डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मला दिसलेलं बांगलादेशी कथाचित्र

बांगलादेशला भेट देण्याचा माझा उद्देश तेथील कथाकारांना भेटणं व कथासृष्टीशी परिचय करून घेणं हाच होता. ढाक्याच्या मुक्कामात मला काही कवी, कादंबरीकार, समीक्षक प्रकाशक इ. भेटले आणि बांगलादेशच्या साहित्याची स्थूलपणे ओळख झाली. माझा ओढा होता अर्थात् कथेकडे. तेथील कथाकारांचे लेखन व जीवन, स्वप्न व खंत हे सारं जाणून घ्यायचं होतं.

बांगलादेशला भेट देण्याचा माझा उद्देश तेथील कथाकारांना भेटणं व कथासृष्टीशी परिचय करून घेणं हाच होता. ढाक्याच्या मुक्कामात मला काही कवी, कादंबरीकार, समीक्षक प्रकाशक इ. भेटले आणि बांगलादेशच्या साहित्याची स्थूलपणे ओळख झाली. माझा ओढा होता अर्थात् कथेकडे. तेथील कथाकारांचे लेखन व जीवन, स्वप्न व खंत हे सारं जाणून घ्यायचं होतं. कथालेखकांशी संवाद करायचा होता. स्नेह साधायचा होता. बांगला भाषा अवगत नसताना आणि बांगला देशात फार काळ थांबणं अशक्य असताना हे कसं काय साचेल याची शंकाच होती. पण तिथे जाण्यापूर्वी माझ्या अपेक्षा मी तेथील सलीना हुसेन या लेखिकेस कळविल्या होत्या. सलीना हुसेन या आघाडीच्या कथाकार तर आहेतच पण बांगला अकादमीत डेप्युटी डायरेक्टर या महत्त्वाच्या दुधावर आहेत. अकादमीत साहित्य चळवळी एकवटलेल्या आहेत. साहित्यिकांचा राबता आहे. सलीना हुसेन यांनी मी येताच माझ्या साहित्यिकांशी ओळखी करून दिल्या, ग्रंथालय-वाचनालय माझ्यासाठी उघडं ठेवले, मला हव्या त्या सुविधा दिल्या, त्यामुळे बांगलादेशी कथेबद्दल मला बरंच काही समजू तमजू शकले. त्या नवजात देशातील कथेचं चित्र डोळ्यांपुढे आणता आलं.

राजाशाही विश्वविद्यालयात तत्वज्ञानाचे प्राध्यापक असलेले हसन अझीझल हक् आणि ढाक्याच्या गुलशन भागातील मंडुवारी 'त राहाणारे सय्यद शमसुल हक हे दोन 'हक्' लेखक, बुध्दधर्मींय सुद्रत बारूआ व पत्रकार राहत खान, तरूण, महत्त्वाचे कथाकार रशीद हैदर सलिना हुसेन आणि भारतीय संस्कृती व साहित्य यावर पोसलेले वयोवृध्द शौकत उस्मान अशा सात-आठ कथाकारांशी मुलाखती झाल्या मनातलं मनसोक्त बोलता आलं. त्यांच्या काही कथांची इंग्रजी रूपान्तरं याचता आली. हे कथासप्तर्षी चांगल्य देशच्या कवेचं प्रतिनिधित्व करतात हेही लक्षात आले. शितावरून माताची परीक्षा तांदुळवाल्या बांगला देशच्या साहित्य स्थितीबद्दल करायला हरकत नाही. या सात कथाकारांच्या स्नेहाचं इंद्रधनुष्य मला तेथील कथाकारांच्या लेखनाचं व जीवनाचं दर्शन देऊन गेलं.

एकूण बांगलादेशी साहित्यिकांप्रमाणे कथालेखकही मुक्तलढ्यातील रोमहर्षक प्रसंग, ग्रामीण जनतेची लूट व नद्यानाल्यावर अवलंबून असलेलं जीवन या तीन मुख्य विषयांत गुरफटून गेलेले आहेत. कथाकार कदाचित अधिकच. कारण त्यांना पाकिस्तानी सैन्याच्या क्रौर्याच्या व मुक्तिवाहिनीच्या शौर्याच्या घटना सर्वाधिक ज्ञात आहेत. बंगबंधूंपासून ते साध्या विद्यार्थीपर्यंतची झालेली हत्या व भाषिक चळवळीतले रोमहर्षक प्रसंग ह्या गोष्टी कथा रचायला, रंगवायला व वाचकप्रिय करायला सहज हाताशी येतात हे समजलं आहे. मी (इंग्रजीतून ) सुमारे पन्नासेक बांगलादेशी कथा वाचल्या, त्यात प्रामुख्याने हाच सूर हेच सूत्र होतं.

हे सात कथाकार साधं, सरळ आयुष्य व्यतित करताना दिसले. पाकिस्तानी कथालेखकांत सुजलेली श्रीमंती व दाखवायची खानदानी दिसली.होती. तशी बांगलादेशी लेखकांत आढळली नाही. हे लेखक मध्यमवर्गीय होते. सलीनाकडे, तिचा नवरा 'विमान’ कंपनीचा मोठा अधिकारी म्हणून असेल, जरा श्रीमंती आढळली. बंगलेवजा घर, रंगीत टी. व्ही. नोकरनोकराणी पण रशीदची पत्नी शिक्षिका, अझीझल हक् मोठे प्राध्यापक पण दोघांकडे साधी राहणी दिसली.

पाकिस्तानात मला भेटलेले लेखक फाळणीमुळे अस्वस्थ बरेचसे भ्रांतचित झालेले वाटले. मायदेशाबद्दल काळजी, भारताबद्दलचा कळवळा... बांगलादेशी लेखक पाकिस्तानशी फारकत घेतल्यामुळे समाधानी झालेले दिसले. त्यांनाही मायदेशाबद्दल वेगळ्या प्रकारची काळजी आणि भारताबद्दल आदर-पाकिस्तानी कथाकारांप्रमाणे, किंबहुना अधिकच बांगलादेशी कथाकार धर्मवेड सोडलेले व समाजवादाची ओढ असलेले होते. निदान मला भेटलेले त्या दोन देशांतील कथालेखक तरी!

बंगाली साहित्यास हजारो वर्षाचा इतिहास आहे. आधुनिक बांगला कथा (गस्प) अवतरून शतक संपलेलं आहे. 

कथेचे माध्यम रवीन्द्रनाथ ठाकूरांच्या हाती आलं आणि त्यांनी त्यांचं सुवर्ण केलं. मागोमाग विभूतिभूषण बंदोपाध्याय, ताराशंकर बुद्धदेव बसु प्रेमानंद मित्र, माणिक बंदोपाध्याय- एकेक रथीमहारथी बंगाली कथा सकस समृद्ध करून गेले. शरदबाबूंच्या थोड्याच कथा, पण किती दर्जेदार. तीच गोष्ट प्रमथनाथ बिशी व मनोज दास यांची. 

देशाच्या विभाजनाबरोबर बंगालही दुभंगला बहुतेक मुसलमान लेखक पूर्व पाकिस्तानात गेले. उरलेल्या कथा-लेखकांत बिमल मित्र, विमल कार,समरेश बसू, रमापद चौधरी, प्रेमेंद्र मिश्र, मती नंदी, संदीपन चटर्जी, सुनील गांगुली, मणिशंकर मुखोपाध्याय (शंकर) अशी नवकथाकारांची नवरत्नमालिका झळकू लागली. 

ही बंगाली कथा प्रयोगशील, बंडखोर, तशीच मूल्यविवेकनिष्ठ व भावविवश आहे.

बंगाली लेखक पूर्व बंगालच्या पार्श्वभूमीवर पूर्वी लेखन करीत होतेच. देशविभाजनानंतर बंगाली (हिंदू) लेखकांची पूर्व बंगालची ओढ आटणं मारणं अशक्य होतं. त्यांच्या कथालेखनात पूर्व बंगालच्या मातीची व माणसांची रेखाटणे येत राहिलीच.

पण फाळणीमुळे संदर्भ बदलले. मातीच्या जातीच्या सीमारेषा साहित्यिकांच्यापुढे स्पष्ट करण्यात आल्या. हिंदू लेखक व मुसलमान लेखक हे वेगळे दाखविण्यात येऊ लागले.

फाळणीपूर्वीचे बंगाली मुसलमान कथाकार म्हणजे इज्राहिमलान, अबुल मन्सूर अहमद, शौकत उस्मान, सैय्यद वालिउल्ला अबु जफर शमसुद्दीन, अबु रइद, सरदार झैनुद्दीन आणि शमसुद्दीन अबुल कलम. यांच्या कथा कादंबऱ्या कलकत्याहून प्रकाशित होत असत. त्या वाचकांच्या पसंतीस येत असत. समीक्षांची मान्यता मिळवीत होत्या.

हे व अन्य मुसलमान लेखक फाळणीनंतर ढाक्याला आले. काही चितगाव, मैमनसिंग, सिल्हेट येथे गेले. पण ढाका हेच राजधानीबरोबर साहित्य-संस्कृतीचं केंद्र बनलं. वर उल्लेखिलेले लेखक नव्या वातावरणात नवा पवित्रा घेऊन लेखनकामासाठी करू लागले. काहींनी कादंबरीकार म्हणून कीर्ती मिळविली. शौकत उस्मान, अबु जाफर शमसुद्दीन, सैय्यद वालिउल्ला हे तिघं कादंबरीइतकंच कथालेखनातही नाव कमावू लागले.

शौकत उस्मान 1917 साडी हुगळीला जन्मले. कलकत्याच्या कॉलेजात प्राध्यापक असतानाच लेखन प्रसिद्ध करू लागले, कथा, कादंबरी, नाटक, समीक्षा, बालवाकाय-चौफेर लेखन. पूर्व पाकिस्तानात ते आघाडीचे साहित्यिक गणले जात. आजवर त्याचे सात कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांतील अनेक कथा उर्दू, इंग्रजी, मलेशियन, चिनी, रशियन भाषांतून अनुवादित झालेल्या आहेत. त्यांनी परदेशचे दौरे केले आहेत व भारतभेटीही दिल्या आहेत. बांगला देशात सध्या उस्मान निवृत्त जीवन जगत आहेत. बांगलादेशी कथाकारांत श्रेष्ठ, आदरणीय गणले जात आहेत. 

अबु जाफर शमसुद्दीन तसे शौकत उस्मानहून वयाने मोठे, पंचाहत्तरी पार केलेले,पेशाने पत्रकार व मूळ ढाक्याचेच. यांच्या कथा पूर्वी कलकत्याहून व लाहोरहून प्रकाशित झालेल्या आहेत. आफ्रो-आशियन बुक फ्रुअच्या संग्रहात त्यांची कथा समाविष्ट आहे. 'जीवन' हा त्यांचा पहिला संग्रह 1948 साली तर ‘लेंगरी’ संग्रह गेल्या साली प्रसिद्ध झाला. नाट्यपूर्ण कथानक, व्यक्तीचित्रणावर मर आणि प्रचलित समस्यांचं भान ही शमसुद्दीन यांच्या कथेची प्रधान लक्षण.

सैय्यद वालिउल्लांची पण साठी उलटलेली होती. त्यांचा जन्म पण पूर्व बंगाल सिल्हेटचा. वालिउल्ला प्रथम कलत्याच्या 'स्टेटसमन' मध्ये होते. मृत्युसमयी ते पारीसला होते. मानवी मनाची गुंतागुंत उकलण्याचा सैय्यद वालिउल्लांच्या कथांतून प्रयत्न असतो.

या तीन जेष्ठ व श्रेष्ठ कलाकारांव्यतिरिक्त साठी उलटलेले आणिक तीन कथालेखक म्हणजे मिर्झा अब्दुल हाय, शाहिद अली आणि शमसुद्दीन अबुल कलम वालिउल्ला, शौकत उस्मान यांच्याप्रमाणे हे तिघेही अखंड हिंदुस्थानात जन्मले. पूर्व पाकिस्तानात प्रसिद्ध झाले. बांगलादेशात आदरणीय ठरले. मिर्झा अब्दुल हाय डेप्युटी मॅजिस्ट्रेट होते, शमसुद्दीन अबुल कलम नभोवाणी संचालक होते तर शाहिद अली पार्लमेंटचे सभासद होते. मिर्झोच्या कथेत मरणासंबंधी चिंतन दिसते. शाहीदच्या कथेत भाषेचा फुलोरा व तंत्राची नक्षी आढळते. शमसुद्दीनच्या कथेत प्रणयाची स्वप्नं व प्रखर वास्तव आलटून पालटून येत.

देशाची फाळणी झाली तेव्हा तारुण्यात पर्दापण करणाऱ्या बांगलादेशची निर्मिती झाली तेव्हा आयुष्याची उभारी सरलेल्या या कथाकारांच्या आणिक काही वाचावयास मिळाल्या असल्या, तर त्यांच्या लेखनातील अनुभवांच्या व आविष्कारांच्या बदलत्या छटांचा अभ्यास करता आला असता. हिंदुस्थान ते (पूर्व) पाकिस्तान ते बांगलादेश हा प्रवास कथाकराने कसा केला असेल हे कळालं असतं.

आज पन्नाशीला पोचलेले, म्हणजे पाकिस्तान निर्मितीचे वेळी किशोरावस्थेत कथाकार म्हणजे अलाउद्दीन अल् आझाद, सईद आणि बहाउद्दीन जहांगीर से सहाही कथाकार रामनगर- ढाका, तंगेल ढाका, बारीसाल, दिनाजपुर, रंगपूर व कौमिला अशा पूर्व बंगालमधल्या गावी जन्मलेले आहेत. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये जन्मलेले व फाळणीमुळे इकडे आलेले असे लेखक आता आढळत नाहीत. मुसलमानसुद्धा. 

अलाउद्दीन अल् आसाद लंडन युनिव्हर्सिटीची पीएच. डी. मिळवणारा प्रथम प्राध्यापकी करून मग वकिलात नौकरी करणारा बहुप्रसवी लेखक, कथा मुख्यत्वे लाचखोर अधिकारी व व्यापारी यांच्यावर. कथेशिवाय कादंबरी, काव्य, निबंध, नाटक- सगळे बाष्पय प्रकार हाताळणारा... सईद अतिकउल्ला आजकाल काव्यात रमलेला, पण खरा कथाकारच. बँकेत अधिकारी, पण कथेत भिकारी लोक फार. जगावेगळी कथानकं तिरकस पद्धतीने लिहिण्याची खासियत... अब्दुल गफार चौधुरी हा पत्रकार, भाषिक चळवळीत शाहीर. स्थिरावला, गाजला तो भाषाभिमान ओसंडणाऱ्या कथांमुळे... सय्यद शमसुल हक हा पाकिस्तानमध्ये देण्यात येणारं 'आदमनी पारितोषिक' 'हे सर्वश्रेष्ठ भूषण मिळविणारा एकमेव पूर्व पाकिस्तानी, आता बांगलादेशी... शौकत अली खेड्यातलं रगेल व रंगेल जीवन रंगवणारा... आणि बुऱ्हाउद्दीन जहांगीर अस्सल व इरसाल ‘ग्रामीण' कथाकार. 
हे सहा स्थिरावलेले, पोक्त व प्रथितयश कथालेखक. त्यांच्या मागोमाग खऱ्याखुऱ्या बांगलादेशी कथाकाराची पिढी पुढे आलेली आहेच. 

आजचे अग्रगण्य बांगलादेशी कथाकार म्हणजे हसन अझीझूल हक् (वय 46 ), राहत खान (45), रशीद हैदर (44), अख्तर उझ्झमान इलायत (42), सुन्नत बारुआ (42) आणि सलीना हुसेन (38). हिंदुस्थानची फाळणी झाली तेव्हा अझीझल हक् अष्टवर्षीय होता तर सलीना हुसेनचा जन्म होत होता. भारतीय संस्कृती, परंपरा, इतिहास इत्यादींची या लेखकांची जवळीक नाही. याची जडणघडण झाली ती 1952 च्या भाषिक आंदोलनाचे वेळी आणि यांची प्रतिमा फुलली ती मुक्तीसंग्रामाचे काळात. या दृष्टीचे हे सहालग सर्वतोपरी बांगलादेशी 'गल्पकार'.

हसन अझीझूल हक् सध्या राजाशाही विश्वविद्यालयात तत्वज्ञानाचे प्राध्यापक आहेत. लेखन वाचनात गढून गेलेले. प्रो. हक् गंभीर वाटतात. अस्वस्थ भासतात. तळागाळातल्या लोकांसंबंधी लेखन. मुक्तिसंग्रामानंतर आलेलं वैफल्य व फसवणूक यांचा अर्थ शोधणाऱ्या कथा. नवेनवे प्रयोग करण्याकडे कल. हकसाहेबांच्या चार संग्रहातील पन्नास कथांतून असं काहीसं चित्र दिसतं. 1964 साली त्यांचा समुद्र स्वप्न, शीतेर अरण्य' हा आणि 1984 साली 'पाताले-अत्पताले’ असता हा कथासंग्रह प्रकाशित झाला... अख्तर उझ्झमान इलायत बोभा गावाचा, आता अध्यापक असलेला, कथा हाच फक्त लेखनप्रकार हाताळगारा. कथेत आजच्या समस्यांचा उहापोह करीत माणसाच्या मूलभूत प्रवृत्तीचा वेध घेणारा... हसन व अख्तरच्या थोड्याच कथा वाचल्या ओझरत्याच, भेटी झडल्या. पण मला ही दोघे माणस अव्वल दर्जाची वाटली. कलाकार, कथाकार म्हणून.

सलीना हुसेन, रशीद हैद्रर व सूत्रत बारूआ हे तिघेजण बांगला अकादमीत नोकरी करतात. त्यांची माझी मी ढाक्क्याला पोहोचलो त्याच दिवशी भेट झाली. तेथल्या मुक्कामात मग गाठीभेटी झाल्या. मुलाखती-मैत्री. राहात खानची अकादमीतच ओळख झाली. या ताज्या दमाच्या लेखकांच्या साहित्याचा अधिक परिचय होऊ शकला तो कबीर चौधरी यांनी केलेल्या कथांच्या इंग्रजीकरणामूळे. प्रत्यक्ष कबीर चौधरी मला प्रत्यही भेटत, ती माहिती देत. कबीर हे समीक्षक व शौकत उस्मान हे कथालेखक माझ्याच पिढीचे, आवडनिवडीचे. त्यामुळे त्या दोघांच्या गाठीभेटींनी बांगलादेशी कथेच चित्र बरंच स्पष्ट होत गेलं बांगला देशातील कथापंचक संबोवता येईल अशा सलीना, रशीद राहत व शौकत यांची स्नेहचित्रे रेखाटता आली व त्यांच्या बांगला कथेचा इंग्रजीद्वारा मराठीत अवतार सादर करता आला.

Tags: रशीद राहत व शौकत सलीना बांगलादेशची निर्मिती तशीच मूल्यविवेकनिष्ठ व भाव विवश बंडखोर प्रयोगशील हजारो वर्षाचा इतिहास बंगाली साहित्य अरविंद गोखले बांगलादेशी कथाचित्र Valid and Valuable Rebellious Experimental Thousands of Years of History Bengali Literature Arvind Gokhale #Bangladeshi Fiction weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके