डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

रोहवे मध्यवर्ती तुरुंगाचे नंबरकरी

तुरुंगाच्या उंच दरवाज्याचे छोटे दार उघडले गेले. समोर केवढे तरी आभाळ पसरले होते. हिरवीगार उंच झाडे गप्प उभी होती. आतल्या कितीतरी जणांना ती कधीच दिसणार नव्हती. हिरमुसल्या, सुन्न मुक्या बनलेल्या मुलाने डोके हालवून झुलपे मागे टाकली आणि त्या दगडी पायऱ्या उतरून धूम ठोकली. त्याला मागे वळून पाहायचे नव्हते!

घंटेचे कर्कश टोल पडले आणि प्रचंड दरवाजा उघडला गेला. रोहवे मध्यवर्ती तुरुंग, सार्जंटने हुकुम दिला: ‘रांग लावा.’ बारा ते सतरा वयातली सगळी पोरे, तुरुंगाचा अंतर्भाग कधी न पाहिलेला. एकामागोमाग एकाला आत घेतले गेले. दरवाजा बंद झाला. ‘खिसे तिथे पालथे करा’, हुकूम आला पटापट जवळचा सारा ऐवज टेबलावर जमा झाला. सार्जंटच्या इशाऱ्यासरशी रांग भिंतीच्या कडेला चिकटली. एक टोल पडला आणि पुढचा दरवाजा उघडला गेला. दंडुक्याच्या खुणावण्याबरोबर रांग आत सरकली. मागे दार खाडकन् लागले. प्रत्येकाची कसून तपासणी झाल्यावर हुकूम आला, ‘कपड़े उतरा.’

कैद्याचे भरड कपड़े अंगावर चढले. गळ्यात नंबराची धातूची प्लेट अडकवण्यात आली. ‘डावी मनगटे पुढे करा.’ हुकुमासरशी प्रत्येकाच्या डाव्या मनगटावर अदृश्य शाईने कोडनंबर लिहिण्यात आला. ‘रजिस्टरला नाव, पत्ता सांगा.’ हुकूम सुटला.

‘शाळेचा पत्ता सांगायचा?’ किंचित कोणी विचारले. उत्तरादाखल, गणवेषातला सार्जंट हलला. पोरासमोर एका इंचावर त्याचा कराल, उग्र चेहरा मिनिटभर उभा झाला, आणि प्रश्न संपले!

तिसऱ्या घंटानादानंतर दरवाजा मागे बंद झाला आणि बधिर झालेल्या पोरांच्या लक्षात आले. हा रोहवे मध्यवर्ती कारागृहाचा अंतर्भाग आहे. त्या बंदिस्त कोठडीत पोरांच्या एकदम लक्षात आले, बाहेरच्या जगापेक्षा ही जागा तोडलेली, वेगळी आहे.

एक सार्जंट समोर येऊन उभा राहिला आणि खेकसून म्हणाला, ‘ऐका, ध्यानात धरा. इथे आमच्या हुकुमाप्रमाणे तुम्ही चालायचे आहे. तुम्ही आता आमच्या ताब्यात आहात. हजर बोला, नंबर- झीरो वन सिक्स...’भीषण शांतता पसरली. क्षणभर कोणाला काही कळलेच नाही. मग पहिल्या पोराला सार्जंटने खडसावून इशारा केला आणि गांगरलेल्या आवाजाने तो म्हणाला, ‘हजर...’

एकापाठोपाठ एक सर्व नंबरकऱ्यांची हजेरी झाली आणि पुढच्या एका खोलीत त्यांना नेण्यात आले. पलीकडच्या कोठड्यांमधल्या कैद्यांच्या किंकाळ्या. विव्हळणी आणि गयावया केल्याचे आवाज स्पष्टपणे ऐकू येऊ लागले. वाचा गेलेली पोरे बधीर शरीराने तेथे अवघडून उभी राहिली. समोरचा दरवाजा उघडला गेला आणि आतल्या भागात उभे असलेले आठदहा भयंकर कैदी पोरांना दिसले. त्यातला एकजण साखळदंड धरलेल्या सार्जंटच्या हुकुमासरशी पुढे आला आणि बोलू लागला. ‘मी नंबर सिक्सओओएट्...लाईफ खुनाबद्दल हयातभर!..सश्रम कारावास.’

रोहवे कारागृहाचा हा प्रयोग, एका कैद्याच्या सूचनेवरून अमलात आला. दोन जन्मठेपेची शिक्षा झालेला रिचर्ड रोवे. त्याने केला नाही असा गुन्हा नव्हता! तुरुंगात थोडा काळ कंठल्यावर त्याला समजले, त्याचा बारा वर्षाचा मुलगा बाहेर हळूहळू तयार होऊ पाहात आहे. खिसेकापूपणापासून आता तो गर्दीतल्या लोकांच्या बॅगा पळवण्यात तरबेज होतो आहे. नेमकी कोणाची बॅग उचलायची ते त्याला कळू लागले आहे. पोरगा आपल्या पावलावर पाऊल ठेवतो काय? रोवे निर्ढावलेला होता पण मेलेला नव्हता. 

आपली वाट कोणत्या नरकाकडे घेऊन जाते, हे तो अनुभवीत होता. पण पोराला अडवायचा कसा? त्याला तुरुंग माहिती करून दिला, तर?... नीट ऐका! कर्कश सिक्सओओटू म्हणाला, ‘मी बोलत असताना एकाने जरी दुसरीकडे पाहिले तरी गर्दन मुर्गाळून टाकीन. इथे मी का आलो, ऐकायचेय?’ 

‘आठव्या वर्षाला मी पाकिटे मारायला लागलो. दहाव्या वर्षी दुकानांत उचलाउचली, बाराव्या वर्षी घरात घुसायला शिकलो! आता मला कॉलर चढली. मी तरबेज व्हायला लागलो, चौदाव्या वर्षी घरफोडीत पंटर लोकही माझ्याकडे बोट दाखवायला लागले. तिथे माझ्यासारखे गाठले, भी त्यांचा पंटरच झालो. एका बँकवाल्याच्या घरात घुसलो.’ क्षणभर थांबून डोळे फिरवून सिक्सओओ पुढे सांगू लागला. ‘घरात कोणी नव्हते. बिनधास्त आत घुसलो. बाहेर एकाला पहाऱ्यावर मी बसवला होता. पण दगा आतूनच झाला. रूम उघडतो तर समोर बँकवाला रिव्हॉल्व्हर रोखून उभा! तो माझ्यापेक्षा चलाख निघाला. गडबडलो आणि मी चूक केली. माझ्याही नकळत त्याचे नरडे आवळले. तो तर मेला, मलाही त्याने संपवले..’

तेवढ्यात त्याला दिलेली मिनिटे संपली. दुसऱ्या कैद्याला पुढे आणण्यात आले. असहाय जखमांच्या खुणांनी भरलेले आवळलेले हात उंचावीत तो बोलला, ‘इथे काय काय चालते त्याचा तुम्हाला कोणाला पत्ताही नाही.’ एका किरकोळ प्रकृतीच्या गोऱ्यापान पोराला खुणावीत तो म्हणाला, ‘तुला इथे डिमांड पुष्कळ कोकेन बिकेन आणायला, चिठ्या चपाट्या पोचवायला तुझा फार उपयोग होईल! इथे येशील तेव्हा तुझा पुरेपूर उपयोग करून घेतला जाईल आणि वर जाऊन रडलास, तर साहेब तुझी बदली एकट्याच्या कोठडीत करतील. बस ठणाठणा करीत. पब्लिक नको ना तुला? वीस तास बंद, दोन तास एक्सरसाइजसाठी खुल्ला...आमच्यात पुन्हा यायची तुझ्यासारख्या छकड्यांची टापच नाही. आलास तर खेळ खतम्!’ आणि तो कैदी त्याच्या अंगावर धावून आला. सार्जंटने खेचले. 

त्या गोऱ्या पोराने भेदरून चक्क हुंदका दिला, तेव्हा तुच्छतेने दात विचकून कैदी ओरडला, ‘रडतोस? हुड! मला तर वाटले. तू चांगला पंटर होणार म्हणून’ रोहवेच्या आपल्यासारख्याच जन्मठेप भोगणाच्या कैद्यांशी रिचर्ड रोवे बोलला. आपल्या पोराबद्दलची चिंता त्याने व्यक्त केली आणि आपल्या पोरांना एकदा ‘आत’ आणून हा अनुभव देण्याची, कैद्यांकडूनच प्रत्यक्ष ऐकविण्याची योजना त्यांनी तयार केली. आपल्या बायकोकरवी ती रोवेने तेथील पोलीस प्रमुख अँथनी ओ ब्रायनना कळविली. ज्युव्हेनाइल जज जॉर्ज निकोला यांनी ती कारागारप्रमुखांना पटवून दिली. तुम्ही पोरांना इथे आणणार असलात, तर मी त्यांना येऊ द्यायला तयार आहे. 

पुढे झेप घेतलेल्या त्या कैद्याला ताबडतोब मागे खेचण्यात आले. पुढच्या कैद्याने खूण करून एका सर्वात कमी वयाच्या मुलाला सांगितले, ‘तू उभा रहा! सगळ्यांना हुकूम सोड- त्यांनी दोन्ही हात, दोन्ही पाय टेकून चालावे. कृती करा.’ भेदरून गेलेल्या त्या मुलाने तसा हुकूम दिला. सर्वांनी तो विनातक्रार मानला. खिजवीत तो कैदी म्हणाला, ‘कसे वाटले?... असे इथे नेहमीच असते बाबांनो.’ एका सार्जंटच्या तोंडापुढे हात उंचावीत बोलला, ‘याची काय हिंमत आहे माझ्यापुढे उभा राहील! पण हा वर्दीमध्ये आहे- मानावे लागते. वर्दीतल्या कोणाचेही ऐकावे लागते.’ त्या सार्जंटच्या हे सगळे ओळखीचे असावे. कंटाळलेल्या परंतु जरबेच्या सुरात त्याने इशारत दिला, ‘ए, चल हट्!’ तो कैदी मागे सरला.... आणखी एक कैदी त्याला बाजूस सारून पुढे आला. त्याच्या हुप्प सुजलेल्या तोंडाकडे पोरांना पाहवत नव्हते. तो काही बोलणार, इतक्यात मागे काही तरी गडबड झाली.

आधीच्या कैद्याच्या अंगावर त्याचे साखळदंड धरून ठेवलेला सार्जंट धावून गेला आणि त्याने त्या कैद्याला खाली पाडले, नाकातोंडावर ठोशांची सरबत्ती केली. त्याला जखडणाऱ्या साखळदंडांनीच त्याला मारहाण केली- एक शब्दही न बोलता. ‘हे काय?’ पोरांचा थरकाप उडाला. परंतु त्यांना बसू देण्यात आले नाही. तुरुंगाधिकारी यांनी पुढे येऊन त्यांना उभे राहण्याचा हुकूम दिला. कोणालाही काही बोलण्याचे सुचत नव्हते. सुन्न होऊन ते सर्वजण आले त्या रांगेने परत फिरले.

मधाच्या कोठडीत आल्यावर त्यांनी अंगावर घातलेले कैद्यांचे पोषाख उतरून देऊन, त्यांना त्यांचे कपडे चढविण्याचा हुकूम मिळाला. काळ्या प्रकाशाचे झोत टाकून त्यांच्या मनगटावरील कोडनंबर्स तुरुंगाच्या रजिस्टरशी ताडून पाहण्यात आले आणि मग रांगेला हुकूम देण्यात आला, ‘चला!’ पुढचे दार उघडले गेले आणि त्याच्या पुढचे उघडण्याआधी तेथील पहारेकऱ्याकडे प्रत्येकाने आपल्या गळ्यातील नंबर काढून देण्याची सूचना झाली.

प्रत्येकाने घामाने ओल्या झालेल्या बोटांनी तो धातूचा तुकडा हातात काढून घेतला. आणि तो मुलगा दचकला. हादरला कावराबावरा झाला. त्याच्या गळ्यात नंबरच नव्हता! नंबर नाहीसा झाला होता. पोराला ब्रह्मांड आठवले. पहारेकऱ्याने त्याला बाजूला घेतला आणि इतर रांग पुढे सोडली. आता तो एकटा, अगदी एकटा इथे अडकला होता! त्याने धडपडून जाऊन आपला कैद्याच्या कपडयांत नंबर गळपटला काय, ते पाहण्यासाठी धाव ठोकली. पण परत वळणे, आपल्या हातातले नाही, इथे काहीच आपल्या हातात नाही हे त्याला समजून चुकले...आता?

निदान तीन तरी तुरुंगाधिकाऱ्यांशी त्याला बोलावे लागले. अखेर शेवटच्या अधिकाऱ्याने त्याला प्रश्न केला, ‘तुझ्याकडून तो नंबर कोणी चोरला असेल असे तुला वाटते काय?’ तसे वाटण्याचे कारण नव्हते. त्याच्या वर्गमित्रांपैकी त्याच्या जवळपास कोण होते? कोण मिस्किली करणार होते? नो. कोणीच नाही.

नंबर सापडल्याशिवाय त्याला बाहेर सोडले जाणार नव्हते. अखेर त्या लालबुंद झालेल्या पोराने सपशेल शरणागती पत्करली तेव्हा एका सार्जंटला तुरुंगाधिकाऱ्यांनी खूण केली. त्याने खिशातून तो नंबर काढून पोरासमोर लटकत धरला! त्याच्या गळ्यातलाच तो नंबर होता आणि त्या सार्जंटलाही पोराने लगेच ओळखले. अंगावर झेपावणाऱ्या त्या कैद्याला मागे खेचणारा तो सार्जंट. निमिषार्धात त्या कैद्याने याच्या गळ्यातला नंबर केव्हा काढून घेतला होता, कोणाच्या ध्यानातही आले नव्हते!

तुरुंगाच्या उंच दरवाज्याचे छोटे दार उघडले गेले. समोर केवढे तरी आभाळ पसरले होते. हिरवीगार उंच झाडे गप्प उभी होती. आतल्या कितीतरी जणांना ती कधीच दिसणार नव्हती. हिरमुसल्या, सुन्न मुक्या बनलेल्या मुलाने डोके हालवून झुलपे मागे टाकली आणि त्या दगडी पायऱ्या उतरून धूम ठोकली. त्याला मागे वळून पाहायचे नव्हते!

(‘रीडर्स डायजेस्ट’ वरून स्वैर)

Tags: गुन्हेगारी रीडर्स डायजेस्ट कच्चे कैदी रोवे कारागृह बालन्याय Criminal Justice Crime Reader’s Digest Unter trial prisoners Rowe Jail Juvenaile Justice weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके