डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

केतनच्या आईला बाबांच्या नाटकांचा राग होता. त्यांच्या नाटकांनीच तिला रस्त्यावर आणले, याचा हा राग. केतन आणि त्याची लहान बहीण यांना त्यांच्या आईने वाढवले, मोठे केले, शाळेत नोकरी केली. ती त्याच्या बाबांना 'नाटकी' म्हणायची, केतनने मेडिकलला असताना गॅदरिंगमधे नाटके बसवली. त्यांत कामे केली तेव्हा त्याची आई देवयानीला म्हणाली होती. देवयानी, ही नाटकं कॉलेजच्या गॅदरिंगपुरतीच असू देत हं."

फायनल एम.बी.बी.एस. चा शेवटचा पेपर देऊन केतन हॉलबाहेर आला तेव्हा बाहेर देवयानी त्याची वाट पाहात उभी होती. तिने हात उंच करून त्याचे लक्ष वेधून घेतले आणि ती घाईघाईने त्याच्याजवळ आली. "कसा गेला पेपर ?" "त्याबद्दल नको विचारू", तो हसतचम्हणाला,  'का ?" ती त्याच्याबरोबर जाऊ लागली. मुलांचे घोळके इथेतिथे उभे होते. पेपरची चर्चा करत. "परीक्षा फायनलची आहे. पुढल सगळ एकदम समोर येतं: मग ही परीक्षा संपल्याचा आनंद सांडून जातो." तो म्हणाला . "तू हा शब्द छान वापरलास. सांडून जातो. "त्यात छान काय ?" "तुझ्या मनातलं सगळं सांगून टाकलं त्या शब्दानं." देवयानी म्हणाली. दोघे बाहेर आली. मेडिकल कॉलेजच्या आवारातील झाडे सळसळत होती. नोव्हेंबरची हलकीशी थंडी सुरु होत होती. 

केतनने वर आभाळाकडे पाहिले, चालता चालता थबकून. "काय पाहातोस ?" "आभाळ पुष्कळ दिवसांत पाहिलं नाही." "आता पाहा मनसोक्त." "कुणास ठाऊक" तो म्हणाला. ते थट्टेत की कसे, ते तिलाही कळले नाही. "आता सगळ्यांच्या अपेक्षा सुरु होतील. आईच्या, तुमच्याकड्याच्या लोकांच्या आधीच्या परीक्षांमध्ये हे काही नव्हतं." मग त्यात वाईट काय, असे म्हणावेसे याहूनही ती काही बोलली नाही. "आपण एका तीक्ष्ण धारदार रेषेवर उभे असतो. इंटर्नशिप, पोस्ट ग्रॅज्यूएशन, एम.डी., एम.एस. अनेक परीक्षा अभ्यास. त्या लांबलचक रेषेवरले हे आपल्या मुक्कामाचे ठिपके." "ठिपके का म्हणतोस ?" "माहीत नाही, आपण कुठे स्थिर होणार आहोत" डोन्ट वी अ फिलॉसफर. केतन तुझे इतकं काही अनिश्चित नाही हं. चल आपण कॉफी घेऊ. काही खाऊपण." दोघे कंफेटेरियात आली. इथे त्याचा ग्रुप आधीच जमलेला होता. आनंद, अगरवाल, जोशी गुप्ता “या. लग्नाची कार्ड छापायला द्यायची असतील", अगरवाल म्हणाला. "वेळ आहे पुष्कळ", देवयानी म्हणाली, “आता कुठे सेकंड इयर." "केतनला काय ! सासऱ्याचे एवढं हॉस्पिटल, वाटच बघतोय तो तुझी. 

ऑर्थोपेडिक सर्जन, देवयानीही येतेच मागोमाग एक मजला तिचाही." "तू तुझे बोल", केतन म्हणाला. “त्याचं काय, ही विल सर्टनली नॉट बेस्ट हिमसेल्फ इन धिस रॉटन कंट्री", गुप्ता त्याची नकल करत म्हणाला कॉफी, खाण्याचे बिल केतनने दिले. "काफी कशाबद्दल रे ?" अगरवालने चिडवले. "माझ्या सासऱ्याच्या हॉस्पिटलबद्दल...", केतन हसत हसत म्हणाला. स्कूटरजवळ आल्यावर केतनने विचारले, "घरीच जायच आहे ?" "तू म्हणशील तस आई्ला कल्पना दिली आहे. कुठं तरी बाहेरही जाऊ म्हणून," “उद्या एक चांगल नाटक आहे, सध्या नाट्यमहोत्सव सुरू आहे. त्याची तिकिटं काढून घेऊ, मग ठरवू कुठे जायचं ते." तो "तिकिटं मिळतील वेळेवर ?" "बघू. समोरची मिळाली तर घेऊ. दोन प्रयोग आहेत. मी या नाटकाबद्दल खूप ऐकतो आहे. " हो !" "एका मुक्या, पहिल्या आणि आंधळया मुलीला एक शिक्षिका शिकवते भाषा. वस्तु, वस्तूची संकल्पना, अर्थ या सर्व पातळीपर्यंत पोचणारी भाषा शिकवते. देवयानी, इथे भाषा ही किती तोकडी, अपुरी ? ती ग्रहण करणार कुठलंही माध्यम नाही. 

दृष्टी श्रवण, वाणी. पण त्या भाषेलाही संवेदनांच्या गाभ्यापर्यंत वाकवणारी ती कुणी शिक्षिका…आजूबाजूला कुणीही नसावे असा केतन बोलत होता मोठयाने. देवयानी त्याचा हात धरून त्याला बुकिंग टेबलशी घेऊन गेली. लाईनमध्ये समोर संतोष होता. तिकीट घेऊन वळला तर दिसलाच, मग तिकिटे घेऊन केतन संतोषशी खूप वेळ बोलत राहिला, देवयानीची अजिबात दखल न घेता. संतोष केतनला सीनियर होता. केतनने गॅदरिंगमपे दोन वर्षे नाटक बसवले, त्यात केतनने मुख्य भूमिका केली होती. दोघे किती वेळ त्यावरच बोलत होते. मग संतोषचेच लक्ष गेले. देवयानी कंटाळून उभी होती. अरे, देवयानी बोअर होते आहे", तो म्हणाला. "नाही, ऐकतेय तुमचं बोलणं." "काय लग्न कधी ?" दोघांकडे बघत संतोषने विचारले. "संतोष, तू सिनियर आहेस. तुझे लग्न आधी." देवयानी म्हणाली. "अग त्याला लग्न करायला वेळ नाही. परीक्षा द्यायच्या आहेत. अभ्यास आहे. लंडनला जायचे आहे. 

त्यामुळे लग्न ही अगदी क्षुद्र गोष्ट" केतनने चिडवले. स्वीमिंग सुरु आहे अजून ?" देवयानीने विचारले "हो." संतोष म्हणाला. "त्याला त्यातही विक्रम करायचा आहे. पोहून जायचं आहे लंडनला, विमानानं नाही." केतनने चिडवले. उद्या नाटकात भेटूय, म्हणून संतोष गेला "किती दिवसांनी भेटला हा ! आज भेटला तर वाटलं की याला घेऊन पुन्हा एक नाटक करावं." केतन म्हणाला. दोघ हॉलवर पोचली तेव्हा नाटकाची वेळ झाली होती तरी गर्दी नव्हती. बहुतेक अर्थ थिएटर रिकामे होते. "अगदी गर्दी  नाही. नाटक बघताना थिएटर गच्च भरलेलं असतं की बरं वाटतं." देवयानी म्हणाली. केतनला वाटलं… संपूर्ण थिएटरमधे एकच जण बसलेला आहे. एक नाटक समोर होते आहे. तो प्रकाशझोत त्या व्यक्तीपर्यंत थेट पोचतो. त्या व्यक्तीत शिरतो. बाकी कुणी आहे की नाही याला काय महत्त्व थिएटर पूर्ण भरलेलं असो - नसो, तो प्रकाश देणारा घेणारा आपापल्या जागी एकटेच असावेत..." नाटकाचा पडदा वर जाईतो केतनचे त्याच्या बाजूच्या खुर्चीकडे सारखे लक्ष जात होते. ती संतोषची होती. 

त्याचा नंबर केतनच्या आधी होता. संतोषची खुर्ची रिकामी होती, नाटक सुरू झाले तरी. मग मात्र केतनचे लक्ष रिकाम्या खुर्चीकडे गेले नाही. एक अंक संपल्यानंतर त्याला पुन्हा दिसले, संतोष आलेलाच नाही. "संतोष का आता नसेल ?" त्याने देवयानी विचारले. "आला नाही का ?" ती सहज म्हणाली. तो आला नसल्याचे तिच्या लक्षात आले नव्हते, याचा केतनला एकदम राग आला. "बाजूची खुर्ची रिकामी आहे. काल संतोषच्या मागेच होतो आपण." तो चिडून म्हणाला. मग आपण उगाचच चिडलो असे वाटून तो नरमाईने म्हणाला, "वेफर्स घेऊन येऊ ?" "नको" तीही रागाने म्हणाली, मग केतनने तिचा हात हातात घेतला. बोट एकांत एक गुंफली. पडदा पडला होता. अर्धा भरलेला हॉलही रिकामा होत होता. लोक परततही होते. नाटक पुष्कळांना आवडले नव्हते.  

"देवयानी, प्रयोगापूर्वी आणि नंतर थिएटर रिकामंच असतं नं ! मला फार कुतूहल होतं लहानपणी त्याचं, की या रिकाम्या वेळी तिथं काय असतं, कसं होतं ? मी लहानपणी वडिलांची नाटकं पाहिली आहेत. मी नेहमी जायचो, नाटक संपलं की पडद्याआड जाऊन बसायचो. सेट काढून टाकताना बघायचो. रिकामं थिएटर व्हायच. खूप झोप यायची, तरीही हट्टान जागा राहायचो. मग वडील उचलून घ्यायचे तेव्हा जाग यायची." "तेव्हाही तुझी आई नव्हती येत का प्रयोगाला ?" तिने भीत भीत विचारले. "येत होती सुरुवातीला. मग तिनं बंद केलं. या नाटकापायी बाबा कर्जबाजारी झाले. मग त्यांनी घरच सोडलं. आईला याचा खूप राग यायचा. देवयानीने मग त्याला मधेच थांबवले. हा विषय केतनच काढायचा नेहमी आणि मग शेवटी त्याचा मूड जायचा, हेही तिला माहीत होते. 

केतनच्या आईला बाबांच्या नाटकांचा राग होता. त्यांच्या नाटकांनीच तिला रस्त्यावर आणले, याचा हा राग. केतन आणि त्याची लहान बहीण यांना त्यांच्या आईने वाढवले, मोठे केले, शाळेत नोकरी केली. ती त्याच्या बाबांना 'नाटकी' म्हणायची, केतनने मेडिकलला असताना गॅदरिंगमधे नाटके बसवली. त्यांत कामे केली तेव्हा त्याची आई देवयानीला म्हणाली होती. देवयानी, ही नाटकं कॉलेजच्या गॅदरिंगपुरतीच असू देत हं." नाटक संपले तेव्हा संध्याकाळचे सात झाले होते. केतन काहीच बोलत नव्हता. नाटकाचा त्याच्यावर खूप परिणाम झालेला दिसतच होता. देवयानीला मात्र ते नाटक इतके चांगले वाटले नाही. प्रयोगात ते उणे वाटते. मुळात कल्पना परकीय होती. त्याचे मराठीकरण उमटले नव्हते. काही नाटके फक्त स्क्रिप्टवरचीच असावीत, प्रयोगात ती फसावीत असे ते नाटक वाटते. पण ते केतनला सांगावेसे तिला वाटले नाही. ते त्याला अजिबात आवडले नसते पुन्हा ते नाटक किंवा कोणतेही नाटक, ही काही त्या दोघांची मिळून असलेली अशी मर्माची वगैरे गोष्ट नव्हती की त्यासंबंधी उगीच वाद उकरून काढावेत. 

उलट नाटक आवडले नव्हते तरी केतनकरता ती म्हणाली, "बरं आहे नाही नाटक ? म्हणजे वेगळं." आपण त्या नाटकाला चांगलेही म्हणत नाही आणि वाईटही, तिलाच वाटते. मग ते पुसून शकण्याकरता ती घाईघाईत म्हणाली, "चल, आपण आईस्क्रीम खाऊ." केतन न बोलता तिच्या मागोमाग जावे तसा गेला. आईस्क्रीम खाताना म्हणाला, "देवयानी, मला वाटत होते की मी त्या संपूर्ण हॉलमधे एकटाच आहे आणि फक्त माझ्याकरताच ते नाटक होत आहे. मी उद्याचाही प्रयोग बघीन." तिने आश्चर्य त्याच्याकडे पाहिले, "उद्या ?" "उद्या मला… "मी एकटाच जाईन" तो शांतपणे म्हणाला. थोडेसेच आईस्क्रीम त्याने खाल्ले, बाकी वितळून चालले होते. तीच उठली. पैसे दिले. मग त्याच्या जवळ घेऊन त्याला म्हणाली 'चल'. तोही मग उठला. 

घरीच चल आई वाट बघत असेल.' ती म्हणाली "तुला सोडून देतो." "नाही, तूही घरीच चल. आई म्हणत होती की परीक्षा संपल्यापासून तू आलाच नाहीस !" "कालच तर संपली परीक्षा !" केतन काहीसा उंच स्वरात म्हणाला. त्याचे ते काहीसे तीव्र स्वरातले बोलणे तिला आवडले नाही. स्कूटर चालू करताना तो म्हणाला, "तुला सोडून जातो मी !" "पाच मिनिट ये." "नको, तुझी आई मग प्रश्न विचारत बसेल." "मग विचारले, तरी काय ! ते सगळे प्रश्न सहजच आहेत. कुणीही तेच, तसेच विचारील." "पण मला ते आवडत नाही, "मी सांगेन तसं आईला.... झालं ?" ती म्हणाली. मग ती त्याच्या मागे बसली तेव्हा तिला वाटले की एक आई-दादांना ती सांगेल नको विचारू म्हणून. पण बाकीच्यांचे प्रश्न ? ते तर असतीलच. तिचे आणि त्याचे मिळून तयार होत असलेले भविष्य - त्यासंबंधीचे जग, त्यातली थोडी स्पर्धा, त्यांच्या अडचणी, लागणारा काळ, यांतूनच स्पष्टपणे उभे होत गेलेले एक सुसंगत चित्र. त्याबद्दलचे प्रश्न कसे टाळणार ? याचे नाटक पाहून आलो तर त्याबद्दलचे प्रश्न मनात थैमान घालतात. 

ते नाटक आवडो, न आवडो. काहीच लगेच पुसून जात नाही.  मग ही तर साऱ्या जन्माची गोष्ट. आपल्याला व्यापून राहणारी. प्रश्न असतीलच आणि या प्रश्नांची उत्तरे देता देताच आपलाच रस्ता आपल्याला नीट दिसतही जाईल. देवयानीने आवेगाने त्याच्या कमरेभोवती हात टाकला. त्याने तो बाजूला केला. "हा रस्ता आहे देवयानी,” तो म्हणाला. ती चपापली. इतक्या जवळ राहूनही हे असे दूर असणे. याला काय झाले आहे ! तिला सोडून देऊन तो जातो म्हणाला. स्कूटर त्याने बंदही केली नाही. मग तिनेही त्याला थांबवले नाही. त्याची स्कूटर वळेपर्यंत ती तिथेच उभी होती. पण त्याने वळूनही पाहिले नाही ती आत गेली तेव्हा आईने विचारले, “केतन नाही आला." "नाही. घाईत होता." "घाई कसली ? परीक्षा तर संपली !" आई म्हणाली. ती बोलली नाही. "मी समोशाची तयारी ठेवली होती. केतन येईल तेव्हा गरमच करू म्हटलं. आई म्हणाली. ती तरी बोलली नाही "उद्या येईल न पण ?" आई पुन्हा म्हणाली, तेव्हा तिला एकदमच राग आला. 

ते साधेसेच प्रश्न तिला अगदी नको वाटते आणि ते उगाचच उगाळत बसणाऱ्या आईचाच राग आला. देवयानी घरी आली तेव्हा केतन येऊन बसला होता. समोर सामोशांची प्लेट होती. तिची मोठी बहीण सुजाता त्याच्याशी बोलत होती. आई गरमागरम सामोसे आणून वाढत होती. सुजाताशी बोलण्यात तो रंगून गेला होता. म्हणजे आईने आपले सामोशाचे साधून घेतसे म्हणायचे ! तिला हसू आले. ती येऊन बसलो. "केव्हा आलास ?" "तासभर तरी." "सांगितलं असतंस तर गेलेही नसते." "मी बोअर झालो नाही. सुजाता होती. तिनं काही पुस्तकं दिली वाचायला. त्याबद्दल बोलली. मग सामोसे आले गरमागरम." लहान मुलासारखा त्याने बालिश तपशील दिलेला पाहून तिला हसायला आले. मग तिच्याकरता गरम प्लेट आणून तिची आई समोर येऊन बसली "मग, काय आता पुढे ?" आईने सुरुवात केती. "डॉक्टर म्हणतात, तू आधी खूप एक्स्पीरियन्स घ्यायला हवा, मोठया मोठया हॉस्पिटलमधून. सगळे स्टेप बाय स्टेप व्हायला हवं. घाई नको.." केतनला या वेळी एकदम हसू आले. 

त्याने अर्थपूर्ण नजरेने तिच्याकडे पाहिले. आता तिलाही हसू फुटले. वाटले. केतनशी लग्न झाल्यावर आपण आई दादांना डॉक्टर म्हणते - एकटे असतानाही तेच म्हणते - तसे कधीच नाही म्हणणार. आपण त्याला डॉक्टर वगैरे म्हणतो आहोत या कल्पनेचे तिला पुन्हा हसू आले. ते हसू एकदम फवाऱ्यासारखे बाहेर पडले फसकन 'का हसलीस ग ?" सुजाताने विचारले. तेव्हा ती म्हणाली, काही नाही ग." सुजाताने दिलेली पुस्तके घेऊन तो उठला.” आठेक दिवसांत परत करतो", तो म्हणाला "घाई नाही. ही माझी स्वतःचीच आहेत", सुजाता म्हणाली. तो उठलाच. तो फक्त आपल्याशी बोलेल, कुठे चल म्हणेल किंवा तिच्या खोलीत जाऊन तिच्याशी बोलायला पाहील, असे तिला वाटले, तसे तो काही बोलला नाही. उलट सुजाताकडेच पाहून "थँक्स, वेळ चांगला गेला", म्हणाला आणि ती काही म्हणायच्या आत गेला देखील…तो गेल्यावर सुजाता म्हणाली, पुष्कळ वेळ बसला होता तुझी वाट पाहात. 

मी थोडा वेळ बसले. पण म्हटलं मी काय बोलणार ? माझे  विषय वेगळे. पण तसं काही झालं नाही." देवयानी काही म्हणाली नाही. सुजाता इंग्रजीत एम.ए. करत होती. पुस्तकांची तिला आवड होती आणि आवडलेल्या पुस्तकांबद्दल समरसून हातवारे करून, रंगून बोलण्याची तिची पद्धत देवयानीलाही आवडतच होती. केतन तर निश्चितच रंगला असेल. केतन रात्री मधेच केव्हा तरी जागा झाला. विचित्र स्वप्नांनी, स्वप्न फक्त एकच नव्हते. अनेक स्वप्नांचे तुकडे तुकडे विचित्रपणे एकत्र आले होते. जाग येण्याच्या काही क्षण आधी तर ते स्वप्न आहे असेही ठळक जाणवून जाग येत होती, तीही स्वप्नातच. ते स्वप्न हे तर स्वप्नातही कळत होते. त्याला कुठे तरी पोहोचायचे होते. पण तो पोहोचू शकत नव्हता. 

ते तसे पोहोचण्याच्या आधी किती तरी छोट्या छोट्या अडचणी... एका स्वप्नात त्याला गाडी गाठायची असते. सगळे गाठतात, पण इतक्या किरकोळ गोष्टी उभ्या राहतात आणि गाडी सुटायच्या आधी गाडी गाठणे त्याला मुष्किल होऊन जाते. एका स्वप्नात परीक्षेचा हॉल. तो पेपर लिहीत असतो. त्याला एवढ्या हॉलमधे फक्त तोच दिसतो. पेपर लिहिताना त्याला पेपर येत असतो. पण दिलेल्या वेळेत तो पेपर सोडवून त्याला पूर्ण करता येत नाही. जे जमत नाही त्याबद्दलची त्याची असमर्थता त्याला स्वप्नातही जाणवते. स्वप्नातही त्याचा जीव त्याकरता तडफडतो. एखादी साधी सहज सोपीशी गोष्ट सरळ सुरळीत न होण्यातला त्याचा विचित्र सहभाग त्याला चकित करतो. स्वप्नातला तो इतका असहाय, इतकी त्याची घुसमट. हे सारे स्वप्नातच. स्वप्नाबाहेर येऊन तो पाहात असतो. सारे खूप सोपे असूनही स्वप्नातल्या त्याला ते जमत नाही. तिथपर्यंत पोचता पोचता दिलेली वेळच संपून जाते. तो जागा झाला तेव्हा घामाने चिंब होता. 

स्वप्नातली ती विचित्र असहायता जागेपणीही ठळक आठवली. तो बाहेर गॅलरीत उभा राहिला. आई आणि त्याची बहीण नंदा दोघी हॉलमधेच झोपत आणि हा खोलीत. त्याच्या खोलीत. त्याला या वेळी असे घामाने चिंब होऊन उत्तररात्रीनंतर केव्हा तरी जाग आली असतानाही लक्षात आले की अभ्यासाला स्वतंत्र खोली होती ती त्यालाच. नंदा कुठेही अभ्यास करायची. आईने जास्तीत जास्त सुविधा दिल्या त्या त्यालाच, रस्ता आखून रेखून दिला तो त्यालाच, जराही सैल सोडले नाही ते त्यालाच. त्याचे वडील तसे घर सोडून निघून गेल्यानंतरचा प्रत्येक दिवस ती त्याच्या मोठे होण्याची वाट बघत आहे ही जाणीव आईने सतत दिली ती त्यालाच, नंदा त्यापासून दूर राहिली. अॅडमिशन मिळू शकली असती, तरी तिने मायक्रोबायोलॉजी घेतले...बी. एस्सी. झाली की आई तिचे लग्नाचेही बघेल.... आपल्याला हे सगळे आताच या भलत्या वेळी का समोर येते आहे हे त्याला कळेना. आपल्या विचित्र स्वप्नाचा याच्याशी काय संबंध आहे ? 

बाहेर थंडी होती. त्याचा घाम गेला. गार हवेने भणभणणारे डोके जरा थांबले. तीन वाजत होते. आताही झोप येऊ शकते. ती. डोळ्यांत होतीच. सुजाताने दिलेले पुस्तक वाचत तो रात्री पुष्कळ वेळ जागा होता. त्याला अचानक ते पुस्तक दिसले. त्याच्या उशीजवळ त्याच पानावर पालथे पडलेले एका कथेचा इंग्रजी अनुवाद होता. त्या कथेनेच आपल्याला अस्वस्थ केले होते हे त्याला समजले. या स्वप्नाच्या मुळाशी मग ती कथा होती का ? रात्री पाचलेली ! स्वप्ने इतकी, अशा तात्कालिक गोष्टीशी जोडलेली असतात ? की त्याची मुळे दूर कुठेतरी अज्ञातात असतात ? किंवा त्याला काही मुळेच नसतात ? काल रात्री वाचलेली ती कथा अगदी साधी. काहीशी दीर्घकथा, काल वाचताना इंग्रजी अनुवादातूनही त्या कथा पीळ त्याला जाणवलेला होता. ती कथा, ते सारे मर्माचे वाटले होते. दोघे साधीच माणसे. खुप काही अँबिशस नाहीत. एक मुलगा, एक मुलगी दोघांचे प्रेम, ते सर्वांनी मान्य केलेले लग्न जमलेले.  

पण अशा काही गोष्टी जुळून घडून येतात की हे घडून होत नाही. लग्नच होत नाही एवढेच नाही, तर एकमेकांपासून दूरही जावे लागते. आजारपण नाही, अपघात नाही, मरण नाही. कुणाचे काही चुकलेले नाही. जे घडते त्याला नियती असेही सरधोपट नाव लेखक देत नाही. जे घडते ते माणसांकडून. ते सहन करतो तो माणूसच. लेखकाचे कोणते भाष्यच या कथेत नसते. असते ती एक अटळ जाणीव. यातला नायक कमी पडत जातो आणि स्वतःची ती अवस्थाही स्वतःच बघू शकतो. एक असहाय अवस्था. कुठेतरी अडून राहिलेले पाणी, साधे प्रवाहित करणेही न जमलेली तो साधी माणसे. एकमेकांचा निरोप घेण्याचीही कटुता टाळून एकमेकांपासून दूर होतात. पार्श्वभूमीला प्रेमकथा असलेली ही कहाणी त्यांच्या विफल प्रेमाची आहे, असे म्हणता येत नाही. 

जिथे प्रेमच मुळी पार्श्वभूमीला आहे तिथे त्याची विफलता हा विषयच होत नाही. कथेतून जाणवते ते एक अतर्क्य अदृश्य सूत्र. ते कळत नाही. कथेतून प्रगट होतो तो एक पीळ, ज्याचे वळ माणसाच्या मनावर उमटत जातात. एक मर्माची बोच जाणवते. अरे हे असे असे होते ! इतके साधे ! इतके जवळ ! इतके सोपे ! का नाही कुणी त्या दोघांना ते तसे.... मग तो विचार मधेच थबकतो. ही कुणी कुणाला सोपी करून देण्याची गोष्टच नसते. आपल्या आताच्या विचित्र स्वप्नाशी या कथेचा काय संबंध होता कळत नाही. त्याने पुन्हा पुस्तक उघटले. मघा मूळ लेखकाचे नाव पाहाचे राहून गेले होते. ते आता पाहिले. केशव हरी वनमाळी.' पूर्ण नाव दिले होते. आजकाल कुणी असे इतके संपूर्ण नाव नाही देत. पुन्हा त्याच्या अचानक एक लक्षात आले. ती तीनही नावे कृष्णाचीच होती. केशव म्हणजेही कृष्ण हरी हाही कृष्ण आणि वनमाळी हे तर कृष्णाचे एक लोभस रूप. 

कुणी मुद्दाम जाणीवपूर्वक नसतीलच ठेवली ही नावे. जसे त्या कक्षेत जराही जाणीवपूर्वक असे काही नव्हते. असे असे होते. होत असते असाही आव नाही. असे असे झाले, असे होता होता तसे न होता असे असे झाले इतकेच. त्यावर कुठलेही भाष्य नाही. एक जखम कुणाला न दिसता टिपकत राहावी असा पीळ...कथा मूळ हिंदी होती. कुठल्या हिंदी मासिकांतून घेतली होती. मूळ कथा वाचायला हवी, त्याला वाटले. सुजाता मिळवून देईल मासिक...तो झोपला तेव्हा चार-साडेचार झालेले...सकाळी जागा झाला तेव्हा नंदा आणि देवयानीचा बोलण्याचा आवाज आला. अकरा ! त्याने पाहिले, आई शाळेत जायच्या गडबडीत होती. त्याला सर्व आवाज येत राहिले. "झोपला आहे केतन ?" "उठेल तो. रात्री बसला असेल जागत. बराच वेळ वाचत होता. परीक्षा संपली त्याची आई म्हणाली. 

नाटक आवडले ?" नंदाने विचारले त्याला ऐकू आले "खूप नाही, चांगले होते." "पण केतनला खूप आवडले !" "हो." देवयानी म्हणाली "तुझा अभ्यास काय म्हणतो ?" "चालू आहे. "डॉक्टर काय म्हणतात ?" "ते नेहमीसारखेच बिझी." "आता पाहा, एवढं हॉस्पिटल. एखादा मुलगा असता...तोही डॉक्टर.."मी झाले व डॉक्टर... म्हणजे होईन "पण त्याचा त्यांना काय उपयोग ?..." आईचे प्रश्न देवयानीला आवडत नसणार....त्याला वाटले "सुजाताला बघता का कुठे तुम्ही !" "नाही, तिला तसं काही आवडत नाही. "तिचं तिनं ठरवलं असेल," "असंही नाही..... देवयानी उठलीच. 'मी निघते. केतनला सांगा, येऊन गेले म्हणून.' मग मात्र केतन उठलाच. "अरे, केव्हा  आलीस ? उठवायचं होतं !" साळसूदपणे म्हणाला. नंदा कॉलेजला गेली. 
दोघेच उरले. "तू आज घरी कशी ? "मुद्दामच, तुझी परीक्षा संपल्याचा आनंद घेतलाच नाही ना ! दोघीही घरी नसतील. तू एकटाच..." "अच्छा ! तर बाईसाहेब प्रेम करायला आल्या..." शी - काहीतरीच काय !" ती म्हणाली. "मी पाच दहा मिनिटांत तयार होतो. तोवर तू ही कथा वाच, काल रात्री मी वाचली. मला मग किती वेळ झोप आली नाही आणि लेखकाच नाव बघ देवयानी, गमतीदार आहे. केशव हरी वनमाळी तिला 'ते' पान उघडून देऊन तो गेला. दहा मिनिटे म्हणता म्हणता आंघोळबिंघोळ करून चांगला अध्या-पाऊण तासाने आला, टॉवेल गुंडाळून, गोरा तांबूस. छातीवरचे केस. तो जवळ आला. तो आता आपल्याला जवळ घेईल असेच तिला वाटले. त्याचा श्वास निकट होता. तिचा श्वास वाढला. तो वाकल्याचे कळले. त्याने तिच्या मानेवर ओठ टेकले. 

त्याचे हात आता आपल्याला ओढून घेतील असे वाटत असतानाच त्याचा प्रश्न आला, वाचलीस कथा ?" "हो", स्वतःला आवरत ती म्हणाली. "आवडली ?" "हो, चांगलीच आहे. पण केतन...' "काय ?" ती मधेच थांबलेली. "त्या दोघांचं लग्न होत नाही, इतकंच नाही तर ती दूर जातात. हे मला कनव्हिन्सिंग वाटलं नाही...” मूर्ख आहेस. तेवढीच ती कथा नाही." तो अकारण चिडला. तिला ते आवडले नाही. पण तिने ते बोलून दाखवले नाही. दोघांच्या एकांतात त्याने त्या कुठल्याशा कथेला आणावे हे तिला आवडले नाही पण तिने स्वतःला राग येऊ दिला नाही. तो काही वेळ त्या कथेबद्दलच बोलत राहणार हे लक्षात आल्यावर ती म्हणाली, "तुझ्या एक गोष्ट लक्षात आली ?" "तुझं नावही बघ, केतन हरिश्चंद्र वेलणकर. तीनही नावांची आद्याक्षरं त्यां लेखकासारखीच. केशव हरी वनमाळी ! इंग्रजीत के. एच. व्ही." "हो ! माझ्या हे लक्षात नव्हतं आलं !" तो म्हणाला. 

शिवाय ही त्यांची सगळी नावं कृष्णाची आहेत." अरे हो ! हे माझ्या काही लक्षात नाही आलं, मला वनमाळी हे आडनाव विचित्र वाटलं जरा.. ती म्हणाली. 'आता काय प्लॅन आजचा ?" त्याने विचारले एवढा एकांत ! घरी कुणी नाही. परीक्षा संपलेली आणि हा विचारतो आहे, काय प्लॅन ? ती काही बोलणार तोच तो म्हणाला सुजाता विचारून ही कथा असलेले मासिक बघ मिळाले तर. मला ही कथा मुळातून वाचावीशी वाटते." तिला आता त्या कथेचा राग यायला लागला. एवढे असामान्य असे त्यात काही नव्हते. पण ती ते बोलली नाही. अनुवादकाने हिंदीतून ती तेवढीच कथा घेतली होती म्हणजे तिच्यात काही वाचनीयता जरूर होती. पण केतन जेवढा झपाटला गेला तेवढे तिला वाटले नाही. कदाचित केतनची मन:स्थिती तशी असेल ! आपण त्यापासून दूर असू. 

ते नाटकही आपल्याला तेवढे नव्हते आवडले, जेवढा तो त्यात गुरफटला होता. तो कथा मिळेतो केतनने सुजाताला छळलेच. तो सारखी आठवण देऊ लागला. अनुवादकाने मूळ मासिकाचे नाव पण दिले होते. त्यालाही लिहिले. लायब्ररी धुंडाळल्या. ते मासिक मिळेतो तो अस्वस्थ, अशांत राहिला. ती अशांतता त्याला कळेना, समजेना. इंटर्नशिप सुरू झाली होती. समोर बरेच काही होते. तरी ती कथा त्याचा पिच्छा सोडत नव्हती. एक दिवस अखेर ते मासिक मिळाले. सुजाताने ते त्याच्यासाठी देवयानीजवळ दिले आणि दोन दिवस देवयानी ते केतनला द्यायला विसरूनच गेली. केतनने तो देवयानीकडे आला असताना सुजाताला पुन्हा टोकले त्या मासिकाबद्दल. तेव्हा ती आश्चर्याने म्हणाली, "म्हणजे, तुला मिळालं नाही ? मी देवयानीजवळ दिलं आहे ते मासिक." "काय ?" त्याला आता देवयानीचा राग आला. ते त्याला द्यायला विसरल्याबद्दल तो तिला बरेच बोलला. तिथेच सुजाता होती. तिची आई होती. 

तो तिला तसे बोलत असतानाही त्याला जाणवले की हे जरा जादाच होत आहे. पण त्याचा जसा ताबाच सुटला. अर्थात देवयानी काही बोलली नाही. सर्व होते हे एक. पुन्हा तो रागाने लाल झालेला असताना काय बोलणार ! देवयानीची आई तर घाबरूनच गेली. सुजाता तिथून निघून गेली आणि जाताना आईला चल म्हणाली. ती दोघेच उरली, तेव्हा काही वेळ देवयानीने जाऊ दिला. मग तिने ते तिथेच ठेवलेले मासिक त्याच्या हातात दिले. देताना त्याचा हात किंचित धरला, थोपटला. त्याला जरासे शांत करावे असे म्हणाली, "पण आता मिळालं नं हे मासिक ! तो आनंद असा का घालवतोस ?" त्याने ते मासिक घेतले. मग तो काहीसा शांत होत असतानाच देवयानी म्हणाली, "किती चिडलास केतन, तेही उगाचच ! यापूर्वी तू कधी असा रागवता, बरसला नव्हतास. तेही सर्वांसमोर. हे मासिक ते काय ! तो काही आपल्या जगण्यामरण्याचा प्रश्न नाही...." तो बोलला नाही. शांत झालाच होता. 'सॉरी' म्हणाला. मग थांबला मात्र नाही. 

स्कूटर सुरू करताना त्याला वाटले, जगण्यामरण्याचे प्रश्न पाहून वेगळे असतात ? ती कथा वाचण्याची आपली धडपड तडफड. त्या अनुवादातूनच डोकावणाऱ्या अनेक शक्यता. रंगभूमीचा पडदा आपल्यासमोर हळूहळू उघडतो आहे. आतला धूपाचा वास, घंटेचा आवाज आपल्यापर्यंत येतो आहे. कलावंतांचे श्वास आपल्याला कळताहेत आणि याही मागे आहे, काही नाटकांच्या अनेक शक्यता सामावून असलेला त्या कथेतला गर्भित प्रकाश. तो आपल्याला खुणावतो आहे. सारखा अस्वस्थ करतो आहे. हा काय जगण्यामरण्याचा प्रश्न नाही ? जगणे याहून काही वेगळे असते ? रात्री झोपताना त्याने ती कथा वाचली, एक दोनदा पूर्ण. मग मधून मधून हवा तो मजकूर पुन्हा पुन्हा, अनेकदा, त्याला हवा होता तो रंगभूमीवरला अनोखा प्रकाश त्या कथाभर दडलेला होता. त्या कथेत एका चांगल्या नाटकाची बीजे होती. 

या वेगळ्या फॉर्ममधे ती कलाकृती स्वतःच्या सगळ्या अव्यक्त सामर्थ्यासह या असल्या विचारांनी तो दचकला. पण हे सारे आपण लिहू शकणार आहोत ? ती ताकद आहे का आपल्यात ? एवढा वेळ आहे आपल्याजवळ ? हो, लिहिणार आहोत. वेळेचा प्रश्नच नाही. लिहिले पाहिजेच, हे कळते आहे. ती आपल्या श्वासाची मागणी आहे... संपूर्ण रात्रभर तो जागा होता. ती कथा मिळूनही अस्वस्थ होता. सकाळी तो नेहमीप्रमाणे तयार झाला नाही. डोळे जागरणाने तारवटले होते. तेव्हा आईने विचारले. "बरं नाही तुला ? आज जात नाहीस ?" दोन्हीला मिळून त्याने 'नाही' हे एकच उत्तर देऊन टाकले. दोन दिवस तो घरीच थांबला. अस्वस्थता. देवयानीला फोन केला नाही, तिच्याकडे गेला नाही. एक दिवस रात्री त्याने त्या कथेवर लिहायला सुरुवात केली. एकदा सुरुवात झाली, मग तो शांत होत गेला. मग स्वतःचे रुटीन त्याला शक्य होत गेले. पंधरावीस दिवसांत त्याने एक अंक पूर्ण केला. 
त्या दिवसांत तो देवयानीकडे मुळीच फिरकला नाही. हॉस्पिटलमधून परतायलाच उशीर. मग तो समोर कागद घेऊन बसायचा. अनेक कागद नासवल्यावर त्याला स्वतःच्या मनातला आकार अखेर सापडलासे वाटले. देवयानीनेही फोन केला नाही. हे त्याच्या लक्षात आले ते तो पहिला अंक पूर्ण झाल्यावरच. मग त्याला तिची एकदम आठवणच आली. पंधरा दिवसांत आईने कितीदा तरी, देवयानी नाही आली रे, म्हटले की त्याला आईचाच राग यायचा. पण आता मात्र त्याला वाटले की किती दिवस झाले ! आपण राहिलो कसे तिला भेटल्याखेरीज ! तो देवयानीकडे गेला. तेव्हा ती निजलेली होती. "हे काय ?" "तू रागावून आला नाहीस, तिनं दुखणं काढतं !" आई म्हणाली. ते देवयानीला काही आवडले नाही. "साधं व्हायरल इन्फेक्शन रे. ताप होता तीन-चार दिवस." "फोन का नाही केलास ?" "रोज वाटायचं की, तू येशीलच." उतरला का ताप ? "आज चढला नाही, " "मी थोडा बिझी होतो." 

तो काहीसा अपराधी स्वरात म्हणाला "हो, मला वाटलंच. “मी त्या कथेवर नाटक लिहिलं. एक अंक झाला. त्यातच होतो." "हो ?" देवयानी उठून टेकून बसली. तिच्या चेहऱ्यावर आनंद होता "तुझ्यात हे टॅलेन्ट आहे हे मला माहीत नव्हतं ! म्हणूनच तुला ती कथा हवी होती, नाही ?" ती म्हणाली. तिने त्याचा हात हातात घेतला. आई हळूच निघून गेली, कॉफी पाठवते वगैरे म्हणत. "थोडं अंग गरम आहे गं !" तो म्हणाला. "ह, चढेलही एखादे वेळी." ती म्हणाली. "तू लिहिलेले नाटक पहिल्या रांगेत बसून बघायला मला आवडेल." "अजून त्याला वेळ आहे ग ! कदाचित हे नाटक स्क्रिप्टमधेच असेल. ती कथा वाचली आणि मला राहवलं नाही." "असं होणार नाही. ज्या तिडिकीने तू हे सगळं केलंस तू दुसरा अंक लिहून काढ... मग त्याचं आपण वाचन करू...त्याला हसू आले. 

देवयानी या सगळ्या भोवती एक वलय उभे करत होती. तू बरी हो प्रथम, आपण या लेखकाला भेटून येऊ, कुठे छिंदवाडा की परासियाला राहतो. पत्ता दिला आहे कथेच्या शेवटी. मी पत्र लिहितो." "त्याला कशाला भेटायचं ?" "असंच दुसरा अंक लिहिण्यापूर्वी त्याला भेटता आलं तर बरं." देवयानी बोलली नाही. त्याने तिच्या हातावर हात ठेवता. समोरच्या तावदानातून सूर्याचा तांबूस प्रकाश देवयानीच्या थकलेल्या पायावर पडला होता. त्याला एकदम भरून आल्यासारखे झाले. आपण तिला त्या दिवशी किती बोललो, रागावलो ! तो एकदम वाकला, तिच्या गळ्यावर त्याने ओठ टेकले. "देवयानी... देवी. ..." तो पुटपुटला. त्याच्यासाठी खाणे, कॉफी घेऊन सुजाता आली. पण आल्या पावली मागे वळली  नंतरचे दिवस केतनसमोर फक्त ते नाटक, ती कथा. त्याने लिहिलेला पहिला अंक आणि लिहायचा असलेला दुसरा अंक होता. तो त्याचे सगळे व्यवहार करत होता. 

इंटर्नशिप सुरू होती. पण त्या कुठल्या गोष्टीत त्याचे लक्ष नव्हते. एक विचित्र हरवलेपण, झपाटलेपण तो अनुभवत राहिला. मित्र भेटत होते. देवयानी येत होती. बसत होती. दोघे कुठे जात होते, फिरत होते. पण तिलाच कळत होते की तो या सगळया वेळी अतिशय एकटा आहे. ती सुद्धा त्याच्यापर्यंत पोचू शकत नाही. संध्याकाळचा तो असा घरीच बसलेला होता. नुकताच हॉस्पिटलमधून परतला होता अगरवाल आला. "चलो केतन, टेनिस खेलेंगे. बीच मे सब बंद था. आज से शुरू, " त्याने आग्रह केला. "नहीं, रहने दो, थक गया." चलो भी. सब थकान दूर… "नहीं", म्हणत केतन उठला. "क्या हो गया हे तुझे केतन !" "कुछ तो नहीं !" संतोष कह रहा था, तुम कुछ लिख रहे हो." "नहीं, ऐसा ही होता..." "क्या लिखते हो ?" "नो. आय वॉज जस्ट थिंकिंग ऑफ इट. थोडा वेळ कुणी बोलले नाही. नंदा कॉफी घेऊन आली. बशीत पकोडे होते. 

अगरवालने उत्साहाने बशी समोर ओढली. "परीक्षा संपलीच नसती तर बरं होतं..." केतन म्हणाला. अगरवालने उचललेला पकोडा हातातच ठेवला. तो आश्चर्याने केतनकडे पाहू लागला "परीक्षेत हे काही अस वर नव्हतं आलं." केतन काय म्हणतो आहे हे अगरवालला कळलेच नाही, पकोडे जवळ जकळ संपवून तो म्हणाला "यू नो अबाऊट संतोष ? उसका ठीक नहीं चल रहा." "संतोष ! त्याला काय झालं ? आता तर भेटला होता." "उसकी अॅडमिशन छे महिना लेट..." "अॅडमिशन... ?" "येस, ही सेड ही इज द फर्स्ट क्लेमेट अॅण्ड ही वुईल फाईट फॉर इट," केतनच्या डोळ्यांसमोर संतोषची सगळी धडपड आली. तो त्याला सीनियर होता त्याच्या परीक्षा, अभ्यास, त्याचा ठरलेला मार्ग, त्यावरले निश्चित झालेले यश, या सऱ्यापलीकडचा संतोष केतनला माहीत होता तो त्याने गॅदरिंगमधे केतनच्या नाटकात काम केले होते तो.. महत्वाचा रोल उभा केला होता... ते सगळे दिवस किती वेगळे होते. 

"पण सहा महिने काही लेट होत नाही." "इट् डिपेंडस् ईव्हन वन डे कॅन वी लेट", अगरवाल म्हणाला. तो रात्री जेवून गेला, तेव्हा अकरा वाजले होते तो आल्यामुळे आपल्याला बरे वाटले. सारख्या त्याच त्या विचारांपासून आपण जरा बाजूला तर झालो, केतनला वाटले देवयानीकडे सुजाता भेटली. "व्हॉट अवाऊट युवर न्यू व्हेंचर ?" तिने हसत विचारले. "व्हेंचर ?" तोही हसला. देवयानी म्हणत होती....म्हणत सुजाताने सुरुवात केली. मग ती एकदमच म्हणाली, "मी ती कथा वाचली आहे. मला ती बरी वाटली. अनुभव वेगळा नाही पण सांगितली आहे वेगळेपणाने. अनेक शक्यता त्यात सूचित होत राहतात. नाटक हा फॉर्म तर त्या कथेच्या संदर्भात समोरच येत नाही. त्या दृष्टीने मला ती तितकी नाही आवडली." केतन ऐकत होता. जसजशी सुजाता बोलत होती तसतसा त्या नाटकाचा फॉर्म जास्तच कोरीवपणे समोर येत होता. 

सुजाता त्याविरुद्ध बोलत होती तरी त्याच्याकरता तो संपूर्ण अनुभव नाटकरूपातच समोर येत होता.  त्याला पुन्हा वाटले, संपूर्ण थिएटरमध्ये आपण एकटेच आहोत. अगदी एकटे आणि ते नाट्यरूपही फक्त आपल्याचकरता समोरच्या रंगभूमीच्या प्रकाशात... आणि त्या प्रकाशाचे त्याच्याशी फार जुनेच नाते आहे....फार जुने...तो एकदम उठलाय. सुजाताला 'थैक्स' म्हणाला अरे कशाबद्दल ! आणि देवयानी येईतो थांबत नाही ?" "नाही, घाईत आहे. पुन्हा येईन", तो म्हणाला रविवारी सकाळी सातला अगरवालचा फोन, केतन, बॅड न्यूज..." "काय ?" "संतोष उसने सुईसाईड..." "काय ?" त्या दिवशी नाटकात संतोषची त्याच्या बाजूची रिकामी खुर्ची... तलावात त्याने आत्महत्या केली...तलावात ! संतोष चांगला पोहणारा होता. पोहणाऱ्याने अशी पाण्यात आत्महत्या करायची ? म्हणजे काय करायचे ? हातपाय मारायचेच नाहीत ! स्वतःला बुड द्यायचे ! 
त्यापेक्षा आत्महत्येच्या दुसऱ्या मेथडस... केतन दचकला. म्हणजे संतोषच्या आत्महत्येला आपली हरकत नाही ! नसावी. जगावेसे वाटणे संपले म्हणजेच कुणी ते संपवतो. ज्या कारणाने संतोषला जगावेसे वाटत नव्हते ते त्याच्याकरता खूप मोठेही असू शकते...एकदम त्या केशव हरी वनमाळीच्या कथेतली अरुंधती त्याच्या समोर आली. ती मैत्रिणीला म्हणते, "मी निरोप वगैरे घेऊन हे संपवणार नाही. कारण ते संपणारच नाही. ते सगळे माझ्याबरोबर माझ्यापुरतं असेल ते तसं त्याच्याकरता असेलच की नाही हे मी कसं सांगू ? तू माझी काळजी करू नकोस. मला अजूनही जगत राहणेच आवडेल, " संतोषच्या या अशा आत्महत्येवर त्या अरुंधतीचे शब्द असे उमटले होते...! केतनला वाटले की आपण संतोषकडे आता एकटे जाऊ शकत नाही, देवयानीशिवाय, अशा वेळी देवयानीला तिची आई पाठवणार नाही. 

आपण तिथे तिला न्यायलाही नको. पण तरीही आपण जर जायचेच आहे तर तिलाही यावेच लागेल....त्याने देवयानीला फोन केला...ती फोनवर येईतो संतोषचे हे जाणे आणि ती केशव हरी वनमाळीची कथा एकमेकांत काही कारण नसताना विचित्रपणे गुंतत गेलेली त्याला जाणवली. एकात मरण होते, एकात जगण्याचा स्त्रोत होता. एकात प्रकाश होता, एकात अंधार. एकाचा अतर्क्य अनाकलनीय शेवट होता आणि एकाची वेगळ्या रस्त्याची कदाचित सुरुवातच होती... देवयानी फोनवर आली तेव्हा क्षणभर आपण फोन कशाकरता केला हेच तो विसरला. संतोषची बॉडी मिळेतो दुपारचे तीन झाले. रविवार होता म्हणून खूप लोक होते. वेगवेगळे लोक. इतके वेगळे, वेगळ्या क्षेत्रांतले की त्यांचा संतोषशी कसा, कुठे संबंध येऊ शकतो, याचेच केतनला आश्चर्य वाटले. 

एका नाट्यप्रेमी ग्रुपचे अविनाश बोकारे दिसले. तो त्यांच्याशी बोलत बसला. "काय नवीन ?" त्याने त्यांना विचारले. “चालू आहे. चांगली नवी थीम हवी, नव्या लोकांची. आम्ही व्यावसायिक रंगभूमीवरली नाटकं नाही करत !" बोकारे म्हणाले. तेव्हा केतन एकदम बोलून गेला - हे बोलण्याची ही वेळ नाही हेही त्याला   सुचले नाही. "माझं सुरू आहे काही, पण पूर्ण होण्यावर आहे. " "तुमचे ?" त्यांनी आश्चर्याने विचारले. "हो. एक कथा मला आवडली, त्यावर लिहितो आहे." "कथा कुठली ?" "मराठी नाही, हिंदी. लेखकही काही खूप नाव ऐकलेला नाही. पण मला कथा आवडली." "असं काही तरी हवं, नवं ताजं.. बोकारे म्हणाले. देवयानी केतनजवळ येऊन म्हणाली, "मला प्लीज घरी सोडून दे." "का ग ? आता नेतीलच." "नाही मला सोडून दे. स्कूटरने हार्डली पंधरा-वीस मिनिटं लागतील." कधी नव्हे तो तिच्या स्वरात हट्ट होता. 

नुसता हट्ट नाही: तो तीव्रही होता. "ठीक आहे. तू आत सांगून ये." "अशा वेळेला कुणाला सांगू ? त्याची आई, बहीण कुणीच नीट भानावर नाही. त्यांना आपण जातो हे सांगायचं कशाला ?" वैतागल्यासारखा तो निघाला. अगरवाललाच सांगितले की देवयानीला सोडून येतो...."देवयानी, असं निघून येणं बरं नाही. तसा संतोष आपल्या ग्रुपमधलाच होता." "हो ! म्हणूनच त्याची बॉडी पडली होती आणि तू त्या बोकाऱ्यांशी ताज्या नव्या थीमबद्दल बोलत होतास !" देवयानीचा आवाज चढला होता. तो कुणी ऐकू नये म्हणून त्याने लगेच स्कूटर सुरू करून दिली. पण तो चपापला. ती म्हणत होती ते खरेच होते. संतोष गेला तेव्हापासून ते नाटक अजून काही परींनी त्याला दिसू लागले होते. तिला घरी सोडून तो म्हणाला, "देवयानी रागवू नकोस. प्लीज." आणि ती विरघळत असतानाच तो म्हणाला, "पुढल्या रविवारी आपण जाऊ सकाळी. परासियाला. 

मी पत्र लिहिलं आहे त्यांना. उत्तर आलं नाही तरी हरकत नाही. तू आईला विचारून ठेव. स्कूटरनं जाऊ, पण..." त्याच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकून देवयानी आत निघून गेली. खरे म्हणजे संतोषच्या अशा जाण्याशी त्याच्या थीमचा किती जवळचा धागा होता हे त्याला देवयानीला सांगता आले असते तर तो आकार मनातल्या मनात अधिक स्पष्ट कोरला गेला असता. नंतरच्या रविवारी परासियाला जाणे जमले नाही. रीजंटला सकाळी नऊ वाजता एक जुना इंग्रजी पिक्चर होता- कॅसाब्लांका देवयानी आणि तो मेंबर होते त्या क्लबतर्फे . देवयानी त्या पिक्चरमधे इंटरेस्टेड होती. एरवी त्यालाही ते आवडले असते पण सध्या त्याला दुसरे काही सुचतच नव्हते. परतताना देवयानी त्या पिक्चरबद्दल उत्साहाने बोलत होती. मधेच लांबून तिने विचारले, "तुला इतका आवडला नाही ?" "वा, आवडला तर ! चांगलाच आहे." पण मग वेळ होता आणि संधीही होती तर त्याने सांगितले तिला समजावून. संतोषचे जाणे, त्याचे नाटक. 

सारे अगदी अस्पष्ट वाटलेले सुद्धा त्याने बाकी ठेवले नाही. तिला आता तरी समजले असेल असे त्याला वाटते. पण ती म्हणाली, "म्हणजे तू संतोषचा मृत्यू स्वतःकरता वापरतो आहेस देवयानी !" तो चकितच झाला. "खरं म्हणजे तू ही एक चांगली कलाकृती पाहिलीस. इनग्रिड बर्गमनची ही वेगळी भूमिका... तुला हिच्याबद्दल बोलावसं नाही वाटले. तू आता स्वत:ला कलावंत वगैरे समजत असशील ना ! स्वतःचीच अंडी उबवत बसणारे लोक कलावंत कसले !" बापरे, काय भयंकर बोलत होती देवयानी, तो स्वतःला कलावंत वगैरे समजत होता ! संतोषचे मरण स्वतःकरता वापरत होता ! देवयानी असे म्हणू तरी कशी शकत होती ? आठवडाभर तिला त्याने फोन केला नाही की तिच्याकडे फिरकला नाही. तिनेही केला नाही. पण शुक्रवारी संध्याकाळी त्याने फोन केला. फोनवर सुजाता होती. देवयानी घरीच नव्हती, त्याने निरोप दिला, की तो रविवारी सकाळी परासियाला जातो आहे. देवयानीला यायचे असेल तर तिने कळवावे.  

रविवारी तो सकाळी देवयानीकडे गेला तेव्हा डॉक्टर, तिचे वडील भेटले. ते सकाळी मॉर्निंग वॉकला जात. ते त्याच तयारीत होते. "देवयानीला न्यायला आलो." तो जरा भीड पडून म्हणाला. "वेल, पण स्कूटरनं का जाता ? गाडी घेऊन जा आपली. ड्रायव्हर येईल आठ वाजता... मी म्हटलं देवयानीला, पण ती म्हणाली, तुम्ही पुष्कळ जणं जाताहात." तो चमकला. देवयानीने खोटे का सांगितले, ते दोघेच जात असताना ! जायला मिळावे म्हणून ? पण का जातो आहे म्हणून विचारले तर ती काय सांगणार होती ? तो केशव हरी वनमाळी, त्याची कथा, ते नाटक, सगळे ! ते कोणाला पटेल ? काल रात्री आईशीच नाही का वाद झाला ? नाटक लिहायला तिची ना नाही, पण त्यामागचे पुढचे तिला नको आहे. मुळात नाटकाचा त्याच्या वडिलांशी असलेला संबंध तिला भेडसावतो. नाटक लिही हवं तर, ती म्हणाली. मग ते लिहिणे कशासाठी, हा विचार ती करत नाही. 

किती वेगवेगळ्या प्रकारांनी स्वत:ला जपतो माणूस... देता येतच नाही. स्वतःला चारी दिशांनी थांबवता मात्र येते त्याने स्कूटरचा वेग वाढवला. थंडी होती. त्याला एका हाताने बिलगुन बसत देवयानी म्हणाली, "हळू केतन..." साधारण बाराच्या सुमाराला केतन त्या वनमाळीच्या घरी पोचला. नावाची पाटी होती. त्यावर व्ही. एच. वनमाळी हे नाव होते. तो कदाचित त्यांचा भाऊ असावा... त्याला वाटले. बेल दाबतो तो देवयानी थोड़ी बाजूला त्याच्या मागे उभी राहिली. एकदम अनोळखी ठिकाणी केतन बरोबर जात आहोत, तेही काही अंशी न पटलेल्या ठिकाणी. त्याने तो कुजली होती. दार उघडले गेले. “यो वेलणकर." त्या नावाने काही वजन पडणार नाहीसे वाटून तो नकळतपणे म्हणाला, "डॉ. वेलणकर, नागपूरहून आलो आहे. केशव हरी वनमाळी इथंच राहतात ना ? मी पत्र पाठवले होते. पण मागच्या रविवारी मी येऊ शकतो नाही. "तो आणि एका दमात म्हणाला. "या, या." तो माणूस दारातून बाजूला होऊन म्हणाला. दोघे आत आले. जेवायची तयारी होती. आपण भलत्या वेळेला आलो आहोत याची त्याला जाणीव झाली. "तुम्ही लोक जेवून घ्या. 

आम्ही वाटेत जेवून आलो आहोत." तो म्हणाला. त्याने सुटका झाल्यासारखे होऊन मग पाणी समोर आले. त्याने थोडा वेळ चुळबूळ केली. हा समोरचा माणूस केशव हरी वनमाळी नक्कीच नव्हता "तुम्ही त्यांचे..." "मी भाऊ त्याचा. सांगतो मी त्याला." तो आत गेला. तो दहा-पंधरा मिनिटांनी बाहेर आला. आतल्या हालचालीवरून वाटते की खोली आवरताहेत, आपण आलो म्हणून. त्याने या, म्हटल्यावर तो आत गेला. देवयानी बाहेरच थांबली होती. तिलाही त्याने बोलावले. ते केशव हरी वनमाळी. पलंगावर निजले होते ते. बरेच आजारी वाटले. चाळीस-पंचेचाळीसचे असावे. निमगोरे, कृश असे. त्यांचे आजारपण मुरलेले वाटले. "नमस्कार", त्याने सुरुवात केली. "नमस्कार", ते म्हणाले. शब्द तोंडातल्या तोंडात. "मी पत्र पाठवलं होतं. एकदम येण्यानं गैरसोय होऊ नये "गैरसोय कसली ? कुठली कथा माझी ? तुम्ही तिचे टोक पकडून ठेवून इथवर आलात. काय माणू मी ? मी पत्र पाठवू शकत नाही. कुणावर अवलंबून रहावं लागतं." "काय होतं तुम्हांला ?" 'पार्किन्सन डिसीज म्हणतात डॉक्टर लोक त्याने खोलीभर पाहिले. 

पुस्तके बिखुरली होती. पलंगावरही पुस्तके होती. मघा हीच पुस्तके त्यांच्या भावाने आवरली असणार... हिंदी, इंग्रजी, मराठी पुस्तके. मासिके दोन- तीन कपाटे भरून, पण बेशिस्त कॉपलेसी. पुस्तकांचा जुना वास येत होता. समोर टी.व्ही. होता ब्लॅक अॅण्ड व्हाईट. खोलीला एकुलती एक खिडकी होती. त्यावर एक जुन्या साडीचा पडदा शिवलेला होता. तो धुवायला झाला होता. एका टाकून दिलेल्या वस्तूसारखे केशव हरी वनमाळी त्या खोलीत पडले होते. मघा घरात वावरत होती ती त्यांची बायको असेल, मुले होती, भाऊ होता. ते सगळे त्यांच्याकडे लक्ष का नव्हते देत ? एवढे चांगले लिहिणारा माणूस...! "घरात आहेत त्या आपल्या मिसेस...." नाही, ती धाकट्या भावाची बायको. मी लग्न नाही केलं. मी धाकटया भावाकडं राहतो. म्हणजे तोच माझ्याकडे राहतो...“घर मोठं आहे !" त्याने म्हटले. खरे म्हणजे त्याला त्या कथेबद्दलच बोलायचे होते. पण सुरुवात कशी करायची ? खोलीत प्रकाशही कमी होता. 

न राहवून केतन उठला, त्याने पडदा बाजूला केला. दुपारचा प्रकाश पाय न वाजवता आत आला. “थँक्स", वनमाळी पुटपुटले. मग त्या प्रकाशाचे बोट धरून केतनने सुरुवात केली. "मला आपली कथा आवडली. मी प्रथम इंग्रजीतून वाचली. मग मूळ हिंदी कथा मिळवली. ती तर जास्तच आवडली. इंग्रजी अनुवादातच मला वाटलं की यावर नाटक लिहावं किंवा त्या फॉर्ममधे काही.. मी एक अंक लिहिलाही. पण मग वाटलं की आधी आपल्याला भेटावं..."तो थांबला, वाटले की ती कथा किती आणि कशी आवडली, आपल्या आत खोलवर तिचे नाट्यरूप कसे भिनत गेले, हे तर अजूनही आपण सांगू शकलेलो नाही, वनमाळी शांतपणे त्याचे बोलणे ऐकत होते. एक सौम्य संयत प्रकाश आतूनच यावा असा, त्यांच्या चेहऱ्यावर पसरला होता. 

तो त्यांच्या प्रतिसादाकरता थांबला आहे असे वाटून ते म्हणाले, "मी ऐकतो आहे. सांगा तुम्ही. "काही विचारू ?" "विचारा. त्याकरताच तर इथवर आलात !" "ही अरुंधती-खूप खरी म्हणजे एकदम ऑथेन्टिक उमटली आहे. तुम्ही पाहिली अशी कुणी स्त्री  ?" नाही कल्पनेतलंच ते रूप असावं," आणि श्रीधर तो म्हणजे. "मी नाही." पण त्या सगळ्या कहाणीत विलक्षण पीळ आहे, तो सच्चा वाटतो." "तो लेखनावर अवलंबून आहे." "मला वाटलं आपल्या आयुष्यात असं काही घडलं असेल." "सामान्य आयुष्यात काय घडणार ? काही सत्याचे क्षीण अंश. बस्स. बाकी सारं अज्ञातातून हाका घालणारं..." "मग नुसती कल्पनाच करायची तर सफल प्रेमाची का नाही ?" "आयुष्यातलं इतर असमाधान यात प्रतिबिंबित झाले असेल." "तुम्ही हिंदीतच लिहिता ?" "हो हिंदी मुलुखातच राहिलो. नोकरी केली. " "आता ?" "मी नोकरी मागेच सोडली. 

आता तर दोन वर्ष झाली. आजारीच आहे." "कुठे होता ?" "मँगनीज खाणीत." "त्यावर काही लिहिलं ?" "नाही." "या कथे शिवाय मी आपलं इतर काही वाचलं नाही इतकं चांगलं काही लिहिलं अजून ?' "लिहिलं थोडं फार. पण चांगलं की वाईट नाही माहीत." "एक आधीच सांगतो. मला सांगायचं राहून गेलेले. तुमची ही कथा प्रेमकथा नाही. ती पार्श्वभूमीला प्रेमकहाणी वाटते पण तुम्हांला सांगायचं आहे ते वेगळं. म्हणून मी ओढला गेलो. श्रीधर-अरुंधतीचं मीलन न होण्याची जी कारणं सहजासहजी घडत जातात, त्यांनीच ती कथा घडते. जे होत जातं ते इतकं फिट, इतके तंतोतंत की वाचताना वाटतं हे कुणीही बदलवू शकणार नाही. ना श्रीधर, ना अरुंधती. ना कुठली शक्ती. श्रीधरच चहुबाजूंनी उणा पडत जातो. यातला निवेदक वेगळा उरतच नाही. 

वेगळा जाणवत नाही... तो श्रीधरमध्ये पूर्णपणे भिनत गेलेला आहे. कथेच्या पहिल्या वाक्यापासून..." "आणि अरुंधती ?" त्या वनमाळीने विचारले. "बरं विचारलंत. अरुंधती ही स्वतंत्र उमटली आहे. तिला समजावून घेण्याचा प्रयत्न आहे. त्याहीपेक्षा अरुंधतीच्या बाबतीत मला दोन गोष्टी एकदमच जाणवल्या."
"कुठल्या ?" वनमाळीनी क्षीण आवाजात विचारले. "श्रीधरच अरुंधतीवरं प्रेम तर आहेच. तरीही तिचे सगळे चढउतार साक्षीभावानं टिपलेत. अरुंधती मात्र श्रीधरच्या बाबतीत वेगळी उरलेली नाही. त्याच्यापासून दूर होतानाही नाही. म्हणूनच प्रेमकथेतली मीलनाची सांकेतिकता इथ कुठंही नाही....." आवेगाने बोलून तो थांबला. देवयानीही त्याच्या बोलण्याकडे चकित होऊन पाहात राहिली. किती विचार केलाय केतनने या कथेवर ! म्हणूनच तो इतका अस्वस्थ होता. 

आपण फार बोललो का ? ती कथा आपल्या अशी दिसली हेही आज असे स्पष्ट होत गेले. जे जाणवले तोच होता का नाटकाचा फॉर्म, आपल्या मनातला ? आता या भेटीनंतर कदाचित पहिला अंक पुन्हा लिहावा लागेल ? मग दुसरा - ते लिहून झाल्यावरच आपण शांत होऊ का ? देवयानीने त्याचा हात हलवला हळूच. वनमाळींच्या डोळ्यात पाणी होते. ते तिने दाखवले. तो त्यांच्याजवळ गेला "माफ करा, मी तुम्हांला दुखवलं का ?" "नही तो", ते एकदम हिंदीत बोलले. तो उठला. "तुम्ही काही लिहिलं असेल याशिवाय, तर ते मला द्याल ? मी परत करीन." "ते माझ्याजवळ नाही." "मग कुणाजवळ ?" "माहीत नाही. मी काही जवळ ठेवलं नाही. आयुष्यच बदललं. किती वर्षात काही लिहिले नाही. ही कथाही जुनीच लिहिलेली होती. "मग ती प्रसिद्ध आता केली ?" "हो." "मग ती आता प्रसिद्ध करावीशी का वाटली ?" "मी केली नाही " "मग कुणी ?" "माहीत नाही." त्यांनी डोळे मिटून घेतले. त्यांना ताण वाटत होता. 

देवयानीने लक्षात आणून दिले. तो विचारायचा थांबला. त्यांनी भावाला आवाज दिला तो बाहेर पोचला नाही. मग त्यांनी हात लांब केला. टेबलावर घंटी ठेवली होती. ती घेण्यासाठी. मग केतननेच त्यांच्या भावाला बोलावून आणले. दुपारच्या वेळी आले आहेत. काही देतोस त्यांना ?" त्यांच्या स्वरात याचना होती. "आम्ही वाटेत जेवून आलो." देवयानी म्हणाली." तरी पण काही प्या चहाबरोबर ताजं." ते म्हणाले. अर्ध्या तासाने चहा आला. चहाबरोबर कचोरी. शिळी, तेलाचा वास असलेली, बाजारची आणि ताजे दही. कसेबसे पकोडे खाऊन दोघे उठले "या मिसेस वेलणकर ?" वनमाळींनी विचारले "अरे हो, ओळख करून द्यायचीच राहिली. ही देवयानी, ही पण डॉक्टर होते आहे." केतनने सांगितले. स्वतःच्या नात्याचा उल्लेख त्याने केला नाही. परतताना स्कूटरचा वेग कमी झाला आपोआप. देवयानीही त्याला बिलगून बसली नाही.  मग केतनने वेगाने आणि आवेगाने दोन अंक लिहून टाकले. आता विचारांना स्थिरता आली होती. 

जे दिसू पाहत होते, ते पकड़ता येत होते. फार पाने फाडली नाहीत, फार खोडाखोडही नाही. रात्री जागून तो लिहीत होता. लिहीत असताना कुणाला झाले तेवढे वाचायला द्यावे, काही चर्चा करावी असे फार वाटते. देवयानी सुजाता आठवल्याही, पण त्या याकरता नको वाटल्या. मग संतोषची आठवण आली तीही टिकली नाही. तीनेक आठवडे या धुनमध्ये गेले. एकदा लिहून झाल्यावर त्याला एकदम मोकळे वाटले. तो त्या दिवशी खूप गाढ झोपला. झोप लागताना वाटले की हेच हवे होते. बस्स. हे असे लिहून काढणे. याहून काही दुसरे नकोच, नाटकाचे प्रयोगही नकोत. ती गोष्ट आपली, आपल्याकरता नाही. आपण फक्त लिहिणारे...हे लेखन प्रसिद्ध होणे, नाटकातून, प्रयोगातून लोकांपुढे येणे, या कुठल्याही गोष्टी आपल्यासमोर नव्हत्या का ? सध्या तरी नाहीत. 

कुणाला बसवायला द्यावे असेही वाटत नाही. त्या दिवशी माहीत नाही, संतोष तसा गेला असताना त्या बोकारेला आपण कसे म्हणून टाकले ! देवयानी किती चिडली ! ते ठीकच होते. नकोच ते आपल्याला. आता नेहमीचे रुटीन सुरू करू. आई नाराज झाली आहे. अभ्यास करायचा आहे. आर्थोपीडिक सर्जन हाच आपला मार्ग. हे नाटक माहीत नाही, कसे मध्ये आले. आता पूर्वीसारखे सगळी झोप लागली गाठ. सकाळी नऊला आलेली जाग एकदम ताजी होती. खोलीभर पसरलेल्या सूर्यप्रकाशापासून सारे सुंदर होते. त्याची खोली, टेबल, टेबलावरचे तारखेचे कॅलेंडर, खिडकीचे पड़दे, भिंतीवरचा देवयानीचा हसरा फोटो टेबलावरचा नाइटलम्प आणि त्याजवळ पेपरवेटखाली ठेवलेले कागद - त्याने लिहिलेले. तो खोलीबाहेर आला. नंदाला चिडवले. आईसाठीही चहा बनवला. देवयानीला फोन केला. ती अंघोळीला गेली म्हटल्यावर पुन्हा, ती फोन करायची वाट न बघता केला. 

असल्या लहान सहान गोष्टीतही समरस व्हायला त्याला आवडत होते. "खुश दिसतो आहेस !" आई म्हणाली. "हो." "झालं लिहून नाटक ?" "हो", तो आतून समाधानाने म्हणाला. "तुझ फडतूस नाटक कोण बसवणार आहे ?" नंदाने त्याला चिडवले. "मला नाटक करायचंच नाही. लिहायचंच होतं ते लिहिलं, बस्स." आईला बरे वाटले. देवयानीबरोबर संध्याकाळ घालवताना तिने नाटकासंबंधी विचारलेल्या प्रश्नांना त्याने वरवरच उत्तरे दिली, आभाळ, डग, त्यांचे रंग, झाडे, हवेतली वाढत चाललेली गरमी. सारं त्याला सुंदरच वाटतं - सुंदर आणि फक्त त्याच्याच करता म्हणून असलेलं, मग त्याच्या केसांतून हात फिरवत देवयानी म्हणाली, "किती हरवला होतास केतन ! मला तुझी जरा भीतीच वाटली." "हो ?" "तर ! तू माझ्यापासून किती दूर गेला होतास !" "पण ते संपतं सगळं आता. "संपवायचं कशाला ! तू काही वेगळ करत होतास ! मला ते आवडलं होतं." "मग भीती कशाची ?" "तुझी आई त्याचा संबंध तुझ्या वडिलांशी जोडत होती. त्याची मला... केतन जोराने हसला. 

"त्या दोन भिन्नच गोष्टी, देवयानी... मी आता हे स्क्रिप्ट झेरॉक्स करून वनमाळीना पाठवून देतो. मग हे संपलंच सगळं." "पण जे लिहिलंस त्याचा प्रयोग नको ?" "झालाच पाहिजे असंही नाही. प्रयोग समोर ठेवून ते लेखन झालेलं नाही. त्यात त्या दृष्टीनं त्रुटी असतील. त्या सर्वात वेळही जाईल. तो काही आपल्या प्रांत नाही." केतनचे सर्व त्याच्या आणि सर्वाच्या दृष्टीने असे सुरळीत सुरू असताना एक पोस्टकार्ड त्याच्या नावाने आले. ते नाटक लिहिले. वनमाळीना पाठवले, त्यालाही आता तीन-चार महिने होऊन गेले होते. उत्तर नव्हते. त्याला मधून मधून ते झपाटलेपण, लिहिणे, वनमाळी, परासियाला स्कूटरने जाणे हे आठवायचे. पण त्यांचे उत्तर नाही आले तेव्हा त्याने ते स्क्रिप्ट पुस्तकाच्या कपाटात दडवून ठेवून दिले. कदाचित त्यांना ते नसेलही आवडले, असे वाटून. आणि आता ते पोस्टकार्ड आले. आपण पाठवलेलं स्क्रिप्ट मागेच मिळालं. परंतु उत्तर देण्याच्या परिस्थितीत ते नव्हते. आता तर ते या सर्वांच्या पलीकडे गेलेत. 

आपण त्यांच्या आयुष्यात शेवटी शेवटी जो प्रकाश दाखवलात त्याबद्दल ते ऋणी होते... रेवती." पत्राखालची सही वाचून वाटले ही कोण रेवती ! रेवती म्हणजे अरुंधती का ? पत्र पाहिले. ते तर परासियाहूनच टाकलेले. अशा पत्रात मायना-पत्ता वगैरे नसतो. पण हे पत्र त्याला त्या केशव हरी वनमाळीच्या मृत्यूचे पत्र वाटले नाही. त्यात ती बातमी होती तरी. हे पत्र कशाची तरी सुरुवात होत होते. वनमाळी तर जाणारच होते. ते गेले. पण हे पत्र काही तरी सुरू करून देते आहे. जे थांबले होते ते. जे दडले, दडपून ठेवले होते ते ! त्याने दडवून ठेवलेले ते स्क्रिप्ट काढले ते स्क्रिप्ट पाहाता पाहता त्याला रंगभूमीचा प्रकाश खुणावू लागला. हा प्रकाश त्याने लहानपणापासूनच पाहिलेला होता. त्या प्रकाशात वावरणारे त्याचे वडील ते घरातून निघून गेले. 

पुन्हा परतले नाहीत त्यांची नाटके ही नंतर होता होता थांबली. पण तरी तो प्रकाश खरा होता. जसे त्या वनमाळींची अरुंधती खरी होती. श्रीधर खरा होता. आणि त्याचे नाटक कसे होते. ते आता ठरावायचे होते. त्या नाटकाला रंगभूमीचा प्रकाश दिसायलाच हवा होता. त्याने स्क्रिप्ट बाजूला केले. ते पत्र पुन्हा पुन्हा वाचले. ते पत्र कुठेच वनमाळीच्या मृत्यूचे त्याला वाटले नाही. "कोणाचे पत्र केतन ? कोण रेवती ? तू मागे परासियाला गेला होतास तेच न ते वनमाळी ? तेच गेले ?" आई विचारत होती आणि त्याला ते ऐकूच येत नव्हते. तो, त्याचे वडील आणि ते केशव हरी वनमाळी या सर्वांत एक अदृश्य दृढ सूत्र त्याला जाणवले. त्याच्या खुणा तिघांवरही उमटलेल्या होत्या आणि त्यावर केतनचा काही इलाजच नव्हता. तरी पंधरा दिवस केतनने जाऊ दिले. पण ते फक्त स्वतःला थोपवण्यात गेले. कशातही त्याचे मन लागेना. देवयानीकडे तो गेलाच नाही. 

तीच आली तेव्हा खुलून बोलला नाही. का रे केतन ?" काही तर नाही" "आई म्हणत होत्या की तू कुठेही बाहेर पडत नाहीस." "या ! हॉस्पिटलला जातो आहे मी." "तेवढच रे. पण नेहमीसारखं नाही. घरीही नाही फिरकलास." "सगळेच दिवस नेहमीसारखे कसे असतील ?""म्हणूनच विचारते आहे. काय झाले ? की अगेन द सेम स्टोरी..." केतन एकदम उठून बसला. पलंगावरची उशी घेतली. त्यात कोपरे रोवली, हात गालावर ठेवले. देवयानीला वाटले किती लहान मुलासारखा दिसतो आहे ! ती लाडात येऊन त्याच्या जवळ सरकली. "प्लीज देवयानी” त्याचा स्वर कोरडा, रूक्ष होता. ती मागेच सरकली, मग त्यात्ताच काही वाटले. तर म्हणाला, ते वनमाळी, ते गेले. "हो  ?" पत्र आलं होतं. कुणाचं असेल ?" तिनं, नाही सांगता येत, अशी मान हलवली "रेवती, अशी सही आहे. तीच असावी ती अरुंधती !" हो  ?" केतनने दिलेले पत्र घेऊन तिने वाचले "पण म्हणून तू एवढा अस्वस्थ... "नाही ग. म्हणून नाही. 

तुला काय वाटतं देवयानी, ही रेवती तीच असेल का अरुंधती ?" "असेल आणि नसेलही, नाव कुठे इतकी महत्त्वाची असतात, केतन !" "खरं आहे." तो म्हणाला. मग तिचा हात हातात घेत तो म्हणाला, "वनमाळी गेले, त्याचं मला दुःख नाही. पण त्यांच्या मृत्यूनं, खरं म्हणजे या पत्रातल्या त्यांच्या मृत्यूच्या बातमीनं पुन्हा ते जुनं सगळे सुरू करून दिले आहे. "मग जे सुरू झालंच आहे. त्याला सामोरं जा." "देवयानी !" "अरे, स्वतःला अस कोंडून घेईपर्यंत मजल गेली ! जे वाटतं ते कर, त्यातल्या अडचणी तर कळतील ? ते सगळे तुझ्याकरता आहे की नाही हे तर स्पष्ट होईल ? असे कुठून काय होईल ? "पण कोण घेईल हे नाटक ?" "लिहिताना याचा विचार नव्हता ना केलास ? आता प्रयोग करतानाही नको करूस. तू स्वतःच कर." "पण कोण बघेल हे देवयानी ! कुणाकरता करू !" "स्वतःकरताच कर, नाटककाराचा प्रेक्षक पुष्कळदा तो स्वतःच असेल. 

त्यानं त्याचं नाटक जसं पाहिलं, तसं दुसरे कोण पाहील ? तूच म्हणत होतास ना ! तू संपूर्ण थिएटरमधे एकटाच आहेस आणि तुझा प्रयोग फक्त तुझ्याकरताच होता..."देवयानी” त्याने तिला जवळ ओतून घेतले ते स्क्रिप्ट घेऊन केतन अविनाश बोकारेंच्या घरी गेला. तो त्यांच्याकडे कधी गेलाच नव्हता आणि आज असा जातो आहे हेही त्यांचा जिना चढताना त्याला जाणवले. रात्रीचे नऊ होत होते. बोकारे घरीच होते. त्यांनी तर प्रथम केतनला ओळखच दिली नाही. मग केतननेच सुरुवात करून दिली, मागे त्यांचे नव्या ताज्या लेखनाबद्दल काही बोलणे झाले होते. संतोष गेला असताना...हेही त्यांना नीटसे आठवेना. ते थोडे इकडचे तिकडचेच बोलले. त्याला काही थंड घेतोस का विचारले. मग सिगरेटचा धूर सोडत बसले. केतनला खरे तर त्याच्या स्क्रिप्टसंबंधीच खूप बोलायचे होते. 

पण बोकारे अगदीच थंड होते. तरीही शेवटी केतनने ते स्क्रिप्ट त्यांच्या पुढ्यात ठेवलेच ! केव्हा येऊ, विचारले. मग ते सावकाश म्हणाले. "त्याचं काय आहे... सध्या एक नाटक करतो आहोत. ते संपेपर्यंत याचा विचार करता येत नाही. आता उन्हाळाही सुरू होईल. उन्हाळ्यात तालमी होत नाहीत. पुष्कळजण बाहेरगावी जातात." "पण तुम्ही सध्या काही करत नाही कुठलंही नाटक नाही, असं शर्मा म्हणत होता बोकारे थोडे सटपटलेच, तेही केतनच्या लक्षात आले "म्हणजे या चालू नाटकानंतर असे म्हणालो असेन..." "कोणतं घेतलं नाटक ? कोणाचं ?" "अं ! म्हणजे विचार आहे..." ते पुन्हा जरा गडबडले "मग मी हे सध्या घेऊन जातो ", म्हणत केतन उठलाच, तेव्हा बोकारे जरा नरमले. "असं करा, हे ठेवून जा, मी बघतो वाचून." केतनवर उपकारच करतो आहोत अशासारखे ते म्हणाले. 

केतनलाही ताणायचे नव्हते. नाही तरी तो आणखी कोणाकडे जाऊ शकत नव्हता. उन्हाळा संपेतो बोकारेंकडून काही समजले नाही. केतनही त्यांना विचारायला गेला नाही. तो त्याला अपमानच वाटला. मूळ प्रत होतीच त्याच्याजवळ. वाटलेच तर स्वतंत्रपणे करता येईल काही. पण या कामाकरता आता पुन्हा बोकारेंचा जिना चढायचा नाही. त्याने स्वतःला बजावले. त्या दिवशी हॉस्पिटलमधे एका भीषण अपघाताच्या केसमधे एकाच कुटुंबातले सहा सातजण गेले. नवरा, बायको, दोन मुले, त्यांच्या बायका. एका मुलाचा मुलगा बरोबर होता. तोही गेला. परीक्षा होती म्हणून घरी राहिलेला चौदा वर्षाचा मुलगा मात्र वाचला. काही स्पॉटवर गेले.. काही हॉस्पिटलमध्ये गेले. अमरावतीला त्यांची गाडी जात होती. ट्रकने धडक दिली. नागपूरही पुरते मागे पडले नव्हते आणि हा अपघात झाला. केतन त्या दिवशी उशीरा घरी आला. आई, नंदा वाटच बघत होत्या. 

"किती उशीर, केतन !" "हं." मग त्याने त्या अपघाताबद्दल सांगितले. जेवताना आई म्हणाली, "कुणी शर्मा येऊन गेला." हो ! काय म्हणाला ?" "बोकारेंनी बोलावस म्हणाला. नाटकाचं वाचन करायचं म्हणतात ते, असं काही म्हणाला वाटतं." "हो ?" तो थोडा उत्सुकतेने म्हणाला. कदाचित हा अपघात असा समोर नसता तर त्याला जास्त आनंद झाला असता, असे त्याला वाटले. "कुणाचं नाटक केतन ?" " मी लिहिलेलं ", तो म्हणाला. संपूर्णपणे "माझं' म्हणण्याची हिंमत त्या झाली नाही. तो जेवतानाच शर्माचा फोन आला. "तुझं नाटक घ्यायचे ठरवतो आहोत आम्ही. तुला बोलावलं आहे." "कसं वाटलं ? लिहिताना प्रयोग समोर ठेवून लिहिलं नसावं." "वाचलं नाही." म्हणजे न वाचताच...मी नाही वाचलं. पण त्यांनी वाचलं असेलच. ते म्हणाले की काही जाणकारांसमोर जाहीर वाचन करू...वाचता वाचताच नाटक उभ होत जाईल..." ती कल्पना केतनला आवडली. 

पण बोकारेंचा थोडा राग, थोडे असमाधान, त्यांचे काहीच उत्तर न आल्याने पुन्हा पुन्हा उगाचच आठवत राहणाऱ्या नाटकातील त्रुटी, यांचे एक विचित्र मिश्रण झाले. तो गप्पच राहिला. “कुणाचा फोन ?" आईने विचारले. तोच. शर्माचा." "नाटकाबद्दलच ना", आईने फोनवर ऐकले होतेच तरी पुन्हा विचारले. "हो", त्याला जास्त बोलावेसे वाटले नाही "केतन. तुझं पुन्हा ते सुरू करू नकोस. आधीच या नाटकाला तू किती वेळ दिलास ! सारं एकदा मार्गाला लागू दे मग कर हे नाटकबिटक..." केतनला एकदम संताप आला. मस्तकातच भिनत गेला. असे असते ? एवढे करून घेतल्यावर मग करता येण्याइतके सोपे ? सुरक्षित ? एका मर्यादित नमून, जपून वागणारे ? कुणाचे तरी ताबेदार असलेले ? तसे असते तर बाबांनी घर नसते सोडले ! वनमाळींचे हे असे नसते झाले ! 

काही तासांपूर्वी पाहिले ते मृत्यूचे भयानक तांडव हाच जर शेवटी सगळ्याचा खरा अर्थ असेल तर मग हे अडसर कशाकरता ? आईला काही झटकन तोडून बोलायला तो गेला पण तेवढेही करावेसे त्याला वाटले नाही. धाडकन त्याने आपल्या खोलीचे दार लावून घेतले. नाटकाच्या वाचनाला तो देवयानी आणि सुजाताला घेऊन गेला. बाकीच्यांनीही कुणी कुणी स्वतःचे लोक आणलेच होते. बोकारेंचे काही खास लोक होते आणि बोकारेंना नाटकात ज्यांना घ्यायचे होते ते. शर्माचे घर मोठे होते. त्याच्या हॉलमध्ये वाचन ठरले होते. नाटक चांगले असेल तर तालमीही तिथेच होतील, त्याला वाटले. त्याला तर त्या हॉलमधली तालीमच दिसायला लागली. वाचन सुरू झाले. सव्वा दोन तास. तो आणि सुजाता दोघांनी मिळून वाचले. वाचता वाचता त्याला ते नाटक किती बाजूंनी दिसायला लागले. त्या सगळ्या गोष्टी रंगभूमीवरच्या होत्या. 

दिग्दर्शनाच्या होत्या लिहिताना हाही विचार किती नकळतपणे आपल्याकडून होत गेला आहे हे त्याला जाणवले. वाचन संपले. चहा-विस्किटे होईतो कुणी बोलले नाही. मग बोकारेंनी सुरू केले. थीम नवी आहे. सांकेतिकता कुठेच नाही. पण प्रयोगाच्या दृष्टीने खूपच कच्ची. पुष्कळ बदल करावे लागतील. "बदल" केतन काहीसा दुखावून म्हणाला "आम्ही ते नेहमीच करतो. मोठ्या मोठया नाटककारांनीही बदल केलेले आहेत. दिग्दर्शकाच्या सूचनांनुसार..."हे वाचताना आपल्यातला दिग्दर्शकही जागा होता हे केतनला सांगावेसे वाटले. पण तो बोलला नाही. तो काही कुणी मोठा नव्हता आणि नाटक ही काही त्याची वाट नव्हती. परतताना सुजाता, देवयानी कुणीच बोलले नाही. सुजाता शांतपणे गाडी चालवत होती. "कसं वाटलं ? तुम्ही कुणीच काही बोलता नाहीत मघा !" आम्ही तुझ्या बाजूने आलो होतो. तिथे आमचं मत कसं देणार ?" सुजाता म्हणाली. “म्हणजे ?" "मला मुळातच हा नाटकाचा फॉर्म वाटलेला नाही. मी मागेच म्हणाले होते. फार संथ गेलं आहे सगळे. 

ही सूक्ष्म वीण नाटकाची वाटत नाही. " "पण जे झालं ते कसं झाले आहे ? "फॉर्मच जर त्यायोग्य नसेल तर काही अर्थच नाही." सुजाता जास्त कठीण आणि परखड बोलते आहे असे देवयानीला वाटले. ती घाईघाईने म्हणाली, "पण जे सुचलं आहे तेच जर नाटकाच्या फॉर्ममधून असेल तर अर्थ नाही हे म्हणणं बरोबर नाही..."कदाचित तालमीतून हे जास्त स्पष्ट होत जाईल. अर्थात तालमी झाल्या तर....केतनला वाटले तालमी सुरू झाल्या. बऱ्याच विस्कळितपणे. त्याही रात्री आठ नंतर. सर्वजण जमायला साडेआठ नऊ, साडेअकरापर्यंत तालीम. आठवड्यातून दोनदाच. तरी नेहमीच्या रुटीनवर त्याचा परिणाम व्हायला लागला. केतनचे अभ्यासातले लक्ष विचलित व्हायला लागले. आईने टोकलेही की, हे सगळे आता या एवढ्या नाटकानंतर बंदच. सुरुवात झालीच आहे म्हणून एवढे, नंतर नाही. ते त्याला थोडेसे पटलेसुद्धा. त्यालाही त्रास होतच होता. 

हा रस्ता जास्तीकरून अपयशाचाच असेल…तालमींना हूहबू आकार येत गेला. तेव्हा केतनला वाटले की बोकारेंचे दिग्दर्शन फार सपाट जाते आहे. आपल्याला ज्या जागा दिसत होत्या, त्या त्याने विझवून टाकल्या. केतन मग काही दिवसच स्वस्थ बसू शकला. समोर तालमी चालू असताना नुसते असे स्वस्थ बसून राहणे याहीपेक्षा वेगळे काही आपल्याला हवे आहे, हे त्याला आतून धडक देत राहिले आणि एक दिवस भडका उडाला. त्याने काही जागा सुचवल्या. दिग्दर्शनात बदल हवा होता. त्यामुळेच नाटक त्याला हवे तसे उभे राहणार होते. त्यानेही बोकारेंनी सुचवलेसे बदल करून दिलेच होते ना ! पण बोकारे चिडले. ते काही नवे नव्हते. ते चिडूनच म्हणाले की, हे नाटकच भिकार आहे. त्याच्याकरताच खरे म्हणजे ते नाटक करत होते. मुळात काही दम नसताना…वादावादी विकोपाला गेली. 

केतन आपले स्क्रिप्ट उचलून घेऊन आला. पण त्याला एकदम सगळे संपले असे काही वाटले नाही. हे असे व्हायला नको होते असे वाटत असतानाच तो अनोखा प्रकाश, आता ओळखीचाच होत आलेला, खुणावतच राहिला. काही आठवडे तसेच गेले. देवयानी घरी आली. तो तालमीचा दिवस होता. "मी आज येणार आहे तुझ्याबरोबर किती वाजता प्रॅक्टिस आहे ?" तिने विचारले. तालीम नाही." "मग केव्हा ?" "सध्या नाहीच. मी माझं नाटक घेऊन आलो बोकारेंकडून." "अरे, पण का ?" त्याने शक्य तितक्या कमी शब्दांत सांगितले. अजिबात गोष्ट न रंगवता, न वाढवता. त्या तशा सांगण्यातूनही त्याला स्वतःला काय हवे आहे हे त्याला नीट कळत गेलेय. मग तो म्हणाला, "जे झाले ते चांगलंही झालं. मीच हे नाटक करीन मला हवं तसं. तुला काय वाटतं ?' यावर देवयानीनेही कोण, केव्हा, कसे, असे काही उलटसुलट प्रश्न केले नाहीत. "जरूर कर. तूच करू शकशील. 

आपल्याला नेमकं काय हवं आहे हे आपणच जास्त चांगलं समजू शकतो. जे इतकं आतून उत्कटतेनं वाटत असतं ते तसंच व्यक्तही होतं. वनमाळींचे श्रीधर-अरुंधती म्हणूनच आपल्याला खरे वाटते ना" ती म्हणाली. तो बोलला नाही. ती जायला निघाली तेव्हा विचारले. "तुझा अभ्यास कसा सुरू आहे ?" "चांगलाच. नोव्हेंबरमधे परीक्षा न ? म्हणून तर इतक्या दिवसांत आले नाही. "देवयानी, माझ्या या सगळ्याचा परिणाम तू तुझ्या तरी अभ्यासावर होऊ देऊ नकोस." ती हसली एकदम आणि मोठयाने का ? का हसते आहेस ?" अरे परीक्षा इतकी जवळ आली आहे आणि दोघांनीही एकमेकांना किती दिवस अभ्यासाबद्दल काही विचारलं सुद्धा नाही. ती निघाली, केतनने दारापर्यंत निरोप दिला. ती बाहेर रस्त्यावर आली. लूना सुरू करणार तो केतनची आई तिला आवाज देत होती. काय आई ?" "घरी मुद्दामच नाही बोलले. केतनसमोर. त्याला आवडत नाही. 

तुला सांगायचं होतं. ती काही बोलली नाही. त्या काय सांगणार याची तिला कल्पना होती. घरी तिची आई, वेळ होत असेल तेव्हा तिचे वडील तिला तेच सांगत होते. "हे असं सारं कुठवर चालेल ? तूच त्याला आवर घाल, पुरुष असेच असतात, आपणच त्यांचे पाय जमिनीवर..." केतनच्या आईचे ऐकून घेऊन तिने हो म्हणून मान हलवली, आवर घालायचा म्हणजे नेमके काय करायचे ? तो उडू पाहात असेल तर त्याचे पंखच धरून ठेवायचे ! चालायलाच इतकी मोठी आखून दिलेली भूमी असताना मुळात उडायचेच कशाला ? आपली जागा सोडून ! असे सांगायचे ? राज्य नाट्यस्पर्धाकरता एक ग्रूप धडपड करत होता. त्यांना नवे नाटक हवे होते. कुणीतरी त्यांना केतनचे नाव सुचवले आणि केतकला त्यांचे. दोघांना एकमेकांची गरज होती. केतनने त्यांना नाटक दिले. ती सगळीजण नवी होती. 

त्यांनी केतनचे बरचसे ऐकून घेतले. त्याचे दिग्दर्शनही मान्य केले पूर्णपणे नसले तरी बरेचसे. केतन काही तरी मर्माचे सांगत होता हे त्यांना पटले. त्या सर्वांची वाट नवी होती. आभाळ नवे होते. केतनही नवाच होता. अशा वेळेला एकमेकांचे सगळेच पटत नसते हेही केतनला  कळले. पण या सगळ्यांत तो ओळखीचा होत गेलेला प्रकाश अधिकाधिक खोलवर भिनत गेलेलाच त्याने अनुभवला. नाटकाची रंगीत तालीम झाली, तेव्हा हे नाटक काय हवे होते आणि कसे झाले हे त्याला कळत गेले. अजून बरेच काम बाकी होते. अपुरेपणा होता. जे हवे ते लांबवर होते. तरी काही पडत होते. रुजू पाहत होते. हे रुजणे नव्या भूमीतले होते आणि त्याचे त्या प्रकाशस्त्रोताशी खूप निकटचे, खूप निकटचे - अगदी रक्ताचे नाते होते. फक्त त्याची ओळख करून देण्यापुरते निमित्त घडले ते मात्र वनमाळींच्या कथेचे.

राज्य नाट्यस्पर्धेत केतनचे नाटक आठव्या दिवशी होते. सभागृही काही खूप गच्च भरले नव्हते. कलाकारांच्या घरचे लोक, आप्त मित्र, पास दिलेले, काही निमंत्रित, काही तिकीट काढून आलेले आणि परीक्षक - अर्धा हॉल रिकामाच होता. केतनचीही सगळी माणसे होती. मेडिकलचा त्याचा नाटकाचा ग्रुप होता. डॉक्टर - देवयानीचे वडीलही आले होते. देवयानी समोरच पहिल्या रांगेत होती, तो विंगमधे. पडदा वर गेला. तो प्रकाश, रंगभूमीवरचा प्रकाश फाकला. त्या प्रकाशात त्याचे शब्द, त्याची रचना, त्याची पात्रे जी मुळात वनमाळीची होती, पण नाटकात त्यांच्यावर त्याचीच मुद्रा होती ती, तो बघू लागला. खरे म्हणजे तो विंगमधे नव्हताच. तो समोर थिएटरमधे होता आणि एकटा...अगदी एकटा. देवयानीही त्याच्या बाजूला नव्हती आणि त्या प्रकाशात प्रयोग फक्त त्याच्या एकटयाकरता होत होता. 

नाटक संपले.... कुणी तरी म्हणाले, चला, वेळेत तर बसलं " कुठली वेळ ? कुणी दिलेली ? स्पर्धेने ? पण स्पर्धा कुणाशी ? त्याचे नाटक तर त्या प्रकाशात त्याने पाहिले ते एकटे एकच होते ! एकेक जण त्याच्याजवळ येत गेला. प्रथम बोकारे आले. शर्माही होता. "अभिनंदन, प्रयोग खूपच चांगला झाला." ते मनापासून म्हणाले. सुजाताही म्हणाली, "प्रयोग स्क्रिप्टपेक्षा पुष्कळ वर उचलला डॉक्टरही आत येऊन म्हणाले, "यू हॅव डन समथिंग न्यू. बट व्हॉट नेक्स्ट ? घिस इज नॉट युवर फील्ड." त्याच्या आईने त्याच्या पाठीवर हात ठेवला; तिच्या डोळ्यांत किंचित पाणी होते. नंदा म्हणाली, "माझ्या सगळ्या ग्रुपला नाटक आवडलं जरा वेळाने देवयानी आत आली. हळूच म्हणाली, "थोडं बाहेर चलतोस. बाहेर कुणी आलं आहे, तुझ्याकरता थांबले आहे." "बोलाव न त्यांना." "नाही, तूच चल." समोरचा पडदा उघडून पायऱ्या उतरून तो हॉलमधे आला. 

आता तिथे अंधार नव्हता. हॉल पूर्ण रिकामाच होता आणि एका खुर्चीवर कुणी बाई बसली होती. देवयानी त्याला तिच्याजवळ घेऊन आली "हा केतन आणि केतन या-या रेवती..." केतन पाहत राहिला. त्या बाईनी नमस्कार केला. पण केतन... तो पाहत राहिला. साधी वायलची साडी. अंगावर शाल, गळ्यात, कानात काही नाही हातात फक्त घड्याळ, कुरळे केस, कुरळे आणि भुरे पिंगट. डोळे मोठे, तेही किंचित पिंगट, काळेभोर नाहीत आणि डोळ्याला चष्मा. कृश, उंच आणि गोरीच. कपाळावर बारीक टिकली. आपण या बाईना कुठे तरी पाहिले आहे, हे त्याला जाणवले. पण कुठे ? आठवले वनमाळीच्या कथेत आणि नंतर आपल्या नाटकात. तसा थोडा फरक दोन्हीमधे होता पण वनमाळीच्या कथेतले, त्याच्या नाटकातले चित्र तरुण स्त्रीचे होते. तीच ही. समोर होती, ती चाळिशीला आलेली, केसातल्या रुपेरी छटा, डोळ्याला चष्मा. "मी यांना कळवलं होतं. 

नाटकाबद्दल वनमाळींच्या पत्त्यावर." देवयानी म्हणाली. तेव्हा केतन भानावर आला. "प्रयोग चांगला झाला", ती म्हणाली. केतनला बोलणे सुचलेच नाही. "केशवला आवडला असता." ती पुन्हा म्हणाली. उतरलात कुठे ?" त्याने विचारले. "कुठंच नाही. बसनं आले थेट इथंच. लगेच जाईन." घरी चला" "नको. पुन्हा कधी", ती म्हणाली. देवयानीने आग्रह केला. खरंच पुन्हा येईन. यांच्या नवीन नाटकाला." ती म्हणाली. नवीन नाटकाला. तो थरथरला. केतनला ते शब्द स्वतःकरता आहेत असे वाटलेच नाही. नाटकानंतर जेवण वगैरे होते. त्यानंतर देवयानीला सोडायचे होते. आता तो थोडा मोकळा होत होता. नाटकाच्या नुकत्याच घेतलेल्या अनुभवापासून थोडा दूर असा. "तू काहीच बोलली नाहीस, देवयानी !" तो स्कूटर सुरू करत म्हणाला, सर्वजण सांगत होतेच. माझी तशी गरज नव्हती." म्हणजे नाटक चांगलं वाईट झाले हे गरजेपोटी सांगायचं असतं ?" तो म्हणाला, तेव्हा ती चमकली. “तसं नाही रे. 

पण सर्वजण चांगलं म्हणत आहेत. मलाही ते चांगलं वाटलं. मी वेगळं काय सांगणार ? वाहून काही वेगळं जाणवलं तर सांगता येईल. सारेजण विरोध करतात त्या वेळी असेल तर काही चांगलं सांगता येणं जास्त महत्त्वाचं ना केतन !" "म्हणजे देवयानी ?" त्याने स्कूटरचा वेग कमी केला. “केतन माणसाला जे आतूनच धडका देत असतं ते करून पाहता येणं हेच माणसाचं सर्वांत मोठ यश नं ! बाकी लौकिक यश-अपयश वेगळंच. त्याचा याच्याशी संबंध नाही. ते येत राहील, जात राहील." मग तिने एका हाताने त्याला वेढून घेतले. त्याला बिलगून त्याच्या पाठीवर मान टेकली आणि त्याला हळूच म्हणावे तशी अगदी स्वतःशीच म्हणाली, ते त्याला ऐकू जाणारही नव्हते. . श्रीधर अरुंधतीला हेच जमलं नसेल. तुझ्या वडिलांनाही जमले नाही. 

आपल्या उसळणाऱ्या रक्ताशी अप्रामाणिक होणं... तसं होतानाचे क्लेश, तडफड, त्याचे बळ...पण केतन त्या वनमाळींची कथा मी तुझी माझी होऊ देणार नाही. कदाचित हीच वाट असेल तुझी आणि तुला ती शोधतच जायचं असेल, तरीही नाही… तिचे बोलणे अर्थातच केतनला ऐकू नव्हते आले. पण त्याने स्कूटरचा वेग कमी केला. तिचा हातही हळूच बाजूला केला. त्याच्या डोळ्यांपुढे आता अरुंधतीचे हे रूप यायला लागले. नुकतेच पाहिलेले. चाळिशीला आलेली. कदाचित चाळीस पार केलेली, केसांतील रुपेरी छटा, डोळ्याला चष्मा, डोळ्यांतील पिंगट छटा थकलेल्या; खाली पाहात त्या हॉलमधे एकटीच बसलेली ती, श्रीधरची अरुंधती. आता या टोकाकडून ती सगळी कथा पुन्हा केतनपुढे यायला लागली, अस्पष्ट, अंधुक तरीही एका मोठया अपरिचित स्क्रीनवर. तो गोंधळला. आता पुन्हा त्या सगळ्याची पुनरावृत्ती सुरू होईल. अस्वस्थ, अशांत, अस्वस्थ ! नुकतेच तर सारे संपले होते. नुकताच तो मोकळा झाला होता आणि हे काय पुन्हा सुरू होत होते ! "काय केतन ?" मध्येच स्कूटर हळू झाली म्हणून देवयानीने विचारले. "काही नाही", तो म्हणाला.
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके