डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

तो साऱ्या घरा-अंगणाचाच विजय ठरला. सकाळ-संध्याकाळ आर्बसला आता तो चाळाच लागला. मरियाही जणू त्याची वाट पाहू लागली. तिची 'हा... हू...' ऐकणे हा आम्हालाही एक विरंगुळा होऊन बसला. दरम्यान आर्बसमध्येही जादूसारखा बदल घडला.

पश्चिमी वारे आले. लाटांवरून तरंगत तो पक्षी बंदरात आला. मेन (अमेरिके)च्या किनाऱ्यावरच्या पोरा- पोरींनी त्याला खाण्याच्या जिनसा पुढे केल्या. तो पक्षी पुढे आला आणि त्याने त्या स्वीकारल्या, खाल्ल्या. भरभर संपविल्या. हा उपाशी-तापाशी, पाण्याचा शोष पडलेला पिसांचा ढिगारा म्हणजे एक हंसी होती आणि तिचा उजवा पंख कापलेला असला, तरी तिची ठेवण खानदानी होती. राजकन्येची होती. लालचुटुक चोच, लांबलचक डौलदार मान आणि हालचालीतली सहज शान. जणू ही कोठेतरी मुकुट विसरून आलेली कोणी राजकन्यकाच होती.

उडता न आल्याने निदान 35 किलोमीटर्स तरी तिने पोहून महासागर पार केला होता. वारा आणि लाटा, जरा निराळ्या असत्या, तर अफाट अटलांटिकमध्ये ती कोठच्या कोठे वाहून गेली असती.

अखेर तिने निपचित पंख जुळविले. पाण्यावर हेलकावे खाणारे बारकुडे पाय जवळ घेतले. शक्ती गोळा केली आणि धडपडत बीचवर ती चढली. लॉबस्टर गोळा करणाऱ्या मार्क बेमिस या मच्छिमार कोळ्याला सुखेनैव स्वतःला पकडू दिले. माझ्या शेजारणीच्या, एलाइनच्या पोल्ट्रीयार्डमध्ये मार्कने तिला सोडले, तेव्हा पंख धडपडून फडफडवीत तिने बाजूच्या, गोड पाण्याच्या सरोवराचा शोध घेतला आणि अडखळत ती तिकडे गेली. तेव्हासुद्धा तिच्या हालचालीत डौल होता तो हजारो वर्षे पाषाणरूपात राहिलेली एखादी अलंकृता रूपशालिनी सजीव व्हावी, असा. त्या गोड्या पाण्याची तिने चव घेतली. तिच्या ते मनास आले. हरकत नाही, असे ठरविल्यासारखे पंख एकवार फडफडवले. मग ती अधिरेपणाने सुखेनैव ते पाणी पिऊ लागली.

काही दिवसांतच तिचे अवसान परत आले. त्या साऱ्या चिमुकल्या बेटाच्या उत्सुकतेचा ती विषय बनली. मार्क म्हणाला, 'तिचे नाव तिच्या लालस ओठांवरून ठेवू या का? चोच किती सुंदर आहे तिची!’

अखेर 'गंधवती’, नाव तिला हौसेने देऊन टाकले- 'मरिया' या अर्थाने. कारण ती वाऱ्याच्या झुळुकेने आली होती. मरियाची पिसे घनदाट, पिंगट काळीशार होती. एक पांढरीशुभ्र पट्टी त्यांच्या मुळाशी होती. मरिया रूळली. आमची झाली. एलाइनच्या मुलांच्या हातून काहीबाही घेऊ लागली. गंमतीची गोष्ट, त्यांना प्रतिसादही देऊ लागली. ओळख दाखवू लागली. परंतु तीसुद्धा आपला आब राखून. जणू तिचा खानदानी मोठेपणा तिला अंगभूतच होता.

‘तुझ्या हातून मात्र मरिया काही घेत नाही!' मी आर्बसला चिडवून मौजेने म्हणाले.

‘तिची मर्जी!' आर्बस तुटकपणे म्हणाला. खरेच, आर्बसने एका हातात ब्रेडचे-एवढेच काय केक्सचे- तुकडे धरले, तरी ते न घेता मरिया शेजारच्या पोराने आपल्या छोट्या हातांनी पुढे केलेल्या ब्रेडकडे वळायची आर्बसने बेफिकिरी दाखवली, तरी त्याच्या मनाला ते लागायचे हे मला समजत होते.

नाही कशाला म्हणू? त्याचा एक सूक्ष्मसा आनंदही मला होत होता. आर्बस माझा पती. आम्ही दोघेही दुसऱ्यांदा विवाहित होतो. नीट विचारपूर्वक पुन्हा विवाह केलेला. भावनेच्या भरात नाही की काही कारणाने कोणीतरी सक्ती केली म्हणून- अशातला भाग नव्हता. आमच्या दोघांवरही, कोणाच्या पूर्वीच्या मोठ्या जबाबदाऱ्यांचे ओझे होते, असेही नव्हते.

आर्बसचे लक्ष दुसरीकडे गेले होते असा प्रकार नव्हता. मुळीच गर्व न करता, वस्तुस्थिती मी सांगेन- माझे मला एक सौंदर्य होतेच- आहेच. जगाने ते मला सांगितले होते. गृहिणी, सखी... सचिव मी कोठेही उणी नव्हते, आणि तरीसुद्धा आर्बसचे मन इथे नव्हते. लॉब्सर्सची शिकार करणाऱ्या या बलदंड माणसाला कोठेतरी शिस्तच लागायला हवी होती आणि ती मरिया लावीत होती. तिच्या बेफिकिरीने, तुच्छतेने आर्वस् नकळत दुखावला जात होता आणि म्हणून मला नाही म्हटले तरी हसू फुटत होते.

आर्बस हट्टाला पेटत होता. मी दिलेल्या निरोपाला कोरडेपणाने उत्तर देणारा आर्बस कामावर जाता- येताना आवर्जून शेजाऱ्यांच्या जलाशयापाशी थबकू लागला. आपल्या ब्रेडमधले तुकडे, दाणे हातात घोळवू लागला. मरियाची भुकेची वेळ साधून तिच्या पुढे पुढे करू लागला.

मरिया जवळ येई. डौलदार मान उंचावून आणखी पुढे येई! लालट डोळ्यांनी आर्बसला न्याहाळी. त्याच्या हातातील पदार्थांकडे नजर टाकी आणि मान वेळावून पंखाचे एक रेखीव वर्तुळ पाण्यावर उमटवून मागे वळे!

‘तिला नको तर जाऊ दे ना उड़त!' मी आर्बसला म्हणाले, 'तुला गरज काय पडली तिची एवढी आर्जवे करायची?’ परंतु आर्बसने मुळीच मानले नाही. मरियाचे त्याला आता वेडच लागले. हिला आपला लळा का लागू नये? हा जणू त्याने ध्यासच घेतला. शेजारपाजारची पोरे, मी असे आम्ही सगळे जसे काही एका बाजूला आणि आर्बस दुसऱ्या असे काही सुरू झाले. घरात त्याचा सारा थंडा कारभारच होता. मीही त्याला सरावले होते.

आणि एक दिवस ते घडले. कामावर जाताना स्वारी मोठ्याने ओरडली, तेव्हा मी धावत गेले. 'व्हॉट्स इट?' इलाइनही घरातून बाहेर येत विचारू लागली.

आर्वसचा विजय झाला होता. मरियाने शरणागती पत्करली होती. आर्बसच्या हातून पहिल्या प्रथमच मरियाने काही स्वीकारले होते. एका अबोध ओढीने आर्बस माझ्याकडे वळला. त्याच्या डोळ्यात विजय नाचत होता. 'तुला पहायचेय्?' लहान मुलाच्या उत्सुकतेने, एखादे खेळणे त्या पोराने मिरवावे, तसा त्याने पुन्हा काहीतरी हातात धरले आणि मरियापुढे केले. क्षणार्धात मरिया पुढे झेपावली झडप घालून तिने ते आपल्या राजेशाही चोचीने उचलले आणि 'हा...हू...' असा गोड साद घालीत मागे वळली.

मी टाळ्या पिटल्या. आर्बसचा विजय म्हणजे माझाही विजय नव्हता का? तो साऱ्या घरा-अंगणाचाच विजय ठरला. सकाळ-संध्याकाळ आर्बसला आता तो चाळाच लागला. मरियाही जणू त्याची वाट पाहू लागली. तिची 'हा... हू...' ऐकणे हा आम्हालाही एक विरंगुळा होऊन बसला. दरम्यान आर्बसमध्येही जादूसारखा बदल घडला.

घरधनी आर्बस घरात आला. घराशिवाय त्याला करमेनासे झाले. त्याच्या वृत्ती जणू बहरून आल्या. आनंदकल्लोळांनी आम्ही गजबजून गेलो.

एलिनॉय धावत आली. 'अगं!' मला सांगू लागली, 'मरिया नाहीशी झाली आहे!' जलाशयातून उडून, वाऱ्यावर स्वार होऊन मरिया आली होती तशी अटलांटिकमध्ये केव्हातरी अदृश्य झाली होती. मला धक्काच बसला. सारे घरदार हतबुद्ध, विजेने चाटावे तसे गप्प गप्प होऊन गेले.

‘आणि अगं, तुला सांगायलाच हवे!' एलिनॉय चुटपुटत, हळहळत म्हणाली, 'कालच रात्री आयझलबरोहून, 50 किलोमीटरवरच्या त्या बेटावरून एक फोन कॉल आला. ती बाई- वयस्कर असावी. म्हणाली, 'आम्ही ऑस्ट्रेलियन हंसांची एक जोडी पाळली होती. तुमच्याकडे नव्याने एक हंसी आल्याचे कळाले म्हणून फोन केला. त्या जोडीतला नर कोणाशी तरी लढून मरून गेला. उरली ती मादी.

तिच्यासाठी आम्ही अनेक जोडीदार आणून पाहिले. परंतु ती पहिल्याशी इतकी एकनिष्ठ असावी की त्यांच्याकडे तिने ढुंकुनही पाहिले नाही. आपली वेदना घेऊनच ती मुकी बनलेली हंसी कोठे नाहीशी झाली, कळलेही नाही. तुमच्याकडे आली असल्यास तिला जपावे हे सांगण्यासाठी फोन करून त्रास दिला. क्षमा करा!

मी ओंजळीत माझे मुख लपविले. त्या व्यथित हंसीची नजर मला सारखी दिसू लागली. माझा पती तिने मला मिळवून दिला होता. तिला मी तिचा कोठून देणार होते?

(‘रीडर्स डायजेस्ट' वरून स्वैर)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके