डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

दगड फोडणाऱ्या समाजाच्या पडझडीची कहाणी

साहित्य : ललित ग्रंथ पुरस्कार । पडझड : अशोक पवार

पालावर माझ्या आयुष्याची जवळजवळ 25 वर्षे गेली. पालावर जगत असताना अनेक भटक्या-विमुक्त जाती-जमातींची पालं माझ्या पालाशेजारी राहायची. वडारांची पालंसुद्धा आमच्या शेजारीच होती. छाती फाडून घणाने दगड फोडणाऱ्या वडार समाजाच्या आताच्या ‘पडझडी’ची कथा मी ‘पडझड’ कादंबरीत रेखाटली आहे. भटक्या-विमुक्त समाजातील तरुणांना पालाची दुनिया सोडून बाहेर पडणे फारच अवघड आहे. व्यवस्थेने अशी एक अव्यवस्था करून ठेवली आहे की, ती प्रत्येकाला आपल्या चाकोरीतले जीवन जगायला भाग पाडते. मग पालावरच्या एखाद्याने पाल सोडून गावात, शहरात स्थायिक होण्याचा प्रयत्न केला; तरीही गावगुंड, जातपंचायत, रीतीरिवाज यांच्या कैचीत पिचकू पिचकू मारते आणि भटक्या-विमुक्तांचे जीवन नासवून त्याला पोटाच्या खाईत संपवून टाकते.

वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत पालावर राहिलो. पोटापायी बिराड घेऊन दर कोस, दर मुक्काम हिंडलो. मरणयातनेचे ते आयुष्य जगलो. लयी डाव मरणगावच्या रस्त्याने आत्महत्येच्या गावाला जाऊन आलो. वापस आल्यावर पुन्हा नव्याने बिराडातली भटकी-विमुक्त माणसं वाचली, अनुभवली आणि जगलीसुद्धा... लहानपणात अचानक चुकून शाळेशी धागा जुळल्यामुळे जगाचा थोडाफार अभ्यास झाला. पुढे खूप संघर्ष करून बिराडातून बाहेर पडलो. जातपंचायतीचा बहिष्कृतपणाचा कायमचा शिक्का कपाळावर मारून घेऊन मजुरी करून जगू लागलो. अनेक पुस्तकं वाचली, मनात जगण्याची नवी उमेद जागी झाली...    

तसा माझा बाप दारूड्या होता, आई खूप मेहनती होती. बाप शाळेच्या विरोधात. मी रोज मजुरी करून त्याच्या संसाराला हातभार लावावा, असं त्याचं मत होतं. तर आई पुतळाबाई मला शाळा शिकवून साहेब करण्याचं स्वप्न बघत होती. रात्रपाळीने चौथी आणि नंतर दहावी पास झालो. दहावीला चांगले मार्क्स होते. डी.एड.ला नंबर लागला होता. या वेळी थोडीशी मदत करणारा दाता भेटला नाही. असो. शाळा सोडली, लग्न केलं. वाट्याला बिराड आलं आणि साऱ्या आयुष्याची ससेहोलपट सुरू झाली. पुस्तकं हाती आली. वैचारिकता परिपक्व झाली आन्‌ जगण्याला दिशा मिळाली.
    
‘बिराड’ हे आत्मकथन लिहिलं. बिराडच्या आवृत्त्यावर आवृत्त्या निघत आहेत. ते चार विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात आहे. भीक, भूक, दारिद्य्र आणि गुन्हेगारी यांच्या विळख्यात चिरडलेल्या ज्वलंत दु:खाची गाथा म्हणून समीक्षकांनी त्याची नोंद केली आहे. आत्मकथन लिहिलं की लेखक संपला. गाजलेल्या आत्मकथनाचे लेखक पुढे त्या दर्जाची पुस्तके लिहू शकले नाहीत. सर्व आत्मकथनात आल्यावर ठेंगा राहील का जवळ? जा, बिराडनंतर तुम्ही आराम करा- असा सल्लाही मला मान्यवरांनी दिला. मी तो शांतपणे ऐकून पुढे चालत राहिलो. बिराड 2001 मध्ये आलं. नंतर पुन्हा मी भाकरीच्या शोधात पायाला भिंगरी बांधून भटकू लागलो. जवळजवळ सातएक वर्षे थांबलो. 2008 मध्ये ‘इळन्‌माळ’ कादंबरी लोकवाङ्‌मय गृहाने प्रकाशित केली. 2010 मध्ये ‘दर कोस दर मुक्काम’ नावाची कादंबरी मनोविकास प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केली. आता त्यांनीच 2013 मध्ये ‘तसव्या’ नावाची कादंबरी प्रकाशित केली, तर 2011 मध्ये लोकवाङ्‌मय गृहाने ‘पडझड’ नावाची कादंबरी प्रकाशित केली होती. माझ्या साऱ्याच पुस्तकांच्या आवृत्त्या निघाल्या. सारीच पुस्तकं मान्यवर समीक्षकांकडून, वाचकांकडून चर्चिली गेली. पुरस्कृत झाली. विद्यापीठीय अभ्यासक्रमात गेली. मी जेवढा यापूर्वी अस्वस्थ नव्हतो, तेवढा अस्वस्थ आता होत चाललो. माझ्याजवळ आयुष्य थोडे आहे आणि मला खूप काही लिहायचे आहे. मी सदा वावरत राहतो अनुभवांच्या विद्यापीठात. तेच उतरवतो, वेळ मिळेल तेव्हा कागदावर.    

‘पडझड’ कादंबरी लोकवाङ्‌मय गृहाने प्रकाशित केली. स्वातंत्र्यानंतरच्या भटक्या-विमुक्तांच्या चौथ्या पिढीतील मुलं-मुली शिक्षण घेत आहेत. या चौथ्या पिढीसोबतच प्रचंड स्पर्धेचे महायुग जन्माला आलेले आहे. येथे कोणीच कोणाचा वाली नाही. दलित चळवळीची फाटाफूट झाली. कामगार चळवळी थंड पडल्या. भ्रष्टाचाराने कहर केला. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने मानवी जीवनाचे जगण्याचे संदर्भच बदलून टाकले. चोरी करणारे चोरच, आपल्या घरी चोरी झाली म्हणून बोंब ठोकायले. आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या भटक्या-विमुक्तांचा टिकाव कसा लागेल? ते थोडेफार शिकले, पण हाताला काम लागले नाही; परिणामी बेरोजगारीच नशिबी आली. पण पोट तर असतंच ना! पोट भरण्यासाठी त्यांनी विविध मार्ग अवलंबिले. या सर्व परिस्थितीची मांडणी मी ‘पडझड’ कादंबरीत केलेली आहे.

लहानपणापासून चोरी करणं, दारू पिणं, भीक मागणं, भांडणं करणं- असं पालावरचं जीवन माझ्या पदरात आलं. अवहेलना, अपमान पाचवीला पुजलेला. यातूनच वाचनाचं वेड लागलं. शाहू, फुले, आंबेडकर, मार्क्स, गांधी, मॅक्झिम गॉर्की, लिओ टॉलस्टॉय, अँतोन चेकाव्ह अभ्यासले. जीवन समजून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय समाजव्यवस्थेने भटक्या-विमुक्तांच्या पाठीवर अथांग वेदनांचे ओझे लादले. अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवी मूलभूत गरजांपासून कोसो दूर ठेवले. ‘पडझड’ कादंबरीत वडार ह्या भटक्या-विमुक्त समाजाची व्यथा-वेदना मांडली असली, तरी पडझड कोण्या एका माणसाची किंवा जातीची कथा मुळीच नाही; तर ‘पडझड’ ही मानवी दु:खाने बरबटलेल्या शोषित, पीडित व भटक्या-विमुक्त समाजाची महागाथा आहे. लोकांनी भटक्या-विमुक्त जाती-जमातींचे उपरेपणाचे जीवन समजून घ्यावे, ही माफक अपेक्षा आहे. ‘पडझड’ कादंबरी अक्षरवाङ्‌मय असल्याचा दावा मी करीत नाही आणि करणारही नाही. तसा न्यूनगंड माझ्यात निर्माण होऊ नये, म्हणून मी स्वत:ला जपतो.    

‘पडझड’ या कादंबरीचा प्रवास सुरू होतो पालावरून आणि भटक्यांच्या पालावरच संपतो. या कादंबरीत भटक्या-विमुक्त जाती-जमातींतील वडार या जमातीत ‘तुका’ नावाचा तरुण जन्माला येतो. पोटासाठी गावोगाव भटकणाऱ्या व दगड फोडणाऱ्या या जातीतील अनेक जीवघेणे अनुभव मी जसेच्या तसे मांडले आहेत. या कादंबरीचा नायक तुका आहे आणि नायिका शोभा आहे. ही कादंबरी म्हणजे काही एकाच सुशिक्षित बेरोजगाराची कहाणी नाही, तर हजारो सुशिक्षित होऊन वाट्याला बेरोजगारी आलेल्या बांधवांच्या कपाळावरची ती भळभळती जखम आहे. याच कादंबरीचा सहनायक ‘नामा’ परिस्थितीवर मात करून एम.ए.पर्यंतचे शिक्षण घेतो. नोकरीसाठी खूप प्रयत्न करतो, पण खिसा फाटका असल्यामुळे नोकरी मिळत नाही. तो बायकोला घेऊन मुंबईला जातो, तेथे भीक मागून आपला उदरनिर्वाह करत असतो. तो कधी कधी पालावर यायचा. पालावर आल्यावर मी मुंबईला नोकरीला लागलो म्हणायचा. तुकाही बेरोजगारीच्या खाईत पुरता होरपळल्यावर मुंबई गाठतो- नामाच्या सहकार्याने नामावानी कंपनीत नोकरी लागण्यासाठी. आणि त्याला नामाच्या जगण्याचे कोडे उलगडते. तो आतून-बाहेरून फाटून जातो.    

पालावर माझ्या आयुष्याची जवळजवळ 25 वर्षे गेली. पालावर जगत असताना अनेक भटक्या-विमुक्त जाती-जमातींची पालं माझ्या पालाशेजारी राहायची. वडारांची पालंसुद्धा आमच्या शेजारीच होती. छाती फाडून घणाने दगड फोडणाऱ्या वडार समाजाच्या आताच्या ‘पडझडी’ची कथा मी ‘पडझड’ कादंबरीत रेखाटली आहे.

भटक्या-विमुक्त समाजातील तरुणांना पालाची दुनिया सोडून बाहेर पडणे फारच अवघड आहे. व्यवस्थेने अशी एक अव्यवस्था करून ठेवली आहे की, ती प्रत्येकाला आपल्या चाकोरीतले जीवन जगायला भाग पाडते. मग पालावरच्या एखाद्याने पाल सोडून गावात, शहरात स्थायिक होण्याचा प्रयत्न केला; तरीही गावगुंड, जातपंचायत, रीतीरिवाज यांच्या कैचीत पिचकू पिचकू मारते आणि भटक्या-विमुक्तांचे जीवन नासवून त्याला पोटाच्या खाईत संपवून टाकते. तुका व्यवस्थेशी संघर्ष करतो; पण त्याला याचीही जाणीव आहे की, ही प्रचंड महाकाय व्यवस्था एकाएकी तुटणार नाही, वाकणार नाही... पण तो आशावादी आहे. या व्यवस्थेला किमान आपण एक दगड मारू शकतो, असे त्याला वाटते. आज शिक्षणासाठी आपल्या मुलाबाळांना मायबाप किती खर्च करून शिकवितात, पण तुकाजवळ त्याच्या बापजाद्यापासून काहीच नाही. तो साऱ्या जन्माचा नंगाड आहे, तरी त्याची शिक्षण घेण्याची जिद्द वाखाणण्याजोगी आहे. परिस्थितीमुळे शिक्षण सोडू पाहणाऱ्या मुलांना तुका नवी प्रेरणा देऊन शिकायला प्रवृत्त करेल. तशी मला माझी सर्वच पुस्तकं अतिप्रिय व महत्त्वाची आहेत. मी माझ्या प्रत्येक पुस्तकात एक नवा संदेश दिलेला आहे. तसाच नवा संदेश मी ‘पडझड’ कादंबरीत दिलेला आहे.    

तशी माझी सर्वच पुस्तकं वाचली, नामवंतांनी त्यांचे तोंड भरून कौतुक केले. आत्मकथन लिहिल्यावर लेखक संपतो, नंतर तो चांगली पुस्तकं लिहू शकत नाही- हा समज मला वाटते, मी खोटा ठरवला. तुम्ही म्हणाल, स्वत:ची खूपच स्तुती करीत आहे. मला ते आवडत नाही. माझा स्वभावही तसा नाही. पण जे वास्तव आहे, ते मी या ठिकाणी सांगत आहे- तुमच्यासमोर मांडत आहे. असो. एवढं शिकून मी भीक का मागतो? या व्यवस्थेने चिरडून टाकल्यामुळे... स्वातंत्र्य हिरावून घेतल्यामुळे... आत्मविश्वास गमावल्यामुळे- मी भीक मागतो, असं नामा सांगतो. पोलिसांचा मार, महिलांची सोशिकता, गावकऱ्यांचे भटक्या-विमुक्तांना न समजून घेण्याचे संदर्भ... असे बरंच काही मी ‘पडझड’ कादंबरीत शब्दबद्ध केलं आहे.

Tags: अशोक पवार लोकवाङ्‌मय गृह जातपंचायत भटकी-विमुक्त तसव्या आ.ह.सांळुखे कादंबरी पडझड पाल अशोक पवार Lokvagmany Gruh Jatpanchayt Bhataki-Vimukt Tasvya A.H. Salunkhe Kadambari Padjhad Pal Ashok Pawar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके