डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

तर भारत-पाकिस्तान महाशक्ती होतील

‘शांती आणि लोकशाहीकरता पाकिस्तान आणि भारतीय जनमंच’ या नावाने काम करणाऱ्या ध्येयवादी संस्थेच्या कार्याने आता छोट्या चळवळीचे रूप प्राप्त केले आहे. या मंचाचे चौथे अधिवेशन अलीकडेच पेशावर येथे झाले. शस्त्रास्त्र स्पर्धेवरील खर्च टाळून परस्पर-सामंजस्य व लोककल्याण यांवर भर दिल्यास भारत आणि पाकिस्तान महाशक्ती म्हणून उदयाला येतील असा विश्वास या अधिवेशनात व्यक्त करण्यात आला. या परिषदेत सहभागी झालेल्या श्री. अरविंद आडारकर यांचा लेख. महात्मा गांधींच्या स्मृतीला ३० जानेवारीनिमित्त अभिवादन करताना तो अधिकच अर्थपूर्ण आहे.

----------

अर्शदच्या एका मित्राने आम्हांला घरी जेवणासाठी बोलावण्याचा प्रस्ताव आईकडे आणि बायकोकडे मांडला. आई मुळची भारतातील. ती म्हणाली, ‘माझा काहीच मसला नाही पण ते आपल्याकडे जेवतील का हे त्यांना विचार’ आमचा पण काहीच मसला नव्हता. जेवणाचा प्रचंड थाट होता. एक आठ आणि एक दहा वर्षाचा अशी दोन मुलं त्याला होती. त्यांनी आमचा ताबाच घेतला. असंख्य प्रश्न विचारले. मला विचारलं, ‘तुम्ही हिंदू का?’ मी म्हटलं, ‘हो, का?’ ‘तुम्ही तर पपांपेक्षा काही वेगळे दिसत नाहीत. पपा मुसलमान आहेत.’या मुलांचे पपा माझ्यासारखे जीन्स, शर्ट आणि जॅकेट वापरणारे होते.

‘शांती आणि लोकशाहीकरिता पाकिस्तान आणि भारतीय जनमंच’ अशा लांबलचक नावाची संस्था काही ‘वेडया’ लोकांनी गेली चार-पाच वर्षे राबवली आहे. भारतात कुलदीप नय्यर, रजनी कोठारी, अॅडमिरल रामदास, सुहासिनी मुळ्ये, तपन बोस तर पाकिस्तानात मुबाशीर हसन, रेहमान, हमीद खान इत्यादी मान्यवरांची प्रेरणा या मंचामागे आहे. मैत्रीच्या भावनेने भारलेल्या या चळवळीने आता मूळ धरलं आहे असं म्हणायला हरकत नसावी. कारण 21-22 नोव्हेंबरला पाकिस्तानात पेशावरमध्ये या मंचाचे चौथे एकत्रित अधिवेशन पार पडले. भारतातून 161 प्रतिनिधींनी हजेरी लावली होती. 300 ते 350 भारतीय आणि पाकिस्तानी लोकांच्या उपस्थितीत हे अधिवेशन उत्स्फूर्तपणे पार पडलं. सद्भावना आणि मैत्रीचा आवेग तसंच आदरातिथ्य यापुढे भारतीय प्रतिनिधी पार दडपून गेल्याचे जाणवलं. एका विशिष्ट ध्येयामुळे एकत्र आलेल्या या मंडळींतला आदरभाव आणि प्रेम पदोपदी जाणवत होतं. 

पाकिस्तानी प्रवेशद्वाराकडे पोहोचलो. पुढच्या दहा मिनिटांतच इमिग्रेशन आणि कस्टमचे सोपस्कार पुरे झाले. कस्टममधून बाहेर पडलो त्या वेळेस एका टेबलावर पुढील प्रवासाची आणि हॉटेलमध्ये करण्यात आलेल्या व्यवस्थेची माहिती दिली जात होती. ‘मी. मुबाशीर हसन, वेलकम टु पाकिस्तान.’ सत्तरीतील एका व्यक्तीने हात मिळवला. प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची ही व्यक्ती समोर येताच मी क्षणभर अवाक् झालो. ज्यांच्याबद्दल आतापर्यंत इतकं सारं ऐकत आलो असं आदरणीय व्यक्तिमत्त्व अवचित समोर. आपल्याकडच्या एस एम जोशींची आठवण होत राहावी अशीच सौजन्यमूर्ती. असंच तेवत राहणार शांत, ओजस्वी व्यक्तिमत्त्व. पाकिस्तानच्या पीपल्स पार्टीची स्थापना मुबाशीर हसन यांच्या घरी झाल्याचे सांगितले जातं. भुत्तोच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्रिपद त्यांनी भूषवलं, पण राजकारणात ते रमल्याचे दिसत नाही. मात्र त्यांचा दबदबा पाकिस्तानात सर्वदूर पसरला आहे. पुढील तीन दिवसांत ते सतत सावलीसारखे आजूबाजूला होते. अडचणी पहाडासारखे झेलत होते, दूर करत होते. त्यांचा त्रासलेला चेहरा चुकूनसुद्धा पाहायला मिळाला नाही. 

द्रुतगती महामार्ग 

मंडळी स्थानापन्न झाल्यावर बसेसनी लाहोरकडे प्रयाण केले. लाहोर शहराचा काही भाग फिरून बस मोटार-वेला लागली. आम्ही प्रथम मोटर-वेने इस्लामाबादपर्यंत आणि नंतर हायवेने पेशावरला जाणार होतो. बस मोटार वेला लागली आणि सर्वच मंडळी आश्चर्यचकित झाली. हा मोटार-वे सही सही अमेरिकेतील मोटार-वेची नक्कल, असा मोटार वे भारतात अजून बांधला गेला नाही. पाकिस्तानने भारतावर कुरघोडी केली. रस्त्यावर कोणत्याही प्रकारचं क्रॉसिंग नाही, दोन्ही बाजूला पूर्ण रस्त्यालगत तारेचं कुंपण (याचाच खर्च केवढा असेल!). त्यामुळे मनुष्यप्राणी अथवा जनावर पायी फिरत नाही. कोणत्याही प्रकारचा अडथळा नाही. ताशी 120 कि. मी. वेगाने आमची बस सुसाट चाललेली. रस्त्याचा पृष्ठभाग खाचखळगेरहित. मुंबई ते पुणे एवढं 180 कि. मी. अंतर बसने या मोटार वेवर 2 तासांत पार केलं.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे बांधला जातोय, त्याधी आठवण झाली. 180 कि.मी. अंतराच्या या एक्स्प्रेस-वेसाठी 1500 कोटी रुपये खर्ची पडणार आहेत. तर या 350 कि.मी. लांबीच्या मोटार-वेसाठी किती खर्च झाला असेल? कोरियन कंपनीने अल्पावधीतच या मोटार-वेची बांधणी केली. क्रॉसिंग नसल्यामुळे या मोटार-वेवर अनेक पूल बांधले गेले आहेत. ठराविक अंतरावर प्रसाधनगृह, उपाहारगृहं, गाड्यांसाठी दुरुस्तीच्या सोयी तसंच नमाजासाठी मशिदींची व्यवस्था आहे. किती खर्च आला असेल? किती गावं विस्थापित झाली असतील? त्यांच्या पुनर्वसनाचं काय झालं असेल? (मेधा पाटकरांनी दिलेला धडा पाकिस्तानात पण आठवला.) साधारणपणे 7000 ते 8000 कोटी रुपये तर सहजच. मन अस्वस्थ झालं. पाकिस्तानात नंतर फिरताना विषय सहजच मोटार वेकडे वळायचा, पण नवाज शरीफांच्या या मेगा प्रोजेक्टबद्दल अनेकांनी नाकं मुरडली. पण एका बावीस वर्षीय तरुण शिक्षिकेने मात्र अट्टहासाने समर्थन केलं. तिच्या मते राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा महामार्ग अत्यावश्यक आहे.

इतरांच्या अनेक तक्रारी होत्या. पैशाची उधळपट्टी, ट्रॅफिकच नसणं, विस्थापन, नैसर्गिक समतोल बिघडणं. उदा. : पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवला गेल्यामुळे एका बाजूला पाण्याची पातळी वाढली आणि त्यामुळे खारजमिनीचं प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. तर दुसऱ्या बाजूला पाण्याचा पुरवठा कमी होईल, झाडझाडोरा आणि पक्षी तसंच वन्यजीवनावर परिणाम घडून येईल असं वर्तवलं जातं. प्रवासाचा उल्लेख करायचा झाला तर या मोटार-वेवरील प्रवासाने एक अनुभव नक्कीच दिला, एक नवीन परिमाण दिलं.

21 तारखेला बसेसच्या ताफ्यातून भारतीय प्रतिनिधी निश्तार हॉलवर पोहोचले. गजबज, लगबग या सर्वांतून वाहणारा प्रचंड उत्साह जाणवत होता. पाकिस्तानी प्रतिनिधींबरोबर ओळखी करून घेतल्या गेल्या. हॉलमध्ये सुमारे 350 प्रतिनिधी असावेत. व्यासपीठावर भारताचे माजी नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल रामदास, पाकिस्तान चॅप्टरचे रहमान उपस्थित होते. पेशावरमधील एक खासदार लतीफ आफ्रिडी यांनी स्वागताचे भाषण केलं. नर्म विनोद, टोमणे यांची चौफेर टोलेबाजी करत त्यांनी टाळ्या घेतल्या. अ‍ॅडमिरल रामदास यांचं छोटेखानी भाषण सर्वांची मनं जिंकून गेलं. भारतीय आणि पाकिस्तानी जनतेतील सामंजस्य वाढवणं आणि सरकारवर त्यासाठी दबाव आणण्यासाठी फोरम प्रयत्नशील आहे. आणि यापुढे दुगुण्या उत्साहाने कार्यरत राहील अशी ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली. रेहमान तर उत्कृष्ट वक्ते आहेत. त्यांच्या संभाषणचातुर्याचा अनुभव अगोदरच आला होता. उपस्थितांचा प्रतिसाद एवढा प्रचंड होता की सतत टाळ्यांचा कडकडाट होत होता. 

काश्मीरविषयक चर्चेला भारत-पाक प्रतिनिधींनी जास्तीत जास्त हजेरी लावणं यात आश्चर्य काहीच नाही. भारत आणि पाकिस्तानमध्ये आज असलेल्या तणावाचे प्रमुख कारण काश्मीरच आहे. आणि काश्मीर प्रश्नाची उकल त्वरित व्हावी, असा आग्रह प्रत्येकाचाच होता. चर्चेची सूत्र डॉ. मुबाशीर हसन आणि तपन बोस यांच्याकडे होती. हा मामला गुंतागुंतीचा आहे हे खरंच. या प्रश्नावर तीन युद्ध लढली गेली. दोन्हीकडच्या जनतेला अनन्वित हाल अपेष्टांना तोंड द्यावं लागलं. काश्मीरच्या दोन्ही भागांतील लोकांच्या भावनांचा आदर व्हावा आणि केवळ प्रादेशिक तंट्याचं मूळ म्हणून काश्मीरकडे पाहू नये, अशा प्रकारच्या भावना प्रतिनिधींनी व्यक्त केल्या. कोणत्याही परिस्थितीत या प्रश्नावर लष्करी बळाचा वापर न करता सामोपचाराने आणि लोकशाही पद्धतीने हा प्रश्न सोडवावा यावर एकमत झालं. सध्याची लाइन ऑफ कंट्रोल सीमा मानून हा प्रश्न निकालात काढण्यात यावा असा एक विचारप्रवाह जाणवत होता. पण यावर एकमत मात्र झालं नाही.

अण्वस्त्र उन्मादाचा निषेध

निर्लष्करीकरण आणि शांतता यांवरील चर्चासत्रात मी भाग घेतला. डॉ. इक्बाल अहमद आणि सुशील खन्ना यांनी सूत्रसंचालन केलं. माजी नौदलप्रमुख रामदास, अब्दुल नय्यर, संजय चतुर्वेदी, नकबी, शर्मा, जोशी, सुमीत चक्रवर्ती, आनंद पटवर्धन यांचा सहभाग या चर्चासत्रात होता डॉ. इक्बाल अहमद यांचे या विषयावर प्रभुत्व आहे. त्यांनी या विषयाची उत्कृष्ट मांडणी केल्यामुळे चर्चेला रंग भरला. नौदलप्रमुख रामदास यांनी अत्यंत खुबीदारपणे ‘धाकासाठी अण्वस्त्र’ या कल्पनेचा फोलपणा विशद केला. याबाबत झालेल्या ठरावामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होता.

अण्वस्त्रमुक्त जग या कल्पनेवर दृढ विश्वास व्यक्त करून, दोन्ही देशांच्या अणुचाचण्यांवर टीका करून दोन्ही देशांत निर्माण झालेल्या उन्मादाचा निषेध केला गेला. दोन्ही देशांनी अण्वस्त्रस्पर्धेतून त्वरित बाहेर पडावं, राष्ट्रीय सन्मान, अस्मिता यांबद्दल भ्रामक कल्पना उराशी बाळगू नयेत. एकमेकांवर अण्वस्र रोखू नयेत. इतर अस्रंदेखील हलवावीत. सीटीवीटीचा अवलंब करावा, असं आवाहन या ठरावात केले आहे. किंबहुना हा सर्व प्रचंड खर्च टाळून लोककल्याणाकरिता खर्च केल्यास भारत आणि पाकिस्तान ही राष्ट्र महाशक्ती म्हणून उदयास येतील असा फोरमचा विश्वास आहे. (जपान आणि जर्मनी या राष्ट्रांचं उदाहरण बहुधा डोळ्यांसमोर असावं.)

पाहुणचार

लाहोरमध्ये चार दिवसांचा मुक्काम होता. अनेकांना भेटण्याचा योग आला. रस्त्यावर, ठेल्यात, धाब्यावर, लोकांच्या निवासस्थानी जिथे जिथे शक्य होतं तिथे लोकांच्या प्रतिक्रिया आजमावल्या. काही ठिकाणी असा सल्ला दिला गेला की, तुम्ही हिंदुस्थानमधून आला आहात असे सांगू नका. पण हा सल्ला मी मानला नाही. लोकांच्या प्रतिक्रिया नाही तर कशा मिळणार? मला कुठेही कटू अनुभव आला नाही. 

वजीरखाँ मशिदीत एक वयस्क गृहस्थ भेटले. ते तिथे 26 वर्ष आहेत. आजान देणं, प्रार्थना करवणं अशी कामं ते करतात असं त्यांनी सांगितलं. अर्शदच्या मते तो इमाम होता. तू इंडियन आहेस असं सांगू नकोस, असा प्रेमळ सल्ला मला मिळाला. पण बाण तर अगोदरच सुटला होता. या इमामाने मला फिरवून कुठच्या भागाचं नूतनीकरण झाले होतं, कुठचा भाग तोफगोळ्याने उद्ध्वस्त झाला होता अशी माहिती दिली. नंतर त्याने जाऊन संध्याकाळच्या प्रार्थनेचं नेतृत्व केलं आणि प्रार्थना संपल्यावर मुख्य दरवाज्यापर्यंत येऊन निरोप दिला. ‘तुम्ही उशिरा आलात. नाहीतर मी तुम्हांला मिनारात वर नेऊन आजूबाजूचं लाहोर दाखवलं असतं. पुन्हा या’, असं म्हणाला. 

अर्शदच्या एका मित्राने आम्हांला घरी जेवणासाठी बोलावण्याचा प्रस्ताव आईकडे आणि बायकोकडे मांडला. आई मूळची भारतातली. ती म्हणाली, ‘माझा काहीच मसला नाही पण ते आपल्याकडे जेवतील का हे त्यांना विचार.’ आमचा पण काहीच मसला नव्हता. जेवणाचा प्रचंड थाट होता. एक आठ आणि एक दहा वर्षांचा अशी दोन मुलं त्याला होती. त्यांनी आमचा ताबाच घेतला. असंख्य प्रश्न विचारले. मला विचारलं,‘तुम्ही हिंदू का?’ मी म्हटलं, ‘हो, का?’ ‘तुम्ही तर पपांपेक्षा काही वेगळे दिसत नाहीत. पपा मुसलमान आहेत.’ या मुलांचे पपा माझ्यासारखे जीन्स, शर्ट आणि जॅकेट वापरणारे होते. 

लाहोरला शालामार गार्डनमध्ये फिरून दमल्यावर विश्रांती घेत बाजूला बसलो असता एक तरुण आणि त्याची पत्नी माझ्याकडे आली. त्या तरुणाने मला मी आर्टिस्ट आहे का आणि इंडियातून आलोय का असं विचारलं. तो पण आर्किटेक्टच होता. त्याच्या तीन बहिणी इतरत्र फिरत होत्या. त्या आल्या. हळूहळू आमच्याभोवती पंधरा-वीस शाळकरी आणि तरुण-तरुणींचा गराडा पडला. बागेतून बाहेर पडल्यानंतर काही अंतरापर्यंत या घोळक्याने साथ केली. हात हलवून निरोप दिला. घरी जेवायला चलाचा आग्रह स्वीकारणं शक्यच नव्हतं. अनेकदा हा अनुभव आला. छोट्याशा बातचितीनंतर घरी जेवायला चला असा आग्रह धरून ही मंडळी गळी पडत. त्यांना नाकारणं फार कठीण होत असे. एका ठेल्यावर मुश्ताक अहमदने खायला घातल्याचे पैसे स्वीकारणं नाकारलं. मुंबईला भेट देणं ही त्याची एकमेव ‘ख्वाहिश’ आहे. पण मला व्हिसाच मिळत नाही अशी तक्रार त्याने मांडली. 

कराचीमध्ये भेटलेला टॅक्सीवाला तर अविस्मरणीय होता. 1963 सालचा जन्म असलेल्या या टॅक्सीवाल्याने आम्हाला कराचीभर हिंडवलं. त्याने दाखवलेली कराची अन्यथा पाहणं अशक्य होतं. त्याचे वडील दिल्लीतून आलेले. भारतातून आलेल्या निर्वासितांना ‘मोहाजीर’ म्हणतात आणि बांगलादेशातून आलेल्यांना ‘डबल मोहाजीर’ म्हणतात अशी माहिती त्याने दिली. एका मोठ्या स्टोअरमध्ये खरेदीला गेलो होतो. तिथल्या तरुण व्यापाऱ्याने आदरातिथ्य करून निघताना मिठी मारून एक प्रेझेंट हातात ठेवलं. माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

जैन-बाबरी चौक

हे सर्व विस्ताराने सांगायचा उद्देश एवढाच की पाकिस्तानमधील तरुणपिढी भारतद्वेषावर पोसली आहे; भारतातून तिथे गेलेले आता जवळजवळ संपल्यामुळे भारताबद्दलची जुनी ओढ नाहीशी झाली असून तिची जागा तरुणपिढीच्या भारत-विद्वेषाने घेतली आहे असा एक समज करून दिला जातो. पण या समजाला पुष्टी यावी असं काही आढळलं नाही हे आग्रहाने नमूद करावंसं वाटतं. 

बाबरी मशिदीच्या विध्वंसाच्या पार्श्वभूमीवर तिथल्या तिखट प्रतिक्रिया अपेक्षित होत्या. पण कराचीतील टॅक्सीवाल्याच्या मते हा जनप्रक्षोभ तीव्र नव्हता. आपण काहीतरी केलं पाहिजे इथपर्यंतच ती प्रतिक्रिया होती. सरकारने कराचीत मंदिरांना चोख संरक्षण दिलं असं तो सांगत होता. लाहोरमध्ये बसमधून एकीकडे उतरताना कंडक्टर त्या जागेचं नाव ‘जैन-बाबरी चौक, जैन-बाबरी चौक’ असं ओरडत होता. चौकशी केली तेव्हा असं कळलं की, तिथे एक जैन मंदिर होतं. बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतरची प्रतिक्रिया म्हणून ते पाडलं गेलं. तेव्हापासून त्या चौकाचं नाव जैन-बाबरी चौक असं घेतलं जातं. बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर जनमानसाला झालेल्या जखमा हळूहळू भरल्या जात असाव्यात असं वाटायला जागा आहे. पण त्याचे व्रण कधीच पुसले जाणार नाहीत असं मात्र वाटत राहिलं. 

लालकृष्ण अडवाणींचा जन्म लाहोरचा. सत्तासोपान तर त्यांनी गाठला आहे. एक वेडी आशा अशी वाटते की, यापुढे रामरथयात्रेऐवजी प्रेमरथयात्रा अडवाणीजींच्या नेतृत्वाखाली लवाच्या प्रदेशाकडे लाहोरकडे निघेल. त्यांचं प्रचंड स्वागत होईल. बर्लिनच्या भिंतीसारख्या मतभेदाच्या आणि धर्मांधतेच्या भिंती कोसळतील आणि दोन्ही देश खऱ्या अर्थाने जवळ येतील. तालिबानसारखं धर्मांध राष्ट्र आपल्या सीमेवर निर्माण होऊन कायमची कटकट होणं टाळायचं असेल तर भारताने अवश्य पुढाकार घेऊन संबंध सुधारावेत असं मला वाटतं.

Tags: बाबरी लोकशाही पाकिस्तान भारत अरविंद आडारकर Babari Democracy Pakisthan India Arvind Adarkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके