डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कष्टकऱ्यांना माणूसपण बहाल करण्याचा प्रयत्न!

महाराष्ट्र फौडेशनने यंदा पुण्यातील कागद-काच-पत्रा कष्टकरी संघटनेला तीन लाख रुपयांचा पुरस्कार दिला आहे. आम्हांला याचा अतिशय आनंद होत आहे. या संघटनेचा हा परिचय...

रस्त्यावर, घाणीत पडलेला कागद काच-पत्रा-प्लॅस्टिक वेचून त्यावर पोट भरणाऱ्यांची संख्या पुण्यासारख्या शहरात फार मोठी आहे. दुष्काळाच्या खाईत सापडलेली खेड्यांतली काही मंडळी शहरात पोट भरण्यासाठी म्हणून येतात. शहरात आल्यानंतर कोणताच रोजगार जेव्हा मिळत नाही तेव्हा हे लोक घाणीत पड़लेले प्लॅस्टिक, पत्रा, कचरा कुंड्या उकरून मिळणारे कागद काचा गोळा करून त्यावर आपला उदरनिर्वाह चालवतात. परंतु त्यांना चोर ठरवून पोलीस ताब्यात घेतात. वास्तविक पाहता हे लोक शहरी भागाचे आरोग्य अबाधित राखण्याचे मोलाचे काम करतात, हे आपल्याला मोहन ननावरे आणि त्यांच्या संघटनेने दाखवून दिले आहे. ते सांगतात, 'पुणे शहरात दररोज एक हजार टन कचरा निर्माण होतो. त्यापैकी 80 टन कागद, 60 टन प्लॅस्टिक, 60 टन काच आणि 30 टन धातू असा 230 टन कोरडा कचरा असतो. हा सर्व कचरा कागद-काच-पत्रा वेचणारे लोक उचलतात. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागावरील कामाचा ताण कमी होतोच पण शहर स्वच्छ व्हायलाही मदत होते. आठ ते दहा हजार लोक आज पुणे शहरात या कचऱ्यावर जगतात. मोहन ननावरे यांनी कागद-काच-पत्रा वेचणा्ऱ्याच्या प्रश्नात लक्ष घातले. 

डॉ. बाबा आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या लोकांची एक मोठी परिषद 1993 मध्ये आयोजित केली. त्याच परिषदेत काच-कागद-पत्रा कष्टकरी पंचायत या संघटनेची स्थापना करण्यात आली. आज या संघटनेचे ननावरे अध्यक्ष आहेत. कागद-काच-पत्रा वेचणाऱ्यांमध्ये 6 ते 12 वयोगटातील मुलांचे प्रमाण मोठे आहे. मुलांना शाळेत पाठवण्याऐवजी त्यांनी दिवसभर कागद-काच-पत्रा वेचला तर 10-12 रुपये मिळतात, असा विचार करून आई-वडील मुलांना आपल्याबरोबर घेऊन जातात. परंतु प्रत्यक्षात मुलांकडून एवढी कमाई होत नाही. एकतर भंगार घेणारे दलाल मुलांचे मोठ्या प्रमाणात शोषण करतात. वजन काट्यात मारतात. त्यामुळे 15 रुपयांच्या भंगाराचे मुलांना 10-12 रुपये मिळतात. त्यांतले अर्धे पैसे मुले स्वतःकडे ठेवतात. मग त्या पैशांतून विडया, माणिकचंद जर्दा अशा वस्तू घेतात. त्यातून वाईट नाद जडतो आणि मुले व्यसनी बनतात. या मुलांना शिक्षण दिले पाहिजे. त्यांचा शिक्षणाचा हक्क त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न ननावरे गेली दोन-तीन वर्षे करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे. 

जन्मदाखल्याचे कारण दाखवून अनेक शाळांनी या मुलांना प्रवेश नाकारला. पण ननावरे यांनी संघर्ष करून ससून रुग्णालयात जन्मदाखल्यासाठी एक वेगळा कक्ष सुरू करायला प्रशासनाला भाग पाडले आज अनेक मुले शाळेत जात आहेत. दर वर्षी 100 ते 150 मुले नव्याने प्रवेश घेतात. त्यामुळे कागद-काच- पत्रा वेचणाऱ्या मुलांचे प्रमाण कमी होत आहे. आरोग्याच्या दृष्टीने हे काम हानिकारक आहे शिवाय ते श्रासाचेही आहे. दिवसाकाठी 15 ते 30 रुपये या कामातून मिळतात. पण त्यासाठी 15 ते 20 किलोमीटर फिरावे लागते. शिवाय 10 ते 12 तास घाणीत रहावे लागते. काही जणांनी काही कचराकुंड्याच ताब्यात घेतल्या आहेत. तिथे त्यांच्याशिवाय दुसरा कोणी आला तर भांडणे होतात. म्हणून काही जण पहाटे 4 वाजताच घराबाहेर पडतात. अशांना काही वेळा पोलीस कोठडीतही जावे लागते. केवळ पोलीसच त्यांना त्रास देतात असे नाही. 

काही गावगुंडही हे काम करणाऱ्या महिलांची छेड काढण्यापासून अतिप्रसंग करण्यापर्यंत मजल मारतात. अशा वेळीही ननावरे आणि त्यांची संघटना या महिलांच्या मदतीला धावून जाते. कागद-काच-पत्रा- प्लॅस्टिक-धातू या भंगारांचा व्यवसाय मोठा आहे. दिवसात 3 ते 4 लाखांची उलाढाल यात होते. यापेक्षाही अधिक कमाई मधले दलाल करतात. तेव्हा या दलालांना जो काही नफा होतो तोही याच लोकांना मिळाला पाहिजे. यासाठी मोहन ननावरे यांनी काही भंगार दुकाने सहकारी तत्त्वावर सुरू करण्याचा प्रयत्न चालवला आहे. या प्रयत्नांना पिंपरी-चिंचवड पालिकेच्या मदतीमुळे यशही आले आहे. पालिका एका उड्डाण पुलाखालची मोकळी जागा या संघटनेला देणार आहे. ननावरे आणि त्यांचे सहकारी यांच्या प्रयत्नाने या कष्टकऱ्यांची स्थिती सुधारण्याच्या मार्गावर आहे.

Tags:  पिंपरी-चिंचवड डॉ. बाबा आढाव मोहन ननावरे अरुणश्री Pinpari Chinchawad Dr. Baba Adhav Mohan Nanaware Arunashri weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके