डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

इस्लामच्या नावाने स्थापन झालेल्या पाकिस्तानचे भाषेच्या प्रश्नावर दोन तुकडे झाले. कारण, पंजाबी मुस्लीम व बंगाली मुस्लीम यांचे प्रथमपासूनच सख्य नव्हते. बंगालीभाषक मुस्लिमांना उर्दू ही राष्ट्रभाषा म्हणून मान्य नव्हती. एखाद्या व्यक्तीचे समाजातील स्थान ज्या अनेक गोष्टींवरून ठरते त्यात धार्मिक अस्मिता ही एक गोष्ट आहे. पण यात राजकारण आणले तर काय घडू शकते हे निदान भारतीयांना तरी वेगळे सांगायला नको. धार्मिक अस्मितेने प्रश्न सुटत नाहीत तर वाढतात.

जगात असे एकही राष्ट्र नाही की जिथे अल्पसंख्याकांचा प्रश्न नाही. हुकूमशाही असलेले देशही याला अपवाद नाहीत. लोकशाही राजवट असलेल्या देशात आपली भाषा, धर्म व संस्कृती यांची जपवणूक करण्याचे अनेक मार्ग अल्पसंख्याकांना खुले आहेत. भारतीय घटनेत तर त्यांचे हक्क लिखित स्वरूपात आहेत (कलम 25 ते 30). तरीही लोकशाही राजवटीत अल्पसंख्याकांचे बाबतीत कठीण प्रश्न निर्माण होतात. अमेरिकेत काळ्या लोकांच्या बाबतीत गंभीर प्रश्न निर्माण झाले व त्यासाठी मार्टिन ल्यूथर किंग (ज्यू.) यांना लढा उभारावा लागला, यामुळे सारा समाज ढवळून निघाला.

दोन वर्षांपूर्वी तुरुंगातील कैद्यांचे सर्वेक्षण केले असता पाहणीत असे दिसून आले की एकाच प्रकारच्या गुन्ह्यासाठी काळ्या कैद्यांना गोऱ्या कैद्यांपेक्षा जास्त शिक्षा दिलेली आहे. मादक द्रव्ये बाळगणाऱ्या काळ्या आरोपीस गोऱ्यांपेक्षा जास्त शिक्षा मिळते. अमेरिकेत हे प्रकार आजही सुरू आहेत. उत्तर आयर्लंडमध्ये हीच परिस्थिती आहे. इस्लामच्या नावाने स्थापन झालेल्या पाकिस्तानचे भाषेच्या प्रश्नावर दोन तुकडे झाले. कारण पंजाबी मुस्लीम व बंगाली मुस्लिम यांचे प्रथमपासूनच सख्य नव्हते. बंगाली भाषक मुस्लिमांना उर्दू ही राष्ट्रभाषा म्हणून मान्य नव्हती. भारतामधून पाकिस्तानात जी मुस्लीम कुटुंबे स्थलांतरित झाली त्यांना पाकिस्तानात 'मुजाहिर' म्हणून संबोधले जाते. त्यांची भाषा उर्दू असूनही भारतामधील मुसलमानांपेक्षा त्यांचा जास्त छळ पाकिस्तानात सुरू आहे.

अस्मितांचे राजकारण :

अस्मिता - मग ती धार्मिक, सांस्कृतिक व भाषिक असो, तिचा व अल्पसंख्याकांचा संबंध काय? एखाद्या व्यक्तीचे समाजातील स्थान यामुळे लक्षात येते. समाजातील अभिजन वर्ग याच्या मदतीनेच समाज एकत्र करतो. अस्मितेचे स्वरूपही बदलत असते. अस्मितेचा उपयोग राजकारणासाठी होत नसेल तर त्या अस्मितेचे महत्त्व आपोआप कमी होत जाते.

ब्रिटिश भारतात आले तेव्हा भारतात मर्यादित स्वरूपात लोकशाही राबविण्यास त्यांनी सुरुवात केली. भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंतच्या काळात लोकशाही विकसित करून पूर्ण लोकशाहीकडे वाटचाल सुरू झाली व यामुळे धार्मिक अस्मितेचे संदर्भच बदलले. मुस्लीम समाजाचे प्रश्न स्थानिक व्यवसाय, जात बिरादरी यांपुरते मर्यादित असत व हे प्रश्न सोडविण्याकडे त्यांचा कल असे. परंतु एका बाजूला ब्रिटिशांचे धोरण व दुसऱ्या बाजूला अभिजन वर्गाचे राजकारण यांमुळे धार्मिक अस्मितेलाच महत्त्व प्राप्त झाले. बंगाली, तांबोळी, रंगरेज अशा प्रकारचे भेद संपून मुस्लीम म्हणून अस्मिता वाढीला लागली. धार्मिक अस्मितेने प्रश्न वाढतात. बदलत्या संदर्भात निर्माण झालेल्या मुस्लीम अस्मितेमुळे मूळ प्रश्न सुटले का? उलट जास्त समस्या निर्माण झाल्या. कष्ट करणाऱ्या सामान्य मुस्लिमाला याचा काय फायदा झाला? उच्चवर्णीय मुस्लीम व सामान्य मुस्लीम यांचे प्रश्न सारखे होते का?

नवीन निर्माण झालेल्या या अस्मितेमुळे सामान्य मुसलमान अभिजन वर्गाच्या हातामधील बाहुले बनला व धार्मिक दंगलीत तोच होरपळून निघाला. डाव्या विचारसरणीचे लेखक श्री. ख्वाजा अहमद अब्बास यांनी यावर कडक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते लिहितात, ‘‘भारतीय मुस्लीम असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यांपुढे कोण असतो ? जीना, छगला, आगाखान का सामान्य स्त्रीपुरुष? एखाद्या वस्तीतील वयस्कर मुस्लीम आजी पाच वेळा नमाज पढते, अल्ला व पैगंबरनंतर गांधीबाबांचे नाव घेते, गांधींच्या भाषणाने प्रेरित होऊन आपला मृतदेह मृत्यूनंतर परदेशी कापडात न गुंडाळता खादीच्या कपड्यात गुंडाळावा म्हणून स्वतः कपडे तयार करते. कोणता भारतीय मुस्लीम अभिजनांना अभिप्रेत आहे ?’’

श्री. ख्वाजा यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. 'धार्मिक अस्मितेने प्रश्न सुटत नाही तर वाढतात. हिंदू व मुस्लीम अभिजन वर्गाने स्वतःच्या स्वार्थासाठी ब्रिटिश राज्यकर्त्यांना साथ दिली नसती तर खूप प्रश्न सुटले असते. कदाचित फाळणीही टळली असती. धार्मिक अस्मितेला महत्त्व नाही असे माझे म्हणणे नाही. या अस्मितेपुरताच विचार केला तर समाजात काही चांगल्या व अर्थपूर्ण घटना घडू शकतात. एखाद्या व्यक्तीचे समाजातीत स्थान ज्या अनेक गोष्टींमुळे ठरते, त्यात धार्मिक अस्मिता ही एक गोष्ट आहे. पण यात राजकारण आणले तर काय होऊ शकते हे भारतीयांना तरी वेगळे सांगावयास नको. विशेषतः लोकशाहीत याचे फार वाईट परिणाम होतात.' 

अस्मिता खरी व खोटी :

अस्मिता खरी व खोटी कशी बदलू शकते हे मौलाना महमद अली यांच्या उदाहरणावरून दिसून येते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस मौलाना हे भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीतील एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व होते. 1930 ला जी गोलमेज परिषद झाली तेव्हा ते म्हणाले, ‘‘मी प्रथम मुस्लीम आहे व शेवटपर्यंत मुस्लीमच राहीन. ही अस्मिता सोडून मी राहू शकणार नाही व ते मी करणार नाही.’’ पण भारताबाबतचे प्रश्न आले तर ते त्यांनी कधीही दुय्यम मानले नाहीत. भारत व इस्लाम या दोहोंशी ते प्रामाणिक होते. यात त्यांना विरोध वाटत नसे. ते म्हणत, ‘‘भारताचे स्वातंत्र्य, भरभराट याचा प्रश्न असेल तेव्हा मी फक्त भारतीयच आहे. प्रथमपासून शेवटपर्यंत.’’ गांधीजींच्या ते अगदी आतील गोटातील होते, तेव्हा ते म्हणत, ‘‘ज्यू, ख्रिश्चन किंवा इतर कोठेही गांधींसारखा उदार मनाचा माणूस मी पाहिला नाही.

श्री. अब्दुल बारी यांच्याबद्दल मला खूप आदर आहे तरीही गांधीजींपेक्षा मोठा माणूस मला भेटला नाही. महंमद पैगंबरांनंतर फक्त गांधीजींचीच आज्ञा पाळणे हे मी माझे कर्तव्य समजतो.’’ खिलाफत चळवळीतील मुख्य नेते श्री. महंमद अली यांची धार्मिक, राजकीय व राष्ट्रीय अस्मिता वरीलप्रमाणे होती. अस्मिता वेगवेगळ्या संदर्भांत बदलते. कायम अशी एकाच गोष्टीवर ती केन्द्रित राहत नाही. बहुसंख्याकांबाबतही हेच म्हणता येईल. हिंदू समाजाची अस्मिता न बदलणारी व बंदिस्त नाही. हिंदुत्ववादी फक्त हिंदुत्वावर भर देतात व राजकीय, वर्गीय, जातीय मतभेदांकडे मात्र दुर्लक्ष करतात. त्यातही पुन्हा धार्मिक अस्मितेवर त्यांचा जास्त जोर असतो.

तामिळनाडू, उत्तर प्रदेश, ओरिसा व इतर प्रांतांतील शेतकरी वर्ग एका बाजूला व म्हैसूरचे महाराज, लालकृष्ण अडवानी, करणसिंगसारखे लोक दुसऱ्या बाजूला, अशी जर तुलना केली तर या दोघांत भाषा, संस्कृती, वर्ग व राजकीय हितसंबंध यात काहीतरी साम्य आहे का? असे साम्य नाही तरीही हिंदुत्ववादी विचाराचे लोक हिंदुत्व हीच आमची अस्मिता आहे, आम्ही सर्व एकाच धर्माचे, संस्कृतीचे आहोत, आमची संस्कृती संमिश्र नाही असे कोणत्या आधारावर म्हणतात? म्हणून हिंदुत्ववादी जरी फक्त हिंदू धर्म अस्मितेवर जोर देत असतील तर त्यामुळे अल्पसंख्य जमातींनी घाबरण्याचे कारण नाही. अनेक अस्मितांचा धार्मिक अस्मिता एक भाग आहे. धार्मिक अस्मिता जेव्हा कार्यरत असतात त्याच वेळी इतर अस्मितांचे एकत्रीकरणाचे कामही कार्यरत असते. स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्यानंतरच्या काळात, विशेषतः 1980 नंतर हिंदु-मुस्लीम संघर्ष वाढले. कारण इतर अस्मितेकडे दुर्लक्ष करून धार्मिक अस्मितेवरच जोर देण्यात आला म्हणून इतर अस्मितांवर जोर देऊन त्या जास्तीतजास्त कार्यरत करून त्याचा उपयोग करून घेणे हाच एक मार्ग उपलब्ध आहे.

(‘हिंदू’वरून रूपांतरित - श्री. कृ. रा. लंके)

Tags: अस्मितांचे राजकारण हिदू-मुस्लीम संघर्ष धार्मिक अस्मिता वैचारिक politics for identities hindu-muslim conflicts religious identities ideological weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके