डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आता कोणी कोणाची जय म्हणायाची, ते तुम्हीच सांगा राव...?

आमची बोलायला सुरूवात झाली. त्या बुढ्याचं नाव विठ्ठल पवार. तो सांगू लागला, “मालक इंदरा गांधीच्या काळात एकर दोन एकर जमीन मिळाली. जमीन धोपटाळ्याला आहे. किती भी राबून काय पिकते जमिनीत जेवढे उत्पन्न होते त्याच्या दीडपट पैसेच खर्च होतात. त्यापेक्षा भीक मागून जगलेलं बरं. मी आन मही बायको मस्त भीक मागून जगतो, म्या काही साधा नाही. राजुरा, कलकत्ता, बंबई मेन गावात भीक मागून फुकट फिरता येते. कोणी तिकीट विचारत नाही. आन महत्त्वाचं मम्हणजे भीक भी जास्त मिळते. लोक भी तरास देत नाही. पोलिस भी खेदाडत नाही...”

मी निघालो. मनात विचाराचं चक्र सुरू होतं.... आमचा भारत देश स्वतंत्र. ह्या स्वतंत्र भारतात हाडामासाचे माणसं, एक उजेडात आन् दुसरा अंधारात राहातो. ह्या एकाच देशात दोन देश कसे नांदतात. एक इंडिया आन् दुसरा भारत. आता कोणी कोणाची जय म्हणायची ते तुम्हीच सांगा राव...?

गावाच्या बाहेर पटांगण रान, त्या रानात भटक्यांची पाच सात पालं उतरलेली. दिवसाचे चार एक वाजले असतील. दोन तीन घंटे रिकामा वेळ आहे आपल्याला, तसं आता काही काम नाही. चला पालावर जावावं, बघावं आपल्या लोकाईची परिस्थिती. दहा ते बारा वर्ष झाले आपन पाल सोडला. या काळात जगात अनेक उलथापालथी झाल्या. भारतातही अनेक बदल घडले, त्याचा परिणाम आपल्या लोकाईच्या पालावर झाला असेल.

मी रोड सोडून पालाकडे निघालो. मला बघताच गडी माणसं इकडे तिकडे पळू लागले. तरण्या तरण्या बायका पालात घुसल्या. मथारे कोतारे तेवढेच बाहेर राहिले.

मी पालावर आलो, मह्याशी कोणीच बोलना, माह्याकडे बघंना, आता काय करावं. मीच बोलायला सुरूवात केली. नेहमीप्रमाणे आपलाय परिचय दिला. त्याईच्यात एक जाडा बुढा बसलेला होता. तो खाऊन पेऊन टनाटन वाटत होता. मी त्याला बोलायलो, तो काही बोलेचना. मी पाच मिनिट उभा राहिलो, तवा तो बुढा एकाएकी मह्या पायात पडला. “मालक आण्ही चोर न्हाय, आम्ही भीक मागून जगतु, आम्ही पारधी हाव, आमचे बापजादे शिकार करून जगत होते. मायबाप सरकारनं शिकारीवर बंदी आनली. आम्हाला लोक काम देत नाही. आम्ही पोटं भरण्यासाठी भीक मागतो, मालक आम्ही चोरी करीत नाही”

“आरे मी तुमचाच आहे. पोलीस नाही”

“मागे असाच एक पोलीस आला. तुमचाच हाव म्हणला” वळखपाळख झाली. आपला माणूस होता म्हणून त्याला चित्तर बाटरं फुकटात देत होतो. त्याचं उठसूट नेहमीचंच सुरू झालं. मग आम्ही त्याला देनं बंद केलं. त्याला एक –दोन डाव वापस पाठवीलं. तो चिडला. आम्हाला धमकी देऊन गेला. आम्हाला वाटलं आपलाच माणूस आहे. कशाला तसं काही करेल. बेट्यानं शेन खाल्लंच. पोलीस घेऊन आला, आम्हाला चोरीच्या गुन्ह्यात अडकवलं.

“मी तसा नाही. तुमचं जगनं चांगलं होवावं म्हणून सरकारी दरबारी झटतो. ”

 “ तोही असंच काहीबाही बोलत होता.”

“आता तुम्हाला विश्वास वाटत नसंल तर मी जातो. मला तसेच चित्तर बाटरही नको, मी सहजच आलो.”

मी निघतो, जातात अडचण पडली तर मला भेटा असं पारधी भाषेतून सांगतो, मी पारधी भाषेतून बोलल्याबरोबर ते भानावर आले. लगेच त्यांनी हात धरून मला थांबवलं. “ काय मालक आधीच का नाही सांगितलं. आमची समदी गडी माणसं पोलिस साध्या कापडात आला म्हणून पळून गेली. जाऊद्या, बरं झालं नसता पोलिस असते तर बेकार झालं असतं, फुकटच टल्ले खायाला ठाण्यात घेऊन गेले असते. ”

मग मी त्याच्या शेजारी गोधड्यावर बसलो. एका बुढ्यानं तोंडात बोट टाकून जोरात शिट्टी वाजवली. तसं बायका हळूहळू पालातून बाहेर येऊ लागल्या. गडी माणसं एक एकानं येऊ लागले.

आमची बोलायला सुरूवात झाली. त्या बुढ्याचं नाव विठ्ठल पवार. तो सांगू लागला, “मालक इंदरा गांधीच्या काळात एकर दोन एकर जमीन मिळाली. जमीन धोपटाळ्याला आहे. किती भी राबून काय पिकते जमिनीत जेवढे उत्पन्न होते त्याच्या दीडपट पैसेच खर्च होतात. त्यापेक्षा भीक मागून जगलेलं बरं. मी आन मही बायको मस्त भीक मागून जगतो, म्या काही साधा नाही. राजुरा, कलकत्ता, बंबई मेन गावात भीक मागून फुकट फिरता येते. कोणी तिकीट विचारत नाही. आन महत्त्वाचं मम्हणजे भीक भी जास्त मिळते. लोक भी तरास देत नाही. पोलिस भी खेदाडत नाही...”

“आता कोठं चोऱ्या करत्यात आपले लोक, आपल्या लोकाच्या चोऱ्या सुटल्या आन दुसरेच लोक करायला लागले. पण पोलिस आपल्याच लोकाईला पकडून नेतात. ढोरासारखं मारतात राव. आपल्या बापजाद्यापासून आपली गत वाईट हाय. जाऊ दे. आम्ही भीक मागून आनंदात जगतो. आता पयल्यावानी राहिलं नाही पोरंच बापाईपेक्षा जास्त दारू पेयाला लागले. महे पोरंबाळं भी खूप दारू पेतात. लहान पोरगा आन सून मह्यापासी राहात्यात. त्याची बायको खुशाल भीक मागायला जाते, आन् हा दारू पेतो. दाखवला असता तुला, पण तुलाच भेऊन पळून गेला. पडला असंन कोठं खदाडीत. तू गेल्यावर मग त्याले अनावं लागंल. ”

‘‘आरे दादा, मला भेटतात पाचपन्नास रूपये. त्यात पेते साला दारू. मी भी घेतो घोट खांड. भीक मागू मागू थकवा येतो. शीणभाग घालवण्यासाठी पेतो दारू. लोक लई कलाकार हाईत राव. असंच गेलं भीक मागायला की पैसे देत नाही. म्हणून आंगावर भगवी कापडं घालतो. साधू महाराजासारखं दाढी केसं वाढवले, अंगावर भगवी कापड बघितली की लोक फुल ना फुलाची पाकळी भीक देतात.

‘‘आता तुम्ही पोलीसावानीच वाटले म्हणून लपल्या होत्या तरण्याताट्या पोरी. पोलीस लयीच वंगळ राव. तरणीताटी पोरगी सोरगी दिसली की धरधुरच करतात बेट्टे, म्हणून ह्या लपल्या होत्या. बरंच झालं, तुम्ही आपले निघाले. आपली तर जिंदगी असीच गेली. पोराबाळांची तरी जिंदगी सुधरली पाहिजे. तसाही ह्यो भीक मागण्याचा धंदा खूपच बेकार हाय बबा. भीक मागायला गेल्यावर लोकं तर भीक देत नाही, उलट बोलू बोलू गाभडं पाडून टाकतात. हातपाय सुधं हाय,काम करायला काय रोग येते का, असं लोक म्हणत्यात. मी मह्या नातवाला मातर भीक मागू देणार न्हाय. त्याला साळा शिकवतू. त्याला पोलीसच बनवतू. असा तसा पोलीस न्हाय, इनामदार पोलीस बनवतू.

‘‘आता आपले पारधी आदिवास्यात आले म्हणे. आपल्याला खूप सवलती मिळत्यात म्हणे. खूप लोकं सांगत्यात रे बाबा. पण आपल्या पालापसवर कोनत्याच सवलती येत न्हाय, कोठं गायब होतात कोनाला ठावं. म्हागं आमच्या जवळून काही लोकानं पैसे नेले. फोटो न्हेले. निराधाराचा पगार चालू करतो म्हणून. आज दोन-तीन वर्सं झाले, पण त्याचं काहीच झालं नाही. आमच्याकडून तितरंबाटरं भी लयी डाव खायला न्हेले. साला लोकं फसवत्यात. लालूच दाखवत्यात. आन आपल्यासारखे लोकं लालचीत मरतात. मी वर्सा सहा महिन्यात धोपटाळ्याला जातो. इचारपूस करतो, पण सरकारातून झालं नाही म्हणत्यात. चंद्रपूरच्या सरकारजवळ हाईत म्हणं आमची कागदपत्रं. तुम्ही चंद्रपुरातच राहता ना. तेवढं इचारून बघा. काय पाचपंचवीस घेयाचे ते घे म्हणावं. पण कागदं थोपटाळ्याला पाठव म्हणाव. एक डाव निराधाराचा पगार चालू झाला, की सोडून देतू भीक मागायाचा धंदा. धोपटाळ्याचं घर धरून राहतो. आता कटाळा आला रे असलं भीक मागत बोंबलत हिंडायाचा...”

तेवढ्यात पालात खड्‌ल खड्‌ल झालं. एक दोन जन धावले. डुकराची झुंड पालात घुसली होती. हाट्‌ हाट्‌ करीत हाकालले. या रानात साला पालाच्या घरात कुत्रे, मांजरे घुसतात. पालाला थोडंच घर असते. चवकडून भोंगळेच असतात पालं. आता आंधार पडत चाललेला.

आंधारात एकानं काडीकचरा चेतवून चुलीत जाळ घातला. तेवढ्यात पुन्हा बोलायला सुरुवात झाली. एका बाईनं सांगितलं, ‘‘आता भीक मागायाची भी तऱ्हा बदलली भाऊ. आम्ही बायका दिवसभर भीक मागतो. हे बघा हे ताट.”

मी ताट बघितलं. त्या ताटात देवादिकाचे फोटो चिपकवलेले.

मी- ‘‘या ताटात देवादिकाचे फोटो चिपकवल्यावर काय होते?”

ती- ‘‘होते, भरपूर होते. ताटात देवादिकाचा फोटो असल्यावर लोकं नादर समजत्यात. न वाढणारे भी वाढत्यात. असं कोन्ही वाढणार नाही, पण देवाचे नावानं नक्कीच वाढतील. आन्‌ टुकार लोक चावट बी बोलत नाही.”

मला भेऊन पळून गेलेले, एक एक तरुण माणूस येऊ येऊ मह्यापासी बसू लागला. कान देऊन माझे बोलणे ऐकू लागले. मी,‘‘आरे, आपन एक गाव धरलं पाहिजे. घर बांधलं पाहिजे. रोजमजुरी करून जगवलं पाहिजे. मुलाबाळांना शिकविलं पाहिजे.” तेवढ्यात एक तरुण पुढे झाला आन बोलू लागला, ‘‘आव सायब,मी नांदगावला राहतो. साधीसुधी गुरवाडीत झोपडी बांधली. गावात काम बघू लागलो, पण कामच कोणी देईना. अंगाचा वासच येतू म्हणतात. मग भीक मागून जगू लागलो. किती दिवस भीक मागणार. एका गावात किती दिवस लोकं भीक वाढतील. गमलंच नाही, सोडून दिलं गाव. खुशाल पालं घेऊन हिंडतो.

त्याच्या त्वांडाचा घमकन देशी दारूचा वास आला. मी थोडा मागे सरकलो. मग त्याईनं बोलायला सुरुवात केली. एकाचवेळी चार-चार जण बोलायले. एकाला चूप केलं तर दुसरा बोलायला. मधातच तिसरी बोलायला, काहीच समजंना.

तवा मी सांगितलं, पुन्हा येतो म्हणलं. निघता निघता त्याहीला म्हणलं, ‘‘आरे, जवळपास येथे पाण्याचा पत्ता दिसत नाही. तुम्ही पाणी कोठुन आनता.”  तवा ते म्हणतात, ‘‘आवं सायब, तसीही आपली जात हुशारच आहे. ती समुरची पाईप

लाईन जाते ना.”

‘‘हो.”

‘‘मोठी पाईप लाईन आहे. शहराला पाणी पुरवते.”

‘‘आम्ही ती फोडतो. पाण्याचा फवारा उडतो. आमची सोय होते.”

‘‘दुरुस्त करीत नाही.”

‘‘करतात दोन-तीन दिवसाला.”

‘‘तुम्हाला काही म्हणत नाही?”

‘‘दुरुस्त करणारे म्हणतात, आजून फोडत जा, दुरुस्त करायाचे आम्हाला पैसे मिळतात म्हणतात.”

मी निघालो. चालत चालत रोडवर आलो. उभा राहिलो. शहराकडे नजर टाकली. शहरात लखलखता प्रचंड उजेड. मग पालाकडे बघतो, तर काय, जीवघेणा अंधार. ह्या उजेड आन्‌ अंधारातलं अंतर कवा कमी होईल.

मी निघालो. मनात विचाराचं चक्र सुरू होतं... आमचा भारत देश स्वतंत्र. ह्या स्वतंत्र भारतात हाडामासाचे माणसं, एक उजेडात आन्‌ दुसरा अंधारात राहतो. ह्या एकाच देशात दोन देश कसे नांदतात. एक इंडिया आन दुसरा भारत... आता कोणीकोणाची जय म्हणायाची ते तुम्हीच सांगा राव...?

Tags: भीक मागणे मजबुरी सवलतींचा घोटाळा लाचारी दारिद्र्य भीक असुरक्षित आयुष्य भीक मागण्याची मजबुरी आयुष्य भिकाऱ्यांचे जिणे पालावरचे जिणं अशोक पवार India verses Bharat Wealthy poverty Life tribes Ashok Pawar Bharat - India weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके