डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

टिळकांनी तुरुंगातल्या आपल्या वास्तव्यात फ्रेंच, जर्मन आणि पाली या भाषांचा पुस्तकांवरून अभ्यास केला. त्यांना या भाषा चार ते सहा महिन्यांत येऊ लागल्याचे त्यांनी एका पत्रात नमूद केले आहे. फ्रेंचसाठी त्यांनी व्हिक्टर ह्युगोचे ह्युगोज फ्रेंच रिडिंग, ह्युगोज व्हर्ब सिंप्लिफाईड, ह्युगोज फ्रेंच जेंडर्स, ह्युगोज कॉन्व्हर्सेशन सिंप्लिफाईड अशी चार पुस्तके त्यांनी वाचून आपला फ्रेंचचा पाया पक्का केला होता. ह्युगोचे व्याकरण पाणिनीशी मिळते-जुळते आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करायची आणि त्याबद्दलचे शोध घेत राहायचे, ही त्यांची उपजत वृत्ती होती. त्यामुळेच त्यांनी ब्रह्मदेशात असलेल्या मिकटिला (मेक्टिला) या नावाचा उगम कोठे असायची शक्यता आहे, ते दादासाहेब खापर्डे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. मिकटिला हे नाव रामायणातल्या जनक राजाच्या मिथिला या नावाशी साधर्म्य दाखवणारे आहे, असे त्यांचे मत होते.

मंडालेच्या तुरुंगातून सुटका होऊन लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यात गायकवाड वाड्याच्या दिंडी दरवाजासमोर उभे राहिले, तो दिवस होता 17 जून 1914. त्यांनी दिंडीची खिटी वाजवली. ‘‘कौन’’ आतून भैयाचा आवाज आला. टिळकही बाहेरून म्हणाले, ‘‘मै टिळक.’’ भैयाने त्यांना काही क्षण थांबायला सांगितले. त्याने धोंडोपंतांना वर जाऊन निरोप दिला. तेही लगोलग आले. त्यांनी दार किलकिले करून पाहिले, तो त्यांचा डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. साक्षात्‌ दादा म्हणजे त्यांचे मामा दरवाजात स्वत:ची वळकटी घेऊन उभे होते. दरवाजा उघडला. धोंडोपंतांनी दादांना वाकून नमस्कार केला. ते घरात आले. सर्व घर त्यांना पाहण्यासाठी जागे झाले. ‘दादाऽ, दादाऽऽ’, असा गलका सुरू झाला. दादांची नजर काही वेगळेच शोधत होती. ते एका खोलीतून दुसऱ्या खोलीत फिरले. सगळीकडे त्यांनी नजर टाकली. ती ज्या एका व्यक्तीला शोधत होती, ती त्या समोरच्या भिंतीवर होती. टिळक त्या तसबिरीसमोर उभे राहिले. त्यांनी हात जोडले. टिळक आपली पत्नी सत्यभामाबाई यांच्या तसबिरीसमोर उभे होते. त्यांची मुले त्यांना बिलगली होती. त्यांनी आपल्या उपरण्याने डोळ्यांच्या कडा पुसल्या. त्यांना काहीसे अंधारून आल्यासारखे झाले. त्यांनी आपल्या मुलांना जवळ घेतले आणि या मुलांना जे काही समजावायचे, ते समजावले. त्यानंतर ते एका खाटेवर ध्यानस्थ अवस्थेत बसले. तेवढ्यातच जरा बाजूला गेलेल्या रामने त्यांना ‘‘बाहेर केवढी गर्दी झाली आहे, पाहिलीत का?’’ असे त्यांच्याजवळ येऊन म्हटले. टिळकांनी डोळे उघडले. ती आपल्यातून गेली, यावरच ते अजून विचार करत असावेत. पहाटेच्या सुमारास ही गर्दी माना उंचावून आणि टाचा वर करून एकाच दर्शनाचा ध्यास घेत होती. त्यांना टिळक हवे होते, त्यांचा देव त्यांना पाहायचा होता. टिळक अगदी एक-एक पाऊल उचलत गॅलरीत आले आणि ते आपल्या भक्तांना पाहू लागले. अथांग समाज होता तो. म्हातारे-कोतारे, आबालवृद्ध, स्त्री-पुरुष असे सगळेच तिथे होते. कुठेही घोषणाबाजी नाही, कुठेही गलका नाही. कुणी पदराआड डोळे करत होते, कोणाच्या आनंदाश्रूंना पारावार उरलेला नव्हता. टिळकांनी पुन्हा एकदा हात जोडले. ‘‘मला जे सांगायचंय, ते मी उद्या सांगेन. माझ्या उदंड स्नेहीजनांनो, आता तुम्ही विश्रांती घ्या-’’ असे काहीसे ते बोलले आणि आत गेले. तथापि, गर्दी काही हटत नव्हती. टिळक पुन्हा एकदा बाहेर आले आणि गेले. त्यांची उलघाल काही संपत नव्हती. ते विचारमग्न झाले. गायकवाड वाड्याकडे जाणारे रस्ते पोलिसांनी अडवले आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांची नावे लिहून घ्यायला प्रारंभ केला. हेतू हा की, लोकांनी टिळकांकडे जाणे थांबवावे; पण झाले उलटेच. तुम्ही नावेच घेणार आहात, मग आमच्या दैवताला भेटण्याचा आमचा हक्कच आहे- असे त्यांनी मनाशी पक्के केले आणि ते गायकवाड वाड्यात शिरायला जागा नसतानाही आत सरकत राहिले. सकाळ उजाडेपर्यंत टिळकही आपल्या थकव्याला बाजूला सारून आत-बाहेर करत राहिले. 

टिळकांनी आकाशाकडे एकदा पाहिले. समोरच्या गर्दीवर एक नजर टाकली. ती लोकयुगाची नांदी होती. त्यांच्या डोळ्यांसमोरून 1897 पासूनचा मागल्या सतरा वर्षांचा पट झरझर सरकत गेला. ते त्या गेलेल्या वर्षांच्या स्मरणात गुंतून गेले. ते पुन्हा एकदा विचारमग्न झाले. 

राजद्रोहाचे दोन खटले आणि प्रदीर्घ कारावास. असंख्य यातनांना सामोरे जात त्यांनी ज्या धीरोदात्तपणे क्रूरकर्म्या ब्रिटिशांशी संघर्ष केला, त्याला जगाच्या इतिहासात तोड नसेल. दुसऱ्या राजद्रोहाच्या खटल्याच्या निकालापूर्वी जेव्हा न्यायमूर्ती दिनशा दावर यांनी, ‘‘तुम्हाला काही सांगायचे आहे काय?’’ असे टिळकांना विचारले, तेव्हा त्यांनी ‘‘ज्यूरींनी जरी मला गुन्हेगार ठरविले असले तरी मी निर्दोष आहे, अशी माझी मनोदेवता मला ग्वाही देत आहे. मानवी शक्तीहून अधिक वरिष्ठ प्रतीच्या शक्ती जगत्सूत्रे चालवीत आहेत; आणि मी ज्या कार्याकरता प्रयत्न केले, त्या कार्याला माझ्या दु:खाने व संकटानेच अधिक जोर यावा, असा ईश्वरी नेमानेम दिसतो’’, असे बाणेदार उद्‌गार काढले होते. त्याने ते न्यायालयही थक्क झाले. त्यालाही आता सहा वर्षे झाली. मधे बरेच काही घडून गेले, तरी त्यांचा संघर्ष संपलेला नव्हता. 

टिळकांना राजद्रोहाची झालेली पहिली शिक्षा त्यांच्या स्फोटक लिखाणाबद्दल होती. दुसरी शिक्षाही त्याच कारणासाठी होती. राजद्रोहाच्या पहिल्या खटल्यात 1897 मध्ये चार्ल्‌स वॉल्टर रँड आणि लेफ्टनंट सी. इ. आयर्स्ट यांच्या खुनात टिळकांना अडकवायचे होते. ब्रिटिशांचा तो प्रयत्न फसला. रँड आणि आयर्स्ट यांचा खून गणेशखिंड रस्त्यावर चापेकर बंधूंनी केला; पण त्यात जर चापेकरांना अपयश आले असते, तर लोकमान्यांचे एक निष्ठावान कार्यकर्ते आणि भाऊ रंगारी तालमीचे वस्ताद काशीनाथ ठकुजी जाधव यांनी रँडचा काटा काढला असता. 

त्या खुनांच्या चौकशीसाठी जेव्हा मुख्य तपास अधिकारी हॅरी ब्रुईन त्यांच्याकडे आला आणि त्याने चौकशी सुरू केली, तेव्हा त्याने रँड व आयर्स्ट यांचे खून हे पुण्याला लागलेले लांच्छन आहे, असे मत व्यक्त केले. त्यावर टिळकांनी त्याला स्पष्ट शब्दांत बजावले की, ते लांच्छन तुम्हाला वाटत असले तरी ते मला तसे वाटत नाही. मग ब्रुईन याने थेट आपल्या भात्यातला बाण काढला आणि म्हटले, ‘‘मिस्टर टिळक, तुम्हाला या खुन्यांची माहिती असेलच ना?’’ कोणाच्याही शब्दात चुकूनसुद्धा न अडकणारे टिळक त्याला म्हणाले, ‘‘मला या खुन्यांची माहिती नाही आणि समजा ती असलीच तर ती मी तुम्हाला द्यायला काही या सरकारचा नोकर नाही. मी तुमचा खबऱ्या नाही.’’ त्यांनी या ब्रुईनला असे निरुत्तर केले आणि तो हात हलवत माघारी गेला. पण आरोपपत्र दाखल करताना टिळक हे त्या खुनात प्रत्यक्ष सहभागी नसले तरी त्यांची गुन्हेगारांना साथ होती, असे म्हटले. टिळकांचे अग्रलेख आणि त्यांचा केसरी वाचूनच चापेकर बंधूंनी हे खून केले, असे त्या खटल्यात इंग्रजांना सिद्ध करायचे होते. त्यात त्यांना यश जरी आले नसले, तरी टिळकांना दोषी ठरवण्यात न्यायमूर्ती स्ट्रॅची यांना यश आले. 

मुळात रँड हा अतिशय कर्तबगार अधिकारी होता, असे सव्वाशे वर्षांनंतर सांगणारे काही जण आपल्यामध्ये आजही आहेत. त्यांच्या डोक्यात एक वेगळीच विषारी कल्पना आजही दबा धरून बसली असण्याची शक्यता आहे, त्यांच्यासाठी ही माहिती आवश्यक आहे. रँडने 1897 मध्ये आलेल्या प्लेगमध्ये प्रारंभीच्या काळात काही तडकाफडकी निर्णय घेतले. त्याने गावाबाहेर एक छावणी उभी केली आणि प्लेग झालेल्यांना त्याने पोलिसांच्या साह्याने त्या छावणीमध्ये नेऊन टाकले. तोपर्यंत सर्व गोष्टी ठीक होत्या. टिळकही प्लेगच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करायचे आवाहन करत होते. पण जेव्हा रँडच्या सैनिकांनी घराघरांत शिरून महिलांना घराबाहेर काढून त्यांच्या काखांची आणि जांघांची तपासणी करायला प्रारंभ केला, तेव्हा त्या घृणास्पदतेची हद्द ओलांडली गेली. रँडला ठार करण्यात आले आणि पुणेकरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. त्या काळात या खुनाची तयारी अतिशय गुप्तता बाळगून चालू होती. यापैकी कोणताच प्रकार टिळकांना माहीत नसेल, असे नाही; कदाचित त्यांना माहितीही असेल, पण त्यांच्याकडून त्याची वाच्यता केली जाणे अवघड होते. रँड आणि आयर्स्ट मारले गेल्यावर इंग्रज अधिकारी आणि त्यांचे सोजिर एकदम पिसाळले. टिळकांनी त्याच काळात ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’, हा अग्रलेख लिहिला (6 जुलै 1897) होता. 22 जून 1897 रोजी रँड आणि आयर्स्ट मारले गेले. तो दिवस मंगळवार असल्याने त्या दिवशीच्या केसरीत त्या घटनेविषयी काहीही प्रसिद्ध झाले नाही, हे अर्थातच स्वाभाविक होते. पण त्यानंतरच्या म्हणजे 29 जूनच्या अंकाचा अग्रलेख होता, ‘गेल्या मंगळवारी रात्री घडलेला भयंकर प्रकार!’ या अग्रलेखाची प्रारंभीची मांडणी अशी- ‘बुधवारी सकाळी शहरात जेव्हा मि.रँड यांस कोणी गोळी घातल्याची बातमी आली, तेव्हा पहिल्याने ती कोणासच खरी वाटेना. ही भयंकर गोष्ट घडून येण्याचा संभव कोणासही वाटत नव्हता, करिता वरील बातमी कानी पडल्याबरोबर तिने सर्वांचीच अंत:करणे खेदाने आणि आश्चर्याने भरून गेली.’ या अग्रलेखानंतर ब्रिटिश सोजिर पुण्यात पिसाळल्याप्रमाणे वागू लागले. तेव्हा टिळकांनी, ‘राज्य करणे म्हणजे सूड उगविणे नव्हे!’ हा अग्रलेख (13 जुलै 1897) लिहिला. 

पहिल्या राजद्रोहाच्या या खटल्याच्या पार्श्वभूमीवर टिळकांवर भरण्यात आलेला राजद्रोहाचा दुसरा खटला चालला. रँडच्या खुनाच्या प्रकरणानंतर बरोबर दहा वर्षांनी पुन्हा जवळपास तशीच स्थिती निर्माण झाली. तेव्हाच्या बंगालमध्ये मुझफ्फरपूर येथे खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चक्रवर्ती यांनी 30 एप्रिल 1908 रोजी सत्र न्यायाधीश डग्लस किंग्जफोर्ड यांच्या घोडागाडीवर बाँब फेकतो आहोत असे समजून बाँब फेकला, पण त्या गाडीत बसलेल्या इंग्रज बॅरिस्टर प्रिंजल केनेडी याची पत्नी आणि मुलगी या दोघी ठार झाल्या. बाँब कसे बनवावेत, हे विनायक दामोदर सावरकर यांचे शिष्य पांडुरंग महादेव बापट यांनी कलकत्त्यास जाऊन बंगाली तरुणांना शिकवलेले होते. इंग्लंडहून आलेल्या बापटांनी या बाँबचे पहिले प्रात्यक्षिक पुण्यात गायकवाड वाड्याच्या विहिरीतच केलेले होते. 22 मे रोजी टिळक आणि महाराष्ट्रातील काही जहाल पुढारी यांच्या सह्यांचे एक पत्रक प्रसिद्ध झाले. त्यात मुझफ्फरपूरच्या घटनेने आपल्याला अतीव खेद वाटत असल्याचे म्हटले होते. बाँबहल्ल्याची दखल केसरीकडून घेतली जाणे हे स्वाभाविक आणि टिळकांच्या स्वभावानुसार होते. टिळकांच्या केसरीत तेव्हा प्रसिद्ध झालेल्या एकूण आठ लेखांना इंग्रज सरकारने आक्षेप घेतला. ‘देशाचे दुर्दैव’ (12 मे 1908) हा अग्रलेख आणि त्याच अंकातील दोन स्फुट सूचना असे एकूण तीन लेख टिळकांच्या लेखणीतून उतरलेले होते. अन्य पाच लेख काकासाहेब खाडिलकर यांचे होते. 

केसरीत प्रसिद्ध झालेले हे लेखन आपले नाही, असे टिळकांनी न्यायालयास सांगितले असते, तर इतिहास वेगळा झाला असता; पण त्यांनी तसे म्हटले नाही. इंग्रजांच्या मते, प्रत्यक्ष बाँबस्फोटापेक्षाही अतिस्फोटक असलेल्या त्या लेखनाबद्दल टिळकांना सहा वर्षांच्या काळ्या पाण्याची शिक्षा झाली. 22 जुलै 1908 रोजी त्यांना शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्यांना खास रेल्वेने साबरमतीच्या तुरुंगात रातोरात हलविण्यात आले. खाडिलकरांचे मोठेपण असे की, त्यांनी लगेचच पुण्याच्या न्यायालयात धाव घेतली आणि त्यांनी ‘हे अग्रलेख माझे म्हणजे श्री.कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे आहेत आणि त्यांची सर्व जबाबदारी मी घेत आहे’, असे प्रतिज्ञापत्र तिथे सादर केले. ते न्यायालयाने अर्थातच फेटाळून लावले. 

राजद्रोहाच्या खटल्यात बाळ गंगाधर टिळक यांना सहा वर्षांची शिक्षा झाली. त्या आधी त्यांनी सलग दोन दिवस आपले या खटल्याबद्दलचे म्हणणे मांडले होते. या भाषणात शब्दांपेक्षा आशय महत्त्वाचा होता. त्याला माझे अतिशय जवळचे स्नेही प्रा.ग.प्र. प्रधान यांनी त्यांच्या ‘लोकमान्य टिळक’ या ग्रंथात एक छान उपमा दिली आहे. हे भाषण कसे होते, तर इंग्रजीत एक वचन आहे की, ‘स्पीक दॅट आय मे सी यू’ (तुम्ही बोला म्हणजे तुम्ही काय आहात, ते मला समजेल) यासारखे टिळकांचे हे भाषण ज्यांनी ऐकले, त्यांना टिळकांची असामान्य बुद्धिमत्ता, अपूर्व स्मरणशक्ती, कायद्याचा गाढा व्यासंग, बिनतोड युक्तिवाद करण्याचे सामर्थ्य, त्यांच्या बुद्धिमत्तेचा प्रचंड आवाका आणि त्यांच्या मनातील स्वातंत्र्याची दुर्दम्य नैतिक प्रेरणा- या सर्वांचे अविस्मरणीय दर्शन घडले. 

ज्यूरीतील सदस्यांना उद्देशून त्यांनी मग त्यांचे आभार मानले. ते म्हणाले, ‘‘माझे हे विचार बरोबर आहेत असे म्हणणारा एक जण जरी मला ज्यूरीत मिळाला, तरी मला समाधान वाटेल. एखादी गोष्ट मनाला पटली तरी ती बोलून दाखवण्याला एक प्रकारचे धैर्य लागते ते ईश्वराने तुम्हाला द्यावे, अशी माझी प्रार्थना आहे.’ या त्यांच्या वाक्यात खटल्याचा निकाल ज्यूरींकडून काय दिला जाणार आहे, याची छटा लपलेली होती. झालेही तसेच. ज्यूरी त्यांच्या खोलीत चर्चेला गेले. न्यायमूर्ती दिनशा दावर यांचे भाषण हे टिळकांना ते दोषी आहेत असेच सांगणारे होते. त्यात त्यांनी तर दूषणांची लाखोलीच वाहिली होती. न्यायालयात टिळकांचे जवळचे सहकारी तात्यासाहेब केळकर, काकासाहेब खाडिलकर, दादासाहेब खापर्डे आदी होते. त्यांच्या चेहऱ्यावर खिन्नतेचे भाव होते. न्यायमूर्ती आत गेल्याने टिळक त्यांच्या त्या आरोपीच्या चौकटीतून बाहेर आले. त्यांनी आपल्याला किती शिक्षा होऊ शकते ते आपल्या या सहकाऱ्यांना बोलून दाखवले. न्यायमूर्ती दावर न्यायालयात पुन्हा दाखल झाले आणि त्यांनी ज्यूरींचा निकाल विचारला. त्यांनी सात विरूद्ध दोन असे आपले मत देऊन ‘टिळक दोषी आहेत’, असे सांगितले. न्यायमूर्ती दावर यांनी टिळकांना दोषी ठरवलेलेच होते, आता फक्त त्यांच्या शिक्षेचे स्वरूप त्यांना सांगायचे होते. त्यांनी ते सांगितले आणि टिळक हे दोषी असल्याने त्यांना सहा वर्षांच्या काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली. न्यायमूर्ती दावर यांनी टिळकांना दिलेल्या शिक्षेबद्दल त्यांना ब्रिटिश सरकारने ‘नाइटहूड’ हा किताबही पुढे बहाल केला. दिनशा दावर हे आधीच्या राजद्रोहाच्या खटल्यात म्हणजे 1897 मध्ये त्यांचे वकील होते. त्यांनी टिळकांना उद्देशून ते ‘रोगट मनोवृत्ती’चे असल्याचे म्हटले होते. टिळकांना त्यांनी ‘काही सांगायचे आहे काय’, असे विचारले. तेव्हा टिळकांनी त्यांना 14 मुद्दे वाचून दाखवले. ते दावर यांनी फेटाळून लावले आणि ‘तुम्हाला काही सांगायचे असल्यास सांगा’ असे म्हटले, तेव्हा टिळक अतिशय शांत आवाजात बोलू लागले. त्यांनी आधी दावर यांचाच समाचार घेतला. ‘तुमची विशेषणे जनतेच्या चिरकाल स्मरणात राहतील’, इतक्या सभ्य भाषेत त्यांनी दावर यांच्या असभ्यतेला उघडे पाडले.

दुसऱ्या दिवशी टिळकांच्या शिक्षेची वार्ता सर्व देशभर वृत्तपत्रांमधून समजली. मुंबईकरांनाही ती समजली. मुंबईत त्या शिक्षेच्या विरोधात दंगे उसळले. त्यात कित्येक जण बळी पडले. टिळकांच्या या शिक्षेविरोधात मुंबईच्या गिरणी कामगारांनी अतिशय उत्स्फूर्तपणे गिरण्यांमधल्या कामावर बहिष्कार टाकला. त्यांच्या सहा वर्षांच्या शिक्षेला उत्तर होते ते दर वर्षाला एक दिवस या न्यायाने कामगारांनी सहा दिवस संप केला. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातला तो पहिला मोठा संप होता आणि त्याकडे साऱ्या जगाचे लक्ष वेधले गेले. रशियन कम्युनिस्ट पक्षाचे नेते लेनिन यांनाही कामगारांवर असलेल्या या महान नेत्याच्या प्रभावाचे विशेष कौतुक वाटले. 

टिळकांना दि. 22 जुलै 1908 रोजी न्यायालयाने रात्रीच्या वेळी शिक्षा सुनावली. टिळकांना लगेचच खास रेल्वेने साबरमतीच्या तुरुंगात नेण्यात आले. शिक्षा काळ्या पाण्याची असल्याने त्यांना 13 सप्टेंबर रोजी मुंबईमार्गे ब्रह्मदेशात (आताचे म्यानमार) रंगूनला (यांगूनला) नेण्यात आले. त्यापूर्वी प्रिव्ही कौन्सिलात अपील करण्यासंबंधीचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला होता. मुंबईहून खास गाडीने त्यांना आधी मद्रास आणि नंतर यांगून येथे नेण्यात आले. स्टेशन आले की, गाडीच्या खिडक्या धडाधड बंद केल्या जात होत्या. कोणालाही टिळकांचे दर्शन होता कामा नये आणि टिळकांना बाहेरचे वातावरण कळता कामा नये, याची पूर्ण खबरदारी घेतली जात होती. यांगूनमध्ये त्यांची आगबोट लागत असता, तिथेही गर्दी जमली होती आणि त्या गर्दीतून ‘टिळक जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या जात होत्या. लोकमान्य टिळक मंडालेहून परतले ते 17 जून 1914 रोजी. टिळकांचे मंडालेचे जीवन कसे होते, हे त्यांनी केसरीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. ही मुलाखत दि. 23 जून 1914 च्या केसरीत प्रसिद्ध झाली आहे. या मुलाखतीच्या शिरोभागात म्हटले आहे की, ‘टिळकांना शिक्षा होऊन हायकोर्टाच्या इमारतीतून अदृश्य झाल्यापासून फिरून ते पुण्यास दिसेपर्यंत त्यांच्यासंबंधीची हकिगत सहा वर्षांत काय घडली याविषयी लोकांस फार उत्कंठा लागून राहिली होती हे आम्हांस माहीत आहे. पण त्यांच्या खासगी पत्रांव्यतिरिक्त त्यांची हकिगत कळण्यास दुसरा काहीच मार्ग नव्हता; व खासगी पत्रांमध्ये अर्थातच खासगी मजकूर असणार. यामुळे लोकांची जिज्ञासा आम्हांस फारशी तृप्त करता आली नाही. पण सुदैवाने टिळक आता सुटून आल्यामुळे व त्यांच्याच तोंडून ती हकिकत कळण्यासारखी असल्यामुळे आम्ही त्यांची मुलाखत घेतली.’ 

साबरमतीच्या तुरुंगातच टिळकांचे वजन दहा दिवसांमध्ये दहा पौंडांनी कमी झाले होते. साबरमतीहून टिळकांना 13 सप्टेंबर 1914 रोजी हार्डिंग या लष्कराच्या मोठ्या बोटीने नेण्यात आले. त्यांना आणि त्यांच्याबरोबरच्या गुजराती स्वयंपाकी कैद्यास बोटीच्या तळघरातल्या दोन स्वतंत्र खोल्यांमध्ये- खोल्या कसल्या अंधारकोठड्याच त्या- ठेवण्यात आले होते. रोज संध्याकाळी टिळकांना एक गोरा पोलीस अधिकारी बोटीवर फिरायला घेऊन जात असे. टिळकांनी सांगितले त्यानुसार, त्या खोलीत बारा आणि बारा चोवीस तास उकडत असे. असे नऊ दिवस टिळकांनी त्या आगबोटीच्या प्रवासात काढले. दि. 22 सप्टेंबर 1914 रोजी ते रंगूनला पोहोचले. संध्याकाळचे चार-साडेचार वाजले असतील. त्यांना बोटीवरून उतरवून तिथेच उभ्या असलेल्या एका आगगाडीत बसविण्यात आले. तो दुसरा स्वयंपाकी कैदीही तिथे होताच. दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. 23 सप्टेंबरला सकाळी आठ वाजता टिळक मंडालेच्या स्टेशनात पोहोचले. त्यांच्यासमवेत अहमदाबादपासून आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना मंडालेच्या तुुरुंगाधिकाऱ्याच्या स्वाधीन केले.... आणि आधीच योजून ठेवलेल्या कोठडीत त्यांची रवानगी करण्यात आली. मंडालेचा तुरुंग हा मंडालेच्या किल्ल्यात नैर्ॠत्य दिशेला आहे (म्हणजे तेव्हा तो होता. त्यास लोकमान्यांचे नातू जयंतराव टिळक यांनी भेट दिली, तेव्हाही म्हणजे नव्वदच्या दशकात तो होता आणि टिळकांना जिथे ठेवण्यात आले होते, ती कोठडीही तिथे होती. तिथे स्मारक म्हणून टिळक हॉलही होता. आता तोही नाही.) या किल्ल्यात असलेल्या त्या तुरुंगाची भिंत फक्त आज आहे, पण आतमध्ये म्यानमारच्या लष्कराचे केंद्र आहे. 

मंडालेत टिळकांना वृत्तपत्रे मिळू शकत नव्हती आणि रेडिओ किंवा अन्य कोणतीही माध्यमे उपलब्ध नव्हती. टिळकांना जो काही पत्रव्यवहार करायला मिळे. त्यातून महिन्यातून केवळ दोनदा ते पत्रे पाठवू शकत. म्हणजेच दोन आठवड्यांतून एकदा त्यांना पत्र पाठवता येई. पण ती सर्व पत्रे त्यांनी इंग्रजीतच लिहिली पाहिजेत, असे त्यांच्यावर बंधन होते. टिळकांनीही आपल्या अगदी घरातल्या आणि सर्व हितचिंतकांना ‘खुशालीची पत्रे जरूर लिहावीत, पण त्या पत्रांमध्ये कोणत्याही राजकीय विषयांचा उल्लेख करू नये’, असे बजावले होते. याचे कारण जर तुरुंगाधिकाऱ्यांना यात काही तरी संशयास्पद मजकूर आहे असे वाटले, तर ते पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचणारच नाही, हे उघड होते. टिळकांनी आपली पत्रे तुरुंगाधिकाऱ्याला वाचता येतील अशा बेतानेच लिहिली. तुरुंगात असलेल्या टिळकांवर इंग्रजांची अर्थातच पाळत होती आणि टिळकांना त्याची कल्पना होती. मंडालेच्या तुरुंगात येऊन चार महिने झाले, तरी त्यांना वृत्तपत्रे मिळत नव्हतीच. त्यासाठी जेव्हा परवानगी मिळेल तेव्हा मी कळवेन, तेव्हा वृत्तपत्रे पाठवायला हरकत नाही- असे त्यांनी आपले भाचे धोंडोपंत विद्वांस यांना कळवलेले होते. टिळकांना तुरुंगातसुद्धा आपल्या घरातल्या ग्रंथसंग्रहाची काळजी होती. त्यांनी या पुस्तकांची खबरदारी कशी घ्यायला हवी, हे पत्राद्वारे विद्वांसांना कळवलेले होते. आपल्याला आता पुस्तकांची गरज आहे आणि कोणकोणती पुस्तके पाठवायची आहेत याची भली मोठी यादीच टिळकांनी विद्वांसांना पाठवलेली होती. काँतच्या ‘पॉझिटिव्ह फिलॉसॉफी’चे तीन खंड आणि ‘पॉझिटिव्ह पॉलिटी’चे चार खंड पाठवून द्यावेत, असे त्यांनी पहिल्याच पत्रात लिहिले होते. आनंदाश्रमाच्या ब्रह्मसूत्रांचे दोन खंड आणि भगवद्‌गीतेचा एक खंड पाठवावा. ज्याची नावे इंग्रजीत आहेत, असे हे खंड असल्याने येथे मिळण्यास मला प्रयास पडणार नाही, असेही त्यांनी कळवलेले होते. म्हैसूरच्या पॅलेस लायब्ररीचे ग्रंथपाल महादेवशास्त्री यांच्याकडून उपनिषदे आणि त्यांचे भाषांतर मिळवावे, हे त्यांनी स्पष्ट केले होते. स्वत:च्या घरात कोणता ग्रंथ कोणत्या बाजूने, कोणत्या रकान्यात आणि कोणत्या ठिकाणी सापडेल, हेही त्यांनी कळवलेले होते. विशेष हे की, त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी ती पुस्तके मिळत होती आणि ती पुण्यातून त्यांच्याकडे पाठवण्यात येत होती. मागवलेल्या पुस्तकांमध्ये त्यांनी संत तुकाराममहाराज यांचा गाथा आणि समर्थ रामदासस्वामी यांचा दासबोध पाठवावा, असे लिहिले आहे. 

मंडालेहून पुस्तकांचे मागणीपत्र दर महिन्यात वाढतच होते. तेही स्वाभाविक होते. पण मंडालेच्या तुरुंगात राहून ते आपल्या केसरी आणि मराठा या पत्रांविषयीही काळजी करत होते. मंडालेत पुण्याहून आणि इतर भागांतून पाठविण्यात आलेल्या पुस्तकांची संख्या साडेचारशेच्या घरात निघाली. आपण तिथे नसताना खाडिलकर व केळकर या दोघांनाही ही वृत्तपत्रे सांभाळायची आहेत आणि ती ते काळजीपूर्वक चालवतील, अशी आपल्याला खात्री आहे; पण तरीही ब्रिटिशांची नजर लक्षात घेऊनच दोघांनीही स्वत:चे लेखन परस्परांना दाखवून मगच ते छपाईसाठी द्यावे, असेही ते कळवतात. ‘नेहमी लक्षात ठेवा की, एकाच्या दोन डोळ्यांपेक्षा चार डोळे कधीही चांगले असल्याने त्याबाबतची खात्री घेणे गरजेचे आहे’, असे त्यांनी बजावले. एका पत्राच्या शेवटी त्यांनी ‘केळकर, खाडिलकर आणि लिमये यांना मी विचारले आहे, असे सांगावे.’ असे लिहिले आहे. याचाच अर्थ, त्यांना या तिघांकडून पत्र लिहिले जावे असे अपेक्षित असणार, हे उघड आहे. धोंडोपंत विद्वांस हे भाचे आणि केसरीचे व्यवस्थापक असल्याने त्यांना लिहिलेल्या खासगी पत्रांमध्ये ते आपल्या पत्नीची व मुलांची चौकशी करीत. पत्नीच्या आजारपणात आपण तिथे नाही हे किती वाईट आहे, असेही ते एका पत्रात लिहितात. चिरंजीवांसोबत मथू या आपल्या कन्येलाही चांगले शिकवावे, असे त्यांनी एका पत्रात लिहिले होतेच; पण त्या पत्रात ‘खरे तर तीच चांगले शिकू शकते’ असे एक वाक्य असल्याने टिळकांना मुलीपेक्षा मुलांची चिंता कशी सतावत असेल, हेही लक्षात येते. त्यांच्या व्यायामाकडे लक्ष द्याावे, असेही ते लिहितात. 

टिळकांनी तुरुंगातल्या आपल्या वास्तव्यात फ्रेंच, जर्मन आणि पाली या भाषांचा पुस्तकांवरून अभ्यास केला. त्यांना या भाषा चार ते सहा महिन्यांत येऊ लागल्याचे त्यांनी एका पत्रात नमूद केले आहे. फ्रेंचसाठी व्हिक्टर ह्युगोचे ह्युगोज फ्रेंच रिडिंग, ह्युगोज व्हर्ब सिंप्लिफाईड, ह्युगोज फ्रेंच जेंडर्स, ह्युगोज कॉन्व्हर्सेशन सिंप्लिफाईड अशी चार पुस्तके त्यांनी वाचून आपला फ्रेंचचा पाया पक्का केला होता. ह्युगोचे व्याकरण पाणिनीशी मिळते-जुळते आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करायची आणि त्याबद्दलचे शोध घेत राहायचे, ही त्यांची उपजत वृत्ती होती. त्यामुळेच त्यांनी ब्रह्मदेशात असलेल्या मिकटिला (मेक्टिला) या नावाचा उगम कोठे असायची शक्यता आहे, ते दादासाहेब खापर्डे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. मिकटिला हे नाव रामायणातल्या जनक राजाच्या मिथिला या नावाशी साधर्म्य दाखवणारे आहे, असे त्यांचे मत होते. अलीकडे नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी नेपाळमध्ये श्रीरामाची अयोध्या होती, असा दावा केला असल्याने श्रीरामावर आता भारताच्या पूर्वेला किंवा ईशान्येकडे असणारे देश आपला हक्क सांगतील की काय, अशी शंका मनाला चाटून जाते. (हे मी गमतीने लिहिले आहे, अन्यथा एक नवा वाद निर्माण केल्याबद्दल मला जबाबदार धरले जाईल, ही भीती वाटते.) 
मंडालेला प्लेगची साथ आल्याने टिळकांना त्या तुरुंगातून मेक्टिला येथे हलविण्यात आले होते. तिथे त्यांनी आपले एक नवे मृत्युपत्र तयार केले. हे मृत्युपत्र टिळकांनी त्यांचे वकील मित्र दाजी आबाजी खरे यांच्याकडे ठेवायला द्या, असे धोंडोपंत विद्वांसांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. पुढे जाऊन ते लिहितात की, हे मृत्युपत्र जपून ठेवण्याबाबत खरे यांना काळजी घेण्यास सांगावे आणि ते एकसारखे फिरत असल्याने त्यांच्या सौभाग्यवतींजवळ ते द्यावे म्हणजे ते सुरक्षित राहील, असेही त्यांनी म्हटलेले आहे. आधीचे मृत्युपत्र त्यांनी श्रीलंकेत केले होते. या मृत्युपत्राची एक अस्सल प्रत माझ्याकडे कल्याणचे दत्ता जोशी यांनी आणून दिली होती. ही प्रत अस्सल होती, हे त्या पत्रातल्या अक्षराची खात्री करून घेतल्यावर स्पष्ट झाले. दत्ता जोशी हे आपल्या आजोळी म्हणजे दापोलीजवळ हर्णे येथे गेले असताना त्यांना आवराआवरीत एका मोठ्या ट्रंकेत हे मृत्युपत्र आढळले. त्यांनी त्याबाबतची वाच्यता माझे एक स्नेही आणि सद्‌गुरू साईबाबा या दिवाळी अंकाचे संपादक बाळ जाधव यांच्याकडे केली. त्यांनी ते मला सांगितले आणि त्या मृत्युपत्राला मी केसरीचे संपादक आणि लोकमान्यांचे पणतू डॉ.दीपक टिळक यांच्याकडे समारंभपूर्वक सुपूर्द केले. हे मृत्युपत्र केसरी कार्यालयात लोकमान्य संग्रहालयात आजही पाहायला मिळू शकते.

दि.9 सप्टेंबर 1909 रोजी टिळक पुन्हा मेक्टिलाहून मंडालेला परत आले. त्यानंतर वर्षभराने त्यांनी ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहायला घेतला. गीतारहस्य हा एक अद्‌भुत ग्रंथ तर आहेच, पण तो हिंदू धर्मविषयक तत्त्वज्ञानाने भारलेला गेल्या दोन शतकातला सर्वोत्तम ग्रंथ आहे. हा ग्रंथ म्हणजे टिळकांनीच म्हटल्याप्रमाणे ‘गीतेचे बहिरंग परीक्षण, मूळ संस्कृत श्लोकांचे मराठी भाषांतर, अर्थनिर्णायक टीपा, पौर्वात्य व पाश्चिमात्य मतांची तुलना वगैरे’सह परिपूर्ण आहे. ‘गीतारहस्या’त प्रामुख्याने दोन भाग पाडण्यात आले, त्यापैकी पहिल्या भागात आधुनिक वाटावीत अशा पद्धतीची प्रकरणे आहेत. उपसंहारासह एकूण पंधरा प्रकरणे पूर्वार्धात आहेत आणि उत्तरार्धात गीतेचे बहिरंग परीक्षण आहे. त्यात गीता व महाभारत, गीता व उपनिषदे, गीता व ब्रह्मसूत्रे, भागवत धर्माचा उदय व गीता, हल्लीच्या गीतेचा काल, गीता व बौद्ध ग्रंथ, गीता व ख्रिस्ती बायबल असे एकूण सात स्वतंत्र भाग आहेत आणि त्यानंतर गीतेचा श्लोकवार अर्थ देण्यात आला आहे. या शेवटच्या भागात गीतेचे मूळ श्लोक, त्यांचे मराठी भाषांतर आणि टीपा देण्यात आल्या आहेत. अगदी आजच्या भाषेत सांगायचे तर, एवढा सर्वसाक्षी ग्रंथ झाला नाही. हा ग्रंथ त्यांनी मंडालेच्या तुरुंगात लिहायला घेतला आणि तुरुंगातच लिहून पूर्ण केला. 

हा एवढा मोठा ग्रंथ लोकमान्यांनी विक्रमी वेळेत लिहून पूर्ण केला. 2 नोव्हेंबर 1910 रोजी त्यांनी ग्रंथलेखनास प्रारंभ केला आणि पहिली आठ प्रकरणे त्यांनी एक महिना सहा दिवसांमध्ये पूर्ण केली. हे काम 413 पानांचे होते. संपूर्ण लेखन त्यांनी 30 मार्च 1911 रोजी संपवले आणि त्यानंतर त्यांनी सविस्तर प्रस्तावना लिहायला घेतली. पुस्तकाची अनुक्रमणिका, समर्पण हेही त्यांनी त्याबरोबरच पूर्ण केले. कोणत्या मजकुरापुढे कोणता मजकूर घ्यायचा, याबद्दलचा तपशीलही त्यांनी स्वतंत्ररीत्या लिहून ठेवला. प्रत्यक्षात हा ग्रंथ 888 पानांचा झाला आहे. 

आपल्याला आता शेवटही दिसू लागला असल्याचे ‘कृतांतकटकामलध्वज-जरा दिसों लागली, पुरस्सर गदांसवे झगडता तनू भागली’ या महाराष्ट्र कविवर्य मोरोपंतांच्या श्लोकातून प्रस्तावनेत त्यांनीच सांगितले आहे. या ग्रंथाची संकल्पना त्यांच्या मनात वयाच्या अगदी सोळा वर्षापासूनच घोळत असली पाहिजे. त्यासाठी लागणारा अपूर्व असा व्यासंग त्यांच्या अंगी होता, म्हणूनच हे लेखन कोणत्याही अर्थाने सुखासमाधानाची स्थिती नसताना पार पडले. पण टिळकांचा स्वभाव लक्षात घेता, एखादी गोष्ट त्यांनी हाती घेतली की तिच्या मागे हात धुऊन लागण्याची त्यांची सवय होती आणि त्याप्रमाणे त्यांनी हे काम विक्रमी वेळेत पूर्ण केले. हे सर्व लेखन त्यांना पेन्सिलीने करावे लागलेले आहे आणि या वह्या आजही केसरीमध्ये अतिशय जपून ठेवलेल्या आहेत. पुन्हा एकदा थोडासा विषयांतराचा धोका पत्करून एका गोष्टीचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. मी जे इथे लिहितो आहे त्याबद्दल कोणी ती अंधश्रद्धा म्हणेल, पण ती तशी नाही- हे मी शपथेवर सांगायला तयार आहे. त्याचे असे आहे की, अनेकांना ही घटना म्हणजे अशक्य कोटीतली कथा वाटेल, पण ती मी स्वत: लोकमान्य टिळकांचे नातू आणि माझे पहिले संपादक जयंतराव टिळक यांच्याकडून ऐकलेली आहे. 12 जुलै 1961 रोजी पानशेत धरण फुटले आणि केसरी जिथून प्रसिद्ध होतो, त्या गायकवाड वाड्याच्या प्रांगणात पाणी शिरले. ते बघता-बघता वाढले आणि ते ग्रंथशालेत भसाभस शिरले. पाणी वाढत होते आणि डोळ्यांदेखत त्या ग्रंथशाळेतल्या अनेक ग्रंथांना ते पोटात घेऊन गेले. केसरीच्या जुन्या अंकांच्या काही फायलीही पाण्याच्या भक्ष्यस्थानी पडल्या. त्यांचा अगदी लगदा झाला. त्या फाइल्स जिथे होत्या त्याच्याच वरच्या बाजूला गीतारहस्याचे हस्तलिखित आणि लोकमान्यांनी लिहिलेली पत्रे, तसेच पंडित मोक्षमुल्लर भट्ट अशी सही असलेले मॅक्समुल्लर यांचे पत्र आणि काही महत्त्वाची कागदपत्रे होती. ज्या ठिकाणी हे पाणी शिरून त्या हस्तलिखिताचा लगदा होण्याची शक्यता होती तिथे हे पाणी थांबले आणि त्या हस्तलिखिताला कोणतीही बाधा पोहोचली नाही. संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांची गाथा इंद्रायणी नदीत तरल्याची कथा आपण ऐकतो, तशी ही कथा खुद्द जयंतरावांच्या तोंडून मी ऐकलेली आहे. तेव्हा मी शहारून गेलो होतो आणि डोळ्यांत पाणी आले होते. त्या काचपेटीबाहेर लाल खुणेची एक आडवी रेघ होती. त्या खुणेपर्यंत पाणी आले आणि ते ओसरले. पुढे कित्येक दिवस मी त्या ग्रंथालयात गेलो की, काचपेटीतल्या त्या हस्तलिखितापुढे नतमस्तक होत असे. बालकृष्णाचा पाय यमुनेच्या पुराला लागल्यावर ज्याप्रमाणे ते पाणी ओसरले आणि कंस राक्षसाकडून येणाऱ्या मृत्यूपासून त्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी तो वसुदेव कृष्णासह यमुनापार पोहोचला, तशीच ही एक कथा. ती खूण त्या ग्रंथालयाची इमारत पाडली जाईपर्यंत तिथे होती. 

सांगायचा मुद्दा हा की, पानशेतचा पूरही हिमालयाची उंची असलेल्या त्या ग्रंथाला हात लावू शकला नाही, असा हा कर्मयोगशास्त्राचे विस्तृत विवेचन करणारा आणि आपल्या वैचारिकतेच्या सर्व पैलूंना स्पर्श करणारा ग्रंथ शतकातून एकदाच होतो, असे म्हटले तरी चालेल. सांगायचा मुद्दा हा की, टिळकांनी गीतारहस्य लिहिले आणि कदाचित त्यांना खूपच मोठे ओझे उतरल्यासारखे वाटत असणार, यात शंका नाही. अजून तर फक्त तीन वर्षेच झाली होती, शिक्षेची तीन वर्षे उरली. प्रिव्ही कौन्सिलकडे टिळकांच्या वतीने दादासाहेब खापर्डे यांनी अर्ज करायचे ठरवले. त्यांनी तो केलाही, पण भारतमंत्री मोर्ले आणि प्रिव्ही कौन्सिल यांनी राजाला तसा सल्ला द्यायचे नाकारले. टिळकांना ही बातमी कळली, पण म्हणून ते नाराज झाले नाहीत. सौभाग्यवतीने सिंहगडावर जाऊन राहावे आणि फार तर मुलांनाही बरोबर न्यावे, असे त्यांनी धोंडोपंतांना पत्राद्वारे कळवले. आपल्या भावालाही त्यांनी न्यावे, पण तिथल्या हवेत त्यांना आराम पडावा, अशी आपली इच्छा असल्याचे त्यात त्यांनी म्हटले होते. मन चिंती ते वैरी न चिंती, अशी ती अवस्था होती. पुढे जे घडू नये, असे त्यांनाच काय, त्यांच्या मुलाबाळांना वाटत असेल ते घडून गेले. सौभाग्यवती सत्यभामाबाई टिळक यांचे 7 जून 1912 रोजी निधन झाले. हा मंडालेत असणाऱ्या टिळकांवर वज्राघात होता. 

धोंडोपंतांना दि. 8 जून रोजी पाठवलेल्या पत्रात त्यांनी लिहिले की, ‘संकटांचा स्वीकार अतिशय शांतपणे करायची सवय मला आहे. आपल्याकडे ज्या समजुती रूढ आहेत, त्यात पत्नीने पतीच्या आधी जाणे याला अनिष्ट मानत नाहीत. पण अखेरच्या क्षणीही मी तिथे नाही, हे सर्वांत क्लेशदायक आहे. मला नेहमी ही धास्ती वाटत होती आणि शेवटी तसेच घडले. माझ्या आयुष्यातला एक अध्याय संपला आहे आणि दुसराही संपायला फार वेळ लागणार नाही.’ टिळकांच्या मनाची अवस्था काय झाली असेल, ते या पत्रातून स्पष्ट होते. आपल्या मुलांवर हे जे संकट कोसळले आहे, त्याविषयीही त्या पत्रात उल्लेख आहे. आकाश कोसळले तरी त्यावर पाय देऊन उभे राहायची न्यायालयासमोर प्रतिज्ञा करणाऱ्या टिळकांवर खरोखरच आकाश कोसळले होते आणि त्यावर पाय देऊन उभे राहणे त्यांच्या आवाक्यापलीकडचे होते. त्यानंतर त्यांनी जी पुस्तके पुण्याहून मागवली होती, त्यात एक होते नित्शेचे (निट्‌झे) ‘बियाँड गुड अँड एव्हिल’ (फॉन गुट उंड ब्योज). त्यात ज्ञानाची व्याख्या ही मार्क्सच्या संकल्पनेशी मिळती-जुळती आहे; पण मार्क्सचा सिद्धांत हा काहीसा आर्थिक संबंधांना स्पर्श करणारा आहे, तर नित्शे त्याच्या सामाजिक परिणामांना विचारात घेतो. मार्क्स हा सामाजिक मांडणीचा विचार आधी करतो, तर नित्शे हा सर्व प्रश्नांच्या मुळाशी सामाजिक समतेचा प्रश्न असल्याचे सांगतो. लोकमान्यांची तुरुंगातून बाहेर पडतानाची दिशा स्पष्ट होती. 

सुटकेचा दिवसही जवळ येत चालला होता. गीतारहस्यानंतर त्यांनी वेदिक क्रोनॉलॉजी किंवा वैदिक कालगणना हा वेदांग ज्योतिषावरील ग्रंथही मंडालेच्या तुरुंगात लिहिला आणि तोही एका अर्थाने अपुराच राहिला. या ग्रंथाची तारीख आहे 15 मे 1914. त्यांनी 1 जून 1914 रोजी धोंडोपंतांना लिहिले की, येथून पुढे मी पत्र लिहीन की नाही हे सांगता येत नाही. मला अन्य कुठे हलवणार आहेत किंवा काय, तेही माहिती नाही. मृत्युपत्राच्या अर्थाबाबत काही मतभेद असल्याने मूळ मृत्युपत्राचे शब्दश: भाषांतर करून घेणे आणि ते रोमन लिपीत छापून घेणे चांगले. 

मंडालेच्या तुरुंगास ‘लोकमान्य’ लिहिणारे प्रा.न.र. फाटक यांनी ‘मंडालेचे कारातीर्थ’ अशी उपमा दिली आहे. लोकमान्यांची सुटका अखेरीस झाली 1914 च्या 8 जूनला. त्यांच्या कारागृहाचा पर्यवेक्षक तिथे आला आणि त्याने टिळकांना सामान आवरायला सांगितले. त्यांच्या तिथून निघण्याची ही पूर्वसूचना होती. इथून पुढे कोठे याचा त्यांना अंदाज नव्हता. मंडालेच्या किल्ल्यात एक डबा लागलेला होता. त्याचे इंजिन तयार होते. हा डबा पुढे मेलला जोडला गेला. तिथून रंगून, एवढे तरी नक्की होते. टिळकांनी आपली पगडी बरोबर घेतली होती, पण ती त्यांनी या प्रवासात घालू नये, असे त्यांना सांगण्यात आले. त्यांच्या आत्मस्वातंत्र्याचा तरी तो दिवस होता. त्यांनी एक टोपी घातली. दि.9 जून 1914 रोजी रंगून बंदरात उभ्या असलेल्या मेयो या बोटीवर टिळक गेले. तेव्हा त्यांना बहुतेकांनी ओळखले नाही. ही बोट मद्रासकडे चालली, हे निश्चित होते. दि.15 जून 1914 रोजी रात्री 8 वाजता टिळक मद्रास बंदरात दाखल झाले. त्यांना घेऊन जाण्यास रंगूनमध्ये पुण्याचे पाच पोलीस अधिकारी आले होते. ते मद्रासमध्ये त्यांच्याबरोबरच बोटीवर चढले आणि त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. 

Tags: काळकोठडी मंडाले टिळक स्मृतिशताब्दी अरविंद व्यं गोखले लोकमान्य टिळक bal gangadhar tilak lokamanya tilak lokmanya tilak 100 death anniversary arvind gokhale on tilak arvind vyan gokhale weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अरविंद व्यं गोखले,  पुणे
arvindgokhale@gmail.com

पत्रकार-संपादक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके