डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पायाखाली दबणाऱ्या पाचोळ्याचा किंवा रेतीचा आवाज होऊ नये म्हणून, श्वासही रोखून फ्रेड कानोसा घेऊ लागला छे. रेती कुठली? शय्यागृह अगदी शांत होते. ज्यूलिया, त्याची प्रिय पत्नी पलीकड़े गाढ निजली होती अगदी निश्चित. त्याने बोटाने तिच्या अंगावरचे ब्लंकेट सारखे केले तेव्हा तिने झोपेत किंचित् दीर्घ श्वास सोडला.

शंख फुंकल्याचा आवाज ऐकू आला आणि फ्रेड तट्कन् उठून बसला. तीच ती सुरांची गंभीर लड- घुमत जाऊन तुटणारी. सावध करणारी. फ्रेडने विजेचा धक्का बसल्यासारखे भानावर येऊन भोवताली नजर टाकली. पायाखाली दबणाऱ्या पाचोळ्याचा किंवा रेतीचा आवाज होऊ नये म्हणून, श्वासही रोखून फ्रेड कानोसा घेऊ लागला.

छे. रेती कुठली? शय्यागृह अगदी शांत होते. ज्यूलिया, त्याची प्रिय पत्नी पलीकड़े गाढ निजली होती अगदी निश्चित. त्याने बोटाने तिच्या अंगावरचे ब्लंकेट सारखे केले तेव्हा तिने झोपेत किंचित् दीर्घ श्वास सोडला. बेड लँप मंद प्रकाश पसरला होता. लँपच्या शेडची नक्षीदार सावली चकचकीत भिंतीवर वलयाकार उमटली होती. शंखाचा आवाज आला कोठून?

भासच तो! फ्रेडला हसू आले. मनाला पूर्ण जाग आली. नो , नो. आता आपण जंगलात नाही. मिनेसोटा स्टेटमधल्या आपल्या अद्ययावत् फ्लॅटमध्ये आहोत. त्याला थोडे समाधान वाटले. सुरक्षित वाटली. कशी, कंफर्टेबल वाटले. पलीकडे झोपली आहे डायना. माझी- होय, माझी-गोड छोकरी. (मुलांच्या रूममधून येऊन माझ्याजवळच झोपणारी. पप्पांशिवाय चालतच नाही मॅडोबाचे- डायनाने झोपेत काहीतरी हालचाल केली आणि फ्रेडची स्मृती पुन्हा चाळवली गेली. त्याला निराळेच काही आठवू लागले आणि फार अस्वस्थ वाटू लागले. न्यू ब्रिटनच्या किनाऱ्यावर आपल्या पाठोपाठ धावणाऱ्या आपल्या पायाचा माग कोणी काढून आपल्याला शोधून काढू नये म्हणून त्या पाउलखुणा पुसून टाकणाऱ्या अबोल, उघड्या वाघड्या चिमुकल्या बाळांची आठवण झाली आणि त्याच्या पापण्या नकळत ओलावल्या. ते सारे आदिवासी खेडे त्यांच्या रगेल वासासह समोर उभे राहिले. धुराचा वास. मासळीचा वास. दुधाचा गंध. झाडांवनांतले गार वारे. धुळीचा, नेटिव्ह लोकांच्या अंगाचा, त्यांच्या शस्त्राचा, बांबूचा, भपकारा. आपल्या अंगावरच्या फाटून चिंध्या झालेल्या कपड्यांचा उग्र दर्प. दलदलीचा, डूकरांचा, इबक्यांचा, बदकांचा. अनेक तऱ्हांचे वास. आणि त्या अनादि आदिवासींच्या प्रार्थनागृहातला, त्या गिरिजाघरातला तो गोड वास. या साऱ्या वासांच्या कल्लोळातही ती सुवासाची रेघ! साऱ्या आठवणी घेऊन मागचे आयुष्य फ्रेडसमोर उभे राहिले आणि तो कावरा बावरा झाला. खोल बघू लागला.

सारे नीरव शांत आहे. आपल्या छातीचे ठोकेही फ्रेडला ऐकू येत आहेत.

लेफ्टनंट फ्रेड हर्जेशिमरच्या छातीचे ठोके किंचित जलद पडू लागले आणि आपले ट्वि पी-38 इंजिन त्याने सरळ मुसंडी मारत खाली उतरविण्यास सुरुवात केली. राबॉलमधल्या जपानी तळावर हल्ला चढविण्याच्या तयारीत असलेल्या शत्रूच्या ठाण्यांचे फोटो घेण्याची त्याची कामगिरी. जमिनीवरल्या एका छोट्याशा चोरट्या धावपट्टीकडे त्याने नाक खाली लावून मुसंडी मारली आणि मशीनगनचा कडकडाट त्याच्या कानावर आला. त्याच्या उजव्या इंजिनमधून ज्वाळा भडकल्या आणि काही सेकंदातच त्याच्या पाठीमागे लागलेल्या जपानी, वेगवान विमानाच्या झंझावाती माऱ्याने फ्रेडच्या डाव्या एंजिनाचा चुराडा करून टाकला. तोंडावरून रक्ताचा पाट वाहत असतानाच त्याने इमर्जन्सी लिव्हर खेचला आणि 200 मैल वेगाच्या वाऱ्याच्या झाेताने अंतराळातून तो खाली भिरकावला गेला. वर पॅराशूट उघडले गेल्याचे त्याला जाणवले आणि काही क्षणांतच जंगलातल्या चिखलात तो आदळला.

बिस्मार्क रणक्षेत्रातले न्यू ब्रिटन हे एक बेट, जपान्यांनी ताब्यात घेतलेले. त्याचे बंद राबॉल म्हणजे पॅसिफिकमधला जपानचा, अगदी मिशीला पीळ भरावा असा तळ, जपान्यांखेरीज 500 मैलांचे घनदाट अरण्य आणि 200 मैल प्रशांत सागर, लेफ्टनंट फ्रेड आणि न्यूगिनीमधला त्याचा तळ यांच्यामध्ये विघ्नासारखे उभे होते. फ्रेडजवळच्या तातडीच्या सामग्रीमध्ये (इमर्जन्सी किट) एक कंपास होता, सुरी, आगकाड्या, मासेमारीचा एक गळ, कॅन्व्हासची  पाण्याची पिशवी, औषधे होती आणि चॉकोलेटचे तीन बार. कपाळावरच्या जखमेवर पॅराशूटच्या पट्ट्या बांधून त्याने दाट अरण्यात वाटचाल सुरू केली.

दहा दिवसांत त्याचे चॉकोलेटचे 'रेशन संपले आणि अंगावरच्या कपड्यांच्या चिंध्या झाल्या. एकतिसाव्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी दाट झाडीतले एक झावळ्यांचे झोपडे अचानक समोर दिसले आणि तो जागच्या जागी खिळून उभा राहिला. फ्रेड दृष्टीला पडताच तेथील रहिवाश्यांच्या गटाने आरोळी ठोकली आणि त्याच्याकडे धाव घेतली..

'मस्टाह, मस्टाह'-अगम्य शब्दोच्चार करीत धावून आलेल्या त्या आदिवासींना पाहताच फेडने पहिल्याने आपल्या गळ्यातला क्रॉस उंचावला आणि त्या जमावाच्या म्होरक्याने आपल्या जवळची एक चिट्ठी त्याच्या पुढे केली. ती पाहून फ्रेडचा ऊर भरून आला. या म्होरक्याचे नाव लाॅओ असून ही जमात दोस्त राष्ट्रांशी दोस्ती करणारी आहे असा मजकूर त्या चिठीत होता. ऑस्ट्रेलियन किनारा-रक्षकदलाच्या प्रमुखाची सही त्या खाली होती! गलितगात्र झालेला, दमछाकीने हैराण झालेला फ्रेड आनंदाने जमिनीवर कोसळलाच. अश्रू त्याच्या गालांवरून वाहू लागले. आदिवासींनी मग केळी, सफरचंद आणि मांसाचा एक तुकडा एवढी दौलत त्याच्या पुढे केली.

दुसऱ्याच दिवशी फ्रेडला त्यांनी आपल्या खेड्यात नेले. एका लॅगूनजवळची पाचपन्नास गवताळ झोपड्यांची वस्ती नंताम्बू हे ते खेडे, पुढचे काही महिने फ्रेडचा आसरा व्हायचे होते. लॉओने या अमेरिकन 'पक्षीमानवा'चे बर्डमैनचे- संरक्षण करण्याच्या हुकूम दिला. डोक्यावर जपानी विमाने घिरट्या घालू लागली की 'पीजन बिलाँग जपान’ च्या इशारतीच्या आरोळ्या उठू लागल्या फ्रेडला लपून बसण्याच्या सूचना. अनेकदा जपानी गस्तवाले किनाऱ्यावर शोध घेण्यास सुरुवात करीत. त्या वेळी शंखांची गंभीर सुरावट फ्रेडला सावध करी. तो बूट घालून वाळूतून चाले, तेव्हा दोन बालके त्याच्या बाजूने धावत : त्याच्या पायांचा माग पुसून टाकण्यासाठी. कोणी पाऊलखुणांवरून त्याला शोधून काढू नये म्हणून.

रात्र व्हायची, चांदण्या डोकवायच्या, काळेशार मेलनेशियन आदिवासी रिंगण धरून बसायचे. फ्रेड त्यांच्यात बाहेर येऊन बसे. ते ओबडधोबड गप्पा करीत. आदिवासींचे आयुष्य अगदी प्राथमिक होते, ते उदार बुद्धीचे होते आणि निष्ठावान त्याच्या ध्यानी आहे की, धर्माने शिकविलेल्या सोप्या सद्गुणांचेच तर आचरण ही भावडी, भोळी माणसे सरळसोट करीत आहेत!

तो त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून होता, आणि त्याच्या बरोबर उलट ते त्याला आपले सर्वस्व मानायला लागले होते! त्याचे रक्षण करणे हे जणू त्यांचे परम कर्तव्यच नाही तर मनोभावे करण्याचे एक व्रतच झाले होते. मेलनेशियन जमातीच्या तो जसा काही मर्मबंधातली ठेवच होऊन बसला होता. त्यांची लहानसहान भांडणे त्याच्याकडे सोडवायला यायची, आणि त्याने घातलेली समजूत पटवून घेतली जायची. का हे लोक एवढे प्रेम आपल्यावर करीत आहेत? लाॅओला- त्यांच्या नेत्याला अनेकदा गस्तीवरचे जपानी लष्कर चौकशीसाठी पकडून नेई. गळ्याला बायोनेटचे पाते लावून विचारले तरी हे बहादूर फ्रेडबइल अवाक्षरही तोंडा  तून काढीत नसत.

मग आला मलेरिया. फ्रेडला या दुखण्यातून उठवण्यासाठी या भाबडया  लोकांनी जिवाचे रान केले. त्यांच्या वेड्या प्रेमाचा पुरेपूर प्रत्यय त्याला या वेळी आला. वनातल्या त्यांच्या एका 'गॉड'ला त्यांनी याच्यासाठी 'नवस’ ही केल्याचे त्याला पुढे समजते. तो बरा झाला. तेव्हा त्यांनी त्याला आवर्जून त्या 'गॉड च्या दर्शनाला नेले होते. त्याने निर्विकारपणे का होईना, त्यांनी सांगितले ते सगळे विधी केले, तेव्हा त्यांना काय आनंद झाला होता!..

-एका रात्री टेहाळणी करणाऱ्या आदिवासी जागल्या ने बातमी आणली. तीन ऑस्ट्रेलियन टेकड्यांमध्ये येऊन लपले आहेत. त्यांच्याकडे एक वायरलेस सेटही आहे.. अतिशय अशक्त झालेल्या फ्रेडच्या बरोबर काही आदिवासी निघाले आणि लवकरच त्यांनी त्या तिघांना शोधून काढले. ते ऑस्ट्रेलियन किनारा-रक्षक (कोस्टगार्ड) सैनिक होते. दोस्त राष्ट्रांच्या लष्करावर हल्ला करण्यासाठी राबॉलवरून निघणाऱ्या शत्रूच्या विमानांचा वेध घेण्यासाठी पाठवलेले, ती विमाने सरळ त्यांच्या डोक्यावरून जात आणि त्यांची माहिती देणारा संदेश क्षणार्धात पाठविणे यांना शक्य होई. फ्रेडसारखेच आणखी दोघे वैमानिक तेथे येऊन पोचले होते. न्यू गिनीहून उलट संदेश आला : 'वैमानिक उचलू'...

त्यांना घेऊन जाणान्या रबरी 'डिपी’ च्या पाणबुडीच्या चालिकेचा चेहरा फ्रेडला तशा अवस्थेतही आवडला होता! (तीही फ्रेडच्या भयंकर दिसणाऱ्या चेहऱ्याकडे निमिषभर टक लावून पाहत राहिली होती. आणि त्याने तिच्याकडे पाहताच तिच्या पापण्या खाली वळल्या होत्या.)

ज्यूलिया! शय्यागृहात निश्चित झोपी गेलेल्या आपल्या पत्नीकडे फ्रेड पाहत राहिला. त्या मेलनेशियन आदिवासींबरोबर काढलेल्या - आयुष्याची ही जणू अमोल मिळकतच होती.

परंतु नाही! लेफ्टनंट  फ्रेड हर्जेशिमर एवढ्यावर मुळीच संतुष्ट नव्हता. या सुखी आयुष्यात आणी काही व्हायला हवे होते. ज्यूलियाकडे पाहताना त्याला त्या मेडनेशियन आदिवासी मुली आठवत, आपल्या आनंदी पोरांमधून त्या निष्पाप आदिवासी पोरांची भोळी तोंडे दिसायला लागत. इथली अद्ययावत सुखसाधने सहजगत्या हाताळणारी आपली पोरे पाहताना आपल्या बॅगची झिप सर्रकन ओढली तरी आ वासून पाहत राहणाऱ्या त्या मुलांचे, आपल्या मागून अनवाणी धावत आपल्या बुटांचे ठसे पुसून टाकणाऱ्या बालकांचे चेहरे दिसायला लागत-

नो, नो. त्यांच्यासाठी काहीतरी करायलाच हवे होते. फ्रेड नाताळसारख्या सणांना त्यांना भेटी पाठवीत राहिला. वस्तू, पैसे- पण नाहीं. समाधान होतच नव्हते! सारी मिळकत देऊन टाकली असती तरी मनाचा गाभारा भरणारच नव्हता, कशाने हा मनाचा शंकर सगळे भरून पावणार होता? हॉरिबल, लेफ्टनंट फ्रेड- तुम्ही एरव्ही शांत राहूच शकत नाही-

फ्रेडने पुन्हा एकदा त्या न्यू ब्रिटन बेटावर फेरी मारण्याचे ठरवले.

आता वर्षे उलटली होती आणि सारे जीवनचक्र मंदपणे, पण निश्चितपणे, पुढे सरकले होते. जणू हे एक वेल- ऑइल्ड मशीनच होते! कुणा अज्ञात अंगुलींनी कणखर धरलेले मुळीच आवाज न करता टिक्... टिक्.... पुढे परिक्रमा करणारे, आणि त्यामागल्या प्रेरणेचे तृप्त तरी शोधक हसरे डोळे फ्रेडला जणू विचारीत होते-बोल. आहे उत्तर?-

होय! फ्रेडला उत्तर सापडले होते. या आदिवासींसाठी खरी देणगी शिक्षणाची होती. प्रॉटेस्टंट मिशनरी लोकांनी त्याला उत्तेजन दिले. सर्व प्रकारची मदत दिली. आर्किटेक्ट आले. इंजिनिअर्स आले. रायॉलमध्ये कामचलाऊ शाळा उघडण्यासाठी श्रमदान, लाकूड सामग्री स्थानिक उत्साही लोकांकडून आली. काम तसे अडून राहिले नाही. सरकारी झाऱ्यामधले शुक्राचार्य ही दूर झाले. बॅसे खेड्याजवळ पहिली स्कूल- बिल्डिंग उभी राहिली आणि जमलेले अनाडी आदिवासी मेडेनेशियन 'आ' वासून पाहत राहिले. त्यांची उपडी पोरे बोटे चोखत विस्फारल्या डोळ्यांनी पाहत होती.

लेफ्टनंट फ्रेड हर्जेशिमरनी त्यांच्या शिक्षणासाठी उरलेले आयुष्य वेचले. कृतज्ञता म्हणून. जणू कृतज्ञतेच्या खुलभर दुधाने त्या मानस-शिवाचा गाभारा भरून ओसंडला होता.

Tags: कथा फ्रेड विदेशी गुलबकावली अरुणश्री Fiction Foreign Stories Arunshri Translated #Weekly Sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके