डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पण या कवितेवर कविताच लिहिता येत नाही...!

आता त्या हायवेने गेलो, की मला ते दोन झेंडे दिसतात. कविता माझ्या काळजावर घाव घालून जाते. मला उभा फाडून टाकते. मी तिला विसरण्याचा प्रयत्न करतो; पण ती विसरत नाही. अशा अस्वस्थ घटनांवर मी छोट्यामोठ्या कविता लिहितो.  आतापर्यंत खूप कविता लिहिल्या...या कवितेवरही कविता लिहिण्याचा खूप प्रयत्न केला; पण जमलं नाही. या कवितेवर मनासारखी कविताच लिहिता आली नाही. पालावर अशा कितीतरी कविता गायब झाल्या, त्याचं काय?

बंगाली कँप चंद्रपूर शहराचा एक भाग. तेथून आंध्रप्रदेशात जाणारा हाय-वे लागतो. त्या हायवेवर थोडंसं लांब गेलं की शर्मा पेट्रोल पंप आहे. त्या पेट्रोलपंपाच्याच बाजूला पडीक जागा आहे. तेथे भटक्यांची पालं नेहमी उतरलेली असतात.

एकदा संध्याकाळी या रोडनं चालता चालता मी भटक्यांची पालं न्याहाळू लागलो, तवा पालावरून रडण्याचा आवाज आला. मी कान देऊन ऐकू लागलो. पालावर लेक्राबाळांचा आक्रोश चाललेला. आरे यार, ही आपली भटकी माणसं आहेत. माझे पाय बिराडाकडे ओढले गेले. मी पालाजवळ गेलो.  मला बघताच गडीमाणसं पालात लपली. तरण्याताट्या बायकाही पालात घुसल्या. मथारे माणसं, मथाऱ्या बाया चाचरत चाचरत मह्यापासी आल्या. लेक्राबाळांचा आक्रोश चाललेला एकाएकी थांबला. समदी पालं चिडीचिप झाली.

मी उभ्याउभ्यानं आंधारात बोलीभाषेतून बोलायला सुरुवात केली. ‘मी आपलाच तीन दगडाचा सोबती हाव म्हटलं. आपल्याच भिकार पंथातला माणूस आहे. ‘ त्यांना माझं म्हणनं पटलं. लगेच बुढ्या बाढ्याईनं गोधडं आथरलं. बाकीच्याईला आवाज दिला. भराभर समदे पालाबाहेर आले.  मी गोधड्यावर बसलो.  समदे मह्याभौती बसले. तेवढ्यात एकजनानं चुलीत जाळ केला. त्या गडद अंधारात आम्हांला एकमेकांचे चेहरे दिसायला लागले.

मी बोलता बोलता त्यांना माझा परिचय दिला. ‘येणार नव्हतो; पण पालावर रडण्याचा आवाज आला म्हणून आलो’, म्हणलं. कारण याच पालातून माझ्या आयुष्याचा प्रवास झाल्याचं सांगितलं. तवा त्यातला एक जन म्हणतो, ‘‘तसं काही नाही सायब.  झोपायची येळ असतीया, लेक्रबाळं चिरचिर करत्यात. ते तुम्ही रडण्याचा आवाज ऐकीला असेल.’’

त्याचं वाक्य कट करत दुसरा म्हणतो, ‘‘सायब आपल्या लोकाईची भाषा तसीच हाय, एटन छाप लोकं आपले. घोट-दोनघोट मारून बडबड करत्यात; ती बडबड तुम्हांला रडण्याच्या आवाजावानी ऐकू आली असन.’’

तिकडे पलीकडे पालात दोन-तीन लेक्रं हुंदके देत होते. त्यांना दोन बायका समजवत होत्या. ‘रडू नका’ म्हणत होत्या.

चूप राह्यला सांगत होत्या. तवा मी विचारलं, ‘‘त्या पालात कोणीतरी रडतं आहे.’’

‘‘अं, ती लेक्रं आहेत सायब,’’ ते.

‘‘हं, त्यांच्याच रडण्याचा आवाज मी ऐकला वाटतं.’’

‘‘छे, त्यांचा आवाज ऐकला नसंल. ते तर आताच रडत आहेत.’’

तेवढ्यात दारू पेलेला एक बुढा म्हणतो, ‘आरे, आपल्या माणसाला तरी खरं सांगा ना रे.’’

तवा समदेच त्याच्यावर सुटतात, आन त्याला गप राह्याला सांगतात. पण तो आर्धी-पाव दारू मारून असतो. कशाचा चूप बसतो. ‘‘तुम्ही मला दबक्यात घेत हाईत का? म्या लयी डाव जेलात जाऊन आलो. जे होईल ते होईल, म्या खरंच सांगतो...कवितेचा तिकडं जीव चालला, आन्‌ तुम्ही मला चूप राह्याला सांगता... आरे जे खरं हाय ते सांगा. आपला माणूस हाय. काहीतरी करंल...’’

मी, ‘‘काय सांगतात काकाजी?’’

ते, ‘‘काही नाही, दारू पेऊन बडबड करतोय मथारा.’’

तेवढ्यात त्या पालातली लेकरं रडायला लागली. मी उठलो तवा दोगं-तिगं मला खाली बसवत म्हणाले, ‘‘आहो सायब, जरा बेकार घडलं.’’

मी, ‘‘म्हणजे?’’

ते, ‘‘जाऊ द्या ना सायब, आपन आपलं बोलू.’’

तवा मध्यातच एक बाई म्हणाली, ‘‘काही नाही सायब,लोकाईन कविताची इज्जत लुटली.’’

‘‘कोणत्या लोकाईन.’’

‘‘कोनाला ठाऊक.’’

‘‘तिला बलवा.’’

‘‘मेऊ शकत नाही ती, तिची कंबर मोडली. मेल्याईन इज्जत लुटली त लुटली, पण बिचारीची कंबर मोडली.’’

तिने तसं म्हणताच दारू पेलेले दोघं-तिघं जन तिच्यावर सुटले. ‘कशाला बडबड करती, बाराच्या भावात जाशील’म्हणले. ती ताडताड उठून गेली आन्‌ पालात घुसली. मग तिला खूप वेळा आवाज दिला, तिला बोलावलं; पण ती आलीच नाही...

मी उठलो. माझ्याबरोबर समदेच उठले. गेलो त्या पालाजवळ. मला बघताच लेक्रं रडायाचे थांबले. मी मोबाइलने उजेड केला. एक नागवी बाई पडलेली. मी मोबाइलचा उजेड बंद केला. ‘चला, उचला, हिला सरकारी दवाखान्यात घेऊन जाऊ’ म्हणलं. तवा ते म्हणतात, ‘‘आता सायब, हिला कशाला दवाखान्यात नेयाचं. ती मार्गी लागली. एक-दोन दिवसाची सोबतीन हाय, वाट लागली की देऊ खड्‌ड्यात दाबून.’’

‘‘काय बोलताय तुम्ही.’’

‘‘जे खरं हाय तेच बोलतो.’’

‘‘आरे बाबाहो, दवाखान्यात नेल्यावरती वाचेल.’’

‘‘आता कशाची वाचती सायब ती.’’

‘‘आपन प्रयत्न तर करून बघू.’’

‘‘आम्ही तिला घेऊन तुमच्यासंग नाही येणार. ते पोलीसवाले उलटसुलट विचारून आमच्यावरच केसेस भरतील. बिनगुन्ह्याचंच बिनभाड्याच्या खोलीत जावावं लागंल.’’

‘‘आरे, काही होत नाही. मी आहे ना संगं. तुम्ही हिला दवाखान्यापसवर नेऊ लागा. मग वापस या. पुढे मी बघतो.’’

‘‘जाऊ द्या ना सायब, आज नाही उद्या दिवसा नेऊ हिला सरकारी दवाखान्यात.’’

‘‘आरे आता कसं करू यार.’’

मग जराशा वेळानं ‘काम झालं ते सांगा’ म्हणून त्याईला पुन्हा पुन्हा विचारलं, पण ते सांगतच नव्हते. आख्रीला कंटाळूनमी त्याईला म्हणलं, ‘‘अरे बाबाहो, मला काही भेयाचं कारण नाही.  मी आपलाच माणूस आहे. मला सांगा ना...’’

मग ते बोलायला लागले. ‘‘आता आपलाच माणूस म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो सायब. हिचं नाव कविता धारणे. पोलिसांनी हिच्या नवऱ्याला एक दिवस पेट्रोल पंपावर दरोडा टाकला म्हणून पकडून नेलं. साले पोलीसवाले कोठंबी, कोणीबी चोरी केली की आपल्याच लोकांला पकडून नेतात. हिच्या नवऱ्यात मुंगी मारायची ताकत नव्हती, तर दरोडा कसा टाकंल? आमची भी बिराडं होती संगमंगच. रात्रीपोलिसांनी पालावर गराडा टाकला. आम्ही समदे निसटलो, पण हिचा नवरा सापडला. तापानं बिमार होता म्हणून पोलिसांच्या हाती लागला... पोलिसांनी त्याला पकडून नेल्यावर खूप कुताडला. एवढा कुताडला की सुटून आल्यावर तो पांगळाच झाला... त्याला बरोबर चालता येत नव्हतं. त्याच्या समद्या आंगावर पोलिसांच्या माराच्या गाठी गाठी झाल्या. त्यातच तो मेला...

‘‘कविताला दोन-तीन बारकी बारकी लेक्रं हाईत. बाई लईच पतिव्रता हाय. तिच्या डोक्यावरचा पदर हटायाचा नाही. तिचा नवरा मेल्यावर ती तिच्या  मथाऱ्या सासऱ्याचे आसऱ्यानं राह्याची. लेकराईला,मथाऱ्या सासऱ्याला घेऊन ती आमच्या बिराडासंग मुलूख हिंडायची...

‘‘सातआठ दिवस झाले. आम्ही चंद्रपूरला आलो. शहर मोठं हाय. हितं भीक चांगलं मिळतंया. कविता रोज आमच्या बायकांसंग गावात भीक मागायला जायाची. लेकरंबाळं जगवायाची. आता सरकारानं आपल्या जातीवर शिकार करण्यासाठी बंदी घातली. शिकार आपल्या बापजाद्याचा धंदा, तोच बुडाला. आपल्या लोकांला, दुसरे लोक चोरच समजतात. काम मागायाला लोकाईकडं गेलं तर काम मिळत नाही. आता पोटासाठी काहीतरी करावं लागतं ना...त्याच्यानं खुशाल भीक मागतु आन जगतु...

‘‘तिचा सासरा खूप मथारा झालता. आठ-पंधरा दिवस झाले, तो मेला. तिची हिंमतच खचली. गळ्याला दोन-तीन लेकरंबाळं आन्‌ आधाराला गडी माणूस राहिला नाही म्हणून...तो बघा, तो झेंडा दिसतो ना, तिथंच तिच्या सासऱ्याला पुरलं...

‘‘रोजच्यावानी कविता सकाळी भीक मागायला गेली. दोन दिवस आलीच नाही.  आम्ही हवालदिल झालो.  नेली असन पोलिसांनी पकडून वाटलं. आमचा जीव पालावर लागंना. हिची लेकरंबाळं भी हुरहूर करू लागले. काम करावं काही सुचंना. आख्रीला हिंमत करून आम्ही गडी माणसं गावात तिला शोधू लागलो... ती सापडली नाही...

‘‘आज सकाळी... त्या समुरच्मा बेसरमीची झाडं दिसतात ना, तेथं कोणीतरी इवळत असल्याचा आवाज येऊ लागला. तेथं आमचा एक गडी हागायला गेल्ता. त्याच्या ध्यानात आलं. त्यानं आम्हांला बोलावलं. आम्ही कोन हाय म्हणून लपत लपत त्या ईवळणाऱ्याला बघायला गेलो.

‘‘बघतो तर काय, तिथं कविताबाई नागवी पडलेली. तिला तसंच उचललं. आनलं पालावर. तिची कंबर मोडली. तिचं रक्तसुरू हाय. आता ती होशमधी नाही. ती बोलत-चालत नाही. नुसती बघते. तिच्यावर बलात्कार झाला सायब. सायब, साल्याईनं तिच्यावर बलात्कार केला तर केला, तिची कंबर मोडून टाकली. साले ट्रकवाल्याईनं तिचा खंगाळा केला असन. तिचं जाऊ द्या सायब, आपन दुसरं बोलू. जिवाचं बोलू. तिचं बोलून तरी काय करायाचं आता. ती मार्गी लागली सायब.’’

मी, ‘‘आरे बाबाहो, एवढा मोठा अन्याय आपल्यावर झाला. आपन चूप बसायाचं. चला, उचला, आपन तिला दवाखान्यात नेऊ. पोलिसात तक्रार करू.’’

‘‘सायब, तुम्ही आमचे हाईत म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं. आता पोलिसात गेलू तर ते आमचीच उलट तपासणी करतील. आम्हांलाच ठाण्यात नेतील.  आमचं जगनं आवघड करतील.’’

‘‘मी आहे ना.’’

‘‘सायब, ‘मी आहे ना’ म्हणणारे टायमावर निसटून जातात, आम्हीच फुकट मरतू. या अगोदर दोन-तीन डाव असं घडलं. जाऊ द्या ना सायब, आम्ही कसंतरी भीक मागून जगतो, लेकरंबाळं जगवितो. तसं तर या गावात भीक चांगलं मिळतं. आम्ही कसेतरी पोटापाण्याला लागलो. आम्हांला जगू द्या ना...’’

‘‘पुन्हा असं दुसऱ्या बाईवर घडलं तर?’’

‘‘जे नसिबात असतं तेच घडतं सायब. सटविका लिखा कभी नही चुका... जन्मताच माणसाच्या कपाळावर जे देवानं लिहलेलं असतं ते कवाच चुकत नाही. आता कविता धारणेच्या नसिबात जे होतं तेच घडलं...’’

‘‘आरे बाबा, नसिब फिसीब काही नसतं. ह्या खुळचट कल्पना आहेत.’’

‘‘असं कसं म्हणता सायब?’’

असं बोलता बोलता बरीच रात झाली. पोलीस केस करायला आन दवाखान्यात नेयाला ते राजी झाले. पोलीस स्टेशनमध्ये सकाळीच जाऊ म्हणले.

मी पुन्हा उठलो. मोबाइलचा उजेड केला, कविता धारणेपासी गेलो. तिचा चेहरा न्याहाळू लागलो. ती किलकिल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघायली. तिची लेकरंबाळं तिच्या हाडामांसाच्या शरीराला बिलगलेली. हिचं काही बरंवाईट झालंतर ह्या किलबिलत्या जिवांचं कसं होईल...

मी निघालो. चालत चालत घरी आलो. बायकोला कविताची हकिकत सांगितली. ती अस्वस्थ झाली. आम्ही जेवन न करतातसेच झोपलो. झोपच येईना. डोळ्मांसमोर कविताच यायली.

सकाळी लवकर उठलो. प्रा.इसादास भडके यांना भेटलो. समदी हकिकत सांगितली. आम्ही दोघांनी कामाला सुटी दिली. निवेदन तयार केलं. कविताला सरकारी दवाखान्यात नेयाची तयारी केली. तिला अँटोने दवाखान्यात आनायाचं ठरविलं.

आम्ही दोघांनी अँटो घेतला, गेलो पालावर. समदे वाटच बघत होते. अँटो थांबला, उतरलो. बघतो तर काय कविता धारणे कायमची गेली. तिच्या मातीची तयारी सुरू झालेली. मी अंगातला शर्ट काढून तिच्या उघड्याबंब आंगावर झाकलं.

मग बसलो अँटोत. निघालो. आलो वापस. राज्य सरकार, केंद्र सरकार, मानवाधिकार आयोग, गृहखाते, पोलीस स्टेशनमांच्यासाठी तयार केलेलं निवेदन फाईलमध्ये ठेवून दिलं.

पाच-सात दिवसांनी त्या बेड्याकडे फिरत फिरत गेलो. तिथं दोन झेंडे दिसत होते. एक तिच्या सासऱ्याचा अन्‌ दुसरा कविताचा. तिथं पालं नव्हती. तीन दगडांच्या चुली, साफसूफ केलेली जागा, आन्‌ हे दोन झेंडे होते. मग भरून आलं. थोडावेळ थांबलो. मनात अनेक विचार येत होते, जात होते. तसाच माघारी फिरलो. आलो घरी. बरेच दिवस अस्वस्थ होतो.

आता त्या हायवेने गेलो की, मला ते दोन झेंडे दिसतात. कविता माझ्या काळजावर घाव घालून जाते. मला उभा फाडून टाकते. मी तिला विसरण्याचा प्रयत्न करतो, पण ती विसरत नाही. अशा अस्वस्थ घटनांवर मी छोट्यामोठ्या कविता लिहितो. आतापर्यंत खूप कविता लिहिल्या... या कवितेवरही कविता लिहिण्याचा खूप प्रयत्न केला, पण जमलं नाही. या कवितेवर मनासारखी कविताच लिहिता आली नाही.

पालावर अशा कितीतरी कविता गायब झाल्या, त्याचं काय? त्यांच्या प्रश्नांची उत्तरं कोणी देयाची... नारायण सुर्वेंची कविता मात्र मनात घोळते-

जीवनापासून पळुन जावे तर जावे कुठे?

आकाशीच्या बापाशी पहिल्यापासुन वैर होते

एकट्यानेच गज तोडुन उडावे, एवढे बळ कुठे?

अवघ्या वाटांवर ठायी ठायी पहारे होते

बोंब मारून बोलवावा असा स्वर्ग आहेच कुठे?

ज्याच्यासाठी आमचे आतडे तिळतिळ तुटत होते

उठ! तेवढी कोपऱ्यातली तलवार शोधुन ठेव

एकेकाळी तिच्यावर मी माझे नसीब घासले होते.

(दिल्ली येथील ‘संस्कृती’ प्रतिष्ठानच्या वतीने 35 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या साहित्यिकाला दिला जाणारा सन्मान, या वर्षी अशोक पवारला मिळाला आहे. ‘बिराड’ आणि ‘इळनमाळ’ ही त्याची पुस्तके प्रसिद्ध आहेत.)

Tags: स्त्री अन्याय पालावरच्या सत्यकथा भटके जीवन अनुभव सत्यकथा कथा लेखक अशोक पवार   Women Unjust   sad story realistic Life story Writer Author Ashok Pawar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके