डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अजीम नवाज राही यांचा नवा काव्यसंग्रह : कल्लोळातला एकांत

उगम पावलेली नदी सतत पुढे पुढे वाहत जाऊन समुद्राला मिळते. माणसांच्या जीवनाचेही तसेच आहे. कितीही खाचखळगे, वळणे येवोत, माणसाला काळासोबत पुढे जायचे असते. अजीम कवितेच्या क्षेत्रात पुढे पुढे जाऊन आयुष्याच्या एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर उभा आहे. सतत पुढे पुढे जाण्याच्या जीवनओघात आनंदाचे, सुखाचे क्षण फारच कमी येतात, त्या मौलिक क्षणाची साक्षीदार त्याची अस्वस्थ कविता आहे. तो कवितेला जाऊन मिळाला. जशा अनेक नद्या समुद्राला जाऊन मिळतात, समुद्र मात्र सर्वांशी समान वागतो. तशी त्याची कविता आहे. 

पहिला शांताराम पोटदुखे चंद्रपूर भूषण साहित्य पुरस्कार कवी अजीम नवाज राही याला देण्यात आला. त्याने पुरस्कार स्वीकारला. तो निघाला, जाता जाता त्याने मला त्याच्या ‘कल्लोळातील एकांत’ या कवितासंग्रहाची एक प्रत सप्रेम भेट दिली. त्यावर त्याने लिहिलंय- ‘अशोकराव, तुमचा-माझा प्रवास वेगळा नाही.’ यापूर्वी मी त्याचा ‘व्यवहाराचा काळा घोडा’ हा कवितासंग्रह वाचला. तो 2004 साली प्रकाशित झाला होता. त्या कवितासंग्रहाला महाराष्ट्र फाऊंडेशनचा, शासनाचा व इतरही पुरस्कार मिळाले. तो कवितासंग्रह गाजला त्यातील वेगळ्या विषयामुळे व नवीन शब्दांमुळे. त्याची ‘पडझड मोहल्ल्याची’ ही कविता दहावीच्या अभ्यासक्रमात आहे. तो राज्यातल्या उत्तम निवेदकांपैकी एक आहे. बापाच्या आग्रहाखातर सातवीपर्यंत उर्दू शिकला. पुढे उर्दू शिकण्याची व्यवस्था झाली नाही, म्हणून आठवी मराठीत शिकला. शाळा बोंबलली. आईसकांड्या विकल्या. पानटपरीवर राहिला. सहकारमहर्षी भास्कररावजी शिंगणे यांनी त्याला सूतगिरणीत नोकरी लावून दिली. व्यवहाराचा काळा घोडा त्यांना समर्पित आहे. आता सूतगिरणी बोंबलली, जगण्याची लढाई सुरू झाली. त्याला कवितेने तारले. तो उभ्या महाराष्ट्रात कविता म्हणत आणि निवेदनं करीत फिरतो. तो साखरखेड्याच्या मोहल्ल्यात राहतो. मला वाटते कविता, कादंबरी, कथा अजून बरंच काही जगण्यातून आलं तर ते फसवं किंवा धोकेबाज नसतं. ते माणसाचं माणूसपण जपणारं असतं. म्हणून अजीम नवाज राहीचा मी वैयक्तिक परिचय या ठिकाणी करून दिला. 

मानवाच्या विकासासाठी ज्याप्रमाणे स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक मूल्यांची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे साहित्याचीसुद्धा निकड असते. तळागाळातील लोकांच्या उत्थानाकरिता मानवी हक्काची जाणीव करून देणाऱ्या साहित्याची आत्यंतिक गरज भासते. मानवी जीवनाच्या स्वप्नपूर्ततेसाठी, आशावादी जीवनासाठी धडपड करणे हा मानवी मूल्यांचा अविभाज्य घटक आहे. येथील माणसाने आशावादी जीवन जाणिवेतून, उद्याची क्षितिजे सहजपणे न्याहाळली पाहिजेत. मानवी आशावाद, मानवी संवेदनाशी व त्यांच्या जगण्याच्या सुख-दु:खाशी बांधील असला पाहिजे. ह्या सर्व प्रसंगांतून माणसांचा अभेद्य प्रवास होतो. हा अभेद्य प्रवास जो काळाबरोबर मुठीत पकडतो तो समाजाचा खऱ्या अर्थाने हीरो असतो. कधीकधी माणूस झुंजीत हरतो हे आपण पाहिलेले आहे. परंतु हेही ध्यानात ठेवणे आवश्यक आहे की, तो त्यातूनही फिनिक्ससारखे नवे जीवन, नवे रूप घेऊन आपल्या विजयोत्सवाकडे निघतो. अशा लोकांचे जीवन ‘कल्लोळातला एकांत’ या कवितासंग्रहात अजीम नवाज राही यांनी शब्दबद्ध केले आहे. 

मोहल्ल्यातल्या शोषित माणसांचं जगणं उभं करताना मूल्यनिष्ठ वृत्तीतून त्याची कविता जगाकडे बघते. व्यवहारवादी जगात मानवी मूल्यांचे प्रसवन कविता करते. यातून व्यक्तीचे पद, वर्ग, सामाजिक दर्जा ह्यासारख्या गोष्टीवरून न ठरवता निखळ मनुष्यतेच्या दृष्टीने जगाकडे पाहण्याची दृष्टी त्याच्या कवितेला प्राप्त होते. 

आज समाजात सामाजिक अंगाने होणारे परिवर्तन अपरिहार्य असले तरी हे परिवर्तन किती प्रमाणात सर्वकल्याणकारी आहे, यावरून त्याची गुणवत्ता तपासावी लागते. जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण म्हणजे ‘जाखाऊ’ ही संज्ञा गेल्या दशकंची महत्त्वपूर्ण भेट आहे. ह्या शब्दाला केंद्रस्थानी ठेवूनच समाजाच्या सर्व क्षेत्रांशी निगडित परिवर्तन होणार आहे. मात्र ह्या ‘जाखाऊ’मुळे सर्व स्तर सुखी झालेत काय? ह्या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी असेच आहे. उलटपक्षी सर्व स्तरांतील विषमता विपरीतता आणि विसंगती ही काळाची बाब आहे, आणि हाच अस्वस्थ करणारा विषय गेल्या दशकात माणसांच्या केंद्रस्थानी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष येणे अपरिहार्य आहे. तसा तो काही प्रमाणात गेल्या दोन दशकांत आलेला आहे, त्याचे जनसामान्य माणसांना, रोजी-रोटीसाठी लढणाऱ्या माणसांना दाहक चटके बसत आहेत. त्या चटक्याचे प्रतिबिंब ‘कल्लोळातला एकांत’मध्ये हुबेहुब उमटलेले दिसते. 

या कवितासंग्रहाची निर्मिती राजन खान यांच्या ‘अक्षर मानव’ प्रकाशनाने केली आहे. निर्मिती चांगली असून कवितासंग्रह 213 पृष्ठांचा आहे. सर्व कविता मुक्त छंदातील आहेत. आपल्याला माहीत नसलेल्या शोषितांचे एक वेगळे जग अजीम नवाज राही याने ‘कल्लोळातला एकांत’ या कवितासंग्रहात उभे केले आहे. हा कवितासंग्रह वाचताना मला कादंबरी वाचल्याचाच भास होत होता. 

एकीकडे विज्ञानयुगाने यंत्रसामग्रीच्या माध्यमातून केलेली भौतिक साधनांची रेलचेल तर दुसरीकडे संधीअभावी आर्थिकदृष्ट्या भणंग आणि मानसिकदृष्ट्या भयग्रस्त झालेला एकाकी माणूस, एकीकडे ऐश्वर्याचा महापूर तर दुसरीकडे उघडा पडलेला रखरखता खडक. ही समाजव्यवस्थेतील विसंगती आहे. खरे म्हणजे या द्विदशकाची देन आहे. उभ्या महाराष्ट्राचे चित्र बदलले आहे, तरी आज सर्वसामान्य माणूस सुखी का नाही, त्यांच्या कुटुंबात मरणातील कलह का आहेत, शेतकरी आत्महत्या का करतो, तर मौलवी भीक का मागतो असे अनेक महाकाय प्रश्न निर्माण झालेले आहेत. सर्वसामान्यांचे जीवन सुखी-समाधानी झाले पाहिजे यासाठी ‘कल्लोळातला एकांत’ हा कवितासंग्रह जनसामान्यांचे प्रश्न या धकाधकीच्या युगात जगण्याशी नाळ ठेवून समाजासमोर मांडतो. 

उगम पावलेली नदी सतत पुढे पुढे वाहत जाऊन समुद्राला मिळते. माणसांच्या जीवनाचेही तसेच आहे. कितीही खाचखळगे, वळणे येवोत. माणसाला काळासोबत पुढे जायचे असते. अजीम कवितेच्या क्षेत्रात पुढे पुढे जाऊन आयुष्याच्या एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर उभा आहे. सतत पुढे पुढे जाण्याच्या जीवनओघात आनंदाचे, सुखाचे क्षण फारच कमी येतात, त्या मौलिक क्षणाची साक्षीदार त्याची अस्वस्थ कविता आहे. तो कवितेला जाऊन मिळाला. जशा अनेक नद्या समुद्राला जाऊन मिळतात, समुद्र मात्र सर्वांशी समान वागतो. तशी त्याची कविता आहे. संपूर्ण मानव जात मूलभूत गरजांपासून वंचित राहू नये, हे जग अतीव सुंदर बनावे, जगण्याच्या व्यवहारवादात अडकलेली सर्व माणसं शोषणमुक्त व्हावीत याचे भान आणून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ‘कल्लोळातला एकांत’ करतो असे मला वाटते. वानगीदाखल या कवितासंग्रहातील एक कविता....

कावलो जीव 

लावताना मेळमाफ रोजगाराचा 
परततात घेऊन धग अपमानाची मोहल्लेकरी 
विसरतात दिवसभरातला घटनाक्रम जहरी 
बघून चेहरे चिल्ल्यापिल्यांचे. 
हरपतो तणावात चेहरा आयुष्याचा 
येत नाही जगता मनासारखे 
होते कटकटीने सुरुवात दिवसाची 
असतो एखादा घाव हमखास 
जातिवाचक शिवीचा मावळताना 
करू शकत नाही जगण्याचा विचार 
मोहल्ल्याला वगळून मी. 
आहेत खोलवर रुजलेली 
अस्तित्वाची मुळे मोहल्ल्यात 
माणसे, शेळ्या, कोंबड्या बदकासह 
रेंगाळतो माझ्यात सदैव 
संपते त्याच्या मायाळू बाहूत 
भटकंती दिवसाची 
ओळखतात मोहल्ल्यातल्यांना 
कुत्री कसायाची हिंसक 
जात नाहीत आंगावर करून चाल 
आंधारात लोडशेडिंगच्या 
घालतात गराडा नवख्याला 
भांडणानंतरच्या एकोप्यात 
सापडली बीजे उदारतेची 
जुंपले कामाला लग्नकार्यात शत्रू कट्टर 
पाण्यात एकमेकांना बघणारे 
माणसं काही खुन्नसखोर 
काही शब्दाला जागणारी 
कापली नाही मोहल्ल्याने 
रसद विषयांची कवितेला लागणारी 


‘कल्लोळातला एकांत’ 
अजीम नवाज राही 
अक्षर मानव प्रकाशन, 
पृष्ठे : 213, किंमत : 300/- रुपये 

Tags: कवितासंग्रह पडझड मोह्ल्ल्याची व्यवहाराचा काळा घोडा अजीम नवाज राही कल्लोळातला एकांत अशोक पवार Kavita Sangrh Maharashtra Foundation Padzad Mohallyachi Vyavaharacha Kala Ghoda Ajeem Navaz Rahi Kallolatla Ekant Ashok Pawar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके