डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

...मी तर काय कोणीही असू शकतो! प्रत्येकजणच मी असू शकतो! प्रत्येकजणच जे होऊ शकेल तेच आपण कसं व्हायचं? आपल्या आपल्याच संदर्भातलं सगळं अंगावर वाहून नेणारा तो 'मी' होणं नको वाटतं. तो 'मी' दूरस्थ परका- 'मी’ ऐवजी 'तो' बरा- 'तो' म्हणून स्वतःकडे पाहता आलं की झालं. तो म्हणजे मी नव्हता, हे तर झालंच पण तो कार्तिकही तरी होता की नाही! आई म्हणायची, नाव असतंच कुठे आपल्याला! आपण मी म्हणतो. लोक तू म्हणतात. आपण खरं म्हणजे तोच असायला हवं.

कार्तिकने लिहायला सुरुवात केली. मणीने कालच आणून दिल्यासारख्या वह्या कोऱ्या, न उलगडलेल्या आणि हाताशीच अशा होत्या. त्यावर त्याने पहिल्याच ओळी लिहिल्या.... बोटांना पेनची पकड जाणवली नाही. तरी नेटाने त्याने त्या ओळी वहीच्या कागदावर ओतून पाहिल्या, पेनाशिवाय बोटांनीच. मनात इतके सगळे साचून राहिले होते, की आता पेन हे केवळ निमित्तच असेल, हे त्यालाच कळले. तरीपण उपचार म्हणून पेन किंवा त्यासारखे काही, कदाचित साधी पेन्सिल, जराशी पसरट टोकाची बरी राहिली असती, असे जाणवले. त्या फिजिओथिरपीस्टने करवून घेतल्याप्रमाणे बोटांच्या चिमटीच्या लहान बारीकशा हालचाली केल्या... आणि स्वतःला त्या वहीतल्या कोऱ्या पानांच्या स्वाधीन करून टाकले. 

...मणीने मला माडीवरच्या खोलीत पलंगावर आणून निजवले आणि समोरची खिडकी उघडली. नजरेत आले ते समोरचे आभाळ. दुपारचे. कोरे करकरीत. या वहीतल्या पानांसारखे, आणि आभाळाचा निळा रंग पांढर्याकडे झुकलेला. आभाळ अतिशय संथ होते. पाखरं, पक्षी, ढग, विमान असा लहानसा ओरखडाही त्यावर नव्हता. आभाळ इतके कोरे करकरीत निःसंग असू शकते, हेच प्रथम कळले. आधी कळले. मग दिसले. आणि लगेचच लक्षात आले की हा तर चक्क आईसारखाच विचार करतो आहोत आपण! निःसंग हा शब्दही तर तिचाच! ती फिजिओथिरपीस्टही अशीच! तिच्या भावना समजतच नाहीत. बोलणे एकसुरी. कुठलेही चढउतार नाहीत. जशी एक्सरसाईज देताना कॅसेटच लावली आहे. टेप केलेली. तिच्या सूचनांची बोटे दुखली म्हणून त्याने लिहिणे थांबवले.....

त्याच्या कारचा आणि समोरून भरधाव येणाऱ्या कारचा तो अपघात झाला तो अशाच चिडीचूप दुपारी. भर उन्हाने रस्त्यात जणू चिटपाखरू नसावे. त्याची कार आणि समोरून मरणासारखी चालून येणारी दुसरी... तो वाचला तरी! त्या कारमधला तर जागीच... भवताली आगीसारखी पेटलेली दुपार आणि तो भवतालचा दबा धरून बसलेला मृत्यू... हॉस्पिटलमध्ये महिना काढला. घरी येऊनही पंधरा दिवस झालेत. अजून अंथरुणावरच आहे. पलंगावरच. हाता-बोटांचे काही एक्सरसाईज सुरू आहेत. अजून उठून बसता येत नाही. मानेवर जबरदस्त आघात झालाय, शिवाय मल्टिपल फ्रॅक्चर....

जिन्यावर पावले वाजली ती मणीची. त्याचे सकाळचे सगळे आटोपून ती घाईघाईने ऑफिसला जाण्यापूर्वी त्याला सांगायला म्हणून आली.
"अं! जाऊ मी?" तिने विचारले. 
"जातेस?" तो म्हणाला.

"जायला हवं. महिना झाला सुट्टी झाली. याहून जास्त...”
'ती थांबली. ती जे बोलली त्यापेक्षा न बोललेले जास्त होते; आणि ते त्याला कळलेच. तिला ऑफिसला जायची घाई असते, ती वेळेवर जाणे जमावं म्हणून तर असतेच; पण तिला या सगळ्या अंगावर आलेल्या रुटीनपासून सुटकाच हवी असते, हेही त्याला कळलेच. ती घाईने निघून गेली, तिने शिंपडलेल्या सेंटचा वास मागे रेंगाळला. जिन्यावरून तिची उतरती पावले ऐकू येईनाशी झाली आणि त्यालाही जरा सुटल्यासारखेच झाले.

हा अपघात झाल्यापासून त्याला मणीचे एक दडपणच येत होते. ती घरून हॉस्पिटलला जायची वेळ झाली, की ते दडपण यायचे. हॉस्पिटलमधून डिसचार्ज मिळाल्यावर तिनं विचारलं, 
"तुला कुठं रहायला आवडेल? वर की खाली?" 
"वरच" तो तात्काळ म्हणाला.
"मलाही तेच वाटतं. खाली सारखी वर्दळ. पुन्हा मावशी खूप वरच्या पट्टीत बोलत असतात सारख्या. तुला त्याचा त्रासच होईल.”

मुली मात्र म्हणाल्या की बाबांना खालीच असू दे. वरपेक्षा खालीच मन रमेल त्यांचं म्हणून... मणी ऑफिसला निघून गेल्यावर खोल श्वास घेऊन सोडून कार्तिकने स्वतःला मोकळे करून घेतले. समोरच्या भिंतीवर सोनालीने- त्यांच्या मोठ्या मुलीने- केलेले पेंटींग होते. तिकडे तो पाहू लागला. सोनूला रंगांची, रेषांची विलक्षण जाण आहे, हे त्याला माहीत आहेच. सोनूचा त्याला अभिमान आहे. ती काहीशी तेज आहे, तिच्या आईसारखी. दिसतेही मणीसारखीच. आणि हट्टीही तशीच आहे. जरा मनाविरुद्ध झाले की हिचा चेहरा बदलतो. भिंतीवरचे चित्र एका आदिवासी बाईचे आहे. अंगात ब्लाऊज नाही आणि कडेवर मूल- मूल अगदीच किडकिडीत. बरगड्या दिसतात त्याच्या... खायला न मिळाल्यासारखे ते मूल... पोट मोठे, हाता-पायाच्या काड्या... शेजारच्या घिरणीकरांच्या गच्चीवर मिसेस धिरणीकर तिच्या लहान मुलाला कडेवर घेऊन त्याचे कपडे एका हाताने तारेवर वाळत घालत होती. दहाच वाजत होते, तरीही गच्चीवर ऊन तापत होते. बर हवाही असावी. तिची ओढणी उडत होती आणि कडेवरच्या त्या गबदुल मुलाचे कुरळे-भुरे जावळही. ती धिरणीकर निघून गेली. तिने तारेला लटकवलेले कपडे तेवढे राहिले. त्या चिमुकल्या कपड्यांनी ती अवघी तार भरून गेली होती... आणि सोनालीने काढलेल्या चित्रातल्या मुलाला कपडेच नव्हते...

मावशी त्याचे जेवणाचे ताट घेऊन वर आल्या, त्याच्या बाजूला स्टूल सरकवून त्यांनी त्यावर ताट ठेवले. जिना चढून दम लागल्याने जरा भिंतीला टेकल्या.
"तुम्ही कशाला आलात मावशी?" तो जिव्हाळ्याने म्हणाला. 
"अकरा वाजले! मणीचा फोन येतो मग, दिलं का जेवायला म्हणून!" त्यांचा मोठा कर्कश टिपेतला आवाज कानावर आदळलाच... किती जवळ होता तो! आणि त्या केवढ्याने बोलत होत्या!
“आज ती नवी बाई आली नाही." मावशींनी तक्रार केली. ही नवी बाई दिवसभराला मणीने सध्या मुद्दामच ठेवली... 
"आता म्हणजे मलाच मरावं लागणार..." मावशी कुरकुरल्या. असे कुरकुरणे मावशींना आवडते. कार्तिक ऐकून घेतो. म्हणून मग कार्तिकजवळ त्यांना स्फुरण चढते... कार्तिक फक्त हसला.
"जेवून घ्या गरम, मला खाली काम आहे." त्या घाई करायला लागल्या. कार्तिकच्या पलंगाची उशाकडची बाजू त्या वर करायला लागल्या.
"मला भूक नाही मावशी, इतक्यात. मधुरा आली की मग खाऊ घालेल."
"मधुरा आज सकाळीच शाळेत गेली." 
"शाळा सुरू झाल्या?"
"तर!" 
मधुरा लहान आहे. ती आता कॉलेजमध्ये जाते तरी मावशी शाळाच म्हणतात, म्हणून सगळे घरही मधुराच्या कॉलेजला शाळाच म्हणते.
"मला भूक नाही" मावशींकडून भरवून घेणे त्याला अगदी नकोच वाटले.
"सारं गारढोण होईल; मणी मला बोलेल."
“पण गारढोण झालं आहे, हे बाईंना कळलं तर ना!” तो हसून म्हणाला.

"तरी मणीला सगळं समजतं. ऑफिसमधून वासच येतो तिला." म्हणत पुटपुटत मावशी जिन्याकडे गेल्या. उगाचच कण्हत. त्यांना जिना चढायला त्रास होतो हे त्याला कळावे म्हणून मुद्दाम 'रामा रे रामा' वगैरे निरर्थकच पुटपुटत... मावशी मणीच्या दूरच्या नात्यातल्या नात्यातल्याही नाहीतच, तिच्या माहेरच्या परिवारातल्या. सोनूच्या जन्मापासून मणीजवळ आहेत. विशिष्ट असे नाते नाही म्हणून त्या कोणीही असू शकतात. आणि कधी कोणीच नसतात...

कार्तिक डोळे मिटून पडला. आता उन्ह वाढते आहे. उन्हाचा पूर्वीचा चटका गेला, पण ही वेळच ऊन चढण्याची होती. खिडकीतून दिसणाऱ्या घिरणीकरांच्या गच्चीवरही ऊनच ऊन होते, तारेवर लटकवलेले कपडे गरम हवेत फडफडत होते. पण खिडकीचा पडदा सरकवायला हवा होता.
‘झोपलात बाबा?’ सोनाली विचारत होती.'
"नाही ग! डोळ्यांवर प्रकाश येत होता." 

मग तिने गच्चीच्या बाजूच्या खिडकीचा पडदा ओढला, समोरच्याही खिडक्यांचे पडदे सोडले. कार्तिकच्या मनात आले, ....रंगमंचावर सोनूचा प्रवेश झाला आहे. मनातली कल्पना तशी त्याची त्यालाच फुसकी वाटली; पण ती मधुराजवळ बोलून दाखवता आली असती. मधुराचे नि त्याचे तसे नातेच आहे लवचिक. सोनू जरा गंभीरच आहे.
“अन्न गार झालं बाबा. मावशी आणून कशाला ठेवतात!" ती डाफरली.
"मला भूक नाही हे त्यांना कसं कळावं!" त्याने आपल्याकडून मावशीची बाजू धरून उचलली. उगाच मणीने बोलायला नको! 
"आणि आईनं पडदे सोडायचे नाहीत का! केवढं ऊन आलं!"
"ती गेली तेव्हा ऊन नव्हतं ना पण!" तो म्हणाला. सोनू खालून वेगळं जेवण घेऊन आली. आधीचं ताट ती खाली घेऊन गेली. ती आता मावशींना बोलेल आणि मग मणीला कळेल. मावशींना मणी रागवेल... ते सगळे त्याच्यामुळे असे दडपण कार्तिकला आले. सोनू त्याचे दुसरे ताट आणीपर्यंत त्याने पुन्हा डोळे मिटून घेतले. मनाशी एक अनोखा खेळ सुरू केला.
"ऊन कोणासाठी पडतं? त्याने स्वतःलाच विचारले. केवळ माझ्या करताच. "
"ती समोरची गच्ची कोणाकरता? फक्त माझ्याकरताच."
"ते कपडे कुणाकरता हवेत उडतात? अर्थात माझ्याकरता."

"जिन्यावर पावलं वाजतात ती कोणाकरता? माझ्याकरताच."
"रंगमंचावरचे हे सगळे प्रवेश कुणाकरता? माझ्याकरताच." 
सोनू विचारत होती,
"थकलात बाबा! भूक लागली ना!"
"नाही ग!" तो म्हणाला. तिला आपल्या खेळात सामील करून घ्यावेसे वाटले, पण तो शांत राहिला. सोनूने त्याला कुशीवर केले. स्टूल जरा दूर केले. ताट त्यावर. डाव्या हाताला जरा बरी पकड होती. त्याच्या दोन बोटांच्या पकडीत चमचा दिला. दोन-चार घास खाऊ दिले. मग सोनू तिच्या आईसारखेच म्हणाली,
“घाबरू नका बाबा, नर्व्हस नका होऊ! मीच खाऊ घालणार आहे. पण शेवटी तुम्हांलाच आले पाहिजे म्हणून..." सोनू भरवायला लागली. तोंडात घास असतानाच त्याने सांगितले..
"सोनू, तुझं चित्र मला फार आवडलं."
"ते पेंटींग, बाबा?"
"हो."
"रंग रेषा कळतात तुम्हांला, बाबा?"
"इतके दिवस नव्हतं कळत, पण आता..."
"आता काय!"
"तू हे सगळं माझ्याचकरता काढलंस असं मला वाटतं." 
"पण मी हे तुमच्याकरता नाही काढलं काही.”
"मग कोणाकरता?"
“कुणाकरता असं नाही. प्रत्येक गोष्ट अशी कुणाकरता, कशाकरता म्हणून नसते काही." 
"तरीपण मला वाटतं, सगळ्या रंगरेषांचं जरी नसलं तरी या तुझ्या रंगरेषा मात्र केवळ माझ्याकरताच..." 
"काहीतरीच काय, बाबा? ते सगळं मी माझ्या आनंदाकरताच करते..."
"मी त्याचा उद्देश नाही विचारत सोनू. एखाद्या गोष्टीचं अस्तित्वच कधी असं कशाकरता तरी असतं नकळत!" 
"मला नाही कळत."

"बरं एक सांग, मला हा असा अपघात तरी कशाकरता?" 
"कशाकरता काय बाबा? तो अपघातच शेवटी!"
"अगं सोनू, एकमेकांशी संबंध नसलेल्याही दोन भिन्न गोष्टींचं अस्तित्व कधी कधी एकमेकांकरता असू शकतं."
"मला नाही समजत तुमचं." म्हणत ती उठली. त्याच्या तोंडाला पाणी लावले. गुळणा करवला. कूलर सुरू केला. 
"जाऊ मी बाबा?"
"कॉलेज..."
"कॉलेजं अजून नीट सुरू झाली नाहीत. मैत्रिणीकडे जाते. मधुरा येईलच आता..."
"तिचं कॉलेज सुरू झालं?"
"तिची तर शाळा आहे. केव्हाच सुरू झाली." सोनू हसत म्हणाली. मधुरा ज्युनियर कॉलेजला आहे, ते शाळेसारखे असतेही. तो हसला. सोनू जायला लागली. 'सोनू' त्याने आवाज दिला.
"त्या वह्या देतेस! आणि पेन्सिल?"
"काही लिहायचं आहे? लिहून देऊ?"
"नको, एक्सरसाईज बोटांचा बस्स..." एक्सरसाईज म्हटलं की सगळ्यांचं समाधान होतं. हॉस्पिटलमधून घरी आल्यावर मणीला वह्या मागितल्या. आणून दे म्हटलं तर म्हणाली, 
“रेस्टच घे तू. काही लिहू बिहू..." म्हणता म्हणता ती थांबलीच. त्याला लिहिता येत नाही, पण मनात काहीबाही येत असेल. त्याला वाट तर द्यायलाच हवी... ती मग त्याच्या केसावरून फिरवून म्हणाली, 'मी, सोनू, मधू, कुणीही लिहून देईल. जरा स्थिर हो मात्र."
"नाही मलाच लिहायचं आहे." तो निर्धाराने म्हणाला, तिने त्याच्याकडे अगदी आश्चर्यानेच पाहिले.
मग तोच म्हणाला, “एक्सरसाईज म्हणून..." यावर पूर्ण समाधान होऊन मधुराच्या रफ वह्या, कोरे कागद राहून गेलेल्या दिल्या, तेव्हा स्वतःची नाराजी लपवत तो म्हणाला,

"मी खरंच काही लिहिणारा लेखक असतो तर मला जसं पॅड, वह्या दिल्या असत्यास, तशाच दे." तिने त्याच्या त्या लिहिण्याच्या एकूणच ऊर्मीकडे संपूर्ण अविश्वासानेच पाहिले... सोनूने दिलेल्या वह्या, पेन्सिल त्याने त्याच्या छातीवर पालथी ठेवली. बोटांत पेन्सिल धरता येत होती आता. तसे एक्सरसाईज झाले होते. फक्त पेन्सिल धरून लिहिता येणे ही वेगळी गोष्ट होती. पालथ्या ठेवलेल्या वहीच्या पानांतून तो मधले बोट फिरवू लागला. मग अंगठा आणि त्याजवळचे बोट घेऊन ते त्याने निकराने त्या कोर्या कागदातून फिरवले. जणू तो लिहीतच होता. पूर्वीचे डौलदार अक्षरांचे वळण तर नव्हतेच... ओळीही एकात एक घुसल्या होत्या आणि एकातून एक सुटल्याही होत्या. इतस्ततः पूर्वी मणीची नि त्याची बोटे एकात एक गुरफटावी तशा आणि आता या रुटीनमध्ये एकमेकांपासून विलग व्हावी तशा... कार्तिकने त्या ओळीतल्या 'मी' कडे पाहिले रोखून. हा 'मी' म्हणजे आपण म्हणजे कार्तिक हा प्रत्यय भिडेनाच. तो क्षणकाल स्तब्ध झाला. वहीच्या पानांतून बोटे फिरायचीच थांबली, शब्द बोटांतून स्त्रवण्यापूर्वीची ती अस्वस्थता ते प्रचंड दडपण.... आणि बोटे कागदावर वेडीवाकडी फिरू लागली. तो हळूहळू मोकळा सैलावत गेला.

...मी तर काय कोणीही असू शकतो! प्रत्येकजणच मी असू शकतो! प्रत्येकजणच जे होऊ शकेल तेच आपण कसं व्हायचं? आपल्या आपल्याच संदर्भातलं सगळं अंगावर वाहून नेणारा तो 'मी' होणं नको वाटतं. तो 'मी' दूरस्थ परका- 'मी’ ऐवजी 'तो' बरा- 'तो' म्हणून स्वतःकडे पाहता आलं की झालं. तो म्हणजे मी नव्हता, हे तर झालंच पण तो कार्तिकही तरी होता की नाही! आई म्हणायची, नाव असतंच कुठे आपल्याला! आपण मी म्हणतो. लोक तू म्हणतात. आपण खरं म्हणजे तोच असायला हवं. स्वतःहून कुणीतरी निराळा. वेगळा. दुसरा. मणी लग्न झाल्याझाल्या 'तू' म्हणायची. नंतर सरळसरळ 'कार्तिक'- आता तर ती काहीच म्हणत नाही. अरे बघ, हे पहा.... इत्यादी... सुरू असतं. सतत निकटच जे आहे त्याला हाक मारायची गरज काय! मणी आता ऑफिसमधून फोन करते तेव्हा विचारते. कसा आहेस! काय करतोस! गेले कित्येक दिवस की महिने तिनं आपल्याला कार्तिकही तर म्हटलं नाही! ताई म्हणायची, 'अरे कार्तिक'- कार्तिक असणं म्हणजे काय असतं ते ताई हाक मारायची तेव्हा कळायचं. तेव्हा वाटायचं की खरंच आहे आपलं नाव कार्तिक...

फोनची रिंग आली. जिन्यावर पावलं वाजली. जवळचाच कॉर्डलेस त्याच्या कानाशी धरून ती दिवसभराची मुलगी म्हणाली, 'बाईंचा फोन...'
"कसा आहेस! काय करतोस!" पलीकडून मणीने विचारले, तेव्हा त्याला एकदम फस्सकन हसू आले...
"का हसतोस?" तिने विचारले.
“असंच गं!" तो म्हणाला.
“जेवलास ना?"
"हो."
“आता चमच्यानं स्वतः थोडं खाता येतं ना? हात वर जातो ना!"
"हो गं! पण वेगळं काही विचार ना!" 
"काय विचारू? हो. एक्सरसाईज द्यायला बाई आली होती?"
“अजून तिची वेळ झालीच नाही. पण माझी तब्येत, मी काय करतो हे प्रश्न सोडून काहीतरी विचार नं." 
'बरं' म्हणून मणीने फोन ठेवून दिला.

ठीक चार वाजता, एक्सरसाईज द्यायला ती बाई आली. त्याने पाहिले अगदी राईट टाईम. हिच्या येण्या-जाण्यावरून घड्याळे घ्यावीत लावून! त्याने तिच्याकडे पाहिले; हिला सरसकट सगळे बाई का म्हणतात! एक्सरसाईजवाली बाई. तिला तिचं नाव-गाव आहेच. अनू पोतदार. वय- तेहतीस. रिंग रोड, प्लॉट नं. 62, घर नंबर...
"घर नंबर काय तुमचा!" त्याने एकदम विचारले.
"अं!" ती आश्चर्याने म्हणाली.
"कशाला!"
'असंच. कळून घ्यावासा वाटतो."
"त्याची तुम्हांला कधी गरज पडणारच नाही." ती कमालीच्या निर्विकारपणे म्हणाली.
"तसं नाही, पण माझा एक मित्र तिकडेच राहतो त्या..." 
"त्यांना फिजिओथिरपीस्टची गरज आहे का?" आता त्याला एकदमच हसू फुटले.
"एवढा मी आहे अंथरुणाला जखडलेला. पुरेसा नाही का!” ती काही हसली बिसली नाही. मग तो म्हणाला,
“अहो मेल्यानंतरच सगळं सामान मिळत ना, ते विकणाऱ्या माणसालाही वाटणारच की रोज कुणीतरी मेलाच पाहिजे म्हणून..." तो हसत म्हणाला.
"काहीतरीच टाईमपास करता तुम्ही! त्यांची आमची कशी कम्पॅरिझन! आम्ही तर तुम्हाला बरं करण्याकरताच येतो" तो किंचित ओशाळला.

हाताचे एक्सरसाईज पटापटा झाले. आता बोटांचा आणि बोटाच्या चिमटीचाही बराच पुढे प्रवास झाला होता. बोटांनी पेन धरून कागदावर लिहिता येत होते. फक्त अक्षर किंचित दाबून लिहिणे आवश्यक. मोठी किंवा पुसट अशी येत. त्यात पूर्वीची सहजता नव्हती. गुडघ्यापासूनच्या पायाच्या पावलाचे एक्सरसाईजही निजल्यानिजल्या झाले- 'आज तुम्हांला मी उठून बसवते. मी असेपर्यंत बसायचे.’ ती म्हणाली. दोन्ही हातांनी त्याला पाठीकडून उचलून तिने बसवले. त्याने स्वतःला पूर्णपणे तिच्या स्वाधीन केले होते. ती अतिशय कृश, काटकुळी होती. ठेंगणीही होती. त्याला असं सर्व भार घेऊन उठवताना जरा तिचा घास फुलला. तिची वरखाली होणारी एरवीची अनाकर्षक, काहीशी सपाटच छाती- तिचा स्पर्श त्याला झाला, त्याला बरं वाटलं. चष्म्याआडचे तिचे काहीसे निःसत्त्व डोळे; तेही त्याला आज त्याचे, त्याच्याकरता असलेले असे वाटले. ती कितीही रोड, कशीही असली तरी हा स्पर्श एका बाईचा होता. आणि पुन्हा या क्षणी तरी फक्त त्याच्याचकरता असा होता. त्याच्या नसांत एक चैतन्याचा स्रोतच जणू खेळायला लागला. पण ती विलक्षण कोरडी होती. तिचे पंतोजीपण तिच्यात या क्षणीही पूर्ण मुरूनच राहिले होते. त्याला नुसते बसवूनच ती थांबली नाही. तो लटपटत लुडकत असतानाही त्याला स्वतःचा पूर्ण आधार घेऊ देऊन तिने त्याला पलंगाच्या काठाशी सरकवून बसवले. खिडकीकडे तोंड करवून त्या गच्चीला समोर असे; आणि ती त्याच्यानिकट अगदी चिकटूनच असल्यासारखी बसली. त्याचे पाय खाली लोंबू दिले. 'हं हलवा पावलं.' तिनं हुकूम सोडला.
'एकदा एक आणि एकदा एक'.
तो थकत होता, आळसत होता. पण तिने एका हाताने तिच्या बॅगमधला छोटा पॉकेट टेपरेकॉर्डर लावला. कसलीशी धून तालात, लयीत सुरू झाली. त्या लयीत ती त्याची पावले जणू हलवायची होती. एकदा एक, एकदा एक.

"एकदा हे जमलं की मग गुडघ्यापासून खाली हलवायची" त्या कॅसेटमध्ये तरी काही हालचाल असेल पण त्याहीपेक्षा तिचे सगळे बोलणे एकजात मख्ख एकसुरी होते. इकडे तिच्या अशा निकट स्पर्शाने त्याच्यात काहीतरी ताजे प्रवाहित होऊ पहात होते; आणि ती... ती मूर्ख बाई निव्वळ तात्या पंतोजीसारखी हुकूम सोडत होती!
'हूँऽऽ' तो हुंकारला.
'झालंच आहे' ती म्हणाली.
कॅसेटची गरजच काय होती! तिचे अवघे शरीरच तर एक धून होऊन वाजत होते! पाच झाले. समोर गच्चीवर ती धिरणीकरबाई कपडे काढायला आलेली- पण याचे आज तिकडे लक्ष नव्हते. इतका तो इकडे एकाग्र झाला होता. तिने त्याला निजवले, घाम पुसून दिला. खाली कॉफी सांगितली, तरी तो पडूनच राहिला.

"थकलात का?" तिने विचारले. आणि स्वतःच सांगूनही टाकले, "उद्या तेवढा थकवा येणार नाही." कॉफी आली, ती न उठवताच त्याला चमच्याने पाजली. जशी त्याची आई किंवा ताई त्याच्या तापात पाजायच्या तशा... आताच तिचे बाईपण त्याच्या नसातून शिरशिरी उमटवून गेले होते; आणि लगेचच त्याला आई नि ताईही आठवल्या... त्यालाच त्याचे आश्चर्य वाटले.

"मी लहानपणी एकदा खूप आजारी झालो” तो म्हणाला. तिला उत्सुकता वाटलेली दिसली नाही. तसा तो एकदम विझलाच. “तुम्ही आता चमच्यानं पाजलेत नं. त्यावरून आठवलं. माझी आईही...” 
"निघू मी..." ती मधेच म्हणाली. त्याचा विरस झालेलाही तिच्या लक्षात आला नाही. ती मूर्तिमंत फिजिओथरपीस्टच असावी. ती गेली. आता लोक भेटायला येतील... त्याला वैताग वाटला.

....त्याचा चहा-बिहा झाल्यावर मणीनेच त्याला उठवून बसवले. मागे जरा भक्कम टेकण दिली. मणीने त्याला समोर भिंतीकडेच तोंड करून बसवले. त्याला खरे तर गच्चीकडे तोंड हवे होते. गच्चीकडे बघायचे तर आताच्या या ताणलेल्या अवघडलेल्या स्थितीत ते जरा सोपेही नव्हते. पूर्वी या सगळ्या क्रिया एकसाथ आणि सहज होत. आता ते तसे नव्हते, अपघात झाला तेव्हा तर हाताला स्पर्श झालेला दुसरीकडेच जाणवे. सगळ्या स्पर्शसंवेदनांचे भेंडोळे गुंतून गेलेले आणि त्याचा नियंत्रक असा कार्तिक आणि त्याच्यातला पुन्हा मीच जागेवर नव्हता.

'मणी, मला गच्चीकडे तोंड करून बसवून दे" तो म्हणाला. 
"जरा वेळानं बसवून देते. चालेल?"
समोर भिंतीवर बघावं असं काहीच नाही. “पेपर चाळ तू तंवर..." ती म्हणाली.

पेपरमध्ये वाचावे असे त्याला काही नाही. सध्या त्याला फक्त अपघाताच्या बातम्याच वाचायला आवडतात. बाकी राजकारणाचे, सत्तेचे, पक्षांचे सारे चेहरे इथून तिथून एकच वाटतात. रंगही तोच, उन्हात रापलेला. साधा उन्हात थकलेला चेहरा, कोणी थंड पाण्याने धुवेल तर तोही किती वेगळा ताजा वाटतो, ते सारे ताजेपण गमावलेल्या रोजच्या... शिळ्या बातम्या. त्याने मान कलून गच्चीकडे पाहिले. धिरणीकर बाईने प्लेमॅटवर तिच्या मुलाला निजवले होते. ती एक्सरसाईज करत होती. निजून जसे दिसते त्यापेक्षा बसून वेगळे दिसते. हे त्याने स्वतःला सांगितले. प्लेमॅटमधले बाळही झाडांच्या गच्चीवर झुकलेल्या फांद्यांची पाने हलत होती तिकडे बघून हातपाय झाडत होते. कुशीवर होत होते. पालथे पडून सरकत होते. आईच्या लंयीत जणू त्याची लय मिसळू पाहत होती. तिच्या श्वास सोडण्याच्या आणि घेण्याच्या हालचालीवरून ती चुकते आहे हे त्याला स्पष्ट दिसले, पण इथून त्याचा आवाज पोचणार नव्हता. आणि कसे चुकते हेही तो करून दाखवू शकत नव्हता. गच्चीवर ऊन आले. हातपाय हलवता हलवता बाळ झोपले असणार. धिरणीकरबाईने प्लेमॅटसकट बाळाला उचलले. तेव्हा मणी धापा टाकत बुटाचे बंद सोडत होती. 
"आलीस फिरून?"
“हां.” 
“आज स्पीड जास्त होती का?” 
"नाही तर..."
"धापा टाकते आहेस म्हणून...”
"तुला साधा टोस्ट ब्रेड की दुसरं काही?"
"मला खायला नकोच मणी... निजून निजून भूकच नाही लागत.”
"पण औषधं आहेत तर काही खावं लागेलच.”
"मणी लहानपणी मला एकदा खूप ताप आला होता. माझी बारावीची परीक्षा दोन दिवसांवर होती..." तो सांगायचे राहून गेलेले सांगू लागला.
"मला आज खूप घाई आहे. तुला बेडपॅन हवं का? म्हणजे मग मी बाथरूममध्ये धरते." तो ओशाळला. त्याने नाही अशी मान हलवली.
"माझ्यासमोरच होऊन गेलं म्हणजे बरं ना! पुन्हा स्पंजिंगच्या आधी...”
त्याचा ओशाळा चेहरा मणीला दिसलाच नाही. त्याला निजवून देऊन तिने गच्चीकडचा पडदा ओढला. ऊन येत होते, प्रकाश डोक्यावरच येत होता म्हणून; नाही तर त्याला खिडकी उघडीच आवडत होती.

मधुरा स्पंजिंगचं पाणी घेऊन आली. मधूचे स्पंजिंग त्याला आवडते. एका हाताने त्याला सांभाळून एका हाताने ती पुसते. तिच्या गोऱ्या गुलाबी नाजूक तळव्यांनी. तिचे मोठे बोलके डोळे सारखे बोलत असतात. आणि तीही बोलत असते. मधूने त्यांचा शर्ट काढला. गुंड्या काढून दिल्या. मणी, सोनू त्याला गुंड्या काढायला, लावायला लागतात. एक्सरसाईज म्हणून. पण मधू सगळंच करते. मनापासून...
"तुझी आई गेली का ग?"
"हो मघाच!"

“मला...”
"मी देते ना..." तिने केवळ त्याच्या स्वरावरूनच ताडले.
"सॉरी मधू..."
"नो सॉरी बाबा..." ती त्याला बिलगून म्हणाली. तिचे त्याचे नातेच वेगळे होते. मग स्पंजिंग करताना तिनं तिच्या क्लासमधल्या कितीतरी गमती सांगितल्या. त्याचे आक्रसलेले, आंबलेले, अवघडलेले शरीर, त्याच्या नसा न नसा तिनं मोकळ्या केल्या.
"बाबा, तुम्हांला उत्तर रामायणातला राम आवडतो?" तिने मोठे डोळे करून विचारले. तो त्याला माहीतच होता कुठे! ते सगळे ताईचे डिपार्टमेंट.
“मला फार आवडतो.”
"हो."
"पण बाबा, काही तर म्हणतात की सीतात्याग झालाच नाही.”
"नाही मधू, अशा मोठ्या घटनांबद्दल जे लिहिलं जातं ते सगळं झालेलंच असतं, कारण त्यात एक ताजेपण असतं." 
"म्हणजे?"
"म्हणजे जे कधी शिळं होत नाही, असं काही तरी त्यात असतं."
"हो! मलाही असंच वाटतं पण.... काही तर म्हणतात बाबा, खरी सीता रामानं आधीच लपवून ठेवली. त्याला सगळं म्हणे आधीच माहीत होतं. रावणानं खोटीच सीता पळवली म्हणून सीतात्यागही झालाच नाही. हे पटत नाही ना! जी गोष्ट नाहीच, त्याकरता राम युद्ध का करेल?" 
"बरोबर."
"म्हणजे हे सगळं झालंच आहे ना."

"एकदम, सगळं घडलं आहे. असंच आहे. एखादा मोठाच मोठा वृक्ष असतो आणि त्याच्या खाली किती लहान-मोठी झाड उगवून येतात. तो वृक्ष तिथेच असतो. ती छोटी झाडं-झुडपं मात्र येतात- जातात मधू, म्हणून ती खोटी म्हणायची तर तो एवढा मोठाच्या मोठा वृक्षच खोटा आहे म्हणायचं का?"

"अय्या हो! बाबा किती छान सांगितलत!" मधूने कपडे घालून चेहऱ्यावर पावडर लावली, लावली म्हणण्यापेक्षा फासलीच...
"अन् निजल्या निजल्या पावडर कशाला?"
"असंच बाबा. तुम्ही स्मार्ट दिसायला हवेत.” 
"अगं पण कुणासाठी?"
“तुमच्याच तर साठी! देऊ आरसा?"
"नको आरसा कशाला! मधू एकदा मला बारावीची परीक्षा दोन दिवसांवर असताना खूप ताप आला. हाय फीव्हर. उतरेनाच."
"अय्या बाबा! मग हो!" तिने आताही डोळे मोठे करून काळजीने विचारले.
"मग काय! आई-बाबा, टीचर, मित्र सगळे म्हणाले, ड्रॉपच घे. महत्त्वाचं वर्ष..."
"मग?" तिने हनुवटी हाताच्या तळव्यावर ठेवली. तिचे कुरळे केस उडत होते.
"माझी ताई होती डिलिव्हरीला आलेली. ती म्हणाली, "काही ड्रॉपबिप नको. गोळीने ताप उतरवू. पेपर दे तू; अभ्यास झालेला तर आहे!"
“मग?”
"मग काय, मी दिले पेपर. पहिले महत्त्वाचे पेपर्स तापात दिले. गणिताचा दुसरा पेपर होता, त्या दिवशी ताप नव्हता. पण खूप थकलो होतो. तर ताई म्हणाली, “पेपर देऊन ये. मग थक तू." परीक्षा संपल्यावर म्हणाली,
"बरं झालं परीक्षा दिली ती. सर्व पुढे गेले असते. सगळे ताजे असतात. आणि आपण तेवढे शिळे होतो.”
"मग परसेन्टेज बाबा?" "जी काय दहा-बारा मार्काची कमी होती. ती पुढे भरूनही निघाली ग! तुझी नि ताईची भेट व्हायला हवी होती. पण माझ्या लग्नाआधीच ताई गेली..."

मधुरा खाली गेली. इतके दिवस सांगायची असलेली साधीशीच गोष्ट शेवटी ऐकून घेतली ती मधुरानेच. त्याला विलक्षण मोकळे वाटले, किती तरी दिवसाचे अडलेले पाणी ते झुळझुळ वहायला लागते. अडलेही होते ते किती थोड्याशा कचऱ्याने!

....त्याला बसवून देऊन सोनू गेली. पंधरा-वीस मिनिटांनी अनू पोतदार येईल एक्सरसाईज द्यायला! बसल्यावर आता समोर बाजूला व्यवस्थित दिसते. मान जरा वळवली की झाले. हालचालींवर थोडे थोडे स्वतःचे नियंत्रण येत चालले. बोटांना लिहिताना पकड येत चालली होती. पॅड जवळ होतेच. फक्त पेन-पेन्सिल दूर होती. तिथपर्यंत हात पोचत नव्हता. पॅड पुढे ओढून त्यावरून त्याने हलकेच बोटे फिरवली. 

...चार व्हायचेच आहेत, अनू यायची वेळ व्हायची आहे. तरी गच्चीवरले आभाळ रंगत चालले आहे. झाडे वेगाने सळसळताहेत. वारा सुसाट. धिरणीकरच्या गच्चीवरल्या फांद्या ओणव्या होऊन पुन्हा सरळ होतात. वाऱ्यात दुरून कुठून तरी पावसाचा वास येतो. गच्चीवर कुणी नाही. कुणी असण्याची ती वेळही नाही. वाट केवळ सुटलेली! तारेवरले कपडे काढायला तर कुणी येईलच ना! छे, कुणीच कसं येत नाही! आई कशी वाळलेले कपडे लगेच काढून घ्यायची. तो काहीसा अस्वस्थ झाला. इतकी बेपर्वा माणसे! कपडे खुशाल तारेवरच फडफडू द्यायचे! ओले होऊ द्यायचे! ते कपडे त्याच्या घरचे नव्हते, म्हणून काय झाले! जरा वेळाने मात्र ती बाई- धिरणीकरीण एकदाची आली. कडेवर ते मूल होतेच. त्याला काय खाली ठेवून नव्हती येऊ शकत ती! कुणी नसतील यावेळी आणि ते नेमके झोपेतून उठले असणार नाहीतर इतक्या वादळात ती मुलाला घेऊन कपडे नाही काढणार! थँक गॉड! ती पाऊस सुरू होण्याआधी आली! आता ते मूल तिला धड कपडे काढूही देत नाही. हवा इतकी, की बाईच्या हातून हलका कपडा उडूनच जातो. त्या मुलाला मस्त मजा वाटते. त्याला खरे तर कडेवर बसायचेच नाही. त्या कपड्यांसारखेच तो तिच्या कडेवरून सुटायला, उतरायला पाहतोय. एकदाची एका हातात कपडे आणि एका हातात तो गुंडू मुलगा अशी कसरत करत ती एकदाची खाली जाते. पण वारे तसेच आहे. गच्चीवर आलेल्या फांद्या एकावर एक आपटताहेत. आभाळात ढग विलक्षण कुतूहलाने पळताहेत. वाऱ्याने पावसाचा रंग, वास गंध सगळे हुसकावूनच लावले आहे. दारे-खिडक्या धडाधड आपटतात त्या शेजारच्या घराच्या. त्याच्या घरच्या का नाहीत! कदाचित मणीने ऑफिसला जातानाच नीट बंदोबस्त केला असेल... ती पुष्कळदा आधीच अंदाज बांधून सगळे करते. त्याचा तिला अभिमानही आहेच. पण त्याला तरी अकस्मात- पणातला एक आनंद घालवून नाही का टाकला? हा त्याचा अपघातच तर केवळा अकस्मात! मणीचा एक शब्द आहे. कॅलक्युलेट करणे. म्हणजे सगळे शिळे करून टाकणे. मणीला हे समजत नाही. जसे त्याला मधूचे उत्तररामचरित समजत नाही; पण गंमतही असते यात. एकाला कळणे आणि दुसऱ्याला न कळणे- एक आतला असणे आणि एक बाहेरचा. म्हणून तर दोघांत एक अनुबंध असतो. एक साहचर्य असते. एक संवाद असतो. हा अनुबंध शोधणे हाच तर खरा खेळ. मर्माचा. नुसता मर्माचाच नव्हे! त्याहीपेक्षा सत्त्वाचाच. किंबहुना मर्म आणि सत्त्व यांत फरकच काय! पावसाचा वास अजूनही दुरूनच येतो. पाऊस पडणे इतक्या काहिलीनंतर ती पण मर्माचीच गोष्ट. पाऊस पडत का नाही! दूर पडतो तर मग इथेच का नाही!"
मांडीवर ठेवलेले पॅड खाली घसरले. ते उचलून घेणे ही त्याच्या आवाक्याबाहेरची गोष्ट- जिन्यावर अनूची पावलं वाजतील. तिचीपेक्षा तिच्या चपलांची. कधी नव्हे तो तिला अर्धा तास उशीर झाला. शक्य आहे; वारा, धुंद पावसाची हवा.

"मला आज जरा लेट झाला, पण मी अर्धा तास जास्त देईन." ती तिच्या अर्ध्या तासाचा हिशेब पुरा करत होती. तिला तासाचेच पैसे मिळत होते. अजूनही तिचे नित्याचे नाते असे हिशोबाचेच होते.
“बाहेर एवढा वारा धुंद. पाऊस येईलसुद्धा उशीर झाला तर काय बिघडतं?".
"वारा धुंद! नाही तर!"
"म्हणजे बाहेर वारं सुटलं नव्हतं?"
"छे!"
"झाडं एकमेकांवर आपटत नव्हती?" 
“अजूनही बाहेर ऊनच आहे. माझी स्कूटी बंद पडली. म्हणून मला उशीर... " 
"पण पाऊस नक्कीच येईल." तो गोंधळून म्हणाला.
तिला पावसाशी काही कर्तव्य नव्हते.. 
“आज एक्सरसाईज नको. अभ्यासाचा कंटाळा आला.”
"असं कसं!"
"स्कूटी कुठे बंद पडली तुमची!"
"रामदास पेठ..."
"मग!"
"मग काय, पंक्चरचं दुकान होतं तिथंवर ओढत नेली..."
"आज आपण वेगळं बोलू." ती बोलली नाही. 
"तुम्ही कधी शाळेला, कॉलेजला दांडी मारली नाही का?”
तिने त्याला बसवले. पाय खाली सोडून ती आज खाली बसली. टोंगळ्यापासून त्याचे पाय ती हलवू लागली. एकदा एक, एकदा एक, हाताने; तिचा काटकुळ्या सावळ्या हाताने.
"हळूहळू दोन्ही पाय एकदम करता येतील तुम्हांला स्वतःच..." म्हणत तिनं तो छोटासा टेपरेकॉर्डर काढला. "तो नको, तो फार निर्जीव वाजतो. त्यापेक्षा तुम्ही बोला ना!"
ती तरीही बोलली नाही. पण तिने टेपरेकॉर्डर मात्र सुरू केला नाही.
"आज तुम्ही एक्सरसाईज दिला नाही तरी मी तुम्हांला तासाचे पैसे पूर्ण देईन, मणीला मी हे सांगणारच नाही." 
"मी सांगितलं ना. माझा संबंध तुमच्या बरं होण्याशीच आहे. तुम्ही बरे झालात की मी येणार नाही."
"मग तर मला मुळीच बरं व्हायचं नाही" तो अडूनच बसला. "मी थकलो आहे. मला निजवून द्या, प्लीज." तिचा कोरा चेहरा गोरामोरा झाला. त्याच्या बोलण्यात एक अटीतटीचा, निर्वाणीचा स्वर होता. तिने त्याला निजवले..
"तुम्हांला कॉफी सांगून मी जाते." 
"का? तुम्हांला नको?"
"नको."
"मी सांगतो तुमची ड्यूटी समजूनच तुम्ही आज माझ्याशी बोला. फक्त एक्सरसाईज देऊ नका."
"मला कुणाशी असं वेगळं बोलता येत नाही.” 
"तर मी बोलतो. तुमचं नाव अनू म्हणजे काय?"
"अनुपमा, अनुराधा... की..."
"नुसतं अनूच..."
"तुम्हांला टीव्ही पहायला आवडतो?"
"हो."
“आवडीचा पदार्थ कोणता?" ती आता उठलीच.
“थांबा ना, फक्त पाऊस आवडतो की नाही, एवढं तर सांगा."
“माहीत नाही.”
"असं कसं!"

"पाऊस आवडून घ्यायला माणूस मोकळा, मुक्त तर पाहिजे?" 
"म्हणजे कसं?"
"पाऊस बाहेर पडतोय आणि आपल्या घरात बसून आपण तो शांत, निश्चिंत बघतो, अनुभवतो, असं कुठं होतं? घरातून बाहेर जायचं असलं, बाहेरून घरी यायचं असलं की मग..."

तो तिच्याकडे पहात राहिला. पावसाला असे या उपयोगाच्या व्यवहाराच्या पातळीवर आणून ठेवणाऱ्या त्या समोरच्या बाईचे त्याला अतोनात नवल वाटले. ती इतके दिवस हॉस्पिटलमध्ये आणि घरीही त्याला एक्सरसाईज देणारी नसती आणि तिचे नाव आता सरावाचे झालेले असे अनू नसते तर तिने पुन्हा इथे पाऊल टाकू नये असेच त्याला वाटेल हे त्याला कळले. उन्हाळा तापतापून तापला आणि मग जमिनीवर आलेले सुगंधी शिंतोडे. त्याचाच जेव्हा पाऊस होतो तेव्हा... ती चुळबुळतच थांबली होती. पुन्हा पुन्हा मनगटावरच्या घड्याळाकडे पहात- तास संपण्याची जणू वाट पहात...
“तुम्हांला कंटाळा आला ना! जा तुम्ही." तो म्हणाला. 
"कामाशिवाय मला थांबण्याची सवय नाही.” 
"ठीक आहे, जा." तो म्हणाला. मावशींना कुठे जायचे होते; म्हणून त्यांनी वेळेआधीच कॉफी पाठवली. ती नाईलाजाने थांबली. 
“तुमच्याबद्दल सांगा ना, आम्हांला फारच कमी माहीत आहे. इतके दिवस तुम्ही येता इथे."

"मुद्दाम माहीत करून घ्यावं असं माझ्याजवळ काही नाही." ती उठली आणि फक्त तिचाच कप घेऊन गेलीसुद्धा... त्याचा कप अर्धाही नव्हता झाला. ती निघून गेली. अद्याप अर्धा तास बाकी होता. मणी यायला खूप वेळ होता. सोनू, मधू येतीलच- खाली मावशींचाही आवाज नव्हता. तो वर-खाली संपूर्ण घरात एकटाच होता का! त्याला अस्वस्थसे झाले. थोडा घाम आला. आपल्याला बेडपॅनच लागते. कूलरचे पाणीच संपले तर... त्याने जवळची घंटी वाजवली. सतत काही वेळ हाताचा तळवाच तिच्यावर दाबून धरला. कामाला दिवसभराची ठेवलेली मुलगी धावत आली- तिच्या तोंडात काहीतरी होते. ती खात आली. “काय झालं, काय हवं..."
"काही नाही. तू होतीस का? मला वाटलं," तो ओशाळून म्हणाला. ती पोरगी तरीही तिथे थांबली.

"टीव्ही लावू?" तिने विचारले आणि आगाऊपणे लावलाही. कुठलीतरी अॅक्शन फिल्म होती. अर्धवट कपडे घातलेल्या बायका नाचत होत्या- सस्पेन्सचे म्युझिक होते- कुणी तरी बाँब ठेवला होता. थोड्याच वेळात ते थिएटर... "तू खाली जाऊन टीव्ही पहा." तो तिला म्हणाला. ऋजू, मृदू असे. त्याला दरडावून अधिकारवाणीने बोलताच येत नाही. मणीसारखे... ती पोरगी गेली.
...का घाबरलो आपण? काय झालं असतं एकटं राहिलो असतो तर!

समोरची गच्ची अद्याप शांतच होती. त्याने डोळे मिटून घेतले, तापलेल्या जमिनीवर ते सुगंधी शिंतोडे पडत होते. डोळ्यांपुढे काय काय यायला लागले. तो कॉलेजमध्ये म्हणत असलेले गाणे सर्वांचे फेवरिट. पेईंग गेस्टमधले. देवानंदच्या तोंडचे, किशोरकुमारने गायलेले. 'माना जनाबने पुकारा नहीं...' नंतर 'सोलवा साल मधले हेमंत कुमारने गायिलेले 'हे अपना दिल तो आवारा...' तो चक्क ती गाणी त्या अनूसमोर आणि तिच्याकरता म्हणत होता. आणि ती लक्ष देऊन ऐकत होती. आणि बाजूची गच्ची त्याच्याशी बोलत होती....

"आवाज चांगला आहे हो तुमचा! कसे आहात? मी रोज बघते तुम्हांला! किती दिवस निजणार आहात?" मग कडेवरचे तिचे बाळ चक्क त्याच्याकडे झेप घ्यायला लागते. त्याला त्या बाईशी खूप बोलायचे होते, पण त्याला स्वतःचे गाणेच ऐकू येत होते. ते थांबेपर्यंत वाट पहायची होती. त्याला एकच प्रश्न तिला विचारायचा होता. 'तुम्ही गच्चीला कठडा का करत नाही? तुमचे बाळ रांगायला लागले...'  पण गाणे संपायचे होते आणि सारेजण त्यात रंगलेले होते. त्याचे गाणे संपले तेव्हा त्याला अजून एक विचारायचे असलेले आठवते.... की गच्चीवर तुम्ही एकट्याच मुलाला घेऊन का येता? घरचे इतर का येत नाहीत गच्चीवर? पण ते सगळे लोक एकतर निघूनच गेले होते आणि त्याने गायिलेल्या शब्दांचा, स्वरांचा प्रकाश अद्याप तेथेच रेंगाळत होता. त्याने डोळे मिटूनच घेतले. मघाचे ते सुगंधी शिंतोडे तापलेल्या जमिनीवर विरूनच जात. पण आता तापल्या जमिनीवरून त्या सुगंधी पाण्याचा एक मोठा लोटच्या लोटच वाहात होता. कौलां-छपरांनावरले, झाडा-पानांवरले पाणी ठिबकून त्याचाही एक ओहळ होऊन त्या लोटाला मिळत होता. त्या लोटाचा रंग तर मातीचाच होता. वासही मातीचा.... आता त्या तिरप्या पावसाच्या धारांचे शिंतोडे त्याला खिडकीतून भिजवत होते. त्या ओलेपणात त्याला एक कविता आठवली. लहानपणाच्या पाठ्यपुस्तकातली. नलदमयंती, स्वयंवराख्यानामधली.... तो ती कविता पुन्हा त्या अनूकरताच म्हणत होता, तन्मय होऊन. तीही तन्मय होऊनच ऐकत होती. आणि ते असे रंगलेले कवितावाचन, ती कडवी गच्चीवर उभे राहून ती ऐकत होती. मूल कडेवर होतेच. आणि त्याला त्याच्याकडे झेप घ्यायची होती... पण तो त्या कवितेच्या ओळीत रमलेला, रंगलेला... त्याचे हात मोकळे कुठे होते!

सवे सेना भूपाल निघालाहे 
शीवलंघी उद्यान एक पाहे
रिघे तेथे, मित सैनिकासी बाहे
फौज सारी बाहेर उभी राहे...

राजा सैन्य घेऊन कुठे निघालेला? मधेच ते उद्यान तरी कसे अवधित लागले? ते लागणार होते हे आधी कळलेच नाही? ओढला गेल्यासारखा राजा त्या उद्यानात शिरला. ते उद्यान रूक्ष रखरखीत नव्हते. तिथे फुले-पाने झाडे नेमून दिल्यासारखी शिस्तीत फुलत नव्हती? तर आपल्या मस्तीत डुलत होती. ती काहीतरी रुजणारीच भूमी होती. म्हणूनच तो भूमिपाल तिथे थबकला. पूर्ण सैन्य त्याने बाहेरच उभे ठेवले आणि मोजक्या सैनिकांना घेऊन तो आत गेला. का? त्याने असे का केले? पूर्णच सैन्य का नाही नेऊ त्याने? मुळात ते उद्यान तरी असे मधेच का भेटावे? शुभशकुनासारखे! आणि त्याला तरी आत का जावेसे वाटावे? त्यात नक्कीच काही सूचक होते. त्याला आधी माहीत नव्हते; पण त्याला त्या उद्यानात एक हंस भेटणार होता. त्या हंसाकरवी तो आपल्या भावी राणीला पत्रे पाठवणार होता. आणि ही नाजूक वाट त्याला मोकळे करून देणार होते ते इवलेसे थरथरणारे पाखरू- ते दोघे असे अवचित भेटणार आहेत, हे मुळीच त्या दोघांना आधी ठाऊक नव्हते, हीच होती खरी गंमत! आता तिथे पूर्ण सैन्य नेण्याची गरजच काय होती!... सरांनी शिकवलेला सरधोपट अर्थ बाजूला सारून ताईसह त्याने हा अर्थ शोधला होता. त्याला नि ताईला पडलेले प्रश्नही कुणालाच कधी पडले नाहीत- आता तर तो अगदी पिसासारखा हलका होऊन गेलेला आणि एकामागून एक ओळी आपल्या ओठावर येताहेत....

जो अंबरी उफळता खुर लागलाहे
तो चंद्रमा निज तनूवरि डाग लाहे
जो या यशास्तव कसे धवलत्व नेघे
शृंगारिला हय तयावरि भूप वेंधे

हा राजाही वेगळा आणि घोडाही वेगळा. तो हंसही वेगळा. तो राजाही वेगळा. त्या दोघांची वेगळीच भाषा. एकमेकांची भाषा. हे पाखरू माझ्या कामी येईल की नाही? हे इवलेसे पाखरू माझ्या काय कामी येऊ शकते, असा विचार तू करू नको, असे ते पाखरू राजाला सांगते आणि राजाला ते पटतेही.
दोघांना एकमेकांची भाषाही कळते. त्या दोघांत एक वेगळेच नाते रुजलेले. बटन दाबावे आणि प्रकाश पडावा असा यांत्रिकपणा या नात्यात नाही; तर आतूनच काही गर्भित प्रकाश फाकावा असे काही त्या दोघांत हळूहळू रुजले जात आहे. दोघांना एकमेकांची गरज आहे पण त्यापलीकडले काहीतरी... सगळे पार करून माणसाला पोचायचे असते ते त्या अशा जागेपर्यंत...

मणीने त्याला उठून बसवले आणि प्रथमच मागे काही टेकण ठेवली नाही. मी आहेच. लक्ष ठेवते, असं म्हणाली होती जवळपासच राहिली. आपण पाच-दहा मिनिटे बसू शकतो, हेही त्याला कळले. बसल्यावर आता समोरचा दोन्ही बाजूचा जो भाग नजरेच्या टप्प्यात सहजपणे सामावतो तो एकसंध आहे; त्याचे पूर्वीसारखे तुकडे पडत नाहीत, हे जाणवले. मणीनं पुन्हा टेकण ठेवताना विचारले, की अजून बसायचे की निजायचे? ...तर त्याला बसावेसे वाटत होते. हाताने सरकवून पॅड त्याने मांडीवर घेतले. पेन्सिल हातात घेऊन तो सुरू करणारच होता. आपल्या मनात जे लिहायचे आहे, ते या कागदावर आता उमटू शकेल, असा त्याला आतून विश्वास आला. पण त्याने लिहिले नाही. पेन, पॅड, पेन्सिल सारे हातांत येत होते. पकड होती. पण त्याला लिहावे असे वाटलेच नाही. ती असोशी होती बोटांत. पेन, पेन्सिल टिकत नव्हती तेव्हाच, मणी आज घरीच होती. रविवारची. एवढेच नव्हे तर त्याच्या अवतीभोवतीही होती. 
"फार उकडतंय, पाऊस येईलसं वाटतं..." मणी म्हणाली,
"यायला हवाच आहे, एकदा तोंड दाखवून गेला. बस्स.... तेव्हापासून गायब..." तो म्हणाला.
"माझी बदली होण्याचं सुरू आहे." ती मधेच म्हणाली. 
"मधेच..."
“मधेच नाही. सुरूच होतं... पण तुझ्या आजारपणाचं कारण मी पुढे करणार आहे. तसाही तू पूर्ण बरा झाला नाहीसच." 
"खरं म्हणजे मणी तू बदली घे..."
“काहीतरीच काय!”
"तुला चेंज होईल, मजा येईल. आपल्याला कुठे जायला एक ठिकाण होईल."
"नको रे. मला नको बदली. सगळं विस्कटेल."
"अगं, सगळं शिस्तीत ठरल्यासारखं थोडंच जायला पाहिजे! थोडा विस्कळीतपणा हवाच. ताजेपण येतं त्याने."

मणीला ते अजिबातच पटले नाही. तिचे रविवारचे आवरणे सुरू झाले. त्याची आवरलेलीच खोली ती आवरत होती. तो बघत होता.
“यात आवरण्यासारखे काही आहे असे मला वाटत नाही.” तो म्हणाला.
"तुला ती नजरच नाही. मला सगळे पसरलेले आवडत नाही." 
"त्यापेक्षा माझ्याशी पत्ते खेळ.” तो म्हणाला. 
"मला नाही आवडत. रिकामपणाचा खेळ." 
"पण मीही तर रिकामाच आहे! माझ्याशी म्हणून खेळ." 
फोन वाजला.
मणीने घेतला. फोन तिलाच केलेला होता. 
“त्या पोतदारचा फोन आहे. उद्या यायचं की नाही विचारत होती. "
"यायचं आहे, म्हटलं तर म्हणाली, की तू आजकाल तासभर एक्सरसाईज घेत नाहीस. उगीच पंधरा-वीस मिनिटं घेतो... खरं का?"
"मला कंटाळा आला एक्सरसाईजचा की थोडं बोलू म्हटलं तर ते तिला नको असतं. कालच थोडे पत्ते खेळू म्हटलं तर रागावली. थांबलीच नाही."
"मी काय विद्यार्थी आहे तिचा? तासभर शिकवत बसते!" मणीला खळखळून हसू आले.
"आहेस हं! चांगला नाठाळ विद्यार्थीच आहेस तू तिचा!” मणी म्हणाली.
जेवणापूर्वी त्याचे धाकटे मामा आले आणि त्यांनी घर गर्जून सोडले. आले होते त्याला भेटायलाच; लांबून. पण आल्याआल्या तोफा डागायला सुरुवात केली.

"काय रे पैसे बियसे काही क्लेम केलेस की नाही? तुझ्या अतिशहाण्या बायकोनं नसतीलच केले! स्वतःच्या फायद्याचे जे काय असेल, त्यावर पाणी सोडायचे; स्वतःचे हित सगळे दानपत्रात दान करायचे..." त्याला तर चक्क हसूच आले. त्याच्या आजोळपैकी एकुलता एक उरलेला हा मामा.. सडाफटींग. मागे आगापिछा काही नाही.
"हसतोस काय! तुझी आईही अशीच होती!"
"पैसे कुणाला क्लेम करायचे पण, कारच्या इन्शुअरन्सचे?" 
"कुणाला म्हणजे ज्यांनी ज्यांच्या कारने हा अॅक्सिडेंट केला त्यांना."
"पण तो तर गेला, जागीच ठार. मीच वाचलो..." 
"पण त्याचे घरचे लोक नव्हते का! त्यांनी सरळ आपली कार अंगावर आणली." 
"तो जिवंत असता तर हेच मला म्हणाला असता. दुपारचा नीरव सुनसान रस्ता. रिकामा. त्याचासुद्धा वेग वाढलेला असेलच. कुणी कुणाच्या अंगावर कार घातली हे कसं..."
“असे अंथरुणावर किती दिवस राहणार?"
"सुधारणा होत आहे."
"पण काही एक्सरसाईज?"
"ठेवली आहे एक बाई. ती पी.टी. करवून घेते." 
"का? बाई का? मणीला वेळ नाही? पैसे जास्त झाले तुमच्याजवळ... ते राहू दे, सोनूचं लग्न करतो का? एकदम बढिया स्थळ आहे."

"सोनू? मामा ती किती लहान आहे!" 
"लहान कशानं! ग्रॅज्युएट होईल ना यंदा..."
सोनू, सोनूचं पण लग्न होऊ शकतं! तो थरथरला. हे लक्षात आलं नव्हतं. ताई एकदम लग्न करून निघून गेली तेव्हाच लक्षात आलं...
"मामा तुमची कृष्णा कशी?" 
"कोण नदी का गाय?"
"दोन्ही.. पण नदीच."
“नदीला पाणी बरंच आहे. पाऊस पडला की बघ तू. तुम्ही लोक कुणी येत नाही, आम्हीच यायचं आठवण झाली की!"
मामांचे खरे होते. जायला होतच नव्हते... 
"आणि औदुंबर कसा आहे मामा?”
"अरे, असा सळसळतो-रागावतो काय, समजावून सांगतो काय, खूप बोलतो माझ्याशीच."

"मामा तुमच्या या औदुंबरानं तुम्हांला एकटं कसं राहू दिलं? लग्न का नाही करायला सांगितलं? आता या वयात एकटं... "
"का? एकटं काय म्हणून रे! तुझं घर नाही का? तुम्हांला नाती नकोत."
मामा उठले. तो बघत होता. ते खूप आईसारखे दिसतात- लकबीही बऱ्याच सारख्या... पण आईचा आवाज ऋजू, कोवळा. मामांचा म्हणजे तारस्वर. रात्रभर थांबले. सकाळी आग्रह करूनही थांबले नाहीत. निघताना म्हणाले,
"ये, बरा झालास की. औदुंबर पहा. आपण जिथं रुजलो, वाढलो त्या जागेशी नातं टिकवून ठेवावं लागतं कार्तिक." ते थांबले थोडा वेळ. म्हणाले, "घर तुझ्या नावावर करतो म्हणतो. पण तू येऊन-जाऊन तरी असायला हवं. तुला तो मोह नाही; मला माहीत आहे. पण मग मी असा एकटा. लग्न नाही केलं, तेच तर बरं रे!"

"अरे, कोणती मुलगी माझ्याशी टिकली असती? आम्ही असे सडेफटिंगच बरे." मामा निघून गेले. त्यांच्या वरच्या पट्टीतल्या बोलण्याने सारे घर गरजले. मामा गेले. मणीही ऑफिसात गेली. मुली कॉलेजात. समोरच्या गच्चीवर आज नेहमीच्या झाडाऐवजी औदुंबरच सळसळत होता. वेगाने, प्रचंड वेगाने, त्याखाली बाईंचा एक्सरसाईज सुरू होता. बाळ भोवती तरंगत होते. त्याची पेन-पेन्सिल पायाशी होती. पॅड उशाशी. आता बसवून देणारे कुणी नव्हते आसपास. त्याने निकराने पायाच्या बोटाने पेन्सिल जवळ सरकवण्याचा प्रयत्न केला. निकराने, नेटाने. ती प्रथम जरा दूर गेली. पण मग पुन्हा ती जवळ आली, हळूहळू ती हाताच्या कक्षेत आलीसे वाटले, पण आता हात लांब पोचत नव्हता. एकदाची बोटे लागली पेन्सिलीला. आली त्याच्या टप्प्यात. पेन्सिलीचे टोक बोथटले होते. पण तरीही त्याने दोन ओळी लिहिल्या.

"ती अनू नि मामा! कसे राहतील एकमेकांबरोबर? दोघंही जातीनं पंतोजीच! कुणी कुणाचं ऐकून घेणार नाही. ऐकून घ्यायचं तर एक कुणी तरी विद्यार्थी हवाच..."
पण मनातल्या कल्पनेने त्याला खूपच मजा वाटली. मामा आणि अनू, अनू आणि मामा... स्वतःच्या कल्पकतेवर तो खूषच झाला.
ठिक चारला नेहमीसारखी ती येऊन हजर झाली तिच्या ड्यूटीवर. आल्या आल्या तिने घड्याळाकडे पाहिले, ती वेळेवर आली होती.

"आज मी मॅडमना फोन करूनच आले... "
त्याने तास चुकवू नये याची ती सूचना होती तर! तो हसला. ‘आज आपण खाली उतरायचं.’
त्याला माहीत असूनही त्याने मुद्दाम विचारले. 
"जिना उतरून....?" पण ती न हसता निर्विकारपणाने म्हणाली, 
"पलंगाखाली. खोलीतच चालवीन मी तुम्हांला.”
"कॅथेटर..."
"ते राहील ना. त्याची अडचण यायची नाही."
"मला साधं उभंही राहता येत नाही."
"ते कळेलच न आता!" ती पूर्ण विश्वासाने म्हणाली. तिने वॉकरसारखे काही आणले होते. त्याचे उठून बसवणे ही आता मोठीशी गोष्ट नव्हती. काही दिवसांनी तो स्वतःच उठून बसणार होता. त्याला स्वतःचा पूर्ण आधार देऊन तिने त्याला खाली उभे केले. त्याच्याच घराच्या गुळगुळीत टाइल्सचा स्पर्श... त्याचे पाय लटपटत होते.
"मी धरलं आहे, तुम्ही पडणार नाही. फक्त माझ्यासह या वॉकरपर्यंत... बस्स. मी आहेच." तिची ती एकसुरी टेप सुरू झाली. तो काही विचारत, म्हणत होता. पण तिने थांबवले,
“लक्ष तुमच्या क्रियेवर द्या.”
वॉकरसह तो खोलीच्या दारापर्यंत तीन-चार पावले गेला. आता तिथून परत पलंगापर्यंत आपण प्रचंड थकलो असे त्याला वाटले, पण तो पुन्हा पलंगापर्यंत येऊ शकला. ती अगदी जवळच होती. तिने त्याला अगदी हलकेच धरले होते, आणि त्याने वॉकरचा दांडा धरला होता. पलंगाशी आल्यावर त्याचा पूर्ण ताबा घेऊन तिने वॉकर बाजूला केला, त्याला पलंगावर बसवले. ती त्याच्याजवळ बसली.
“निजायचं आहे?”
तो मानेनेच 'नाही' म्हणाला. तिचा निकट गंध त्याला वेडावत होता. तो स्त्रीचा गंध होता. मणीहून पार वेगळा असा तो गंध. ती खरोखर कोण होती! त्याच्या आयुष्यात अशी अपघाताने येणारी मणीशिवाय दुसरी कुणी अशी! की ती कधी तर ताईसारखीही वाटलेली... ती या दोघींपेक्षाही कुणी वेगळी, की दोन्हीची रसमिसळ! अंतर राखून बसलेल्या तिचा तो काटकुळा दंड त्याने धरला, घट्ट....
“अजून घट्ट धरा. बघा आत्ता तुम्हाला चांगली पकड येत आहे...”
तो हसला. ती मूर्तिमंत फिजिओथिरपीस्टच होती! त्याहून वेगळे काही तिला होताच येत नसावे....तिच्याबरोबर कॉफी घेताना त्याच्या मनात ती सकाळचीच कल्पना आली. तिची आणि मामांबद्दलची.... आणि त्याने एकदम विचारून टाकले.
“तुम्ही लग्न का नाही केल!”
तो प्रश्न तिला सर्वस्वी अनपेक्षित होता. तो तिला आवडलाही नाही. त्याला बशीत कॉफी ओतून देताना ती थांबलीच. तो काहीसा वरमला. पण तिच्या काही अत्यंत खाजगी गोष्टीत आपण नाक खुपसतो आहोत असे मात्र त्याला अजिबात वाटले नाही.
"मी हे फालतूच विचारतो आहे असे समजू नका. माझे मामाच लग्नाचे आहेत. त्यांनाही लग्नाला उशीर झाला आहे...” सकाळी जोडलेली दोन टोके त्याने पुन्हा जोडून पाहिली.
"तो काल आला, आज सकाळीच गेला. लांब राहतो एकटा..." त्याने सुरू ठेवले... ती ऐकत होती, की नव्हती! कळत नाही. तिचा चेहरा तितकाच कोरा होता. तिच्या उरलेल्या कॉफीचा कप तिनं तसाच ठेवला.
"मी निघते" ती उठत म्हणाली.
"तुम्हांला राग आला का?" 
“अहो, कशासाठी तुमचे मामा माझ्याशी आणि मी त्यांच्याशी लग्न करणार आहोत! उद्या तुम्ही बरे झालात की मी इथं येणारही नाही!"
"असं कसं! इतकाच तुमचा-माझा संबंध आहे? विसरून जाण्यापुरता?" त्याने विचारले... ती बोलली नाही...
"तुम्ही इतक्या ठिकाणी जाता. हॉस्पिटलमध्येही जाता. तुमच्या पेशंटशी तुम्ही असंच वागता?" तिने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले.
"असं म्हणजे! वाईट वाटते का मी?" तिला त्याचे बोलणे अजिबात आवडले नाही.
"वाईट नाही; पण तात्या पंतोजीसारखं वाटतं!" ती किंचित हसली. जायला लागली.
"घाई नसेल जायची, तर बसा ना!" 
“माझ्या भावाला आणायचं आहे शाळेतून. पाचला शाळा सुटते."
"एवढा लहान भाऊ आहे तुम्हांला?" 
“सहावीत आहे. सावत्रभाऊ माझा.”

“तुम्हीच का जाता आणायला! दुसरं कुणीही...” 
"कुणीही तर नाही. आम्ही दोघंच आहोत." ती निघून गेली..

तो काहीसा थकला, चालण्याच्या आणि विचाराच्याही श्रमाने. नेहमीसारखे त्याला निजवून आपला कप धुवून ती आज गेली नव्हती, तर तिचा कप तसाच टाकून त्याला बसलेलेच ठेवून ती गेली. प्रथमच, पण त्याला जाणवले की आपण आपले आपण निजू शकतो एका कडेला. मग हळूहळू सरळही....

..मधू विचारत होती.
"आई जेवायला येत नाही. बाबा, तिला उशीर होईल. आपण जेवायला काय करायचं?" तिचा निरागस चेहरा कोवळा... तो पाहत होता.
"सांगा ना!"
"तुला आवडेल ते कर.”
"खिचडी, सगळ्या मुगाची, चालेल?"
“धावेल!”
“आणि भुरकायला काय?”
“सार.”
"आणि मेतकूट?"
"हो आणि आंब्याचं-गुळाचं लोणचं." तो म्हणाला, आणि त्याला एकदम हसू आले जुने आठवून
“का हसता, बाबा?"
"अगं, आमचे बाबा जेवायला बसले की मी, आई नि ताई असाच शॉर्टकट शोधायचो. मजा यायची. बाबा असले की सगळं साग्रसंगीत व्हायचं. आता मी घरी असतो; मणी बाहेर ऑफिसला असते. भूमिका बदलल्या पहा..." तो हसतच म्हणाला. पण मधुराचा चेहरा गोरामोरा झाला.
"खरं म्हणजे तुम्हांला असं वर एकटं ठेवून आईनं उशीर करायलाच नको बाबा." 
"रोज थोडी करते ती उशीर! आणि वरच मला करमतं. मधू एका खूप मोठ्या रंगमंचावर काय एकेक एन्ट्री होत असते! आणि ते सगळं मीच घडवून आणतो. माहिती आहे?" 
“म्हणजे बाबा!”
"अगं, एकमेकांशी अजिबात संबंध नसलेल्या दोन वेगवेगळ्या गोष्टी मी सहज एकत्र आणतो. जोडतो. " 
“मला नाही समजत बाबा.”
“न समजू दे, पण हे मी वरच आहे म्हणून मला करता येतं की नाही? खाली असतो तर... मावशींच्या आवाजात सगळं...." तो हसला.
"अय्या, हो बाबा!"

सकाळी धिरणीकरबाई एक्सरसाईज करत होती, तिचे गबदूल मूल रांगत होते. धरून उभे होऊ पाहात होते. तो डोळे ताणून पाहात होता. मूल आता प्लेमॅटमध्ये टिकत नव्हते. आणि बाई बेफिकीर हातवारे करत होती. गच्चीला कठडा नव्हता, पुन्हा उन्हाची कोवळीक संपेपर्यंत बाई व्यायाम करत होती..

आज एक्सरसाईज देऊन झाल्यावरही, कॉफी झाल्यावरही अनू किंचित रेंगाळली. थोडे बोललीही त्याच्याशी वेगळे असे. त्याला आश्चर्य वाटले. त्याला तिने आरामखुर्चीत बसवले.
"आज जायची घाई नाही का तुम्हांला?"
“आहे ना!”
“भावाला आणायचं...”
"आहे ना. पावसाचा रंग दिसतो." तिच्या आवाजात घाई होती. पण ती रेंगाळते आहे हे स्पष्ट दिसत होते. पावसाचा खरेच रंग होता. आभाळ, वारे सगळे सुगंधी झाले होते. 
“तुम्हांला आता फार दिवस माझी गरज नाही.”
महिन्याभरात तुम्ही स्वतंत्रपणे... सगळं करू शकाल." ती म्हणाली आणि गेली. पण तिला रेंगाळावेसे वाटत होते. काही नेहमीपेक्षा वेगळे बोलावेसे वाटत होते, हे स्पष्टच दिसले. पण ती बोलली नाही. आभाळात ढगांची पळापळ सुरू होती. काळे. ढग दाटून आलेले. ढग खाली ओणवे होत होते. ती जेमतेम खाली पोचली असेल तो वारे सुटले. दारे-खिडक्या धडधडा आपटली. पाऊस येईल.... ती अनू पुन्हा वर आली. ती गेली नव्हती. दाराला तिने अडकण लावली. खिडक्या बंद करायला गेली तर तो म्हणाला,
"असू दे. तुम्ही गेला नाही?"
"दार उघडे, ओसड येतेय, खाली फक्त मावशी. म्हणून आले. तुम्ही एकटेच." ती वेगळे म्हणाली, नेहमीपेक्षा तो अनिमिषपणे पावसाचे हे आकस्मिक तुफान पाहात होता. पावसाचा तो वास त्याच्या मनभर झालेला.... गच्चीवरचे कपडे निघाले होते. ते बाईंनी मघाच काढले असणार... त्याचे लक्ष नव्हते. आभाळात पाऊस हळूहळू भरून जमून येत होता मघाच. परंतु तेव्हा त्याचे लक्ष नव्हते. तो दुसरीकडेच कुठेतरी गुंतला होता. आता ती खिडकीशी उभी होती आणि पावसाचे तिरपे आडवे मोठाले थेंब अंगावर घेत होती. ती भिजत होती पावसात. पण वाटत होते त्याला, की ती वेगळ्या कशात तरी चिंब होतेय. पाऊस हे केवळ निमित्त. थेंबाच्या मोठ्या धारा झाल्या, तेव्हा नाईलाजाने खिड़की बंद करावी लागली.
"मला पाण्याचे लोट बघायचे आहेत." तो म्हणाला, ती खिडकीपासून दूर झाली.
"पावसाचे तुफान सुरू आहे. ते थांबू दे."
अर्धा-पाऊण तास पाऊस नुसता पडत होता. तो जरा थकला तेव्हा तर चालतच तिचा आधार न घेता खिडकीजवळ गेला. तिने खिडकी उघडली त्याच्याकरता. पाण्याचे मातीच्या रंगाचे लोटच्या लोट वाहात होते. रस्त्यावर पाणी साचलेही होते. जाणाऱ्या वाहनांचे इकडेतिकडे पाणी उडत होते. यांबलेली रहदारी पुन्हा सुरू होत होती. ती निघाली.
“तुमचा भाऊ...”
"शाळेत थांबला असेल. सगळीच थांबली असतील. येऊ मी?" तिने विचारले आणि ती गेली. इतक्या दिवसांत त्याला "येऊ मी?" असे तिने प्रथमच विचारले होते. प्रथमच ती रेंगाळली. प्रथमच तिला जायची घाई नव्हती... त्याला आवडणारा पाऊस इतक्या दिवसांनी आलेला जमिनीला तापवून दमवून भेगा पाडून मग एकदाचा आलेला. पण एकदा आला. मग मात्र हातचे काही राखले नाही, त्याने. तो पाऊस त्याने आज तिच्यासोबत अनुभवला... लहानपणी ताईसोबत, मग सोनू मधू सोबत आणि आता या अनूसोबत... तिने न निजवताच तो आपला आपण पलंगावर आला. डायरी ओढली. पेन जवळपास नव्हते. पेन्सिलला तर टोकच नव्हते. पण या लहानसहान गोष्टींना तोही, पूर्वी बोटात पेन्सिल धरता येत नव्हती, तरीही अडला नव्हता. मग आता तर त्याची बोटे, त्यांची पकड संपूर्णपणे फक्त त्याचीच होती. अनूसोबत अनुभवलेला तो पाऊस त्याने आवेगाने लिहून काढला... तो भानावर आला तेव्हा सोनूने खिडक्या, दार उघडले.

"बाहेर बघा ना बाबा! किती मस्त पाऊस पडला." तिने खिडकी उघडली. त्या गच्चीच्या बाजूची. ते झाड अजूनही सळसळत होते. आपले चिंब झालेले अंग जणू झटकत पावसाचे थेंब उडवत. आज किती दिवसांनी सोनूने त्याच्या डाव्या हाताकडचे बंद दार उघडले! तीही एक छोटी निमुळती गच्चीच होती. नको असलेले अडगळ सामान टाकून दिलेली. तिथून हवेचा एक छानसा झोका आला. त्याने हसून तिच्याकडे पाहिले- इथेही एक गच्ची त्याच्याकरता होती. हे तो विसरूनच गेला होता. पश्चिमेकडची बाजू म्हणून मणीने बंदच ठेवलेली... 
"मला खुर्ची तिथे नेऊन दे ना!" तो म्हणाला.
"खूप अडगळ, कचरा आहे. पाणीही साचलंय बाबा. हे सगळं साफ करू मग... आणि मघा सगळी दारं, खिडक्या सताड होती, आपटत होती. कॅलेंडर उडून गेलं. फाटलं... मी मग बंद केलं सगळं..." 
"तू बंद केलंस!"
"हो नं."
"मला वाटतं..."
"काय...?"
“वाटलं की अनूच....”
“त्या तर मघाच गेल्या. पावसात सापडल्या त्या. मी 'थांबा' म्हटलं, पण त्यांना खूप घाई होती." त्याला आता फुस्सकन, हसूच आले...

गंमतच आहे, ढगांची ती पळापळ खरीच... हा पाऊसही पूर्णपणे खरा! तो अनुभवणारा तोसुद्धा तितकाच खरा. पण त्यात अवेळी गेलेली ती तेवढी खरी नाही! तिच्यासोबत त्याने पाऊस पाहिलेलाच नाही... मग आजचे तिचे ते उगीचच रेंगाळणे! आणि कामाशिवाय थोडे उगीचच बोलणे... ते... तेही...”

दोन-तीन दिवस असाच मधून मधून पाऊस येत राहिला. उघडीप पडत राहिली. पण पावसाळा लागला. म्हणण्यासारखा पाऊस येत होता खचित. जमिनीची धग जणू निवली होती. दोन दिवस अनू मात्र आली नव्हती. तिचा फोन होता. तिला खूप सर्दी झाली होती. किंचित तापही. फ्ल्यूसारखे होते. नक्कीच तिला पाऊस बाधला होता. चांगली थांबली असती... आता मणीने त्याचीही गच्ची साफ करवून घेतलेली, उघडली- ती सकाळी तिच्या वॉकला गेली. आणि जाताना सवयीने खिडकी उघडून दिली. धिरणीकर गच्चीवर व्यायाम करत होती. तिचे मूल अवतीभोवती होतेच. धरून धरून बसत रांगत होते. झाडे सळसळत होती. त्याला एक स्वर होता. आणि दुरून कुठूनतरी पक्षी ऐकू येत होता, दिसत मात्र नव्हता. त्या पक्ष्याचे हे असे असणे म्हणजे या सकाळचेच असणे होते- सोनूने पेपर आणून दिला. आकाशवाणीवर यावेळी चांगली गाणी असतात, न्यूज असते आता सकाळच्या चित्रात हे सगळे येते पूर्वीसारखे- ऐटीत हातात धरून पेपर चाळायचा- त्या बातम्यांत आपण कुठेच नसतो. आपली बातमी कधीच नसते. इथे वाचणारा बाहेरचा असतो; आणि ज्याच्याबद्दल बातमी असते तो आतला. एक आतला; एक बाहेरचा. दोघांमधला संबंध इथे अतिशय वरवरचा मानला तर असणारा; नाही तर नाही- त्याला हे कोणाजवळ तरी बोलावेसे वाटते, पण कोणाजवळ? जिन्यावर मणीची पावले वाजली.

….आज दुपारी ती आली होती. अनू... 
"कशी आहे तब्येत" त्याने विचारलं.
“आता बरीय. खूप सर्दी...”
"तुम्हांला हौसच होती आजारी पडायची. त्या दिवशी जरा थांबला असता तर काय होतं! तुम्ही हट्टीच आहात." ती जरा गंभीर झाली. मग एक्सरसाईज सुरू करण्यापूर्वी म्हणाली, "मी दोन दिवस घरी होते तर विचार केला तुम्ही म्हणाला त्याचा.”
“कशाचा!” तो काय कधी म्हणाला हे विसरून गेला होता. 
 'कशाबद्दल?" 
"तुम्ही तुमच्या मामांबद्दल म्हणत होता. त्यांना माझ्याबद्दल तुम्ही विचारू शकता, पण माझा भाऊही माझ्याबरोबर असेल.... तो मार्गाला लागेपर्यंत..." त्याच्याकडे न पाहता म्हणाली. 
"मामांबद्दल!" तो चकितच झाला. गोंधळला; जे सहजी मनात आले त्यातला अकस्मातपणाचा अंश तिनं घालवला होता. रंगमंचावरला तो प्रवेश! स्थळ-काळ वेळही ओलांडून कुणाला कुठे नेऊन जोडणारा... त्या सार्या गोष्टींना तिने एक ढोबळ आकार देऊन सारे घालवून टाकले. तो मनोमन शरमिंदा झाला.
“मी विचारीन... पत्रच टाकीन." तो अद्यापही गोंधळलेलाच होता.

“मीच माझ्याबद्दल विचारायला नको. पण कुणीच नाही माझ्याबद्दल विचारणारं घरचं असं! तुम्ही जवळचे म्हणून...” तिने सांगून टाकले. तो अस्वस्थसा होता. एक्सरसाईज सुरू झाला. आज त्याच्या क्रिया एकचित्त नव्हत्या. तो चुकत होता. नेहमीचे सरावाचेही करत नव्हता, तिने त्याला खुर्चीवर बसवले. आपण तिथे बसू, त्याने त्याच्या घरच्या गच्चीकडे बोट दाखवले. हवा चांगली होती, मणीने गच्ची साफ केली होती. फक्त जरा उंचवटा होता. गच्ची जरा खाली होती. अनूने तिथे खुर्ची ठेवली. त्याची आरामखुर्ची आणि त्याला वॉकरने दारापर्यंत नेले, तेवढे उरलेले अंतर तो स्वतःहूनच जाऊ शकेल; प्रयत्न करा, असं ती सांगत असतानाच त्यानं तिचा आधार घेतला. नको असताना आणि मुद्दाम जाणीवपूर्वक तिची छाती चाचपडली बोटानं... ती गोरीमोरी झाली. तिला तो स्पर्श समजला. तिने त्याला आरामखुर्चीवर बसवलं...
"मी निघते, तुम्ही बसा. खाली कुणालातरी सांगते की तुम्ही गधीत बसला आहात."

आणि तो काही म्हणायच्या आत ती गेलीही. तो खाडकन् भानावरच आला. तिचा गोरामोरा अपमानित चेहरा...

ती दोन दिवस आलीच नाही, फोन, निरोप काही नाही. अजून दोन दिवस तसे तिचे येणे न होता संपले. घरातलेही सगळे त्यालाच विचारत होते, की ती का येत नाही! आणि त्याला सांगता येत नव्हते. दोन दिवस तर शेजारची गच्चीही बंद होती. बाईंचा व्यायाम नव्हता. तारेवरील कपडे नव्हते. ते भवती दुडदुडणारे मूल नव्हते, गच्चीवर झाडे नुसतीच सळसळत होती. अनूने आणि त्या बाईंनी काही संगनमत केले आहे असेच त्याला वाटले. त्याने शेवटी न राहवून मणीलाच विचारले,
"शेजारची धिरणीकर मंडळी कुठे गेली आहेत का?" मणीलाच काही माहीत नव्हते. तिला आजूबाजूचे तसे फारच कमी माहीत असते. मग सोनूला विचारले, तर तिला माहीत होते. ते लोक कुठे बाहेरगावी गेले लग्नाला. त्यांच्या भावाच्या. दुसऱ्या दिवशी ती गच्चीही उघडली. तारेवर कपडे आले. सोनूने विचारलेही.
“कसे झाले लग्न?” ते सांगून तिनेही विचारले. "कसे आहेत बाबा? "
"खूपच प्रोग्रेस आहे, खोलीतल्या खोलीत फिरतात..." 
"हो, मी बघते ना! ती मुलगी एक्सरसाईज देते..."

त्याला अनूची तीव्र अशी आठवण आली. तो लवकरच पूर्ण बरा होत होता आणि त्याला आता अनूची तशी गरज राहणार नव्हती. पण अनूची ही आठवण त्या गरजेपलीकडचीच होती हे त्याला आतून लख्ख समजले. तिची आठवण तिच्या त्याला वाटणार्या स्पर्शाच्या ओढीचीही नव्हती. त्याहीपलीकडली होती. त्याची वरची खोली- छत, भिंती, खिडकी बाजूची गच्ची, बाई, तिचा व्यायाम, ते मूल, ती सळसळणारी झाडे हे आणि अनू. तिची चार वाजताची येण्याची वेळ.... तिचा नि त्याचा घडलेला, न घडलेला संवाद हे सगळे एकच चित्र होते. त्याच्यातल्या कार्तिक नसलेल्या कुणी तरी ते काढले होते. त्याला गरज होती ती या सगळ्यांच्या एकत्रित असण्याची. भले त्या एकमेकांत काही अनुबंध न का असेना! आणि ती मूर्ख मुलगी त्या फालतू गोष्टीला बिथरून येतच नव्हती....

रात्री मणीकडे तिच्या ऑफिसचे बॉस लोक जेवायला होते. तिने त्याला चांगला तयार केला. दाढी करायला लावली. 
"तुझ्या बदलीच्या करता हे जेवण असेल, तर मणी, मला शक्य तितकं गबाळ दीनवाणंच असणं बरं ना!" तो हसत म्हणाला.

"तू कधी दीनवाणा वगैरे होऊच नको रे बाबा... बदली झाली तर झाली" ती म्हणाली. मग थोडं थांबून म्हणाली,
“खरं म्हणजे एवढा अपघात झाला पण तू कधी मला नुसतं बरं होण्याची वाट पहात बसलेला, कुढणारा असा कधीच वाटला नाहीस." तो हसला. मणी खाली गेली... त्याने पॅड ओढले. पेन्सिल जवळच होती. शाळेत इंग्रजीचे व्याकरण शिकवताना गुरुसर सांगत, त्यांच्या सांगण्यात एक कोणी तरी मनू असे कंपॅरिटिव्ह डिग्री शिकवताना ते 'मनू'च म्हणत. त्याऐवजी त्याने अनू केले लिहायला सुरवात केली.

अनू "इज मोअर ब्युटिफुल गर्ल दॅन एनी अदर गर्ल इन द क्लास. अनू इज टॉलर दॅन अदर्स इन द क्लास. नो अदर गर्ल ऑफ द स्कूल इज अॅज क्लेव्हर अॅज अनू इज. ऑफ ऑल द गर्लस् इन स्कूल अनू इज फूलिश- अनू इज टूऽऽ यंग टू अंडरस्टँड हिज फीलिंग्ज, अनू इज टूऽऽ यंग टू मॅरी विथ मामा- अनू इज सो यंग दॅट शी कॅनॉट मॅरी विथ मामा....”
त्याने लिहिणे थांबवले. अक्षरे उमटली. पण एकात एक घुसून गेली होती. त्याच्या शाळेचा तो वर्ग गुरू सरांचा- तो क्लास, ते व्याकरण सरांनी फळ्यावर लिहून दिलेले. अनू आणि तो... त्याने पेन्सिल फेकली, भिरकावली ती दूर लांब फेकायची होती, पण पडली जवळच. पलंगावर. त्याला राग आला. ही मूर्ख मुलगी! सतत आपला एक हिस्साच बनून आपल्याला असं कुरतडून टाकणार का? ही धड बाहेरचीही होत नाही; आणि आतलीही नाही. एक कुठली तरी तड गाठून तिथं रहावं आपलं मुकाट्यानं...! जेवणाचं ताट घेऊन मधू आली; पण त्याचं जेवण होईतो थांबली नाही. तिला खाली काम होतं... जाताना मणीचे सगळे लोक वर आले. त्याला भेटायला. त्याचे अर्धवट चिवडलेले ताट स्टुलावर तसेच होते. मणीनं त्याकडे नाराजीचा कटाक्ष टाकला.

“कसे आहात!” तिच्या बॉसनी हात पुढे केला. त्याने त्याचा हात पुढे केला. पण त्याची बोटे खरकटी, वाळलेली होती. 'सॉरी' म्हणत त्याने हात मागे घेतला. मणी जास्तच नाराज झालेली त्याच्या लक्षात आलं. सगळे लोक खाली गेले. त्यांच्या कार, स्कूटर्स सुरू झाल्याचे आवाज आले- तो स्वतःशीच हसला. मणी नाराज झाली असेल तर होऊ दे पण तिचेही काम होऊन जाईल. बदली कॅन्सल होईल. तो काही कटोरा घेऊन नव्हता बसला. आणि मणीही नव्हती तशी. जरी हे जेवण बदलीच्या संदर्भातच होते तरीही... खरे म्हणजे कुणीही स्वतःकडे असे कधी बघत नाही. आणि त्याने मात्र अनूला.... अनूचा त्या दिवशीचा गोरामोरा, अपमानित चेहरा.... तो कासावीस झाला. त्याने कुठलेही तुकडे फेकले नव्हते, हे तिला सांगायचे होते. फक्त एकदाच तिनं यायला हवे आहे- नंतर केव्हाही नाही आली तरी चालेल.....

पुढचे चार दिवसही अनू गायब होती. सोनू, मधू कुणीही. त्याला चालवत होत्या. खोलीत. चार दिवसांनी कॅथेटरही निघणार होते. आता आली तर हिशेब करून टाकू म्हणून मणीही म्हणाली. हिशोब या दोन-अडीच महिन्यांचा नव्हता. प्रत्येक दिवसाचा आणि तासांचाच होता. ती एका तासाच्या हिशोबानेच पैसे घेत होती.... पण तिने त्याला व्यापून टाकले ते मात्र सारे त्या एका तासापलीकडे... दिवसाच्याही चोवीस तासांपलीकडचे... एक अनाघ्रात ताजेपण त्या भाबड्या अश्राप मुलीने त्याला बहाल केलेले. मणी म्हणालीच होती, तू कधी बरा होण्याची वाट बघत कुढत बसला नाहीस म्हणून.... त्याच्या घशात दुखले. काहीतरी दाटून आले.

....आज दुपारीच आकाश भरून आले. तीन वाजताच धिरणीकरबाई तारेवरचे कपडे काढून गेली. ते मूल नव्हते बरोबर. कदाचित झोपले असेल. असे त्याने समजून घेतले आणि काय आश्चर्य! जिन्यावर पावलं वाजली ती अनूची. तिच्या नेहमीच्या वेळेला. ठीक चार वाजता. एक सेकंद इकडे की तिकडे नव्हता. ज्या चार वाजण्याशी इतके दिवस एक अनुबंध जुळला होता, ती वेळा पुन्हा जणू सचेत झाली. जसे या वेळेला इतके दिवस बंद पडणारे घड्याळ पुन्हा सुरू झाले. या वेळेपासूनच. तो काही तरी म्हणणार होता तो तीच म्हणाली,
"सॉरी मला येता आलं नाही..." 
“कळवता तर येत होतं!” तो पूर्ववत होत म्हणाला रागावून. तो त्याचा राग रुसवा तिला स्पष्ट कळावा म्हणून. 
"तेही जमण्यासारखं नव्हतं." ती स्थिरच होती.
"काय झालं?"
"माझा भाऊ फार आजारी झाला. हाय फीव्हर. ताप उत्तरेना. सहापर्यंत चढला. अॅडमिट करावं लागलं. घरी आणल्यावरही अशक्तपणा खूपच होता. आज तो शाळेत गेला. हॉस्पिटललाही मी आज गेले."
"मला वाटलं, वाटलं की तुम्ही मुद्दामच आला नाहीत." तो त्या दिवशीचा उल्लेख न करता म्हणाला, तिची नजर टाळून.
“असं कसं करता येईल आम्हांला? तुम्ही बरं होईपर्यंत आम्ही तुमच्याशी बांधलेलेच असतो.” ती सरळ त्याच्याकडे पहातच म्हणाली. पूर्वीच्याच निर्विकारपणे.. तो काहीसा खट्टू झाला. त्याचा आणि तिचा स्वतःचाही उल्लेख तिनं सर्वसाधारण असाच केला. तिच्याकडून तरी त्या दोघांत काहीही वेगळे घडलेले नव्हते. ती किंवा तो हे मुळीच स्पेशल असे नव्हते, हेच ती जणू ठासून सांगत होती.

"आज एक्सरसाईज करायचा आहे?" आज तिनंच त्याला विचारलं, 'तुम्ही म्हणाल तसं’, तो म्हणाला. मधेच त्याचे लक्ष शेजारच्या गच्चीकडे गेले. गच्चीचे दार उघडे होते. मघा धिरणीकर कडी घालायला विसरली असावी.
"तुम्ही येत नव्हता तेव्हा समोरची गच्चीही गायब होती. काही दिवस!" तो म्हणाला. 
“गच्ची?”
"म्हणजे ती बाई, व्यायाम करते ती आणि तिचे मूल..."
यावर काही बोलावे असे तिच्याजवळ नव्हते. ती साधे हसलीही नाही.
"त्या बाईला एक समजत नाही की त्या छोट्या मुलाला ठेवून ती खुशाल बिनधास्त व्यायाम करते. गच्चीला कठला नाही." 
"थोडासा आहे."
"पण पुरेसा नाही. ते मूल पडेल एकादे दिवशी. "
"नाही पडणार."
"कशावरून?"
"असंच वाटतं. तुम्ही नाही का वाचलात, एवढ्या अपघातातून!"
"हो. पण कठडा हवाच ना!"
"हो, हवा तर खरा." म्हणत तिने ती उठली एक्सरसाईज झाले. तिचा नाममात्र आधार त्याने घेतला. आज तर वॉकरही जसा तोच चालवत होता.
“तुम्ही खूप फास्ट प्रोग्रेस केला. विलपॉवर स्ट्राँग आहे तुमची."

"कॉफी घेऊ." तो म्हणाला. ती स्टुलावर बसली, तो पलंगावर. दोघांमध्ये एक स्तब्ध मौन भरून राहिले. तिने कपच त्याच्या हातात दिला.
"तुम्हांला एक सांगायचं आहे."
"बोला."
"तुम्ही समजून घ्याल..."

"प्रयत्न करीन..."
"मी तुम्हांला त्या दिवशी मामांबद्दल विचारलं, ते काही खरं नाही..."
"मीही काहीतरी बोलून गेले. यू फरगेट इट."
"तसं नाही, मामा पन्नाशीला आला. लग्न करायचंच नाही त्याला... तिरसिंगराव आहे तो. तो काही लग्नबिग्नवाला नाही. आणि तुम्हीही तशाच... चक्रम अडेलतट्टू... मी तुम्हा दोघांना जोडून पाहिलं... बस्स इतकंच."

कधी नव्हे तो ती खळखळून हसली. इतकी की तिच्या डोळ्यांत हसता हसता पाणी आलं. तोही हसायला लागला. आणि बाजूच्या गच्चीच्या उघड्या राहिलेल्या दारातून तो गबदूल मुलगा आला. तो थोडासाच दुडदुडत चालला, पण गच्चीत. चालणे त्याला सरावाचे नसावे. भिंतीला धरून पावलं टाकून तो रांगायलाच लागला... रांगता रांगता थांबून इकडेतिकडे पाहिलं, त्याला एकट्याला खूपच मजा वाटत असावी. मागे त्याची आई असेलच असे अनूला आणि त्यालाही वाटले. पण ते मूल सरळ कठड्याकडे रांगत बसत सरकायला लागलं. तेव्हा मात्र इकडे हा घाबरला. त्याने अनूचा हात घट्ट धरला. त्याचा श्वास फुलला.
"गच्चीला कठडा नाही." तो पुटपुटला. 
"त्याची आई गेली कुठे मुलाला सोडून!" 
“तो पडायचा नाही” अनू म्हणाली.. 
“असा कसा पडणार नाही।" तो रागानं म्हणाला.
"मी सांगते ना, नाही पडणार!" पण तो हळूहळू पलंगावरून उतरला. दांड्याला धरून कसाबसा अनूशिवाय लटपटते पाय स्थिर केले. हात लांब करून भिंतीला धरले. आणि जिवाच्या कराराने तो खिडकीशी पोचला. ते बाळ आता अगदी कठड्याशी आले. पण थांबले तरी होते. कठड्याशीच. जरा वाकले, ओणवे झाले की... संपले. खिडकीतून त्याने जोरात आवाज दिला. खिडकीची चौकट पक्की पकडून.

"धिरणीकर, अहो धिरणीकर!" तो आवाज पोचत होता की नव्हता! की सुटलेल्या वाऱ्यात इकडे-तिकडे फेकला जात होता! त्याचे त्याला कळत नव्हते. ते मूल आता कुतूहलाने काही बघत होते. ते बघतानाच थांबले होते. ते झाडाचे वाळलेले पान होते ते तोंडात घालून पाहिले त्याने. वाऱ्याने तशी मग बरीच पाने गच्चीतून उडून त्याच्यापर्यंत आली. मग तो कठड्यापासून जरा बाजूला झाला. त्या पानांच्यात रमला. इकडे याच्या चेहऱ्यावर घाम डवरून आला. अनूही पहात होती. बाळाची आई धावत आली. तिने त्याला उचलले. छातीशी धरले, मटामटा त्याचे पापे घेतले त्याच्या कुरळ्या जावळावर गाल घासले.

मूर्ख नाहीतर! तो पुटपुटला आणि पलंगाकडे यायला लागला. भिंतीला धरून धरून अनूने हात पुढे केला पण अनूची आता तशी गरज भासत नव्हती. अनू त्याच्याकडे पाहून हसली. तोही हसला, वारे सुटले होते. पावसाचा रंग होता. 
"निघते मी. पाऊस येईल." ती घाईनं म्हणाली.
"नाहीही येणार पाऊस. वाऱ्यानं उडून जाईल." तो म्हणाला. पण ती थांबली नाही. खाली कुणीतरी त्याचे नाव घेत होते कार्तिक... कार्तिक...
“तुमच्याकडे कुणी आलं आहे." ती म्हणाली. जिन्याशी जाऊन जरा थबकली जरा मागे वळून पाहिले. थोडी
हसलीसुद्धा. आणि हात हलवला निरोपाचा.... 
उद्यापासून ती यायची नव्हतीच.
 

Tags: Love Painting Exercise Rain Physiotherapist प्रेम पेंटिंग व्यायाम पाऊस फिजिओथिरपीस्ट weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके