डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

चार्ल्स चॅप्लिन : एक पुतळा-पुराण

50 वर्षांहून अधिक काळ मराठी रंगभूमीवर तळपणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त त्यांना चार्ल्स चॅप्लिन यांचा पुतळा भेट द्यावा, असं एकाएकी मनात आलं आणि हा संकल्प पुरा झाला. त्याची ही कहाणी.

खरं तर या कहाणीला सुरुवात करायची झाली तर ती शिरीष कणेकर यांच्यापासून करावी लागेल. कणेकर हे 'सदर'हू गृहस्थ आहेत. राजेंद्र बर्वे जसे एका वर्तमानपत्रातलं सदर बंद केलं की लगेच दुसऱ्या वर्तमानपत्रात लागलीच दुसरं सदर सुरू करतात. तसंच कणेकरांचंही आहे. ही मंडळी एवढं 'दिसामाजि' कसं लिहू शकतात कोण जाणे! त्यातून तेच तेच लिहिण्याची किमया त्यांनी हस्तगत केलेली! कणेकरांची स्मरणशक्ती विलक्षण आहे. त्यांना जुन्या नव्या घटना तंतोतंत आठवत असतात. त्यांचे हातखंडा विषय म्हणजे क्रिकेट व चित्रपट. कणेकर यांचे लागेबांधे सर्वच वर्तमानपत्रांत असल्याने त्यांचं सर्वत्र नेहमीच कौतुकच कौतुक छापून येतं. कणेकरांची एक लेखक म्हणून काही वाढच झाली नाही. अनेक वर्षांपूर्वी ते जसं लिहीत तसं आजही लिहीत आहेत. त्यांच्या लिखाणात पांचटपणा असतो, कमरेखालचं लिहिण्याकडे त्यांचा कल असतो. त्यांच्या लिखाणाचं यथार्थ परीक्षण कोणा समीक्षकानं केल्याचं आढळायचं नाही. परंतु सुमारे दोन-तीन वर्षांपूर्वी लोकसत्तेच्या रविवार पुरवणीत त्यांच्या 'गोतावळा' पुस्तकाचं चांगलंच परखड समीक्षण छापून आल्याचं आठवत होतं. तो लेख मला फार आवडला होता. परंतु लेखाचं कात्रण काढून ठेवण्याची शिस्त माझ्यात नसल्यानं ते कात्रण मी काही ठेवलं नव्हतं. 

एकदा काही लिखाणाच्या निमित्तानं त्या परीक्षणाची याद आली. ते कोणी लिहिलं होतं हे पण मला धड आठवत नव्हतं. मग मी लोकसत्तेमध्ये रविवार अंकातील परीक्षण विभाग सांभाळणार्या श्रीमती अपर्णा पाडगावकर यांना फोन केला त्यांनी ते परीक्षण कोणा डॉ. विजया टिळक यांनी लिहिल्याचं सांगितलं. त्यांच्याकडून टिळक यांचा फोन नंबरही मिळविला. मी त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. व त्या लेखाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. त्या चकितच झाल्या, आपल्या एका जुन्या लेखाचं एवढ्या विलंबानं कोणी अभिनंदन करील असं त्यांना वाटलं नव्हतं. मी त्या परीक्षणाची झेरॉक्स प्रत त्यांच्याकडून मागवून घेतली. त्या परीक्षणात डॉ. विजया टिळक यांनी शेवटचा परिच्छेद पुढीलप्रमाणे लिहिला होता, 'माझं नाव एकबोटे, असं एक बोट समोर धरून म्हणणाऱ्या फुलन एकबोटेचा हा विनोद कणेकरांना आवडला होता. आठवीत असलेच विनोद आवडतात, काही माणसं विनोदाच्या बाबतीत आठवीतच राहतात तो भाग वेगळा!' असं त्यावरचं भाष्य वाचून मात्र वाचक खरोखरच बुचकळ्यात पडतो. कणेकरांची आजची इयत्ता कोणती? तसंच वाचकांची स्वतःची इयत्ता कोणती? हे गांभीर्यानं शोधणं आता क्रमप्राप्तच आहे. तोपर्यंत मात्र 'जो जे वांच्छील तो ते लिहो, जो जे वांच्छील तो ते वाचो आणि वाचो' याहून अधिक काय म्हणणार? कणेकरांना त्यांची इयत्ता इतक्या मार्मिकपणे कोणी दाखवून दिली नव्हती. तेव्हा डॉ. विजया टिळक यांची ओळख झाली ती अशी कणेकरांमुळे. मला शास्त्रीय संगीताची फार आवड. परंतु त्यातली तांत्रिक माहिती शून्य. ओ की ठो कळत नाही. एखाद्या आवडत्या गायकाची कॅसेट लावायची आणि लिखाणाला बसायचं, हा माझा नेहमीचा परिपाठ.

डॉ. टिळक यांच्याशी फोनवर बोलत असताना पार्श्वभूमीला कॅसेट चालू असायचीच. त्या फोनवरच सूर ऐकून गायक व राग अचूक ओळखत. कारण डॉ.टिळक स्वत: गायिका, संगीताचे वर्ग चालविणाऱ्या, त्यांनी पीएच.डी. केली ती पण संगीत नाटकांवर! आता आमच्या फोनवरील संभाषणात संगीत हा विषय अपरिहार्यपणे येऊ लागला. माझ्या आवडत्या गायिकांत मालिनी राजूरकर आहेत, हे त्यांना कळलं. डॉ. टिळक यांचे वास्तव्य ठाणे येथे असलं तरी त्या मूळच्या पेणच्या. एकदा त्या म्हणाल्या, 'पेणला मालिनी राजूरकर यांची मैफल आहे. मी गाडी करून जाणार आहे. तुम्हांला यायचं आहे का? मालिनीबाईंच्या गायनाचा मी भोक्ता असलो, तरी त्यांची एकही मैफल प्रत्यक्ष ऐकण्याचा कधीही योग आला नव्हता. त्यामुळे मी तात्काळ होकार दिला. पक्षाघाताच्या विकारामुळं माझ्या हालचालींवर बंधनं असली तरीही मी पेणला जायचं ठरवलं. डॉ. विजया टिळक, त्यांची मैत्रीण व शिष्या कवयित्री नीलिमा पालवणकर आणि मी असं आमचं त्रिकूट पेणला गेलं. तेथील एका मंदिरात मालिनीबाईचं गाणं होतं. ते रात्री नऊपासून पहाटे अडीचपर्यंत चाललं. त्यांच्या आवाजात अवीट माधुर्य आहे. त्या दिवशीची त्यांची मैफल अद्भुत, अपूर्व अशीच होती. त्यांच्या स्वरांना स्वर्गीय लावण्य प्राप्त झालं होतं. जणू त्या एकामागून एक अमृताचा मधुघटच रिता करीत होत्या. तो जणू मधाचाच महोत्सव होता. देहभान हरपून गेलं. 'देता किती घेशिल दो कर्णांनी' अशी अवस्था झाली. गाणं नुसतं कानात शिरत नव्हतं तर अंतःकरणात पाझरत होतं, धमन्यांतून वाहत होतं. असा अभूतपूर्व अनुभव मी पूर्वी कधी ना ऐकिला; ना अनुभवला. या मैफिलीच्या निमित्ताने मालिनीताईंशी ओळख झाली. त्या चांगल्याच "चहांबाज' आहेत, हे कळलं; कारण मध्यंतरात कॉफीपानाच्या वेळी त्यांनी माझ्यासारखाच चहा मागवून घेतला.

या मैफलीच्या संयोजकांत एक उत्साही रसिक विनायक गोखले आणि पेणचे प्रसिद्ध मूर्तिकार आनंद देवधर हे होते. त्यांचे वडील राजाभाऊ देवधर यांचा लौकिक अफाट. पेण म्हणजे गणपतीच्या मूर्तींचे माहेरघर. राजाभाऊंची एक प्रख्यात मूर्तिकार म्हणून सर्वदूर कीर्ती पसरलेली होती. त्यांच्या नावाचा एक चौकच पेणमध्ये आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे चिरंजीव आनंद देवधर यांनी वडिलांची परंपरा पुढे चालवली आहे. मैफलीला जाण्यापूर्वीच आनंद देवधर यांनी त्यांच्या स्टुडिओत आम्हांला नेलं. त्यात गणेशमूर्तीखेरीज छत्रपती शिवाजी महाराज, कुसुमाग्रज, देवी सरस्वती यांचे केलेले पुतळे होते. ते पहात असताना मला आकस्मिकपणे एक कल्पना सुचली. नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांचा 75वा वाढदिवस दोन-तीन महिन्यांत साजरा होणार होता. डॉक्टर चार्ली-चॅप्लिनचे चाहते. त्यांच्या घरी चॅप्लिनचं एक सुरेख पोस्टर होतं. परंतु मुंबईहून पुण्याला वास्तव्य हलविताना ते पोस्टर गायब झालं होतं. तेव्हा त्यांना वाढदिवसानिमित्त चॅप्लिनचा एखादा पुतळाच का भेट देऊ नये, असा विचार मनात आला. 

मी ही कल्पना आनंद देवधरांकडे बोलून दाखविली; व तुम्ही चॅप्लिनचा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा पुतळा बनवाल काय, अशी विचारणा केली. त्यांनी होकार दिला. पण गंमत म्हणजे त्यांनी चार्ली-चॅप्लिनचा एकही चित्रपट पाहिलेला नव्हता. पुतळा बनविण्यासाठी त्यांना चॅप्लिनची काही छायाचित्रं द्यायला हवी होती. तेव्हा इंटरनेटच्या साहाय्यानं चॅप्लिनला 'भूतलावर' आणलं. परंतु ती छायाचित्रं पुतळा करायच्या दृष्टीनं पुरेशी नव्हती. आता माझ्या डोक्यात चॅप्लिनशिवाय दुसरा कोठलाही विचार घोळत नव्हता. मग चॅप्लिनवरच्या पुस्तकांचा शोध सुरू केला. माझ्याजवळ चॅप्लिनचं आत्मचरित्र होतं. परंतु ते कोणीतरी लंपास केलेलं होतं. तेव्हा हॉलिवूडच्या चित्रपटांचा व कलाकारांचा विशेष अभ्यास असलेले व्यासंगी पत्रकार, स्नेही यशवंत रांजणकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याकडे चॅप्लिनवर एकही पुस्तक नव्हतं. पण रांजणकर यांची एक खासियत आहे. एखादं पुस्तक कोणाकडे आहे, किंवा कोणाकडे मिळू शकेल, याची अचूक माहिती त्यांना असते. काही महिन्यांपूर्वी मार्लिन मन्रो या नामवंत नटीबद्दलचं साहित्य, पुस्तकं मी गोळा करीत होतो. तेव्हा आपल्यापाशी पुस्तक नाही, पण 'अंतर्नाद'चे संपादक व कथाकार भानू काळे यांच्याकडे एक मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली होती. (व ती खरी होती!) आता चॅप्लिनवरचे पुस्तक नामवंत अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्याकडे मिळेल. अशी माहिती त्यांनी दिली, प्रभावळकरांकडे केवळ छायाचित्रंच असलेलं चॅप्लिनवरचं एक अप्रतिम पुस्तक होतं. पुतळा करण्याच्या दृष्टीनं ते त्यांनी तत्परतेनं मला दिलं. मी ते आनंद देवधर यांना पाठवून दिलं. आणि 'आता कामाला लागा' अशी विनंती केली. 

त्या पुस्तकातील छायाचित्रांवरून आनंद देवधर पुतळा बनविण्याच्या कामाला लागले. अर्धवट काम झाल्यावर एकदा येऊन पुतळा पाहून जा, असा निरोप त्यांनी पाठवला. एकदा माझे स्नेही श्रीकांत लागू, अनंत व पुष्पा भावे असे आम्ही पुण्याला जात असताना वाटेत पेणला थांबलो आणि देवधरांकडे गेलो. सोबत प्रख्यात व्यंगचित्रकार वसंत सरवटे हेदेखील होते. विशेष सल्लागार म्हणून त्यांचं मत मला अजमावायचं होतं. तो अर्धवट झालेला पुतळा पाहून आमचं कुणाचंही समाधान झालं नाही. चॅप्लिनच्या व्यक्तिमत्त्वात एक प्रकारचा मिश्किलपणा आहे. डोक्यावर हॅट आणि अंगात ढगळ विजार, हातात काठी अशा वेषातील चॅप्लिनची उभी राहण्याची एक विशिष्ट ढब आहे; लकब आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातलं हे वैशिष्ट्य अचूक पकडणं हे महाकठीण काम होतं. आनंद देवधरांना हे काम जमेल की नाही अशी शंका मनात तरळून गेली. वसंत सरवटे यांनी देवधरांना काही मौलिक सूचना केल्या. सरवटे म्हणजे अर्कसम्राट. त्यांची अर्कचित्रं (ठणठणपाळ, गो.नी. दांडेकर, ग.का. रायकर ही त्यांची अर्कचित्र) मराठी साहित्यात अमरत्व प्राप्त झालेली आहेत. तेव्हा त्यांच्या सूचना अत्यंत मौलिक होत्या. काहीशा शंकित मनोवस्थेतच आम्ही परतलो. 

दिवस जात होते. डॉक्टरांचा वाढदिवस जवळ येत चालला होता. पुढं पुतळा पूर्ण होत आला. तेव्हा सरवटे यांना तो दाखविण्यासाठी पेणहून चॅप्लिनचा पुतळा मुंबईला घेऊन आनंद देवधर आले. आता पुतळा चांगलाच झाला होता. पण त्याच्या डोळ्यांतील मिश्किल भाव आणि त्याची उभी राहण्याची विविष्ट ढब पूर्णतः पुतळ्यात उतरली नव्हती. सरवटे यांनी पुन्हा त्यांना काही सूचना केल्या. दरम्यान या कामाचा मोबदला काय द्यायचा याबद्दल माझं आनंद देवधरांशी काहीच बोलणं झालं नव्हतं. खरं तर मी आधीच हे ठरवायला हवं होतं. तोवर आनंद देवधर यांच्याशी चांगला स्नेह जुळला होता. ते कविता करतात. एखादी नवीन कविता ते फोनवरती ऐकवीत, पण पुतळ्याच्या मोबदल्याबद्दल आम्हा दोघांत विषयच निघाला नाही. वसंत सरवटे यांनी मात्र एकदा आनंद देवधरांना सहज विचारलं की, असा ऑर्डरनुसार पुतळा तयार करण्याचे तुमचे चार्जेस काय असतात? अशी चौकशी केली. त्यावर देवधर उत्तरले, 'वीस हजार', पुतळा फायनल करण्यापूर्वी ऑर्डर देणार्याला तो मी दाखवितो. व त्याला पसंत नसेल तर जेवढा खर्च झाला असेल तेवढा घेऊन ऑर्डर रद्द झाल्याचे समजतो. 

सरवटे यांनी हे संभाषण मला सांगितलं. तेव्हा मी उडालोच! शिल्पकारांच्या वा मूर्तीकरांच्या मानधनाची कल्पना नव्हती. किंबहुना मी पहिल्यांदाच असा पुतळा बनवून घेत होतो. वीस हजार रुपये देण्याची माझी ऐपत नव्हती. मी 'महाराष्ट्र टाइम्स' मधून सेवानिवृत्त झालो होतो. उत्पन्नाचा मुख्य दिंडी दरवाजाच बंद झाला होता. कुठून आपण पुतळा बनवून घेण्याच्या फंदात पडलो, असं मला वाटू लागलं. मी तात्काळ आनंद देवधर यांना पुतळ्याचं काम थांबवा, मला त्याचा एवढा प्रचंड मोबदला देणं परवडणार नाही, असं कळवलं. त्यावर देवधर यांनी, “ही माझी नेहमीची फी असली तरी ती तुम्हांला लागू नाही. आणि आता तुम्ही तर माझे मित्र झाला आहात, तेव्हा तुम्ही द्याल ते मानधन मी आनंदानं स्वीकारीन. पण पुतळा पुरा करण्याचा ध्यास मी घेतला आहे. ही माझी अग्निपरीक्षाच आहे.

पुतळा मी पुरा करणारच-" असे उत्तर दिले. त्याप्रमाणे तो परिश्रमपूर्वक पुरा केला आणि पुतळा त्यांनी स्वखर्चानं मला मुंबईला पोहोचवून दिला. पुढे माझ्या कुवतीनुसार जो मोबदला देणं शक्य होतं तो मी दिला आणि देवधरांनी तो स्वीकारला, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होईल. डॉ. श्रीराम लागूंच्या वाढदिवसाचा अनौपचारिक सोहळा पुण्यात आयोजिलेला होता. डॉक्टर लागूदेखील मालिनी राजूरकर यांचे कट्टर चाहते. रोज संध्याकाळी मालिनीबाईंची कॅसेट लावून येरझाऱ्या घालणं हा त्यांचा नित्यक्रम. वाढदिवसाच्या निमित्तानं मालिनी राजूरकर यांचीच मैफल आयोजिलेली होती. हा एक विलक्षण योगायोगच होता. राजूरकर यांची मैफल ऐकण्याच्या निमित्तानं मी पेणला गेलो होतो. आणि त्यातूनच आनंद देवधर यांचा परिचय होऊन या पुतळापुराणाला सुरुवात झाली होती. तेव्हा मालिनीबाईंच्याच हस्ते तो पुतळा डॉ. लागू यांना वाढदिवस समारंभात द्यावा असं मनात आलं. परंतु त्या अनौपचारिक सोहळ्यात डॉक्टर काही भेटी स्वीकारणार नाहीत. तेव्हा त्यावेळी पुतळा वगैरे देता येणार नाही, असं संयोजकांनी निक्षून बजावलं होतं. मी काहीसा हिरमुसलो. पुतळा तयार करून घेण्याची कल्पना प्रत्यक्षात साकार झाली असली तरी मालिनीताईंच्या हस्ते तो डॉक्टरांना सुपूर्द करण्याची मनीषा अपुरीच राहणार असं मला वाटू लागलं. पण बहुधा माझ्या राशीत त्यावेळी उच्च ग्रह असावेत. माझी ही मनीषा पुरी झाली पण वेगळ्याच प्रकारे. ज्या दिवशी वाढदिवस सोहळा होता त्या दिवशी दुपारी काही निमंत्रितांसाठी डॉक्टरांच्या घरी भोजन आयोजिलेलं होतं. त्याला मालिनी राजूरकर यांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं. तेव्हा त्यावेळी त्यांच्याच हस्ते चॅप्लिनचा पुतळा डॉक्टरांना देता आला आणि माझी मनीषा पुरी झाली.

खरं तर या 'ऑपरेशन चॅप्लिन'चं श्रेय शिरीष कणेकर यांना द्यायला हवं. कारण त्यांच्या 'गोतावळा' पुस्तकामुळे डॉ. विजया टिळक यांचा परिचय झाला. त्यामुळंच पेणला मालिनीताई यांची मैफल ऐकण्याचा योग आला. त्यामुळं मूर्तिकार आनंद देवधर यांची ओळख झाली. ती झाली नसती तर पुतळ्याची कल्पना सुचलीच नसती. अनेक अडचणींचे टप्पे ओलांडून ती कल्पना साकार झाली. आनंद देवधरांनी मलाही एक पुतळा दिला व तो माझ्या घरच्या दिवाणखान्याचं मुख्य आकर्षण केंद्र बनलं आहे. त्यांनी वसंत सरवटे, दिलीप प्रभावळकर यांनाही पुतळे दिले. व आम्हा चॅप्लिन चाहत्यांचं एक कुटुंबच बनलं. पुढे देवधर यांनी पुण्याच्या 'फिल्म अर्काइव्हज'ला पुतळा भेट दिला. एकूण सारी योगायोगाचीच कहाणी. पुतळा बोलत नसतो परंतु त्याच्या निर्मितीमागची ही कहाणी किती बोलकी आहे!

Tags: Mumbai Pune Malini Rajurkar Ashok Jain Shirish Kanekar Loksatta Vijaya Tilak Pen Anand Deodhar Dr. Shriram Lagu Charles Chaplin मुंबई पुणे मालिनी राजूरकर अशोक जैन शिरीष काणेकर लोकसत्ता विजया टिळक पेण आनंद देवधर डॉ. श्रीराम लागू चार्ल्स चॅप्लिन weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके