डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

रविवार 11 डिसेंबर 2011 रोजी हा प्रतिसाद लिहीत असताना आजच्या दैनिक लोकसत्ताच्या मुंबई आवृत्तीत दुसऱ्या व चौथ्या पानावर मिळून 36 नाटकांच्या जाहिराती आहेत. आणखी किमान चार-पाच नाटकांचे प्रयोग पुण्या- मुंबईत होत आहेत ज्यांचा समावेश यात नाही. म्हणजे आज घडीला किमान चाळीस नाटकांचे प्रयोग चालू आहेत. नव्या, चांगल्या संहितांअभावी तेंडुलकरांची कसदार, तर कानेटकरांची घिसीपिटी (पण लोकानुरंजनी) नाटके काही हिशेबी नाट्य-निर्माते रसिकांच्या माथी पुन्हा मारत आहेत. हर्बेरियममधून सुनील बर्वे जुन्या अभिजात नाटकांचे प्रयोग मर्यादित संख्येने व निष्ठेने करीत आहेत आणि ते स्वागतार्हच आहे. ही सर्व परिस्थिती निराशाजनक म्हणता येईल काय?  कदाचित नाट्यप्रयोगांच्या वाढत्या संख्येमुळे प्रत्येक नाटकाच्या प्रयोगाला पंधरा-वीस वर्षांपूर्वी व्हायची तेवढी तुडुंब गर्दी होत नसेल. पण हे तर मराठी व हिंदी चित्रपटांच्या बाबतीतही खरे ठरत आहे

सुप्रसिद्ध लेखक श्री.भारत सासणे यांचे नाटक, नाटक! हे टिपण साधनाच्या 17 डिसेंबर 2011 च्या अंकात वाचले. यातून रंगकर्मी तसेच विचक्षक वाचक-प्रेक्षकांत सकस वाद-विवाद घडवून आणण्याचा साधनाकारांचा हेतू फलद्रूप होवो, ही शुभेच्छा. मुद्दामहून अशी शुभेच्छा देण्याचे कारण असे की सध्याचा मराठी माणूस सजग वाचक- प्रेक्षक कमी आणि आत्मतुष्ट ग्राहक अधिक झाला आहे की काय, असे वाटण्यासारखी भयावह परिस्थिती दिसून येत आहे.केवळ स्वांतसुखाय न लिहिता, हेतुपुर:सर दुसऱ्यांकरिता किंवा समाजप्रबोधनाकरिता लेखन करणाऱ्या लेखकांचे (खूप मेहनत घेऊन केलेले) लिखाण वाचकांकडून दखल घेतली न जाता ज्या वेगाने रद्दीच्या ढिगाऱ्यात लोटले जात आहे, त्यावरून परिस्थितीच्या गांभीर्याची कल्पना यावी. यावरचा उपाय म्हणून साधनाच्या अंकात श्री.भारत सासणे यांच्या नाटक, नाटक! या टिपणावर आणि समावेषक गृहनिर्मिती या संपादकीयावर वाचकांना लिहिते करण्याचा जो प्रयत्न साधनाकारांनी केला आहे तो खचितच कौतुकास्पद आहे. 

नाटकाशी संबंधीत सर्व प्रकारच्या कलाकारांमध्ये दंगल घडवून आणण्याची ताकद श्री.भारत सासणे यांच्या त्या लेखात असली, तरी नाटक हे सर्वप्रथम लिखित साहित्यच असते यावर दुमत होऊ नये. केवळ त्या संहितेचा पुढे रंगमंचीय आविष्कार होतो व त्यासाठी दिग्दर्शक, कलाकार, रंगभूषाकार, वेषभूषाकार, संगीतकार, ध्वनीसंयोजक, नेपथ्यकार तसेच रंगमंच व्यवस्थापक या सर्वांच्या सहभागाची, सहकार्याची आणि कौशल्यपूर्ण कामगिरीची आवश्यकता असते, एवढ्यावरून संहितेच्या साहित्यप्रकार या मूलभूत स्थानाला कमीपणा येत नाही. 

दोन शब्द किंवा दोन ओळीमधल्या अवकाशात दिग्दर्शकाची जादू चालून संहितेचे अक्षरश: सोने होते हे खरेच. पण हे अवकाश लेखकाच्या शब्दाशिवाय अस्तित्वातच आले नसते, हेही तेवढेच सत्य आहे. तरीही छापलेला लिखित शब्द पुस्तकातून वाचून वाचकांनी आपापल्या मगदुराप्रमाणे त्याचा अर्थ लावणे वेगळे आणि प्रतिभावान कलाकाराने (स्वतंत्रपणे किंवा दिग्दर्शकाच्या सूचनेप्रमाणे) तो उच्चारून व त्याला आंगिक तसेच मुद्राभिनयाची साथ देऊन त्यातून दृक्‌श्राव्य शिल्प घडविणे वेगळे. 

रंगमंचीय आविष्काराचा हा दृक्‌श्राव्य परिणाम संहितेत प्राण फुंकून तिला जिवंत करतो. त्यामुळेच अशा आविष्कारास मूर्तीमंत स्वरूप देणाऱ्या सर्व छोट्या-मोठ्या कलाकारांना त्याचे एकत्रित श्रेय द्यावे लागते. त्यामुळेच नाटक हे वर नमूद केलेल्या सर्व कलाकारांचे असते. त्याशिवाय रंगमंचामागील कामगारांचे (बॅक-स्टेज आर्टिस्ट्‌स)सुद्धा तेवढेच असते. म्हणूनच निळू फुले आणि डॉ.लागू चळवळ करून त्यांच्या कल्याणाकरता निधी जमविण्याचा आटापिटा करतात. तसेच मुंबईच्या आविष्कार नाट्यसंस्थेत अनेक दशके निष्ठेने काम करणारे बॅक-स्टेज आर्टिस्ट श्री.मामा कुंभार यांचा सत्कार नाट्यरसिक प्रेमाने करतात. 

एवढेच नव्हे तर रंगमंचावर प्रवेश करण्यापूर्वी अनेक कलाकार कुंभार मामांचा पदस्पर्श करताना पाहून आमचे डोळे पाणावतात. नाटकाच्या विविधांगी आविष्काराची येते तशीच प्रचिती कविवर्य मंगेश  पाडगावकरांच्या जातकुळीतले सर्व कवीगण तसेच साहिर लुधियानवींच्या गोत्रातील उर्दूमधील अनेकानेक शायर लोकांचे काव्य जेव्हा अलौकिकरित्या संगीतबद्ध होते, ते ऐकताना रसिकांना मिळते. 

लेखक/नाटककार काय किंवा कवी काय, त्यांचे शब्द हे केवळ पायाच असतात. पण त्यावर कळस चढविण्याचे काम वर नमूद केलेले इतर कलाकार तेवढ्याच सामर्थ्याने करतात व त्याची एकत्रित प्रचिती 
जेव्हा रसिकाला मिळते, तेव्हा त्याला मिळणाऱ्या स्वर्गीय आनंदात वेगवेगळ्या कलाकारांच्या योगदानाची टक्केवारी किती याचे गणित करण्याच्या फंदात खरा रसिक कधीच पडत नाही.  गेली काही वर्षे चांगल्या मूळ नाट्यसंहितांची चणचण भासल्यामुळे साहित्याची चांगली समज असलेल्या काही दिग्दर्शकांनी चांगल्या कथांचाच नव्हे, तर ललित लेखांचा रंगमंचीय आविष्कार करण्याची प्रथा (किमान) प्रायोगिक रंगभूीवर सुरू केली. हा उपक्रम स्तुत्य अशाकरिता म्हणायचा की त्यामुळे नाटके लिहिण्याचे तंत्र नसलेल्या काही साहित्यिकांच्या कलाकृती रंगमंचावर येऊ शकल्या.

यात गिरीश पतके या गुणी दिग्दर्शकाने गंगाधर गाडगीळांच्या ‘तलावातील चांदणे’, ‘गोष्ट लग्नाचीच’ पण... वगैरे कथांचे एकांकिकांच्या स्वरूपात तर विजय तेंडुलकरांच्या ललित लेखांचे एकपात्री Standing
Monologueच्या रूपात जे रंगमंचीय आविष्करण आविष्कार या मुंबईच्या नाट्यसंस्थेमार्फत केले होते, ते मराठी रंगभूमीच्या इतिहासातले मैलाचे दगड म्हणून सहज गणले जातील.

दुर्दैवाने अशा प्रयोगांना मराठी प्रेक्षकांनी पाठिंबा दिला नाही. भल्या मोठ्या पृथ्वी थिएटरमधल्या (गिरीश पतके दिग्दर्शित व गिरीश साळवी अभिनित) विजय तेंडुलकरांच्या ललित लेखावरील अशाच एका अत्युत्कृष्ट प्रयोगाला जे फक्त सहा प्रेक्षक होते त्यात प्रस्तुत लेखक एक होता (आणि प्रेक्षकांच्या या अनास्थेमुळे मनातल्या मनात तो रडला होता. असो).

अर्थात्‌ या उदाहरणावरूनही संहितेतील शब्दांचे महत्त्वच पुन्हा अधोरेखित होते. याची दुसरी बाजूसुद्धा लक्षात घ्यायला हवी. ‘गाढवाचे लग्न’सारख्या वगनाट्याचे प्रयोग संहितेशिवायच बरीच वर्षे होत होते किंवा ‘रामनगरी’ या राम नगरकरांच्या एकपात्री प्रयोगाचीसुद्धा संहिता नव्हती असे ऐकण्यात आले आहे. त्यामुळे लिखित संहितेशिवाय नाट्यप्रयोग होऊच शकत नाहीत असा काही नियम नाही. पण लिखित संहिता दिग्दर्शकाचे काम थोडे सुलभ करतात, हे मान्य व्हावे. 

त्यातूनही प्रतिभावान दिग्दर्शक संहिता नसल्यास किंवा ती कच्ची किंवा बऱ्याच जागी मूक असल्यास त्याची उणीव आपल्या प्रतिभेने भरून काढू शकतो, पण हौशी किंवा कमी प्रतिभावान दिग्दर्शकांना मात्र सामर्थ्यशाली संहिता चांगलीच तारू शकते, हे महाविद्यालयीन किंवा हौशी रंगमंचावरील स्पर्धात प्रेक्षक म्हणून जाणाऱ्या रसिकांना नक्कीच माहीत असेल.

याच संदर्भात एक किस्सा सांगण्याचा मोह आवरत नाही. विजय तेंडुलकरांसारखे प्रतिभावान नाटककार संवादांबरोबरच कंसात सूचनावजा मजकूर लिहायचे (चित्रपटाची पटकथा लिहिताना तर कॅमेऱ्याची जागा (ऍंगल)सुद्धा लिहायचे असे ऐकिवात आहे). यावर एका प्रथितयश (पण नाट्यक्षेत्रात अहंमन्य समजल्या जाणाऱ्या) प्रतिभावान नाट्यदिग्दर्शकाने तीव्र प्रतिकूल प्रतिक्रिया दिल्याचे प्रस्तुत लेखकाने स्वत:च्या कानांनी ऐकले आहे. 

खरे तर एवढ्या प्रतिभावान दिग्दर्शकाला संहितेतील निरपराध (innocent) सूचनांकडे दुर्लक्ष करणे एवढे कठीण का जाते याचा विस्मय वाटतो.  प्रस्तुत लेखकाच्या माहितीचा एक किंचीत एकांकिकाकार- नाटककार आहे. त्याच्या एकांकिकांच्या संहितांना लेखनस्पर्धेत आणि त्यांच्या प्रयोगांना एकांकिका स्पर्धेत दोनदा प्रथम पारितोषिके मिळाली आहेत. सदर लेखक तर संहिता लिहिण्यापूर्वी रंगमंचीय नेपथ्याचा आराखडाच तयार करत. कुठले पात्र कुठून प्रवेश करते, कुठे उभे राहून कोणता संवाद बोलते, मोठ्याने बोलते की कुजबुजते, या सगळ्यांची कल्पना यामुळे लेखकाला चांगली येते असा त्याचा अनुभव आहे. 

एकांकिकेचा किंवा नाटकाचा प्रयोग होणार असल्याचे प्रत्यक्षात तो होवो किंवा न होवो- नाटककारास गृहीत धरावेच लागत असल्यामुळे, या गोष्टींचे भान संहिता लिहिताना त्याला ठेवावेच लागते. नाट्यलेखन तंत्राचा तो अविभाज्य भागच असतो. त्यामुळे कंसातला मजकूर वाढून वर नमूद केलेल्या प्रतिभावंत दिग्दर्शकासारख्या लोकांचे डोके सटकते हे खरे. 

पण नाटककाराने अशा दिग्गजांच्या पलीकडील वाचकवर्गही संहिता लिहिताना डोळ्यासमोर ठेवावा असे प्रस्तुत लेखकाचे मत आहे (यावरून वर नमूद केलेला किंचित एकांकिकाकार-नाटककार दस्तुरखुद्द प्रस्तुत लेखकच आहे हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच! पण ते बिनमहत्वाचे. असो). 

उदाहरणार्थ, बऱ्याच वेळा पुस्तकरूपात प्रसिद्ध झालेली संहिता एखादा वाचक जेव्हा नाटक किंवा एकांकिका म्हणून वाचत असतो, तेव्हा त्याला वाचताना नाट्यानुभूती देण्यासाठी संहितेत संवादांच्या दरम्यान कंसात दिलेल्या माहितीचा/सूचनांचा नक्कीच फायदा होतो. यावरूनसुद्धा नाटक हे सर्वप्रथम साहित्यच असते या प्रमेयाच्या मूळ पदावरच आपणास यावे लागते. म्हणूनच श्री.महेश एलकुंचवारांच्या (व इतरांच्या) एकंकिका पूर्वी ‘सत्यकथा’ या सकस साहित्याला वाहिलेल्या मासिकात प्रसिद्ध व्हायच्या असे ऐकिवात आहे (चूकभूल द्यावी-घ्यावी).

जॉर्ज बर्नार्ड शॉची अनेक चर्चा नाटके प्रयोगक्षम नसली तरी ती  चमकदार साहित्यात मोडली जातात, असे म्हणत असावेत ते यामुळेच. शेवटी सदर टिपणाच्या अखेरीस, कोणीतरी नव्या प्रतिभेच्या नाटककाराने समाजाला चांगला संदेश देण्याच्या प्रथेबाबत आग्रही राहून नाटकाला पुन्हा स्थिर केले पाहिजे असे मला वाटते. त्यामुळे व्यावसायिक रंगभूमीला पुन्हा चांगले दिवस येतील व प्रायोगिक रंगमंच पुन्हा कात टाकेल हे श्री.भारत सासणे यांचे विधान तर्कसंगत नसल्याने विस्मयकारक वाटले.

श्री.भारत सासणे हे मुख्यत: कथाकार आहेत. ते स्वत: समाजाला चांगला संदेश देण्याचा हेतू मनाशी धरून किती कथांचे कथालेखन सुरू करतात? तशा कथा लिहिण्याने किंवा न लिहिण्याने कथा या साहित्य- प्रकाराचे स्थान किती स्थिर किंवा अस्थिर झाले? खरे तर प्रसिद्ध नाटककार श्री.रत्नाकर मतकरींनी त्यांच्या उमेदवारीच्या काळात मुलांकरिता जी नाटके लिहिली त्यांना ह्या संदेश देण्याच्या काचातून सोडविल्यामुळे, उत्तम मनोरंजन करणारी बालनाट्ये सादर करता आली, असे त्यांनी नमूद केल्याचे चांगले स्मरणात आहे. समाजाला चांगला संदेश देणाऱ्या नाटकांच्या अभावामुळे नाट्यसृष्टीत अस्थिरता आहे किंवा व्यावसायिक रंगभूमीला वाईट दिवस आहेत अशी स्थिती आहे असे वाटत नाही. 

रविवार 11 डिसेंबर 2011 रोजी हा प्रतिसाद लिहीत असताना आजच्या दैनिक लोकसत्ताच्या मुंबई आवृत्तीत दुसऱ्या व चौथ्या पानावर मिळून 36 नाटकांच्या जाहिराती आहेत. आणखी किमान चारपाच नाटकांचे प्रयोग पुण्या-मुंबईत होत आहेत ज्यांचा समावेश यात नाही. म्हणजे आज घडीला किमान चाळीस नाटकांचे प्रयोग चालू आहेत. 

नव्या, चांगल्या संहितांअभावी तेंडुलकरांची कसदार, तर कानेटकरांची घिसीपिटी (पण लोकानुरंजनी) नाटके काही हिशेबी नाट्य-निर्माते रसिकांच्या माथी पुन्हा मारत आहेत. हर्बेरियममधून सुनील बर्वे जुन्या अभिजात नाटकांचे प्रयोग मर्यादित संख्येने व निष्ठेने करीत आहेत आणि ते स्वागतार्हच आहे. ही सर्व परिस्थिती निराशाजनक म्हणता येईल काय? कदाचित नाट्यप्रयोगांच्या वाढत्या संख्येमुळे प्रत्येक नाटकाच्या प्रयोगाला पंधरा-वीस वर्षांपूर्वी व्हायची तेवढी तुडुंब गर्दी होत नसेल. पण हे तर मराठी व हिंदी चित्रपटांच्या बाबतीतही खरे ठरत आहे (नाहीतर, ‘नटरंग’सारखा कलात्मकता व लोकप्रियता यांचा सुंदर मेळ घालणारा चित्रपट जो 40 वर्षांपूर्वी आला असता तर ज्याने सुवर्णमहोत्सव हमखास साजरा केला असता, तो दहा आठवड्यात मुंबईच्या चित्रपट गृहातून उडून जाता ना!). 

कदाचित समाजाच्या एकंदर अभिरुचीतच थिल्लरपणा आल्याने अभिजात नाटकांचा प्रेक्षकवर्ग रोडावला असेल. कदाचित टीन-एजर्सची नवी पिढी इंटरनेट किंवा व्हिडिओ-ऑन-डिमांडमुळे व यु- ट्यूबवरील हौशी चित्रफितीमध्ये अधिक गुंतली जात असल्यामुळे (किंवा इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणामुळे मातृभाषेतील साहित्य- नाट्य कृतींपासून दुरावल्यामुळे) फार मोठ्या प्रमाणात मराठी रंगभूमीस पाठिंबा देत नसेल. 

हल्ली व्यावसायिक नाटकांच्या प्रयोगांच्या प्रेक्षकाचे सरासरी वय 55 ते 60 असते ह्याची नोंद प्रस्तुत लेखकाने ‘काटकोन त्रिकोण’ व ‘जास्वंदी’ ही नाटके बघताना घेतली होती. अर्थात एकंदर भारतीयांबरोबरच मराठी लोकांचेही वयोमान 75 च्या पलीकडे वाढलेले असल्यामुळे नाट्य-निर्मात्यांना या ट्रेंडमुळे काळजीचे कारण नाही. तरीही मराठी रंगभूमीवरील कलेशी (तसेच धंद्याशी!) निष्ठा ठेवणारे निर्माते व रंगकर्मी (तसेच निर्माते बनलेले रंगकर्मी!) स्वत:च्या तसेच महाराष्ट्र सरकारच्या (अनुदानरूपी) खिशात हात घालून व्यावसायिक व प्रायोगिक रंगभूमीवर नवी (व जुनी) नाटके फार मोठ्या संख्येने आणताना दिसत आहेत. सी.डी., डी.व्ही.डी., इंटरनेटच्या व मल्टिप्लेक्सच्या वेगवान जमान्यात सुगीसुगी म्हणतात ती याहून वेगळी ती कोणती असणार आहे?  

जाताजाता श्री.भारत सासणे यांना एक प्रेमाची सूचना करावीशी वाटते. त्यांनी त्यांच्या निवडक कथांची नाट्यरूपांतरे केल्यास मराठी रंगभूमीला सकस संहिता मिळतील (नाही तर आपले गिरीश पतके आहेतच!). श्री.ना.पेंडसेही प्रथम कथा- कादंबरीकारच होते व नंतर ते नाटककार झाले हे रसिकांना आठवत असेलच. 

Tags: मराठी रंगभूमी नाटककार नाटक कादंबरी कथा Marathi Theate Dramatists Dramas Novels Stories weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके