डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

बीजसंरक्षण आणि स्वावलंबन

सरळ जाती आणि प्रजातींच्या विशिष्ट गुणधर्मावर आधारित बियाण्यांचे संरक्षण-संवर्धन व प्रसार करावा लागेल. यामधून शेतकऱ्यांना बीजस्वावलंबनाकडे जावे लागेल. मी म्हणतो, बीजशास्त्र हे शास्त्र म्हणून वापरण्याऐवजी गेली काही वर्षे शस्त्र म्हणून वापरले जात आहे का, याचाही शेतकऱ्यांनी विचार करायला हवा. शेतकरी बांधवांनो, शाश्वत शेती विकास हा बियाणे-स्वावलंबित्व असल्याशिवाय शक्य नाही, असे मला वाटते. म्हणूनच संकरित बियाण्यांवर आधारित जैविक किंवा शाश्वत शेतीचा विकास होऊ शकत नाही, कारण संकरित बियाणे हे मोठ्या प्रमाणावर रासायनिक खताच्या आणि कीटकनाशकाच्या वापराशिवाय चांगले उत्पादन देऊ शकत नाहीत. आपल्या सामाइक विचारसरणीमध्ये याचा वापर आपल्याला सरळ जाती व प्रजातींच्या संवर्धनातून आणि स्वावलंबनातून करावा लागेल, फक्त त्यांच्या गुणवत्तेचा विचार करून हे करावे लागेल.

‘बीजसंरक्षण आणि स्वावलंबन’ या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मी आज आपल्याशी हितगुज करणार आहे. ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ या मराठी म्हणीप्रमाणे बीजाचे महत्त्व वेगळे सांगण्याची गरजच नाही. तरीही गुणवत्तापूर्ण बियाणे हाच शेतीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि तोच शेतीचा उगम किंवा मूल आधारही आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

‘कॉफी, मिरची, चिकोरी अशा बिया’, त्यांचे संरक्षण किंवा त्यांची प्राप्ती यावर इतिहासामध्ये अनेकदा युद्धे झाली आहेत आणि त्यामुळे अनेक ठिकाणी जगाच्या इतिहासात राज्येही बदललेली आहेत. पूर्वी शेतकरी बहुधा आपलेच बियाणे निवडून साठवून वापरत असे, पण आता मुख्यतः अधिक उत्पादनाची बियाणी शेतकरी बहुधा खरेदी करतो. तरी देशी स्थानिक वाण संरक्षण-संवर्धन प्रमाणीकरण याची प्रक्रिया सुरू आहेच. कदाचित पुढे त्याचे महत्त्व वाढेल. कारण बीजविकास निम्मा-पाऊण प्रयोगशाळेत होतो, पण निदान चार-आठाणे म्हणजे 25 टक्के तरी निसर्गात किंवा जमिनीवरच होतो. म्हणून तर मिरचीसारख्या विदेशी पिकाच्या (मिरची हे पीक मूळ लॅटिन अमेरिकेतील) शेकडो जाती-प्रजाती-उपजाती आज भारतासारख्या महाकाय देशात कोना-कोपऱ्यांत वाढल्या बनल्या व शेतकऱ्यांनी त्या जोपासल्या! शेतकऱ्यांद्वारे निवड व जोपासना ही अत्यंत महत्त्वाची यासाठीच आहे.

आता बीजसंरक्षण किंवा बीजस्वावलंबन याचं महत्त्व काही फक्त देशी किंवा परदेशी बीजकंपन्यांनी शेतकऱ्यांना जास्त दराने विक्री करू नये किंवा लुबाडू नये म्हणून आहे, असे मुळीच नाही. तो एक महत्त्वाचा भाग म्हणता येऊ शकेल, परंतु इतरही अत्यंत महत्त्वाची कारणे बीजसंरक्षण किंवा बीजस्वावलंबनामध्ये गृहीत धरली पाहिजेत. उदाहरणासाठी- स्थानिक जात-उपजात विकास आणि त्या जातीचा किंवा त्या प्रजातीचा विशिष्ट आकार-रंग-पोत, कमी किंवा जास्त पाण्यात तग धरण्याची क्षमता, रोग-कीड प्रतिबंध यांसारखे अत्यंत महत्त्वाचे गुण हे त्या विशिष्ट जाती वा प्रजातींमध्ये असणे आवश्यक आहेत. ते विशिष्ट हवामान विभागानुसार आपल्याला नोंद करून घ्यावे लागतील.

महाबीजसारखी एखादी सरकारी कंपनी किंवा अनेक खासगी कंपन्याही आज बीजोत्पादन हे शेतकऱ्यांकडूनच कंत्राटी पद्धतीने करून घेतात. प्रजात-संरक्षण व शेतकरी अधिकार 2002 कायद्यानुसार तर शेतकऱ्यांना आपल्या स्वतः निर्माण केलेल्या जातीची वा प्रजातीची नोंद व त्यासंबंधीचे आर्थिक संरक्षण सुनिश्चित करण्याचीही कायद्यात तरतूद केलेली आहे. कायदा करण्यासाठी काही विशिष्ट विवादास्पद ज्या गोष्टी घडल्या त्यांचा व इतिहासाचा विचार करावा लागेल. कंपनीकडून बटाट्याचं वाण घेऊन संपूर्ण उत्पादन त्याच कंपनीला न देता स्वतः त्याचं सुधारित बियाणं बनवून विकण्याचा पंजाबच्या शेतकऱ्यांचा प्रयोग त्या विशिष्ट कालावधीमध्ये खूप वादाचा आणि चर्चेचा विषय झाला होता, हेही विसरता काम नये. पण स्वतःची प्रतिमा टिकवण्यासाठी कंपनीने त्या संपूर्ण प्रकल्पातूनच माघार घेतली, हेही लक्षात ठेवले पाहिजे.

बियाण्यांचे आपल्याला दोन मुख्य प्रकार दिसतात. एक सरळ बियाणे- ज्याला इंग्लिशमध्ये ‘स्ट्रेट व्हरायटीज’ म्हणतात. आणि दुसरे- हायब्रीड किंवा संकरित बियाणे. आता सरळ बियाणे म्हणजे काय तर- हे बियाणे पेरल्यावर उगवते, त्याला योग्य फळधारणा होते किंवा ती अशा पद्धतीने वाढतात की, त्याचे उत्पादन पहिल्यासारखेच चांगले मिळत राहते. उत्पादनात कमतरता येत नाही. त्याचे गुणही तसेच टिकून राहतात. हायब्रीड किंवा संकरित बियाण्यांच्या बाबतीत असे होत नाही. जर आपण उत्पादन मिळाल्यानंतर परत तेच संकरित बियाणे पेरले, तर त्या बियाण्यांची उत्पादनक्षमता कमी होईल किंवा ती उगवणार नाहीत. म्हणून सुधारित जाती-प्रजाती याच्या बाबतीत जर तुम्ही विचार केलात, तर तुम्हाला कृषी विद्यापीठे किंवा संशोधन संस्था बहुधा सरकारी संशोधन संस्था असतात, त्यांनी प्रस्तुत केलेली सरळ जातींची बियाणी तुम्हाला आजही बाजारामध्ये उपलब्ध आहेत, असे लक्षात येईल. यातल्याच काही सरकारी संस्थांनी निर्माण केलेल्या आणि प्रसिद्ध केलेल्या जास्त उत्पादन देणाऱ्या सरळ परंतु सुधारित प्रजातीसुद्धा खूप आहेत. त्यांची आपल्याला दोन उदाहरणे सहज घेता येतील. ती म्हणजे, आयसीटीपी-8203 हा बाजरीचा वाण- जो इक्रिसॅट या हैदराबाद येथील आंतरराष्ट्रीय संस्थेने बनवला. ही बाजरीची सरळ प्रजात आहे. किंवा अगदी तांदळाच्या बाबतीत विचार करायचा झाला तर, आय.आर.-1164 हे त्याचं उत्तम उदाहरण आहे.

याउलट संकरित बियाणे किंवा जनुकीय परावर्तित जाती (उदाहरणासाठी आपण बीटी कॉटन घेऊ या) बऱ्याच वेळेला प्रयोगशाळेत विविध प्रयोग करून तयार झालेल्या असतात. शेतकऱ्यांनी ही बियाणे निर्माण करणाऱ्या कंपनीकडून पुन्हा विकत घेतली नाहीत व स्वतःच्या शेतातील तेच बीज त्यांनी परत वापरलं, तर ते उगवणार नाही किंवा खूप कमी उत्पादन येईल. म्हणून सरळ बियाण्यांचे महत्त्व आपण लक्षात घेतलं पाहिजे. याचा अर्थ असा मुळीच नाहीये की, संकरित बियाण्यांचे फायदे नाहीत. तरीही बीजसंरक्षण आणि संरक्षणासोबत स्वावलंबनाची जबाबदारी शेतकऱ्यांनी विसरू नये, हे मला अत्यंत महत्त्वाचे वाटते. त्याची कारणे आहेत. या सुधारित किंवा सरळ बियाण्याचं महत्त्वाचं काय? तर एक म्हणजे, त्याला कमी खर्च येतो. त्यामुळे शेतकऱ्यांची बियाण्यांच्या खर्चाची आपोआपच बचत होते. आज 20 टक्के शेतीउत्पादनाचा खर्च बियाण्यांवर होतो आणि संकरित बियाणे किंवा बीटी कॉटन बियाणे कंपन्यांकडून विकत घेतल्याशिवाय शेतकरी त्याविषयी दुसरं काहीच करू शकत नाही. मग त्याचे परावलंबित्व वाढते, ते कधी कधी अत्यंत धोक्याचे ठरते. म्हणून बीजसंरक्षणामध्ये स्वयंपूर्णता महत्त्वाची आहे. सरळ जातीचे महत्त्व हे त्यासंबंधी अत्यंत अधोरेखित करण्यासारखे आहे. आता दुसरा विचार केला तर, सहयोगातून किंवा कंपन्यांकडून कंत्राटी पद्धतीने निर्माण केलेली सरळ वाणांची जी काही बियाणे बाजारात उपलब्ध आहेत, तीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने वाढविली जाऊ शकतात.

सुधारित जातींचे किंवा सरळ वाणाचे जसे फायदे आहेत, तसाच काही मर्यादाही आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. उदाहरणादाखल- शेतकऱ्याला आपले बियाणे राखून ठेवणे, संरक्षित करणे हे सर्वच करावे लागले, तर त्याचे व्यावसायिक गणित कच्चे असते. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे, खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यालाही शेतकऱ्याच्या शेतावर तांत्रिक दृष्ट्या मर्यादा येतात. किंवा अशा बियाण्यांची विक्री, विक्रीसाठी लागणारे जाळे, त्यासाठीचा अनुभव व त्याचा खर्च या सर्वच गोष्टींमध्ये अडथळा येऊ शकतो. चौथा महत्त्वाचा भाग म्हणजे, त्याच्यासाठी लागणारी एक शास्त्रीय आखणी किंवा त्याची व्यवस्था, त्यांच्यासाठी लागणारा विविध प्रकारचा सहयोग यातही शेतकरी कमी पडू शकतात. त्या दृष्टीने काही प्रयत्न झालेले नाहीत असं नाही. त्या दृष्टीचे काही महत्त्वाचे प्रयास किंवा अशा सहयोगी दृष्टीने सरळ किंवा सुधारित वाणांची वाढ, त्यांचा प्रसार करण्यासंबंधी गेल्या काही वर्षांत बऱ्यापैकी काम झालेले आहे.

अशा सुधारित किंवा सरळ वाणांच्या निर्मितीचे, त्यांच्या संरक्षणाचे प्रयत्न गेल्या वर्षभरापासून भारतात चालू असल्याचे दिसते. उदाहरणादाखल भारतीय हरित क्रांतीचे जनक एम.एस.स्वामिनाथन यांच्या स्वामिनाथन फाउंडेशनमध्ये एक सामुदायिक जीन बँक तयार करण्यात आली आहे. असाच दुसरा प्रयत्न डॉक्टर वंदना शिवा यांची नवधान्य ही संकल्पना आहे. त्यांची स्वतःची दुकानं आणि त्यासंबंधीची संपूर्ण विक्री व्यवस्था या सुधारित किंवा सरळ वाणांसाठी त्यांनी केलेली दिसते. याचा मुख्य प्रसार आणि प्रचार उत्तर भारतामध्ये झालेला दिसतो. महाराष्ट्रामध्येही प्रा.माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली राजीव गांधी शास्त्र आणि तंत्रज्ञान संस्थेमार्फत अशा विविध प्रकारच्या सरळ किंवा सुधारित प्रजातींची जिल्हानिहाय जीन बँक तयार करून त्यांचे निश्चितीकरण, त्यासंबंधीची विक्री यासाठी  काही काम झालेलं दिसतं. तसंच मला वाटतं, डॉक्टर रामप्रसाद यांचं ग्रीन फाउंडेशनसुद्धा यासंबंधीचं काम बऱ्यापैकी करताना दिसतं. श्रीकृष्ण प्रसाद यांची सहज समृद्ध संस्थाही अशा प्रकारचे काम मोठ्या प्रमाणावर करताना दिसते. यातील काही सहयोगी प्रकल्पांचा वार्षिक उलाढालीमध्ये तर कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झालेला दिसतो.

पीकप्रजनन आणि बीजसंरक्षण-स्वावलंबन यांवर आधारित असे सहयोगी प्रकल्प फक्त आपल्या देशातच सुरू आहेत, असे नाही. परदेशातही असे प्रयोग केलेले आहेत आणि ते यशस्वीही झालेले दिसतात. काही बाबतींत तर फार मोठे यश मिळालेले दिसते. अगदी उदाहरणच घ्यायचं झालं तर, एचएमटी  तांदळाचे उदाहरण खूप रंजक ठरेल. खरे तर खोब्रागडे नावाच्या महाराष्ट्रातीलच गोंदिया येथील एका शेतकऱ्याने हा वाण विकसित केला आणि कंपनीने तो घेऊन भारतभर प्रसारित केला, प्रचार केला आणि विकला. आज एचएमटी तांदूळ आणि त्याचे बियाणे हे भारतभर प्रसिद्ध आहे.  भरड धान्य (ज्याला स्वामिनाथन पोषक धान्य म्हणतात) डाळी, कंदमूळ, तत्सम काही पिके, मसाले अशा किती तरी पिकांमध्ये अशा प्रकारचा विकास हा जास्त प्रमाणात शेतकऱ्यांकडून झालेला दिसतो. तिथे हा मार्ग जर पुढे आणायचा असेल, तर सर्व राज्यांत त्याचे नियोजनबद्ध प्रकल्प उभारावे लागतील, त्यासंबंधी शेतकऱ्यांना पुढाकार घ्यावा लागेल.

आता पुढे एका महत्त्वाच्या मुद्याकडे वळू या. तो मुद्दा म्हणजे, उत्पादित झालेल्या मालाची गुणवत्ता. आजवरचा संपूर्ण कृषिविकास हा उत्पादनवाढीवर झालेला आहे. आणि खरं म्हणजे, पर्यायाने उत्पादनवाढीसोबत प्रचंड मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी खर्चाच्या वाढीवरही झालेला आहे. आता थोडं बारकाईने बघितलं तर उत्पादन निश्चितच वाढलं आहे, पण अतिरिक्त उत्पादन व निर्यातीमधील समस्या यामुळे अनेकदा देशांच्या मागणी असूनही शेतीमालाचा पुरवठा हा मोठ्या प्रमाणावर देशातच झालेला दिसतो. आजच्या या कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमध्येही भारत सरकारकडे जवळजवळ 80 लाख मेट्रिक टन एवढा अन्नधान्याचा साठा शिल्लक आहे. याचा अर्थ, तितके उत्पादन शेतकऱ्यांनी केले आहे. प्रश्न असा आहे की- मागणीपेक्षा पुरवठा वाढला तर किमती कोसळतात आणि त्यातून शेतकऱ्यांवर आत्महत्येचा भयंकर प्रसंग आढवतो. यावर उपाय काय आणि तो या बीजसंरक्षणाची कसा जोडायचा, हा थोडा बारकाईने विचार करण्याचा विषय आहे. म्हणून यापुढे उत्पादनवाढीपेक्षा पिकाच्या गुणवत्तेकडे एक महत्त्वाचा पर्याय म्हणून बघण्याची गरज आहे. उदाहरणासाठी बघू या- कन्याकुमारीजवळच्या लाल केळ्याची अत्यंत यशस्वी निर्यात अलीकडच्या काळात वाढली. या लाल केळ्यात  काही विशिष्ट पद्धतीची मूलद्रव्ये आहेत, जी अधोरेखित करून त्याच्या विक्रीचा पर्याय विकसित केला गेला. त्याउलट, आपण विचार करू की, नाशिकचा लाल कांदा इतक्या मोठ्या प्रमाणावर निर्यात होतो; पण या लाल कांद्यामध्ये कॅन्सरविरोधी मूलद्रव्य आहे, या गोष्टीचे भांडवल करून आपण तो जगात विक्री केला नाही. बॉम्बे रेड किंवा निफाड अशा विविध प्रकारच्या जातींच्या नावाखाली विकले जाते हे कांदाबियाणे. या सरळ जाती-प्रजाती आहेत. असे गुणवत्तेवर आधारित कांदाबियाणे विकले गेले, तर त्याचे संपूर्ण स्वरूप बदलेल. त्याचे संरक्षण अधिकार शेतकऱ्यांकडे असतील, तर अत्यंत मोठ्या प्रमाणावर व्यवसायवृद्धीची संधी मिळेल.

आता अशाच काही सरळ जाती-प्रजातींविषयी वेचक-वेधक माहिती बघू या. मिरचीची ब्याडगी ही बेळगावजवळची प्रजात अतिशय प्रसिद्ध. ही मिरची मोठी, वाकडी आणि तिच्या अतिशय लाल रंगासाठी प्रसिद्ध आहे. तिथूनच जवळ संकेश्वरजवळची संकेश्वर हीसुद्धा मिरचीची अतिशय प्रसिद्ध जात आहे. ही मिरची छोटी सरळ आणि तिखट असते. तशीच आंध्र प्रदेश, तेलंगणा भागातील  मोठी मध्यम, पण अत्यंत तिखट व अधिक उत्पादन देणारी मिरचीची गुंटूर ही प्रसिद्ध प्रजात आहे. कोल्हापूरची लवंगी ही छोटी आणि झणझणीत असते, तर उत्तर-पूर्वेतील भूत- जोलोकिया किंवा नागा मिरची तर जगात सर्वांत तिखट जातींपैकी एक आहे. आता या सर्व जाती-प्रजाती या सरळ वाण आहेत. म्हणजे यातली कुठलीच जात ही हायब्रीड किंवा संकरित नाही, हेच अत्यंत वाखाणण्यासारखे आहे.

असेच थोडेसे हळदीविषयीही पाहता येईल. सेलमची हळदीची अतिशय प्रसिद्ध जात आहे- जी रंगासाठी वापरतात. पण हळदीमधले कुरकुमिन हे अत्यंत महत्त्वाचे मूलद्रव्य त्याच्यासाठी प्रसिद्ध असलेली प्रजात ही मात्र केरळची. अलेप्पी किंवा ओरिसा कंधमाळ किंवा फुलबनी अशाही जाती कुरकुमिनसाठी प्रसिद्ध आहेत. तसं पाहिलं तर नागपूर-वर्ध्याजवळची वायगाव हळद ही कुरकुमिनसाठी सांगलीच्या प्रसिद्ध हळदीपेक्षा चांगली आहे. पण कुरकुमिन हे हळदीमधले अत्यंत उपयोगी मूलद्रव्य आणि त्यासंबंधातून आपण या हळदीच्या विक्रीचा विचार करतच नाही, तर फक्त रंग किंवा जास्त उत्पादन याचा विचार करतो. हळदीची अत्यंत महत्त्वाची गुणवत्ता विशेष म्हणजे कुरकुमिन. तिचा विचार करताना त्यातील प्रजातींचा शेतकऱ्यांनी प्रसार केला पाहिजे आणि या सर्व प्रजाती सरळ आहेत, संकरित नाहीत.

विविध प्रकारची फळे, पालेभाज्या, कंदमुळे, तृणधान्ये, तसेच पूर्वी ज्याला भरडधान्य म्हणायचे किंवा आता स्वामिनाथन त्याला पोषक धान्य म्हणायला लागले- म्हणजे ज्वारी, बाजरी यांसारखी पिके! अशा पिकांच्या सरळ जाती वा प्रजाती भारतीय शेतीत खूप पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत. यातील बऱ्याच जाती-प्रजातींच्या संकरित किंवा हायब्रीड प्रजाती निर्माण केल्या गेलेल्या नाहीत. केरळमधील नावरा या जातीच्या तांदळाची पेज आजारी माणसाला खास दिली जाते. हल्ली तर काळे आणि करडे  तांदूळ डायबेटिक प्रतिबंधक म्हणून अतिशय महाग दरात विकले जातात. तसेच बासमतीच्या हिमालयाच्या पायथ्याजवळील काला नमक या जातीविषयी सांगता येईल. ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मुळात लठ्ठपणापासून वाचवण्यासाठी ही जात उपयोगी ठरते. या सर्व सरळ जाती-प्रजातींतील महत्त्वाचा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. तो म्हणजे- या सर्व जाती-प्रजाती शेतकऱ्यांनी आजपर्यंत स्वतः वाढवल्या, त्या वाढवताना त्यांचं संरक्षण केलं. त्या संरक्षणामधून स्वावलंबी होण्यासाठी व्यवस्था निर्माण करावी लागेल.

याविषयी पुढील दिशा काय असली पाहिजे, त्याचा थोडा विचार करू- तोही काही उदाहरणांनी करू. कडकपणामुळे दूरवर वाहतुकीसाठी सोईची जाईल, अशी पपईची तैवान जात खूप प्रसिद्ध आहे. आता ती  भारतात सर्वदूर लावतात. तिचा मूळ गुण म्हणजे टणकपणा. ही प्रजाती मोठ्या प्रमाणामध्ये भारतात वाढवून भारतातल्या विविध भागांत त्याची विक्री केली जाते. काही ठिकाणी तर तिची निर्यात होते. आता भारतीय सरळ जाती-प्रजाती या अशा प्रकारच्या काही विशिष्ट गुणधर्म धरून वाढवल्या, तर त्यांचा उपयोग होऊ शकतो. उदाहरण घेऊ या थॉमसन सीडलेस द्राक्षाचे. जवळजवळ गेली तीस-चाळीस वर्षे ही सुप्रसिद्ध द्राक्षे भारतातून मोठ्या प्रमाणावर निर्यात होतात. आता बिया असलेली द्राक्षे तुम्हाला सर्वांना आठवत असतील. फार पूर्वी हैदराबादजवळची असलेली द्राक्षं खूप प्रसिद्ध होती. अनाबेशाही ही जात संकरित नव्हती. द्राक्षाच्या बीमधील अँथोसायनिन हे तत्त्व खूप महत्त्वाचं मानलं जातं. ते मानवाच्या लठ्ठपणावर उपयोगी मूलद्रव्य आहे, असे म्हणतात. त्या द्राक्षासंबंधी त्याच्या गुणवत्तेवर आधारित व्यवस्था निर्माण करावी लागेल. शेतकऱ्यांना स्वतःच्या अशा प्रजाती वाढवण्याचा फायदा मिळाला पाहिजे.

बीटी कापसाचा भारतातला गेल्या वीसेक वर्षांतला प्रचार आणि प्रसाराचा इतिहास बघितला, तर तोही मोठा रंजक आहे. कापसाचं भारतातलं उत्पादन वाढलं यावर तर कोणी शंका घेणार नाही. पण जसा-जसा हा बीटी कापूस भारतात वाढत गेला तसतशी बोंडअळीसुद्धा उत्क्रांत होत गेली. मग बीजी-2 वरून बीजी-3 अशी प्रगती होत गेली. तरीसुद्धा आता परत या बीटी कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसायला लागला. गेल्या दोन-तीन वर्षांत तर पिंक बॉलवर्मने बीटी कापसावर मोठा धुमाकूळ घातला आहे. तसं पाहायला गेलं तर मग या बीटीचा इतिहास आणि त्याच्यातली बोंडअळी प्रतिरोधक शक्ती, त्याचे जास्त मिळणारे उत्पादन हे जरी प्रसिद्ध असलं; तरी हे सर्व करताना प्रचंड खर्च वाढलेला आहे, हेही कोणी नाकारू शकणार नाही. परत काही वर्षांनंतर त्या बीटी कापसामधले मूळ तत्त्व जर निघून जात असेल, तर ही सर्व स्पर्धा एक आंधळी दौड आहे असे दिसते. यामधील आणखी एक मुद्दा अतिशय महत्त्वाचा, तो सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घेतला पाहिजे. कापूस पिकविणाऱ्या अनेक देशांत जिथे बीटी कापूस वापरला जातो- ब्राझील, अमेरिका एवढेच कशाला चीनमध्येसुद्धा बीटी कापूस वापरत असले- तरी, त्या कापसाच्या प्रजाती संकरित आहेत असे नाही. बीटीचे तत्त्व सरळ जाती किंवा प्रजातींमध्ये वापरलेले आहे. शेतकरी बांधवांच्या आतापर्यंत हे निश्चित लक्षात आले असेल की, या सरळ जाती किंवा प्रजातीसुद्धा चांगले उत्पादन देऊ शकतात. त्यांच्यातले काही गुणधर्म जोपासले गेले पाहिजेत.

विषयाच्या शेवटाकडे येताना आणखी एका गोष्टीचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. शेतीशास्त्रज्ञ, शेती पदवीधर यांची संख्या मर्यादित आहे. शेतकरी मात्र संपूर्ण देशात करोडोंच्या संख्येने आहेत. शेतकऱ्याला रोजच्या स्थितीतील पिकातील बदल, त्याचा विकास, गुणवत्ता कायम शेतात राहून आणि वर्षभराच्या निरीक्षणाने जास्त चांगली कळते. शेतकरी या गोष्टी जोपासत असतो. त्यामुळे प्रयोगशाळेमध्ये केलेला आणि संकरित वाण असण्याचे महत्त्व असले तरी त्याच्या मर्यादाही लक्षात घेतल्या पाहिजेत. यासाठी शेतकऱ्यांच्या सहयोगाने त्यांच्याशी चर्चा करून पुढील जाती-प्रजातींचा विकास करावा लागेल. महत्त्वाचे म्हणजे, फक्त संकरित जातींचा विकास करावयाचा नसून सरळ जाती व प्रजातींच्या विकासावर लक्ष केंद्रित करावे लागेल.

आता या सर्व विवेचनावरून शेतकऱ्यांसाठी काही मर्यादित कृती-आराखडा करता येईल का, असाही विचार करायला हवा. काही मजेशीर, उत्साहवर्धक अनुभव या प्रक्रियेत अनुभवायला मिळतात. ‘पोटॅशियमसमृद्ध केळ खा व हृदयरोग टाळा’ अशा पद्धतीच्या पाट्या लावून व घोषणा देत औरंगाबादमध्ये कधी कधी शेतकरी विक्री करताना दिसतात. तेव्हा माती, पाणीपरीक्षा, मालाची गुणवत्ता, त्याचे परीक्षण आणि त्या गुण-पद्धतीनुसार त्याचा प्रचार आवश्यक आहे. या गोष्टी सरळ जाती किंवा प्रजातींबाबत मी बोलत आहे. त्याच्या प्रसारासाठी त्यांच्या गुणवत्ता-प्रचार आपल्याला विचारात घ्यावा लागेल, त्याच्यामध्ये मोठ्या दर्जेदार आणि गुणवान बीजांची किंवा फळांची निवड करून त्यांची वेगळी साठवणूक करणे, खालची पाने खुडून बीज सशक्त बनविणे, काही चांगले जोमदार रोपे मुद्दामहून बियाण्यांसाठी वेगळी ठेवणे- हे करावे लागेल. मी हे सरळ प्रजाती व जातींच्या संवर्धनाविषयी बोलतोय. जरुरीनुसार हाताने परागीकरणाची क्रिया करणे, अशा गोष्टीही करायला लागतील.

म्हणून आपण म्हणतो- ‘कांदा-मुळा भाजी अवघी विठाई माझी!’ त्या म्हणीनुसारच कॅन्सर, मूळव्याध, मूतखडा, रक्ताल्पता अशा रोगांवर प्रभावी उपाय म्हणून या सरळ जाती आणि प्रजातींच्या विशिष्ट गुणधर्मावर आधारित बियाण्यांचे संरक्षण-संवर्धन आणि प्रसार करावा लागेल. यातून शेतकऱ्यांना बीजस्वावलंबनाकडे जावे लागेल. मी नेहमी म्हणतो- बीजशास्त्र हे शास्त्र म्हणून वापरण्याऐवजी गेली काही वर्षे शस्त्र म्हणून वापरले जात आहे का, याचाही शेतकऱ्यांनी विचार करायला हवा. शेतकरी बांधवांनो, शाश्वत शेती विकास हा बियाणे-स्वावलंबित्व असल्याशिवाय शक्य नाही, असे मला वाटते. म्हणूनच  संकरित बियाण्यांवर आधारित जैविक किंवा शाश्वत शेतीचा विकास होऊ शकत नाही. कारण संकरित बियाणे हे रासायनिक खताच्या आणि कीटक-नाशकाच्या मोठ्या प्रमाणावर वापराशिवाय चांगले उत्पादन देऊ शकत नाही. आपल्या सामाइक विचारसरणीमध्ये याचा वापर आपल्याला सरळ जाती-प्रजातींच्या संवर्धनातून व स्वावलंबनातून करावा लागेल, फक्त त्यांच्या गुणवत्तेचा विचार करून हे करावे लागेल.

(हा लेख श्री.आशिष वेले यांच्या ‘नेचर केअर फर्टिलायझर्स’च्या फेसबुक लाइव्ह सत्रामधील मांडणीचा अनुवाद आहे.)

Tags: बिजसंरक्षण स्वावलंबन आशिष वेले swavlamban ashish vele weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात