डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कशानं काय निंघत व्हतं त्या पुड्यात? जिल्लंबी? का भजे? नही! फटाके निंघत व्हते. लुंगी फटाक्यांच्ह्या लळा, टिकल्यांच्ह्या डब्या, सुयसुंद्य्रा आन्‌ सापाच्या गोया आसं राहात व्हतं तिच्यात. एवढ्या सगळ्या फटाक्यांच्हा एक पुडा बांधून आणेल राहात व्हता बापानं. सोडल्यावर तो बऱ्याकरता बरं वाटत व्हतं आम्हाले. दिवाईच्या तेवढ्या खरदीवर समाधान मानून घेत व्हतो. दुधाची तहान ताकावर भागवून घेत व्हतो.

दिवाईची चाहूल लागली की आम्ही सावध हून जात व्हतो. मायबापाच्या हालचालींकडी ध्यान द्याले लागून जात व्हतो. त्ये कशानं काय करता काय नही... आमच्ह्यासाठी नव्वे कापडं काव्हा घेता काव्हा नही... आम्हाले मामाच्या घरी काव्हा नेता काव्हा नही... गोडधोड खायाचं काव्हा आन्ता काव्हा नही... दिवाईची रोषनाई काव्हा येते काव्हा नही... अशानं आसं तशानं तसं... कशानं काय व्हतं काय नही... ह्या सम्द्या गोष्टींच्ही आशा लागून जात व्हती आम्हाले. तेवढ्यासाठी मायबापाच्या हालचालींकडी पाहत व्हतो. त्ये काय करता काय नि येच्याकडी ध्यान ठिवत व्हतो. आम्ही त्येंच्याकडी आशामारी पाहात व्हतो आन्‌ त्ये आमच्ह्याकडी ध्यान देत नव्हते. कशानं काही इच्यारपूस करत नव्हते. कशानं काय करत व्हते मंग त्ये?

जशी जशी दिवाई जोय येत व्हती तसतशे जास्तच कामाले लागून जात व्हते... शेतारानात खपत व्हते... मोलमजुरी करत व्हते... सुगी कमावत व्हते...

एवढं तरी बरं राहात व्हतं नवरात्रातल्या आरत्यांल्हे मायनं घरदार सवारून घेलं राहात व्हतं. नही तं पुढी तिचं तेवढं बी रिकांपन राहात नव्हतं. पुढी चालून तिचं कशातच चित्त लागत नव्हतं. आमच्ह्या कडी ना घरादाराकडी लक्ष राहात नव्हतं. तिच्यामांघी कामस तेवढं राहात व्हतं. रोज ऊठली की शेतारानात खपत व्हती.

सक्काळी तिची कामाले जायाची घाई राहात व्हती. संद्याकायी झापड पडल्याले घरी येत व्हती. ताव्हाचे त्येंच्हे थकले भागलेले चेहरे पाहून कशानं काही बोलू पावत नव्हतो आम्ही.

मायबापाले बी समजत व्हतं आमच्ह्या मनातलं. पण त्ये बी कशानं काही करू शकत नव्हते. नाईलाज व्हता राहात त्येंच्हा. नाईलाज अशासाठी की जोय पयसा राहात नव्हता. तुम्हाले तं मायथी हे की, सम्दे सोंगं करता येता पण पयशाचं सोंग करता येत नही. महे मायबाप बी तठी हारून जात व्हते.

तसं काम हातातले व्हतं राहात त्येंच्ह्या; पण काम त्ये बिनापयशाचं राहात व्हतं. कसं म्हना? जवारी काप्याचं, खुळणी, मळणी आसं काम राहात व्हतं. कामाच्या मोबदल्यात ह्या रोक पयसा नव्हता भेटत. जवारीच्या बदल्यात जवारी भेटत व्हती. मजूरांल्हे बी त्ये पायझे राहात व्हती. ह्या दोन दिसातच त्येंच्ही सालभरची सुगी कमावल्या जात व्हती.

म्हणून बी मजूर तुटून पडत व्हते. रात-दिवस, सन-वार पाहात नव्हते. भलाई लेकरांच्हे किलवाने तोंडं घेत व्हते त्ये पाहून. अशानं आशी लेकरांल्हे बी आन्‌ मायबापांल्हे बी हून जात व्हती सवय.

आमच्ह्या घरात येच्यापेकशा न्यारी परिस्थिती नव्हती राहात. जसजशी दिवाई जोय येत व्हती तसतशी आमच्ही चेहरेपट्टी उतरून जात व्हती. समजत सगळं व्हतं पण बोलू पावता येत नव्हतं. काहून की मायबापाचे हाल दिसत व्हते आम्हाले. त्येंच्ह्या काबाळ कष्टापुढी दिवाईची रोषनाई फिक्की वाट्याले लागून जात व्हती आम्हाले. अशानं आसं राहात व्हतं!

गप्प राहात व्हतो आम्ही. कशानं काही बोलत नव्हतो. कशानं काही मांघत नव्हतो. परस्थितीच आशी तयार हून जात व्हती. काही काही करता येत नव्हतं आम्हाले. मायबाप मातर त्येंच्हं कर्तव्य करत व्हते. राबत व्हते. राबता राबता शेवटच्या दिशी फटाके आणून देत व्हते. दिवाईच्या आधी जो बजार पडीन, त्या शेवटच्या बजारी हे काम करत व्हता बाप. एक एक बजार पुढी लोटत लोटत शेवटच्या बजाराले जात व्हता. कामाच्या मोबदल्यात मिळालेली काही जवारी इकून हा बजार साधत व्हता बाप.

बाप बजाराले गेल्ह्यावर आशा वाढून जात व्हत्या आमच्ह्या. काय आन्तो न्‌ काय नि बाजारातून, आसं वाट्याले जागून जात व्हतं. त्येची वाट पाहात बसत व्हतो. आम्ही परत्येकझन तोंड वासून बसत व्हतो, खोप्यातल्या चिमणीच्या पिलांवानी.

बाप इन आपल्यासाठी काहीतरी आणिन... पण तो कोन्हासाठी कशानं काही आणत नव्हता. थोडाफार बजार आणत व्हता. कपडेलत्ते आणत नव्हता की गोडधोड मिठाई. आमच्ह्यासाठी कोन्थ्यास चिजा आणत नव्हता. घरखर्चाचा बजार आन्‌ काही चिजवस्तू तेवढ्या आणत व्हता.

आमच्हे आशाभरले चेहरे हिरमुसून जात व्हते जाव्हा माय बजार उभरत व्हती. आमच्ह्यासाठीच्या कोन्थ्यास चिजा बजारात दिसत नव्हत्या. शेवटी एका पुड्यावर आमच्ह्या नजरा खिळत व्हत्या. रद्दीच्या पेपरानं बांधेल राहात व्हता तो पुडा. कशानं काय हाये न्‌ काय नि त्या पुड्यात, आसं वाटत व्हतं. उत्सुकता तानल्या जात व्हती.

कशानं काय निंघत व्हतं त्या पुड्यात? जिल्लंबी? का भजे? नही! फटाके निंघत व्हते. लुंगी फटाक्यांच्ह्या लळा, टिकल्यांच्ह्या डब्या, सुयसुंद्य्रा आन्‌ सापाच्या गोया आसं राहात व्हतं तिच्यात. एवढ्या सगळ्या फटाक्यांच्हा एक पुडा बांधून आणेल राहात व्हता बापानं. सोडल्यावर तो बऱ्याकरता बरं वाटत व्हतं आम्हाले. दिवाईच्या तेवढ्या खरदीवर समाधान मानून घेत व्हतो. दुधाची तहान ताकावर भागवून घेत व्हतो.

दुसरं काय करू शकत व्हतो मंग आम्ही?

ना मायबापाशी भांडन करू शकत व्हतो, ना त्येंच्हा राग धरू शकत व्हतो. कशानं काही करू शकत नव्हतो. आल्या परस्थितीले सामोरी गेल्ह्याशिवाय पर्यायच उरत नव्हता आमच्ह्यापुढी. - कशानं काय करत व्हतो मंग आम्ही?

स्वत:च स्वत:च्या मनाची समजूत घालून घेत व्हतो. बाकीच्या चिजा नही भेटल्या त्येचा राग मानत नव्हतो. आल्या परसंगाले सामोरी जात व्हतो. तेवढ्या फटाक्यात मन भरून जात व्हतं. घेत व्हतो मानून समाधान.

बाप दाह्यापोट्‌ट्यांसारके वाटे करून देत व्हता आम्हाले त्या फटाक्यांच्हे. दोन-दोन चार-चार फटाके येत व्हते आमच्ह्या वाट्यावर. दोन लुंगी फटाक्यांच्ह्या लळा, दोन टिकल्यांच्ह्या डब्या, सुयसुंद्य्रा चारपाच, एकादी सापाच्या गोईची डबी- आसं येत व्हतं एकेकाच्या वाट्यावर. तेवढं आम्हाले लय वाटत व्हतं. मन भरून जात व्हतं.

फटाके आमच्ह्या ताब्यात भेटल्यावर कोन्ही आनंद हून जात व्हता आम्हाले. दिवाईची एक तरी वस्तू भेटल्याचं समाधान वाटत व्हतं. बाकीच्या गोष्टींच्हा इसर पडून जात व्हता आपोआप. ना मिठाईची याद येत व्हती, ना नव्या कपड्यांच्ही. कशानं काही याद येत नव्हती. फाटक्या फटाक्यांच्ह्या नांदी लागून जात व्हतो. अशानं आसं हून जात व्हतं!

कशानं काय करत व्हतो मंग आम्ही?- आपापले फटाके घ्यून घेत व्हतो. फटाके सांभाळून ठिवत व्हतो. नुस्ते सांभाळून नही तं लपाळून ठिवत व्हतो. कोन्हं एखांदी फटाका लांबवू नही आसं वाटत व्हतं. चुकून त्यातला एखादी फटाका फोडत नव्हतो की वाया जावू देत नव्हतो. जिवापाड जपत व्हतो फटाक्यांल्हे. काहून की दिवाईच्या दिशी फोडने राहात व्हते आम्हाले त्ये. दिवाईच्या दिशी आतशबाजी करनी राहात व्हती आम्हाले आमच्ह्या दारी. उजळून टाकनं राहात व्हतं घरदार.

अशानं आसा इच्यार राहात व्हता आमच्हा. तेवढ्यासाठी जिवापाड जपत व्हतो फटाक्यांल्हे. जतोपत  जपून ठिवत व्हतो. एखादी बी फटाका वाया गेल्हा नि पायझे, फूसका निंघाला नि पायझे- आसं वाटत व्हतं. तशी काळजी बी घेत व्हतो. फटाक्यांल्हे उन्हात वाई घालत व्हतो.

फटाक्यांल्हे वाई घाल्याची बी आमच्ही जागा वाटेल राहात व्हती. आपापल्या जागी ताटलीत घालून फटाके वाई घालत व्हतो. चांगले दोन-तीन ऊन दाखवत व्हतो. आमच्ही आमच्ही करत व्हतो आम्ही ही गोष्ट. आपापले फटाके सांभाळून ठिवत व्हतो.

दिवाईच्या दिशी व्हत काय व्हतं, आम्ही सांभाळून ठिवलेले आमच्हे फटाके तशेच राहून जात व्हते. काहून, कशानं काय व्हत व्हतं?- आम्ही दुसऱ्याच नांदात लागून जात व्हतो. कोन्था नांद तो?

आम्ही करत व्हतो आमच्हे फटाके फोड्याची तयारी. तेवढ्यासाठी तं वाई गी घालून ठिवेल राहात व्हते. जतोपत जपून ठिवेल राहात व्हते. पणत्या गिणत्या लावून फटाके फोड्याची तयारी करत व्हतो, त्येच्या आधी गावातली, आमच्ह्या शेजारपाजारची रोषनाई सुरू हून जात व्हती. त्ये फटाके, त्येंच्ही रोषनाई, आतशबाजी कित्तीतरी मोटी, डोये दिपवणारी, कानठळ्या बसवणारी राहात व्हती...

आमच्हे लुंगी फटाके आन्‌ टिकल्यांच्या डब्या कुठीस लागत नव्हत्या त्येंच्ह्यापुढी. किस गली मे गलबला राहात व्हतो आम्ही आन्‌ आमच्हे फटाके. आसं हून जात व्हतं. गावातली रोषनाई आकाश भेदत व्हती. कशानं काय चित लागन्हार व्हतं मंग आम्हच्हं दारी. आमच्हे फटाके ठिकानावरस राहात व्हते. आमच्हे पावलं आपोआप घराच्या भाईर पडत व्हते... कशानं काही करू शकत नव्हतो आम्ही. घरचे तुटपुंजे फटाके फोडू पावत नव्हतो. काही केल्या मनाले आवर घालू शकत नव्हतो. भाईरच्या फटाक्यांच्ही आतशबाजी पाह्यासाठी घराच्या भाईर पडत व्हतो...

घराच्या भाईर, गल्लीत, गावात, आमच्ह्या आजूबाजूले दिवाई म्होट्या थाटामाटात साजरी व्हत व्हती. आकाशकंदिल, दिवे, पणत्या आन्‌ फटाक्यांच्ही आतशबाजी चालत व्हती. एकापेक्षा एक म्होटाले फटाके फोडल्या जात व्हते. दोरखंडापेक्षा बी लांब लळा लावल्या जात व्हत्या फटाक्यांच्ह्या. महाल्क्षी फटाके, सुतळी बाम, आकाश भेदणाऱ्या चिमण्या-राकेट, म्होटम्होटाल्या सुयसुंद्य्रा, कुंड्या आसं सम्दं राहात व्हतं. एकापेक्षा एक थाट राहात व्हता. डोये दिपवणारी रोषनाई राहात व्हती.

कानठळ्या बसवणारे आवाज राहात व्हते. रोषनाई, आवाज आयकून पाहून आम्ही चकित व्हत व्हतो. भूली पडून जात व्हतो. घर इसरून जात व्हतो. घरी कशानं काही ठिकाना राहात नव्हता आमच्ह्या. गाव, गल्ली दुमदुमून जात व्हती. उजळून निंघत व्हतं एक एक घर. गाव अशानं आसं उजळून निंघत व्हतं आन्‌ आमच्हं घर निस्तावलेलं... झाकोळून गेलेलं...

अशानं आशा घरात थामताच येत नव्हतं आम्हाले. थांबतच नव्हतो. तुरूतुरू रस्ता धरत व्हतो भाईरचा... भाईरची रोषनाई आम्हाले खुणावत व्हती, ओढून नेत व्हती... अशानं आशे गावभर बोकायत फिरत व्हतो... गावभर फटाक्यांच्हा कहर उडत व्हता. तो आम्ही आनुभवत व्हतो.

कोन्हाच्या दारी कोण, कित्ती, कोणथे फटाके फोडून राहाला ते पाहात व्हतो... ह्या बाबतीत समद्या गावाची खबर राहात व्हती आम्हाले. गल्लोगल्ली भटकून मजा घेत व्हतो. जसे काही आम्हीस फटाके फोडून राहालो आसा भास करून घेत व्हतो. फटाका फुटला की बोंबलून उठत व्हतो. कुंडीच्या प्रकाशात नाचत व्हतो. हासून बोंबलून उठत व्हतो...

एखादी फटाका फूस गेल्हा की पयतस जावून उचलून घेत व्हतो... अशानं आशी झुंबळ उडत व्हती आमच्ही. एवढ्यावर आम्ही थामत नव्हतो. फूस गेलेले, न फुटलेले, उडालेले, राहून गेलेले फटाके गोळा करत व्हतो... झुंबळ करून, पटकन जावून उचलून घेत व्हतो... सऱ्या गावभर फिरत व्हतो...

अशानं आसं दान गोळा करत... राती उशीरा घरी परतत व्हतो... दोन्ही दोन्ही खिशे फटाक्यांन्हं भरलेले राहात व्हते. मायबापापुढी फटाके उभरत व्हतो... आन्‌ मंग दिवाई साजरी करत व्हतो... फटाके उडवत व्हतो राती उशीरालोंग...

Tags: बाप माय फटाके दिवाळी अशानं असं होतं अशोक कौतिक कोळी Maay Baap Fatake Diwali Ashan Asa Hota Ashok Koutik Koli weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके