डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

बापाच्या हाडावर अन्न शिजवून खाताना...

‘अशोकराव ज्याला आम्ही काबाडकष्ट करून शिकविला, ज्याच्यावर आमचा भरोसा होता, त्या आमच्या भावानं घर पुढं नेवावं असी आमची इच्छा होती, पण तो निसटला. नोकरीला लागला, शहरात राहायला गेला. त्याने बंगला बांधला, आता तो मोठा माणूस झाला. आई, बाबा गेलते राह्याला, त्याच्याजवळ आई-बाबाला राहता येत नाही म्हणे तिथं. खेड्यातली लेडं. आडाणीचोट माणसांना तेथे सपादून घेतलं नाही, हाकलून दिलं राव. पहिले तरी गावाकडे आला की पैसे आदले देयाचा. मायबापाला मह्या गळ्याभोवती टाकून, शिकवून सवरून निसटला बेट्टा. अशोकराव भेटला कवा तर त्याला समजावा, सांगा. मही खूप आबाळ चालली म्हणून.’ तो बोलत होता, मी ऐकत होतो. शिकून माणसं परिस्थितीचे भान ठेणार नसतील, रिश्ते नाते तोडणार असतील, माणूस आन्‌ माणुसकी त्यांना समजणार नसेल तर असल्या शिक्षणाचा काय उपयोग? बापाची हाडं जाळून ताजमहाल उभा करण्यासारखी ही गोष्ट नाही का?

 

 -। 1 :-

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्याने शिक्षण घेतले. शिक्षणाच्या चार डिगऱ्या कमविल्या. नोकरीसाठी सरकारी-दरबारी पायपीट केली. मला आरक्षणाचा फायदा झालाच पाहिजे म्हणून ओरडला. आरक्षणातही देण्याघेण्याची चढाओढ बघून थक्क झाला. व्यवस्थेत ॲडजेस्ट होण्यासाठी धडपडू लागला. त्यांच्याकडे तीन एकर जमीन होती. खूप चांगली नव्हती, पण त्या जमिनीवर त्याचे कुटुंब पोसल्या जात होते. त्याला एक भाऊ होता, त्याने बापाजवळ आग्रह धरला जमीन विकण्याचा. बाप दुसऱ्या पोराचं कसं म्हणायचा. तवा तो म्हणाला, ‘कुटुंबाचे विकासासाठीच मी शाळा शिकलो. एक डाव नोकरी लागल्यावर पैसाच पैसा.’ ह्या तीन एकरातून त्या भावाच्या हिश्श्याला दीडच एकर जाते ना, त्याला 10 एकर जमीन घेऊन देईन.

बापानं त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. ती तीन एकर जमीन जाळली. हा एका संस्थेत प्राध्यापक म्हणून चिटकला. पोरगा चांगला आहे, हातातून सुटला नाही पाहिजे. संस्थाचालकांनी हुशारी केली. आपलीच भाची त्याला देऊन टाकली. भाची जेवढी उंच होती तेवढीच तिची कंबर होती. समदं धावपळीत झालं. ती दिसायला जेवढी बेढब होती, त्याच्यापेक्षा कितीतरी पट बोलायला हुशार व्हती. सासऱ्यानं सरांना फुकटात घेऊन दिला. सरांनी आपला संसार उभा केला.

सर समदी पगार बायकोच्या हातात देयाचे. भांडे घासू लागायचे. साड्या धुवू लागायचे. जागोजाग मी किती चांगला आहे याचा प्रत्यय बायकोला व सासरच्या लोकांना आनून द्यायचे. आपल्या गावाचा पोरगा प्राध्यापक झाला म्हणून लोक सुरुवातीला त्याच्याकडे यायचे. माय बाप भाऊ तर पडलेलेच असायचे. हळूहळू त्याचं येण्या-जाण्याचं प्रमाण कमी झालं. मायबाप भाऊही यायला भेऊ लागले.

सर, वहिनी कवा कवा मला भेटायाचे. कार उभी करून दोन शब्द मायेने बोलायचे. एखाद्या दिवशी बायको पोरांना घेऊन ये म्हणायचे. बायको पोरांना घेऊन रिकामा टाइमपास मला कधी जमला नाही. सर खूप उत्साहाने बोलायचे. ‘चळवळीचं काही खरं नाही, खूप भ्रष्टाचार वाढला. नव्या पिढीत जाणिवा नाहीत, खाजगीकरणात समदं बेचिराख झालं. हे कोणीतरी रोखायला पाहिजे. सब बरबाद हो गया, शाहू, फुले, आंबेडकरांचे नावाने यांनी सुरू केली, असं बरंच काही. नाहीतरी प्राध्यापक किती बोलतात आपल्याला माहीत आहे. मग त्यांना मी प्रत्येक वेळेस कटवायचो.

कार्यक्रमाची पावती फाडायला कार्यकर्ते गेले की, सर लपून बसायाचे असे लोक म्हणायचे. आता सर दिसले की मी पळून जातो.

एक दिवस रात्रीच त्याचा बाप, भाऊ, माय, भावाची बायको भेटले. सरांमुळे ओळखीचेच झाले होते. मी विचारपूस केली. सर व सरांच्या बायकोने हाकलून दिलं म्हणाले. धडाधडा रडायला लागले. तवा सरांचा पूर्वेतिहास माहीत झाला. मी त्यांना घेऊन सरांचे घरी आलो. सर होते. ‘सर कशाला लंब्याचौड्या बाता ठोकता- भ्रष्टाचार वाढला.’

तीन एकर जमीन विकून तुम्हीच तर भ्रष्टाचार केला. भ्रष्टाचार निर्मूलनाची सुरुवात तुम्ही तुमच्यापासून करायची होती. सर खाली मुंडकं घालून बाहेर गेले. त्यांचे मायबाप भाऊही वहिनीसगट गेले. मी घरी आलो. बापाच्या हाडांवर अन्न शिजवून खाणारं नवं जग आवतरतंय याचा अनुभव आला. जाऊ द्या साला.

 -: 2 :-

एक मुलगा चांगल्या मार्कांनी पास झाला. खेड्यातून शहरात शिकायला आला. त्याच्या घरची परिस्थिती जेमतेम होती. त्याचे मायबाप आन्‌ मोठा भाऊ राबराब राबून त्याला महिन्याकाठी जेमतेम ऐपतीनुसार पैसे पाठवायचे, त्यात त्याचं जगणं आन्‌ शिक्षणपाणी होयाचं. दोन चार मुलांसोबत एका खोलीत राहून तो कॉलेज शिकू लागला. त्याच्या खोलीच्या शेजारीच आमची खोली होती.

पंधरा एक दिवसाला त्याचा बाप त्याला भेटायला यायचा. येताना राशनपाणी घेऊन यायचा, त्याचा बाप आला की, हमखास मला भेटायाचा, त्याच्या खेड्याचा समदा इतिहास सांगायचा. आता खेड्यात मजा राहिली नाही. खेडी राजकारणाने सडली. नव्या पिढीला हाताला काम राहिलं नाही. जगनं अवघड झालं. कोणी कोणाला बोलत नाही. खेड्यात जगनं असुरक्षित झालं. गावाशी संबंध असणारा नोकरशहा वर्ग शहरात राहतो. गावाकडे ढुंकून बघत नाही. ‘तो दिन जाव और पैसा आव’ अशा पद्धतीने वागत आहे, कोणताही कागद काढायचं म्हटलं की, नोकरीवाले लुटतातच. योजना आली की, सतराशे बाहात्तर कागद लागतात. कागदपत्रं काढता काढता नाकीनऊ येते. कोणत्याबी हापिसात गेलं की, चेप्राशी सतावत्यात. लहान सायब खिसे तपासत्यात आन्‌ मोठ्या सायबाला येळच नसते. लहानापासून मोठ्यापसवर पार लुटालुटीची साखळीच हाय म्हणत्यात. आता आमच्यासारख्या थोडंफार शिकलेल्या माणसाचं काहीबी खरं नाही. आता धोतऱ्या धोतऱ्याच राहिला, आता ह्या धोतराला कवडीची किंमत राहिली नाही.

भाऊसाहेब तुम्ही ग्यानी ध्यानी हाईत. मह्या पोराकडे धान द्या, पाच पन्नास रुपये एका वक्ताला लागले, तर त्याला द्या. दुसऱ्या चेकराला म्या आलो की देतुच, त्याला खूप शिकवून नोकरीलाच लावतो. अशा आन अशा बऱ्याच वाढोळपसवर गप्पा मारल्यावर ती म्हणजे माला हमखास दोन कप चहा करून आननार. चहा पेला की, काकाजी निघणार. काकाजीविषयी मला फारच आदर. मुलाला शिकविण्यासाठी त्याची केवढी प्रामाणिक तळमळ! साला असा बाप जर प्रत्येकाला मिळाला, तर आमचे प्रामाणिक कवी मायऐवजी बापावर कविता रचतील. त्याईचं काहीबी असो मला जर असा बाप मिळाला असता तर मी आहे त्यापेक्षा निश्चित वेगळा असतो.

मी येताजाता त्या पोराकडे ध्यान देऊ लागलो. तो पोरगा मला प्रामाणिक वाटू लागला. एक दिवस पेट्रोलपंपावर मी गाडी घेऊन गेलो असता तो मला गाडीत पेट्रोल टाकताना दिसला. मला बघताच तो घाबरला, मी घरी आलो.

दुसऱ्या दिवशी तो माझ्याकडे आला. भाऊ बाबाला काही सांगू नका. मला मोबाईल, चांगली कापडं घेयाची होती म्हणून थोडे दिवस काम करतो. नाहीतर कॉलेजात काय असतं. पैशाबिगर काहीच होत नाही. ते मी कमवतो. त्याचा बाप मला नेहमीप्रमाणे भेटायला आला. मला राहवलं नाही. तुमचा पोरगा अशान्‌ असं शिक्षण सोडून काम करतो म्हणतो. बुढा भनकला. रागातच उठला, ताडताड पोराकडे गेला. त्याला दोनचार गोष्टी सुनावल्या. नंतर पोराने आमच्या रूमपासून लांब रूम केली. तरी काकाजी आले की, मला भेटायला हमखास यायचे. आता त्यांच्या पोरातलं आन्‌ माझ्यातलं अंतर वाढलं होतं. आमचा काहीच संबंध येत नव्हता. हळूहळू काकाजीचं माझ्याकडे येणं बंद झालं. तीन वर्षांनंतर तो पोरगा हॉटेलात मला भेटला. प्लेटा विसळत होता. मला बघताच तो माझ्याजवळ आला. रडायला लागला. भाऊ, त्या वेळेस तुमचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. नापास झालो. घरचा संबंध तुटला, आता म्या काय करू सांगा? वेळ गेली नाही, पुन्हा शीक. संधीचं सोनं कसं करता येईल बघ. ग्लोबलायझेशनच्या झाकोळ्यात येऊन बापाच्या हाडाची काडं करू नको मित्रा. नसता स्पर्धेच्या युगात आपलं भविष्य मायनस झीरोच असेल.

-: 3 :-

माझा वर्गमित्र रत्नाकर (नाव बदलले) प्राध्यापक झाला. आम्ही दोघेही पाचवी ते दहावी एकाच शाळेत व वसतिगृहात होतो. आम्ही एकमेकांवर जिवापाड प्रे केलं. आभ्यासाला, हागायला- मुतायला व जेवायला संगच राह्याचो, जायाचो.

दहावीनंतर मी बिराडात हरवलो. आन्‌ तो परिस्थितीवर मात करीत पुढे शिकत गेला. एका संस्थाचालकाची मुलगी बायको केली आन्‌ रत्नाकर संस्थेवर प्राध्यापक म्हणून लागला. गरिबीतून आला होता बिचारा. लाईफ बनविण्यासाठी तेवढी ॲडजेस्टेंट तर करणारच बिचारा. हिंगोलीतच ते महाविद्यालय आहे. तो प्राध्यापक कॉलनीत राहायचा. त्याचं राहणीमान हायफाय. शेजाऱ्याच्या घरी एक पांढरं बुटकं कुत्रं होतं. रत्नाकरही एक बुटकं कुत्रं घेऊन आला. तो हापपँट घालून रोज कुत्र्यासंगं व्यायाम करायाचा. रोडानं सकाळी सकाळी फिरायाचा.

एक दिवस त्याची व माझी भेट झाली. तो भरभरून बोलला. काय बोंबलत हिंडतो बिराड घेऊन म्हणला. एक झोपडी बांध, ह्या शहरात रोजमजुरी कर म्हणला. असल्या नसल्याला हा तुवा दोस्त जिंदा आहे. फक्त आवाज दे म्हणला.

आमची दोन-तीन पालं रोडच्या काठाला उभी. त्याच शहरात आम्ही मजुरी करून जगू लागलो. हाप्ताभर काम चालायचं नाही. चार दिवस काम चालायचं, तीन दिवस बंद राहायाचं. उसनंपासनं करून घर धकवावं लागायाचं.

आडीअडचणीला मी पन्नास-शंभर रुपये रत्नाकरकडून आणायचो. आनलेले पैसे परत त्याला काम झालं की नेऊन देयाचो. जास्त नाही पण चारपाच डाव असं झालं असंन. असाच संध्याकाळी मी त्यांच्या घरी गेलो. तो जेवत होता.

मी- ‘आरे काय करीत आहेस?’

‘जेवत आहे तू जेवून आलास का?’

‘नाही.’

‘जेवतो का?’

‘असेल तर जेवतो.’

‘आहे का गं सैपाक.’

कोणाचाच आवाज आला नाही. मी भी बसलो वाट बघत, ताट  आलंच नाही. त्याची साली पाहुणी आली होती. रत्नाकरने तिला विचारलं. तिनं सांगितलं, ‘सैपाक संपला.’

थोडा वेळ थांबल्यावर बघतो तर काय रत्नाकरची बायको, साली, मूल तिघं डायनिंग टेबलावर बसून जेवत होते. ते माझ्या आन्‌ रत्नाकरच्या लक्षात आलं. मला माझ्या आवकातीची व परिस्थितीची जाणीव झाली.

पुढे मी त्याच्या घरी गेल्यावर, तो मला रोडवर आणायाचा, किती पैसे पाहिजेत बोल म्हणायाचा. टपरीवर चहा पाजून हाकलून देयाचा. मह्या समदं ध्यानात आलं. एक दिवस तो कार घेऊन भेटला. आता तू घराकडे येत जाऊ नकोस म्हणाला.

 ‘का बरं?’

‘नको येत जाऊ तू आमच्याकडे. तुझा फाटक्या कापडातला आवतार बघून आम्हांला लाज वाटते.’

‘एक दिवस तुम्ही फाटक्या कापडात होता.’

‘आता नाही.’

‘तुला आपल्या दोस्ताची लाज वाटते!’

‘मी कोणत्या कॉलनीत राहतो माहीत नाही तुला. समदे लोक हसतात. माझी बायको मला बोलते. तुझ्यामुळे मला मानसिक त्रास होतो. तू माझ्या घरी येत जाऊच नको.’

आणि तो कार घेऊन गेला. पुढे मी त्याच्या घरी जाणे सोडून दिले.

दोन वर्षांनंतर कळमनुरीच्या बाजारात त्याचा भाऊ मला भेटला. मी भेटल्यावर त्याला खूप आनंद झाला. मला हॉटेलात चहा पाजला. धोतऱ्याच माणूस पण खूपच चांगला. ह्यापूर्वी आमच्या बऱ्याच भेटी झाल्या होत्या. रत्नाकरसोबत दोन तीन डाव मी त्याच्या घरीसुद्धा जाऊन आलो होतो. शेतकरी माणूस, जेमतेम परिस्थिती पण त्यांच्यात आतोनात प्रेम होतं. माणसाला माणूस म्हणून समजून घेण्याची ताकद होती. चहा पिणं झाल्यावर त्याने रत्नाकरचा विषय छेडला.

तो बोलत होता आन्‌ मी ऐकत होतो, ‘अशोकराव ज्याला आम्ही काबाडकष्ट करून शिकविला, ज्याच्यावर आमचा भरोसा होता, त्या आमच्या भावानं घर पुढं नेवावं असी आमची इच्छा होती, पण तो निसटला. नोकरीला लागला, शहरात राहायला गेला. त्याने बंगला बांधला, आता तो मोठा माणूस झाला. आई, बाबा गेलते राह्याला, त्याच्याजवळ आई-बाबाला राहता येत नाही म्हणे तिथं. खेड्यातली लेडं. आडाणीचोट माणसांना तेथे सपादून घेतलं नाही, हाकलून दिलं राव. पहिले तरी गावाकडे आला की पैसे आदले देयाचा. मायबापाला मह्या गळ्याभोवती टाकून, शिकवून सवरून निसटला बेट्टा. अशोकराव भेटला कवा तर त्याला समजावा, सांगा. मही खूप आबाळ चालली म्हणून.’ तो बोलत होता, मी ऐकत होतो.

शिकून माणसं परिस्थितीचे भान ठेणार नसतील, रिश्ते नाते तोडणार असतील, माणूस आन्‌ माणुसकी त्यांना समजणार नसेल तर असल्या शिक्षणाचा काय उपयोग? बापाची हाडं जाळून ताजमहाल उभा करण्यासारखी ही गोष्ट नाही का? दहा-बारा वर्षांनंतर आता त्याच कॉलेजमध्ये माझं भाषण होतं. त्याने प्रास्ताविकात हा माझा लंगोटीयार राष्ट्रीय लेखक आहे, राज्यातल्या पाच विद्यापीठांत त्याची पुस्तकं शिकविली जातात वगैरे असं बरंच काही सांगितलं, माझी ओळख करून दिली.

कार्यक्रम संपल्यावर त्याने घरी येण्याचा खूप आग्रह धरला, पण आता माझ्याकडे वेळच नव्हता. मला चंद्रपूर गाठायचे होते. असतो काळाचा महिमा... उलटापालटा समदं झेलत आयुष्य चालायचं असतं.

Tags: साहित्य ललित अशोक पवार literature lalit ashok pawar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके