डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आयुष्याच्या उजाड माळरानावर...

मी ताईच्या पासी गेलो. बसलो. मला बघून त्या आश्चर्यचकित झाल्या. एकटाच कसा आला. मायबाप, पाहुणे, नवरी कोठं हाय... असे नाना तऱ्हेचे प्रश्न ईचारू लागल्या. आता काय करावं काहीच सुचंना. जरासा वेळ शांत राहिलो. मग घडलेली. समदी हकीकत सांगितली. पुन्हा त्या खोदू खोदू ईचारीत होत्या. आता दोन वाजले असतील. मी बायांना म्हणलं, आता मला काहीबी ईचारू नका. हांडीभर पाणी आन्‌ पुस्तक घेतलं. निघालो. चढ चढता माळ आले, त्या जाळीत शिरलो थंड सावलीत. बसलो वाचत  पुस्तक. पुस्तक इकत आनलं नव्हतं. गावातल्या पोराकडून आणलं होतं. ती भालचंद्र नेमाडे यांची ‘कोसला’ कांदबरी होती. पांडुरंग सांगवीकर जागोजाग मला भेटत होता. पण आज का कोण जाणे मव्हं मन पुस्तकात लागत नव्हतं. सारखी मायबापाची काळजी वाटत होती. पान मुडपून पुस्तक मिटवून ठेवलं. 

वयाच्या सोळाव्या वर्षी जातीरिवाजानुसार यशोदासोबत लग्न झालं. पाच वर्षं संसार केला. यशोदा सोडून गेली. लग्नाचा तमाशा झाला. जगात आपलं आता कोणीच नाही, आपण आत्महत्या केली पाहिजे. जगून काय उपयोग अशी भावना मनात जागृत झाली. स्वत:ला दारूत डुबवून घेतलं आणि अचानक एके दिवशी पुस्तक हातात आलं. मनात जगण्याची नवी उमेद जागी झाली. कामाला लागलो. मायबापाच्या हाताखाली काम करू लागलो. जोडपिपरी ह्या गावात तलावाचं काम सुरू होतं. गावाला लागून टेकड्यांच्या रांगा होत्या, त्या रांगांच्या पायथ्याशी आमची पालं होती. कामाला सुट्टी असली की, वाचनालयातून आणलेलं पुस्तक घेऊन मी टेकड्यांवरच्या झाडीत घुसायचो.

सुरुवातीला एक-दोन डाव झाडाखाली पुस्तक वाचत बसलो. नंतर मात्र मी एका झुडपात मस्त जागा केली. तिथं दाट थंडगार सावली असायची. त्या सावलीत बसून पुस्तक वाचायचो. सोबत हांडीभर पाणीसुद्धा आणायचो. पालवात बांधून भाकरसुद्धा आणयचो.  पुस्तकं वाचून थकलो की थोडा वेळ जाळीतून बाहेर निघायचो, इकडेतिकडे पाय मोकळे करायला. पुन्हा जाऊन जाळीत बसायचो. समोर बघितलं की सिद्धेश्वर धरण दिसायचं. अथांग पाणी. हे पाणी बघून मन भरून यायचं. पुस्तकातील पात्रं मनात गर्दी करायची. आता पुढे काय याची आस लागायची, पुन्हा हावऱ्यावानी पुस्तकं वाचायचो. संध्याकाळ झाली की निघायचो. 

चालत चालत चिमणशा बाबाच्या दर्ग्यावर यायचो. एकटाच बसलेला हा चिमणशा बाबा. दर गुरुवारी येथे लोक बकरे कापायचे. नवसाला पावला म्हणून. मग बाकीचे दिवस इथे कोणीच यायचं नाही. मी मात्र तिथे थोडा वेळ बसून पालावर जायचो. पालावर आलो की सुरू असायचा दारू पिणाऱ्यांचा तमाशा. बाबाभी रोज संध्याकाळी दारू पिऊन वरलोड असायचे. कामाचे समदे पैसे दारूत घालायचे. शब्दाशब्दाला आईची आन्‌ बाबाची चकमक चालायची. बाबा नंग्या नंग्या शिव्या आईला देयाचा. आईभी बाबावर पलटवार करायाची. दोघंबी एकमेकाला ठोकायाचे. मह्यापेक्षा कमी वयाची पोरं, दोन दोन लेकराईची बापं झालेली, लेकराईला कापडं नसली तरी चालतील- तेभी दारू पिऊन वरलोड असायची.

मी बोललो की बाबा मह्यावर सुटायचा, ‘साल्या बायको मुतून गेली, आन्‌ तू बसला हितं केस काढत. जगाकडे बघून वागायला शीक. तुह्यापेक्षा बारकी बारकी पोरं कशा बायका नांदवीतात आन्‌ तू शेट कारभार करीत बसतो. आता पुस्तकंच वाचून दिवा लावणार  हाईस. आबे मव्हं नाव मातीत घातलं. तुला दहावीपतवर शिकवलं आन्‌ समदं वाया गेलं.’  त्याची रातभर बडबड चालायची म्हणून मी बाबाशी बोलणं टाळायचो. आई-बाबाचं महायुद्ध सुरू झालं की मी लांब जायाचो. एखाद्या मोठ्या दगडावर बसायाचो. 

आमच्यात लग्नाला फारच महत्त्व. पोरापोरीचं कमी वयातच लग्न करतात. कामावर गेलो की आई-बाबा मह्या लग्नाची चिंता करायाचे. सून असती तर आजून एक रोजी मिळाली असती. अशोक्याचं लगीन ठोकावं लागंल, पण दुसरं परण्याला लोक पोरगी देयाला धजावत नाहीत. याची जिंदगी वाया जाणार, हा असाच मरणार. लोकाईच्या सुना बघून मन जळते. असं काहीबाही ते बोलायचे. 

त्यांचं बोलणं ऐकून मी घायाळ होयाचो. मलाही लग्न करावं वाटायचं. एखाद्या डाव एखादा पाहुणा आला की पेणाऱ्याची मैफिल बसायाची. खूप गप्पा चालायच्या. त्यात मह्या लग्नाचा विषय हमखास निघायाचा. कवर पोराला असाच ठेवतो. याचं दुसरं लग्न लावून दे- शानेसुरते बाबाला सल्ला देयाचे. तवा बाबा सांगायाचा ‘असंल एखादी पोरगी ध्यानात तर सांगा.’ बाबाला ठेपा लागला की बाबा गळ्यात रुमाल अडकवून तिथं जायाचा. पावणेरावणे यायचे, मला बघितलं की पोराचं वय जास्त हाय म्हणायचे. मह्या लहान भावाचं लगीन झालं पण मव्हं लगीन काही होईचना. आता आता तर ठेपे भी येणे बंद झाले. माय आन्‌ बाबा मह्या लग्नासाठी येडेपिसे झाले. 

आता लग्नाची पोरगी मिळत नाही मोहतराची कर म्हणले. एक दिवस आम्ही पाचसात जण दुसऱ्या गावाच्या पालावर गेलो. रत्ना नावाची बाई होती, तिला दोन मोठोठी मुलं होती. ती मला दाखवली. ‘जगाच्या ओळखीची’ तेवढी समज मला आली नव्हती, मायबाप तर लग्न कर म्हणून हातपाय धुऊन मागे लागले होते. मी रत्नाला बघितली, तिने तांब्याभर पाणी दिलं. गटगटा पिलो. पोरगी जाडजूड हाय, कामाला बरी राहील म्हणून मायबापानं मला समजावलं. 

समद्याच्या मनात मव्हं लगीन होऊन जावावंच होतं. मी बी होकार दिला. रत्ना पसंत आहे म्हणलं. जातपंचायत लिंबाच्या झाडाखाली बसली. तिची पोरं कोण सांभाळायची? बाबानं प्रश्न उपस्थित केला. पंच गिलासावर गिलास दारू पेत होते. बंब चर्चा करीत होते. संध्याकाळ झाली, पण पंच काही निर्णय देईना. रत्नाचा बाप म्हणतो, पोरं पोरीसंगच राहतील. आखरीला मायबापाच्या जीवाखातर मीच सांगितलं. ठीक आहे पोरं रत्नासोबत राहू द्या. मी सांभाळतो त्याईला. बाबा मह्यावर सुटलाच.  मी चूप बसलो. पंचांनी उद्या रात्री मोहतर करायचं ठरवलं. रात्रभर आम्ही तिथंच झोपलो. 

सकाळी सकाळी हागायला गेल्यावर बायकाईनं आईला सांगितलं की, ‘रत्नाचं कॅरेक्टर बरोबर नाही. तिचं पोट आलेलं हाय. त्याच्यानं तिचा बाप तिच्या लग्नाची घाई करत हाय.’ आई हागून आल्यावर मी तिचा चेहरा बघितला. पूर्ण उतरलेला होता. बाबा तवर गावात गेल्‌ते. जराशा वेळानं आले तर साडी आन्‌ बोकुडच घेऊन. आता बोकुड कापून मोहतराची पंगत करायाची आन रात्री रत्नाला साडी नेसवून मह्यासंगं गाठ मारायची. मग दिवस निगायाच्या आतच आम्ही रत्नाला घेऊन पालावर जाणार. झाला मव्हा मोहतूर. असं करून आता मला जिवाची सजणी म्हणून रत्ना मिळणार होती. 

बाबा पंच तेन तिकडूनच दारू ढोसून आले होते. मायीने बाबाजवळ गुपचीप गुपचीप आग लावली. अशानं असं हाय म्हणली, पण बाबा ऐकायच्या मन:स्थितीत नव्हता. बायका चुगल्या सांगतात, त्या ऐकू नये म्हणाला. मव्हा आन्‌ रत्नाचा मोहतर लावायची बाबाची फुल तयारी झालेली. आता बाबाला कोणीच रोखू शकणार नव्हतं. आता रत्ना मही बायको होणार ही काळ्या दगडावरची रेष होती. बोकड्या कापला, सैंपाक शिजायला लागला, तीन दगडांच्या चुलीवर. बाबा बंब पैसे खर्चत होता. कॅनीनं दारू आनून पाजत होता. समद्या पालाईवर आनंदाची भरती आली होती. लेकरापासून मथाऱ्यापर्यंत समदे तोऱ्यात वावरत होते.

आईन सांगितलं तवापासून मव्हं डोकसंच फिरलं. साला दोन लेकरं आयतेच आहेत, ते आपण स्वीकारले. आता पोटातलं तिसरंभी स्वीकारायचं का? आपण बायको कशासाठी करीत आहोत? बायको, लग्न ही आयुष्यात महत्त्वाची भानगड असते का? मी मुंजा थोडाच आहे? मव्हं एक डाव लग्न होऊन गेलेलं आहे. लग्नाचा चिल्लरपणा कोणतेच पुस्तकात तर नाही. एटीत मला काम होत नाही. रत्नाचे तीन तीन लेकरं मी कसा पोसंन. सुचत काहीच नव्हतं. मेंदू चालंचना. दहावी शिकलो होतो, पण त्याचा हितं काहीच फायदा होईना. 

तेवढ्यात पंगत बसली. समदे जेवायला बसले. मला भूकच नव्हती, पण पंचानं मला बळजबरीने जेवायला बसविलं, दोनतीन खांड खाल्ले. रत्ना हिकडं नव्या साडीत मुरकत होती. तिचे पोर मह्या जवळून चालले की दुसरी पोर माणसं त्याला धरून मह्यापासी अनायली. मह्या मांडीवर बसवायली. हा तुव्हा बाप आहे म्हणून ओळख करून देयाली. मला समदं आवघडल्यावानी वाटायलं. पण इलाज नव्हता.

जेवणं खावनं करता करता संध्याकाळ झाली. मोहतुराचा टाइम जवळजवळ यायला. अंधार पडलेला. तांब्या घेतला तेवढ्यात माय जवळ आली. वीस रुपयाची नोट तिने मह्या हातात दिली. आन्‌ हळून निघून जा म्हणली. मग आलो हागायला. तसाच लवनालवनाने पळालो. औंढा जवळच होता. औंढ्याची यात्रा होती. आज रात औंढ्याच्या यात्रेतच काढावी म्हणून निघालो. चालत चालत बऱ्याच रात्री औंढ्याला आलो. सुटलो एकदाचा रत्नाच्या तावडीतून... रात्रभर औंढ्याच्या जत्रेत हिकडून तिकडं फिरत होतो. मनच लागत नव्हतं. आता मायबापाचं काय झालं आसंन असं सारखं वाटत व्हतं. जातपंचायत तर आईला सुदामतीने सोडणार नाही, रात अशाच विचारात काढली. 

दिवस निगला, आईने दिलेले 20 रुपये तसेच जवळ होते. एक खिचडी-भजे खाल्ले. पोट टम्म झालं. आता भुकेची दिवसभर चिंता नव्हती. मग बसमध्ये बसलो. निघाली बस. आली सिद्धेश्वरला. थांबली. उतरलो. 
जोडपिपरीला जाण्यासाठी बस नव्हती, पाच किलोमीटर पायी चालायचं होतं. डोकं सनसनच करत होतं. पागल झाल्यावानी वाटत होतं, साला पाच रुपये उरले. दारू घेवावं. दारू घेतल्यानं टेंशन कमी होते. तसाच निघालो. चालत चालत देशी दारूच्या दुकानावर आलो. पाच रुपयाची देशी दारूची आर्धी बाटली घेतली. बाहेर आलो, तिथं पेणाऱ्यासाठी गिलासं ठेवले होते. दारू गिलासात टाकली, त्यात पाणी मिसळवलं अन्‌ गिलास उचलला, तसं पुस्तकाची दुनिया आठवली. दारू वाईट आहे, आपण दारूने आंघोळ करून दारू सोडलेली आहे. एकदम मनात आलं. तसा गिलास जमिनीवर ओतू लागलो. पेणारे मह्याकडे बघायचे. दारू कामून फेकता, पागल झाले की काय म्हणायले. 

दारू फेकून दिली, काहीही न बोलताच उठलो. निघालो. जोडपिपरीची वाट धरली. चालू लागलो तळ्याच्या काठाकाठानं. आता दुपार झाली होती. आंग तापलं होतं. मग अंगावरची कापडं काढली. तळ्याच्या पाण्यात उतरलो. काठावर बसून हातपाय घासले, बंब काळ्याशार पाण्यात डुंबलो. जीव शांत झाला. पुन्हा बाहेर आलो. अंगावर कापडं चढविली. निघालो. चालत चालत आलो जोडपिपरीला. तेथे म.गांधींचा पुतळा होता, खेटूनच शाळा, शाळेत हापसी, उन्हाळ्याच्या शाळेला सुट्‌ट्या, शाळेत दोनचार कुत्रे झोपले होते. उन्हामुळं मलाही तहान लागलेली.

गेलो हापसीवर, गडाल गडाल दोन-तीन डाव जोरात हालविली आन्‌ हाताच्या ओंजळीनं गटागटा पाणी पेलो. जीव शांत झाला. जरासा इसावा घेवावं म्हणून शाळेच्या व्हरांड्यात सावलीला बसलो. याच्या मायला उन्हाच्यानं फरशी तापली होती. तसाच उठलो, गळ्यातला रुमाल काढला, आंथरला. त्यावर बसलो. आता जरा बरं वाटू लागलं. फरशीवर बसण्यापरीस रुमालावर बसलेलं बरं. डोळे मिटले. जीव थकला होता, पण मायबापाचं, नातेवाईकाचं काय झालं असन? मनात कालवाकालव सुरू झाली. उठलो. निघालो. चालत चालत पालावर आलो. बायका घरीच होत्या. जवळच्या लिंबाच्या झाडाखाली उवा मारीत बसलेल्या.

मी ताईच्या पासी गेलो. बसलो. मला बघून त्या आश्चर्यचकित झाल्या. एकटाच कसा आला. मायबाप, पाहुणे, नवरी कोठं हाय... असे नाना तऱ्हेचे प्रश्न ईचारू लागल्या. आता काय करावं काहीच सुचंना. जरासा वेळ शांत राहिलो. मग घडलेली. समदी हकीकत सांगितली. पुन्हा त्या खोदू खोदू ईचारीत होत्या. आता दोन वाजले असतील. मी बायांना म्हणलं, आता मला काहीबी ईचारू नका. हांडीभर पाणी आन्‌ पुस्तक घेतलं. निघालो. चढ चढता माळ आले, त्या जाळीत शिरलो थंड सावलीत. बसलो वाचत  पुस्तक. पुस्तक इकत आनलं नव्हतं. गावातल्या पोराकडून आणलं होतं. ती भालचंद्र नेमाडे यांची ‘कोसला’ कांदबरी होती. पांडुरंग सांगवीकर जागोजाग मला भेटत होता. पण आज का कोण जाणे मव्हं मन पुस्तकात लागत नव्हतं. सारखी मायबापाची काळजी वाटत होती. पान मुडपून पुस्तक मिटवून ठेवलं. 

भिरभिरत्या नजरेनं पाण्याकडे बघू लागलो. किती मोठं समिंदरावानी तळं आहे. माणूसही ह्या तळ्यावानी शांत झाला पाहिजे. आजूबाजूला पळसाची फुलं किती मोहक वाटतात, आपली नजर आकर्षून घेतात. ही झाडं, झुडपं एवढ्या उन्हात कशी तग धरून आहेत, बिचारी हिरवीगारच आहेत. ह्या सगळ्या निसर्गाकडे बघून आपलं मन भरून येतं. ही दुनिया वेगळीच आहे. एखादा सरडा कसा गळ्याचं रंग बदलून माझ्याकडे खालीवर मान करून बघतो. जाऊ दे साला. तसाच उठलो, निघालो, चाललो. चालत चालत पालावर आलो. आई- बाबा समदे आलेले. बाबा दारू पेऊन वरलोड होता. नंग्या नंग्या शिव्या देत होता. मी पालावर आलो. 

पुस्तक झोऱ्यात ठेवलं आन्‌ जवळच्या दगडावर जाऊन बसलो. बाबाला तेने त्याईन लई ठोकलं. रत्नानं बाबाला चपला हानल्या म्हणे. त्याच्याच बाबा एवढा चिडला वाटते. बाबा मह्यावर सुटायला लागला तवा बाकीच्यांनी धरला तरी बाबा बोलत होता, ‘साल्या आसक्या हिजड्या, मव्हा जीव घेतला व्हता तुव्हा. जातपंचायतीत समदी छी थू झाली. माणसात नाही तू, माणसात नाही. कशाला नसीब फोडायला लोकाईच्या पोरीचं? आता तुला बायकू करून देत नाही. नाही करीत मी कोणाच्या पोरीचं वाटोळं. पालवाल्यांसंगं सवसार करायला तुला बायको करून देऊ का? मह्या पोटी तू हिजडा आला. मह्या जिंदगीचा सत्यानास झाला. फोकनीच्या आता असीच जिंदगी काट चिड्डीत पीठ भरून.’ बाबा जास्तच भडकलेला दिसतो.

मी शांत राहणं पसंत केलं. मी माणसाला कसा आहे ते समजावून सांगितलं असतं, पण तो बाप पडला. आता काय सांगावं त्याला. मी चुपचाप बसलो. रात्र गेली. त्या रात्री एक घास खाल्ला नाही. दुसऱ्या दिवसापासून मी कामाला लागलो. दिवस चालले. पण आता मह्याकडे बघण्याच्या नजरा बदलल्या. पालवाले माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघू लागले. मला ‘हिजडा’ समजू लागले. आन्‌ बापाने पोरी बघणे बंद करून टाकले. 

एक दिवस तुका तात्या आमच्याकडे पावणा आला. तो तिसरी शिकलेला होता. त्याची आन्‌ माझी चांगलीच गट्टी जमली. आम्ही बऱ्याच रातपसवर बोलत बसलो. त्यांनी दुसऱ्या लग्नाबद्दल विषय छेडला. मी समदी कथा सांगितली आन्‌ त्याने चल तुला नववी शिकलेली पोरगी करून देतो म्हणला. शिकलेल्या शिकलेली बायको असते म्हणला. 

मी व त्यानं बाबाला समदं सांगितलं आन्‌ दोघंही निघालो, मग मी, तुकामामा सिद्धेश्वरला बसमध्ये बसलो. बस निघाली. आली वसमतला. वसमतला उतरलो. रिक्षानं गेलो. खेडेगावात (गावाचं नाव आठवत नाही) संजय गांधी झोपडपट्टी योजनेत आठ टिनाचं घर भेटलेलं. म्हागे पाच पत्रे आन्‌ पुढे तीन. कसंतरी पांढरमातीनं आडदिड बांधलेलं. सरकारची योजना ती असीच असणार. साऱ्या कुत्र्यांनी कुरतडत कुरतडत गावखेड्यापर्यंत निर्जीवर होऊन पोहोचलेली.

पोरगी एकटीच घरी होती, तिचे मायबाप आन्‌ तीन भाऊ कामावर गेलेले, लोकाच्या वावरात मजुरीला. मुलगी खूप सुंदर नव्हती, पण तरुणपणी तरुण मुलगी तरुण मुलाला सुंदरच वाटते, पोरगी काळीसावळी होती, पण पाणीदार चेहऱ्याची होती. तिच्या नजरेचा मुकाबला करायाची मही ताकद नव्हती. तुकामामानं समदं तिला सांगितलं. माझ्याहीबद्दल सांगितलं. आता घरचे संध्याकाळीच येतील म्हणली, मी खाटेवर चुपचाप बसलो. ती पिठाच्या डब्यावर बसलेली. मामा तेवढ्या उन्हात उठला आन्‌ गेला दारूच्या भट्टीकडे. मी खाली मान घालून बसलो.  ती बोलायला लागली. तिचे नाव रूपा. 

रूपा- ‘का हो, तुम्ही लाजायला पोरगी आहात का?’ 

मी- ‘नाही.’

रूपा- ‘तुमचं पहिलं लग्न कसं मोडलं?’

मी- ‘असंच.’

रूपा- ‘तुमच्याबद्दल वाईट भुमका हाये.’ 

मी- ‘मी तसा नाही. मह्या बापानं रत्नासंगं लग्न केलं नाही म्हणून भुमका केली.’ 

रूपा- ‘माझे मन सांगते तुम्ही तसे नाही. तुम्ही खूपच सुंदर आहात.’ 

मी- ‘माझ्याशी लग्न करणार?’

रूपा- ‘माझ्या मनावर असतं तर आताच लग्न केलं असतं, पण मायबापाचं ऐकावं लागते ना.’ 

आम्ही असं आन्‌ असंच बोलत बसलो. बोलता बोलता संध्याकाळ झाली. तेवढ्यात दारू पेऊन तुकामामा आला. आम्हाला बोलत बसलेलं बघून म्हणतो, ‘काय अशोकराव, आज समदं बोलून घेणार हाईस का? थोडं बाकी ठीव, लग्न झाल्यावर बोलायला.’ 

रूपा लाजली आन्‌ घरात गेली. मी खाट अंगणात न्हेली. बसलो दोघजणं. तुकामामा शहाणपणा सांगीत होता आन्‌ मी ऐकीत होतो. तो दारू पेला होता, त्याच्याशी भैस करण्याची ताकत माझ्यात नव्हती. मी ‘हो हो’ची कॅसेट लावलेली. 

संध्याकाळी रूपाचे मायबाप आले. त्याच्या बापानं खूप दारू पेली आन्‌ मह्यावर सुटू लागला. आत्ताच्या आता नीघ, माझी पोरगी मागायला कसा काय आला म्हणायला. रूपा, तिची माय समजवत होते, पण गडी काही शांत होत नव्हता.

तेवढ्या रात्री मी व तुकामामा निघालो. चालत चालत तीन किलोमीटर लांब वसमतला आलो. रातभर बसस्टँडवर निजलो. दुसऱ्या दिवशी तो त्याच्या गावाला गेला आन्‌ मी जोडपिपरीला आलो. काळाने कोणत्या वळणावर आनून उभं केलं रे मला. वयाच्या 22-23 व्या वर्षी दुसरं लग्न करायचा विचार केला, याला-त्याला मधात घालून सोयरिकी करायाचो पण  सोयरीक तुटून जायाची. अशा बऱ्याचशा मह्या सोयरिका तुटल्या. जिंदगीला भयानक अनुभव देऊन गेल्या. मनातून लग्नाचा विचारच काढून टाकला.

एक लग्नात प्रकाश भेटला, खूप हुशार माणूस. तो माझा नातेवाईक होता, त्याने लग्न कामुन करीत नाही म्हणून विचारलं. तवा मी त्याला समदा इतिहास सांगितला. तो अमरावती जिल्ह्याचा राहणारा होता. भटकत भटकत परभणी जिल्ह्यात तो आला होता. लग्नात त्याची व मही भेट झालेली. मग तो म्हणाला- तुला एक चांगली पोरगी करून देतो, पण पहिले लग्न झाले नाही. सतरावी-आठरावी शिकलेला हाईस असं सांग. तवा मी त्याला खोटं बोलू शकत नाही म्हणलो. तवा तो म्हणला, चांगल्या गोष्टीसाठी खोटं बोलून तर बघ. त्याने समजावलं, मी तयार झालो. फलाण्या दिवशी ये म्हणला. 

मी रोजमजुरी करून पैसे जमा केले. आलो अमरावतीला. तो भेटला. त्याला मी बंब दारू पाजली. गेलो तळेगावला शोधत. रामसिंग मोहिते होते. त्याने पावण्याईला पटविले, सोयरीक झाली, पत्रिका छापल्या. आलो जोडपिपरीला. रोज मजुरी करून पैसे जमा करू लागलो. आठ दिवसावर मव्हं लग्न येऊन ठेपलं. एक दिवस संध्याकाळी आम्ही समदे पालावर गप्पा मारत बसलो. 

तेवढ्यात पंजाबी ड्रेसवर एक पोरगी आली. मला बघताच मह्या गळ्यात पडली. ‘अशोक मी सारी दुनिया सोडून तुझ्यासाठी आले. मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे.’ बायका मधे पडल्या, त्याईनं सोडवलं. बघतो तर काय, ती रूपा होती. एकटीच घरून पळून आलेली. तिची मानसिकता बिघडल्यावानी वाटत होती. सारखं अशोक अशोकच करीत होती. दुसऱ्या दिवशी बाबानं तिच्या मायबापाला व नातेवाईकाला बोलवून आनलं. तिचा बाप रडत होता. अशोकसंग मह्या पोरीचं लग्न करून द्या म्हणत होता. मी तिची ताकद, प्रेम, बघून तयार झालतो लग्न करायला, पण बाबा आडवं आला.

आज तुझ्यावर प्रेम करते, उद्या तुह्यापेक्षा दुसरा चांगला मिळाला तर त्याच्यासंगं प्रेम करन म्हणला. जातपंचायत बसली, बाबानं नकार दिला. रूपाला तिचे मायबाप घेऊन गेले. लग्नाचा दिवस उजाडला. लग्नाच्या दिवशी पाचपंचवीस नातेवाईक घेऊन आलो तळेगावला. पुढचा माणूस श्रीमंत, स्वत:चं घर, गावात इज्जत. आजूबाजूच्या खेड्यापाड्यात मानपान. भव्य मंडप टाकलेला लग्नाचा. लग्न लागायची घटिका जवळ आली. कोणीतरी सांगितलं अशोकचं पहिलं लग्न झालेलं आहे. आन काय बघता, समदे मह्यावर चिडले. नंग्या नंग्या शिव्या देऊ लागले. दुसरा नवरदेव बघण्याची तयारी सुरू झाली. 

मी हळदीचे आंग घेऊन बाजूला उभा झालो. आलेले नातेवाईक सटकले. प्रकाश दारू पेऊन पडलेला. समदे मला फसवलं फसवलं म्हणायले. आता मव्हा प्रश्न मलाच निपटायचा होता. हिंमत केली, सासऱ्याजवळ गेलो ते बोलायला तयार नव्हते. मग सासूबाईजवळ गेलो. सासूबाईला सलाईन लागलेली. मी फसवल्याचा धक्का सहन न झाल्यामुळे म्हणे. तिच्याभोवती बायकांची गर्दी. त्या मला शिव्या देत होत्या. 

तेवढ्यात हळदीतली ‘माला’ दिसली. तिच्यापुढे मी हात जोडले. छातीला माती लावून तुव्हा सांभाळ करेन, तुला फुलासारखं जपेन. असं बरंच काहीबाही सांगितलं. ती काहीच न बोलता आतल्या घरात निघून गेली आणि माझ्या लग्नाची तयारी थोड्याच वेळात सुरू झाली. मायबाप कोणीच नव्हतं. समदे पळून गेले होते. मी व माला लग्नाच्या बंधनात बांधले गेलो. तिनेच तिच्या मायबापाला व नातेवाईकाला नमवलं होतं म्हणे. आता माला आन्‌ मी सासऱ्याजवळून तिकिटाचे पैसे मागून जोडपिपरीला गेलो. बाबाला खूप आनंद झाला. आनंदात खूप दारू पेला. रात्री बडबड करीत होता. ‘मव्हा पोरगा मर्द आहे, पठ्यान्‌ एकट्यानं बायको करून आनली’ असं बरंच काही. 

आर्धी रात्र कलांडल्यावर एकाएकी आभाळ भरून आलं. विजा कडाडू लागल्या, आन्‌ पावसाला सुरवात झाली. आता मी मुलगा राहिलो नव्हतो. लग्न करून माणूस झालो होतो. आमच्या दोघांच्या खांद्यावर बिराडाची जबाबदारी आली होती. समदे शाळेकडे पळू लागले मी व मालाभी दोन गठ्ठे डोकशावर घेऊन निघालो होतो. भिजून वले चिंब झालो. आलो शाळेत. मग समद्याबरोबर बसलो रात्र काढत. 

दुसऱ्या दिवशी मालाला खूप ताप आला. क्रोसीन गोळी दिली, ताप उतरला. हळूहळू मालाला पालावर राहायची सवय झाली. तिला लिहिता वाचता येत नाही. तिला मी त्या टेकडीवरच्या झुडपात सुट्टीच्या (कामाला) दिवशी घेऊन गेलो. उद्धव शेळकेची ‘धग’, किशोर काळेचं ‘कोल्हाट्याचं पोर’, शरणकुमार लिंबाळेंचं ‘अक्करमाशी’, साने गुरुजींची ‘श्यामची आई’ ही पुस्तकं तेथेच वाचून दाखवली. ‘धग’ तिला खूप आवडलेलं पुस्तक आहे. काही दिवसांनी आमचं बिराड जोडपिपरीला निघालं. पोखर्णीला आलं. 

Tags: श्यामची आई साने गुरुजी शरणकुमार लिंबाळे किशोर काळे उद्धव शेळके Shyam'chi Aai Sane Guruji Sharan Kumar Limbale Kishore Kale Uddhav Shelke bhalchandra nemade weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके