतला कोठला आम्हांला चालणार होता? आम्ही खाणाखुणांनी पटवायचा प्रयत्न केला की आम्हांला जेवायचे नाही. हवा फार गरम आहे. भूक फारशी नाहीच शिवाय हे साप चांगले मोठे आहेत. आम्ही फारसे न खाल्ल्याने तुमचे अन्न निष्कारण फुकट जाईल. पण त्यांना गिऱ्हाईक हवे होते. मला केव्हा तरी सुचले. धुळीच्या रस्त्याच्या कडेला दाणे टिपत असलेली कोंबडी माझ्या दृष्टीला पडली. यांच्या मालकीचीच दिसत होती. तिच्याकडे बोट दाखविले. ती मिळेल का? हावभावांनी विचारले आणि  मुंड्या हलवून त्यांनी होकार भरला. 

मेनू ठरला. वीसच मिनिटांत अन्नब्रह्म समोर येऊ लागले आणि शब्दशः शून्यातून एवढे तऱ्हातऱ्हांचे अन्नपदार्थ तयार करणाऱ्या सुगरण चिनी हातांच्या लालित्याने आम्ही चकित होऊन गेलो. नित्याचे जादुई सूप, त्यापाठोपाठ आल्या अनेक तऱ्हांच्या भाज्या; अर्थातच ऊनऊन भात आणि त्या तसल्या हवेत उकळता गरमागरम चहा. त्याचे हवे तेवढे वाडगे भरभरून. जेवणाच्या दरम्यान ती वयस्क यजमानीण माझ्याकडे बघून स्मित करीत, मला पंख्याने वारा घालीत राहिली. तिच्या हातातला तो पंखा मोठा कलाकुसरीचा, सुबक दिसला. 

करड्या-पिंगट पिसांचा बांधलेला होता. अशी वस्तूच मी हयातीत पाहिली नव्हती. पण मी तोंड आवरले. पंख्याला चांगले म्हणालोच नाही. कुडाची झोपडी निखळ रिकामी होती. चीजवस्तू म्हणून दिसत नव्हती. पाहुणा चांगले म्हणेल, ती वस्तू त्याला भेट देऊन टाकावी असा इथला अतिथिधर्म असतो. समजा पंख्याची वाखाणणी केली आणि यांनी मलाच तो देऊन टाकला, तर? 

मी तोंड फिरविले. झोपडीत आणखी एक 'ऐवज म्हणण्याजोगी चीज दिसली- एक जुने घड्याळ- यजमानीणबाई मोठ्या तोऱ्याने रत्नासारख्या जपत होत्या. बस, इतकेच. कदाचित तो पिसांचा पंखा मला फार आवडल्याने असेल, कसे कोण जाणे. घडले ते असे. 

त्या वयस्क मालकिणीने मला मायेने कुरवाळले व अचानक तो पंखा मला देऊन टाकला. मला धक्काच बसला. या बयेला कसे कळले ? मी अगदी लाजलो. शरमून गेलो. का बरे ही छपरे माझ्यावर अशी उदार झाली होती ? का या पागोळ्या माझ्या अंगणी उतरल्या होत्या? अचानक खोलीत काही तरी बदल घडून आला होता. ती जमीन ब्रह्मानंद झाल्यासारखी समाधानाने हसायला लागली होती. अचानक तिला माझी ओळख पटली होती का? कोणत्या ऋणानुबंधाची तिला जाणीव झाली होती? 

जेवणानंतर का कोण जाणे, तिच्या ओल्या हास्याने असेल. चिनी प्रथेनुसार लगेच टाकोटाक बाहेर पडलो नाही. दुसऱ्या पाहुण्या गिऱ्हाईकांचे स्वागत करायला घरातले इतर जण गेले आणि मोडक्या-तोडक्या इंग्रजीत मालकीण आमच्याशी बोलू लागली. तीस वर्षांत ती आम्हां पश्चिमेकडच्या गोऱ्यांना पहिल्यानेच भेटत होती. आमच्या येण्याने तिच्या आठवणी जाग्या झाल्या होत्या. कोण्या वेड्या चिनी मालकाकडे तिचे वडील कामाला होते आणि हाँगकाँगमधल्या एका मोठयांच्या कॉन्फरन्सला तिला कामासाठी नेण्यात आले होते. माझे हातातले उष्टे चमच्चे काटे तसेच उरले!' यजमानीण उत्सुकतेने सांगू लागली. 

तिच्या विस्फारल्या डोळ्यांपुढे तेव्हाचे चित्र उभे असावे; मंद संगीत आंतरराष्ट्रीय तोलाचे होते. नृत्याचे दालन भरदिवसाही दिव्यांनी उजळले होते. कितीतरी बडे पाहुणे होते. ऐटबाज तरुणांनी, आपदमस्तक नटलेल्या लवलवत्या ललनांनी नृत्यगृह भरून गेले होते. संगीताच्या तालाचा ठोका पडला. लय बदलली. आणि नृत्यगृह जणू जागे झाले. नृत्य सुरू झाले 'मास्टरजी!' वर्तमान काळातून पार हरवलेली ती वृद्ध श्रमिका, माझी यजमानीण अस्फुट स्वराने म्हणाली, 'त्या क्षणी मी माझ्या हातांकडे नव्या डोळ्यांनी पाहिले!' मी यांच्यासारखीच तरुण होणार होते. नटणार होते, मोहून जाणार होते, मोहविणार होते-नाचणार होते, सुंदर सुंदर होणार होते...

पण ज्या चीनमध्ये ती मोठी झाली, तो नाचाला मुळीच अनुकूल नव्हता. यादवी युद्धाने देश होरपळून निघत होता. घाईने तिचे लग्न उरकून टाकण्यात आले. राष्ट्रवादी आणि माओचे कम्युनिस्ट यांच्या भीषण संघर्ष पाठोपाठ आले जपानी अक्रमण : 1937 मध्ये. मग पुन्हा नागरी यादवीला तोंड फुटले. 1949 च्या मेमध्ये एका महिन्याच्या वेढ्यानंतर शांघाव शहर कम्युनिस्टांना बळी पडले. तिचा नवरा, राष्ट्रसेनेचा अधिकारी, छळतुरुंगाकडे जखडून चालविला जाताना तिने भयचकित डोळ्यांनी पाहिला. पुन्हा त्याची तिची नजरभेट कधीव झाली नाही. 

...क्षणभर थांबून तिने त्या जुन्या घड्याळाकडे बोट केले 'उरले ते तेवढे घड्याळ. त्याने मला दिलेले त्याची आठवण!' 

चिन्यांनी राष्ट्रवाद्यांचा कसून शोध घेतला. वेचून वेचून त्यांच्यावर सूड उगवला. तिची रवानगी या हद्दपारीच्या हैनान बेटावर झाली. इथे तिने आयुष्य कंठले होते जवळपास विजनवासाचे. 

तुम्हाला वाईट वाटत असणारच, मी हळहळून म्हणालो. 

पण तसे नव्हते. ती संसारी बाईच होती, पण का कोण जाणे, या फळाने कडवटपणा धरला नव्हता. आले ते आयुष्य तिने झोळीत महादान पडावे असे मानाने झेलले होते, वकूब होता तितपत सजवले होते. 'एक इच्छा मात्र राहिली. तो नाच आयुष्यात पुन्हा शिकायला मिळाला नाही.' यजमानीण बोलली. 

काय ऐकतो आहे ते समजायला मला एक क्षण लागला. मग माझ्या डोक्यात काही आले. त्या वयस्क यजमानीणचा  हात मी हलकेच हातात घेतला. सन्नाटा पसरला, मी न सांगता तिच्या ते लक्षात आले. आता मी तिला ते नृत्य शिकविणार होतो- या क्षणी. 

ती शिकणार होती का?

ती उभी राहिली. 'बॉलरूम फ्लोअर कडे, "नृत्याच्या दालना 'कड़े आम्ही हलकेच गेलो!'

मैदान, धुळीचे. भाजीच्या डेखांनी, खरकट्याने भरलेले. आता परीक्षा माझी. मी मनोमन धडकी भरून प्रार्थना केली. कोणते तरी नृत्य आता मला आठवू दे! पुढाकार कसा घ्यावा, ते पदन्यास आठवू देत- आणि मला ते आठवले. आधी चाचरत, मी स्वर म्हणत राहिलो. मग धीर आला. आत्मविश्वास वाटू लागला. तिच्याही अडखळत्या पावलांत मग स्थिरता आली. खात्री आली. तिच्या मयदिनुसार चपळता आली. गती आली.

तिच्या ढगळ माओ-पायजम्याचा गिरकी घेणारा स्कर्ट बनला. क्षितिजी आले भरतें ग! घना कुंकुम खिरतें ग! झुलतें अंबर झालें झुंबर, हवेत अत्तर तरतें गं!' अशी झपूर्झा अवस्था झाली. दमलो तेव्हा नृत्य थांबले. मला जाणे प्राप्त होते. यजमानिणीला मी काही भेट देणार होतो का? पण मी सावध झालो. माझ्याजवळच्या अमेरिकन बनावटीच्या वस्तू तिच्याकडे सापडणे धोक्याचे होते. संशयखोर चिनी सैनिकांनी तिला धारेवर धरले असते. ती संकटात सापडली असती. 

वर्षे गेली. माझ्या आयुष्यात झंझावाती वेगाने बदल झाले. आई गेली. मुले मोठी झाली. पत्नीशी पटले नाही. पण अद्याप भिंतीवर त्या बाईने दिलेला तो पिसांचा पंखा आहे. तो मी पाहतो, तेव्हा ते नृत्याचे क्षण आठवतात. काही न कळणान्या अनुबंधाने आमची गाठ पडली होती. तिची एक असोशी मी पुरी करू शकलो होतो.  तिचे कृत्यकृत्य हसू मला त्या पंख्यातून दिसायला लागते. आणि मन धावत सुटते, 'जगाच्या टोका'वर..

Tags: अरुणश्री हैनान बेट arunshuree chini china weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके