डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

एका ऑपरेशन मध्ये या शहाण्या मंडळींनी दोन प्रदेशांचे कल्याण साधले आहे. गोनोरेझूच्या अभयारण्याला खरोखरीचे अभयही दिले आणि या वनक्षेत्राला वैभव-जीवनाचे. 'हत्तींचा नाश आणि हस्तीदंत- विक्रीला चंगळवादी परवानगी-' अशा हावऱ्या व्यापारी जीवनपद्धतीला चोख उत्तरही दिले आहे या जिगरबाजांनी!

हा छोट्या आता फारच बंड होत चालला! अंगाशी धिंगामस्ती करणाऱ्या त्या आपल्या लडिवाळ बाळाला त्या हत्तिणीने सोंडेने पलीकडे केला आणि सोंड उंचावीत रानाचा वास हुंगला. सोंड वेळावून पुनः श्वास घेतला. - तिला काहीतरी शंका आली. नक्कीच काहीतरी वेगळे घडत होते! सभोवताली आपले हे आफ्रिकन जंगल दाटले आहे. आपला विशाल वंशविस्तार सुखाने नांदतो आहे. नर, आपल्या सख्या, विहरत आहेत. बाळे दुडदुडत आहेत. मोठी पोरे घावपळ करीत आहेत छोट्या अजून आपल्या अंगाअंगाशी झटतो आहे. या सगळ्या चित्राला एक गंध आहे! परंतु आता या ओळखीच्या, मातकट वासात आणखी एक निराळी छटा येऊन मिसळते आहे ती कोणती असावी? हत्तिणीने कसकसून पुनः वास घेतला.

प्रत्येक वस्तूला, प्रत्येक गोष्टीला एक वास असतो. स्वातंत्र्याला, आनंदाचा वास, बंधनाला. उदासीचा गंध, दुःखाचा वास. या मोकळ्या अवकाशात येऊन मिसळू पाहणारी ही नवी गंधाची छटा दुःखाची तर नाही? हत्तिणीने आकाशाच्या दिशेने एक उंच ललकारी दिली. परंतु तिला वास बरोबर आला होता. ते संकटच होते. छोट्या आकाराचे एक पांढरे विमान, पोलादी माशीसारखे जवळजवळ आले. कॉकपिटच्या दाराशी एक बुटकीसरशी व्यक्ती येऊन उभी राहिली. तिने बंदुकीचा नीट नेम धरला आणि ट्रिगर खेचला. पण साऱ्या  रानाला दचकवून सोडणारा आवाज काही झाला नाही! जीवघेण्या गोळीचा तो मृत्यूचा नाच मुळीच नव्हता. 

डॉक्टरच्या समजूतदार शस्त्रासारखी ती अ‍ॅल्युमिनियमची सिरींज हत्तीणीच्या शरीरात शिरली. कपाळावर हेलिकॉप्टरच्या आवाजाचा परिणाम होणार होताच. काही हत्ती कान विस्फारून त्याच्याकडे पाहात राहिले. काहींनी शुंडा उंचावीत आव्हानाच्या ललकाऱ्या ठोकल्या. काहींनी धूम ठोकल्यासारखे केले! पण अगदीच निरुपद्रवी किरकोळ पक्षी आहे, हे त्यांनाही ठाऊक होते. भिरभिऱ्यासारखे घरघरत ते बिचारे विमान आभाळात चढले आणि खाली पुनः सगळे शांत होत गेले. विमानाचा हिशोब बरोबर होता. जराशाने ते पुनः खाली आले. यावेळी दुसऱ्या एका हत्तीच्या खांयावर सिरींज आघात केला. शरीरात ते गुंगी आणणारे औषध टोचले जाताच काही क्षणातच ते हत्ती आडवे होत गेले, शेवटचा शॉट मारल्यानंतर दहा मिनिटांतच तो सगळा कळप जमिनीवर गुंग होऊन पडला. 

काही मिनिटे त्या महाकाय हत्तींच्या घोरण्याचा आवाज येत राहिला. तेवढ्यात झुडपांतून, नखशिखान्त संरक्षक पोषाख केलेले वीस जवान गार्ड उड्या घेतच येऊन उतरले. धूळमातीने चिखलाने माखलेली एक सॅन्डरोव्हर येऊन उभी राहिली आणि तिच्यातून दोर साखळ्या, रोलर बसवलेले बोर्ड वगैरे साहित्य बाहेर काढण्यात आले. या सर्वांच्या मध्यभागी एक छोटी पण उत्साही आकृती सतत हलते आहे. मुळीच उसंत न घेता क्लेम कोएट्सी सूचना देत आहेत. एका बेसावध हत्तीची सोंड काळजीपूर्वक उचलली. तिच्यात शिरलेले वाळूचे कण काढून टाकले - तो नकळत गुदमरून जाऊ नये म्हणून. आणि ती सोंड हलकेच खाली ठेवून ते पुढे निघाले. दुखून ट्रक्सचा आवाज आला. मोठे थोरले स्टीलचे कंटेनर्स त्यांच्या चॅसीवर बसविलेले आहेत. हत्तींची गणना केली जाते. त्यांची मोजमापे नोंदली जातात.

पांढऱ्या रंगाने नंबर देण्यात येतात. प्रत्येकाच्या दुखापतीची आणि जखमांची काळजीपूर्वक पाहणी आणि तिच्यावर मलमपट्टी झाल्यावर तो हत्ती मोठया मॅट्सवर, तेथून रोलिंग बोर्डवर आणि कंटेनरमध्ये ठेवण्यात येती. ते एक छोटे पिलोदा मात्र फारच 'बंडोबा' आहेत! ते मुळीच ऐकत नाहीत. पण अखेर त्यांनाही काबूत आणले जाते. त्याच्या, झोपेत असलेल्या मातो्रीजवळ ठेवले जाते. गुंगीच्या औषधावर उतारा म्हणून दुसरे एक इंजेक्शन प्रत्येकाला टोचण्यात येते, कंटेनरची दारे बंद होतात. बोलट लागतात आणि मग या गजराजांचा प्रवास सुरू होतो- दक्षिण झिंबाब्येमधल्या त्यांच्या नव्या निवासांकडे… या बिल क्षण मोहिमेचे नाव होते ऑपरेशन एल टॅक्यूएशन, आणि तिची कल्पना होती सुविख्यात प्राणितज्ञ क्लेम कोएट्सची यांची. वन्य जीवांची काळजी घेणाऱ्या एका ब्रिटिश पर्यावरण संस्थेने त्यांना आर्थिक मदत दिली होती. 

पहिल्यांदाच क्लेमनी आणि त्यांच्या तज्ज्ञ जिगरबाजांनी दाखवून दिले होते की, संबंध हत्तीच्या कुटुंबांचा काफिला इकडून तिकडे, त्यांना कोणतीही इजा न करता नेणे शक्य आहे! हत्तीचे स्थलांतर? ते कसे शक्य होणार होते? कशासाठी? त्यांनी झिंबाब्येच्या गोनोरेझू राष्ट्रीय उद्यानातल्या हत्तींनी भयंकर दुष्काळामुळे जबर थैमान मांडायला सुरुवात केली होती. खाण्याच्या शोधात त्यांनी सर्वत्र विध्वंस सुरू केला होता आणि त्याच्या परिणामी इतर वन्यजीवांचा विनाश ओढवला होता. या हत्तीचे करायचे काय? त्यांची संख्या एकतर एक सहस्राने कमी करायला हवी होती, आणि त्यांचे कळपच्या कळप ठार करण्यावाचून काहीही इलाज नव्हता प्राणितज्ज्ञ, पर्यावरणप्रेमी, सर्वानी हे मान्य केले होते - परंतु त्याला एक पर्याय होता. त्यामध्ये कल्पकता हवी होती, साहस-जिगर हवी होती! गोनोरेझू राष्ट्रीय उद्यानापासून 320 कि.मी.पेक्षा कमी अंतरावर उत्तरेला साव व्हॅलीचे वनक्षेत्र विस्तीर्ण आडवेतिडवे पसरले होते.

सुमारे 4 लाख हेक्टरचा हा वनप्रदेश खाजगी मालकांना देण्यात आला होता. जनावरांसाठी चराऊ क्षेत्र म्हणून त्यांनी त्याच्यावर आपल्या वाड्या, वस्त्या थाटल्या होत्या. त्यांनी तीस वर्षांपूर्वी येथले वनजीवन पार साफ करून टाकले होते सर्व तऱ्हेच्या उपायांनी हत्ती, वाघ, जिराफ वगैरे वन्य प्राण्यांना पळवून तरी लावले होते. नाहीतर त्यांची सरसकट हत्या करण्यात आली होती. परंतु झाले होते भलतेच. दुष्काळ आला आणि या श्रीमंत मंडळीची गायीगुरेच त्याने गिळून टाकली. जमीन कोरडी होत गेली. आभाळाने डोळे वटारले, जनावरांच्या मांसाच्या किंमती कोसळल्या आणि मालकांच्या तोंडचे पाणी पळाले. 

साव राखीव वनक्षेत्राचे मालकलोक टेकीला आले. अशा आणीबाणीच्या क्षणी क्लाईव्ह स्टॉक हिलची स्वारी हजर झाली. भरड अर्धी विचार ढगळ सदरा आणि जंगी गवती टोपी अशा गवाळ्या अवतारातला हा माणूस म्हणे हत्तींचे कळप इथे आणणार होता, थोडक्यात म्हणजे पर्यावरणाचे चक्र अडकले होते त्याला गती मिळवून देणार होता. आणखी अवघड गोष्ट म्हणजे या सगळ्या खाजगी वनमालकांना एकत्र आणण्याच्या गोष्टी करीत होता! स्टॉकहिल जाणून होता की छोट्या प्राण्यांचे स्थलांतर तसे सोपे होते. महाकाय हत्तींचे काय? त्यात पुन्हा त्यांचे कुटुंब मातृसत्ताक असते. त्यांचा कुटुंबप्रमुख असतो आई, हा! हत्तींच्या कुटुंबात कर्ती धर्ती असते ती आई. पितृदेवांनी बहुतेक 'मम म्हणा- हाताला हात लावा' म्हटले की 'मम' म्हणायचे असते, पत्नीच्या शब्दाबाहेर जायचे नसते. 

म्हणजे पहिली काळजी हत्तिणींची घ्यायला हवी; तिचा गोतावळा- पोरेबाळे, कुटुंब काफिला नीट राखायला हवा! यांची आबाळ केली, तर ते वन कसले? आयुष्य हवे, त्यात गाणे हवे! स्टॉकहिल साहेबांनी बिल जॉर्डनकडे धाव घेतली. ब्रिटिश पर्यावरण, जीवरक्षा संघटनेचे ते मुख्य, त्यांचा तर प्राणिहत्येला कडवा विरोध. त्यांनी मिळून क्लेम कोएट्ट्सींना गायले. तिघांनी कंबर कसली. क्लेमचा तरणाबांड पोरगा हिक्स (विकास!) हेलिकॉप्टरचा पायलट म्हणून उभा राहिला. मदतनीस म्हणून अनेक तज्ज्ञांनी या बिल क्षण मोहिमेत वर्णी लावली. विद्यार्थी, तंत्रज्ञ, प्राणितज्ज्ञ, या कामात सहभागी होण्यास उत्सुक होते. 

नाताळ विद्यापीठाचा गवतशास्त्राचा, प्रगत प्राणिशास्त्राचा विद्यार्थी रिचर्ड सॉवरी डोळे मिचकावून म्हणाला, माझा अभ्यास वर्गाच्या खोलीत होणार होय? हे अफाट जंगल आणि गवताळ प्रदेश- याच्याइतकी माहिती मिळणार कोठून?' पायी फिरणे, हाही मोहिमेचा महत्वाचा भाग असे. मोहिमेत एकदा एका महाकाय, सुळेवाल्या हत्तीने क्लेमवर हल्ला चढविला. क्लेमनी आपल्या गुंगीवाल्या सिरींजचा  नेम धरला, पण ते थांबले, कारण बहुधा पहिला हल्ला हत्ती करतो तो नकली असतो. ‘भ्या' दाखविण्यापुरता असतो. हे राजेश्री सरळ चालून आले आणि क्लेमनी शेवटच्या क्षणी ‘फायर' केले, औषधाचा परिणाम ताबडतोब झाला. पुढे झेपावलेल्या त्या हत्तीचा झोक गेला, एका ओंडक्यावरून महाशय घसरले आणि धूम ठोकलेल्या क्लेमचा जीव वाचला. पंधरा मिनिटांनी सावधगिरी बाळगत, चाहूल घेत, क्लेम परत आले, तेव्हा गजराजांची स्वारी घोरण्यात मशगुल झाली होती.

ट्रक्सवरले ते प्रचंड कंटेनर्स वनक्षेत्रात येतात. द्वारे उघडून हत्तींना बाहेर सोडून देण्यात येते. आरंभी ते कंटेनर्स सोडायलाच नाखूष असतात. हा काय उद्योग या माणसांनी मांडला आहे, असा सूर असतो! पण लवकरच त्यांच्या लक्षात येते- इथे तसा उपद्रव काही दिसत नाही समोर लांबवर विस्तीर्ण जंगलच आहे. मोकळा प्रदेश दिसतो. गवताचे उंच तुरे डोलताना दिसतात. उतरायला हरकत दिसत नाही! एका ऑपरेशन मध्ये या शहाण्या मंडळींनी दोन प्रदेशांचे कल्याण साधले आहे. गोनोरेझूच्या अभयारण्याला खरोखरीचे अभयही दिले आणि या वनक्षेत्राला वैभव-जीवनाचे. 'हत्तींचा नाश आणि हस्तीदंत- विक्रीला चंगळवादी परवानगी-' अशा हावऱ्या व्यापारी जीवनपद्धतीला चोख उत्तरही दिले आहे या जिगरबाजांनी! सारे वनक्षेत्र, वाहू उभारून तुमच्या स्वागताला उत्सुक आहे गजराजांनो. यावे, आपले ऐश्वर्यसंपन्न पाय हलकेच या भूमीवर टेकवावे. हुंगावा येथल्या गवताचा, जीवनाचा वास. कसकसून चाखावा येथल्या मातीचा गंध. येथले अन्नोदक स्वीकारावे. भरून टाकावे वातावरण आपल्या मुक्त आनंद ललकान्यांनी. आम्हाला आपले म्हणावे. हे गजराजांनो, आमची जीवने समृद्ध करावी!

Tags: बिल जॉर्डन  स्टॉकहिल रिचर्ड सॉवरी ब्रिटीश क्लेम कोएट्स  झिंबाब्ये अरुणश्री Bill Jorden Stockhill Richard Sowry British Claim coits Zimbabwe Arunshri weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके