डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अमेरिकेच्या इराकबाबत व इस्रायलबाबतच्या धोरणांना चावेझ यांचा विरोध आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावरून जॉर्ज बुश यांचा उल्लेख ‘सैतान’म्हणून करणारे चावेझ हे एकमेव राष्ट्रप्रमुख असावेत. आपल्या स्वत:च्याच नव्हे तर जगातल्या अनेक देशांत चावेझ लोकप्रिय असून,जगातले विचारवंत व्हेनेझुएलातल्या घडामोडींकडे लक्ष ठेवून असतात. प्रसिद्ध विचारवंत एजाज अहमद यांच्यामते जगात दहा ते बारा देश असे आहेत, जिथे चावेझ निवडणुकीला उभे राहिले तर विजयी होऊ शकतात.

महाराष्ट्राच्या एकतृतीयांश लोकसंख्या पण तिप्पट क्षेत्रफळ असलेल्या व्हेनेझुएला नावाच्या देशातल्या सार्वमतावर जगाचं लक्ष एवढं का केंद्रित झालेलं असावं? या सार्वमतासाठी एकोणचाळीस देशांनी आपले निरीक्षक पाठवले होते आणि हे सार्वमत खुल्या वातावरणात पार पडणार नाही अशी हवा अमेरिकाधार्जिण्या माध्यमांतून पसरवली जात होती. चावेझ हे हुकूमशहा आहेत आणि सदासर्वकाळ सत्तेत राहण्याच्या खटाटोपापायी त्यांनी सार्वमताचा हा उद्योग आरंभला आहे, असं चित्र माध्यमांतून रंगवलंजात होतं. चावेझ हे सार्वमत हरले तर ते असा निकाल सहजासहजी स्वीकारणार नाहीत असंही म्हटलं जात होतं.

व्हेनेझुएला हा तेलसंपन्न देश आहे आणि तिथले अध्यक्ष ह्यूगो चावेझ हे यापूर्वी नऊ वेळा निवडणुका वा सार्वमतांना सामोरे गेले आहेत आणि 1998 पासून दरवेळी भरघोस मतांनी विजयी झाले आहेत. चावेझ यांची धोरणं बऱ्याचअंशी मुक्त भांडवलाच्या विरोधी असून, या अशा भांडवलाच्या हालचालींवर त्यांनी बरेच निर्बंध लादले आहेत वा अटकाव केला आहे. एवढंच नव्हे तर व्हेनेझुएलाच्या तेलाच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा त्यांनीसमाजकल्याणाच्या योजनांकडे वळवला आहे. मोफत वा स्वस्त शिक्षण आणि आरोग्य, अतिगरीब जनतेसाठी अन्नपुरवठा अशा गोष्टींचा यात समावेश आहे.

अमेरिकेच्या इराकबाबत वा इस्रायलबाबतच्या धोरणांना चावेझ यांचा विरोध आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावरून जॉर्ज बुश यांचा उल्लेख ‘सैतान’म्हणून करणारे चावेझ हे एकमेव राष्ट्रप्रमुख असावेत. आपल्या स्वतःच्या नव्हे तर जगातल्या अनेक देशांत चावेझ लोकप्रिय असून, जगातले विचारवंत व्हेनेझुएलातल्या घडामोडींकडे लक्ष ठेवून असतात. प्रसिद्ध विचारवंत एजाज अहमद यांच्यामते जगात दहा ते बारा देश असे आहेत, जिथे चावेझ निवडणुकीला उभे राहिले तर विजयी होऊ शकतात. मात्र आंतरराष्ट्रीय भांडवलाचे प्रवर्तक चावेझवर खूष नाहीत. खुद्द व्हेनेझुएलातली नव्वद टक्के माध्यमं खाजगी आणि बऱ्याच अंशी अमेरिकाधार्जिणी आहेत, ती चावेझविरोधी आहेत. व्हेनेझुएलातल्या घटनेत काही मूलभूत बदल घडवून तिच्यातल्या अनेक (सुमारे वीस टक्के) कलमांत बदल घडवून आणण्यासाठी, 2 डिसेंबर 2007 या दिवशी सार्वमत घेण्यात आलं. मात्र या सार्वमतात चावेझ यांचा थोडक्यात पराभव झाला. चावेझ यांच्या बाजूने 49.3 टक्के तर विरोधी बाजूने 50.7 टक्के मतं पडली.

सार्वमत कशाबद्दल होतं?

सार्वमतातला महत्त्वाचा मुद्दा अध्यक्षीय मुदतीवरची बंधनं काढून टाकण्याविषयी होता. आताच्या घटनेप्रमाणे अध्यक्षांना दोनदाच म्हणजे एकूण बारा वर्षांसाठी सत्तेवर राहता येतं.हे बंधन काढून टाकण्याच्या इथे प्रस्ताव होता. म्हणजे नव्या बदलाप्रमाणे अध्यक्षांना कितीही वेळा निवडणूक लढवता आली असती. दुसरं म्हणजे जर देशात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर निर्बंध घालणारे अनेक प्रकारचे कायदे अध्यक्षांच्या हातात असावे, असा एक प्रस्ताव सार्वमतात होता. ह्या दोन्ही गोष्टी अनेकांना खटकल्या होत्या. तरीपण या सार्वमतात असलेल्या काही कलमांचा इथे आवर्जून उल्लेख केला पाहिजे.

कलम 21 : एखाद्या व्यक्तीच्या लैंगिक वागणुकीवरून किंवा त्याच्या आरोग्याच्या परिस्थितीवरून कोणताही भेदभाव केला जाणार नाही. अपंग, तृतीयपंथी किंवा समलिंगी व्यक्तीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बहुतेक वेळा नकारात्मक असतो.यावर हे उत्तर आहे.

कलम 64 : व्हेनेझुएलातल्या प्रत्येक व्यक्तीला स्वतः घर असण्याचा अधिकार प्रस्थापित केला जाईल.

कलम 87 : जे व्यावसायिक असंघटित क्षेत्रात आहेत आणि / वा ज्यांना नोकरदारांप्रमाणे सुरक्षा नाही, त्यांच्या सामाजिक सुरक्षेसाठी स्वतंत्र निधी स्थापन करणं. उदा. टॅक्सीचालक, छोटे व्यावसायिक, असंघटित क्षेत्रातले कामगार यांसारख्यांसाठी अशा योजनेचा उपयोग होणार होता.

कलम 90: आठवड्याच्या कामाच्या तासात घट करणं. कामाचे तास व्हेनेझुएलाच्या कायद्याप्रमाणे 44 होते, ते 36 वर आणणं.

कलम 272: कैद्यांचे अधिकार जपण्यासाठी प्रयत्न करणं आणि त्यांच्या पुनर्वसनावर भर देणं.

एकविसाव्या शतकाचा समाजवाद व्हेनेझुएलामध्ये आणणं, हा या घटनाबदलामागचा महत्त्वाचा हेतू आहे असं चावेझ यांचं म्हणणं होतं आणि चावेझ यांच्या धोरणांची दिशा पाहता, त्यापेक्षा वेगळं त्यांना अभिप्रेत होतं असं म्हणता येणार नाही. कारण या धोरणांच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू आहे आणि त्यामुळेच अमेरिकेचा त्यांच्यावर रोष आहे. मात्र काही क्षेत्रात राष्ट्रीयीकरण झालं असलं तरी आतापर्यंत उत्पादनांचं सरसकट राष्ट्रीयीकरण त्यांनी केलेलं नाही. गोरगरीब जनतेसाठी काही कल्याणकारी पावलं उचलण्यापर्यंतच त्यांनी मजल गाठली आहे.मात्र लॅटिन अमेरिकेतल्या देशांना एकत्र आणणं; आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक यांना शह देत पर्यायी बँकेची स्थापना, अमेरिकेच्या खुल्या बाजाराच्या धोरणांवर आधारित करारांना विरोध करणं, यात चावेझ यांनी सतत पुढाकार घेतल्याने चावेझ यांचं नेतृत्व अमेरिकेच्या डोळ्यांत सतत सलतं आहे.

पराभवाची कारणं

यातले अनेक प्रस्ताव आकर्षक असले तरी पुरेसं लक्ष न देताच शब्दबद्ध केले होते.अनेक ठरावांची मोटलीदेखील नीट लक्ष न देताच बांधली होती. यातल्या अनेक प्रस्तावांसाठी घटनेत बदल करण्याची आवश्यकता नव्हती. चावेझ समर्थकांच्या फाजील आत्मविश्वासामुळे, पुरेशा संख्येने चावेझ समर्थक मतदानाला बाहेर पडले नाहीत आणि त्यामुळे हा पराभव झाला असे अनेकांनी म्हटलं आहे.

त्यांच्या बाजूने कोण आहे आणि विरोधात कोण आहे? सरकारी पक्ष किंवा विरोधक या साऱ्यांनी जनमताच्या ज्या काही चाचण्या प्रसिद्ध केल्या आहेत, त्यातून स्थूलमानाने असं दिसतं की, गोरगरीब जनता ही बहुतांशी चावेझबरोबर असून चावेझचे विरोधक मध्यमवर्ग उच्चवर्गात अधिक प्रमाणात आहेत. याची कारणं उघड आहेत, चावेझच्या ‘एकविसाव्या शतकातल्या समाजवादा’च्या भाषेने उच्चवर्गीय आणि मध्यमवर्गीय धास्तावले आहेत. वीज आणि दूरसंचार क्षेत्रांत चावेझने राष्ट्रीयीकरण घडवल्याने या असुरक्षिततेच्या भावनेत भर पडली आहे.देशाच्या तेलउद्योगातला अतिरिक्त पैसा चावेझनी आरोग्य, शिक्षण आणि कल्याणकारी कामांकडे वळवल्याने गुंतवणूकदार वर्गामध्ये नाराजी पसरली आहे. मात्र चावेझच्या कारकिर्दीत दारिद्र्यरेषेखालील लोकांचं प्रमाण चव्वेचाळीस टक्क्यांवरून तीस टक्क्यांपर्यंत खाली आलं आहे. शिक्षण, आरोग्य यांबाबत वर म्हटलंच आहे. भाववाढीचा हिशोब जमेस धरूनही दर माणशी केल्या जाणाऱ्या सार्वजनिक खर्चात 314 टक्के वाढ झाली आहे.

रोमन कॅथलिक चर्चने चावेझला विरोध केला आहे. या विरोधाची कारणं समजण्यासारखी आहेत. चावेझ यांची भाषा लॅटिन अमेरिकेत साठीच्या दशकात लोकप्रिय असणाऱ्या लिबरेशन थिऑलॉजी नावाच्या पंथाच्या समर्थकांसारखी आहे.ख्रिस्त हा एक श्रेष्ठ क्रांतिकारक होता, असं या पंथाच्या लोकांनी म्हणणं आहे. हे चर्चला अमान्य आहे. या पंथातल्या ख्रिश्चनांनी साठीच्या दशकात व नंतरजनतेच्या बाजूने आणि त्या त्या देशातल्या हुकूमशहांच्या विरुद्ध लढे दिले होते आणि अमेरिकेच्या झोंडशाहीला विरोध केला होता. यासाठी चर्चबरोबर त्यांनी उभा दावाही पत्करला होता. व्हॅटकिनमधले आत्ताचे पोप सुरुवातीपासूनच लिबरेशन थिऑलॉजीच्या विरोधात होते. मात्र इक्काडोरचे आताचे अध्यक्ष राफेल कोरिया हे स्वत:च लिबरेशन थिऑलॉजीचे पुरस्कर्ते आहेत. शिवाय बाजूच्या पॅराग्वेमध्ये ‘गरीब जनतेचा बिशप’म्हणून ओळखले जाणारे ‘फर्नांडो लूगो’हे एप्रिल 2008 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी उभे आहेत.याला चर्चचा प्रखर विरोध आहे. चावेझ आणि बाकीचे नेते ख्रिश्चनांच्यामध्ये फूट पाडत आहेत असं चर्चचं म्हणणं आहे.तसंच काही मानवाधिकार संघटना, विचारस्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या संघटना चावेझच्या विरोधात होत्या.यातल्या सर्वच अमेरिकाधार्जिण्या होत्या असं नव्हे; पण या संघटनांचा विचार, इतिहास आणि विरोधाची कारणं हे स्वतंत्रपणे तपासावं लागेल.

चावेझ यांचा जर या निवडणुकीत पराभव झाला तर चावेझसमर्थक काहीतरी दंगल घडवून आणतील किंवा कसंही करून चावेझ यात काहीतरी गबडत करतील असं चित्र माध्यमांनी पसरवलं होतं. पण तसं काहीच घडलं नाही. उलट चावेझनी आपल्या समर्थकांना शांत राहण्याचं आवाहन केलं.विरोधकांचं अभिनंदन केलं. चावेझनी सार्वमतातला आपला पराभव सहज स्वीकारल्याने विरोधकांची तोंडं बंद झाली आहेत.आपण सार्वमताचा आदर करतो; विरोधकांनीही असाच आदर करावा असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

व्हेनेझुएलातली लोकशाही आता अधिक सुदृढ झाली आहे, असा याचा अर्थ होतो असं चावेझनी म्हटलं आहे. विरोधकांनी लोकमताचा आदर करावा असा टोला चावेझनी लगावण्यामागे काही इतिहास आहे. 2004 साली चावेझनी अध्यक्षपदावरून पायउतार व्हावं यासाठीएक सार्वमत घेतलं गेलं होतं. दहा लाख सह्या जमा केल्या तर अध्यक्षांना सत्तेवरून पायउतार करण्यासाठी सार्वमत घेण्याची व्हेनेझुएलाच्या घटनेत तरतूद आहे. (ही घटना चावेझच्या काळात लिहिली गेली.) 2004 सालचं सार्वमत जेव्हा चावेझ विरोधक हरले होते (म्हणजे चावेझ यांनी सत्तेवर राहण्याच्या बाजूने जनतेने कौल दिला होता) तेव्हा त्यांनी ते स्वीकारायला नकार दिला होता. यापूर्वीच्या सार्वमतांत अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर आणि त्याची संघटना (कार्टर सेंटर) यांनी निरीक्षकांचं काम बजावलं होतं आणि ह्या निवडणुका व्यवस्थित पार पडल्या असल्याचा निर्वाळा दिला होता. 2005 साली तिथल्या काँग्रेसच्या निवडणुकांत आपण निवडणूक हरणार आहोत असं विरोधकांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी ऐनवेळी निवडणुकांवर बहिष्कार टाकला. 

कार्टर सेंटर आणि युरोपीय युनियनचे निरीक्षक या विरोधकांच्या निर्णयावर नाराज होते. चावेझ हे हुकूमशहा असल्याने त्यांनी हा सार्वमताचा घाट घातला, असा जो प्रचार पश्चिमी कॉर्पोरेट माध्यमांतून सुरू होता (आणि आपल्याकडच्या माध्यमांनी त्याचीच री ओढली होती) तो अर्थातच खरा नव्हता असं मत अनेक विचारवंतांनी व्यक्त केलं आहे. एक कारण तर साधं आहे की चावेझना सत्तेवर राहण्यासाठी लोकशाही निवडणुकांखेरीज कोणता मार्ग हवा होता असं सार्वमतांत वा इतरत्र कुठेच आढळून आलं नाही. दुसरीकडे या सार्वमतात असे अनेक मुद्दे होते की ज्यांच्यातून हे स्पष्ट होत होतं की सत्तेचं विकेंद्रीकरण चावेझला अभिप्रेत होतं. अनेकविचारवंतांनी अमेरिकेतल्यापेक्षा व्हेनेझुएलामधली लोकशाही सुदृढ असल्याचं मत व्यक्त केलं होतं.एकोणचाळीस देशांतल्या निरीक्षकांखेरीज युरोपीय युनियन, जिमी कार्टर यांचं ‘कार्टर सेंटर’आंतरराष्ट्रीय वकिलांचं गिल्ड अशा अनेक संघटना सार्वमताचं जवळून निरीक्षण करत होत्या.

सार्वमत आपण हरणार असं गृहीत धरून चावेझच्या विरोधकांनी फ्रॉड (गैरव्यवहार) अशी अक्षरं छापलेली टी शर्टस् आधीच छापून ठेवले होते आणि अशा तऱ्हेने बोभाटा करण्याचा त्यांचा विचार होता. मात्र विरोधकाकांचाच सार्वमतात विजय झाल्यामुळे हा बेत फसला. चावेझ यांचा 1.4 टक्क्यांनी पराभव होण्याऐवजी 1.4 टक्क्यांनी विजय झाला असता तर नेहमीप्रमाणे विरोधकांनी गैरव्यवहार झाल्याचे आरोप केले असते, असं मत चेसा बोदिन या व्हेनेझुएलासंबंधीच्या राजकीय अभ्यासकाने म्हटलं आहे. सार्वमतांनंतरची विरोधकांची वागणूक समंजस आहे, पण ते एकसंध नाहीत.त्यांच्यात अनेक प्रवाह आहेत, आणि चावेझच्या कारकिर्दीत विरोधकांनी बजावलेली भूमिका नकारात्मक आहे.

2002 साली चावेझविरोधी जो लष्करी उठाव झाला होता त्यात त्यांची वागणूक लोकशाहीविरोधी होती; दरवेळी ते निवडणूक हरत होते, तेव्हा त्यांनी गैरप्रकार झाल्याचे आरोप केले होते आणि लोकशाही प्रक्रियेला खीळ घातली होती असं बोदिन यांनी म्हटलं आहे.(विरोधकांपैकी अनेक गटांना अमेरिकेचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पाठिंबा आहे असं अनेकदा स्पष्ट झालं आहे.) अमेरिकेचं शासन आणि त्याच्या अखत्यारीतल्या यु.एस.एड किंवा नॅशनल एन्डोमेंट फॉर डेमॉक्रसीसारख्या संस्था विरोधी गटांना निधीवाटप करत असतात हे सर्वज्ञात आहे; पण प्रत्येक संघटनेबाबत हे खरं असतंच असं नाही; अनेकवेळा अशा बातम्या ह्या अफवा असू शकतात; मात्र तिथे अमेरिकेच्या हस्तक्षेपाचा धोका अगदी खरा आहे असं बोदिन यांचं मत आहे. सुमाते या नावाची आणखी एक संस्था व्हेनेझुएलामध्ये चावेझविरोधी कामामध्ये गुंतलेली आहे. अमेरिकेचं शासन आणि सुमाते यांच्यात फंडींगच्या व्यवस्था असल्याचं दोघांनीही मान्य केलं आहे. सुमातेच्या संस्थापक मारियाकोरीना माचाडो यांनी अध्यक्ष बुश, कोंडोलिसा रईस आणि वॉशिंग्टनमधल्या इतर अनेक अनेक उच्चपदस्थांच्या गाठीभेटी घेतल्याचे वृत्त अनेकदा प्रसिद्ध झालं आहे.

या निकालानंतर काय होईल हे सांगणं कठीण आहे. चावेझ भांडवलशाहीशी तह करतील की नव्याने पक्षबांधणीवर भर देऊन, आपलं स्थान बळकट करून पुन्हा आपला कार्यक्रम पुढे नेतील? अमेरिका या घटनांची कशी दखल घेईल आणि आपली रणनीती कशी आखील? हे सर्व नीट पहावं लागेल, ज्या कसोट्या वापरून आपण एखाद्या देशाच्या लोकशाहीसंबंधी बोलत असतो त्या निकषांचा आपल्याला जरूर विचार करावा लागेल. त्या देशाची धोरणं खरंच जनतेला धार्जिणी आहेत की नाहीत; त्यातून देशाची साधनसंपत्ती कुठून कशी कुणाच्या खिशात जात असते; त्यातून जनतेचं सबलीकरण होतं की विशिष्ट हितसंबंधांचं होतं, हे प्रश्न आपल्याला विचारावे लागतील. आपण ह्या कसोट्या न वापरताच अनेकदा नेत्यांची निवड करतो आणि मग नरेंद्र मोदी, जॉर्ज बुश, सर्कोझी (फ्रान्स), टोनी ब्लेअर असे कोणतेही नेते विजयी होऊ शकतात. युद्धं, जातीय, धार्मिक वा वांशिक दंगली, असंख्य माणसांच्या जिवाला धोका, संपत्ती कुठेतरी गायब होणं हे सारं संभवू शकतं आणि असे भीषण व्यवहार करणाऱ्यामधूनच आपल्याला नेत्यांची निवड करायची असते, हेच किती भीषण आहे! या पार्श्वभूमीवर लॅटिन अमेरिकेत निर्माण झालेले नवे पर्याय आणि त्यांचे लोकशाहीचे लढे हे आपल्याला बरंच काही शिकवून जातात- जरी त्यांचा मार्ग खडतर असला तरी!

Tags: टोनी ब्लेअर सर्कोझी (फ्रान्स) जॉर्ज बुश नरेंद्र मोदी अशोक राजवाडे खनिज तेल अमेरिका व्हेनेझुएला ह्यूगो चावेझ weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके