डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

निसर्गनाटयातील भाव-भावनांचा तरल अविष्कार : रानभूल

संपूर्ण वसुंधरेचे संवर्धन होऊन जगा आणि जगू द्या हे सजीवांच्या जगण्याचे मूलतत्त्व रानभूलमधील कथांचा मुख्य आशय आहे. रानभूलमधील कथा नवलाईने साकार होतात. सोयरी वनचरे, विलापिका, रानभूल या कथा वाचून पुन्हा प्रत्ययाचा आनंद मिळतो तसेच दुःखही सजल होते. छोट्या छोट्या ‘चान्या' खारी एवढ्या वाटणाऱ्या कथा मोठ्या एवढ्या रूप धारण करतात.

गगने घनखटा शिहरे तसलता । 
मयुर मयुरी नाचिछे हरसे । 
रिमझिम घनघनरे । बरसे रिमझिम घनघनरे ॥ बरसे ॥ 

भर ग्रीष्मात त्या दिवशी घन दाटून आले. आभाळ ढगांनी कुंदकुंद झाले. ढगांचा गडगडाट सुरू झाला. विजा चमकू लागल्या आणि त्या तीन मोरांचे आर्त 'पियू-पियू' सुरू झाले. एक कडकडाट, एक पियू. परत एकदा गडगडाट, पियू पियू पियूच्या दीर्घ विरहणी आभाळातून पाण्याचे जडशीळ थेंब पडू लागले आणि त्या जलबिंदूचा स्पर्श होताच मोरांच्या अंगावरचे पीसनूपीस थरारले. एक पाय वर उचलून तो गिरकी घेऊ लागला. शेपटाच्या कुंच्याला अर्धवट विस्फारू लागला. परत मिटू लागला. आकुंचित होत जाणारी हे वलये... विस्फारणारी वलये... प्रत्ययकारी वर्णन आहे. सुमेधा कामत यांच्या ललित कथासंग्रहातील, रानभूलमधील. रानभूलमधील कथाच सुंदर, फुलाफुलांच्या, पाना-फांद्यांच्या, प्राणी- पाखरांच्या आणि एकूणच निसर्गसृष्टीच्या भाववंधनातून व त्यातील गुंताणुंतीतून आविष्कारीत होत जातात. 

पशु-पक्ष्यांविषयी अतीव कणक-करुणा, ममता प्रेम त्यामुळे निर्माण झालेल्या भावभावना लेखिकेच्या स्वदेशनशीलतेप्रमाणेच आपल्याही मनःपटलावर अशा भावभावनांचे तरंग दीर्घकाळ तरळत राहतात. कामतांच्या कथांत सभोवतालच्या सृष्टी सौंदर्याची मोरपंखी हिरवाई नेहमी प्रभावी होते. सजग-सजीव होते. मात्र कथेच्या आशयाला त्यातील वेदेनेला ती अधिक मुखरितही करते. निसर्गातील विविधतेचे सौंदर्यपूर्ण वर्णन करूनच त्या थांबत नाहीत तर प्राणीपाखरांच्या भावपूर्ण जिण्या-जगण्याचे चित्रण करता करता माणसांच्या अंतरंगातील प्राणी-पाखरांच्या प्रती निर्माण झालेल्या भावना, वेदना, कथा-व्यथा हळूवारपणे, कधी विनोदाने सांगून जातात. त्यांच्या अंतरंगातील कारुण्य आणि ममताही प्रकट करतात. म्हणून त्यांच्या कथा म्हणजे निसर्गनाट्यातील विविध घटकांच्या कथा-व्यथांचे काव्यमय दर्शन आहे. 

शाश्वत- अशाश्वत अशा मानवी मूल्यांचे सिंचनही त्यांच्या कथांतून होत जाते. रानभूलमधील कथा अति लालित्याने झाकोळून जात नाहीत. त्यावर लेखिकेच्या भाषेच्या सहजतेचा प्रभाव- परिणाम असावा. तरीसुद्धा त्यांची शब्दकळा धवलाई, समुद्राची गर्द हिरवाई, पुष्प दरवळाची चाहूल, पाणलाटा, सूर्यझळा, पुण्यबाण, कुंकुमोत्सव, यांच्यात मन मोहून टाकते. स्वतःची स्वतंत्र काव्यात्मक शैलीदार शब्दकळा आणि तिचा घाट यांच्या निर्मितीस कामतांना त्यांच्या अशा कथांमध्ये बराच वाव आहे. लेखिका पाखरांचे पक्षीपण आणि पक्ष्यांमधील माणूसपण, माणसांतील पक्ष्यांसारखे भरारणारे मन एवढ्या बेमालूमपणे टिपते की परिणामतः ती कथा केव्हा संपूच नये असे वाटते. हे त्यांच्या कथेचे प्रभावी असे वैशिष्ट्य आहे. 

‘रानभूल' मधील भाषा कुठेही अवघड होत नाही. तिच्यातील सहजता हेच तिचे सत्त्व आहे. ती सहजतेची अभिव्यक्ती स्वांतसुखाय अशी आहे. परंतु त्यात जीवनाचे हजार तळ ढवळून काढणारे अनुभव ओतले असते तर कामतांची कथा प्रत्ययकारी झाली असती. रानभूलच्या लेखिका गोव्याच्या. गोवा म्हणजे परिपूर्ण सृष्टीसौंदर्याने नटलेला काव्यमय भूप्रदेश. नव्याच्या नवलाईने नटलेले सुंदर असे हिरवाईचे लेणेच. तेथील माणसे शब्दांचे मळे फुलविणार नाहीत असे अपवादात्मकच. लेखिका सुमेधा कामत तर संवेदनशील आणि कविदृष्टीच्या, त्यांच्या लेखणीतून शब्दसुरांचे शिल्प प्रकटणे स्वाभाविकच आहे. ह्या निसर्गाच्या त्या अविभाज्य घटक आहेत. माणूस हा निसर्गाचा अविभाज्य आणि सजग-सजीव असा घटक, ही तशी मूलभूत आदिम जाणीव. त्यामुळेच काम आपली सारी अभिव्यक्ती, जिण्या-जगण्याची सारी दृष्टी, भावना निसर्गाच्या माध्यमातूनच व्यक्त करतात. 

कवि रवींद्रनाथ टागोरांच्या म्हणण्यानुसार, 'अ‍ॅन आर्टिस्ट इज दी लहर ऑफ नेचर, देअरफोर ही इज हर स्लेव्ह अँड हर मास्टर' रवींद्रनाथांचे हे मत कामतांच्या कथा-व्यथांच्या एकूण अभिव्यक्तीशी तंतोतंत मिळते-जुळते आहे. आजच्या सर्वांगीण अशा गुंगागुंतीच्या वास्तवात, कठीण काळात आणि रखरखीत रुक्ष व्यवहारात तरल भावभावनांच्या हिरवाईने नटलेसे रानभूलसारखे साहित्य वाळवंटातील सुखविणाच्या हिरवळीसारखे आहे रानभूलमधील एक एक ललित हे एक एक कथा बीज फुलविणारे ललित आहे. ते केवळ ललित नाही आणि केवळ कथाही नाही. केवळ ललित फार तर अंतरंगात तरंगांचा फुलोरा निर्माण करील. परंतु त्याला भावस्पर्शी कथाबीजाचा स्पर्श झाल्यास ते मनात कायमचे सुगंधासारखे दरवळत राहील. असे कथाबीज आणि त्याची आशयाभिव्यक्ती मानसिक आणि सामाजिक उन्नयन करणारी ठरेल. ही अशी दृष्टी सुमेधा कामतांच्या ललित कथांमध्ये जाणवते. 

कवीच्या कोमल, संवदेशनशील भावनेने, त्या कामधून एक एक विषयाचा पदर उलगडून दाखवितात. त्या अनुषंगाने जीवनातील परिवर्तनासारखे सत्यही त्या मांडून जातात. निसर्ग तसे एक आदिम अनंत असे सत्य. सर्वश्रेष्ठ बदलाचे परिवर्तनाचे परिमाण. त्याच्याकडे, त्याच्या विविध घटकांकडे डोळसपणे पाहिले की त्यांच्यातील स्वयंभू सौंदर्यपूर्ण काव्याचे झरे वाहू लागतात. त्यातील सुप्त कथाबीजांचे महावृक्ष होतात. बोधीवृक्ष होतात. शाश्वत अशा परिवर्तनाचे, सिद्धांताचे सत्य पुन्हापुन्हा प्रकटते, रुजणे बहरणे-फुलणे आणि विरून जाणे, फिरून पुन्हा जगण्याच्या प्रगाढ आसक्तीने, नवनव्याने फुलण्या लहरण्याची, प्राणी-पाखरांची, वृक्ष वेलींची, पाना-फुलांची न कोमेजणारी उमेद पाहिली की माणसाला निसर्ग केवढा तरी जगण्या-जिण्याचा आधार आहे, हे सत्य उमगते. सर्वव्यापी निसर्गाच्या नव्याच्या नव्हाळ नवलाईने माणसांचे सम्यक जीवनच कसे मोहरून जाते. झळाळून जाते! 

रानभूलमधील काही कथांतून असे जीवन जगण्याच्या जाणिवेचा, चैतन्याचा जीवनरस अनुभवण्यास मिळतो. एकूणच प्राणी-पाखरांचे अन माणसाचे निसर्गाशी अतूट नाते आहे. त्यांचे जीवनाचे व्यवहारही परस्परसापेक्ष असे आहेत. संपूर्ण वसुंधरेचे संवर्धन होऊन जगा आणि जगू द्या हे सजीवांच्या जगण्याचे मूलतत्त्व रानभूलमधील कथांचा मुख्य आशय आहे. रानभूलमधील कथा नवलाईने साकार होतात. सोयरी वनचरे, विलापिका, रानभूल या कथा वाचून पुन्हा प्रत्ययाचा आनंद मिळतो तसेच दुःखही सजल होते. छोट्या छोट्या ‘चान्या' खारी एवढ्या वाटणाऱ्या कथा मोठ्या एवढ्या रूप धारण करतात. 

मंगला म्हशीच्या रूप स्वरूपाचे, गुण अवगुणांचे, आनंद-विनोदाचे वर्णन येते. जणू काही सुखात्मिका आणि शोकांतिका सजीवांच्या जीवनाचा अविभाज्य अपरिहार्य भाग होता, असे वाटायला लागते. प्राणी-पाखरांचे साग्रसंगीत जीवन साकारू लागते. त्यांचे प्रणयराधन, नर-मादीचे नाजूक साजूक रुसवे फुगवे, त्यातील नजाकत, त्यानंतरचे राग अनुराग, मनोमीलन आणि नंतरचे प्रत्यक्ष मिलन, त्यानंतरचे सृजन, माया ममता... सचित्र-सजीव आलेख आपल्या डोळ्यासमोर साकार होतो. इथे प्राणी-पाखरांच्या प्रेमाचे, ममतेचे नाट्य आहे तसेच कर कठोर व्यवहारांचेदेखील नाट्य आहे. 'गुटूरगुम’ मधील कबुतराच्या नर-मादीचे पत्थरदिल व्यवहार जसे आहेत तसेच ‘किली किली' मध्ये कोकीळ व कोकिळेचे नाजूक अलवार प्रेमही आहे. 

प्राणी-पाखरांच्या जगण्याचे, प्रेमाचे, ममतेचे, अलवार मायेचे भावपूर्ण स्निग्ध नाट्य त्यात आहे. रानभूलमधील कथा व्यक्तीऐवजी प्राणी पाखरांच्या कथा होतात. त्यांच्याभोवतीच कथानकाची गुंफण झालेली आहे. ही प्राणी- पाखरेच सजीव-सजग पात्रासारखी सचित्र होतात. प्राणी-पाखरांच्या कथा-व्यथा वेदना संवेदनांनी आशयघन होऊन ओथंबून जातात, आणि मग ती पात्रे अंतरंगात रेंगाळायला लागतात. मनपटलावर साकार होऊन दृग्गोचर होतात. मंगला म्हैस, राजा हरीण, चान्या खारी, ही पात्रे अतिशय ठसठशीत आहेत. कुत्रा, मांजर, काटांदारे, बिबळया, पोपट, चिमणी, लांडोर-मोर, कावळा कोकीळ, कबुतर: नियोणी, जांभूळ, आम्रफळ, केळी, वडफळे, चिंच, आणि निरफणस, शाल्मली, सावर, पेल्टोफोरम, उकशी, अशी प्राणी-पाखरांची, फुले- फळांची, झाडाझुडपांची आलेली वर्णने कथानकाला रसरशीत करतात, आणि भावुक व काव्यात्मक परिणाम साधतात. 

'जीवोः जीवस्य जीवनम्' हा प्राणिमात्राच्या सजीव जगातील जगण्याचा नियम डार्विनच्या सिद्धांतासारखा ग्राह्य मानावाच लागतो. 'माती असशी, मातीस मिळशी' हे मंगलाविषयीचे प्रखर सत्य हे वेदनामय शाश्वत सत्य जरी असले तरी जन्म मरणाच्या दरम्यानचे परिवर्तनीय जीवन सुखकारक असते. तेच माणसाचे, प्राणी- पाखरांचे, वृक्ष-वेलींचे खरे जीवन असते. त्यातील सजग सत्यच माणसाला जगण्याविषयीचा आशावाद देते रानभूलमधील कथांची सुरुवात काव्याचे लेणे लेऊन अवतरते तर शेवट मनाला चटका लावून जातात. जसे पहाटे पाच वाजता उठून मी पाहिले, तर त्याची धडपड कायमची शांत झालेली! मान एकाच बाजूला कलंडलेली! त्याची लांब, गुलाबी जीभ गर्द जांभळी होऊन तोंडातून बाहेर लोंबत होती. 

त्याचे तलम सोनेरी अंग काळेटिकर पडलेले! अंगावर ठिकठिकाणी गोठलेल्या रक्ताचे ओहोळ! माझ्या मनाचा एक जडशील दगड... उसनं अवसान आणून त्याच्याकडं मी डोळे भरून पाह्यलं. त्याच्या उघड्या, विशाल, निळ्यानिळ्या डोळ्यांत अजूनही एक स्वप्नं तरळणारं... गर्द हिरव्या रानात बागडण्याचं....' (सोयरी वनचरे) “काळोखाची दाट छाया सरकन आली आणि सावरीसकट तांबटाच्या परिवाराला पोटाशी घेऊन गुडूप झोपी गेली." (तांबटाचा परिवार). या मुक्त वैभवाची त्याला भूल पडलीये! चा अफाट पसरलेल्या रानानं त्याला मुग्ध केलंय. या रानभुलीनं त्याला भुरळ घातलीये,.. आणि तो मला विसरुन गेलाय... कायमचा.. वियोगाच्या दुःखाचे दोन अश्रू तेवढे माझ्यासाठी ठेवून... तो दूर गेलाय.." (रानभूल). वाचता वाचता कथा लहरते-मोहरते आणि शेवटी मनाच्या कडा केव्हा द्रवून जातात कळत नाही. 

अश्रूभरल्या नेत्रातून एक विलापिका बरसू लागते. 'एक मारेकरी गेला. एक घाव घातला. पिलू कोसळले. करुण चिव चिव, दुसरा निष्टूर घाव. आक्रंदन, तिसरा, चीया... तीव्र किंकाळ्यांसारखे विलाप... अनेक कावळे झेपावले, भुरी, कवरी, नाजूक, पिसं इतस्ततः भिरभिरू लागली. आकाशातून उडू लागली. आक्रंदन अजून ऐकूच येत होतं. एखाद्या विवरातून आल्यासारखा येणारा केविलवाणा आवाज हळूहळू मंद होत गेला..." (विलापिका). प्राणी-पाखरांच्या, वृक्ष-वेलींच्या आणि एकूणच सृष्टीच्या आकलनाने आणि सौंदर्यपूर्ण अभिव्यक्तीनेयुक्त अशा प्रा. कामतांच्या ललित कथा मायमराठीला फुलोरा प्राप्त करून देतील.

रानफूल
लेखिका : सुमेधा कामत
इंद्रायणी साहित्य, पुणे.

Tags: ललित कथा  डार्विन निसर्ग गोवा रवींद्रनाथ टागोर सुमेधा कामत अशोक गांगुर्डे Fine Story Darvin Nature Goa Ravindranath Tagor Sumedha Kamat Ashok Gangurde weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके