डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

जेनिफरपाशी उत्तर नव्हतेच, पण मला मुख्य राग येत होता तो तिच्या बिनधास्त अविर्भावाचा. ती मुळीच दिलगीर नव्हती. उलट एका प्रकारे माझ्या रागापासून काहीतरी संरक्षण असावे, असेच ती वागत होती डिश-वॉशिंग, डस्टिंग अशी बारीकसारीक कामे करण्यासाठी ठेवलेली जेनिफर.

'जेनिफर! जरा उभी रहा!'

मी आवाज शक्य तेवढा कडक करीत म्हणालो. जेनिफर उभी राहिली.

‘मी तुझ्या पगारातून पैसे कापणार आहे!’ माझ्या धमकीला वजन आणण्यासाठी मी शेवटचे शब्द मी पुन्हा उच्चारले: ‘येस् आय अ‍ॅम! का आली नाही दोन दिवस? आणि तेही न सांगता?

जेनिफरपाशी उत्तर नव्हतेच, पण मला मुख्य राग येत होता तो तिच्या बिनधास्त अविर्भावाचा. ती मुळीच दिलगीर नव्हती. उलट एका प्रकारे माझ्या रागापासून काहीतरी संरक्षण असावे, असेच ती वागत होती डिश-वॉशिंग, डस्टिंग अशी बारीकसारीक कामे करण्यासाठी ठेवलेली जेनिफर. ती अशी निर्धास्त कशी? पुन्हा काहीही कारण न देता दोन दिवस आलेली नसताना?

अमेरिकेत येऊन मला सहा महिने झाले होते. आमचे सुख आम्हालाच ठाऊक! स्कॉलरशिपने येण्याची सोय केली होती. भाकरी मिळाली होती, मिठाची मिळकत करता करता नाकी दम येऊ लागला होता. पैशाचा पूर वाहत असलेल्या या सोन्याच्या नगरीत मी नर्मदेतल्या गोट्यासारखा कोरडा राहिलो होतो. खाजगी ट्युशन्सचा शिकविण्याचा चमत्कारिक उद्योग करीत होतो. बेबी-सिटींग सारखा तास-दोन तास या धनाढ्य लोकांची पोरे सांभाळण्याचा उद्योग करणारे लोकही आम्ही ‘आ’ करावा इतका बक्कळ पैका जोडीत होते आणि मी इथून गेलेला ‘स्कॉलर’ मनुष्य, माझ्या हातावरचीच धनरेषा इतकी तुटक आणि आखूड कशी, याचे आश्चर्य करीत राहिलो होतो. या संपन्न देशात येवूनही कसाबसा पोटापुरते मिळवू लागलो, तर उपयोग काय?

तशात आमच्या कामवाल्या जेनिफरने कामाला लागताच मला संकटात टाकले होते. आमचे शेजारी डॉसन. त्यांच्या बायकोच्या ओळखीने माझ्या पत्नीने ही कामवाली पटकावली होती. जेनिफर कामाला चांगली होती. कामसू होती. मनापासून काम करणारी होती. प्रयत्न करूनही तिच्या कामात मला दोष काढता येत नव्हता. तिच्या कामावर माझी बायकोही नाराज नसावी. कारण काही दिवसांत तिने जेनिफरच्या वतीने मागणी केली, “जेनिफरच्या मॅगीसाठी तुम्ही थोडा वेळ काढणार का?”

मॅगी एक दोनदा तिच्या ‘मम्मी’ बरोबर आली होती.

दुसऱ्या तिसऱ्या स्टॅंडर्ड मधली पोरगी तिच्या कामाचा मला अंदाज आलाच. ‘काय आहे तिचे म्हणणे?’ मी विचारले.

‘एखादा तास भर तुम्ही तिला शिकवावे! त्या बिचारीला बाहेर कुठे परवडणार आहे?’

भले! म्हणजे आमच्याकडे येण्याचे कारण हे होते - बाहेर परवडत नाही म्हणून. मी एकदम संतापलो, ‘मुळीच जमणार नाही!’ हिला सांगून टाकले.

‘जेनिफरला स्पष्ट सांग- मला वेळ नाही म्हणून.’

‘ती तुमच्याकडे काम करते,’ हिने सौम्यपणे रदबदली करून पाहिली. मी आणखी चिडलो, ‘उपकार करते की काय?’ आणि तुही लक्षात ठेव- आपण डॉलर देतो तिला. उगीच आपले काम नाही करित ती-‘

(खरे म्हणजे काय, आमच्या पियर्सन साहेबांचा काल आलेला राग मीआता तिच्यावर काढला होता शिकवणीचे पैसे त्यांच्याकडून मिळवताना मला फार जिकिर करावी लागली होती.) उगीच, फुकट वेळ घालवणे मला मुळीच परवडणार नव्हते!

जेनिफरने पुन्हा तो विषय काढला नाही. ऋतू बदलले. आमचे यार्ड झाडांच्या गळालेल्या पानांनी झाकून गेले जेनिफरने विक-एन्डला ते काम संपवण्याचे आश्वासन दिले आणि ज्या डॉसनबाईंच्या मध्यस्थीने ती आमच्याकडे कामाला आली होती, त्या मिसेस डॉसनचे आणि आमच्या बायकोचे काहीतरी बिनसले. आमच्या वरच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या ‘इंडियन करी’- आमटी कशी करतात ते सतरा वेळा येऊन विचारणाऱ्या डोरोथी डॉसनबाई फुरंगटून बसल्या आणि आमच्या पत्नीनेही ती डोरोथी फार नटवी असल्याचे ठरवून टाकून बोलणे भाषण बंद केले. यावर माझे काहीच नव्हते, पण माझी झोप उडाली ती शेजारणीच्या या भांडणाच्या परिणामाने! दुसऱ्याच दिवशी सगळ्या डिशेस, भांडी साफ करताना बायकोला पाहिले आणि मी विचारले, ‘हे काय जेनिफर नाही आज?’

‘कोण जाणे!’ तीही त्रासली होती बरं?’ डॉसनबाईंकडे?’

‘त्यांच्याकडे सकाळी येऊन गेली म्हणून म्हणाला त्यांचा वेली मला. कसलं पोरगं ते- धड बोलेल तर शपथ. आईच्याच वळणावर गेलेलं-

असेल काही कारण, म्हणून मी दुर्लक्ष केले आणि असे दोन दिवस गेल्यावर मला हिने सांगितले; ‘जेनिफरला गाठले आज मी जिन्यात.’

‘काही गरज नाही!’ मी सात्विक रागाने हिला म्हटले, ‘नसले यायचे तिला, तर तू कशाला पाणी लावायला गेलीस विचारायला? ध्यानात ठेव; शी

हॅज टू रिपोर्ट. –मग? काय म्हणाली ती?’

‘बोलली नाही काही वर बोट दाखवलं तिने फक्त!’

अर्थ माझ्या लक्षात आला. डॉसनबाईने तिला आमच्याकडे जाऊ नको म्हणून सांगितले होते आणि तिने ती आज्ञा शिरसावंद्य मानून आमच्या कामाला बुट्टी मारली होती.

म्हणजे हा बरा न्याय होता. काम आमचे. पैसे देणार मी. आणि हुकमत मात्र त्या नटव्या डॉसनबाईची! मी परिस्थितीचा नीट विचार केला.
जेनिफरचे काम चांगले असेल, तरी मी, माझी पत्नी काय वाईट मालक होतो की काय? तिच्या किरकोळ सुट्ट्यांचे आम्ही कधी मनावर घेतले होते काय? काढायचे नाही, पण तिच्या जवळजवळ रोजच्या चहा-ड्रिंकचा खाण्यापिण्याचा आम्ही कधी हिशोब ठेवला होता? काय तिला टिप म्हणा, बक्षिसी म्हणा, देताना आम्ही कधी हात आखडता घेतला होता? आमचा कोणता पाहुणा तिला काही न देता गेला होता? आणि याची खुद्द जेनिफरलाही जाणीव होती.

छे, माझे चुकत होते! आमच्या मवाळीचा तिने भलताच अर्थ लावला होता. मी एकदम ठरवून टाकले. आता तिला एकदा जाणीवही द्यायलाच हवी! आणि तशी ती मी जेनिफर ला दिलीच. तिसऱ्या दिवशी जशी गेली होती तशी ती कामाला येऊन हजर होताच मी  माझ्या आवाजात शक्य तेवढे धार आणीत तिला बजावून टाकले. आणि ते खरेच होते! माझ्या घरच्या डिशेस भांडी घासून टाकणे मला मुळीच जड नव्हते. केर काढण्याचे काम मी तेव्हाच करून टाकले असते. प्रश्न या पाने झाडण्याचा होता, पण तेही काम कोणाकडून तासांच्या बोलीवर करून घेतले असते. मला जेनिफरची मुळीच गरज नव्हती!

माझ्या बायकोने मला समजावण्याचा प्रयत्न केला पण मी आज ठरवून टाकले होते; आम्हाला कोणी सुखासुखी पैसे देतोय काय? ते काही नाही- कळूच देत या जेनिफरला एकदा. खाऊ देत आमची ‘इंडियन’ बोलणी!

जेनिफरने खालच्या मानेने ऐकून घेतले. भांडी माझी मी साफ करीन- हे तिला बजावले, तेव्हा मात्र तिचा चेहरा पडला. तिने तोंड वेडेवाकडे केले, तेव्हा माझे उसने अवसान संपले. मी तिच्याकडे पाठ फिरवली आणि माझे कामाचे कागद हाती घेतले.

क्षणभर शांतता पसरली आणि माझ्या बायकोने कांकणे वाजवून जेनिफरला मूकपणेच निरोप दिला.

- राग ओसरला, तेव्हा मला अचानक धाकधुक वाटू लागली आणि मग नेहमीची भीती समोर उभी राहिली-उद्या जेनिफर येणार की नाही? तसा मी काही फार बोललो नाही तिला. आणि इतपतसुद्धा आम्ही बोलायचे नाही की काय? मी मलाच धीर दिला; मी ‘पेमास्टर’ आहे तिचा. कधी बोलणारच नाही की काय? आणि ती चुकल्यावर?

दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र नेहमीप्रमाणे भांडी घासण्याचा, स्क्रबरचा, नळ सोडल्याचा आवाज आला तेव्हा मला हायसे वाटले. 

‘आली वाटतं' मी पत्नीला खुणेने विचारले.

‘मॅगी!’ तिने पापण्या लववून हलक्या आवाजाने म्हटले आणि मी धक्का बसल्यासारखा उभा राहिलो. काही न कळून हतबुद्ध स्वरात म्हटले, ‘मॅगी? जेनिफरची मुलगी?’

पत्नीने खुणेनेच होय म्हटले आणि मी आत किचनकडे कान दिला. होय, मॅगीचा नवखा दबकता हात मला जाणवला. तिची चोरट्या सारखी हालचाल जाणवली. जणू तिचा काहीतरी गुन्हा होता. तिचेच काही चुकले होते—

मला एकदम आठवण झाली. या पोरीची शिकवणी उडवून लावली होती! पुन्हा शब्दाने विचारले नव्हते! तिची कोवळी बोटे, माझ्या डिशेस घासत होती—

‘हे बघ!’ बायकोच्या अंगावर ओरडून मी सांगितले, ‘त्या मॅगी ला सांग; तिचे पाटीदप्तर घेऊन संध्याकाळी सहा वाजता ये म्हणावं. शिकवणार आहे मी तिला— आज पासून आणि भांडी राहू देत म्हणावं— तू टाक घासून. नाही तर मला आहे पुष्कळ वेळ.’

(टेलीकम्यून वरून)

Tags: जेनिफर कामवाली भारतीय अमेरिका परदेश Telecommune Jenifer House Made Indian America Foreign Country weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके